टेंडर कोकोनट आईस्क्रीम

Primary tabs

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in पाककृती
17 Apr 2017 - 3:42 pm

टेंडर कोकोनट आईस्क्रीम

.

उन्हाळा सुरु झाला,की,निरनिराळ्या थंड वस्तूंचा मारा शरीरावर होऊ लागतो.त्यात काय नसतं?सब्जाचे बी,ठेचलेल्या धने+जिऱ्याचे पाणी कोकम-लिंबू-बेलफळ यांची सरबतं,पन्हं,ताक,लस्सी,दुधी-पालक-काकडी यांचा पुदिना,कोथिंबीर घालून काढलेला रस,निरनिराळ्या स्वादाची मिल्कशेस्,शहाळ्याचे पाणी, निरनिराळ्या स्वादाची आईस्क्रीम्स. यादी संपतच नाहीये.

तर सांगायची गोष्ट अशी की,भर उन्हाळ्यात नागीण झालेला पेशंट घरात असल्याने भेटायला येणारे पाहुणे भेटीदाखल शहाळी घेऊन येऊ लागले. त्यातलं पाणी पिऊन झाले की, मलई तशीच उरत असे.या मऊ खोबऱ्याचे टोमॅटोसार उत्तम होते,ते एक दोनदा करून झाले.मलई तशीच राहिली.मलई या नावाखाली जाड खोबरे जास्त खाल्लेपण जात नाही.लहानपणापासून पातळ मलई खायची सवय.(काय करणार?माहेरी शंभर माड असल्याने हवी तशी कोवळी शहाळी खायची सवय.)आता याचे काय करावे बरं?या विचारात तापमानाचा पारा चढत्या भाजणीत वर वर जाऊ लागला आणि आईस्क्रीमचे वेध लागला लागले.

नॅचरलने ज्यावेळी टेंडर कोकोनट आईस्क्रीमचा स्वाद आणला,त्यावेळेचा स्वाद आता त्या आईस्क्रीमला राहिलेला नाही.“मागणी तसा पुरवठा”, या उक्तीनुसार त्या स्वादाची प्रत पूर्वीची राहिली नाही.सर्रास तयार नारळ त्यात वापरला जातो आणि दुधापेक्षा दूधपावडरचा वापर त्यात होतो, हे लक्षात आल्यावर मी ते आईस्क्रीम खाणे सोडून दिले आहे.

आता हवे तसे खोबरे हाताशी असल्याने घरातच करून पाहूया हा विचार मनात रांगू लागला.अजयाने एका पाककृतीची लिंक दिली.तरला दलाल यांचीही एक कृती दिसली.पण त्यात मलईला वापरलेले फ्लेश,मीट यांसारखे शब्द पाहिल्यावर माझ्यासारख्या मांसाहारी व्यक्तीच्या अंगावरही शहारे आले.श्रीफाळाचा असा अपमान?(हा मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्याचा परिणाम असावा बहुतेक!दुसरं काय?)

दोन्ही पाककृती नापास होण्याचे एक कारण हे आणि दुसरे कारण त्यात वापरलेल्या सगळ्याच वस्तू घरात नव्हत्या.मग आतापर्यंतचा स्वयंषाकघरातला अनुभव जमेस धरून प्रयोग करयचे ठरवले आणि मी हिट विकेट आउट न होता आईस्क्रीम हिट झाले.कमीतकमी पदार्थ वापरून केलेलीअतिशय सोपी,सुटसुटीत पाककृती तुमच्यासाठी सदर करतेय.

मला खात्री आहे,की,ही पाककृती वाचल्यावर तुम्ही नक्की शहाळी आणायला पळाल.तर पाहूया साहित्य काय लागतंय ते.

साहित्य:-

१.दोन लिटर दुधावरची साय,(माझ्यकडे जे दुध येते त्यावर एक लिटर दुधाला मिल्क कुकरमध्ये तापवले असतापिझ्झासारखी जाड साय येते.त्याने एक वाटी भरते.) तर अशी दोन वाट्या साय.

२. अर्धी वाटी दुध.(अर्थात साय काढलेले.)

३.दोन शहाळ्यांमधली मलई.(हीपण साधारण दोन वाट्या होते.थोडी कमीजास्त चालून जाईल.).

४. एक ते सव्वावाटी साखर.(कारण कधी कधी खोबरे खूप गोड असते तर चवीनुसासार कमीजास्त साखर लागू शकेल.)

