द डेक्कन क्लिफहँगर - रेस डे..

मोदक's picture
मोदक in भटकंती
18 Dec 2017 - 4:51 pm

द डेक्कन क्लिफहँगर..!!

************

सुमित

.

डॉक आणि मी डेक्कन क्लिफहँगर ला जायचं असं बऱ्याच महिन्यांपासून ठरवलं होतं. पुण्यात डॉकचे बरेच सायकलिस्ट मित्र आहेत. डॉकने त्यांना विचारून आमची टीम पक्की केली. माझ्यासाठी गंमत अशी की, त्यांपैकी कुणालाच मी ओळखत नव्हतो आणि भेटण्याचा तर प्रश्नच येत नाही. पण त्यांचा व्हॉटस्अॅप ग्रुप जॉईन केल्यावर एकेकाचे पराक्रम कळायला लागले.

आमच्या टीम पैकी एक देशपांडेमामा हा काहीतरी भयंकर प्रकार होता. पुण्याची ६०० किमीची बीआरएम त्यांनी अवघ्या एकतीस तासात मारली. लोक जेवढ्या वेळात २०० किमी करतात तेवढ्या वेळात मामा ३०० किमी करतात. सागर पाध्ये बद्दल अशी चर्चा होती की प्रत्येक गोष्ट अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने करून तो १५० किमी अंतर पाच तासात कापू शकतो.

जशी टीम तयार झाली, आम्ही रेजिस्ट्रेशन केलं आणि क्रू मेंबरची जमवाजमव सुरू झाली. यात आम्हाला सुरुवातीला भेटले ते शैलैंद्र! ते नेमके काय करतात हे मला काही कळले नाही. पण डॉक एकदा बोलले की ते CID मध्ये आहेत. ते त्यांची फोर्ड एनडेव्हर घेऊन येणार होते.

मिसळ-पाव डॉट कॉम अर्थात मिपा ही वेबसाईट भरपूर फेमस आहे. यावर विविध विषयांवर लोक लेख लिहितात. त्या वेबसाईटचे ऍडमिन प्रशांत, ज्यांना सरपंच असं संबोधलं जातं ते देखील कृ मध्ये येण्यास तयार झाले.

या व्यतिरिक्त मोदक, अभिजित आणि आनंद ही मिपा वाली मंडळी आमच्या सोबत येण्यास तयार झाली. जवळ जवळ तीन दिवस सोबत राहून देखील आनंदराव आणि अभिजित पोटापाण्यासाठी काय उद्योग करतात हे नेमके कळले नाही. अभिजित बहुदा आयटी कामगार असावेत. मोदक हे अ‍ॅनालिस्ट आहेत. त्यांनी त्यांचे 'अ‍ॅनालिटिकल स्किल्स’ वापरून DC साठी बरीच तयारी करून ठेवली. प्रत्येक गाडीत रूट ची हार्ड कॉपी, कोण काय विकत घेणार याचे प्रत्येकाला इन्स्ट्रक्शन, त्याशिवाय राईड सुरू असतांना रस्ता दाखवणं आणि तो बरोबर आहे की नाही हे तपासात राहणं हे काम ते करत होते. थोडक्यात ह्या रेससाठी ते आमचे कॅप्टन होते. मोदकराव म्हणतील तसं गपचूप करायचं हा नियम प्रत्येकाला पाळायचा होता. कोल्हापूर नंतर तर एके ठिकाणी मामांनी बायो-ब्रेक (इथून पुढे लेखात संडास ला बायो-ब्रेक असला सुटसुटीत शब्द वापरला आहे) घ्यावा की नाही हा निर्णय पण मोदकरावांनी घेतला आणि मामांनी तो मुकाट पणे पाळला देखील!

अभिजित बुचके यांचा कार चालवण्यात हात अत्यंत साफ होता. त्यांनी पूर्ण साडे-सहाशे किलोमीटर सफाईदारपणे गाडी चालवली. ते व्यवस्थितपणे रायडरला मागे फॉलो करत होते. मागे पोलो आणि ड्राइवर म्हणून अभिजित असले की जरा शांततेत सायकल चालवायला मिळायची. नाहीतर एंडेव्हर असली की थोडं दडपण यायचं. एकतर ती गाडी हत्तीसारखी मोठी, आणि तिच्यात डायनासोर एवढी ताकद ! आपली सायकलची स्पीड जरा कुठे कमी झाली आणि चुकून जरी एंडेव्हर चा धक्का लागला जर गेमच खल्लास ! शिवाय स्पीड फारच कमी झाला तर कॅप्टन मोदक मागून ‘पुश पुश’ असं जोरजोरात ओरडायचे. तसं सायकल सुरू असताना गाडीतले लोक काय म्हणतायेत नीट कळायचं नाही. पण आपल्या नावाने बोंबाबोंब सुरू आहे हे लक्षात यायचं.

पुण्यात गुरुवारी भेटल्यावर मोदक, आनंदराव आणि अभिजित बुचके यांची रेश्मा कडे भेट झाली. रेश्मा म्हणजे नळ स्टॉप ची रेश्मा भुर्जी ! शुक्रवारी सकाळी नाश्त्याला मोदक, मी, डॉक, मामा, सागर आणि शैलेंद्र भेटलो. तिथे माझी मामा आणि सागरशी पहिल्यांदा भेट झाली. आम्ही सगळ्यांनी इडली, डोसा, वडा सांबर अशी ऑर्डर दिली आणि मामांना ऑर्डर साठी विचारलं. मामांनी ऑर्डर द्यायला स्पष्टपणे नकार दिला आणि बॅगेतून पिनट-बटर लावलेला पोळीचा रोल काढला. त्यावेळी मामा काय चीज आहे याची थोडी प्रचिती आली.

DC वाल्यांनी भरपूर नियम आणि अटी घालून ठेवल्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे सायकल आणि कार वर रेडियमच्या टेप चिकटवायच्या होत्या. पटापट नाश्ता आटपून आम्ही त्या कामाला लागलो. सायकल वर रेडियमच्या टेप लागलेल्या पाहून पाध्येंचा चेहरा पार पडला. ह्या टेप निघतात कशा याचीच त्याला चिंता होती. हे सगळे उद्योग करून झाल्यावर सकाळी अकरा च्या सुमारास आम्ही परांजपे फॉरेस्ट ट्रेल या ठिकाणी पोहोचलो. तिथे जर्सी, स्टॅम्प कार्ड आदी गोष्टी गोळा केल्या. या ठिकाणी महाजन बंधू (दोघांपैकी कुठले तरी एक), अमित समर्थ आणि संजय मोकळ असले ओळखीचे चेहरे दिसले. औरंगाबादहुन बाईक स्टुडिओ दुकानाची पण एक टीम आलेली होती. तिथे त्यांची पण भेट झाली. DC वाल्यांनी दिलेले पोस्टर गाडी वर लावायचे म्हणजे गाडीचा लुक खराब करून घ्यायचंच काम होतं. पण आता नियमच केला म्हणल्यावर पोस्टर लावणं भागच होतं. ही भानगड आटपून मी, डॉक, मोदक आणि सागर लंच करायला निघालो. व स्ट्यु आर्ट मध्ये जाऊन स्ट्यू वर ताव मारला. शुक्रवारी संध्याकाळी लवकर जेवून आम्ही सगळे झोपी गेलो.

