ते दोघे टू रॉनीज

Primary tabs

मित्रहो's picture
मित्रहो in जनातलं, मनातलं
6 Dec 2017 - 8:04 pm

सत्तर अंशीच्या दशकातला बीबीसीवरचा कॉमेडी शो, तोही सलग सतरा वर्षे आणि करनारे फक्त दोघे, कमाल आहे ना, कमलाच आहे आणि त्या दोघांनी ही कमाल करुन दाखविली होती. १९७१ ते १९८७ या सतरा वर्षाच्या कालावधीत त्यांनी लोकांना खळखळून हसविले. ते दोघे होते टू रॉनीज, रॉनी बार्कर आणि रॉनी कॉर्बेट. या शोचे मुख्य वैशिष्ट म्हणजे दोघांचे विरुद्ध व्यक्तीमत्व, एक उंच, बऱ्यापैकी अंगात तर दुसरा बुटका, असे व्यक्तिमत्व असल्यावर त्यावर विनोद होनारच He can't think deeper किंवा I am the same person but TVs got wider. टू रॉनीज शोच्या १२ मालिका आणि ९३ एपिसोड झाले. त्याकाळी आजच्या सारखे डेलीसोप वगेरे प्रकरण नसावे नाहीतर बारा मालिका आणि प्रत्येक मालिकेचे शंभर इपिसोड झाले असते पण रॉनी बार्करने त्याच्या स्वभावानुसार दोन वर्षातच शो सोडला असता. एक भाग हा साधारणतः पन्नास मिनिटांचा. म्हणजे पन्नास मिनिटे त्यावेळेच्या बीबीसीच्या विनोदाच्या दर्जानुसार विनोद करुन लोकांना हसवायचे काम त्यांनी केले होते. १९८७ साली हा शो संपवण्याचे कारण होते रॉनी बार्करने आता नवीन काही सुचत नाही म्हणून घेतलेली निवृत्ती. शोचे साधारण स्वरुप होते दोघांचे एकएकट्याचे स्केच, दोघांचा मिळून स्केच, बातम्यासारखा प्रकार आणि कुण्या गाण्याच्या पॅरोडीने केलेला शेवट. रॉनीजनी एका स्केचमधे विनोदाने म्हटल्याप्रमाणे you are repeating more than BBC बिबिसी त्यांचा शो वेगवेगळ्या नावाने दाखवित राहीली. बिबिसीने हा शो टू रॉनीज नाइटस किंवा टू रॉनीज ट्रिब्यूट या नावाने नव्वदच्या दशकात आणला. नवीन एपिसोड मात्र फारसे नव्हते आणि ढासळत्या तब्येतीमुळे रॉनी बार्कर फारसा काम करीत नव्हता. पुढे बीबीसी वन वर परत यांना टू रॉनीज स्केचबुक करायला बोलविले जुने काही उत्तम स्केचेस परत दाखविण्यात आले. दुर्देवाने तो शोही रॉनी बार्करच्या निधनामुळे २००५ साली बंद करावा लागला.

आजही युट्युबर दोघांनी मिळून केलेल्या लघु विनोदी नाटीका उपलब्ध आहेत. आपल्यासारख्या कांपुटर आणि स्मार्टफोनच्या जमान्यातील जनतेला जर रॉनीज बघायला सुरवात करायची असेल तर Fruit Shop पासून सुरवात करावी. अर्थातच यात रॉनी बार्कर नाही. एका प्लास्टिकच्या पिशवितून एक फळ बाहेर काढीत रॉनी कॉर्बेट म्हणतो My Black berry is not working आणि आपण हसू लागतो आणि हसतच राहतो. शब्दांशी खेळ करनारे विनोद हे टू रॉनीजचे वैशिष्ट होते. त्यांचे बरेच गाजलेले स्केचेस हे शाब्दिक खेळांवरच आधारीत होते. Finding Ponting Punting यात निव्वळ शब्दछल आहेत. संपूर्ण स्केच हा फक्त ing फॉर्ममधल्या शब्दांनी भरलेल्या संवादांचा आहे. अशा संवादात मधेच Morning सहज येउन जाते. Man who repeats मधे अर्थातच असा व्यक्ती जो समोरचा जे बोलला ते परत बोलतो. मग ते टाळण्यासाठी प्रचंड कठीण शब्द संवादात येतात. तसेच एका स्केचमधे बोलण्यात कुणाचे तरी नावे शोधण्याचा प्रयत्न तर भयंकर प्रकार आहे. कुणी संगीतसंध्या म्हटले तर तुम्ही त्याला म्हणाव 'नाही तसे नाही ते संध्या संगीत आहे, संगीत हा संध्याचा नवरा आहे'. शब्द आणि त्याच्या उच्चाराने होनाऱ्या गंमती हा अजून एक रॉनीजचा आवडता विनोद प्रकार. एक व्यक्ती एका हार्डवेअरच्या दुकानात जातो आणि मागतो Four Candles. दुकानदार चार मेणबत्त्या काढून देतो पण त्या व्यक्तीला मेणबत्त्या नको असतात. बराच वेळ बोलणे झाल्यावर कळते कि त्या व्यक्तीला Fork Handles हवे असतात. तशीच गंमत जेंव्हा एक अरब व्यक्ती एका ग्रॉसरीच्या दुकानात जातो तेंव्हा होते. अर्थातच हे करीत असताना स्टिरियोटाइपींग हे आलच.

