पेशवाईची अखेर आणि दुसरा बाजीराव

मनो's picture
मनो in जनातलं, मनातलं
6 Feb 2018 - 6:36 am

दुसऱ्या बाजीरावाने मराठ्यांचे राज्य घालवले अशी एक सर्वसाधारण समजूत आहे. तो अखेरचा पेशवा असल्याने या समजुतीला बळ मिळते. त्या काळाबद्दल खोलवर वाचन करताना (एकत्रित यादी शेवटी दिली आहे) मला असा आढळलं की ही समजूत खोटी आहे. मागच्या भागात वल्ली आणि गामा पैलवान यांनी थोडक्यात प्रतिसाद लिहिले आहेतच, पण मला असे वाटले की याबद्दल सविस्तर लिहायला हवे. म्हणून हा सारांश इथे मांडतो आहे. राज्य बुडवण्यासाठी दुसरा बाजीराव हा कारणीभूत नसला तरी याचा अर्थ असा नाही की तो शूर होता किंवा त्याच्या हातून चुका झाल्या नाहीत. त्याने आपल्या कुवतीनुसार धडपड केली आणि अखेरपर्यंत त्याला आपण काय गमावले याची जाणीव होती. राज्य गमावण्याची प्रक्रिया आधीपासूनच सुरु झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज अथवा थोरला बाजीराव याचे काही गुण जरी त्याच्या अंगी असते तर त्याला कदाचित ती प्रक्रिया थांबवता आली असती आणि राज्य टिकवता आले असते. त्याचा दोष इतकाच दिसतो की त्याच्या अंगी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन लोकोत्तर यश मिळवण्याचे गुण नव्हते आणि अशी संधी त्याला आली असताना ते शिवधनुष्य पेलण्यास तो असमर्थ ठरला.

या मराठेशाहीच्या अंताची सुरवात १८१७ मध्ये नाही तर कधी झाली होती, दिल्ली ताब्यात घेऊन आख्या भारताचा कारभार चालवणाऱ्या मराठा सत्तेचा ऱ्हास कधी झाला, हे प्रश्न मग उभे राहतात. फक्त मराठ्यांच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील हा निर्णायक क्षण (decisive moment) म्हणजे १८०३ असे मला वाटते. या वर्षानंतर मराठ्यांचे विधिलिखित अटळ बनले. ते टाळणे शक्य होते पण फार अवघड होते. असाच एक दुसऱ्या महायुद्धातील असा निर्णायक क्षण म्हणजे स्टालिनग्राडचा लढा आणि नंतरची कर्स्कची लढाई (ऑगस्ट १९४३). इथे जर्मन लष्कराने आक्रमक पुढाकार गमावला (lost operational initiative) आणि पूर्व आघाडीवर त्यांना सतत बचावात्मक भूमिका घेणे भाग पडले. पूर्व आघाडीवर विजयाची शक्यता कर्स्क इथे पूर्ण नाहीशी झाली. त्यानंतर २ वर्षे हिटलरच्या मृत्यूपर्यंत लढाई चालू होती. पण जर्मनीचा पराभव दिवसेंदिवस अटळ होत गेला.

मराठयांच्या बाबतीत एक गोष्ट दिसते की दौलतीस (मग ती पेशवेपद, होळकर, शिंदे अशी कोणतीही असो) पुढचा वारस कोण होणार या प्रश्नावर सतत अंतर्गत कलह चालू राहिला - . त्याचा फायदा घेऊन इंग्रजांनी सर्वांचे लष्करी पराभव केले आणि हा देश ताब्यात घेतला. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इंग्रजांनी १८०३ साली दिल्ली मराठ्यांच्या ताब्यातून घेतली. इंग्रजांनी मोगलांचा पराभव करून नव्हे तर मराठ्यांचा पराभव करून दिल्ली घेतली. नागपूरकर भोसल्यांना १८०३ साली ओरिसा, कटक हा भाग इंग्रजांना द्यावा लागला. त्यामुळे भारताची सत्ता इंग्रजांनी मराठ्यांकडून मिळवली हे स्पष्ट दिसते.

