हिवाळी भटकंती: चंदेरी ( Chanderi )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
8 Dec 2017 - 10:38 am

मुंबई - पुणे लोहमार्गावरून कल्याणहून कर्जतकडे जाताना उजवीकडे एक डोंगररांग दिसते, ती म्हणजे बदलापूर डोंगररांग .नाखिंड, चंदेरी, म्हैसमाळ, नवरी, बोयी, पेब , माथेरान ही शिखरे याच डोंगररांगेत येतात. या डोंगररांगेत आपला भलाथोरला गोपुरासारखा दिसणारा माथा उंचावलेला एक प्रचंड सुळका दिसतो, त्या किल्ल्याचे नाव आहे "चंदेरी".
Chanderi 1
ईतिहासात डोकावल्यास मे १६५६ मध्ये शिवरायांनी कल्याण ,भिवंडी ,रायरी पर्यंतचा सारा मुलूख घेतला, तेव्हा त्यात हा गडही मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. अल्प विस्तार,पाण्याची कमी साठवणूक, बांधकामाचा अभाव, मर्यादित लोकांची मुक्कामाची सोय, अतिशय अवघड वाट हे सारे पाहून हा किल्ला नसून, एक लष्करी चौकी असावी असेच वाटते.
काही जणांच्या मते ७ ऑक्टोबर १९५७ रोजी चंदेरी किल्ल्याच्या सुळक्यावर संघटित प्रस्तरारोहणाचा प्रारंभ झाला.
Chanderi 2
चंदेरी परिसराचा नकाशा
Chanderi 3
या गडावर जायचे झाले तर मुंबई - कर्जत लोहमार्गावरील ‘वांगणी’ या रेल्वे स्थानकावर उतरावे. तेथून लोहमार्गाच्या कडेकडेने (बदलापूरच्या दिशेस) जाणार्‍या वाटेने गोरेगाव गाठावे. मुख्य स्त्यावरून डावीकडे जाणारी वाट चिंचोली या पायथ्याच्या गावी घेऊन जाते. बदलापूर स्थानकात उतरून चिंचोलीस साधारण पाऊण तासाची पायपीट करूनही पोहचता येते. (वांगणी स्थानकातून गोरेगाव पर्यंत जाण्यास भाड्याची वहानेही मिळतात.)
Chanderi 5
सह्याद्रीला संमातर असणार्‍या या हाजीमलंग माथेरान रांगेतील किल्ले पाहून झाले होते. मुंबईला जाताना चंदेरीचा माथा सारखा खुणावायचा.
Chanderi 4

