समाधानाचे मुखवटे (भाग - २)

निशांत_खाडे's picture
निशांत_खाडे in जनातलं, मनातलं
28 Jul 2017 - 4:16 pm

समाधानाचे मुखवटे भाग - १

दुपारी साडे-बारा एक वाजायच्या सुमारासास बसवाल्याने समाधानाला रस्त्याच्या शेजारी फूटपाथवर सोडले, त्या फूटपाथला लागून पूर्ण अर्धवर्तुळ आकाराचे एक भले मोठे मोकळे मैदान होते. तो फूटपाथ आकाराने एवढा मोठा की होता त्यावर काही चहावाले, पानटपरीवाले यांनी स्वतःचे धंदे दारूची जाहिरात असणाऱ्या छत्र्यांखाली सुरु केले होते. इथेही मान्सून बहुतेक नुकताच सुरु झाला असावा, असा अंदाज समाधानने त्या मैदानावर नुकताच उगवलेल्या हिरवळीकडे पाहून लावला.
वातावरण छानच होते, हलका-हलका पाऊस चालू होता, गडद राखाडी रंगाचे ढग. संथ, आरामदायक आणि थंड हवा. त्या मैदानावरची ओली लाल माती, पोपटी गवत, आणि उंच च्या उंच नारळाची झाडे यांचा एक संमिश्र आल्हाददायक सुगंध सगळीकडे दरवळत होता. समाधान जरावेळ तसाच उभा राहून हे सगळे अनुभवत होता. अचानक पाऊस सुरु झाला. मराठवाड्यात मुसळधार वैगेरे म्हणतात तसा पाऊस. खाली फूटपाथवर ठेवलेली पिशवी उचलून घेण्या इतक्या वेळातच म्हणजे अगदी काही सेकंदातच समाधान पूर्ण भिजून गेला. तो पळत पळत शेजारच्या एका आम्लेटवाल्या म्हाताऱ्या माणसाच्या पत्र्याच्या शेड खाली जाऊन उभा राहिला. रात्रीपासून काही खाल्ले नसल्याने त्याला भूकही लागलीच होती आणि पाऊस थांबेल अशी चिन्हही नव्हती. म्हणून त्याने तिथेच काहीतरी खावे असे ठरवले.
"चाचा, एक डबल आम्लेट मिलेगा?" समाधान बोलला.
"हां हां! बिलकुल! साथमे क्या खाओगे? ब्रेड या पोई?" चाचाने स्टोव्ह चालू करत विचारले.
"ब्रेड हि दे दो" हा दुसरा पदार्थ काय असतो हे माहित नसल्याने व नवीन पदार्थाचे प्रयोग करण्याची इच्छा नसल्याने समाधान उत्तरला.
"ठीक है! अभि बनाता हुन, बैठिये!" चाचा.
त्या म्हातार्याकडे समाधान सोडता इतर एकही ग्राहक नव्हते. तो बाकड्यावर बसून रुमालाने ओले झालेले केस पुसू लागला. गोव्यात हि त्याची पहिलीच वेळ होती. 'पावसाळ्यात गोव्याला फिरायला जाणे म्हणजे मूर्खपणा' असे बऱ्याच मित्रांनी त्याला या अगोदर सांगितले होते. तेही विचार या भयंकर पावसाकडे पाहून त्यांच्या मनात येऊ लागले. जर हे असेच चालू राहिले तर बाहेर पडणेही कठीण होऊन बसेल. समुद्र वैगेरे पाहणे तर सोडाच. मधेच अश्विनीची आठवण आली. तिला पाऊस आवडतो. आणि आम्लेटपण. वेळ काढण्यासाठी म्हणून समाधानने चाचा कडून एक सिगारेट घेतली. ती पेटवून तो पिऊ लागला. आणि अचानक पाऊस बंद. जणू काय नळ बंद करावेत. पाऊस बंद आणि पाच मिनिटाच्या आत ढग कमी होऊन थोडा थोडा प्रकाश पडायला सुरुवात झाली. हे असले वातावरण तो त्याच्या २१ वर्ष्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होता.