आपण जर सवाई माधवरावाच्या जन्माच्या वेळची (ई. स. १७७४) परिस्थिती पाहिली तर आपल्याला नंतरच्या दुसऱ्या बाजीरावाच्या वेळेसारखीच स्थिती दिसते. थोरल्या माधवरावाच्या वेळेपासूनच (१७६१-१७७२) दोन प्रतिस्पर्धी पक्ष पेशवेदरबारात उभे राहिले होते. त्या वेळी नारायणरावाच्या खुनात सहभाग असणाऱ्या रघुनाथरावास पेशवाईचा धनी म्हणून मानणे बऱ्याच जणांना मान्य नव्हते. म्हणून रघुनाथराव इंग्रजांच्या आश्रयास गेले. त्या वेळी जनमत नाना फडणीसांच्या मागे उभे राहिले. महादजी शिंदे यांनी आपले सैन्यबळ नानांच्या मागे उभे केले. मुंबईकर इंग्रजांचा पराभव महादजी शिंदे यांनी वडगाव इथे केला. सालबाईच्या तहानुसार इंग्रजांनी माघार घेतली. रघुनाथरावास नाना सांगेल ते मान्य करून कोपरगावास गोदावरीकाठी (म्हणजे गंगेकाठी) राहावे लागले. इंग्रजांचा पराभव जरी झाला असला तरी त्यांचा संपूर्ण नाश झालेला नव्हता, मुंबई किंवा कलकत्ता मराठयांच्या ताब्यात आलेले नव्हते. उलट इंग्रज दिवसागणिक अजूनच बलवान होत होते. त्यांनी १७९० च्या दशकात निझामाचा दरबार आणि राजकारण ताब्यात घेतले (जे मराठ्यांना ५० वर्षे जमले नव्हते). त्यांनी टिपू सुलतानाचा पराभव करून त्यालाही ठार मारले. ह्या दोन्ही घटना अवघ्या १० वर्षातील आहेत.

रघुनाथरावाचा जेष्ठ पण दत्तक मुलगा अमृतराव. औरस पण लहान पुत्र दुसरा बाजीराव. त्याचा लहान भाऊ चिमाजीअप्पा. बाजीरावाची आई आनंदीबाई यांचे पत्रात 'कारभारी (म्हणजे नाना) मर्द माणूस. बाजीरावाच्या जन्मावेळी धार किल्यात होतो तें किल्ल्यावर तोफा चालवल्या' असा उघड वैराचा आरोप आहे. बाजीरावाच्या अभ्यासाविषयी 'बाजीराव यांचा स्वभाव हूड. फार खेळतात. एकदा मेलेला उंदीर सापडला त्यास काड्या जमा करून अग्नी लावला. पूर्वी गुरुजी होते त्या वेळेस असे नव्हते' अशी तक्रार केलेली दिसते. एकंदरीत नानास 'मूल शहाणे होऊ नये' असे वाटते हा आनंदीबाईंचा ग्रह होता. त्यामुळे तीन बंधूंच्या मनात नाना फडणिसाबद्दल द्वेष नाही तरी किमान अविश्वास नक्कीच भरलेला होता.

नाना आणि सवाई माधवराव
विकिपीडियावरून साभार
nana

नाना फडणीसांनी सवाई माधवरावाच्या सुरक्षेच्या नावास्तव त्याला नेहमी कडेकोट बंदोबस्तात ठेवले. पेशवाईचे सर्व राजकारण नानांनी चालवले. नानांनी या काळात बराच पैसाही जमवला. उदाहरणार्थ कल्याणच्या सुभेदाराच्या दत्तक पुत्रास मान्यता देण्यासाठी पेशव्यास १ लक्ष (खासगी की सरकारी ते कळत नाही) आणि नानास २,००० रुपये मिळालेले अधिकृत कागदात दिसतात. यामुळे नानाच्या प्रतिस्पर्धकांच्या मनात पेशवा आणि त्याला कडक नियंत्रणात ठेऊन मिळणाऱ्या भरपूर कमाईची संधी असा एक पायंडा पडला. प्रसंगी निजाम किंवा इंग्रज यांची मदत नाना फडणीसांनी घेतली (उदाहरणार्थ टिपूविरुद्ध). पेशव्यांशी निष्ठा किंवा राष्ट्राशी निष्ठा हा प्रकार त्या काळात कमी झाला. या ना त्या मार्गाने आपले कमाईचे स्थान अबाधित राखणे हा प्रकार सुरु झाला. गरगरीत वाटोळा रुपया हाच खरा देव अशी त्या काळची परिस्थिती बनली.

