भिमा कोरेगाव- स्वतःकडे बघा

अंतरा आनंद's picture
अंतरा आनंद in काथ्याकूट
6 Jan 2018 - 11:23 am
गाभा: 

"या जय भीमवाल्यांचं काहितरी आहे", "उगाच दंगे करतात, काम करा म्हणावं त्यापेक्षा", " काहि नाही, फडणविसाची खुर्ची यांच्या डोळ्यात खुपतेय"
अश्याच सुरातल्या पण संभावित प्रतिक्रिया इथे बघायला मिळत आहेत. आपल्याला कोणत्याही प्रश्नाचा विचार फक्त आपल्या जागेवरूनच करायचा आहे हे खास आहे.

(१) भिमा कोरेगाव हा अभिमानाचा विषयच नाही. : मुळात चारपाच वर्षांपूर्वी हे स्मारक आणि त्याबद्द्ल कोणालाही जास्त महित नव्हते परंतू महार रेजिमेंट याला आपल्या अभिमानाचा विषय मानत होती. कोणत्याही समूहाला मग तो रेजिमेंट सारखा ऑफिशियल लढवय्या समूह असो वा जात, सार्वजनिक अभिमानाचा विषय शोधणं हे आपल्या सु-संस्कृतीचा भाग आहे, नाही का? तसंही भावनिक कढ काढण्याखेरीज काही करावं हे आपल्या सुसंस्कृत मनांना नको वाटतं. गेल्या काही वर्षात प्रत्येक समूहाने आपलं असं सार्वजनिक अभिमानस्थळ शोधून त्याचा उदो उदो करणं हे सुरू केलेलं आहे. आधुनिक विचारसरणीशी तुलना करायला गेल्यास प्रत्येक अभिमान स्थळावर प्रश्नचिन्ह उठवता येतील, पण तसं कोणी करत नाही कारण प्रत्येकामागे आंधळी झुंड असते. त्यामुळे प्रत्येक समूह, जातीगट आपल्या अभिमानस्थळाला जास्तीत जास्त ’टीआरपी" मिळ्वण्याच्या प्रयत्नात असतो, त्यातूनच मग त्या त्या गटाचं नेतृत्व उदयाला येतं. आपण एकंदरीतच समाज म्हणून विवेकी असण्यापेक्षा भावनेच्या लाटेवर हेलकावे खाणं स्वाकारतो.

(१ अ) मुळात भिमा कोरेगावचं युद्ध इंग्रजांनी जिंकलंच नव्हतं: नसेलही. पण महारांना ते आपल्या पूर्वजांच्या लढवय्येपणाचचं प्रतिक वाटतंय तर वाटू द्या नं. तिथे ते शांतपणे इतके वर्षं जातायत तर काय बिघडलं? या संदर्भात तिथे जमलेल्या लोकांना विरोध म्हणून दुकानं बंद केली गेली, त्यांच्यावर दगडफेक झाली अश्या प्रकारच्या बातम्या आहेत, त्याचं काय? जमलेले लोकं काही आता जाऊन इंग्रजांना आवताण देणार नव्हते. मग अश्या प्रकारे त्यांच्या विरूद्ध जनमत तयार करणं कोणत्या संस्कृतीत बसतं?
ब्राम्हण-मराठा सारख्या प्रस्थापित आणि गावपातळीवर मान असणार्‍या जातींना आपापली प्रतिकं लख्ख कराविशी वाटतात, तिथे झुंडीनं जावं वाटतं तर अजूनही मागास असलेल्या गावकुसाबाहेरच्या लोकांनी एवढा विचार करावा ही सक्ती का?

(२) राजकिय अपरिहार्यता: प्रत्येक गोष्टीत राजकारण्यांना दोष देणं ही फॅशन बनली आहे. कारण ते सोप्पय. आपणही आपल्या व्यक्तीगत पातळीवर हे राजकारण पुरेपूर खेळत असतो. अश्या जाती विभागणीला, उतरंडीला समाजात मान्यता असते, प्रत्येक व्यक्तीच्या मनात ती उतरंड जागी असते म्हणूनच त्याचा फायदा राजकारणी उठवू शकतात. प्रत्येकाने व्यक्ती म्हणून आपण ही उतरंड पाळतो की नाही (मानतो की नाही असं मी म्हटलेलं नाही. कारण ’मी मानत नाही पण नाती तोडून चालत नाहीत, सवय ’, वैगेरे सुटकेचे मार्ग असतात ) हे मनाला विचारावं. खालच्याला वर येण्यासाठी व्यक्तीगत पातळीवर आपण किती आधार दिलाय हे शोधून पहावं. तसं होत नाही. मागासांच्या वागण्यातल्या विसंगती शोधून, त्यांची आधुनिकता किती बेगडी आहे ह्याकडे बोट दाखवणारे आणि त्यांना वेगळे पाडणारेच मोठ्या संख्येने असतात. (इथे या विषयावर ज्या हिरीरीने लिहीलं गेलंय त्यावरून सिद्धच होत.) "जातीने महापुरुष वाटून घेतले आहेत", असं तोंडाने म्हणायचं आणि फक्त आपल्याच जातीतल्या महापुरुषाचा उदो उदो करायचा ही दांभिकता बहुसंख्यांमध्ये असते, म्हणून तर असे अभिमानी गट तयार होतात आणि राजकारण्यांना आयतं खाद्य मिळतं.
जातींनी महापुरुष वाटून घेतलेत म्हणणार्‍यांपैकी किती जणं आंबेडकर जयंती साजरी करतात? नाहीपेक्षा ती आपल्या सोसायटीत साजरी व्हावी असं किती जणांना वाटतं? उलटपक्षी कोणी करत असेल तर "ते जय भीम वाले" म्हणत आपण त्यातले नाही हे प्रकर्षाने दाखवलं जातं. मग वरील तक्रार करताना आपण दांभिकपणे वागत नाही का? किती जणांनी मुलांना राम-कृष्णासोबत बुद्धाच्या गोष्टी सांगीतल्या? किमान स्वत:तरी जाणून घेतल्या? "ही कसली मिरवणूक आहे?" असं विचारणार्‍या पहिलीतल्या मुलाला आंबेडकर- जयंतीच्या मिरवणुकीबद्द्ल "ज्यांच्यामुळे मला प्रमोशन मिळत नाहीय ना त्यांची मिरवणूक आहे" असं उत्तर माझ्या एका कलीगनं दिलं होतं. अर्धवट माहिती देऊन पुढील पिढीच्या मनात अशी विषाची पेरणी केली जाते.

