बाकडं...

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
4 Oct 2008 - 2:03 am

लोकसभेत `नोट फॊर व्होट' प्रकरण झालं, तेव्हापासून `बाकडं' माझं डोकं पोखरतंय...
म्हणजे, प्रत्येक माणसाचा एकएक स्वभाव असतो. पण, तो त्याचा मूळचा स्वभाव नसतो. तो कुठे बसतो, त्यावर त्याचा स्वभाव अवलंबून असतो, असं त्या दिवशीपासून माझं ठाम मत झालंय.
कारण, त्या प्रकरणानंतरचा लालकृष्ण अडवाणींचा चेहेरा मला आजही जसाच्या तसा आठवतोय.
बाकड्याचा परिणाम. दुसरं काय?
लोकसभेत विरोधी बाकांवर बसलं, की आपोआपच व्यक्तिमत्वावर पराभूतपणाचा ओशाळा अंमल चढतो, अशी त्या दिवशीच्या त्यांच्या चेहेयावरून माझी खात्री झालीय.
सत्ताधारी बाजूच्या, शेवटच्या रांगेतल्या बाकड्यावरला, कधी सभागृहात तोंडही न उघडलेला, तो अनोळखी खासदार मात्र, त्या दिवशी कसा खुशीत दिसत होता?
...बाकड्याचाच परिणाम!
तर, तेव्हापासून हे बाकडं माझ्या डोक्यात घर करून बसलंय.
आज त्यानं डोकं वर काढलं.
`मी जर वर्गात समोर बसलो, तर, मीपण पोरांसारखाच वागेन, अशी मला भीती वाटते’... पत्रकारितेच्या वर्गाला शिकवणार्‍या माझ्या एका सहकार्‍यानं वैतागलेल्या सुरात मला सांगितलं, आणि मला राहवेना. काय झालं, ते कळल्याशिवाय मला चैन पडणार नव्हतं.
`अरे, काय कलकलाट करतात ती मुलं... एवढी मोठी झाली, तरी, सारखं `गप्प बसा' म्हणून दामटावं लागतं रे... त्यातली एकदोघं तर शिक्षक आहेत. नोकरी करतात. पण इथे आल्यावर, समोरच्या बाकांवर बसली, की मुलांसारखीच कलकल करतात. त्या बाकड्यांचाच गुण असला पाहिजे हा...' तो आनखीनच वैतागल्या सुरात बोलला, आणि विरोधी बाकावर सुन्न, पराभूत चेहेरा करून बसलेले अडवाणी माझ्या डोळ्यांसमोर दिसू लागले.
आणखी काही दिवस मागे गेलो, तर देशाचे उपपंतप्रधान, आत्मविश्वाच्या सुरात बोलणारे अडवाणी आठवले.
आणि, `बाकडे' हा माणसाच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पाडणारा महत्वाचा घटक आहे, ह्याबद्दल माझी खात्री झाली...
मागे एकदा चर्चगेटच्या एका कॊलेजात एका कार्यक्रमाला गेलो होतो, तेव्हा गर्दीमुळे खुर्ची मिळाली नाही म्हणून बाजूच्या रिकाम्या वर्गात एका बाकड्यावर बसून भाषणं ऐकत होतो. बसल्याबसल्या बाकड्याच्या पुस्तकं ठेवायच्या कप्प्यात हात फिरवला, आणि हाताला एक टाचणी लागली.
माझे कान बाजूच्या हॉलमधल्या भाषणाकडेच होते.
खूपच चांगलं बोलत होता तो वक्ता. मी तल्लीन होऊन ऐकत होतो...
भाषण संपलं, आणि टाळ्या वाजवण्यासाठी मी हात वर घेतला, तेव्हा हातातली ती टाचणी नकळत बाजूला ठेवली गेली.
हे सगळं अगदी सहजपणे घडत होतं...
टाळ्या वाजवून मी उठायच्या तयारीत होतो, तेव्हढ्यात माझं लक्ष त्या बाकड्याकडे गेलं.
भाषण ऐकताऐकता जुन्या सवयीनं आपलं काम केलं होतं.
हातातली टाचणी बाकड्यावर `चालली' होती.
माझ्या थोड्याश्या वेळाच्या तिथं बसण्याच्या खाणाखुणा नकळतपणे बाकड्यावर माझ्या `नावानिशी' उतरल्या होत्या.
शाळाकॉलेजात असताना मला बाकड्यावर नाव कोरायची सवय होती.
पण त्याला आता खूप वर्षं झालीत.
तरीही, त्या दिवशी कॉलेजचं बाकडं आयतं समोर आलं, आणि आपोआप नाव कोरलं गेलं.
माझ्या नकळत मी पुन्हा विद्यार्थी झालो होतो.
... बाकड्याचाच परिणाम!
हे आठवलं, आणि, `शाळेच्या बाकावर बसलो, तर आपण पुन्हा मूल होऊ’, ही त्याची भीती खरी ठरेल, अशी भीती मला वाटली.
त्याचे ते शब्द काही केल्या कानातून जात नव्हते.
तशातच मी स्टेशनवर आलो.
फलाटावर नेहेमीसारखीच तोबा गर्दी होती.
लांबूनच गाडी येताना दिसली आणि सगळी गर्दी सावज पकडायला शिकारी जसा सज्ज होतो, तशी झाली.
गाडी पुरती थांबायच्या आतच सगळ्या खिडक्या भरल्या होत्या...