"तो, कहांसे हो आप?" चाचाने विचारले. बराच वेळ प्रयत्न करून शेवटी त्यांचा स्टोव्ह सुरु झाला होता.
"औरंगाबाद, महाराष्ट्र." तो ढगांकडे पाहत बोलला.
"अरेच्चा! मराठी काय तुम्ही?" चाचा.
"हो. आणि तुम्ही कुठचे?" आता समाधानाचे लक्ष त्या म्हातार्याकडे गेले.
"मी इथलाच, चापोरा गावाचा, जवळच आहे इथून" चाचा आम्लेटची बशी समाधानाच्या हातात देत बोलला.
मग चाचा गोव्यातल्या मराठी लोकांविषयी बोलू लागला. मग तो तरुण असताना एकदा औरंगाबादला गेला होता त्यावेळचे अनुभव. मग आणखी काहीतरी. अखंड बडबड. समाधान हुंकार देत होता पण काही वेळा नंतर त्याला ते एकवेना.
"इथे राहायला जागा कुठे मिळेल स्वस्तात?" तो विषय बदलत बोलला.
"तुम्ही एकटेच दिसता. काही कामा करता आलाय का?" चाचा.
"नाही सहजच, फिरायला." समाधान.
"किती दिवसांसाठी?" चाचा.
"बघुयात. पण महिना-दीड महिना तरी आहे" समाधान.
"व्वा छानच की! म्हणजे अगदी व्यवस्थित फिरून होणार तुमचे! बरं, कुठे हवीये जागा, काही ठरवून आला असाल ना?"
"नाही. पण बाग बीच विषयी ऐकलेय मित्रांकडून" समाधान.
"छे छे! बागाला नका जाऊ, म्हणजे तुम्ही मराठी म्हणून तुम्हाला सांगतो या उत्तर भारतीयांनी बाजार करून ठेवलाय बागा-कांदोलिम चा. फिरायला जायचे असेल तर जा नंतर सावकाश. पण राहायला मात्र नका जाऊ तिकडे. फार महाग आणि गर्दीपण जास्त असते हो." चाचा.
"मग?"
"तुम्ही एक तर दक्षिण गोव्यात जा किंवा मग उत्तर गोव्यात अंजुना-वागातोर वैगेरेला"
"इथून जवळ काय आहे?"
"अंजुना."
"बरं. तिथे मिळेल का स्वस्तात राहण्याची जागा?"
"तुम्हाला खोली स्वतंत्र हवी का?"
"तसे काही नाही. मला काहीहि चालेल"
"मग तुम्ही तिकडेच एखादे हॉस्टेल बघा! तिथे मिळेल दोन-तीनशे रुपयात राहायची जागा. जेवण पण स्वस्त असते. वरून जगभरातून आलेले तरुणसुद्धा भेटतील तुम्हाला. पण वेळ काढून दक्षिण गोवा तेवढा बघून घ्या नंतर"
"बरं अंजुनाला जायचे कसे?" आम्लेट खाऊन रिकामी बशी चाचाकडे देत समाधानाने विचारले.
"तुमचे सामान एवढेच आहे का?" चाचाने विचारलेले.
"हो" समाधान.
"तुम्ही बसा जरा वेळ, मी देतो तुमची जायची सोय करून" चाचा. हात पुसून त्यांनी खिशातला मोबाईल काढला, कोणाला तरी फोन करून ते कोंकणीत काही तरी बोलले. गोव्यात भेटलेला पहिला माणूस इतका फ्रेंडली आणि वरून मराठी येणारा म्हणून त्याला बरे वाटले.आता आपल्याला गोव्यात काय काय करायचे आहे याचा विचार तो करू लागला.
दहा पंधरा मिनिटानंतर एक माणूस पिवळा टी-शर्ट आणि गुढग्याइतकी चड्डी घातलेला. एका स्कुटरवर येऊन चाचाच्या टपरीपुढे येऊन थांबला. चाचाने पुढे जाऊन त्याला काहीतरी सांगितले. त्या माणसाने 'चलो' असा इशारा केला.
" ये रही आपकी सवारी इन्को १५० रुपये दे दो, ये आपको अंजुना छोड देंगे. वाहापे किसीसे भी पुच्छ के हॉस्टेल ढुंढ लो" समाधान कडे पाहून चाचा बोलले.
या स्कुटरवाल्याला मराठी येत नसावी हे समाधानने चाचांच्या मराठीवरून हिंदी मोडवर जाण्याने ओळखले.
त्याला सवयीप्रमाणे स्कुटरवाल्यासोबत ५० रुपयांसाठी थोडी घासाघीस करावी असे वाटले, पण तो मोह यावरून तो तयार झाला. ब्याकप्याक परत पाठीला लटकवली. समाधानाची पिशवी स्कुटरवाल्याने दोन्ही पायांच्या मध्ये अत्यंत व्यवस्थित ठेऊन दिली व समाधान मागे बसला.
"अच्छा!" समाधान चाचांकडे पाहत बोलला.
"या मग, पुढच्यावेळी कधी आलात तर रात्री ८-८.३० च्या दरम्यान. मस्त गोवन सुरमई फ्राय बनवून देईन!" चाचा बोलले.
स्कुटरवल्याने स्कुटर सुरु केली. आणि समाधान निघाला..

(क्रमशः:)
२८/०७/२०१७

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

एस's picture

29 Jul 2017 - 7:31 pm | एस

वाचतोय. पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jul 2017 - 10:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर सुरुवात ! पुभाप्र.

निशांत_खाडे's picture

29 Jul 2017 - 11:38 pm | निशांत_खाडे

"एस, डॉ सुहास म्हात्रे."
धन्यवाद!!

निशांत_खाडे's picture

29 Jul 2017 - 11:38 pm | निशांत_खाडे

"एस, डॉ सुहास म्हात्रे."
धन्यवाद!!