(३) पेशवाईत महारांना कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं बांधून वावरावं लागत होतं हे खरं नाही तसा कागदोपत्री पुरावा नाही:- पलीकडल्या संस्थळावरच्या विद्वान (हे उपहासाने म्हटलेलं नाही, आदर खरा आहे) इतिहाससंशोधकांनी तिथे "याला कागदोपत्री पुरावा कुठेय?" असं विचारलं आणि अर्धवट शहाणे पैलवान इथेही ते विचारत सुटलेत. महार इतके महत्वाचे होते का की त्यासाठी एक कागदी फर्मान सुटेल? कोतवालाला तोंडी आदेश दिले असणं ही शक्य आहे ना? हे ही शक्य आहे की सैन्यात मानाच्या ठिकाणी असलेल्यांना यातून सूट असेल पण सर्वसामान्य महारांना हे लागू असेल. मग ते फक्त सामान्य महारांना लागू होतं म्हणत त्याचं समर्थन करता का? झाडू-गाडगं नसेलही पण "बाजू हो शिवशील, सावली पडली तर विटाळ होईल" हे उद्गार तरी महारांसाठी निघत होतेच ना? मग त्याचं समर्थन करताय का? किती वर्षं हे ऐकावं लागत होतं? अजूनही कुठेतरी लागत असेल. कोपर्‍यातल्या कपात वरून पडलेला चा पिणारी म्हारीण तर आता आतापर्यंत साहित्याचा भाग होतीच ना. ती काय सर्वस्वी काल्पनिक होती?

बरं धरून चालू की हे झाडू-गाडगं प्रकरण खोटं होतं. पण महारांना किती गावात मानाचं स्थान होतं? इथे आपण किती गावच्या मातीतले आहोत हे दाखवण्याची होड लागलेली असते, त्यांना हे गावाचं वास्तव माहित नाही का? आताही त्यांना दिला जाणारा मान किती मनापासून येतो? वेळ येताच "गेले आपल्या जातीवर", "हे असंच अन्कल्चर्ड वागणार", "माजलेत" अशी मुक्ताफळं उधळली जात नाहीत का? आणि "माजलेत, पायरी सोडताय" म्हणत हत्याही घडवल्या जातातच ना?

(४) आरक्षण म्हणजे फुकटचंबूपणा : आरक्षण लागू केल्यावर द्णादण सगळ्या महारांनी आरक्षणाचा लाभ घ्यावा एवढं शिक्षण त्यांच्याकडे होतं का? आरक्षण घेतलेली पहिली पिढी आता कुठे रिटायर होतेय. पिढ्यापिढ्या शिक्षण, मानाचं जगणं नाकारलं गेलेली, स्वत:ची जमीन नसलेली अशी जमात आता कुठे प्रवाहात येऊ लागलीय तर फुकटचंबूपणा दिसतो. मग ब्राम्हणांनाही आरक्षण हवं म्हणत ब्राम्हण मेळावे का भरवता? आमचे पूर्वज कसे वेदशास्त्रसंपन्न होते म्हणत अभिमान मिरवता त्याच पूर्वजांचा (त्यावेळची जनरीत म्हणून का होईना) काहीजणांना जन्मावर आधारीत उपेक्षेची वागणूक देण्यात सहभाग होताच म्हणून लाजही वाटून घ्यावी का वाटत नाही? यालाच दांभिकपणा म्हणतात.

(५) दलितांच्या आंदोलनात नासधूस जाळपोळ होतेच:- इतर आंदोलनात होत नाही का?. स्वघोषित सैनिक काय पुष्पवृष्टी करत आंदोलनं करतात का? जाळपोळीचं समर्थन नाही पण ठराविक समाजाला दोष का देता? रिकामटेकडे आणि समाजकंटक ही नासधूस करतात आणि प्रत्येक आंदोलनात थोडफार होतंच. ते होऊ नये तर ठाम कायद्याचं राज्य हवं (मग त्या राज्यात झुंडीने प्रार्थनास्थळ पाडता येईल का हो? ती सूट द्यायला हवी नाही का? किमान गोमाताचोरांना देहदंड देण्याची गोमातेच्या सुपुत्रांची गुंडगिरी क्षम्य मानायला हवी नाही का? )

(६) प्रकाश आंबेडकरांनी याचा राजकीय लाभ उठवला / त्यांनी चिघळवलं: इथे एवढ्या लिंका फेकल्या गेल्या आहेत. त्यात ही एक ही वाचून पहावी. प्रकाश आंबेडकरांचा ३१ डिसेंबरला प्रकाशित झालेला लेख आहे. त्यात त्यांनी ह्या विजयस्तंभाबद्द्लची मांडणी भावनिक आहे असं म्हटलय. त्यांची मांडणी पोलोटिकली करेक्ट असण्यापेक्शा लॉजिकली करेक्ट असते म्हणूनच निवडणुकीच्या राजकारणात त्यांना स्थान निर्माण करता येत नाही.
प्रकाश आंबेडकरांची राजकीय ताकद ती काय आणि अशी आंदोलनं ते करतातच कशी काय? असा एक सुज्ञ प्रश्न आहे. म्हणजे? जे निवडून येऊ शकतात त्यांना अशी हिंसक आंदोलनं करण्याचा फुकट परवाना मिळतो? जे निवडून येत नाहीत त्यांची अशी काही बाजू नसतेच? आंबेडकरांनी हिंसक आंदोलन करा असं म्हटलं होतं का? कोणाला जमवलेल्या जमावावर नियंत्रण ठेवता येतं? (ठेवता आलं असतं तर बाबरी मशीद पाडली गेली नसती. का ती नियंत्रणाखाली जाणून बुजून घडवलेली घटना होती?)

(७) दरवर्षी एवढे लोक येत नाहीत यावेळेला मुदाम जमवून दंगल माजवली : एवढी माणसं काय एकदम आकाशातून अवतरली का? ही माणसं एवढ्या मोठ्या संख्येनं येणार याची गृहखात्याला खबर लागत नाही का?

[२०० वर्षापूर्वीच्या लढाई बद्द्ल : (१) पेशवे हरले नाहीत त्यांनी गनिमी कावा वापरला
(२) इंग्रज हरले पण त्यांनी स्तंभ उभारला
(३) इंग्रज जिंकले पण त्यांचं खूप नुकसान झालं
इतके किमान पर्याय संभवतात
तेवढ्याच जुन्या झाडू गाडगं प्रथेबद्द्ल (१) ती होती
(२) नव्ह्ती
इतके किमान पर्याय संभवतात
मात्र राम होताच आणि तो अयोध्येत विवक्षित ठिकाणीच जन्मला हे ठामपणे सांगीतलं जातं, जणू रामजन्मानंतर घुगर्‍या वाटायचं काम कौसल्यामातेनं यांच्याकडेच सोपवलेलं होतं. ]

एखादं उभ असलेलं स्ट्र्क्चर झुंडशाहीने पाडून आर्थिक विकासाकडे वाटचाल करणार्‍या भारतीय समाजाला थेट पुराणकाळात नेऊन दोन दंगलखोर बनविणार्‍या, "खतरेमें" ची हूल देत हिंदू समाजाला गेल्या दशकांपर्यंत आणि अजूनही वेठीला धरणार्‍यांबद्द्ल प्रेम असणार्‍यांनी दोन दिवसातल्या आर्थिक नुकसानीबद्द्ल गळे काढावे हा शुद्ध दांभिकपणा नाही का?

