आज ब्ल्यू हैं पानी पानी...

सरनौबत's picture
सरनौबत in जनातलं, मनातलं
3 Oct 2017 - 4:57 pm

आज ब्ल्यू हैं पानी पानी

परवा कपाटाची आवरा-आवर करताना माझा आवडता Arrow चा पांढरा शर्ट दिसला. पांढरा शर्ट घालणे म्हणजे माझ्यासाठी 'पांढरा हत्ती' पोसण्याइतके अवघड काम आहे. पांढराशुभ्र शर्ट मी माझ्या अब्रु इतका जपतो. सर्फ एक्सेल कंपनीसाठी भले 'दाग अच्छे' असतील, पण पांढऱ्या शर्टसाठी अजिबात नाही. छोटासा डाग देखील पांढऱ्या रंगावर ठळकपणे दिसतो. म्हणून चुकूनही डाग पडू नये म्हणून सतत काळजी घ्यावी लागते. कधीनव्हे तो पांढरा शर्ट घालावा आणि नेमकी त्याच दिवशी घरी आवडती उडदाची आमटी असते. आमटीचे मनसोक्त भुरके मारताना शर्टवर एखादा शिंतोडा उडण्याची भीती. एरवी व्यवस्थित चालणारं पार्कर पेन नेमकं ह्याच दिवसही खिशाला लावल्यावर गळण्याची शक्यता असते.

बऱ्याच दिवसात ऑफिसला पांढरा शर्ट घातला नाही तर घालावा असा विचार मनात आला. वॉशिंग मशीन मध्ये इतर कपड्यांबरोबर पांढरे कपडे टाकू नये म्हणतात. मग अजून १-२ पांढरे शर्ट-टी शर्ट धुवायला काढले. तरी देखील ३ कपड्यासाठी वॉशिंग मशीन लावणे जीवावर आलं. शिवाय मशीन मध्ये कॉलर नीट स्वच्छ होत नाही म्हणून स्वतःच कपडे धुण्याचे ठरवले.

कोमट पाण्यात वॉशींग पावडर घालून भरपूर फेस केला आणि कपडे तासभर भिजायला ठेवले. नंतर ब्रशने घासले आणि १-२ वेळा सध्या पाण्यातून काढले. कॉलर नीट निघाली नाही म्हणून लिंबाचा रस लावला पण तरी विशेष फरक पडला नाही. काय करावे अश्या विचारात असताना बाथरूमच्या कोपऱ्यात 'उजाला सुप्रीम' ची बाटली दिसली आणि माझा चेहरा 'उजळला'. ह्यापूर्वी नीळ प्रकार मी कधी वापरला नसल्याने बाटलीवरच्या 'Instructions' वाचल्या. लिटरला ४ थेंब हे प्रमाण होतं. बादली पाण्याने निम्मी भरत आली होती. १०-१२ थेंब पुरतील ह्या विचाराने घाईघाईने बाटली उलटी केली आणि घात झाला! बादली शेजारी असलेल्या Arrow च्या शर्टवर त्यातले अनेक थेंब उडाले! शाईचा छोटा ठिपका शर्टवर पडल्यावर हळहळणारा मी... आणि इथे तर अख्खा शर्ट जांभळा-निळा झाला होता. व्हाईट ऐवजी वाईट शर्ट झाला! मनात विचार आला कि नीळ चा डाग शाईसारखा नसणार. नीळ जर कपडे पांढरेशुभ्र करण्यासाठी वापरतात तर मग ह्याचाच डाग बहुदा पडणार नाही. लगेचच साध्या पाण्यात शर्ट बुडवला आणि ब्रशने घासला. नाही म्हणायला डाग थोडे फिक्कट झाले पण विशेष उपयोग झाला नाही. 'कुंपणानेच शेत खाल्लं' तर तक्रार कोणाकडे करायची? हे म्हणजे चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी कुत्रा पाळावा तर कुत्र्याने उलट मालकावरच भुंकण्यापैकी आहे!

'उजाला' बनवणाऱ्या ज्योती लॅब्स च्या विरोधात तक्रार करावी असा विचार आला. पत्ता बघण्यासाठी बाटलीमागे पाहिलं तर तिकडे 'Do not directly put on the clothes' असं लिहिलंय. त्यामुळे तो मार्ग देखील बंद झाला. नीळ चा डाग काढण्यासाठी 'संकटमोचन गूगल' कडे धाव घेतली. नीळ ला इंग्रजीत काय म्हणतात ते आठवेना. मग 'Ujala Supreme stains' असा सर्च मारला. हे डाग कसे काढायचे हे सापडलं नाही पण 'उजाला मुळे कपडे पांढरेशुभ्र होत नाहीत, केवळ निळी शेड आल्याने पांढरेशुभ्र असल्याचा आभास होतो' ही ज्ञानात भर पडली.

तूर्तास ह्या शर्टचे काय करावे हा प्रश्न आहे. घरीच ४-५ वेळा धुवून बघावे किंवा ड्रायक्लिनींगला टाकावे असा विचार आहे. आगामी थंडीत स्वेटरच्या आत हा शर्ट घालता येईल. हेही नाही जमलं तर होळी- रंगपंचमीला हा शर्ट घालायचा विचार आहे.

