||कोहम्|| भाग 5

Primary tabs

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in काथ्याकूट
27 Mar 2017 - 2:26 am
गाभा: 

मागच्या भागात आपण, उत्क्रांतीच्या चक्रात मानव वंशात झालेले शारीरिक बदल पाहीले. मानवाच्या सगळ्याच प्रजाती साधारण 7/8 लाख वर्षांपासून अग्नी वापरत होत्या. त्यानंतर लवकरच त्यांना दगडी हत्यारांचा आणि ते बनवण्याच्या तंत्राचा शोध लागला. दात आणि नखं नसलेला, तुलनेने कमजोर माणूस हि दगडी हत्यारं वापरून स्वतःच पोट भरण्याचा प्रयत्न करायला लागला. इथे हे सगळे मानव वंशातले प्राणी स्वतःच पोट कसे भरत होते हे पाहणं महत्वाचं आहे.

प्रत्येक प्राणी आपल्या शारीरिक क्षमतेनुसार आपले भक्ष ठरवतो आणि स्वतःचे पोषण करतो. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा सगळ्या सजीवांच्या शरीरात अव्याहत फिरत असते. प्रत्येक प्राण्याचे अन्नसाखळीतील स्थान तो हि ऊर्जा आपल्या शरीरात कोणत्या टप्प्यावर ग्रहण करतो, आणि त्याच्या कडून हि ऊर्जा कोण काढून घेते यावर ठरते. वाघ सिंहासारखे मांसाहारी प्राणी या पृथ्वीवर आल्यापासून या अन्नसाखळीत सर्वोच्च स्थानी आहेत. हरीण, माकडं, म्हशी असे प्राणी पहिल्यापासूनच मधल्या स्थानावर आहेत. मानव हा एकमेव असा प्राणी आहे ज्याचं अन्नसाखळीतील स्थान बदललंय. माकड आणि हरिणांबरोबर लाखो वर्ष अन्नसाखळीत मधल्या स्थानी राहिल्यावर काही हजार वर्षात मानवाने अन्नसाखळीतील सर्वोच्च स्थान व्यापले, नुसते व्यापले नाही तर एकेकाळी सर्वोच्च स्थानी असलेल्या प्राण्यांसाठी आज मानव स्वतः अभयारण्य बांधतोय इतकी त्यांची परिस्थिती केविलवाणी झालीय. आणि हे सगळं घडतं असताना ना मानवाची शारीरिक ताकद वाढलीय ना त्याला नवीन प्रकारचे दात किंवा नखं आलीत. तो आहे तोच आणि तसाच आहे.
मग असं काय बदललं मानवी समाजात कि जे इतर कोणत्याही प्राण्याला कधीच जमलं नाही ते मानवाने, मानवी समूहाने करून दाखवलं? या प्रश्नाच्या उत्तराआधी आपण समाज म्हणजे काय ते समजावून घेऊ..

आपण बऱ्याचदा डिस्कवरीवर आफ्रिकन मैदानातील सिंह किंवा चित्त्याने केलेल्या शिकारीचे व्हिडिओ बघतो. बायसंन किंवा हरणांच्या मोठ्या कळपाच्या मागे हे हिंस्त्र श्वापद कधी एकटे किंवा कधी कळपाने धावतात, त्या कळपाला घेरतात. त्यातील जो कमजोर प्राणी असतो तो शिकार होतो, आणि उरलेला कळप पुढे निघून जातो. हे बघताना मला नेहमीच काही प्रश्न पडतात. बायसंन, जंगली म्हशी, अगदी झेब्रे या सारखे प्राणी जेंव्हा या शिकाऱ्यांना पाहतात, तेंव्हा पळणे हीच एकमेव नैसर्गिक प्रेरणा कशी जागृत होते? समजा सगळ्या जंगली म्हशी जर शिंग रोखून एखादं दुसऱ्या चित्त्यावर किंवा अगदी सिंहाच्या झुंडीवर चालून गेल्या तर काय होईल? दुसऱ्या बाजूला, सिंहांची झुंड एखादा प्राणी मारून का थांबते? खरंतर त्या म्हशींच्या कळपातले अजून दोन चार प्राणी, थोडीशी जास्त मेहनत घेऊन मारणे त्यांना सहज शक्य असतं, पण शक्यतो असं होतं नाही.

या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी प्राणी समूहात कसे राहतात हे पाहणं मनोरंजक ठरेल.