हे सर्व या संस्थळावर आलेल्या प्रतिक्रियांबद्द्ल आहे. त्या प्रतिक्रिया बघताना एक लक्षात आलं की मुळात एखाद्या ठिकाणी जमाव मोठ्या संख्येनं येतो त्यावर दगडफेक होते, दुकानं बंद ठेवली जातात, त्यांच्याविरोधात वातावरण तयार केलं जातं, या मूळ मुद्द्यावर कोणीही बोलत नाहीय. जणू काही ते चुकीचं स्मारक पुजताहेत म्हणोन त्यांनी दगड खायलाच हवेत. खरंतर "याच लोकांनी दगड आणून आजूबाजूच्या घरातून साठवून ठेवले असतील आम्हाला मारा म्ह्णून", एवढंच सरळसोट म्हणायचं बाकी राहिलं आहे. हे असतं आपल्याला हवं तेच बघण्याचं आणि सांगण्याचं टेक्निक. पिढ्यानपिढ्याच्या सुसंस्कृतपणाचा अभिमान आणि नव्या युगाचं शिक्षण हे यासाठी छानपैकी वापरता येतं.
’बाबासाहेबांना आम्ही मानतो पण हे आहेत का कोणी तसे?" असं सर्रास म्हणणार्‍या किती जणांमध्ये त्यांच्या त्यांच्या जातीच्या महापुरुषाचे गुण १०% तरी आहेत?

अरे ही गावकुसाबाहेर ठेवलेली माणसं आता प्रवाहात येतायत. आता जगणं शिकलेली ही नवीन पिढी ही आधीच्या पिढीचा अशिक्षित वा अर्धशिक्षितपणा, एकंदरीत जगण्यात वाढलेली स्पर्धा, स्त्री-पुरूष समानता, गावाकड्ची आपली माणसं आणि नवीन सुशिक्षित समाजात वावरताना आजूबाजूला गोळा केलेली माणसं यांच्यात वावरण्याचा तोल सावरणे, आपल्या पूर्वज-काळात फारसं अभिमानास्पद काही नाही किंवा जे आहे असं आपण मानतो त्याला समाज मान देत नाही अश्या अनेक पातळ्यांवर लढत असते. संपन्नतेची सुखं उपभोगतानाही स्वप्निल सोनावणे, नितीन आगे सारखी प्रकरण त्यांना आपण आजूनही गावकुसाबाहेरच आहोत याचं वेदनादायक भान आणून देतात, सैरभैर करून सोडतात. व्यक्तिगत पातळीवर छोटे मोठे संभावित अपमान आणि "तुम्ही ते काय!" च्या नजरा असतातच. मास्लोच्या पहिल्या पायरीवरून आताच वर चढलेल्या या लोकांनी थेट चौथ्यापातळीवरचा विचार करावा अशी अपेक्षा बाळगत समाज यांच्याकडे
(१) आरक्षणाच्या कुबड्या घेतलेले हे लोक (२) संस्कार आहेत का यांच्याकडे (३) मी म्हटलं बाकी कोणीही आण नवरा/नवरी म्हणून पण जय भीमवाला/वाली नको बाई (४) अच्छा तू *** आहेस? वाटत नाही हे असे अनेक खडे येता जाता फेकत असतो आणि त्यांचेच दगड होऊन अश्या आंदोलनातून समाजाकडे भिरकावले जातात. तेव्हा हे असे खडे आपल्याकडून भिरकावले जाणार नाही याची प्रत्येकाने वैयक्तिकरित्या दक्षता घेतली तरी हे असे भडके उडण्याला थोडाबहुत आळा बसेल. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटांनी या स्मारकाला भेट देऊन तिथल्या व्यवस्थेसाठी बैठक घेतली एवढंच फेबुवर पोस्ट केलं. त्या पोस्टवर एवढ्या विखारी प्रतिक्रिया आल्यात की हेच का ते सामान्य मध्यमवर्गीय आणि हाच काय तो ब्राम्हणी सुसंकृतपणा, अशी शंका येते. ( कुंभमेळ्यासाठी दुष्काळातही गोदावरीत पाणी ओतलं तेव्हा ते नाही खटकलं या लोकांना.) हाच मानभावी सुसंस्कृतपणा या मागासवर्गीय शहरी लोकांना पदोपदी भेटत असतो (गावच्यांचे प्रश्न आजून वेगळे.) आणि त्या घाणीत पाय बरबटू न देता त्यांना स्वतःचं जगणं अजून चांगलं करायचं असतं. इथे दणादण प्रतिक्रिया देण्याएवढं सोपे नसतं ते एवढ भान तरी ठेवावं. आपल्याला समाजात मान आहे, आपलया प्रतिकांना ही अखील समाजाची प्रतिकं म्हणून मान मिळतो पर्यायाने आपल्याला मान मिळतो तरिही लहानपणी आपल्याला "बामण भट कढी आंबट" म्हणून चिडवत होते हे शल्य जाणवतं तर आपल्याला मानच नाही आपले आई वडील केवळ जन्माने वरच्या जातीतला म्हणून छोट्या वयाच्या व्यक्तीलाही मान देतात, हात जोडतात (हे आता आता पर्यंत उत्तर, मध्यप्रदेशात होतं की नाही? अजूनही असेल) हे बघताना त्या जातीच्या मुलांना वेदना होत नसतील का? जिथे तिथे आपली लायकी काढली जाते आपल्याला कमी लेखलं जातं हे स्वीकारून आत्मसन्मान कसा जपत असतील ते? पूर्वंजांच्या चार कथा उचलून निरूपणं करत बसण्याएवढं साधं नाही ते.
सफाईकामात अजूनही ठराविक जातीला अघोषित आरक्षण आहे, जाता का हिरीरीने तिथे आरक्षण नको म्हणत? सवर्णांना चांगलं बोलण, वाचणं बाळकडू घरात मिळालेलं असतं. ५० च्या दशकातल्या बहुसंख्य आरक्षितांना ते मिळालं होतं का? पण उच्चारावरून लिहीण्यावरून , वागण्या बोलण्यातल्या रांगडेपणावरून त्यांना खुसूखुसू हसताना ते हे कुठून शिकतील हे भान असतं का? कुणी उच्च्पदस्थ वा परदेशस्थ नातेवाईक, उच्चविद्याविभुषित परिचितांचं मार्ग दर्शन, आईवडिलांनी साठवलेला पैसा, मिळवलेलं ज्ञान या कुठल्याच कुबड्या आपण नाही वापरल्या का? मग ज्यांच्या अगदी एखादया पिढीपलीकडल्या पूर्वजांनी भिका मागत पोटं भरली (ज्याला जोदार असं गोंडस नाव दिलं गेलं होतं.) त्यांनी एखादी कुबडी वापरली तर त्यांना चोर म्हणावं वाटतं? त्या कुबड्याच आहेत हे वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाला माहित असतं पण "ते जय-भीमवाले " असं म्हणत त्यांना आपण "घेट्टोत" ढकलतो. त्या कुबड्या पुढच्या पिढीला वापराव्याश्या वाटू नयेत असं समाज म्हणून आपण काय करतो? आरक्षणाविरूद्ध इथे गळे काढले जातात मग मेडिकलच्या सीटस जातीची खोटी प्रमाणपत्र देऊन मिळवल्याचं प्रकरण उघडकीला आलं होतं त्याचा निषेध किती जणांनी केला या संस्थळावर? मनोमन तरी किती जणांना वाटलं हे चुकीचं झालं म्हणून? एखादा मागासवर्गीय जनरल जागेसाठी अर्ज करू लागला की "आले हे. स्वत:च्या राखीव जागेतूनच करायचा ना अर्ज, इथेपण यांना हवं" अशी बरोबर उलटी भुमिका घेतली जात नाही का? अश्यावेळी तो माणूस स्वत:ला आजमावण्याचं धाडस कसं करेल याचा विचार अश्या पिंका टाकताना केला जातो का? समाज म्हणून ते नाही तर सवर्ण किती मागासलेले आहेत हेच यातून दिसतंय.
आता खरंतर भिमा-कोरेगाव प्रकरणीत ग्रामस्थांनी परस्पर सहकार्याची भुमिका घेतल्याच्या बातम्या आहेत. चूक कोणाचीही असो असं पुन्हा होणार नाही अशी भाषा दोन्ही बाजूकडून झाली आणि ते ही कोणत्याही प्रस्थापित राजकारण्यांच्या नाक खुपसण्याला वाव न देता. ही खूप आशेची गोष्ट आहे. कदाचित इथल्या मंडळीसारखी जानवं या खांद्यावरून त्या खांद्यावर करत सव्यापसव्याला कसरत म्हणण्याची कला त्यांना अवगत नसावी. दोन गटात फूट पडणे हे आपल्या जगणं कठीण होण्याशी थेट निगडीत आहे, याचं गावकर्‍यांना लवकर भान आलं असावं. पण ते झालं हे खरच चांगलं, समुद्रमंथनातून विषाबरोबर अमृतही निघतं हा दिलासा देणारं आहे. या संस्थळावर मात्र शहाण्यांनी विषाचा प्यालाच दाखवत जो काही एकांगी हैदोस घातलाय तो बघता या समाजातलं असल्याची लाज वाटावी. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही एवढे विष ओकू शकता तर खाजगीत किती विषमय असाल? असो, अश्या बाबतीत यापुढे तरी विवेकाने विचार मांडावा (जमल्यास करावा) एवढीच अपेक्षा. राजकारणी, ब्रिटीश, संघटना या कोणालाही नावं ठेवण्याआधी प्रत्येकाने माझ्याकडून जे मांडलं जातय त्यात तथ्य किती आणि कांगावा किती याचा डोकं स्थिर ठेवून विचार केला तरी अश्या घटना टळायला मदतच होईल. शेवटी समाज म्हणून सगळ्यांनाच पुढे जायचय.

