आप्पा

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जनातलं, मनातलं
29 Nov 2017 - 2:42 pm

हुश्श करीत सगळ्यांनी एकदाची आप्पांची तिरडी खाली ठेवली. बबन्या लाकडं रचायला लागला. गावात धड रास्ता नव्हता. एवढ्या लांब कुणाकुणाच्या परड्यातून, कुणाच्या गडग्यावरून तिरडीसकट चढउतार केल्याने सगळेच वैतागले होते. खरंतर बाळ्याच्या वावरातून आणलं असतं तर एवढा लांबचा पल्ला पडला नसता. पण सांगणार कोण ? बापूची जीभ चांगलीच वळवळत होती. "तरी बरा, आप्पा वजनानं हलको व्हतो. भाऊ तू आसतस तर आमचा काय खरा नव्हता." अवाढव्य आकाराच्या भाऊकडे बघत बापू बोलला आणि सगळे चेकाळले. मग कुणाकुणाच्या मयताच्या गजाली चालू झाल्या.

बबन्या मात्र गपगुमान लाकडं रचत होता. त्याला तसही कोणी गप्पांमध्ये घेत नसत. "खुळगो तो" अशीच त्याची ओळख होती. त्यात तो बोलायला तोतरा आणि बोबडा. त्यामुळे गावात जर कधी कुणाला मनोरंजनाची कमतरता जाणवली तरच लोकं त्याच्याशी बोलत आणि त्याने दिलेल्या उत्तरावर हसत सुटत. पोरांना बाया बाप्यांना पुढचे काही दिवस तो विनोद पुरत असे. आपल्यामुळं लोक हसतात याचा बबन्याला कधी आनंद होई तर आपल्यावर हसतात याचं कधी वाईटदेखील वाटे. पण आजकाल मोबाईल आल्यापासून हे पण कमीच झालं होतं. पूर्वी बबन्या गावची गुरं चारत असे. पण आता त्याची गरज फक्त मयताच्या वेळी लागे. लाकडं रचायला. आताही तो मूकपणे लाकडं रचत होता. आप्पाच्या मृत्यूमुळे ज्याला खरोखर वाईट वाटलं असा जमलेल्यांपैकी तो एकटाच असावा. आप्पा आणि बबन्या एकमेकांचे दोस्त. पण गावातल्या गावात असूनही त्यांची शेवटची भेट होऊन काही वर्षं उलटली होती.

आप्पा म्हणजे माझ्या वडलांचे चुलतभाऊ.ते जवळच्या एका खेड्यात रहात. गेलं वर्षभर ते आजारी होते. त्यांचं वय पंच्याहत्तरच्या पुढे नक्कीच असेल, पण सगळे त्यांना अरे तुरेच करत. कधीतरी चीक द्यायला किंवा फणसाची कुवरी घेऊन आप्पा आमच्याकडे येत. मी लहान असताना एकदा त्यांना बघून "आई आप्पा आला" म्हटल्यावर आईने दिलेला मार अजून आठवतो. त्यावेळपासून "अहो आप्पा" तोंडात बसलं. आप्पा रात्री मुक्कामाला थांबत. आम्ही दिसलो की पाठीत जोरात गुद्दा मारत. "अभ्यास कर " म्हणून दटावत. बहिणीची वेणी ओढत. आम्हाला त्याचा खूप राग यायचा. आईला सांगितलं तर " जाऊ द्या रे त्यांना काय कळतं " म्हणून आई दुर्लक्ष करायला सांगायची.