अगदी ढोबळपणे प्राण्यांचे दोन तीन प्रकारचे समूह आढळतात, पहिला प्रकार ज्याला आपण कीटकांची वसाहत म्हणतो तो, जसं, मधमाशांचं पोळ, मुंग्यांच वारूळ इत्यादी. या वसाहतीतले प्राणी फक्त सामाजिक दृष्ट्या नव्हे तर जैविक दृष्ट्याही संपूर्णपणे एकमेकांवर अवलंबून असतात, इतके कि मधमाशी हा प्राणी आहे की मधमाशीचं संपूर्ण पोळ हाच एक प्राणी आहे हा प्रश्न पडावा. या वसाहतीतील प्रत्येक सजीवाचा जीवनक्रम आणि त्याचं कार्य हे ठरलेलं असतं. त्यात अजिबात बदल होत नाही. राणी माशी आयुष्यभर फक्त अंडी घालते पण कधीही पिल्लांचे पालनपोषण करत नाही. नर मधमाशा फक्त संकर करतात पण कधीही पोळ्याचे रक्षण करावे अशी इच्छा त्यांना होत नाही. अशा वसाहतीतला कोणताही सजीव एकटा जगू शकत नाही. आज कंटाळा आला, आज नुसतेच फुलं बघत फिरते, मकरंद उद्या गोळा करू अशी बुद्धी कोणत्याही कामकरी माशीला होतं नाही. या सजीवांना जणू वसाहतीच्या पलीकडे आयुष्यच नसतं. आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या पेशी जसं वेगवेगळं पण नेमून दिलेलं काम करतात आणि शरीर नावाची संस्था चालवतात अगदी तसंच या मधमाश्या फक्त ठराविक काम करून पोळ हि वसाहत चालवतात, मग यात जिवंत प्राणी कुणाला म्हणावं, पोळ्याला कि मधमाशीला? वारुळाला कि वाळवीला? असो..

दुसऱ्या प्रकारचे समूह असतात ज्यांना आपण कळप, झुंड, टोळी अशा नावानी ओळखतो. या समूहातले प्राणी बऱ्याचदा एकमेकांचे रक्ताचे नातेवाईक असतात. हे सगळे मुळात स्वतंत्र प्राणी असतात जे काही खास कारणांनी आणि नैसर्गिक प्रेरणेने एकत्र आलेले असतात. बायसंनचा, झेब्र्याचा कळप एकत्र फिरतो कारण कळपात असल्यास शिकार करणाऱ्या प्राण्यांपासून वाचण्याची, आणि आपले मरण कुणा दुसऱ्याच्या नावावर ढकलण्याची संधी जास्त असते. त्यापलीकडे या कळपातील प्राण्यांचे एकमेकांशी देणं घेणं नसतं. जितका मोठा कळप तितकी जास्त सुरक्षितता त्यामुळे अश्या कळपात अक्षरशः हजारोंच्या संख्येने प्राणी असतात. कोण येतं कोण जातं, कोण जगत कोण मरत, कुणाला कुणाचा पत्ता नाही. ना त्यांचा कुणी नायक असतो ना पुढारी. दुसऱ्या प्रकारचे कळप मात्र वेगळे असतात, ह्या कळपातील प्राणी तसे संख्येने मर्यादित असतात, हत्तीचे कळप, माकडांची टोळी, रानकुत्र्यांची झुंड हि याची उदाहरण. या कळपात सामाजिक धागे घट्ट असतात. हत्तींचा कळप आपल्या समूहातील लहान पिल्लांची काळजी घेतो, मृत हत्तीच्या शरीरावर माती लोटतो. वानर संपूर्ण टोळीसाठी रखवालदारीचे काम करतो, लांडगे, रानकुत्री एकत्र ताळमेळ साधून शिकार करतात, त्या शिकारीतील वाटा लहान पिल्लांसाठी घेऊन येतात. अगदी व्यवस्थित नियमबद्ध असलेल्या, तरीही स्वतंत्र असलेल्या प्राण्यांचे हे समुदाय असतात. पण या समुदायातील प्राणी वेळ पडल्यास एकटे जगू शकतात. कधी काही कारणांनी, गरज पडल्यास एका टोळीतून दुसऱ्या टोळीतही जाऊ शकतात. पण…

हा पण फार महत्वाचा, कारण या समूहातल्या सदस्यांची संख्या ठराविकच राहते. हत्तींचा कळप 15/20 हत्तींच्या वर सहसा जात नाही, त्याहून जास्त हत्ती झाले की वेगळा कळप तयार होतो. माकडांची टोळी जास्त मोठी झाली की फुटते आणि काही माकडं दुसऱ्या टोळीत जातात. रानकुत्र्यांची किंवा लांडग्यांची टोळी जितकी मोठी तितकी शिकार मिळण्याची संधी जास्त पण तरी ती टोळी एका मर्यादेपेक्षा जास्त मोठी होतं नाही.. का?

जंगली म्हशी एकत्र येऊन सिंहाच्या टोळीवर हल्ला का करत नाहीत, लांडगे सहजपणे मिळणारी जास्तीची शिकार का सोडतात आणि आणि फक्त एक प्राणी सोडून इतर कोणत्याही प्राण्याचे कळप आपली संख्या एका मर्यादेपेक्षा का वाढवू शकत नाही या सगळ्या प्रश्नांचे उत्तर एकच आहे, पण त्या उत्तराकडे जाण्यापूर्वी आपण तो प्राणी कोणता आहे ते पाहू, जो आपला प्रचंड मोठा कळप तयार करू शकतो आणि तरीही लांडग्यांच्या किंवा हत्तींच्या कळपाइतकेच किंवा जरा जास्तच घट्ट सामाजिक धागे विणू शकतो, त्या प्राण्याला हल्ली होमो सेपियन म्हणतात. शहाणा माणूस..