स्टू..

.
.

गार्लिक ब्रेड / टोस्ट

.

शनिवारी सकाळी लवकर उठून आम्ही रेस च्या स्टार्ट पॉईंटला पोहोचलो. रेस च्या सुरुवातीपासून ते कात्रज घाटाच्या वरच्या पॉईंट पर्यंत मी सायकल चालवणार होतो. त्यामुळे सायकल सेट करून एखादी छोटी चक्कर मारून पाहावी असा विचार मनात आला. आणि छोटीशी चक्कर मारल्यावर लक्षात आलं की, माझ्या सायकलचे पुढचे गिअर व्यवस्थित पडतच नव्हते. शैलेंद्र यांनी त्यांच्या पद्धतीने काहीतरी करून पाहिलं आणि दुसऱ्या टीम मधून त्यांच्या ओळखीचा एक मेकॅनिक शोधून आणला. त्याने पुढचे गिअर नीट करून दिले, पण पुढे राईड मध्ये मागच्या गिअरने बराच त्रास दिला. साधारण सव्वा आठ वाजता आमचा फ्लॅग ऑफ झाला आणि रेसला सुरुवात झाली. सुरवातीला परांजपे फॉरेस्ट ट्रेलच्या पायथ्यापर्यंत पूर्ण उतार होता. त्याचा पूर्ण फायदा घेत मी जोरात सायकल काढली. मी मनाशी ठरवलं होतं की तसही 23-24 किमी सायकल चालवायची आहे आणि त्यानंतर गाडीतच बसायचं आहे, म्हणून जमेल तेवढ्या ताकदीने मारायला हरकत नाही. मुळशी रोडला लागलो. ट्रॅफिक सुरू झाले आणि छोटेमोठे चढ-उतार सुरू झाले. कदाचित मी एकटा असतो आणि चढ लागले असते तर स्पीड नक्कीच कमी झाला असता. पण मला हळूहळू एक एक रायडर आणि त्यांना त्यांच्या पाठीमागून फॉलो करणारा क्रू दिसू लागला. दुसरा रायडर बघितला की आपोआपच एक रेस स्पिरिट येतं आणि त्याला ओव्हरटेक करण्याची चढाओढ सुरू होते. दुसऱ्या टीमचे रायडर ओव्हरटेक करण्याच्या नादात मला स्पीड, कॅडेन्स आणि हार्ट रेट या कसल्याच गोष्टीचे भान नव्हते. मध्ये मध्ये बऱ्याच टीम रायडर बदलत देखील होते. एवढ्या कमी अंतरात रायडर बदलण्याची स्ट्रॅटेजी वापरायला आमच्याकडे रिले रेसचा पुरेसा अनुभव नव्हता. सुरुवातीचे दहा किलोमीटर अंतर झाल्यानंतर माझ्या मागच्या गिअरने त्रास द्यायला सुरुवात केली. आमच्या रियाझ मेकॅनिकच्या भाषेत ते ‘स्लिप मारत’ होते. म्हणजे काही रोटेशन नंतर एखादं रोटेशन पॉवरलेस जात होतं. हा प्रकार प्रचंड मनस्ताप देणारा आहे. ह्या ‘स्लिप’ शी माझं मानसिक युद्ध सुरू असतांनाच कात्रज घाटाची सुरुवात झाली. इलेवशन ग्राफ वर आकडे जेवढे भयानक दिसत होते तेव्हढा कात्रज काही भयंकर वाटला नाही. विशेष म्हणजे घाटादरम्यान एखाद्याला ओव्हरटेक करण्याची जी मजा असते ती उतारावर येत नाही. जसा चढ संपला तसा कात्रज चा बोगदा सुरु झाला. बोगद्यात कुठल्याच प्रकारच्या हेड विंड किंवा क्रॉस विंड नव्हत्या. त्यामुळे हलकासा चढ असून देखील चांगला स्पीड मिळत होता. बोगदा संपल्यावर लगेच मला पोलो पुढे उभी दिसली. डॉक सायकलवर माझी वाटच पाहत होते. मी पुढे निघून गेल्यावर लगेच डॉक निघाले. मी रस्त्याचा बाजूला थांबून आधी स्ट्रावा बंद केले. तीस चा सरासरी वेग बघून जरा हायसं वाटलं. एंडेव्हर डॉकला फॉलो करत पुढे निघून गेली. इकडे अभिजित व आनंदरावांनी माझी सायकल पोलोला लावली व मी पोलो मध्ये बसलो.

रेसच्या दिवशी असे दृष्य होते..

.
.
एंडेव्हर सोबत - देशपांडे मामा
.
.
.

पोलो सोबत - प्रशांत मालक

.
.
फोटोसेशन - हेल्मेट घातलेला सुमित. डावीकडून डॉक, सागर पाध्ये, शैलेंद्र, मामा, मोदक आणि प्रशांत

.
.
प्रशांत सर्वांचा सेल्फी घेताना..

.
.
निघण्यापूर्वीची गाडीतल्या सामानाची आवराआवर करताना - शैलेंद्र

.
.
सँडविच सह - आनंदराव..

.
.
कात्रज घाटात - सुमित.

.
.
.

क्रू रायडरच्या मागे गाडीत बसून असा आवाज द्यायचा...

डॉ श्रीहास

हॅप्पी बड्डे आणि रेस डे ! सकाळी ६:३० ला सुरू होणारी रेस भारतीय प्रमाणवेळ ७:५० ला सुरू झाली , कळवल्या गेल्याप्रमाणे पोलोमध्ये डॉक आणि प्रशांत भूगाव च्या परांजपे स्कीम च्या बाहेर वाट बघत होते आणि एंडेव्हर घेऊन शैलेंद्र,मोदक, मामा आणि सागर रेस च्या स्टार्टींग पॉईन्ट ला पोहोचले. सुमीत पहीला रायडर होता टिमचा ! रेस सुरू होण्यास वेळ होता म्हणून मोदकनी पोलो वर म्हणजे स्टार्टींग पॉईन्ट ला घेऊन या असं सांगितल्यावर डॉक नी गाडी वर नेली; तिथं रेस सुरू होण्यापुर्वी सायकल्स चेक करणे, रेस दरम्यान काही सुचना आणि फोटोग्राफी असा प्रकार सुरू होता. तेवढ्यात झोल झाला सुमीतच्या सायकल्स चे गियर्स पडत नाहीत असा शोध लागला. "घ्या आता काय हा नसता उपद्व्याप" हा विचार येईपर्यंत शैलेंद्रनी मेकॅनिक शोधून त्यावेळे पुरती का होईना सायकल दुरूस्त केली. सुमीत ला फार टेन्शन आलं असावं म्हणून डॉक बघायला गेला तर हे साहेब "चिल आऊट" मध्ये मस्तपैकी मित्रांकडून स्वत:चे फोटो काढून घेत होते. डॉक ला हेवा वाटला ह्या ॲटीट्युडचा, असं पाहिजे राव असं मनाशी ठरवत बाकी टिमपाशी येऊन एक प्रायव्हेट फोटोसेशन झालं, मोदकानी अजून एक सरप्राईज दिलं की पोलो सुमीत ला फॉलो करेल आणि शैलेंद्रला एंडेव्हर मध्ये शेलचं डिझेल भरायचं म्हणून सुरवातीला ती गाडी पेट्रोल पंपवर जाऊन मग सुमीत च्या मागे राहणार. डॉक शिव्या आवरत्या घेऊन कृ मेंबर ची आज्ञा पाळत होता कारण सुमीत नंतर डॉकच सायकलवर बसणार होता आणि तोपर्यंत शांत डोक्यानी गाडी चालवणं किंवा गाडीत बसणं हवं होतं पण ते शक्य नव्हतं. शिवाय आनंदराव आणि स्थितप्रज्ञ दोघही नवले पुलाजवळ पाध्येंनी मागवलेली सॅन्डविच घेऊन शांबणार होते आणि त्यांना त्या ठिकाणाहून पिक करायची जबाबदारी पोलोची होती.