आप्पा जन्मत:च बुद्धीने थोडे मंद होते. शिवाय पायाने अधू. पण ते त्यांच्या आईचे, माईआज्जीचे लाडके होते. त्यांनी लहानपणी कितीही आक्रस्ताळेपणा केला तरी आज्जी त्यांना नेहमी पाठीशी घालत असे. शाळेत जायचं वय झालं तस आप्पाना सुद्धा शाळेत पाठवलं. खेड्यापासून दूर, पाचेक मैल चालल्यावर शाळा. तेव्हा सायकल एसटी वगैरे काही नव्हतं. आधीच पायाने अधू आणि त्यात ती घाटी चढून जायचं. सहा वर्षाच्या त्या मुलाला त्रास होत असणार. शाळेत पाठवल्यावर ते रडून गोंधळ घालत. माई आज्जी आणि नानाआजोबा दोघंही अगदी मऊ हृदयाची माणसं. त्यांना कधी कुणाचेच अश्रू पाहवले नाहीत. आप्पा रडताना बघून त्यांच्याही डोळयात पाणी येई. शेवटी "आहे घरची शेतीभाती. दूध दुभतं. कशाला हवी ती बुकं?" असं म्हणून माईआजीने आप्पाची शाळा बंद करून टाकली. आप्पांचे धाकटे भाऊ दादा मात्र शाळेत जात. आप्पाना घरी करायला अनेक कामं होती. रोज सकाळी नाना आजोबा सोनचाफ्याच्या झाडावर चढत. हूकाच्या काठीनं चाफ्याची फुलं पाडत. ती गोळा करणे, बागात पडलेले नारळ सुपा-या आणणं, रतांब्याच्या दिवसांत रातांबे वेचणं, ते फोडणं , सड्यावर सोलं वाळायला घालणं सगळं आप्पा करीत . पण त्याचं खरं मन रमे ते गुराढोरांमध्ये. घरच्या गाई म्हशींना रोज घाटीवरून चरायला नेणं आणि संध्याकाळी परत आणणं, त्यांचं दूध काढणं हे काम आपसूक त्यांच्या कडं आलं. आप्पाना बबन्या भेटला तो इथंच. बबन्याच्या घरची परिस्थिती यथातथाच होती. त्यामुळे तो गावातल्या काही लोकांची गुरं चारायला घेऊन यायचा. दोघंही मंद. पण कशी कोण जाणे त्यांची मैत्री जमली बुवा. ते काय बोलत देव जाणे. पण माई आजीला त्या मैत्रीचं कौतुक होतं.‌ घरी कधी खरवस, धोंडस असं काही केलं की ती आप्पाबरोबर बबन्यासाठी पाठवत असे.

आप्पांचं वय वाढत होतं. त्यांच्या वयाच्या सगळ्यांची आता लग्न होऊ लागली. त्यांचे धाकटे भाऊ दादा सुद्धा संसाराला लागले. आप्पांचं लग्न लावायचा प्रश्नच नव्हता. एक दिवस आप्पा गुरं चारायला घाटीवर गेले. थोड्या वेळानंतर "आई नाना " असा आप्पांचा मोठमोठ्यानं हंबरडा ऐकू आला. आणि सगळे आवाजाच्या दिशेनं धावले. खेड्यातली कोकणातली घरं. दोन घरांमध्ये कुका-यांची अंतरं. नानांच्या शेजारचं वावर बाळाचं. आणि दोन वावरांतून व्हाळी म्हणजे (छोटा ओढा). वहात असे. दोन्ही घरातल्या बायका तिथं कपडे धुवायला जात असत. ओरडण्याचा आवाज तिथून येत होता. दादा नाना तिथं पोचले तर बाळ्या "पुन्हा बघशील, बघशील" म्हणत आप्पाना गुरासारखा मारत होता. आप्पा नको नको म्हणून गयावया करत होते . बाळ्याची नवीनवेली बायको रडत बाजूला उभी होती. दादा नाना मध्ये पडले नी आप्पाला सोडवलं. आप्पा केविलवाणा होऊन काहीतरी सांगू लागले, पण त्यांचं कोण ऐकणार ?

आप्पांचं सगळं अंग सुजलं होतं. ठणकत होतं. माई आजी हळुवारपणे त्याला तेल हळद लावी.त्याचं सगळं हवं नको बघे . पण शरीराच्या भुकेला ती तरी काय करणार? बिचारी एकदम हतबल होऊन गेली. "कलेश्वरा, सांभाळ रे माझ्या लेकराला" म्हणून ती आर्त विनवत असे. आप्पांना पूर्ण बरा व्हायला महिना लागला. मध्ये फक्त बबन्या येऊन भेटून गेला. आप्पा आता अबोल झाले होते. ते घराबाहेर पडायला बघत नसत. माई नानांनी मागे लागून लागून त्याचं गुरं चारणं पुन्हा सुरु केलं. पण दोन शेजाऱ्यांमधले सबंध बिघडले ते कायमचे.