हा माणूस जेंव्हा शहाणा नव्हता तेंव्हा तोही माकडांसारखाच एका छोट्याश्या टोळीत राहायचा, ठराविक काळानंतर ती टोळी फुटायची, वेगळी टोळी तयार व्हायची. अशा अनेक टोळ्या करून वेगवेगळ्या प्रजातींची माणसं राहायची. अन्न मिळवण्यासाठी, आणि ते ज्या भूभागात मिळतं त्या जागेसाठी, तिच्या हद्दींसाठी एकमेकांशी लढायची. लाखो वर्ष माणूस असा राहिला. त्याच्या जवळ आग आणि काही प्रार्थमिक दगडी शस्त्र होते पण त्या शस्त्रांनी तो अगदीच कधीतरी शिकार करू शकायचा, हि दगडी शस्त्र मुख्यतः वाघ सिंहांनी खाऊन सोडून दिलेल्या हाडांमधले मगज कोरून बाहेर काढण्यासाठी वापरली जायची. कारण कमी श्रमात आणि कमी धोका पत्करत मिळू शकणारा तो सर्वोत्तम आहार होता. पण तरीही या मानवाचे स्थान अजूनही अन्नसाखळीत मध्यवरच होते. तो अजूनही फक्त माणूस होता त्याचा शहाणा माणूस होणे अजून बाकी होतं.. आज आपण ज्याला होमो सेपियन म्हणतो, अगदी तोच माणूस अजूनही सेपियन झाला नव्हता. होमो निण्डेरथाल, होमो इरेक्टस इत्यादी भावंडांबरोबर तोही लहान लहान टोळ्यांमध्ये जंगलात फिरत होता.

आणि मग साधारण 70000 वर्षांपूर्वी अचानक ती क्रांती झाली आणि या मानवाची भाषा बदलली, हा होमो सेपियन झाला.
कोणती क्रांती, बघूया पुढच्या भागात

प्रतिक्रिया

अनन्त अवधुत's picture

27 Mar 2017 - 3:19 am | अनन्त अवधुत

हा पण भाग छान आहे.

सुंदर विवेचन. थोडे मोठे भाग टाका ही विनंती.

स्रुजा's picture

27 Mar 2017 - 6:18 pm | स्रुजा

+१

एकुण एक भाग आल्या आल्या वाचते आहे. उत्तम चालू आहे लेखमाला.

रांचो's picture

27 Mar 2017 - 8:02 pm | रांचो

+१

बरखा's picture

27 Mar 2017 - 11:32 am | बरखा

सगळे भाग वाचतिये. छान माहीती मिळतिये.

आनन्दा's picture

27 Mar 2017 - 1:52 pm | आनन्दा

लवकर टाका पुढचा भाग.

संचित's picture

28 Mar 2017 - 9:53 pm | संचित

छान जमल आहे.

मंजूताई's picture

29 Mar 2017 - 10:30 am | मंजूताई

वाचतीये! गप्पा मारतोय असं वाटावं....... फारच आवडलंय!

चौकटराजा's picture

29 Mar 2017 - 11:31 am | चौकटराजा

हा भाग खूपच काही महत्वाची माहिती तपशीलवार देत आहे. पण कोहम हे नाव व काथ्याकूट हे सदर यामुळे आमच्या सारख्या विज्ञानप्रेमी माणसाला हा धागा अध्यात्माचा असावा की काय असे वाटले. आता मात्र पहिल्यापासून सगळे भाग वाचायलाच हवेत. एक मस्त वाक्य इथे टाकतो. कोणताही जीव हा दुसर्‍याला मारत नसतो तो फक्त स्वतः ला पोसण्याचा व जवविण्याचा प्रयत्न करीत असतो.

मराठी कथालेखक's picture

29 Mar 2017 - 1:31 pm | मराठी कथालेखक

कोणताही जीव हा दुसर्‍याला मारत नसतो तो फक्त स्वतः ला पोसण्याचा व जवविण्याचा प्रयत्न करीत असतो.

या वाक्याशी असहमत. सिंह इतर सिंहाना (म्हणजे नरांना आणि अगदी पिल्लांनासुद्धा) मारुन टाकण्याचा प्रयत्न करतो ते स्वतःला पोसण्यासाठी किंवा स्वतःचा बचाव म्हणून नाही. असंच काहीस मांजराच्या (नर) बाबतही आहे. तज्ञ लोक अधिक माहिती देवू शकतील.

दीपक११७७'s picture

30 Mar 2017 - 1:13 am | दीपक११७७

उत्सुकता वाढली आहे. पुढिल भाग लवकर येवु द्या.

हा पण भाग मस्त आहे. चालू द्या.

पद्मावति's picture

31 Mar 2017 - 8:40 pm | पद्मावति

मस्तच.