प्रतिक्रिया

तेजस आठवले's picture

16 Jan 2018 - 10:28 pm | तेजस आठवले

मला साधारण हेच म्हणायचं होतं. लेखकाने लेख कळकळीने लिहिला होता पण पुढे प्रतिसादात सरळसरळ जातीवाचक टोमणे मारले आहेत. समजा माझ्या गावात एखाद्या दलिताने / मराठ्याने / ब्राह्मणाने काही चुकीचे केले तर त्याचे वैचारिक प्रायश्चित्त जगातल्या बाकीच्या साऱ्या दलितांनी / मराठ्यांनी / ब्राह्मणांनी का घ्यावे ? कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये ज्या लोकांनी जे काही चुकीचे केले ते शोधून काढून पोलीस त्यांना पकडतील की.

पूर्वंजांच्या चार कथा उचलून निरूपणं करत बसण्याएवढं साधं नाही ते.

तुम्हाला निरूपण करणं साधं सोपं वाटत असेल तर तुम्ही खूप अभ्यासू असणार, धर्मशास्त्राचा गाढा अभ्यास केलेला असणार.तसं असेल तर मी मनापासून तुम्हाला नमस्कार करतो. निरूपण करायला प्रचंड अभ्यास आणि व्यासंग लागतो, निरूपण-कीर्तन ऐकायला जमलेल्या सर्व जातींच्या, विविध आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीतुन आलेल्या लोकांच्या मनावर पकड घ्यायला खूप कौशल्य लागतं.भाषेवर प्रभुत्व लागतं, विविध ग्रंथातले माहिती-संदर्भ यांची एकमेकांशी सांगड घालावी लागते आणि ती निरूपणाच्या विषयाशी एकरूप होईल ह्या प्रकारे दाखले आणि उदाहरणे द्यावी लागतात, बरं हे सगळं ज्यांच्या समोर करायचे ते लोक वेगवेगळे देवदैवतं मानणारे. त्यांच्या भक्ती-उपासना परंपरेला धक्का न लावता त्यांना त्यांच्या वैचारिक आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी आपल्या संवादातून, मृदू, शांत शैलीतून आपलेसे करून शिकवण देणे ही माझ्या मते तरी सोप्पी गोष्ट नाही.
बरं निरूपण ऐकण्याची सक्ती नाही, का निरूपण करणारे घराघरात जाऊन लोकांना गोळा करून आणत नाहीत. ज्याला ओढ असते तो येतोच. प्रसंगी अगदी ५-१० श्रोत्यांसमोर पण निरूपण-कीर्तन करावी लागतातच की. बरं कीर्तन/निरूपण करणारे फक्त ब्राह्मण नाहीत, इतर जातीतलीही लोक आहेत.माझ्या स्वतःच्या प्रत्यक्ष पाहण्यात आहेत.

पण उच्चारावरून लिहीण्यावरून , वागण्या बोलण्यातल्या रांगडेपणावरून त्यांना खुसूखुसू हसताना ते हे कुठून शिकतील हे भान असतं का?

स्वच्छ, स्पष्ट उच्चार, शुद्ध बोलणं ह्याला हसताना / टर उडवताना मी पाहिलेले आहे आणि अनुभवलेले पण आहे. पण मुळात तुम्हाला तुमचे उच्चार सवर्णांसारखे कशाला व्हायला हवे आहेत ? प्रत्येक बोलीभाषेचा एक लहेजा असतो आणि ते उच्चार तसेच शोभून दिसतात.

कुणी उच्च्पदस्थ वा परदेशस्थ नातेवाईक, उच्चविद्याविभुषित परिचितांचं मार्ग दर्शन, आईवडिलांनी साठवलेला पैसा, मिळवलेलं ज्ञान या कुठल्याच कुबड्या आपण नाही वापरल्या का?

त्या तर सगळेच वापरतात.दलित त्याला अपवाद आहेत का ?