रेस सुरू झाली. एकेक रायडर आणि त्याची सपोर्ट व्हेईकल बाहेर पडू लागले (ह्या ठिकाणी सपोर्ट व्हेईकल असल्यानी प्रत्येक रायडर वेगळ्या वेळेस रेस सुरू करत होता आणि त्या त्या टिम ला स्टार्टींग टाईम दिला जायचा) सुमीत दिसला. मागे एंडेव्हर पण होतीच. ठरल्याप्रमाणे डॉक नी पोलोतुन सुमीतला फॉलो करायला सुरू केलं आणि एंडेव्हर नी ओव्हरटेक करून पेट्रोल पंपवर मोर्चा वळवला. सुरवातीपासूनच सुमीत जोरात होता. "समोर दिसणार्‍या प्रत्येक रायडरला मागे टाकायचंच" ह्या जोशात चांदणी चौकात येईपर्यंत तीन चार रायडर्स मागे टाकले होते. चांदणी चौकातून बंगलोर हायवेला लागेपर्यंत बऱ्यापैकी उतार होता आणि सुमीत ४०-५० किमीच्या जबरदस्त स्पीडने सायकल चालवत होता. एंडेव्हरची वाट पाहत पाहत जवळ जवळ वीसेक किमी पोलोने सुमीतला फॉलो केले. तो पर्यंत आनंदरावांचं आणि प्रशांतचं फोनवर बोलून नेमकं कुठे भेटायचं हे ठरलं होत. यथावकाश सुमीतला न सोडता (कारण कानात वारं शिरल्यासारखं सायकल चालवत होता हा पठ्ठ्या )आनंदराव आणि स्थितप्रज्ञ ह्या दोघांना गाडीत घेणं हे दिव्य पार पडलं. तरी सुमीत थोडा पुढे गेलाच..! डॉक नी पोलोचा स्पिड वाढवून सुमीतला फॉलो करण्यासाठी पोहोचेपर्यंत मोदकचा फोन आला की आम्ही पाचच मिनीटात पोहोचतो आहोत तोपर्यंत कळ सोसा. आणि शेवटी एकदाची एंडेव्हर दिसताच सुमीतला सोडून वेगानी पोलो कात्रज बोगद्याकडे निघाली , तोपर्यंत सुमीत नी आधी निघालेले १० रायडर्स मागे टाकले होते !!!

कात्रजचा बोगदा पार करून रस्त्याच्या डावीकडे गाडी लावून डॉक सायकलींग चे क्लिट्स वाले शुज घालू लागला ( क्लिट्स शुज हे सायकलच्या पेडलला ॲटॅच होतात आणि काढतांना हलका झटका देऊन काढले जातात, ह्याचा सर्वात मोठा फायदा असा असतो की पाय पेडलवरून सटकत तर नाहीच शिवाय पेडलींग करतांना एकाच लाईनमध्ये पाय आणि गुडघे राहील्यानी ईजा होण्याची शक्यता कमी होते) आणि थोडा वॉर्मअप करावा असं म्हणेपर्यंत सुमीत दिसु लागला , मग काय बाकी विचार न करता पोलो च्या मागे लावलेली सायकल काढून डॉक सज्ज झाला, सुमीत पोहोचला आणि डॉक सुटला!! एंडेव्हर नी आता डॉकला फॉलो करायला सुरू केलं. सुरवातीलाच उतार होता त्यामुळे चांगलीच स्पिड मिळत होती पण त्यानंतर चढ उतार (रोलींग) होतं शिवाय सकाळचे ९ वाजलेले त्यामुळे ट्रॅफिक वाढत चाललेली , ३० ची स्पीड मेन्टेन करणं अवघड जात होतं. पण वाॅर्मअप सायकलींगनी नंतर पाय व्यवस्थीत मोकळे झाले आणि बघता बघता अजून २-३ रायडर्स मागे पडले. तेवढ्यात “कमॉऽऽऽन डॉक .... गो गो गो“ अशी आरोळी ऐकू आली, बघतो तर पोलोतून प्रशांत, स्थितप्रज्ञ चियर अप करत पुढे निघाले होते. परत विचार झटकून सायकल चालू. त्या दरम्यान लाल जॅकेट मधल्या एका रायडरनी डॉकला ओव्हरटेक केलं आणि डॉकला स्पिड वाढवण्यासाठी पुरेसं कारण मिळालं. मग ह्या रायडर च्या मागेपुढं जवळ जवळ वीस बावीस किमी सायकलींग केल्यावर हा खंदा रायडर थोडा पुढे निघून गेला आणि त्याच्या गाडीपाशी थांबला आणि त्या टिमचा नवा रायडर निघालेला दिसला. सुरवात चांगली झालेली आणि आता मात्र हेडविंड सुरू झालं होतं. समोरून विरूध्द बाजूनी येणारं वारं सायकलीस्टच्या अनेक शत्रुंपैकी एक.. वाढलेले ट्रॅफिक, हेडविंड आणि जोरात सुरवात केल्यानंतर डॉकचा स्पिड कमी पडू लागला आणि ३०-३२ किमी झालेच होते की मोदकनी गाडीतून आवाज दिला “डॉक थांबा, मामा घेतील इथून पुढे“ मग एक छोटासा पुल ओलांडून रस्त्याच्या डाव्या बाजूला एका हॉटेल समोर भली मोठी मोकळी जागा बघून डॉक आणि एंडेव्हर थांबले पोलोतून उतरून बाकी टिम वाट बघत थांबली होतीच. मामा रॅक वरून सायकल काढून निघायच्या तयारीत होते आणि डॉक रॅक ला सायकल लावत होता तेवढ्यात सायकल ची फ्रेम आणि रॅक चं प्लॅस्टीक हुक ह्यात बोट अडकलं आणि कळेपर्यंत उजव्या हाताच्या बोटाला छोटीशी जखम झाली आणि डॉक ला स्वत: आणलेल्या फर्स्ट एड किटचा वापर करावा लागला....;))

गाडीत बसल्यावर मस्त वाटायला लागलं होतं कारण सकाळी उठल्यापासून कृ आणि रायडर अशी दोन्ही कामं व्यवस्थीत पार पाडल्यानी डॉक समाधानी होता.