गडीच्या बाकावर खिडकीशी बसलेला प्रत्येकजण, पराक्रम गाजवल्याच्या विजयी मुद्रेनं थांबलेल्या गाडीत चढणार्‍या प्रत्येकाकडे पाहात होता.
मला बाकड्यावरची खिडकीची जागा पकडता आल्याने, मीही तेच करत होतो...
काही सेकंदातच गाडी बर्‍यापैकी भरली.
कुठेकुठे एखाददुसरी चौथी सीट शिल्लक होती.
जरा वेळात एक सुटाबुटातला माणूस डब्यात शिरला.
पॆसेजमधूनच त्यानं कुठे जागा आहे का, याचा अंदाज घेतला.
एक चौथी सीट रिकामी दिसताच त्याचा चेहेराही उजळला.
आणि बाकड्यावरच्या तिघांना सरकायला सांगून, जमा झालेल्या कोपर्‍यावर तो कसाबसा टेकला.
गर्दी वाढतच होती.
गाडीनं शिट्टी दिली, आणि ती थोडीशी हलली, तेवढ्यात दोनचार जणांनी धावत येऊन गाडी पकडली, आणि सुटकेचा सुस्कारा टाकत तेही आत आले.
गर्दीतच तेही जागेचा अंदाज घेत होते.
अचानक त्यांचं लक्षं चौथ्या सीटवरच्या त्या सुटाबुटातल्या माणसाकडे गेले, आणि ते निमूटप्णे मागे वळून पॆसेजमध्ये उभे राहिले.
त्या माणसानंही त्यांना पाहिलं होतं बहुधा.
त्याच्या ऑफिसातले, त्याच्या हाताखालचे लोक असावेत ते.
इतका वेळ चौथ्या सीटवरल्या कोपर्‍यातही आनंदात बसलेल्या त्याचा चेहेरा एकदम उतरल्यासारखा झाला.
मिनिटभरानं तो तिथून उठला, आणि सरळ उभाच राहिला.
बाकड्यावरच्या कोपर्‍याच्या जागेचा परिणाम.
मी बाकड्याचाच विचार करत होतो...
नुसतं बाकडंच नाही, तर त्यावर बसायला मिळालेली जागादेखील, माणसाचं व्यक्तिमत्व बदलून टाकते, याचा पुरावाच मला मिळाला.
...माझं स्टेशन येताच मी गाडीतून उतरलो आणि स्टेशनाबाहेर येउन बसच्या रांगेत उभा राहिलो...
एक बस सोडल्यावर नंतरच्या बसमध्ये बसायला जागा मिळाली.
बस भरली, तेव्हा उभ्यानं प्रवास करणारी, अगोदरच थकलीभागली माणसं मला आणखीनच केविलवाणी वाटत होती.
मी आजूबाजूच्या बसलेल्या लोकांवर सहज नजर फिरवली.
खिडकीत बसलेले, बाजूच्या प्रवाशापेक्षा जास्तं फ्रेश आहेत, असं मला उगीचच वाटलं.
बाकड्याचा परिणाम....!
मग बस चालत असताना मी वेगवेगळ्या ठिकाणची बाकडी आठवू लागलो.
मंत्रालयात मंत्र्याच्या दालनाबाहेरच्या बाकड्यावर बसून, मंत्र्याच्या भेटीसाठी ताटकळणारी माणसं मला आठवली.
डॊक्टरच्या दवाखान्यात, आपला नंबर येण्याची वाट पाहात बाकड्यावर बसलेले पेशंट माझ्या डोळ्यासमोर दिसू लागले.
कोर्टातल्या बाकड्यांवर बसलेल्या माणसांच्या मनावरचं दडपण त्याच्या चेहे-यावर उमटलंय, असं मला उगीचच दिसू लागलं.
...आणि, मंत्रालयातून, दवाखान्यातून, कोर्टातून आपापली कामं आटोपून घरी परतून, घरातल्या बाकड्यांवर बिन्धास्तपणे, ऐसपैसपणे बसलेली माणसंही माझ्या डोळ्यांसमोर दिसू लागली.
एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है’... असा एक नाना पाटेकरचा डायलॊग असल्याचं कधीतरी ऐकलं होतं.
एक बाकडंसुद्धा भल्याभल्यांचा नक्षा उतरवतं...
तुम्हाला काय वाटतं?

http://zulelal.blogspot.com

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

4 Oct 2008 - 5:21 am | प्राजु

एका अतिशय साध्या पण दैनंदिन जीवनातला अविभाज्य घटक असलेल्या बाकड्यासारख्या विषयावर अतिशय सुरेख ललित आहे असंच मी म्हणेन.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

4 Oct 2008 - 7:57 am | शितल

लेख वाचुन शाळेतील,कॉलेज मधील आठवणी जाग्या झाल्या.
माझ्या मैत्रीणीला आम्ही चिडवायचे तीला बाकडं दिसल कि झोप यायची. :)

विसोबा खेचर's picture

6 Oct 2008 - 11:06 am | विसोबा खेचर

एक बाकडंसुद्धा भल्याभल्यांचा नक्षा उतरवतं...
तुम्हाला काय वाटतं?

क्या बात है! सुंदर लेख....!

आपला,
(शाळेतलं अर्धअधिक आयुष्य बाकड्यावर उभं राहण्यात गेलेला) तात्या.