Chanderi 6
मात्र एकदा जुलैच्या पावसात जाण्याचा प्रयत्न केला , पण दाट ढगांचा बुरखा बघून चंदेरीला जाण्याची हे वेळ नव्हे हे समजले. त्यानंतर ऑक्टोबरमधे केलेला प्रयत्न वाट न सापडल्याने सोडून द्यावा लागला. अखेरीस एक दिवस विकास या मित्राचा फोन आला आणि सुमो मधून रात्री आमचे टोळके चंदेरीकडे निघाले. कर्जतवरून बदलापुर रोडला लागलो. मधेच लोकल किंवा रेल्वे उजवीकडून जाताना दिसत होत्या. वांगणी स्टेशन मागे पडले आणि गोरेगाव फाट्याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी माझ्याकडे आली, कारण याआधी फक्त मीच काय तो या परिसरात आलेलो होतो. हा फाटा ओळखण्याची मुख्य खुण, म्हणजे उजवीकडे असलेले 'हॉटेल चंदेरी'. ईथून डावीकडे वळालो आणि साधरण दोन कि.मी.वर असलेल्या चिंचवली गावात जाउन पोहचलो. अंधार असल्याने गाडीतच झोप काढली. या रस्त्याला अनेक श्रीमंत लोकांनी फार्महाउस बांधलेली आहेत. जर स्वताची गाडी नसेल गोरेगाव फाट्याला उतरुन चिंचवली गाव गाठणे किंवा खाजगी सहा आसनी रिक्षाने चिंचवली पर्यंत येणे हे दोन पर्याय आहेत.
Chanderi 7
पहाट झाली, थोडे पोटात ढकलले आणि अंधारातच चाचपडत चंदेरीच्या दिशेने निघालो. चिंचोली गावास उजवीकडे ठेऊन वर जाणार्‍या दोन वाटा आहेत. एका लहानश्या टेकाडाच्या दोन बाजूंनी ह्या वाटा जातात. टेकडीच्या उजवीकडून जाणारी वाट दगडधोंड्यांमधून जाणारी खडकाळ आहे. तर टेकडीच्या डावीकडून जाणारी वाट घसरडया लाल मातीवरील झाडांझुडपांतून जाणारी आहे. ह्या दोन्हीही वाटा मध्यभागी असणार्‍या एका लहानशा पठारावर घेऊन जातात.
Chanderi 8
आम्ही उजवी वाट पकडून पठारावर आलो. विस्तृत असे हे गवताळ पठार कोवळ्या उन्हात न्हाउन निघाले.
गंमत या सर्व चालीत डोक्यावरून सतत उडणार्‍या विमानांची आपणास साथ असते. चेन्नई, सिंगापुर, ईंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया या आग्नेय दिशेने मुंबईकडे येणारी विमाने दिसत असतात. एकदा या विमानाच्या खिडकीतून हि रांग पहायची आहे.
Chanderi 9
लांबवर दिसणारा चंदेरी जवळ आला.
Chanderi 10
उजव्या डोंगरावर म्हैसमाळचा सुळका सोबत करत होता.
Chanderi 11
अचानक मला हा मेलेला किडा दिसला. सकाळच्या कोवळ्या उन्हात त्याचा निळसर काळा रंग विलक्षण चकाकत होता.
Chanderi 12

Chanderi 13

वाटेत काही रानफुलेहि दिसत होती.
Chanderi 14

Chanderi 15
लांबवर दिसणारे चिंचवली गाव

अखेरीस चंदेरी आणी म्हैसमाळच्या डोंगरामधून वहाणार्‍या ओढ्याच्या पात्रात आलो. पावसाळ्यात यातून तुफान पाणी वहात असते आणी पुढे एक छोटा धबधबा देखील आहे. आम्ही दिवाळीनंतर लगेच आलो असलो तरी अदयाप ओढ्यात पाणी वहात होते.
Chanderi 16
ओढ्यातूनच आम्ही चढाई सुरू केली आणि चिंचवली सोडल्यापासून साधारण तासाभरात चंदेरी आणि म्हैसमाळच्या इंग्रजी व्हि ( V ) आकाराच्या खिंडीत जाउन बसलो.
Chanderi 17
पलीकडच्या बाजुचे प्रबळगड आणी माथेरानच्या मधील खोरे उलगडून सामोरे आले. समोर गाढेश्वर तलाव दिसत होता. या बाजुला पायथ्याशी तामसई नावाचे खेडे आहे. इथूनही चंदेरीवर येता येते. तामसईला जायचे झाल्यास पनवेलवरून बसची सोय आहे. याच खिंडीत तामसईची वाट वर आली होती.
Chanderi 18
आता उत्तरेची वाट म्हैसमाळ सुळक्याकडे तर दक्षिणेची वाट चंदेरी गडाकडे जात होती. बरोबर आणलेला दिवाळीचा फराळ संपवून आम्ही चंदेरीकडे कुच केले. काहीशी खडी असणारी हि वाट चांगलाच दम काढते.
Chanderi 19

Chanderi 20
अखेरीस चंदेरीच्या सुळक्याच्या अलिकडे असणार्‍या थोडक्या सपाटीपाशी पोहचलो. इथे दगडी पायर्‍या आहेत आणि थोडीफार बांधीव तटबंदी आहे. चंदेरीच्या किल्लेपणाची हिच काय ती खुण.
Chanderi 21
सुळक्याचे रुप मोठे भेदक दिसत होते. सुळक्याच्या उजव्या बाजुने वाट आहे, त्याने चालत गुहेपर्यंत येउन पोहचलो.
Chanderi 22
सॅक ठेवून थोडे आडवे झालो. इथेपर्यंत यायला साधारण दिड ते दोन तास पुरतात.
Chanderi 23