कृती:-
१. शहाळ्याच्या मागच्या बाजूचा लालसर भाग काढून त्या मलईचे तुकडे करा.शहाळे जिथून फोडले जाते त्याच्या विरुद्ध बाजुची मलई जास्त मुलायम असते,अशा मलईचे अगदी बारीक तुकडे करा.ते साधारण पाव वाटी बाजूला ठेऊन द्या.

२. आता आपल्याला शहाळ्याचे क्रीम तयार करायचे आहे.बाकीची मलई आणि साखर एकत्र करून मिक्सरमधून मुलायम पेस्ट करा.थोडावेळ थांबून (इथे थांबाच,कारण मिक्सर गरम झालेला असतो.)त्यातच साय घालून फिरवून घ्या,आता मिक्सर स्लोवर ठेवा,नाहीतर सायीतून लोणी वेगळे होईल.

३. अल्युमिनियामच्या भांड्यात हे मिश्रण ओता.

४. बाजूला ठेवलेले मलईचे तुकडे घालून एकाच दिशेने चमचा फिरवून ढवळा.

५. सहा तास फ्रीजरमध्ये ठेवा.सहा तासांनी कधीही काढून खायला घेऊ शकता.मृदूमुलायम आईस्क्रीम तयार.या आईस्क्रीमला पुन्हा मिक्सरमधून फिरवण्याची गरज नाही

.

आईस्क्रीम

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

17 Apr 2017 - 4:07 pm | संजय क्षीरसागर

पण `सहा तासांनी कधीही काढून खायला घेऊ शकता'.... इतका वेळ वाट पाहाण्यापेक्षा नॅचरल्सला जाऊन खाणं सोपयं.

अर्थात, माझं ऑल टाईम फेवरीट आईस्क्रीम हे आहे :

.

नूतन सावंत's picture

18 Apr 2017 - 8:52 am | नूतन सावंत

नॅचरल्सला? शी! मला नाही आवडत ते! का तेही लिहिलंय वर.म्हणून तर एवढा खटाटोप केला आणि तो सत्कारणी लागला.

चौथा कोनाडा's picture

2 Jun 2017 - 11:06 pm | चौथा कोनाडा

नुकतंच नॅचरल्सचं टेंडर कोकोनट आईस्क्रीम खाल्लं, ते आवडलं.
मलई कुल्फी व्यतिरिक्त मला आवडलेलं पहिलंच आईस्क्रीम !

पण, स्वतः बनवून खाण्याची आणि खाऊ घालण्याची मजा काही औरच आहे (अर्थात, पदार्थ फसला नसल्यास).
ते नॅचरलचं आइस्क्रीम केव्हाही खाऊ शकतो.

मस्त ! सगळे आनंद दमड्या देऊन मोजता येत नसतात त्यातला एक आनंद म्हणजे आवडता पदार्थ स्वतः हातानी करून खाणे आणि प्रियजनांना खाऊ घालणे !!!!
लहानपणी डब्बा आईस्क्रीम करायचो , मग आई नवनवे प्रयोग करायची. फ्रीज घरात आल्यावर तर बर्फाच्या ट्रे मध्ये लिंबू सरबत आणि फळांचे रस घालून कुटाणे करायचो !!!! आईस्क्रीम चं साहित्य मिसळून ठेवलेलं असलं की ते सेट व्हायच्या आधीच अर्धं 'आपोआप' संपायचं !!!
मस्त आठवणी आल्या ! खूप दिवसात केलं नाही आईस्क्रीम. आता करतेच :)
एवढी सोपी कृती दिल्याबद्दल धन्यवाद ताई ! नक्की करून बघणार :)

मस्त ! सगळे आनंद दमड्या देऊन मोजता येत नसतात त्यातला एक आनंद म्हणजे आवडता पदार्थ स्वतः हातानी करून खाणे आणि प्रियजनांना खाऊ घालणे !!!!

एक नंबर..

ऋतु हिरवा's picture

17 Apr 2017 - 5:22 pm | ऋतु हिरवा

करुन बघायला हवे

कपिलमुनी's picture

17 Apr 2017 - 5:51 pm | कपिलमुनी

फोटूचा गणेशा झालाय

फोटो दिसत नाहीत, पण पाकृ हिट आहे एकदम.