मेडिकलच्या सीटस जातीची खोटी प्रमाणपत्र देऊन मिळवल्याचं प्रकरण उघडकीला आलं होतं त्याचा निषेध किती जणांनी केला या संस्थळावर? मनोमन तरी किती जणांना वाटलं हे चुकीचं झालं म्हणून?

माझ्या मते ते चुकीचंच आहे.आणि ज्यांना ज्यांना मनातून ते निषेधार्ह वाटलं होतं/आहे त्याने संस्थळावर ते व्यक्त केलेच पाहिजे ही सक्ती करता येणार नाही.

सार्वजनिक ठिकाणी तुम्ही एवढे विष ओकू शकता तर खाजगीत किती विषमय असाल?

तुमचा लेख वाचून मनात उमटलेले विचार आणि तुमच्या प्रतिक्रिया वाचून त्यात झालेला बदल तुमचा तुम्हीच ओळखा. तुमचे हे वरील वाक्य तुम्हाला पण लागू होते आणि ते प्रतिक्रियांमध्ये दिसत आहे.

राजकारणी, ब्रिटीश, संघटना या कोणालाही नावं ठेवण्याआधी प्रत्येकाने माझ्याकडून जे मांडलं जातय त्यात तथ्य किती आणि कांगावा किती याचा डोकं स्थिर ठेवून विचार केला तरी अश्या घटना टळायला मदतच होईल. शेवटी समाज म्हणून सगळ्यांनाच पुढे जायचय.

+१. आपण सगळ्यांनीच डोकं स्थिर ठेवायला हवे.

महार वतन चार जणांना मिळाली म्हणून महारांची स्थिती चांगली होती अस नाही पण ते उगाळून उगाळून त्याचे वळसे देत बसायचं.

ज्या चार जणांना मिळाली त्यांनी त्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा वापर त्यांच्या समाजाच्या उत्कर्षासाठी केला का हे कसं ठरवणार ? ह्याचप्रमाणे चार ब्राह्मण सुस्थितीत होते म्हणजे बाकीच्या सगळ्या ब्राह्मणांची स्थिती चांगली होती का ?ब्राह्मण समाजात प्रचंड दारिद्र्य आणि गरिबी होती.मराठ्यांना आरक्षण मागताना सगळे मराठा समाजाचे लोक सुस्थितीत नसून त्यांच्यात पण अतिशय मागास आणि गरीब लोक आहेत आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक उत्कर्षासाठी मराठ्यांना आरक्षण पाहिजे असा युक्तिवाद केलेला आहे.पेशवाई सोडली तर ब्राह्मण कधीही राज्यकर्ते नव्हते.
काहींचे पूर्वज भीक मागून पोट भरत होते म्हणताय मग ब्राह्मणांना पण माधुकरी मागून पोट भरावे लागत असे हे माहित असेलच.

ही वाक्य माझ्या वाक्यांपेक्षा जास्त लागट होती. पण हा टिकेचा रोख थेट एका वर्गावर का? असं विचारलंत? त्या धाग्यावर कोणीही हे चुकीचं बोललं जातय असं म्हणताना दिसलं नाही. सगळेजणं जानवं कानावर ठेवून गेला होतात का?

कोणी काय प्रतिक्रिया द्याव्यात ह्याबद्दल तुमच्या आग्रही अपेक्षा का ?बरं इकडे तुम्हाला जानवंच का लिहावंसं वाटलं? सगळेजण तलवारी/बंदुका खाली ठेवून गेलेला होतात का(क्षत्रिय) / सगळेजण चोपड्या बाजूला ठेवून गेला होतात का(व्यापारी) / सगळेजण नांगर सोडून गेला होतात का(शेतकरी) असं त्या त्या वर्गातल्या जातींना तुम्हाला धारेवर धरता आलं असतं. जानवं शौचाला जाताना जमिनीला स्पर्श होऊन खराब होऊ नये, त्याचे पावित्र्य अबाधित राहावे म्हणून कानावर अडकवले जाते.शौचाला आपण सगळ्याच जातीचे लोक जातो, मागास अथवा पुढारलेल्या जातीचे असलो तरी अपवाद नाही. त्यामुळे तुमचे हे वाक्य मला लागट वाटलं नाही अजिबात. मुळात वेळीअवेळी शौचाला जावे लागणे हे काही फारसे चांगले लक्षण नाही.

(१) दगडफेक करणारे कोण असतील ते त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी. ( म्हणजे त्याचा निषेधही कोणी कराय्चा नाह)? करणारे थेट नक्षल्यांचे हस्तक? )
असं म्हणणारे भिडे समाजसेवा करत असल्याची सर्टीफिकेटं का वाटत सुटलेत? सरकार बघेल काय ते? प्रकाश आंबेडकरांनी कायद्याच्या चौकटीत मागणी केलीय. गौरक्षकांसारखं हातात कायदा तर घेतलेला नाहीय ना?

दगडफेकीचा इथे प्रत्येकाने निषेधच केलेला आहे. आणि दगडफेक करून वातावरण चिघळवण्यामागे नक्षल्यांचा हात असल्याचा रिपोर्ट खुद्द तपास करणार्यांनी केलेला आहे. तपासकर्त्यानी कोठेही भिडे गुरुजी आणि एकबोटे यांचे नाव अजून तरी घेतलेले नाहीये. भिडे समाजसेवा करतातच आणि इकडचे एकदोन आयडी त्यांच्या कार्यात भाग घेऊन पण आले आहेत.तुम्ही म्हणताय ना सरकार बघेल काय ते, मग मी तरी काय वेगळे म्हणत होतो ? प्रकाश आंबेडकर जर पत्रकार परिषद घेऊन पुरावे न देता भिडेंना दोषी ठरवत असतील तर इकडे काहींनी पुरावे देता भिड्यांना चांगले म्हटले तर काय प्रॉब्लेम आहे ? पुरावे नसताना भिड्यांची सरळसरळ बदनामी केली जात आहे ह्याचा निषेध तुम्ही करताय का ?

सुबोध खरे's picture

15 Jan 2018 - 1:38 pm | सुबोध खरे

Khobragade was born in Tarapur, Maharashtra,[8] into a prominent Dalit family from Gadchiroli, Maharashtra.[9][10] She attended Mount Carmel High School in Mumbai. She obtained a degree in medicine from King Edward Memorial Hospital and Seth Gordhandas Sunderdas Medical College.[11] While doing an MS in Ophthalmology, Khobragade decided to become a civil servant
She owns a flat in the now infamous Adarsh Housing Society apartment complex meant for defence widows.
Khobragade is married to an American citizen, New York-born Dr. Aakash Singh Rathore
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/IFS-officer-admits-ownin...
https://timesofindia.indiatimes.com/india/Devyani-Khobragade-made-false-...

