फक्त एकदा हसून जा...

निशांत_खाडे's picture
निशांत_खाडे in जे न देखे रवी...
13 Aug 2017 - 12:26 am

मोडली ही प्रीत जरी, थांब थोडे बसून जा |
जगेन तुझ्या आठवणीवर, फक्त एकदा हसून जा |

कोमेजले हे फूल जरी, गंध आणखी आहे ताजा ;
दैवाचा हा खेळ सारा ; नाही मुळी गं दोष तुझा.
द्रावले ना हृदया जरी, पापण्यांना पुसून जा ;
जगेन तुझ्या आठवणीवर, फक्त एकदा हसून जा |

लावुनिया जीवास लळा, फुलविलास गं प्रीतमळा;
कापिता केसाने गळा, झालो बघ मी वेडाखुळा.
समजून मला दुधखुळा, हृदय माझे पिसून जा;
जगेन तुझ्या आठवणीवर, फक्त एकदा हसून जा |

मन माझे गुंतले हे, वेड्या खुळ्या आशेमध्ये;
भांबावलेल्या या मनाचे , भाव तुला कसे न कळे.
भावनांची या माझ्या, कदर तू गं करून जा;
जगेन तुझ्या आठवणीवर, फक्त एकदा हसून जा |

तुजविणा हे जग भासे, विचारांती मज शून्यापरी ;
विरहाचे हे दुःख किती गं, भरले असे माझ्या उरी.
खेळामध्ये खेळ सारे, तुझे तूच गं खेळून जा.
जगेन तुझ्या आठवणीवर, फक्त एकदा हसून जा |

हृदयावरी वार केला, घायाळ हा झालो जरी;
सुखावतो गं जीव माझा, आठवण तुझी आली तरी.
येणार ना परतून जरी, जाताना मात्र दिसून जा;
जगेन तुझ्या आठवणीवर, फक्त एकदा हसून जा |

विषयामध्ये सुख सारे, वाटते गं तुला जरी;
होईल गं दशा तुझी, बीन पाण्याच्या मासोळी परी.
धीवराच्या जाळ्यामध्ये, तुझी तूच गं गुंतून जा;
जगेन तुझ्या आठवणीवर, फक्त एकदा हसून जा |

हारलो या खेळामध्ये, जीत तुझी गं झाली जरी ;
केलेस तू हे सुखासाठी, दुःखचि तुझ्या येईल पदरी.
नकोस येऊ दारी माझ्या, जीवन तुझे फुलवीत जा ;
जगेन तुझ्या आठवणीवर, फक्त एकदा हसून जा |

नाही केले गं पाप मी, पापीन तू आहेस जरी;
प्रेमामुळे येतो जवळी, फुल आणि त्या भ्रमरापरी.
कलिकेमाजी भ्रमर गुंतला, दशा त्याची विसरून जा;
जगेन तुझ्या आठवणीवर, फक्त एकदा हसून जा |

भंगलेल्या या प्रेमाची, खंत आता नको करू;
काढुनीया गं आठवणी त्या, नकोस आता उगी झुरू.
नको करू चिंता माझी, तू मात्र सुखी रहा,
जगेन तुझ्या आठवणीवर, फक्त एकदा हसून जा |
फक्त एकदा हसून जा...

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ही कविता श्री. राजेंद्र खाडे यांची आहे, माझ्या वाचनात आली तेव्हा मला अतिशय आवडली, कवी फेसबुक किंवा इतर कुठलीही सोशल सेवा वापरत नाहीत. त्यांच्या वयक्तिक मिपा खात्यासाठी अगोदरच नोंदणी केली आहे. त्यांच्या कडे या कविता सादर करण्यासाठी इतर कुठलेही व्यासपीठ उपलब्ध नाही, म्हणून मीच हे काव्य मिपावर टाकण्याचे ठरवले. त्यांच्या आणखीनही काही अप्रकाशित कविता त्यांच्याकडे आहेत. मिपाकर हे काव्य वाचून त्यांच्या प्रतिक्रिया देतील व कवीस पुढील लेखन प्रकाशित करण्यास प्रोत्साहित करतील अशी अपेक्षा आहे!
रच्याकने, मिपावर ही कविता टाकण्यास कवीचा कसलाही आक्षेप नाही, व त्यांची परवानगी घेऊनच मी ही कविता इथे पोस्ट करतो आहे :-)
- निशांत खाडे.

कविता

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

13 Aug 2017 - 3:28 pm | धर्मराजमुटके

नाही केले गं पाप मी, पापीन तू आहेस जरी;

हे कळाले नाही. कविला विचारुन सांगता काय प्लीज ? म्हणजे नक्की काय पाप केले आहे प्रियतमेने ?

कवितेत फुलीशस्टॉप ( पुर्णविराम) आणि अर्धविराम वापरतानाचा हा अभिनव प्रयोग मी पहिल्यांदाच पहात आहे. अर्थात बरीच वर्ष कवितांचे वाचन थांबविल्याने माझी चुक असू शकेल. कोणी मार्गदर्शन करणारे असेल तर ऋणी होईन !

छान आहे कविता. मिपावर तुमच्या मित्राच्या साहित्याचे स्वागत.