सवाई माधवरावाच्या राज्याच्या अखेरच्या काळात महादजी शिंदे सैन्यासह पुण्यास आले. आधी कबूल केलेली सैन्यखर्चाची बाकी वसूल करणे आणि कारभारात महादजी शिंदे याना सहभागी करून घेणे अश्या शिंद्यांच्या रास्त मागण्या होत्या. नानास भीती पडली की शिंदे आपल्याला कैद करतात अथवा सैन्याचा बळावर आपल्या मागण्या मान्य करवून घेतात की काय, पण शिंद्यानी सामोपचाराने आपल्या मागण्या मान्य करवून घेण्याचे प्रयत्न केले. पेशव्यांसही स्वतंत्रपणे वागण्यास महादजीने प्रोत्साहन दिले. नानांनी महादजीबरोबरचे वाटाघाटीचे गुऱ्हाळ चालतच ठेवले. त्याचा लवकर निर्णय लागू दिला नाही. त्यामुळे शिंद्यांची मोठी फौज निष्कारण गुंतून पडली. त्यातच महादजी शिंदे यांचे पुण्यात निधन झाले. त्यांच्या फौजेचा पगार देण्यास पैशाची कमी पडू लागली. त्यातूनच निजामाकडून खंडणीची बाकी वसूल करण्यासाठी खर्ड्याची स्वारी करण्यात आली. बाजीरावासही नानाने तुमची व्यवस्था स्वारीनंतर करून देऊ असे फक्त आश्वासन दिले.

या परिस्थितीत अनेक गुंते पडून असताना नानांचे दुर्दैव म्हणून सवाई माधवरावाचे निधन झाले. या वेळी बाजीरावाबद्दल कुणालाच फार माहिती नसल्यामुळे पेशवे घराण्याचा अस्सल वारस म्हणून सरदार आणि जनतेची सहानुभूती बाजीरावाच्या बाजूने होती. नानांनी बाजीरावास पुण्यास आणून त्याच्याबरोबर जुळते घेऊन राज्यकारभार करणे हा योग्य मार्ग सोडून आपले स्थान अबाधित राखण्यासाठी आपल्या नियंत्रणात राहणारा दत्तक पेशवाईच्या गादीवर बसवण्याची धडपड चालू केली. त्यांना लोकांचा पाठिंबा मिळेना. बाजीरावास कळून चुकले की नाना आपल्यास पेशवा बनू देणार नाहीत. त्याने मग शिंद्यांशी गुप्त करार केला की मला पुण्यास पेशवा बनवा म्हणजे मी तुम्हास दीड कोट रुपये देतो. इकडे नानास कळून चुकले की बाजीरावास आणल्याशिवाय पेशवाईचा गुंता सुटणार नाही. म्हणून शेवटी परशुरामभाऊ पटवर्धन यांनी बाजीरावास पुण्यास आणले. बाजीरावाकडे शिंद्यास देण्यासाठी सरकारी खजिन्यात पैसे नव्हते. विल्यम टोन हा यावेळी १७९६ मध्ये बाजीरावापाशी होता. त्याने लिहून ठेवले आहे- 'मध्यंतरीच्या भानगडी चार-पाच महिने चालू असतानाच नानाने सरकारी खजिन्यातील सर्व मत्ता युक्तीने लांबवली होती. निदान २० कोट तरी रोख रक्कम खजिन्यात असावी असा त्या वेळी जाणत्या मंडळींचा तर्क होता'. बाजीरावाने शिंद्यास म्हणावे की मला परशुरामभाऊ यांनी आणले, तुम्ही नव्हे असा प्रकार सुरु झाला. म्हणून शिंदे म्हणू लागले की आम्हास परवानगी द्या, आम्ही नानाकडून पैसे वसूल करतो. महादजी शिंदे यांच्या बायकांनी त्यांचे वारस दौलतराव शिंदे यांच्यावर मारेकरी घातले. या सर्व घोळात कित्येक महिने निघून गेले.

