डाव!!!

विद्या चिकणे मांढरे's picture
विद्या चिकणे मांढरे in जनातलं, मनातलं
22 Mar 2017 - 3:28 pm

'आज स्वाती आणि गौरवच्या घरातून खुपचं आवाज येतोय, नाही?', डोळे किलकिले करत स्वातीच्या बाल्कनीकडे बघत जोशीकाकू बोलल्या. पेपरात खुपसलेलं डोकं आणखीनच खुपसंत काका फक्त 'हुं' एवढंच म्हणाले. 'अहो नेहमीपेक्षा जास्त वाटतंय आज', नं रहावुन त्या परत बोलल्या. 'तुझं आपलं काहीतरीच असतं मला पेपर वाचू देत बऱ', पेपरचं पान बदलत काका म्हणाले. 'थांबा मी बेडरुमच्या खिडकीतून काही कळतंय का बघते.' असे म्हणत काकू बेडरूम कडे धावल्या. 'तुला फार चौकशा लागतात, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तू नको नाक खुपसू त्यात,' काका बोलले. पण काकूंनी लक्षच नाही दिलं. 'अहो घर सोडून जायचं म्हणतीये ती.' लगबगीनं काकांकडे परत येत त्या बोलल्या. 'अगं, काय बोलतेस? तू नीट ऐकलंस का? बापरे! जास्तंच झालंय वाटतं आज', काळजीच्या सुरात काका म्हणाले. काकूही काळजीत पडल्या. 'आता काय हो? असं काही घडायला नको. गोड आहेत हो दोघे. त्या तिसर्या मजल्यावरच्या रीनाचीच नजर लागली पोरांच्या संसाराला. सारखी आपली गौरव, गौरव करत असते मेली.' असे म्हणत काकूंनी रीनाच्या नावाने बोटं मोडली.' 'आपण काहीतरी करायला पाहिजे हो.' अगदी रडवेल्या होत काकू पुन्हा बोलल्या. 'हो हो, तू काळजी नको करू, अगं नवरा बायको म्हटलं की भांडणं आलीचं. आपले दिवस विसरलीस का?' असे म्हणत काकांनी डोळे मिचकावले. 'तुझं माझं जमेना अन तुझ्यावाचून करमेना, नाही का? ऐक माझं, मी सांगतो तसं कर.' असे म्हणत काका काकूंच्या कानाला लागले, आणि काहीतरी कुजबुजले.

काकूंनी धावत जाऊन गौरवच्या दारावरची बेल वाजवली. कुठेतरी जायच्या तयारीत असलेल्या स्वतीनेच दार उघडलं. 'बाहेर निघालीयेस का कुठे?' असे म्हणत काकूंनी गौरव आजूबाजूला आहे कि नाही, याची चाचपणी केली. 'हो काकू, पण....तुम्ही बोला ना, काही काम होतं का ?', अडखळत आणि काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत स्वाती बोलली . 'अगं काही नाही, मला बऱ वाटत नाहीये. उतारवय दुसरं काय, नाही का? यांची फार अबाळ होते आहे गं खाण्याची. त्यात आपली कामवाली गेलीये गावी, ती थेट परवाच येणार. जरा दोन दिवस यांच्या जेवणाचं बघशील का? तुला तर माहीतच आहे, यांना बाहेरचं काही चालत नाही, म्हणून आले होते तुझ्याकडे. पण....तू बाहेर निघालीयेस....जा तू, मी करते काहीतरी....' असे म्हणत काकूंनी पाठ फिरवली. स्वातीने क्षणभर विचार केला आणि काकूंना म्हणाली, 'मी टूरवर जाते तेव्हा गौरवच्या खाण्याची किती काळजी घेता तुम्ही. केवढं करता आमच्यासाठी, अगदी घरच्यांसारखं. काकू, थांबते मी दोन दिवस. आपली कामवाली आल्यावरंच जाईन. तेवढंच जाता जाता तुमच्या उपयोगी पडल्याचं समाधान मिळेल.' 'जाता जाता, म्हणजे गं?', काकूंनी आश्चर्याने विचारले. 'काही नाही काकू, नशीब म्हणायचं आणि सोडून द्यायचं, तुमच्या सारखं आमचं थोडीच ए, चाळीस बेचाळीस वर्षांचा संसार वगैरे, इथे वर्षभरातच एवढे इशुज.' स्वाती पुटपुटली. 'अगं यांच्या औषधाची वेळ झालीये, मी जाते आणि मीही आराम करते जरा.' असे म्हणून, तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत, काकू कधी निघून गेल्या हेही तिला समजले नाही. भानावर आली आणि दार लाऊन घेत किचनकडे वळली. सहा वाजले होते आणि काकांना सातलाच जेवण लागतं हे तिला माहित होतं, म्हणून घाई करायला लागणार होती. विकेंड म्हणजे, गौरव नेहमीप्रमाणे कुठेतरी बाहेर जाण्याचा हट्ट धरणार आणि आणलेली भाजी खराब होणार, असा विचार करून काल ऑफिसमधून घरी येताना तिने भाजी आणलीचं नव्हती. चप्पल सरकवली पायात आणि झरझर गेली भाजी आणायला.