The Supreme Court of India held that Ms. Devyani Khobragade was given a posting of her choice in the Indian Foreign Service by bending and modifying the specific rules of allocation for the specific year of 1999 where she was ranked lower than a meritorious batch mate of hers Mr. Mahaveer C Singhvi. The finding appears in the judgment of the Supreme Court of India in a case filed by the victim batch mate against the vendetta activities of the Ministry of External Affairs effecting his service in the case of Union of India v Mahaveer C Singhvi. The Supreme Court of India in its Judgment stated "The mode of allotment was amended for the 1999 Batch in such a calculated fashion that Ms. Khobragade, who was at Serial No.7, was given her choice of German over and above the Respondent who was graded at two stages above her."
On 12 December 2013, Devyani Khobragade, India's Deputy Consul General at its diplomatic mission in New York City at that time, was arrested on charges of visa fraud and perjury, over the payment of her Indian housekeeper.
In the last quarter of 2014, Devyani Khobragade gave a series of interviews to the Indian press, suggesting that the Indian government seek a political resolution of her case with the United States
हे सामाजिक मागासले पण आहे आणि "सर्व जगभरात" मागास वर्गीयांवर अन्याय होतो याचे उदाहरण आहे

arunjoshi123's picture

15 Jan 2018 - 2:37 pm | arunjoshi123

जशी उद्योगपतींची, राजकारण्यांची, अभिनेत्यांची, बाबूंची, डॉक्टरांची, पुरोगाम्यांची खानदाने आहेत तशीच आरक्षण घेणारांची खानदाने आहेत. यांच्यावर अजिबात काही अन्याय होत नाही. उलट यांच्यात अनेक सवर्ण मुली लग्न करतात. हे आंतरजातीय विवाह करू शकतात. यांचे सामाजिक संबंध सर्वांशी आहेत. यांचे बिझनेस, आर्थिक संबंध सर्वांशी आहेत म्हणून आज त्यांच्यावर सामाजिक अन्यायाचा कोणताही परिणाम उरलेला नाही.
-------------
पुरोगाम्याचं पोरगं पुरोगामीगीरी करतं, बाबूचं पोरगं पुन्हा परीक्षा देतं, पक्ष युवानेते निवडतो - यात सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. हे सगळं प्रायवेट आहे. मात्र आरक्षण सरकारी प्रकरण आहे. याचं उद्दिष्ट सामाजिक न्याय आहे. याचा खर्च सरकार उचलतं नि तोटे देश उचलतो. ज्या माणसाला हे सामाजिक अन्याय कोणते म्हणून चार गोष्टीची लिस्ट करता येणार नाही त्यांना कशाला हवं आरक्षण. आरक्षण फक्त गावातल्या गरीब दलित लोकांनाच आणि लागलं तर जबरदस्तीनं द्यावं. शून्य मार्क असले तरी प्रवेश द्यावेत. त्यांची संपूर्ण पिढी वर येईल. हे ठरवणं किचकट आहे, पण आरक्षणाचा पुरेसा लाभ मिळाला आहे हे ठरवायचे निकष असावेत नि लगेच त्यांना वगळण्यात यावं.
---------------
ज्या लोकांना ५५%- ५०% मार्क घेणार्‍या सवर्णांच्या तुलनेत ४०% - ४५% मार्क घेता येतात अशा दलितांना आरक्षण नसावं. ज्या गावातल्या, गरीब, कोणी सरकारी क्लास १ /२ ची नोकरी नसलेला कुटुंबप्रमुख नसलेल्या इ इ लोकांना ०% ते ५% इतके मार्क असले तरी आरक्षण द्यावे. मूळात सगळ्यांना द्यावं हे तत्त्वतः मान्य असलं ज्याला जास्त गरज आहे सामाजिक न्यायाची त्याला अगोदर द्यावं. प्रत्येक वेळी आरक्षणाचा लाभ वेगळ्या पिढ्यांना दिला तर व्यापक न्याय होइल.
सध्याला तरी जन्माधारित आरक्षित अशी एक नविनच श्रिमंत दलितांची जात जन्माला येत आहे.

पगला गजोधर's picture

15 Jan 2018 - 2:49 pm | पगला गजोधर

"आरक्षण" हे गरिबीनिर्मूलनाचे साधन नाही.

शलभ's picture

15 Jan 2018 - 2:53 pm | शलभ

+१

अच्छा? मी लिहिलं आहे का तसं काहीतरी? काहीही प्रतिक्रिया देणार?
==============================
बाय द वे, सरकारी नोकरी, सिक्षण संस्थेत प्रवेश आणि लेजिस्लेटिव मधे प्रवेश ही सामाजिक न्यायाची साधने नाहीत असं लोकं म्हणू लागतील.

आनन्दा's picture

16 Jan 2018 - 12:06 am | आनन्दा

ते तर आहेच ना.. आता प्रायव्हेट नोकरीमध्ये देखील आरक्षण हवे अशी चर्चा चालू आहे..
म्हणजे तुमची एक छोटी कंपनी आहे, त्या कंपनीला जर दंड भरायचा नसेल तर एका तरी दलिताला नोकरी द्यावी लागेलच..
मोठ्या कंपन्या तशाही समान संधी वाल्या असतातच, पण छोट्या कंपन्या जिथे बरीचशी भरती केवळ रेफरन्स ने होते त्यांना कशाला यात ओढताय?

आनन्दा's picture

17 Jan 2018 - 10:26 am | आनन्दा

अवांतर -
बर्‍याच काळाने मिपावर त्रिशतकी धागा काढल्याबद्दल अंतरा आनंद यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे..

पगला गजोधर's picture

18 Jan 2018 - 6:30 pm | पगला गजोधर

| गॅरी ट्रुमन

http://www.misalpav.com/comment/780012#comment-780012

राजकीय आघाडीवर ब्रिटिश येण्यापूर्वी भारत म्हणजे हे एक ओपन ग्राऊंड होते. कोणीही यावे आणि हात धुऊन न्यावेत अशीच भारतीयांची परिस्थिती होती. आणि ब्रिटिश म्हणजे कोणीतरी परके असे म्हणण्यापेक्षा तत्कालीन विविध राजेरजवाड्यांच्या रस्सीखेचीच्या राजकारणातील इतर खेळाडूंप्रमाणे एक खेळाडू असेच त्यांच्याकडेही बघितले जात होते असे म्हटले तरी चुकीचे ठरू नये. अगदी नानासाहेब पेशव्यांनीही अंग्र्यांचे आरमार बुडवायला ब्रिटिशांचीच मदत घेतली होती. मागे एकदा याविषयी लिहिलेही होते. आपले भारतीय लोकच आपापसात इतके भांडत असतील तर ती परिस्थिती कोणीतरी परका येऊन आपल्यावर राज्य करायला अत्यंत अनुकूल होती.अशा परिस्थितीत पोर्तुगीज किंवा स्पॅनिश लोकांचे भारतावर राज्य न येता ब्रिटिशांचे राज्य आले ही गोष्ट त्यामानाने चांगलीच झाली.
.
.
आपल्याकडे एक गोष्ट फार वाईट असते. हे असे काही लिहिले की काळा इंग्रज, मेकॉलेचे गुलाम इत्यादी इत्यादी विशेषणांची सरबत्ती ते लिहिणार्‍यावर सुरू होऊन जाते. असला प्रकार वस्तुनिष्ठ अभ्यासाच्या दृष्टीने नक्कीच चांगला नाही.