इकडे अहिल्याबाईनंतर होळकरांचे वारस तुकोजी होळकर हे आजारी होते. त्यांच्या मृत्यूनंतर थोरला मुलगा काशीराव हा सैनिकी मोहीम करण्यास शारीरिकदृष्ट्या असमर्थ होता, पण त्याचे तीन भाऊ मल्हारराव, विठोजी आणि यशवंतराव हे शूर होते. तुकोजी होळकरांनी मृत्यूसमयी काशीरावास वारस नेमले. काशीरावास दौलतराव शिंदे यांनी जवळ केले, त्यामुळे त्याच्या बाकी तीन भावाना भीती पडली की दौलतराव शिंदे होळकरांची दौलत काशीरावास गुंडाळून त्याच्याकरवी घशात घालतील. अशातच काशीरावाच्या संमतीने शिंद्यानी मल्हारराव होळकरावर हल्ला करून त्यास ठार मारले. त्यामुळे त्याचे दोन भाऊ शिंद्यांविरुद्ध बंड करून उठले. या आपसातल्या भांडणात नाना अथवा बाजीराव यांनी मध्यस्ती करून वेळीच हा संहार थांबवला नाही. शिंद्यांच्या फौजेच्या ताब्यात बाजीराव असल्याने शिंदे म्हणतील तसा कारभार चालू झाला. विठोजी होळकरास हत्तीच्या पायी देऊन मारण्यात आले.

जनरल वेलस्ली
pic2

होळकरांचा आपण सहज पराभव करू हा शिंद्यांचा अंदाज खोटा ठरवत यशवंतराव होळकराने शिंद्यांचा पराभव केला आणि पुणे लुटले. या वेळी बाजीरावास शिंद्यांचा आश्रय राहिला नाही आणि होळकरावर विश्वास ठेवता आला नाही. त्यामुळे त्याने मुंबईकर इंग्रजांची मदत मागवली. त्यानुसार आर्थर वेल्सली याने दक्षिणेत आणि जनरल लेक याने उत्तरेत अशी एकाच वेळी मोहीम सुरु केली.

१८०३ साली भारताच्या इतिहासातले एक निर्णायक वर्ष सुरु झाले.

मराठा तोफखाना (असईच्या लढाईत) - विकिपीडियावरून साभार
pic3

बाजीराव जरी इंग्रजांच्या ताब्यात असला तरी त्याचे शिंद्यांशी जवळचे संबंध होते. बाजीरावाने शिंदे आणि नागपूरकर भोसले याना एकत्र येऊन इंग्रजांचा पराभव करण्यास भरपूर प्रोत्साहन दिले. होळकराने सुरुवातीस या युद्धात सामील होण्यास नकार दिला, पण नंतर स्वतंत्र लढाई दिली. या पद्धतीने सर्व मराठा सैन्य एका बाजूस तर इंग्रज, निझाम आणि थोडे मराठा सरदार दुसऱ्या बाजूस असा निर्णायक लढा सुरु झाला. मराठ्यांचे लष्करी सामर्थ्य या वेळी इंग्रजांपेक्षा वरचढ होते ते कसे ते खालील यादीत दिसते.

दक्षिणेत इंग्रज फौज (जनरल वेल्सली) एकूण सुमारे ५०,०००
- ८,००० स्टुअर्ट
- ८,००० स्वतः वेल्सली
- ९,००० स्टीव्हन्सन
- ८,००० कॅपिटॉन मरे (सुरत)
- १५,००० सखो रुद्र, निजामाकडून

उत्तरेत इंग्रज फौज (जनरल लेक) एकूण सुमारे २०,०००
- ११,००० कानपुर येथे
- ३,५०० अलाहाबाद
- ५,५०० कटक, ओरिसा

शिंद्यांची फौज उत्तरेत
- १७,००० पायदळ २०,००० स्वार (जनरल पेरॉन)

शिंद्यांची फौज दक्षिणेत
- ५,००० पायदळ
- ८,००० गोपाळराव
- बाबा फडक्यांची हुजुरात

नागपूरकर भोसल्यांची फौज
- १०,००० ते २०,००० पायदळ
- ३०,००० ते ४०,००० स्वार

यशवंतराव होळकर
- ७०,००० स्वार (हा आकडा तपासून पाहण्यास मला वेळ झाला नाही)

असईची लढाई -विकिपीडियावरून साभार
pic10

मराठ्यांच्या हालचाली सावध, धीमेपणाने होत होत्या. दौलतरावाने प्रथम भोसले येऊन मिळण्याची वाट पाहिली. नंतर होळकरांबरोबर वाटाघाटी बराच काळ चालल्या. याउलट जनरल वेलस्ली हा त्यावेळी नवीन सेनापती होता. त्याला स्वतःची प्रगती करून घेण्याची ही संधी मिळाली होती. त्यामुळे त्याने मोठ्या तडफेने आक्रमक हालचाली केल्या. पुढं वेलस्लीने नेपोलियनचा वॉटरलू येथे पराभव करून फार कीर्ती मिळवली. नंतर वेल्सलीस आयुष्यातील सर्वात अवघड लढाईचे नाव विचारले असता त्याने असईच्या लढाईचे नाव घेतले. ही लढाई कशी घडली ते थोडक्यात पाहूया (विस्तृत मजकूर विकिपीडियावर आहे - खाली पहा)