सविता००१'s picture

17 Apr 2017 - 7:38 pm | सविता००१

झक्कासच ग.
फोटो दिसायला पाहिजे राव.
या तुझ्या मिश्रणात परत करशील तेव्हा १ वाटी मिल्क पावडर घालून पहा. अजून धम्माल.
मी घरात कुठलं फळ नव्हतं म्हणून ड्रिंकिंग चॉकलेट घालून असच बनवलेलं हे आईसक्रीम...
.

एकच नम्बर..नक्की करून बघणार.

एकच नम्बर..नक्की करून बघणार.

पिलीयन रायडर's picture

18 Apr 2017 - 1:09 am | पिलीयन रायडर

वा वा!! माबोवर http://www.maayboli.com/node/45309 ही पाकृ फेमस आहे. खुप जणांनी ही हमखास होतेच म्हणून सांगितलं तरीही करुन पहाण्याची हिम्मत होत नाही. तू मात्र स्वतःचे डोके लावुन पाकृ बनवलीस.. धन्य! (कधी गाठणार ही लेव्हल मी!!)

जगातल्या कोणत्याही आईस्क्रिमला ही चव येणार नाही हे नक्की!!

नूतन सावंत's picture

18 Apr 2017 - 10:17 am | नूतन सावंत

मायबोलीवर अशी पाककृती आहे हे भावनाकडून कळळे होते,पण मी माबोची सदस्य नाही आणि तिने लिंक पण दिली नव्हती त्यामुळे ती शोधण्याच्या फंदात पडले नाही,आता मात्र वाचली.

विशाखा राऊत's picture

18 Apr 2017 - 2:00 am | विशाखा राऊत

टेंडर कोकोनट क्या बात है

मनिमौ's picture

18 Apr 2017 - 6:27 am | मनिमौ

आणी आपला हात जगन्नाथ असल्याने कुठल्या ही आईसक्रीम पार्लर चे ऊंबरे झिजवायला नको

यशोधरा's picture

18 Apr 2017 - 9:51 am | यशोधरा

कधी येऊ? करुन घालशील ना आईसक्रीम? =))

नूतन सावंत's picture

18 Apr 2017 - 10:15 am | नूतन सावंत

नक्कीच निघण्याआधी सहा तास कळवलंस तर आल्या आल्याच मिळेल.

यशोधरा's picture

18 Apr 2017 - 4:52 pm | यशोधरा

हैला! डन, डनाडन डन!

टवाळ कार्टा's picture

27 Apr 2017 - 1:54 pm | टवाळ कार्टा

कोलंबी खायची असेल तर किती वेळ आधी कळवावे लागेल? :)

नूतन सावंत's picture

31 May 2017 - 10:08 am | नूतन सावंत

त्याला वेळ लागणार नाही तू निघताना फोन केलास तरी चालेल.मी आज पाहिला तुझी प्रतिसाद.

मदनबाण's picture

18 Apr 2017 - 4:25 pm | मदनबाण

मस्त !

{ बटर स्कॉच प्रेमी } :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kahe Chhed - Mohe Rang Do :- Dr. Payal Vakharia

वाह! आता करूनच बघतो ह्या उन्हाळ्यात! मस्त लिहिलंय...आणि मला फोटू पण दिसत आहेत!

अत्रुप्त आत्मा's picture

18 Apr 2017 - 9:21 pm | अत्रुप्त आत्मा

https://s19.postimg.org/buxkw6skz/IMG-20170417-_WA0001.jpg
................. http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif

पद्मावति's picture

18 Apr 2017 - 9:29 pm | पद्मावति

वाह, मस्तच.

पक्षी's picture

19 Apr 2017 - 7:35 pm | पक्षी

मस्तच, नक्की करून बघणार

जुइ's picture

20 Apr 2017 - 1:27 am | जुइ

अरे वा झक्कास. नॅचरल्सचे फक्त मँगो खाल्ले आहे. हे इथे करता येईल हे बघितले पाहिजे.

ज्यांना शहाळं आणि नारळाचा चव याच्या चवीतला फरक कळतो ते चुकूनही नॅचरल्सचं टेंडर कोकोनट खाणार नाहीत.
तुमची रेशिपी ट्राय करुन बघणेत येईल.

स्वाती दिनेश's picture

20 Apr 2017 - 11:39 pm | स्वाती दिनेश

मस्तच ग .. आवडते आइसक्रिम..
तुझी पाकृ आणि ती सांगण्याची पध्दत दोन्ही आवडले.
उन्हाळ्याबरोबरच आंबे आणि आइसक्रिम चा सिझन आला आहे हे समजतय. :)
स्वाती