एंडेव्हरमधून दिसणारे दृष्य..

.
.
पोलो मधून दिसणारे दृष्य..

.
.
डॉक आणि रायडर

.
.
पट्टेरी टीशर्ट वाले डॉक, रस्त्यावरचे पट्टे चुकवताना..

.
.
मामा.. खंबाटकी घाट चढवताना..

.

मामांनी खंबाटकी घाटमाथ्यावर पोहोचल्यानंतर असा जल्लोश केला की आंम्ही एंडेव्हरच्या आत बसून तो सोहळा अनुभवला आणि आरडाओरडा करून मामांना प्रोत्साहन दिले..

मामा खंबाटकी उतरताना..

पाध्येंची सायकल नेमकी इथेच पंक्चर झाली होती त्यामुळे पाध्ये त्या टेन्शन मध्ये होते.. (सोबत स्थितप्रज्ञ)

.

शेवटी पर्याय म्हणून डॉकच्या सायकलवर पाध्येंनी पसरणी घाट चढवायला सुरूवात केली. सगळे जण विलक्षण टेन्शनमध्ये होते त्यामुळे इथे फारसे फोटो काढले नाहीत.. मात्र पाध्येंनी डॉकच्या सायकलवर अविश्वसनीयरीत्या फक्त ४२ मिनीटात पसरणी संपवला. __/\__
.
.

शैलेंद्र

पाचगणी सोडल्यावर मालाजवळ डॉक्टरने सायकल घेतली, कात्रजनंतर पहिल्यांदाच सायकल मिळत असल्याने, आणि त्यातही वळणावळणाचा उतार असल्याने डॉक्टर खुश होता. हाय वे सोडून पहिल्यांदा आम्ही गावातल्या आणि जंगलातल्या रस्त्यावरून चाललो होतो. उतार आणि टर्न हे भन्नाट कॉम्बिनेशन असतं, रस्ता इतका लहान की समोरून गाडी आली की ती सायकलस्वारावर येणार. वळणं इतके ब्लाइंड की फारतर 50 फूट पुढचं दिसत होतं. उतार असल्याने वेगही सोडवत नव्हता. रस्त्याच्या कडेला दोन तीन बैल चरत होते त्यातला एक जरा बाहेर होता. डॉक्टर आपली डावी बाजू पकडून सुसाट निघालेला. बैलांच्या अगदी जवळ जाऊन डॉक्टरने त्याला कट मारला. आपल कॉलेज पुण्यात झालंय हे बैलाला दाखवून देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न होता. या कौशल्यपूर्ण धमकीचा परिणाम म्हणून तो सातारी बैल उधळला आणि झाडीत दिसेनासा झाला.

बैलांना कट मारून डॉक्टर सुसाट निघाला, वाटेत अनेक कुत्रे डॉक्टरकडे आश्चर्यमिश्रित भयव्याकुल नजरेने पहायचे. या मारुततुल्य वेगाने येणाऱ्या गोष्टीवर आपण भुंकाव की त्याच्या मार्गातून बाजूला व्हावं हे त्यांनी ठरवेपर्यंत डॉक्टर पुढे गेलेला असायचा. भुंकायचा चान्स गेल्याची व्यथा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट वाचता यायची.
उताराचा रस्ता घरंगळत निघाला होता, आता डॉक्टर अनस्टॉपेबल वाटत होता. पुढचा रस्ता अति अरुंद होता म्हणून क्रुने गाडी पुढे घेतली. आता आम्ही दोन डोंगरांच्या मधल्या सोंडेवर पोहचलो होतो. हा जबरदस्त स्पॉट होता, आम्ही जो डोंगर उतरून आलो तो मागे होता आणि समोरचा डोंगर आम्हांला चढायचा होता. सोंडेच्या दोन्ही बाजूला दऱ्या होत्या. आम्ही गाडी बाजूला उभी करून डॉक्टरसाठी थांबलो. तिथेच आयोजकांचे फोटोग्राफर सज्ज होते. सारी कायनात जणू एका तुफानाची वाट बघत होत, आणि ते तुफान रोरावत आले, जल्लोष झाला, खटाखट फोटोचे क्लिक उडाले. त्या आवाजाने डॉक्टरने वर पाहिले, डॉक्टरला पुढचा चढ दिसला आणि डॉक्टर थांबावला.. हो थांबावला.. हा चढ आपण चढल्यास मामांना पुढचा सराव मिळणार नाही या भावनेने डॉक्टरने खस्खसून ब्रेक लावला, तुफान थांबले.
आजही त्या दोन डोंगरांमधील सोंडेवर डॉक्टरांच्या सायकलच्या झिजलेल्या टायरच्या खुणा दिसतील, आजही त्या दरीतून येणाऱ्या वाऱ्यावर डॉक्टरांच्या समजदारीचे गाणे ऐकू येईल.

मामा गाडीतून उतरले, त्यांच्या उजव्या हाताला जंगलातून उतरत आलेला रस्ता होता, डाव्या हाताला जंगलात चढत जाणारा रस्ता होता, मटण बिर्याणीतले पीस खाऊन उरलेला भात एखाद्याने आग्रहाने मित्राला वाढल्यास, मित्राच्या चेहऱ्यावर जे भाव असतील ते मामांच्या चेहऱ्यावर होते. मनातल्या मनात सात्विक शब्द उच्चारत मामानी सायकल घेतली, आंणि तो चढ चढण्यासाठी स्टन्स घ्यावा म्हणून मामा 50 मीटर उताराच्या दिशेने गेले, आयोजकांनी एक कन्यका आणि दोन "यो" टाईपचे फोटोग्राफर तिथे ठेवले होते. सायकलिंग कशाशी खातात हे त्यांना माहीत नव्हतं हे आकारावरून कळत होतं. आमचे मामा उतारकडे गेले तेंव्हा ते जणू फोटो काढायच्या आमिषाने त्या बाजूला गेले असा त्यांचा समज झाला. त्यांनी मामांना पोझ घ्यायला लावली, मामांना काही टोटलच लागत नव्हती, त्यांना फक्त त्या बिर्याणीतला उरलेला भात संपवायचा होता. ते आता मामांचे नैतिक कर्तव्य होते.

