निरवानिरव

रामदास's picture
रामदास in जे न देखे रवी...
8 Oct 2008 - 11:56 am

पोस्टर वरच्या तरुण यक्षीणीच्या
अप्राप्य ,
गोलगुबार स्तनांकडे
बघत बसलेला भणंग माणूस
अचानक
हातउसनं मागेल काहीतरी.
असाही मी परत येणार नाही.
*******
आडगावच्या एका फलाटावर
फतकल मारून बसलेल्या
म्हातार्‍या बैलासारखं.
माझं आयुष्य स्थिरावलं आहे.
चिरस्थायी.
**************
एव्हाना माझ्या आठवणी.
ठेवणीतल्या बुरसट वासासहीत,
ट्रंकेच्या तळाशी.
घडीघडीत विरलेली
घडी.
इथेतिथे
गंजाच्या लाल डागासहीत.
पसरत गेलेल्या आयुष्याच्या मापात
कपडे आता अडनिडे.

तशी तू समजूतदार
हवी असलेली जरीची तार.
बंदीस्त केली असशील
मनातल्या हुशार रीळावर.

दिलंच काही बोहारणीनी विनीमयात
तर चार चकचकीत डब्यांची रांग
साक्ष देईल,
टुकीनी केलेल्या संसाराची.

गुरुजी मागतील
लोकरीचा धागा
तेव्हा दे आठवणीनी
जरीच्या धाग्याचा
एक कटका तुकडा.

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

8 Oct 2008 - 12:02 pm | विजुभाऊ

आडगावच्या एका फलाटावर
फतकल मारून बसलेल्या
म्हातार्‍या बैलासारखं.
माझं आयुष्य स्थिरावलं आहे.
चिरस्थायी.

आयुष्यात स्थैर्य हवं असे आयुष्यभर म्हणणारा खरेतर स्थैर्याला भीत असतो.
स्थैर्य आले असे ज्या क्षणी वाटते त्या नन्तरचा क्षण आत्मपरिक्षणाचा असतो आणि पुढचा क्षण स्थैर्या कडुन अस्थैर्याकडे नेणारा असतो.
व्यवस्थे कडुन अव्यस्थेकडे हा सृष्टीचा नियम आहे

चतुरंग's picture

8 Oct 2008 - 7:52 pm | चतुरंग

चतुरंग

आनंदयात्री's picture

8 Oct 2008 - 12:08 pm | आनंदयात्री

दिलंच काही बोहारणीनी विनीमयात
तर चार चकचकीत डब्यांची रांग
साक्ष देईल,
टुकीनी केलेल्या संसाराची.

विनीमयात : काय बसलाय चपखल शब्द !!

अस्सल कविता !!

अवलिया's picture

8 Oct 2008 - 12:08 pm | अवलिया

गुरुजी मागतील
लोकरीचा धागा
तेव्हा दे आठवणीनी
जरीच्या धाग्याचा
एक कटका तुकडा.

क्या बात है!

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Oct 2008 - 12:30 pm | बिपिन कार्यकर्ते

क्या बात है...

विनिमय हा शब्द कधी कवितेत दिसेल असं वाटलं नव्हतं... चपखल बसलाय.

बिपिन.

बेसनलाडू's picture

8 Oct 2008 - 12:44 pm | बेसनलाडू

आवडले.
(आस्वादक)बेसनलाडू

श्रावण मोडक's picture

8 Oct 2008 - 6:16 pm | श्रावण मोडक

सवालच नाही. मुक्तछंद.

लिखाळ's picture

8 Oct 2008 - 9:27 pm | लिखाळ

उत्तम काव्य !
विनिमयाचा वापर, जरतार..सर्वच आवडले.
--लिखाळ.

केशवसुमार's picture

9 Oct 2008 - 2:23 am | केशवसुमार

भन्नाट कविता / जे काही आहे ते आवडले.
केशवसुमार..

दत्ता काळे's picture

8 Oct 2008 - 12:58 pm | दत्ता काळे

तशी तू समजूतदार
हवी असलेली जरीची तार.
बंदीस्त केली असशील
मनातल्या हुशार रीळावर.

. . . A 1

बहुगुणी's picture

8 Oct 2008 - 5:59 pm | बहुगुणी

एका सुंदर कवितेचं परीक्षण करता करता किती महत्वाचं वास्तव लिहून गेलात!

"आयुष्यात स्थैर्य हवं असे आयुष्यभर म्हणणारा खरेतर स्थैर्याला भीत असतो.
स्थैर्य आले असे ज्या क्षणी वाटते त्या नन्तरचा क्षण आत्मपरिक्षणाचा असतो आणि पुढचा क्षण स्थैर्या कडुन अस्थैर्याकडे नेणारा असतो.
व्यवस्थे कडुन अव्यस्थेकडे हा सृष्टीचा नियम आहे"

क्या बात है!