एवढं सगळं रामायण चालू असताना खुद्द राम मात्र बसला होता, बेडरुममध्ये कानाला हेडफोन लावून. शंकरचं ब्रेथलेस आणि त्याच्या डोक्यातले विचार दोन्ही एकाच वेगाने धावत होते जणू. भांडण झालं की गाण्यांच्याच जगात रमायचा नेहमी, आजही त्याने तेच केले. कितीतरी वेळ तसाच गेल्यावर, चहा तरी पिऊया बऱ वाटेल असे म्हणत त्याने कानातले हेडफोन्स काढून बेडवर टाकले आणि किचनमध्ये आला. किचनमध्ये पडलेल्या पसार्याकडे पाहून, खाली टपरीवर जाऊया आणि मस्त कटिंग मारुया, असा विचार करून तो निघाला. पायाखाली आलेल्या रुमालाच्या घडीने या वीकेंडचा कपडे धुण्याचा कार्यक्रम अजून झाला नाहीये आणि साफसफाई सुद्धा राहिलीये याची आठवण करून दिली. अरे बापरे! म्हणजे आधी कपड्यांची मशीन लावा-ते वाळत घाला-इस्त्रीला द्या-आणा, एवढं सगळं केल्यावर, मग सोमवारी स्वच्छ कपडे मिळतील घालायला. त्यानंतर तो किचन ओटा आवरायचा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवण बनवायचं. आणि हो, घर आवरायचं ते अजून वेगळंच. एका मागोमाग एक कामांची यादीच दिसायला लागली डोळ्यांसमोर. "छोडो ना यार! चहा मारून येऊ मग बघू", असे म्हणत दाराला कुलूप लावलं आणि चहाच्या टपरीवर आला. आज दोन कटिंगऐवजी एकाचं कटिंगची ऑर्डर देताना अडखळला जरासा, पण मग स्वतःला सावरत, एक कटिंग घेऊन कट्ट्यावर बसला. स्वातीला इथला चहा खूप आवडायचा, अगदी कुठेही गेले फिरायला तरी चहाला मात्र इथेच यायचे दोघे. वरून कितीही दाखवलं कि, मला काही फरक नाही पडत, तरी मनाला बांध घालणं जमत नव्हतं. आता मात्र तिच्या आठवणीने कासावीस झाला, दोघांनी एकत्र घालवलेले क्षण एकामागोमाग एक नजरेसमोर उभे राहिले. चहाचा घोट आणि आठवणींचा आवंढा एकत्रच गिळला, डोळ्यांत तरळलेलं पाणी कसंबसं लपवत घरी निघाला. पण पावलांना घरी जायची अजिबात घाई नव्हती. घरी स्वातीच्या आठवणी चहूबाजूंनी पिंगा घालतील अशी भीती असावी त्यांना कदाचित.

भाजीवालीच्या टोपलीत पहुडलेल्या कडू कारल्यांनी स्वातिच्याहि मनात आठवणींची रुंजी घालायला सुरुवात केली. "कित्ती आवडतं कारलं गौरवला! कारल्याची भाजी केली कि, त्या भाजीबरोबर बोटंही खाईल कि काय, असं वाटतं. आणि शेवयांची खीर केल्यावर, मग तर विचारायलाच नको, अगदी मांजरासारखी चाटून खातो वाटी. तरीही कटकट नाही करत कधी, हेच कर तेच कर वगैरे. ताटात येईल ते खातो निमुटपणे." विचार करता करता एक गोड हसू नकळत ओठांवर आलं आणि बरंच काही सांगून गेलं. पाटीतल्या कारल्यांनी पिशवीत आणि गौरवच्या आठवणींनी मनात जागा पटकावली.
घरी परत यायला निघाली अन वाटेत जोशी काकू भेटल्या, पिशवीतून डोकावणाऱ्या कारल्यांना पाहून नुसत्याच हसल्या. 'असा डाव साधलात होय काकू!' असे मनाशीच म्हणत स्वातीही हसली आणि काकूंना 'येते' म्हणत निघून गेली. 'डाव मी नाही, तुझ्या मनाने साधलाय', स्वातीच्या पाठमोर्या आकृतीकडे पहात काकू म्हणाल्या.....

कथालेख

प्रतिक्रिया

एस's picture

22 Mar 2017 - 3:46 pm | एस

:-)

चिनार's picture

22 Mar 2017 - 4:07 pm | चिनार

छान !

कैलासवासी's picture

22 Mar 2017 - 4:21 pm | कैलासवासी

छान आहे कथा.

इरसाल कार्टं's picture

22 Mar 2017 - 4:32 pm | इरसाल कार्टं

सहज सुंदर

ज्योति अळवणी's picture

22 Mar 2017 - 8:46 pm | ज्योति अळवणी

सहज, साधी आणि सुंदर कथा