ऱॉनीजच्या काही स्केचेसच्या तर कल्पनाच भयंकर आहेत. कल्पना करा तुम्ही विकिपिडियाचे सेल्समन आहात तुम्ही कुणाच्या घरी जाता आणि सामन्य ज्ञानातला कठीण प्रश्न विचारता उदा. नाइल नदीची लांबी किती वगेरे आणि त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला नाइल नदीची लांबी, रुंदी आणि खोलीविषयी इत्यंभूत माहीती असेल तर. कल्पना करवित नाही ना, आणि असे जर का प्रत्येक प्रश्नांच्या बाबतीती होत असेल तर विकिपिडीयाचा सेल्समन म्हणून तुमची काय अवस्था होइल. अशा घरात विकिपिडीयाची विक्रि कशी करायची. अशीच एक भयंकर कल्पना म्हणजे अशी एक लायब्ररी जिथे पुस्तके त्यांच्या रंग आणि आकारा नुसार ठेवलेली आहेत म्हणजे लाल पुस्तके एका बाजूला, हिरवी दुसऱ्या बाजूला, जाड पुस्तके वर तर कमी जाडीची पुस्तके खाली. आहे ना भन्नाट कल्पना अशा लायब्ररीत सामान्य वाचाकाला हवे ते पुस्तक त्याने कसे शोधायचे. असाच एक भयंकर प्रकार घडतो जेंव्हा एक स्क्वॅश चँपियन एका अशा व्यक्तीकडून हरतो ज्याने स्क्वॅश या खेळाचे नावसुद्धा कधी ऐकले नसते, जो सुरवातीला रॅकेट उलटी धरतो, स्क्वॅशला स्क्वीश म्हणतो. अशा व्यक्तीकडून हरल्यावर त्या चँपियनची मानसिक अवस्था काय होइल. मास्टरमाइंड हा तसा सरळसाधा खेळ, एक प्रश्न विचारनार दुसरा उत्तर देनार पण जर का या खेळात छोटासा बदल केला तर. बदल अगदी सोपा पहील्या प्रश्नाचे उत्तर दुसरा प्रश्न संपल्यावरच द्यायचे. याने काय काय गंमत घडू शकते त्यासाठी स्केचच बघायला हवा. क्रॉसवर्ड, अकांउंटट वगेरे पण मस्त आहेत.

भन्नाट कल्पना, शब्दांचे अचाट खेळ आणि सुसंगत अभिनय करीत रॉनीजने लोकांना हसविले. या अशा भन्नाट कल्पना होत्या कुणाच्या याचा सुंदर किस्सा खुद्द रॉनी कॉर्बेट यांनी सांगितला होता. कार्यक्रमासाठी ते लोकांकडून स्कीट मागावायचे. आलेल्या स्कीटमधे जी स्कीट आवडली असेल त्यात बदल करुन मग ती स्कीट वापरायची असे चालले होते. जे स्कीट आवडायचे ते बहुदा GW या नावाने लिहिलेल्या व्यक्तीचे असायचे. तेंव्हा साऱ्यानांच हा प्रश्न होता का हा GW कोण. एके दिवशी एक डीनर ठेवण्यात आले त्या डीनरला आजवर ज्या ज्या लेखकांचे स्कीट वापरण्यात आले होते त्यांना बोलविण्यात आले. सारे आले पण GW ची सीट रिकामीच होती. बराच वेळ वाट बघितली पण तो GW काही आला नाही. शेवटी रॉनी बार्करने सांगितले GW नावाचा व्यक्ती कधीच येणार नाही कारण GW नावाने लिहिणारा मीच आहे. २००५ साली बिबिसीच्या या लाडक्या टिव्ही स्टारचे निधन झाले आणि टू रॉनीज संपले. २०१२ साली रॉनी कॉर्बेट यांचे सुद्धा निधन झाले. दोन महान कलाकरांनी आणि चांगल्या मित्रांनी जगाचा निरोप घेतला. त्यां दोघांनी निर्माण केलेली कलाकृती मात्र एक उत्तम विनोदाचा नमुना म्हणूनच जगासमोर राहील.

मित्रहो
https://mitraho.wordpress.com/

लेखविनोद

प्रतिक्रिया

जुने एपिसोड मिळवून पाहण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.

प्राची अश्विनी's picture

7 Dec 2017 - 11:47 am | प्राची अश्विनी

छान ओळख. काही भाग पाहिले , धमाल आली.

मित्रहो's picture

8 Dec 2017 - 10:53 am | मित्रहो

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
सारे स्केचेस तीन ते पाच मिनिटाचे असल्याने पटापट बघता येतात.

नेत्रेश's picture

9 Dec 2017 - 1:23 am | नेत्रेश

Encyclopedia म्हणायचे आहे का?

नेत्रेश's picture

9 Dec 2017 - 1:23 am | नेत्रेश

Encyclopedia म्हणायचे आहे का?

मित्रहो's picture

9 Dec 2017 - 7:42 am | मित्रहो

विकिपीडिया ची सवय लागली. Encyclopedia च हवे. संपादक मंडळाला विनंती बदल करावा.