Chanderi 24
या गुहेत शिवलिंग आहे , मात्र समोरचा नंदी गायब आहे.
Chanderi 25
सध्या ईथे कोणीतरी शिवाजी महाराजांचा सिंहासनारुढ पुतळा बसवला आहे.
Chanderi 26
गुहेच्या एका कोपर्‍यात पाण्याचे टाके आहे , मात्र पाणी खराब होते. चंदेरीवर मुक्काम करावयाचा झाल्यास पश्चिमाभिमुख अशी हि गुहा हा एकमेव निवारा आहे. ८ ते १० जणांच्या मुक्कामासाठी गुहा उत्तम आहे.
Chanderi 27
या गुहेच्या आधी एक पाण्याचे टाके आहे त्यात पिण्यायोग्य पाणी आहे. गुहेच्या थोडे पुढे सुळक्याच्या पायथ्याशी देखील एक टाके आहे.
Chanderi 28
या गुहेतून थेट समोर प्रबळगड व कलावंतीण सुळका दिसतात.
Chanderi 29
आता बेत होता माथ्यावर जाण्याचा. कातळमाथ्याचा विस्तार फक्त लांबी पुरताच आहे. रुंदी जवळजवळ नाहीच. दरड कोसळल्यामुळे सुळक्याचा माथा गाठणे फारच कठीण झाले आहे. तरीही प्रस्तरारोहण कलेची आवड असणार्‍या गिर्यारोहकांचे हा सुळका खास आकर्षण आहे.
Chanderi 30
यासाठी गुहेतून बाहेर पडून दक्षिणेकडे , कातळकडा डावीकडे ठेवून निघालो. क्लांईब असल्याने विकासने रोप वगैरे साधनसामुग्री आणलेली होती. मात्र थोडे अंतर कापल्यानंतर वाट अक्षरशः सत्तर अंशाच्या उभ्या उतारावर यु आकारात खाली उतरून पुन्हा वर चढते.
Chanderi 31

Chanderi 32
उजव्या बाजुला खोल दिसणारी दरी थरकाप उडवत असते तर पायखालचे बॉलबेरींग सारखे सटकणारे छोटे खडे गाळण उडवतात. कच्चा दिलाचे भिडू असतील तर इथे रोप बांधलेला चांगला. त्यासाठी डाव्या बाजुच्या खडकात एक पिटॉन मारलेला आहे. कसाबसा हा पॅच मागे टाकून जेमतेम पाउलभर रुंद वाटेने चंदेरीच्या दक्षिण टोकाशी आलो. इथे एक पाण्याचे टाके आहे पण कोरडे.
Chanderi 33

Chanderi 34
आता खरी परिक्षा होती. कारण डाव्या बाजुला आ वासलेली दरी भिती दाखवत होती आणि जेमतेम पाउल रोवता येईल अशी खडी वाट चढायची होती. थोड्या पायर्‍या आहेत त्यावर चढून वर पोहचले कि खिंड येते, इथल्या घसार्‍यावरुन मात्र जपूनच वर चढावे लागते. विकास रोप अँकर करत पुढे गेला आणी कॅरेबिनर बांधून मागून आम्ही चढलो.वास्तविक हि चढण तितकी अवघड नाही, पण दरीच्या थेट एक्पोजरमुळे भिती वाटते. सुर्य वरून आग ओकत होता, दगडाला हात लावावा तर चटके बसत होते, पण चढणे भाग होते. अखेरीस अत्यंत अरुंद माथ्यावर पोहचलो आणि या श्रमाचे सार्थक झाले ते भन्नाट दॄष्याने.
Chanderi 35