जनरल वेलस्ली स्वतः लिहितो की बचावात्मक हालचाली करून ही लढाई दीर्घकाळ लांबवण्यापेक्षा मी ठरवले की सुरुवातीपासूनच आक्रमक हालचाली करायच्या. शिंदे आणि भोसले निजामाच्या राज्यात घुसून लुटालूट करण्याच्या बेतात होते. वेलस्लीने स्टीव्हन्सनला जाफराबाद इथे ठेवले आणि स्वतः नगरच्या किल्ल्यावर त्याने हल्ला केला. तोफांच्या माऱ्याने त्याने लगेच किल्ला घेतला आणि तिथे आपला पुरवठा करणारा बेस स्थापन केला. आपली पिछाडी सुरक्षित केल्यावर वेलस्ली उत्तरेस औरंगाबादच्या दिशेने गेला. दौलतरावाने या हालचाली पाहून आपला बेत बदलला आणि त्याच्या फौजा भोकरदन इथे आहेत अशी वेलस्लीला खबर मिळाली. त्याने स्टीव्हन्सनला भोकरदन इथे येण्याचे हुकूम दिले आणि इंग्रज फौज दोन बाजूनी मराठ्यांच्या शोधात भोकरदनच्या दिशेने गेल्या.

असईची लढाई - विकिपीडियावरून साभार
pic3

२३ सप्टेंबर १८०३ या दिवशी वेलस्लीला मराठी फौज भोकरदनऐवजी ६ मैल दूर असई इथे आढळली. दौलतराव आणि स्वार आधीच पुढच्या मुक्कामावर गेले होते. १०० तोफा आणि पायदळ मात्र केळणा नदी आणि जुई नदी यांच्यामध्ये नदीचा उतारावर तोफा डागून बसले होते. हे पायदळ निसटून जाईल या भीतीने वेलस्लीने स्टिव्हन्सनची वाट न पाहताच आपली कमी फौज असली तरी ८,००० लोकांनिशी अचानक हल्ला करण्याचा निश्चय केला. त्याचे वाटाडे सांगत होते की नदीस अजून दुसरा उतार नाही, पण वेलस्लीने दोन खेडी केळणा नदीच्या दोन काठांवर पाहिली आणि ठरवले की त्याच्यामध्ये नदीस उत्तर असलाच पाहिजे. इंग्रज इंजिनिअरने पाहणी करून तो उतार शोधून काढला आणि वेलस्ली मराठ्यांच्या डाव्या बाजूने नदीपार झाला.

मराठयानी वेल्स्लीवर तोफांचा मारा केला आणि त्याचे कित्येक सैनिक तिथे ठार झाले. आपले राखीव घोडेस्वार आणि संगिनी (बायोनेट) यांचा हल्ला करून वेलस्लीने तोफा बंद पाडल्या, आणि उरलेल्या पायदळास पळवून लावले. वेलस्लीची इतकी हानी झाली होती की त्याने मराठ्यांचा पाठलाग केला नाही. तोफांचे आवाज ऐकून स्टीव्हन्सन संध्याकाळी वेल्सलीस जाऊन मिळाला. यानंतर काही महिन्यात वेलस्लीने शिंद्यांचा आणि भोसल्यांचा पाठलाग करून बऱ्हाणपूर येथे पराभव केला.

जनरल लेक
pic2

जनरल लेक याने उत्तरेत मोठे राजकारण तडीस नेले. दौलतरावाचा फ्रेंच सेनानी पेरॉन हा दौलतरावावर नाराज होता. त्यास हाताशी धरून मायदेशी सुखरूप पोचवण्याचे आश्वासन इंग्रजांनी दिले. वार्षिक ४० लक्ष रुपये तनखा देऊन पोसलेला एक उत्कृष्ट सेनानी मराठ्यांनी अश्या प्रकारे गमावला. लेक याने घोड्यांनी ओढून नेण्याजोगा हलता मोबाईल तोफखाना आपल्या सैन्यात जोडला. प्रत्येक तुकडीला अश्या काही तोफा वाटून दिल्या. अशी जय्यद तयारी केल्यावर त्याने अलिगढ इथल्या शिंद्यांच्या तळावर हल्ला केला. अलिगडचा किल्लाही त्याने घेतला. पुढे आग्रा आणि दिल्लीवरही त्याने विजय मिळवला. उत्तरेतल्या पराभवाची बातमी ऐकून दक्षिणेत दौलतरावास इंग्रजांबरोबर तह करून माघार घेणे भाग पडले.

