महत्वाची सूचना

नमस्कार,
मिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.

दृष्टीकोन

Primary tabs

फुत्कार's picture
फुत्कार in जे न देखे रवी...
16 Mar 2017 - 9:10 pm

नेत्रभिंग बसवले नवीन, पण कोन तोच दृष्टीचा,
वैद्यकीय प्रगती अफाट, उपयोग काय हो त्याचा !

लांबले आयुष्यमान, भर शून्य कर्तुत्वाचा,
तगले जीव अनेक, उपयोग काय हो त्याचा !

जल, रस्ते, हवाई मार्गे, आक्रसला भूगोल जगाचा,
वेळ नाही घरी थांबायाला, उपयोग काय हो त्याचा !

वसविली आडवी नगरे, गाठला कळस उंचीचा,
निसर्ग नाहीसा केला, उपयोग काय हो त्याचा !

लडबडला, मग गडबडला, भाव अहो तेलाचा,
अर्थशास्त्रात खुलासे अनेक, उपयोग काय हो त्याचा !

महागाई आली गेली, झगडा चालूच आयुष्याचा,
सुगी जगाच्या बाजारी, उपयोग काय हो त्याचा !

उपसुनी खनिजं बेसुमार, गल्ला भरती बाजाराचा,
मिटे ना दारिद्र्यरेषा, उपयोग काय हो त्याचा !

खुळखुळे पैसा हातात, संपे न हव्यास सुखाचा,
खुळखुळा होई जीवाचा, उपयोग काय हो त्याचा !

आधी शोध शून्याचा, आता वेध अनंताचा
जगाच्या लोकसंख्येला, उपयोग काय हो त्याचा !

उमज ना सारासार, तरी हक्क असे मतदानाचा,
लोकशाही भले हीss मोठ्ठी, उपयोग काय हो त्याचा !

मानवी व्यवस्थांचा ऊत, त्यात विवेक नाही साचा,
गीतेचे सार अनेक, उपयोग काय हो त्याचा !

[टीप: विंदा करंदीकर यांच्या ‘उपयोग काय त्याचा’ ह्या कवितेवरून सुचलेली कविता]

कविता