Chanderi 39

Chanderi 40
माथेरानचा डोंगर आणि डाव्या कोपर्‍यात पेब उर्फ विकटगड जवळचा डोंगर नाखिंद
Chanderi 41
जवळचा सुळका म्हैसमाळ, डावीकडे मागे हाजी मलंग उर्फ मलंगगड, तर उजवीकडचा डोंगर बदलापुरजवळचा टावली गुहांचा डोंगर

दक्षिणेला राजमाची, पेठचा किल्ला उर्फ कोथळीगड, माथेरानचा डोंगर, पेबचा किल्ला, नाखिंद, पुर्वेला भिमाशंकरचे नागफणी टोक, गोरखगड, मच्छिंद्रगडाचे जुळे सुळके, सिध्दगड, तर उत्तरेला माहुली, हाजीमंलग, बदलापुरचा सुळक्याचा डोंगर आणि अगदी जवळ म्हैसमाळ, पश्चिमेला प्रबळगड, कलावंतिणीचा सुळका, इर्शाळगड आणी कर्नाळा दिसत होते.
Chanderi 38
माथ्यावर उजव्या बाजुला एक पाण्याचे टाके आहे.
Chanderi 36

Chanderi 37
माथ्याच्या उत्तर टोकाला बदलापुरच्या अंजिक्य हायकर्सनी बसवलेला शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश पुतळा पाहून थक्क व्हायला झाले. जिथे आम्हाला येताना ईतका त्रास झाला होता, तिथे या शिवभक्तांनी किती जिध्दीने हे काम केले होते. त्यांच्या कार्याला मुजरा. उन्हाचे चटके बसायला लागले तसे माथ्यावरून उतरण्यास सुरवात केली. माथा दक्षिण-उत्तर आहे , त्यामुळे माथ्यावर जायचे झाल्यास सकाळी लवकर किंवा संध्याकाळी जावे. अन्यथा तापलेल्या कातळावर चटके बसून चढता-उतरताना खुप त्रास होतो. माथा समुद्रसपाटीपासून २३०० फुट उंचावर आहे.
असह्य चटके सहन करून आणि घसरड्या वाटेचे दिव्य पार करून गुहेत आलो आणि अक्षरशः थंड्गार जमिनीवर आडवे झालो. पंधरा मिनीटे कोणीही एकमेकांशी चकार शब्दही बोलेले नाही. शेवटी एकेकाला कंठ फुटला आणि राहिलेले खाद्यपदार्थ संपवून आम्ही उतरण्यास सुरवात केली. एरवी कोणत्याही किल्ल्यवरून उतरणे सोपे जाते. मात्र थेट सत्तर अंशाचे उतार आणि दोन्ही बाजूला आ वासलेली दरी यामुळे जपुनच उतरून खिंडीत आलो.
Chanderi 42
खालच्या पठारावर पोहचेपर्यंत सुर्य कलला होता. सकाळी पठार पार करताना फार त्रास झाला नव्हता, मात्र आता तीन कि,मी.ची ती चाल चालणे चांगलेच जीवावर आले. अखेरीस गाडीपाशी पोहचलो तोपर्यंत चांगलाच अंधार झाला. थकलेले शरीर सीट्वर टाकून आणि सॅक मागे फेकून सगळेच जण डोळे मिटून शांतपणे झोपलो. ईतके दिवस हुलकावणी देणार्‍या चंदेरीचा माथा सर केल्याचे समाधान मात्र होते.
Chanderi 43

तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

संदर्भ ग्रंथः-
१ ) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के. घाणेकर
२ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
३ ) रायगड जिल्हा गॅझेटियर
4 ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स

प्रतिक्रिया

चाणक्य's picture

8 Dec 2017 - 10:59 am | चाणक्य

कसलेले ट्रेकर आहात राव.

श्रीधर's picture

8 Dec 2017 - 11:08 am | श्रीधर

+1

उपेक्षित's picture

8 Dec 2017 - 12:07 pm | उपेक्षित

जबरदस्त हो मालक _/\_

सुबोध खरे's picture

8 Dec 2017 - 12:25 pm | सुबोध खरे

जबरदस्त

सिरुसेरि's picture

8 Dec 2017 - 1:25 pm | सिरुसेरि

जबरदस्त +१००

संजय पाटिल's picture

8 Dec 2017 - 5:36 pm | संजय पाटिल

जबरदस्त हा एकच शब्द योग्य वाटतो!!!!