चतुरंग

स्वाती दिनेश's picture

8 Oct 2008 - 9:11 pm | स्वाती दिनेश

खरीखुरी,अस्वथ करणारी कविता!
अगदी,अगदी..
स्वाती

मुक्तसुनीत's picture

8 Oct 2008 - 8:29 pm | मुक्तसुनीत

कविता वाचताना एखादी तालेवार कविता वाचतो आहे असे वाटले. वेगवेगळ्या प्रतिमा/रूपकांचा वापर कवीच्या माध्यमावरील पकडीचा प्रत्यय देतो. अशी कविता एकाच माणसाची उरत नाही. ती तुमची आमची सगळ्यांची बनते.

आडगावच्या एका फलाटावर
फतकल मारून बसलेल्या
म्हातार्‍या बैलासारखं.
माझं आयुष्य स्थिरावलं आहे.
चिरस्थायी.

यासारख्या ओळी वाचून जी ए कुलकर्णींच्या कथांची आठवण झाली. कथा व्यक्तीमात्रांच्या, पण अनुभव प्रत्येकाचा. मला वाटते वसंत आबाजी डहाके यांचीसुद्धा बैलावरची कविता अशीच सुन्न करणारी आहे...

धनंजय's picture

8 Oct 2008 - 8:43 pm | धनंजय

भिडणारी.

दिलंच काही बोहारणीनी विनीमयात
तर चार चकचकीत डब्यांची रांग
साक्ष देईल,
टुकीनी केलेल्या संसाराची.

करावाच लागतो विनिमय, नाही का? पि.डां. यांच्या कवितेत (दुवा) आईच्या पुसट होणार्‍या स्मरणाच्या विनिमयात काही मिळवल्याशिवाय बोच कमी होणार नाही.

विसोबा खेचर's picture

9 Oct 2008 - 1:38 am | विसोबा खेचर

पोस्टर वरच्या तरुण यक्षीणीच्या
अप्राप्य ,
गोलगुबार स्तनांकडे
बघत बसलेला भणंग माणूस
अचानक
हातउसनं मागेल काहीतरी.
असाही मी परत येणार नाही.
*******
आडगावच्या एका फलाटावर
फतकल मारून बसलेल्या
म्हातार्‍या बैलासारखं.
माझं आयुष्य स्थिरावलं आहे.
चिरस्थायी.

या ओळी लै भारी...!

वा रामदासराव, सुंदर लिहिलं आहे...!

तात्या.

सहज's picture

9 Oct 2008 - 8:28 am | सहज

जे काही आहे ते आवडले. बर्‍यापैकी समजेल असा अर्थ लावू शकलो तो भावला देखील.

ही कविता "रामदास" कविता आहे नक्की. उच्च!

अरुण मनोहर's picture

9 Oct 2008 - 8:33 am | अरुण मनोहर

रामदासजी, काय भन्नाट कल्पना आहेत!

ऋषिकेश's picture

9 Oct 2008 - 10:27 am | ऋषिकेश

म्या पामराला फारसं काहि कळलं नाहि
पण काहितरी वेगळं आणि उच्च वाचतोय असं वाटलं.
माझ्यासारख्या बुद्धुसाठी कोणी रसग्रहण करेल काय?
-(बुद्धु) ऋषिकेश

विसोबा खेचर's picture

9 Oct 2008 - 10:47 am | विसोबा खेचर

पण काहितरी वेगळं आणि उच्च वाचतोय असं वाटलं.

असं वाटलं ना? अरे मग झालं तर! त्यातच आनंद मान आणि त्याचं रसग्रहण वगैरे करायच्या फंदात पडू नकोस.. :)

रामदासभाऊंची कविता मलाही आवडली. पण का आवडली हे सांगता येणार नाही...

तात्या.

पद्मश्री चित्रे's picture

10 Oct 2008 - 10:03 am | पद्मश्री चित्रे

वेगळा प्रकार, छान वाटला
>>आडगावच्या एका फलाटावर
सर्वात आवडले..

चन्द्रशेखर गोखले's picture

11 Oct 2008 - 9:31 am | चन्द्रशेखर गोखले

एक भन्नाट काव्य ! चांगली साहित्य़क्रुति वाचल्याचा आनंद मिळाला. तुमच्या साहित्यिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

अभिजीत's picture

11 Oct 2008 - 10:00 am | अभिजीत

सुखी संसाराच्या शेवटी असा वानप्रस्थाश्रम म्हणजे एक वेगळंच यश असेल ...