दिवाळी, मे महिन्यात आमचं घर पुण्या मुंबईच्या पाहुण्यांनी भरलेलं असे. काही दिवस आमच्याकडे, काही दिवस नाना आजोबांकडे असा सगळ्यांचा मुक्काम असे. पुण्याची आत्या पैसेवाली होती. नेहमी गाडीने येई. येताना सर्वांसाठी कपडे आणत असे. आप्पा ती आली की विशेष आनंदात असत. पुढे जाऊन गाडीतून तिचं सामान उत्साहाने डोक्यावरून उचलून आणत. दुपारची जेवणं झाली की आत्या बॅग उघडून बसे. आणि एकेकासाठी आणलेले कपडे बाहेर काढी. "हा शर्ट बघ रे आप्पा, आवडला का? तुझ्यावर हा रंग खुलून दिसेल म्हणून आणला." आप्पाकाका आनंदाने तो अंगाला लावून बघत. तो नेहमी मोठ्या साईझचा असे. त्यांना तो ढगळ होई. पण ते खूष असत.पुढे कधीतरी एकदा आत्याने तिच्याकडचा फोटोंच्या आल्बम दाखवायला आणला. आप्पाकाकांना दिलेले शर्ट खरंतर आम्हा सर्वांनाच दिलेले कपडे त्या आल्बम मध्ये इथे तिथे दिसत होते. डोक्याने कमी असले म्हणणं काय झालं, आप्पाकाकांच्या पण ते लक्षात आलं . त्यानंतर पुन्हा कधी तिने दिलेले शर्ट त्यांनी घातले नाहीत. तसंही चांगले कपडे घालून बाहेर जायचे प्रसंग त्यांच्या आयुष्यात कितीसे होते? दिवस सरत होते. नाना माई वारले. घराची सूत्रं काकीकडे गेली. काकी बोलायला फटकळ होती पण तिने आप्पांची कधी आबाळ नाही केली. पण ...

गावात राजकारणाचे वारे वाहू लागले. आत्तापर्यन्त एकोप्याने राहणारे गावकरी, पक्षांवरून एकमेकांशी भांडू लागले.गाव बदललं. कामाला माणसं मिळत नाहीत म्हणून गावातली शेती बंद झाली. गुरं ढोरं कमी झाली. गावात आंबा पोफळी रग्गड होत्या. शिवाय जमिनीला भाव आला. गावकऱ्यांच्या हातात पैसा खेळू लागला. मोबाईल आला . या सगळ्यात आप्पा बबन्या सारखी माणसं हरवून गेली. शेती नाही म्हणून गुरं पण काढली होती. आप्पाना काही काम उरलं नाही. दिवसभर ते व्हरंड्यात खाटेवर बसून असत. कुणीतरी त्यांना एक रेडिओ दिला होता. तो कानाला लावून ऐकत बसत. कधी मनात आलं तर बागेत चक्कर टाकत. पण क्वचितच. येणारे जाणारे " काय अप्पा ठीक?" चौकशी करत. आप्पा आयुष्यभर हेच शब्द ऐकत आले होते. आप्पांचं ठीकच चाललं होतं म्हणायचं.

गेल्या वर्षी घरातच घसरून पडण्याचं निमित्त झालं आणि आप्पा अंथरूणाला खिळले. त्यातून ते उठलेच नाहीत. गेले ते सुटले म्हणायचं.

समोर आप्पांची चिता शांतपणे जळत होती. आणि बबन्या शून्यात नजर लावून बसला होता .

कथालेख

प्रतिक्रिया

छान कथा, भरपूर बारकावे आले आहेत/.. आवडली!

पद्मावति's picture

29 Nov 2017 - 3:35 pm | पद्मावति

खुप आवडली.