मामांना सायकल मिळाली, मामा निघाले. चढ कसाही असला तरी मामा आता थांबणार नव्हते, थोड्याच वेळात मामा टॉपला पोहचले, डोंगर संपला. हँडलवर हात मारत मामांनी डोकं खाली घातलं आणि सीटवर सीट आपटत चल मेरे धन्नो वाला पवित्रा घेतला. सायकल 45/50 चा स्पीड गाठायला लागली. त्या वळणांवर बारीक टायर असलेली ती सायकल घसरायला लागली पण मामांच्या डोळ्यात आता उतार उतरला होता, ते वेग कमी करायला तयार नव्हते. मागच्या गाडीच्या ड्राइविंग सीटवर बसलेला शैलेंद्र 40 फुटवरून हे बघत होता, मामा पडणार हे नक्की होतं फक्त कुठे कसे आणि कधी हाच प्रश्न होता.
आणि तो क्षण आला, डाव्या हाताला वळण होतं, मामांनी मागचा ब्रेक दाबला, सायकल जरा फरकली, मामांनी पुन्हा दाबला, परत तेच.. वेग अजूनही 40 च्या आसपास, तिसरा ब्रेक.. चाक मागून सरकत रस्त्याच्या कडेला, सचिनने शोएब अख्तरला अप्पर कट मारावा त्या शिताफीने सायकलने मामाना रस्त्याच्या पलीकडे फेकलं आणि अनुष्काने विराटच्या गळ्यात पडावं तशी ती मामांच्या गळ्यात पडायला घसरली.
करवंदाच्या काटेरी जाळीत मामा हात पाय वर करून महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीसारखे कुणीतरी मला उचलेल या अपेक्षेने पडून राहिले होते. नशिबाने त्यांना फार काही लागलं नाही. मोदक धावत गेला सायकल बाजूला करून त्याने मामांना उभं केलं. जरासं खरचटलं होत पण थोडक्यात निभावलं. मामा घसरले होते पण हिम्मत हारले नव्हते. तसेच सायकलवर बसून मामा पुढे निघाले.

डॉक.. मेढा घाटात..

.
.
इथेच कुठेतरी डॉकनी बैलाला कट मारला.. :-D

.
.
मामा बिर्याणीतला उरलेला भात संपवताना.. म्हणजे मेढा घाट उतरवताना..

.
.
मेढा घाटातले सुंदर दृष्य..

.

मेढा घाट उतरताना.. मामा.

मोदक

मामांनी अपघातानंतर सायकल सावरली आणि काळजीपूर्वक घाट उतरू लागले. महाबळेश्वरच्या कधीही न बघितलेल्या बाजूचे आणि बहुतांश पर्यटकांची नजर न गेलेले निसर्गसौंदर्य आजूबाजूला पसरले होते, त्यातून मामा सायकल चालवत होते आणि एंडेव्हरमधून आंम्ही त्यांना फॉलो करत होतो. अनेक ठिकाणी थांबून फोटो काढण्याचा मोह होत होता पण आज थांबणे शक्यच नव्हते. यथावकाश मामांना गाईड करत करत मेढा गाठले. एव्हाना पोलोमधून "पाध्येंची सायकल तयार झाली" अशी गुड न्यूजही मिळाली होती. त्यामुळे गाडीतला तणावही निवळला होता.

मामांनी "पाणी संपत आले आहे" अशी खूण केली. आता सातारा येईलच त्यामुळे सातार्‍यात बघू असा विचार आंम्ही केला आणि मामांना अजून ८ / १० किमी चालवा तसेच असे सांगितले. (पर्याय नसल्याने बहुदा) मामा "बर्र.." म्हणाले.

टळटळीत दुपारची वेळ आणि चढ उतार चढ उताराचा रस्ता असल्याने मामांना सातार्‍यापर्यंत ताणायला नको म्हणून क्रूने निर्णय बदलून मामांना पाण्याची बाटली देऊया असे ठरले. चालत्या गाडीतून रायडरला पाण्याची बाटली देणे नियमाविरूद्ध असल्याने गाडी पुढे घेऊन मामांना पाण्याची बाटली द्यावी लागणार होती. शैलेंद्रने गाडी पुढे काढली. मोदक रस्त्यावर जाऊन उभा राहिला. आता मामा आले की खंबाटकीत मामांना पाणी दिले तसे "तुम्ही एक बाटली झेला मी एक बाटली झेलतो" अशी कसरत करावी लागणार होती. पण कसले काय.. मामांचा थ्रो मोदकच्या डोक्यावरून पार पलिकडे गेला. अर्थात मामांना पाण्याची बाटली व्यवस्थीत पोचली होती त्यामुळे रस्त्यावर पडलेली बाटली उचलून गाडीत बसणे इतकेच काम शिल्लक होते.

मामांनी पाणी मिळाल्याने असेल बहुदा पण पुन्हा एका लयीत सायकल हाणायला सुरूवात केली.

अचानक मामांनी उजवीकडे हात करून आमची लक्ष एका नजार्‍याकडे वेधले. एक भटका कुत्रा एका कोंबडीची शिकार घेऊन चालला होता. मामांनी गाडीत असताना आंम्हाला त्यांच्या सुपुत्राचे चिकनप्रेम सांगितले होते आणि त्यावर "मामा सायकल चालवू लागले की रस्त्यावर कोंबड्यांची पळापळ होत असेल" "मामा आता सरळ पोल्ट्री काढा" अशी आंम्ही मामांची बरीच खेचली होती. इतक्या धावपळीत सायकल चालवतानाही मामांनी बरोब्बर हा नजारा टिपला होता हे बघून गाडीत पुन्हा हशा पिकला. :D

सातार्‍याला सरपंच, आनंद्राव, अभिजीत आणि सुमीत एकदम तयार राहणार होते. त्या दरम्यान जेवणाचे काय करायचे हा प्रश्न होताच. एंडेव्हर रायडरच्या मागे ठेवायची ठरली असल्याने आंम्ही जेवण घेणार नाही असे ठरवले व सँडविचवरच भागवू असा बेत ठरला.

आता निवांत AC मध्ये बसून मामांना चीअर अप करणे इतकेच काम आमच्याकडे होते.

अचानक पुढे एक रायडर दिसू लागला,मामांचा मेंदू नेहमीप्रमाणे वेगात चालू लागला आणि त्याने पायांना आदेश दिला असावा, मामांनी त्या रायडरला मागे टाकण्यासाठी वेग घेतला. आम्ही मामांचे शेपूट धरल्यासारखे मागे मागे होतोच. तो रायडर मागे पडला असं वाटत होतं आणि मामा निवांत होत आहेत तोच त्या रायडरने पुन्हा वेग घेतला आणि चक्क मामांचा ड्राफ्ट घेऊ लागला. (ड्राफ्ट = समोरच्या रायडरच्या किंवा गाडीच्या मागे जाऊन हेडविंड टाळणे, असे केल्याने कमी श्रमात जास्त वेग घेता येतो) या स्पर्धेत आपली टीम वगळता दुसर्‍या रायडरचा ड्राफ्ट घेणे हा नियमभंग होता!!