अवघड आहे हे कळले होते म्हणूनच टाळला आहे. लेखामुळे पोहोचलो.

घराच्या अगदी मागे दिसतो हा, इतका अवघड असेल हे माहीत नव्हतं.

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Dec 2017 - 5:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

काही फोटो बघुन पोटात गोळा आला
जायला पाहिजे एकदा इकडे
पैजारबुवा,

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2017 - 5:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट ! ट्रेक, फोटो आणि वर्णन... सगळेच ! तुमचे गड-कोटांचे वेड स्पृहणिय आहे !!

गामा पैलवान's picture

8 Dec 2017 - 8:53 pm | गामा पैलवान

दुर्गविहारी,

भन्नाट मोहीम होती. वर्णन मस्तंय.

रच्याकने : चांदेरी असाही उच्चार ऐकला होता.

आ.न.,
-गा.पै.

दुर्गविहारी's picture

15 Dec 2017 - 11:54 am | दुर्गविहारी

प्रतिसादाबध्दल धन्यवाद. तुम्ही म्हणता ते खरे आहे. स्थानिक लोक चांदेरी म्हणतात.

कोकणातले किल्ले दमटपणा आणि त्यांच्या उंचीमुळे (प्रत्यक्षात जरी समुद्रसपाटीपासूनची उंची कमी दिसत असली तरी ते जवळपास समुद्रसपाटीवरच असल्याने खूपच उंच आहेत) चढाईचा नेहमीच कस पाहतात. त्यात चंदेरी, म्हसमाळ, मलंगगड, माहुली, प्रबळगड, माणिकगड हे सगळे कातळी कडेच.
चंदेरी माथ्यावर जायचं भाग्य खूप कमी जणांना लाभतं, त्यातले तुम्ही एक आहात.

दुर्गविहारी's picture

15 Dec 2017 - 12:01 pm | दुर्गविहारी

हो या रांगेतले किल्ले हवेतल्या दमटपणामुळे कस पहातात. केवळ नशिबानेच मला चंदेरीवर जाता आले.

किल्लेदार's picture

10 Dec 2017 - 2:43 am | किल्लेदार

चार वर्ष मुंबई पुणे प्रवास केला. चंदेरी सतत बोलवत राहिला पण जाणे झाले नाही. तुम्ही भेट घडवून आणलीत, ऋणी आहे.

पाटीलभाऊ's picture

14 Dec 2017 - 12:45 pm | पाटीलभाऊ

जबरदस्त...फोटो अप्रतिम.

सर्वच प्रतिसादकांचे आणि वाचकांचे मनापासून आभार. ईतके प्रतिसाद मिळतील असे वाटले नव्हते. ;-)
सर्व दुर्गभटक्यांना मी एकच सांगु ईच्छितो, चंदेरीवर टेक्निकल क्लांईम्ब आहे त्यामुळे सर्वानांच जायची संधी मिळेल असे नाही. पण किमान गुहेपर्यंत जाणे नेहमीच्या सरावातील ट्रेकर्सना नक्कीच शक्य आहे. किमान तिथे पर्यंत जाणे आनंददायी आहे. जरुर प्रयत्न करावा.

जागु's picture

15 Dec 2017 - 12:44 pm | जागु

जबरदस्त.

दोसत १९७४'s picture

14 May 2018 - 10:12 am | दोसत १९७४

महाराष्ट्राचे बेअर ग्रिल्स दुर्गविहारी यांनी आमचे दंडवत स्वीकारावे.

चौकटराजा's picture

14 May 2018 - 10:31 am | चौकटराजा

हा गड पार्श्वभूमी या स्वरूपात अनेक अ‍ॅड फिल्म मधे वापरण्यात आला आहे. मी यालाच हाजी मलंग समजत होतो. आपला धागा माहितीपूर्ण आहे.