टवाळ कार्टा's picture

29 Nov 2017 - 3:43 pm | टवाळ कार्टा

:(

रघुनाथ.केरकर's picture

29 Nov 2017 - 5:42 pm | रघुनाथ.केरकर

भाईनू मस्तच लिवल्यात, कोणास ठावक पण वाचून वायट वाटला.

पैसा's picture

29 Nov 2017 - 8:31 pm | पैसा

:(

बबन ताम्बे's picture

29 Nov 2017 - 10:50 pm | बबन ताम्बे

आवडली.

निशाचर's picture

30 Nov 2017 - 4:04 am | निशाचर

छान लिहिलंय.

रुपी's picture

30 Nov 2017 - 6:11 am | रुपी

खूप छान लिहिलंय.

अभिजीत अवलिया's picture

30 Nov 2017 - 8:15 am | अभिजीत अवलिया

छान लिहीलय. पण आप्पांंबद्दल वाईट वाटले.

नाखु's picture

30 Nov 2017 - 9:19 am | नाखु

मस्त लिहिले आहे, रवींद्र पिंगे आठवले

पुलेशु

महेश हतोळकर's picture

30 Nov 2017 - 9:44 am | महेश हतोळकर

उगाच काहि चेहरे डोळ्यासमोरून गेले :(

रघुनाथ.केरकर's picture

30 Nov 2017 - 11:21 am | रघुनाथ.केरकर

खरच...

अजया's picture

30 Nov 2017 - 11:51 am | अजया

व्यक्तीचित्रण लिहावे तर चुकलामाकलाने!

प्राची अश्विनी's picture

30 Nov 2017 - 12:15 pm | प्राची अश्विनी

असे अनेक अपरंपार दिसतात. आईवडील असेपर्यंत कसंतरी निभावणं. पण पुढे? आणि यांच्या शारिरीक गरजा लक्षात घेता वाईट वाटते.

प्राची अश्विनी's picture

30 Nov 2017 - 12:45 pm | प्राची अश्विनी

अपरंपार नाही आप्पा.
Autocorrect फार गोंधळ घालतोय.

सस्नेह's picture

30 Nov 2017 - 12:23 pm | सस्नेह

हुरहुर लावणारे व्यक्तिचित्रण !

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

30 Nov 2017 - 6:09 pm | योगेश लक्ष्मण बोरोले

छानच लिहीलय. आप्पाबरोबर बबन्याबद्दलपण वाईट वाटते.

समाधान राऊत's picture

30 Nov 2017 - 7:10 pm | समाधान राऊत

:(

सौन्दर्य's picture

1 Dec 2017 - 2:14 am | सौन्दर्य

फार सुंदर व्यक्तिचित्रण रेखाटले आहे तुम्ही. शहरात देखील अश्या काही व्यक्ती पाहावयास मिळतात. माझ्या लहानपणी आमच्या सोसायटीत एक एडवर्ड नावाची व्यक्ती राहत होती. त्यांना 'मिकी माउस' फार आवडायचा आणि कोणीही जरा जरी सांगितले तरी ते मिकी माउसची नक्कल करत, त्याच्या सारख्या उड्या मारून दाखवीत, चिरक्या आवाजात काहीतरी बोलत. वयाने मोठ्या असलेल्या त्या व्यक्तीला असले बालिश चाळे करताना पाहणे मला माझ्या त्या लहान वयात देखील क्लेशदायक वाटत असे.

mayu4u's picture

1 Dec 2017 - 2:44 pm | mayu4u

आवडलं.

मराठी कथालेखक's picture

1 Dec 2017 - 7:24 pm | मराठी कथालेखक

छान लिहिलंय

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Dec 2017 - 11:21 pm | अमरेंद्र बाहुबली

आवडली

व्यक्तिचित्रण आवडले. ईश्वर अप्पांच्या आत्म्यास शांति देवो.

चुकलामाकला's picture

16 Dec 2017 - 4:17 pm | चुकलामाकला

इतक्या छान अभिप्रायाबद्दल आपल्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.

चुकलामाकला's picture

16 Dec 2017 - 4:18 pm | चुकलामाकला

इतक्या छान अभिप्रायाबद्दल आपल्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.