गॅरी ट्रुमनच्या त्या प्रतिसाद परिच्छेदाची सुरवात मिस झालेली दिसते ती संदर्भासाठी

दुर्दैवाने ब्रिटिश राज्य म्हटले की एकतर ब्रिटिशांनी सगळे काही चांगले केले असे म्हणणारे लोक दिसतात नाहीतर ब्रिटिशांनी सगळे नुकसानच केले असे म्हणणारे लोक दिसतात. मला वाटते की याविषयी थोडा अधिक न्युअन्स्ड विचार व्हायला हवा....

सध्या ब्रिटीश नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने कामगिरी केलेल्या Battle for Haifa चा उदो उदो सुरु आहे स्मृती प्रित्यर्थ दिल्लीतील तीन मुर्ती चौकाचे तीन मुर्ती हएफा चौक असे नामकरण केले गेले. आधी म्हटल्या प्रमाणे दुसर्‍या बाजीरावाने स्वतः च ब्रिटीशांची मदत घेतलेली असताना कोरेआव भीमाच्या नावाने बोटे मोडण्यात फार हशील रहात नाही. देशाचे परकीय चलन खर्ची पडत असताना भारतीयांचे न संपलेले सुवर्ण प्रेम हा काही देशप्रेमाचा सर्वोत्तम नमुना नाही. जे कोरेगाव भिमात उत्सव करतात देश त्यांचाही आहे परक्यांचे साहाय्य घेतलेले उत्सव किती प्रमाणात करायचे किती नाही त्यांचे त्यांना ही ठरवता येणे अधिक उत्तम .

हा जाती वादाचा मुद्दा बाजूस ठेऊ. भाषिक प्रश्नावर मॅकोलेच्या गुलामांनी मराठीचे भाषेचे वस्त्रहरण अशातच पुन्हा एकदा मुकपणे अनुभवले आहे. भारतीयांचे देशप्रेम बहुतेकवेळा फिफ्टी फिफ्टी असते का असा संशय येतो, भारतीय मॅकोलेच्या गुलाम या विशेषणांना सार्थ ठरवण्यासारखे बर्‍याचदा वागतात हे निश्चित पण त्यात धार्मीक प्रांतिक भाषिक जातीय फरक नसावा, मॅकॉले भक्त सर्वगटात आढळतात .

राही's picture

25 Jan 2018 - 12:00 pm | राही

हा प्रतिसाद फक्त मेकॉलेच्या संदर्भात आहे. बाकी या धाग्यावर लिहिण्यासारखे फार काही राहिलेले नाही. अलीकडे 'मेकॉले: काल आणि आज' हे पुस्तक वाचनात आले. लेखक डॉ. जनार्दन वाटवे आणि डॉ विजय आजगावकर. पुस्तक थोडेसे अजेंड्यानिशी लिहिले आहे. पण मूळ उद्द्धृते आणि भरपूर इतर पुरावे इतके भक्कम आहेत की मेकॉले कदाचित तितका दोषी नसेलही असे वाटून राहिले. एखादा मूळ म्हणून मानलेला पुरावाच फेक निघाल्यामुळे त्यावर रचलेला मतामतांचा गलबला कसा कोसळू शकतो याचे मेकॉले हे उत्तम उदाहरण वाटले.
असो. ज्याचा त्याचा निष्कर्ष.
हे पुस्तक बुकगंगावर उपलब्ध आहे.

पगला गजोधर's picture

18 Jan 2018 - 7:02 pm | पगला गजोधर

वेदोक्तबंदी {स्वतःच्या क्षत्रियादिक धर्मबंधूंनासुद्धा वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हणणारी भटबाजी यापुढे चालणार नाही.-सावरकर

रेफ : http://bookstruck.in/chapter.jsp?id=35274

नारायणराव पेशव्याच्या काळात पुण्यामध्ये ब्राह्मणांनी प्रभु समाजावर (सीकेपी) दावा करून ते शूद्र असून त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही, केवळ पुराणोक्ताचा आहे असे आज्ञापत्र धर्मपीठांकडून मिळविलेच होते. त्याचाच भाग म्हणून प्रभूंनी आपल्या पत्रव्यवहारांमध्ये 'शिरसाष्टांग नमस्कार' असे न लिहिता 'दंडवत' असे लिहावे, समोरासमोर भेट झाल्यास 'नमस्कार' न म्हणता 'रामराम' म्हणावे असले अपमानास्पद वाटणारे petty नियमहि प्रभूंवर लादले होते. प्रभु ही त्या मानाने पुढारलेली जात, त्यांची ही स्थिति तर मग तिथे महारांचे काय?

=============================

वेदोक्त पुराणोक्त वादाचें मडकें हा एक भिक्षुकशाहीच्या बाह्मण्यसिद्धीचा विषय गेली तीनशें वर्षे महाराष्ट्रांत धुमाकूळ घालीत असून, या रिकाम्या मडक्याच्या निर्भेळ स्वराज्यासाठीं ब्राह्मणब्रुवांनीं मराठी स्वराज्याच्या टोलेजंग इमारतीची राखरांगोळी करायलाहि कमी केले नाहीं.

रेफ : भिक्षुकशाहीचे बंड (प्रबोधनकार)
http://prabodhankar.org/node/246/page/0/77

माहितगार's picture

18 Jan 2018 - 7:37 pm | माहितगार

भारतात कॉपीराईट कायदा १८४७ मध्ये आला. त्या कायद्याने न कळत प्राचिन ग्रंथावरचे विशीष्ट समुदायाचे कॉपीराईट हक्क संपवले पण ते कुणाच्याही लक्षात न आल्याने गाजावाजा झाला नाही.

आनन्दा's picture

25 Jan 2018 - 10:28 am | आनन्दा

बाय द वे, ही पाहिले का?
https://drambedkarbooks.com/2015/01/10/upcoming-movie-500-a-battle-of-ko...

गामा पैलवान's picture

25 Jan 2018 - 1:18 pm | गामा पैलवान

आनन्दा,

वरील दुवा वाचला. ५०० महारांनी २८००० शिपाई मारले? काहीतरीच काय! एखाद दोन शून्यं इकडून तिकडे जायची राहिली बहुतेक. ५ महारांनी २८ लाख मारले असणार. नीट संशोधन होत नाही हल्ली.

आ.न.,
-गा.पै.

पगला गजोधर's picture

25 Jan 2018 - 2:41 pm | पगला गजोधर

काहीतरीच काय! एखाद दोन शून्यं इकडून तिकडे जायची राहिली बहुतेक. ५ महारांनी २८ लाख मारले असणार. नीट संशोधन होत नाही हल्ली.