नक्की काय सुरू आहेत ते आंम्हाला कळताच आंम्ही पटकन कॅमेरे ऑन करून शुटींग सुरू केल जेणेकरून गरज पडल्यास कायदेशीर कारवाई साठी पुरावा जमा होईल !! ड्राफ्ट प्रकार मामांनाही कळाला होताच त्यामुळे मामांनी एक झकास काम केले. त्याच वेळेस शैलेंद्र पण हेच सांगत होते की बघा गंमत “मामा आता स्लो होणार आणि सपकन् वेग वाढवून त्या रायडरला गुंगारा देणार.. बघाच सगळे जण” गाडीतून मोदक, सागर, डॉक बघतच होते. रायडरचा ससेमिरा चुकावा म्हणून मामांनी चक्क सायकल स्लो केली. त्या रायडरला कळेपर्यंत मामा त्याच्यापेक्षा कमी वेगात सायकल चालवू लागले, तो गडी काय चालू आहे हे कळेना म्हणून मामांकडे बघत होता पण पुढच्या क्षणाला त्याला कांही कळायच्या आत त्याचा मामा बनवून आपल्या मामांनी अशी सुसाट सायकल सोडली की त्या रायडरला मामांना गाठणे शक्यच नव्हतं. एंडेव्हर नी त्या रायडर ला हळूच ओव्हरटेक करून मामांपासून दूर ठेवण्याचं काम केलं आणि आम्ही गाडीत बसून हा सगळा प्रकार भलताच एंजॉय केला. शैलेंद्रचा शब्दन् शब्द खरा ठरला होता आणि मामा हे ऑसम आहेत परत सिद्ध झालं..!!

सातार्‍याला सुमीतला डिप्लॉय करताना आनंदराव..

.

सातारा ते कराड टप्पा कव्हर करताना सुमीत..

.

शैलेंद्र

"मला बायो ब्रेक घ्यायचाय"

पाठीमागून अत्यंत सभ्य आणि आर्जवी स्वरात मागणी झाली, मोदकाने वळून पाहिलं, शैलेंद्र गाडी रस्त्याच्या कडेला सोयीस्कर ठिकाणी कशी घेता येईल ते बघत होता.

"पण मी तो साई इंटरनॅशनलला घेईन" पाठीमागून अजून एक पुरवणी मागणी आली.

कन्फ्युज होऊन मोदकने मागणीच्या आणि बायोब्रेकच्या कर्त्याकडे पाहिलं, सागर पाध्ये विनयखोर नजरेने आपली मागणी पुढे सरकवत होते.

तुला दोन नंबरला जायचंय का? मोदकाने विचारलं, कारण त्या गोष्टीसाठी विशिष्ट स्थळाचा आग्रह समजू शकत होतो.

"नाही, मला बायोब्रेक घ्यायचाय"

सागरने मोदकला परत कन्फ्युज केलं. मग मोदकाने तेच केलं जे त्याने या संपूर्ण ट्रिप मध्ये सगळ्यात जास्त वेळा केलं होतं, त्याने सरपंचांना फोन लावला.

" सरपंच, सागरला बायोब्रेक घ्यायचाय"

आता या गोष्टीत आपला नेमका रोल काय हे सरपंचांना कळेना, सिस्टीम अप करणे त्यांना जमते, पण सिस्टीममधून डाऊन कसं करायचं?

"सागर, तुला वेळ लागणार का?"

मोदकने बायोब्रेकची योग्य आयडीया यावी म्हणून वेगळ्या पद्धतीने प्रोबिंग केलं, पण सागरने उत्तर दिलंच नाही. मोदक परत टेन्शनमध्ये कारण संध्याकाळ होत असताना रायडरला एकटा सोडता येणार नव्हतं, सुमित नंतर डॉक्टर चालवणार आणि मग सागर, त्यादृष्टीने प्लॅन करायचा होता. पण सागर काही त्याच्या मनाचा आणि पोटाचा थांग लागू देत नव्हता.

मोदकाने परत सरपंचांना फोन लावला, सागरला त्याच्या बायोसह दुसऱ्या गाडीत टाकलं, सुमित सायकलवरून उतरला आणि आमची गाडी डॉक्टरच्या मागे चालायला लागली.

पोलो पुढे जाऊन थांबली, 15 मिनिटांनी मोदकाने सरपंचांना परत फोन केला, बायोब्रेक हा नक्की कोणता होता आणि तो सुरळीत पार पडला का हे विचारण्यासाठी..

मामा - कोल्हापूरनंतर..

.

देशपांडे मामा..

साई इंटरनॅशनल हॉटेल ला सागरचा बायो ब्रेक एकदाचा झाला आणि तो पुढल्या सायकलिंग च्या टर्न करता सज्ज झाला. आम्ही (मामा , शैलेंद्र , मोदक) गाडीत आणि डॉक सायकलवर असे हॉटेल जवळ आलो. इथे डॉक थांबून सागर चालवणार आणि मामा बायो ब्रेक घेणार असा प्लॅन होता. हॉटेल जवळ आले, मामा उतरायला तयार झाले आणि आता थांबतील असे वाटत असतानाच डॉक ने अनपेक्षित धक्का दिला! हॉटेल पार करून डॉक ने पुढे सायकल दामटली. डॉक सोडून आम्ही सगळे, दुसर्‍या क्रू कार मधले लोक्स आणि सागर फुल्ल्टू कन्फ्युज!! मामांचा बायो ब्रेक मनातच (आणि पोटातच) राहिला. मोदक डॉक ला हाका मारत होते, शैलेंद्र हॉर्न वाजवत होते पण डॉक काही थांबायला तयार नाही. मग हॉटेलच्या ४-५ किमी पुढे जाऊन डॉक्टरांचा सायकलरुपी उधळलेला वारू थांबला (किंवा थांबवला). डॉकला विचारलं "काय झालं?? थांबला का नाही??" तर निरागसपणे "मला अजून १० किमी सायकल चालवायची होती" असे डॉक नी उत्तर दिले. आता त्यांना कथा आणि व्यथा काय सांगायची म्हणून मामा गप बसले. इथून सागरचा झंझावात सुरु झाला. सागरला बर्‍याच वेळाने स्वत:ची सायकल चालवायला मिळाल्याने तो बुंगाट सुटला होता. रस्ता बर्‍यापैकी चढ उताराचा असला तरी सागर ३० ते ३५ किमी प्रती तास एवढ्या जबरदस्त स्पीड नी सायकल हाणत होता !!

सागरच्या त्या एका तुफान राइडने आम्हाला एक वेगळाच उत्साह दिला. सायकल चालवताना सागरने मध्येच पौर्णिमेच्या सुंदर चंद्राकडे हात दाखवून स्वतःमध्ये असलेल्या कलात्मकतेची जाणीव करून दिली. थोडा वेळ गेला आणि सागरचा हात परत वरती झाला. आता काय बघायला मिळतंय ह्याची गाडीत बसलेले आम्ही सगळे लोक्स आतुरतेने वाट बाघायला लागलो. सागर चा हात वरती होत होत थांबला आणि मधले बोट बाहेर आले ! गाडीत बसलेले सगळे आवाक ! सागर काय करतोय आणि नेमके कोणाला मधले बोट दाखवतोय म्हणून चर्चा सुरु झाली. सागर ची बुलेट ट्रेन पुढे टोल नाक्याला थांबली. मग मामा मैदानात उतरायला तयार झाले . सागर ला कोणाला बोट दाखवले असे विचारले असता त्याने रस्ता खूप चढ उताराचा असल्यामुळे रस्त्याला बोट दाखवले असे अविश्वसनीय पण त्याच्या दृष्टीने गळयाशप्पथ खरे उत्तर दिले. खरे खोटे सागरला आणि त्याच्या मधल्या बोटालाच माहिती..! ;)

जोशीले पाध्ये..

.