इंग्रजांनी अश्या रीतीने एका वर्षात मराठ्यांचा निर्णायक लष्करी पराभव केला आणि हे निश्चित केले की मराठ्यांमध्ये पुन्हा आपल्या पराभव करण्याजोगी लष्करी शक्ती उरता कामा नये. १८०३ या एक वर्षात दिल्ली आणि आग्र्याचा किल्ला, अलिगडचा तळ, महादजी शिंदे यांनी आग्र्यात सुरु केलेले बंदुकीचे आणि तोफांच्या दारूचे कारखाने, दिल्लीच्या बादशाहीवरचे नियंत्रण असे बरेच काही शिंद्यानी गमावले. भोसल्याना ओरिसा हा प्रांत सोडून द्यावा लागला. इंग्रज फौजा दापोडी आणि शिरूर येथे राहू लागल्या. त्यांना पुण्यावर हल्ला सहज शक्य झाला. पुढे बाजीरावाने कितीही प्रयत्न केले तरी त्याला भक्कमपणे पाय रोवून बसलेल्या इंग्रजांना मात देता आली नाही. त्यामुळे १८०३ चा पराभव हा मराठ्यांच्या आणि भारताच्या इतिहासात असा घातक ठरला.

संदर्भ
1) सरदेसाई गो. स. रियासत उत्तर विभाग https://docs.google.com/file/d/0B_hbiN5lXt31bFp6Q0VmVVVZNlU/edit
2) पेशवाईच्या सावलीत - नारायण गोविंद चापेकर https://docs.google.com/file/d/0B0vwUrnl4_0dQlBfZTNaSFZzVGc/edit?usp=sha...
3) Fall of Mughal empire by Jadunath Sarkar https://archive.org/details/in.ernet.dli.2015.231251
4) Battle of Assaye – Wikipedia https://en.wikipedia.org/wiki/Battle_of_Assaye
5) मंत्रावेगळा, वाळल्या फुलात, चांदराती रंगल्या - ना स इनामदार
6) Baji Rao Ii And The East India Company 1796 1818 By Pratul Chandra Gupta https://archive.org/details/in.ernet.dli.2015.279666
7) The Last Peshwa And The English Commissioners 1818-1851 Pratul Chandra Gupta https://archive.org/details/in.ernet.dli.2015.81221
8) Nana Sahab Peshwa And The Fight For Freedom https://archive.org/details/in.ernet.dli.2015.147235

इतिहासविचार

प्रतिक्रिया

मनो's picture

31 Mar 2020 - 8:30 am | मनो

ढाल मध्यप्रदेश अथवा उत्तरेकडील आहे, अठराव्या शतकातील, म्हणजे १७०० -१७९९ मधील. सध्या शेख नासर सबाह अल-अहमद अल-सबाह कलेक्शन (कुवैत नॅशनल म्युसिअम) इथे आहे.

अजून एक चित्र इथे टाकतो आहे.

अहमदशाह अब्दालीचे हे अप्रकाशित चित्र, खाली त्याच्या नाण्यावर असलेला फारसी मजकूर दिलेला आहे. त्याची नाणी काही वर्षांपूर्वी पुण्यात सापडली, त्याबद्दल एक हकीगत पुस्तकात देतो आहे.

शशिकांत ओक's picture

30 Mar 2020 - 9:59 pm | शशिकांत ओक

ओककाका लिहितील तर आनंदच आहे, त्यांनी फक्त थोडी मांडणी वेगळी करायला हवी होती असं वाटतं.

योग विवेक तू उचकून काढून या धाग्यावरील माहिती उपलब्ध करून दिली. मनो यांनी मांडणी वेगळेपण असू दे असे सुचवले आहे. ते लक्षात ठेवून मांडणी करायला हवी...
कै शि म परांजपे यांच्या पुस्तकाला मध्यवर्ती ठेवून यांनी केलेले लढाईचे वर्णन सादर करताना मनोंची मदत लागणार आहे.
आशा करू कि ते आपला वेळ देतील.