गामाजी,
तुमचंच बरोबर हो, म्हणूनच मी आधी प्रतिक्रिया दिलेली,
की
तुमच्या मता प्रमाणे कोरेगावच्या लढाईत पेशवाई विजयी झाली, पुढची शे दोनशे वर्षे , अखंड हिंदुस्तानवर त्यांनी एकछत्री अंमल केला, राज्य करूकरू ते शेवटी कंटाळले, शेवटी जवाहलाल नेहरूंच्या हाती स्वतंत्र भारताच्या किल्ल्या ठेवून ते परत आपल्या कोकेशस पर्वतराजीत आपल्या बरखट्सगार्डन या स्वगृही परतले....

पेशवाई विजयी झाल्यामुळे त्यानंतर 2 वर्षांनी विजयस्तंभ कोरेगाव येथे उभारला जाऊच शकत नाही... तो नक्कीच २०१४ नंतर गुपचूप एका रात्रीत उभारला गेला असणार....
आसेतुहिमाचल पेशवाईचा एक छत्री अंमल असल्याने, १८५७ चा उठाव हा नक्की कोणाविरुद्ध?, त्यामुळे १८५७ चा उठाव ही फेक-इतिहास असणारच तुमच्या मते , कारण पेशवाईचा एकछत्री राज्य होते नं....

गामा पैलवान's picture

25 Jan 2018 - 1:48 pm | गामा पैलवान

भीमा कोरेगाव या विषयावर आणखी एक लेख वाचनात आला. त्याचा दुवा https://prasannavadane.blogspot.in/

आरक्षणबद्दलचे बरेच प्रश्न, आक्षेप यांना उत्तरं http://www.bigul.co.in/bigul/2114/sec/11/religion%20based%20reservation इथे मिळतील.

अॅमी,

लेखात आजची तरुण मुलं विषय लक्षात न घेता तावातावाने भाषणं करतात म्हणून डॉक्टर अभिराम दीक्षितांनी गळा काढला आहे. पुढे म्हणतात की मनुने आरक्षणाला सुरुवात केली. पण त्यापुष्ट्यर्थ मनुस्मृतीतला कुठलाही श्लोक उद्धृत केलेला नाही. मग डॉक्टर दीक्षितांत आणि उर्वरित भावनाविवश तरुणांत फरक तो काय राहिला?

मात्र असं असलं तरी त्यांचा धर्माधारित आरक्षणाला असलेला विरोध मान्य.

आ.न.,
-गा.पै.

हायकोर्टाने एकबोटेचा अटकपूर्व जामीन फेटाळला. कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
https://www.loksatta.com/mumbai-news/bhima-koregaon-violence-high-court-...

दुसरे कथित सूत्रधार आजोबा कंबर बांधून मोहिमेवर निघून गेलेत. त्यांना कोणी टच करणार नाही. बडा भाई का हात है आणि राजांची फौज आहे.
आता काही आमचे हितचिंतक मला आलेला अनुभवाची आठवण करून देतील पण मी काही विसरलो नाही. तो विषय माझ्या लेखी पांचट होत गेला होता म्हणून कळफलक बडवायचा कंटाळा केला. एवढेच सांगू इच्छितो ज्यावेळेस मी प्रथम ११ वीत असताना तुळापूरला बंडा तात्यांनी आयोजित केलेल्या व्यसनमुक्ती शिबिरात गेलो होतो त्यावेळेस हे महाशय इतके गरळ ओकत होते की आम्हा मित्रांना किळस वाटली. कारण लहानपणा पासून वाडीतील पोरांना वारकरी सप्ताहाचे संस्कार होते ज्यात कोणत्या ही प्रकारे द्वेष करणे शिकवले नव्हते. तरी इथं पर्यंत ठीक होते पण जेव्हा ते स्टेजवर कोणत्या तरी प्रसंगी म्हणाले बरे झाले शिबिराला फक्त पोरेच बोलावली, पोरीपण बोलावल्या असत्या तर सगळे उसातच घुसली असती. बंडा तात्यांनी मान खाली घातली कितीतरी वेळ.
दुपारचे जेवण उरकून आम्ही आमचा घाशा गुंडाळून गाव गाठला.
या शिबिरापायी युनिट टेस्टला मी एका विषयात नापास पण झालो होतो.
परत कानाला खडा लावला. स्वतः व्यसनमुक्त राहायचे. जगाचा काही आपण ठेका घेतला नाही.
कृपया त्याचा विडिओ/ऑडिओ वगैरे मागू नका. त्यावेळेस स्मार्ट मोबाईल नव्हते.

गामा पैलवान's picture

2 Feb 2018 - 7:12 pm | गामा पैलवान

विशुमित,

मिलिंद एकबोटे तिथे हजर नसतांना दंगलीचा आणि अट्रोसिटीचा गुन्हा दाखल कसा काय होऊ शकतो? उच्च न्यायालयाने काय कारणं दिली आहेत? अगोदरच्या न्यायधीशांनी सुनावणीस नकार का दिला? उच्च न्यायालय भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे का अशी शंका येते.

आ.न.,
-गा.पै.

विशुमित's picture

2 Feb 2018 - 7:26 pm | विशुमित

जामीन फेटाळला फक्त एवढंच माहिती आहे.

साधारण असंच आणखी एका ठिकाणी वाचलं आहे. शिवाय उदयनराजे छत्रपती असल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करू नये वगैरे बाष्कळ बडबड पण होतीच.

तेव्हाच प्रकाशित झालेले अक्षरनामा वरचे दोन लेख

www.aksharnama.com/client/article_detail/1661

http://www.aksharnama.com/client/article_detail/1678

मित्रहो,आजच्या वाढत्या लोकसंख्येला महत्वाचा एकच प्रश्ण आहे।प्रत्येकाला उपजिविकेसाठी रोजगार हवा आहे।इकडे तर आधुनिक तंत्रज्ञानामुळे उद्योगांचे आंतरजालीकरण,रोबोटीकरण झाल्यामुळे रोजगार निर्मितीत सरकारही अपयशी झाले आहे।अगदी डोनाल्ड ट्रंप पुढेही हेच आव्हान आहे।
अशा वेळी महात्मा गांधींची स्वदेशी व हस्तोड्योगाची कास सर्व विश्वाने अंगिकारल्यासच हा प्रष्ण सुटेल/बेरोजगारी नष्ट होईल।

मित्रहो,आजच्या वाढत्या लोकसंख्येला महत्वाचा एकच प्रश्ण आहे।प्रत्येकाला उपजिविकेसाठी रोजगार हवा आहे।इकडे तर आधुनिक तंत्रज्ञानामुळे उद्योगांचे आंतरजालीकरण,रोबोटीकरण झाल्यामुळे रोजगार निर्मितीत सरकारही अपयशी झाले आहे।अगदी डोनाल्ड ट्रंप पुढेही हेच आव्हान आहे।
अशा वेळी महात्मा गांधींची स्वदेशी व हस्तोद्योग/कुटीरोद्योगाची कास सर्व विश्वाने अंगिकारल्यासच हा प्रष्ण सुटेल/बेरोजगारी नष्ट होईल।