पाध्ये.. आंम्हाला चंद्र दाखवताना.. (नंतर मधले बोट दाखवून आमच्यासमोर काजवे सुद्धा चमकवले.)

निपाणीजवळ मामांवर किड्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला.. पण मामांचा वेग कमी झाला नाही..

तवंदी घाट चढवताना.. मामा.

.

आनंदराव..

रात्री १० च्या सुमारास बेळगावच्या जवळ पोचलो तेव्हा मामांना विश्रांती देऊन सागर ने सायकल घेतली .या बदलामध्ये मध्ये जो काही २ मिनिटाचा वेळ मिळाला त्या वेळात आम्हाला म्हणजे पोलो मधील आम्हा ४ लोकांना मोदक ने डाळ खिचडी चे पार्सल दिले.. आणि आम्ही डॉक ना तयार करण्यासाठी पुढे निघालो. पुढे एका ठिकाणी पंक्चर वाल्याचा इथे जागा मिळाली आणि आम्ही तिथे खिचडी खायला थांबलो. पोलोच्या पाठीमागे सायकली लावल्या होत्या ते बघून काही कानडी लोकांची उत्सुकता वाढली. आणि ते लोक सायकली जवळ येऊन हा काय प्रकार आहे असे त्यांच्या भाषेत बोलायला लागले. सायकली ना हात लावणे , गियर शिफ्टर ला हात लावणे असे प्रकार चालू केले. तेवढ्यात त्यांच्यातल्या एका ने आम्हाला हे काय आहे वगैरे विचारले. डॉक चे या सगळ्या प्रकाराकडे बारीक लक्ष होते. त्या कानडी माणसाने आम्हाला विचारताच डॉक ने त्याला सांगितले कि "पोलिसांची रेस चालू आहे" ते ऐकताच तो कानडी माणूस बाजूला झाला.

आमची ही आयडिया यशस्वी झाली असे आम्हाला वाटत होते पण बाकीचे २-३ कानडी लोक तिथून हलायची नाव घेईनात. शेवटी आम्ही "पाठीमागून DIG साहेब सायकल चालवत येत आहेत" असे असे सांगितले. ही मात्रा बरोबर लागू पडली.

तेवढ्यात सागर आणि त्याला फॉलो करणारी एन्डेव्हर आली.
मी एका पोलीस कॉन्स्टेबल प्रमाणे एंडेव्हरला सलाम केला आणि एखादा वरिष्ठ पोलीस अधिकारी जसा रिप्लाय करेल त्याप्रमाणे मोदकने परत सलाम केला (जसे काही हाच DIG च आहे )

..अर्थात आमच्या इथे काय घडले याची मोदकाला आणि एन्डेव्हर मधल्या लोकांना काहीच कल्पना नव्हती. नंतर मात्र गप्पा मारताना हा किस्सा सांगितल्यावर सगळे तुफान हसू लागले होते. (..आणि मोदक त्याला DIG म्हंटल्यामुळे उगीचच सुखावला :D )

शैलेंद्र

साधे पान, चमन बडीशेप, वेलदोडा आणि पक्की सुपारी

आता तुम्हीं विचार कराल सायकल आणि पानाचा काय संबंध?

पण अशा मोठ्या सायकल रेसमध्ये जितकी जबाबदारी सायकल स्वारावर असते त्याहून जास्त क्रु वर असते. सायकलस्वार हे गाडीच इंजिन असेल तर क्रु म्हणजे गाडीचे स्टिअरिंग असते. सतत स्वाराला प्रोत्साहन देणे, त्याचा मागे चालवत राहून इतर वाहनांपासून त्याला सुरक्षा देणे, रात्री स्वार सतत प्रकाशझोतात राहील अशा प्रकारे गाडी चालवत राहणे, स्वारांतील बदल प्लॅन करणे, त्यांच्या सायकल गाडीला लावणे आणि उतरवणे हे सगळं काम क्रु करत असतो. कुणीतरी अगदी बरोबर म्हटलंय, क्रु तुमच्यासाठी रेस जिंकू शकत नाही पण तुम्हीं जिंकत असलेल्या रेसमध्ये तुम्हांला हरवू मात्र शकतो.

या रेसमध्ये क्रु म्हणून काम करणारे सगळे पहिल्यांदाच ते करत होते. मोदक सलग 25 तास जागा होता, (त्यातले 22 तास फोनवर असावा, उरलेले 2 तास रेंज नव्हती) दुसऱ्या बाजूला सरपंच तितकाच वेळ त्याचे कॉल घेण्यात व्यस्त होते. मोदक आणि सरपंच या दोघांनी एखाद्या व्यावसायिक क्रुच्या तोडीचे समायोजन केले. शैलेंद्रने 22/23 तास, स्वतःच्या नॉर्मल वेगापेक्षा 100 km कमी वेगाने गाडी चालवली. आनंदरावांनी डॉक्टरांबरोबर खड्डे आणि सिमेंट टँकर चुकवत अनमोड घाट उतरवला, अभिजीतने रात्रीच्या 2.30 ते 4 या घातवेळात स्वाराच्या मागे गाडी चालवली. एकंदर क्रुने सुद्धा किस्से केले आणि बघितले.

मेढा घाट उतरलो तेंव्हा दुपार टळून गेली होती. एकसुरी गाडी चालवून शैलेंद्र कंटाळला होता. सातारा हायवे वर लागल्यावर एका हॉटेलजवल मामा उतरले आणि सुमित पुढे निघाला. सगळ्यांनी एकेक सोलकढी घेतली. शैलेंद्रच्या डोळ्यात दुपार उतरली होती.

"पान खाणार का?" मोदकाने विचारलं,

जरूर, शैलेंद्रचे उत्तर आलं..

कोणतं?

तू कोणतं खाणार?

साधं पान, चमन, बडीशेप, वेलदोडा आणि पक्की सुपारी.. इति मोदक.

चालेल..

मोदकाने 8 -10 पानं बांधून घेतली, दोन पानं दोघांनी तोंडात सरकवली, या पानांनी ताशी 25/30 km च्या स्पीडने ड्राइव्हींग करायचे कंटाळवाणे काम सुकर झाले. रात्रीच्या थंडीत तोंडात पान ठेवून क्रु सायकलस्वारांना सपोर्ट करत राहिला.

.

(क्रमशः)

प्रतिक्रिया

डॉ श्रीहास's picture

18 Dec 2017 - 5:37 pm | डॉ श्रीहास

पट्टेवाला शर्ट नाहीये तो.... बरगड्यांचं डिझाईन बघून घेतलाय (माणसं / जनावरं घाबरतात त्याला )

आणि माझे सायकलींग करतांना व्हीडीयो न काढल्याबद्दल निषेध !! निषेध !! निषेध!!

लेख complication लय कडक जमलंय बर का मोदक्राव _/\_

छ्या, पसरणीच्या क्लाइम्ब ला मी टेन्शन मध्ये होतो ठिके, सगळेच टेन्शन मध्ये? 2 ओळी? ;)

लेख मस्त जम्या

सूड's picture

18 Dec 2017 - 5:39 pm | सूड

भारीच!!