सर्फ एक्सेल, एरियल बनवणाऱ्या कंपन्यांना आवाहन आहे कि लोकांच्या घरी जाऊन चांगल्या स्वच्छ कपडयावर रस्साभाजी, तेल वगैरे ओतून स्वच्छ करून दाखवण्याऐवजी माझ्या शर्ट वरचे निळीचे डाग काढून दाखवा. माझ्या हातचा मसाला चहा पाजीन. त्याबरोबर कॉलर देखील स्वच्छ निघाल्यास बिस्किटे देखील देईन.
मित्रहो, तुम्हाला देखील काही तोडगा माहिती असल्यास ह्या विषयावर 'उजाला' टाकावा हि विनंती.

धोरणविचार

प्रतिक्रिया

निनाद आचार्य's picture

3 Oct 2017 - 5:56 pm | निनाद आचार्य

वाईट झाल राव. नील वापरताना फार कालजी घ्यावी लागते.

संजय पाटिल's picture

3 Oct 2017 - 6:00 pm | संजय पाटिल

अता अजून थोडा उजाला घ्या... त्याचा गडद द्रव तयार करा आणि त्यात अखंड बुडवून पांढर्‍याचा निळा शर्ट बनवा...

इंडीगो हि डायच असते. प्रॉपरली केले तर मस्त शेडस मिळतात कॉटनवर. घरात कुणी डिझायनर वगैरे असले तर त्या क्लाउडी पॅटर्न वर मस्त अ‍ॅक्रेलिक कलर्सने ड्रा करुन घ्या. हे पॉसिबल नसेल तर आणि शर्ट खुपच महागाचा असेल आणि प्योर कॉटनचा असेल (काय सांगावे म्हाराजा, ते व्हान हुसन, लुई फिलिप चे रेट वाचुन छाती दडपते हो, आम्ही डबल घोडा तागा घेऊन ५०० त चार शर्ट शिवून घेणारे लोक) लाईट कलरमध्ये डाय पण करुन मिळतो रंगरेजाकडे. आता पुण्यात रंगरेज कुठे हे मला माहीत नाही. हे सगळेच जमत नसेल तर दडपून घालायचा तसाच. इंडिगो स्प्लॅश म्हणून नवीन फॅशन आहे असे सांगायचे.

मार्मिक गोडसे's picture

3 Oct 2017 - 8:01 pm | मार्मिक गोडसे

पांढरा शर्ट आहे ना? मग ब्लिच का करत नाही?

सोमनाथ खांदवे's picture

3 Oct 2017 - 8:42 pm | सोमनाथ खांदवे

शर्ट ओला करून त्या डागा पतंजली एडवांस टूथपेस्ट वर लावून 10 / 15 मिनिटे ठेवा नंतर हलक्या हाताने घासा , असे दोन तीन वेळा केल्या नंतर 100 % डाग गायब होणारच . मी दोन शर्ट मधील खिशाला बॉलपेन चे रुपया च्या आकारा चे डाग घालवले आहेत .

सोमनाथ खांदवे's picture

3 Oct 2017 - 8:45 pm | सोमनाथ खांदवे

त्या डागा वर पतंजली एडवांस टूथपेस्ट लावून ठेवा अस म्हानैच व्हत .

अभ्या..'s picture

3 Oct 2017 - 9:05 pm | अभ्या..

म्हनजे हमखास ब्लीच हाये पेस्टीत.
अन म्हणे दंतकांती.

संजय पाटिल's picture

4 Oct 2017 - 8:25 pm | संजय पाटिल

+१००

उपचार करून बघणेत येईल ...!

पूर्वी पिवळे पडलेल्या बनियनला पिवळेपणा झाकण्यासाठी नीळ वापरत. ( उलट करायला पिवळसर करावे लागेल.)

तुषार काळभोर's picture

4 Oct 2017 - 7:45 am | तुषार काळभोर

ही तुमची चैन आहे, तर आमचं आयुष्य.
मागची सहा वर्षे या हापिसात युनिफॉर्म आहे, कंपनीचा (लोगोसहीत) पांढरा शर्ट अन काळी पॅन्ट(खाली साडेतीन किलोचे सेफ्टी शूज)
बाकी वेळी कुठे पाहुण्या-रावळ्यांकडे, नातेवाईकांकडे, एखाद्या कार्यक्रमाला जाताना, पांढरा लिनन नाहीतर खादी ठरलेला.
दुसरा रंग अंगावर दिसला की लोकं विचित्र नजरेने बघतात राव!

तुषार काळभोर's picture

4 Oct 2017 - 7:47 am | तुषार काळभोर

एकदा कपड्याचा साबण संपला म्हणून लक्स लावून बनियन धुतलं होतं, नव्यासारखं दिसायला लागलं. बघा उजालावर काही फरक पडतोय का.

सरनौबत's picture

4 Oct 2017 - 5:09 pm | सरनौबत

ही कल्पना यशस्वी झाल्यामुळे बहुदा कंपनीने 'लक्स' नावानेच बनियनची श्रेणी बाजारात आणली असावी ;-)

विनिता००२'s picture

4 Oct 2017 - 3:12 pm | विनिता००२

पंतजलीची प्रिमीयर पावडर मधे रात्रभर भिजत घाला. डाग निघून जातील.

सौन्दर्य's picture

4 Oct 2017 - 11:58 pm | सौन्दर्य

एकवेळ अब्रूवर शिंतोडे उडाले तर चालतील, पण पांढऱ्या शर्टावर ? नको रे बाप्पा ! (हलकेच घ्या)
ड्राय क्लीनरला देऊन बघा. निघाले नाही तरी निदान फिक्कट होतील.

सिरुसेरि's picture

5 Oct 2017 - 5:56 pm | सिरुसेरि

"ala" वापरुन पहा .