हे गगनराजा , थांबव तव उष्ण किरण शरा
तव ऊर्जेने मज दाह होतो विनविते तुजला आज धरा
उष्ण वात वाहती भवती तप्त ऊन पडे
निष्पर्ण त्या वृक्ष लताना पाहुनी धरणी रडे
शुष्क होती नद्या जलाशय तडफडती त्यात जलचरे
एकमात्र ह्या थेंबासाठी शांत विहग चहूकडे विचरे
वासरमणी, तुझिया योगे जलचक्र फिरते ज्ञात आहे मला
परी तल्खली होई जीवाची कशी समजावू मी तुला?
तव अनलशरे तनूसी भेगा आता किती मी साहू?
हे दिनमणी न कळे मजला तुजवीण कोणा मी पाहू?
करद्वय जोडुनी नमिते तुजला थांबव हे तप्त आप
वरुणराजा बरसआता शमवि मम शरीर ताप
---- शब्दांकित
वैभव दातार