देशपांडेमामा's picture

18 Dec 2017 - 6:03 pm | देशपांडेमामा

पुन्हा एकदा DC केल्याच फीलिंग येतय :-)

लेखाबद्दल परत एकदा मोदकरावांचे आभार्स _/\_

देश

कपिलमुनी's picture

18 Dec 2017 - 6:11 pm | कपिलमुनी

लेख भारी ! आणि लेखाचे स्वरूप आणि कंपोझिन्ग चान्गला जमले आहे .

पुढील स्पर्धा साठी शुभेच्छा

अरिंजय's picture

18 Dec 2017 - 8:12 pm | अरिंजय

मस्तच हो. खमंग अन् खुसखुशीत झालाय हा भाग. पटकन सायकल काढावी अन् डिसी ला पळावं असं वाटतंय.

शैलेन्द्र's picture

18 Dec 2017 - 9:20 pm | शैलेन्द्र

मस्त,
आठवणी जागवल्या

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Dec 2017 - 9:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं चाललीय रेस... आम्हीपण क्रू बरोबर गाडीत बसून सगळे पाहत आणि अनुभवत चाललोय असेच वाटते ! :) पुभाप्र.

खूप मस्त लिहिलय सगळ्यांनी..

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Dec 2017 - 11:36 am | ज्ञानोबाचे पैजार

हा भाग वाचताना प्रचंड मजा आली, सगळ्या टीमचआ, त्यांच्या टीमवर्क चे आणि कठोर मेहनतीचे कौतुक वाटले.
पैजारबुवा,

मोदक आणि संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन !!!
एखादा इव्हेन्ट कसा करावा, आणि तो एवढ्या वेगळ्या पद्धतीने मिपावर कसा मांडावा याचे सुंदर उदा. म्हणजे DC .
वाचताना जणू काही आपणही क्रू चा भाग असल्याचा फिल आला. पुन्हा एकदा अभिनंदन !!!

भारी सुरू आहे शर्यत. पुभाप्र.

गवि's picture

19 Dec 2017 - 7:43 pm | गवि

मजा येतेय. पुभाप्र..

सुबोध खरे's picture

19 Dec 2017 - 8:26 pm | सुबोध खरे

सगळ्याच लोकांना साष्टांग दंडवत. __/\__
अजून काय लिहू ?

सिरुसेरि's picture

20 Dec 2017 - 9:17 am | सिरुसेरि

हा लेख म्हणजे उतम टिमवर्कचे अप्रतिम उदाहरण आहे . जबरदस्त . जो जीता वही सिकंदर .

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Dec 2017 - 10:04 am | ज्ञानोबाचे पैजार


तिथे माझी मामा आणि सागरशी पहिल्यांदा भेट झाली. आम्ही सगळ्यांनी इडली, डोसा, वडा सांबर अशी ऑर्डर दिली आणि मामांना ऑर्डर साठी विचारलं. मामांनी ऑर्डर द्यायला स्पष्टपणे नकार दिला आणि बॅगेतून पिनट-बटर लावलेला पोळीचा रोल काढला. त्यावेळी मामा काय चीज आहे याची थोडी प्रचिती आली.

या साठी मामांना साष्टांग दंडवत. (काही गमावल्याशिवाय काही कमवता येत नाही हे खरे आहे याची प्रचिती असे काही वाचले की येते. )

या सगळ्या प्रवासात मामांनी स्वतःच्या खाण्यापिण्याची काळजी कशी घेतली तेही वाचायला आवडेल.

पैजारबुवा,

देशपांडेमामा's picture

20 Dec 2017 - 2:23 pm | देशपांडेमामा

रेस दरम्यान दोनच गोष्टींकडे लक्ष ठेवले होते १) Hyderation करता भरपूर पाणी आणि salts (Enerzal , पादेलोण ) घेत राहणे आणि २) भरपूर कार्ब्स घेणे
बाकी काही विचार करायला वेळ (आणि मूड ) पण नव्हता :-)

रेस संपवल्यावर तर मग धडाक्यात उपास सोडला :P

देश

सुमीत भातखंडे's picture

20 Dec 2017 - 10:53 am | सुमीत भातखंडे

जबरदस्त _/\_

स्थितप्रज्ञ's picture

20 Dec 2017 - 12:20 pm | स्थितप्रज्ञ

प्रत्येकाची वर्णनं भारी! सगळ्याच संकलन आणि एकत्रीकरण केल्याबद्दल मोदकरावांचे आभार्स!

डॉ श्रीहास's picture

20 Dec 2017 - 3:19 pm | डॉ श्रीहास

ओ सर
तुमच्या नजरेतून काय दिसलं हे सांगा की हो..... कृ ची कृती आणि कृपा ह्या शिवाय पान हललं नसतं टिमचं .... येऊ द्या प्रतिक्रीया !!

मोदक's picture

20 Dec 2017 - 5:53 pm | मोदक

+११

लिहिते व्हा..!!

अरिंजय's picture

20 Dec 2017 - 7:08 pm | अरिंजय

+१११११

लिहाच आता कॅप्टन

अनुप कोहळे's picture

21 Dec 2017 - 10:22 pm | अनुप कोहळे

माझा पण +१

मनिमौ's picture

20 Dec 2017 - 5:32 pm | मनिमौ

केवळ भन्नाट. क्लिप मधला सायकल चा वेग बघून भारी वाटलं एकदम

धडपड्या's picture

21 Dec 2017 - 8:21 am | धडपड्या

आनंद्रावांचा फोटो पाहून, चित्रपटात स्मगलिंग करणार्या लोकांची आठवण झाली....

"पेहले सोना दिखाव, फिर रोकडा..."

बेरु's picture

21 Dec 2017 - 4:57 pm | बेरु

कमाल!! सर्वांना साष्टांग दंडवत.. मस्त लिहलं आहे.

"या पानांनी ताशी 25/30 km च्या स्पीडने ड्राइव्हींग करायचे कंटाळवाणे काम सुकर झाले." ह्याच कारणामुळे लाल डब्बेवाले तोंडात कशाचा तरी तोबरा भरून गाडी हाकत असतील ;)

अनुप कोहळे's picture

21 Dec 2017 - 10:21 pm | अनुप कोहळे

ह्यातले जवळपास सगळे किस्से कायप्पा समूहावर वाचले आहेतच. पण इथे एकत्र आणि फोटो सकट वाचायला मजा आली.

नाखु's picture

22 Dec 2017 - 9:07 am | नाखु

अचाट उद्योग आहे हा !!!
डॉ क म्हणतात तसं उत्तम टीम वर्क चे उदाहरण आहे हे.
अभिनंदन आणि आभार उत्तम परिचय लेखमाला लिहिली त्याबद्दल

प्रापंचिक दैनंदीन रिसायकल मध्ये अडकलेला नाखु

ऋष्या's picture

22 Dec 2017 - 2:54 pm | ऋष्या

एकच शब्द - 'भन्नाट' !!

आणि एकेका मेम्बरचे तुकड्या-तुकड्यात लिहिलेले अनुभव एकत्र गुंफून वृत्तांत लिहिण्याची style एक नंबर आहे!

लय भारी! वाचतो आहे. पुभाप्र!