अंगारा

शब्दानुज's picture
शब्दानुज in जनातलं, मनातलं
7 Feb 2017 - 12:35 am

"अरे मोहित, जरा सांभाळून. फाडतो का आता तो नकाशा ?" "तू गप रहा रे तेज्या. आज काहीही करुन फायनल करुन टाकू कुठ जायचं ते....हा.. हे बघ" नकाशात छत्तीसगड राज्यातील कुठल्या तरी गावावर मोहितने अखेरीस शिक्कामोर्बत केले.

मी , मोहित आणि गजानन आम्ही तिघे लंगोटीयार. दरवेळेसच्या सुट्टीत एखादा अनोळखी गाव फिरुन येणे हा आमचा छंद. नेहमीचीच जगप्रसिदध ठिकाण पाहिण्यापेक्ष्ा वेगळं काहीतरी करावं म्हणून हा खटाटोप.

"कुठल आहे रे गाव ?" इति गजानन.
"महोज गाव आहे हे छत्तीसगडमधलं. बघू तिथे काय काय पहायला भेटतय ते. आणि आजच घरी सांगून ठेवा. परवा निघू आपण. मी जवळचं स्टेशन बघून टिकीटस काढून ठेवतो. हे घे तेज्या तुझा नकाशा. बॅगेत टाक. तिथे लागेल."

ठरल्याप्रमाणे आम्ही स्टेशनवर पोहचलो. त्या महोजगावापासुन जवळच्या डोयपुर स्टेशनपर्यंत आम्ही अर्थात रेल्वेने आणि पुढे आमच्याजवळच्या सायकलीने जाणार होतो. सायकल रेल्वेत ठेवण्यासाठी लागणारी कागदपत्र्े भरुन आम्ही शेवटी स्थानापन्न झालो.
हे सगळ होईपर्यंत आमच्या आया एकमेकिंना आपलं कार्ट कसं वाईट आहे हे पटवून देत होत्या. तर दुसरीकडे नोटबंदीनंतरची अर्थव्यवस्था ह्यावर आमचे बाबा गंभीर चेह-याने चर्चा करत होते. थोड्याच वेळात रेल्वेने शिट्टी दिली आणि आमचे आईबाबा आमच्याकडे वळाले

" जपुन जा. अनोळखी गावी जाता हट्टाने. नाही ती शिंग फुटली ना आता तुम्हाला. फोन करा पोहचला की .. " यासारखे ठरलेले संवाद आळीपाळीने आम्ही एकले. तेच ते संवाद. अगदी तोंडपाठ झाले होते आम्हाला. आजचेच नाही , तर रोज अगदी सकाळी उठल्यापासुन झोपेपर्यंत कुठले वाक्य कधी येणार हेही आता माहित झालेले होते. मी नुसताच हूं , हुं करत होतो. चार वेळा हा जप झाला आणि रेल्वे हलली.

एखाद्या सिनेमातल्या गोष्टीप्रमाणे समोर 'कोणीतरी' असेल ही आशा केव्हाच धूळीला मिळाली होती. एक म्हातार जोडप आमच्या समोर बसलं होतं. गाडी सुरू होतात म्हाता-याने बिस्कीट पुडा काढला. आमच्या तिघांच्या नजरा त्याच्याकडे लागल्या होत्या. आमच्या नजरेची पर्वा न करता त्याने ते तोंडात टाकले.
"सोगका डा तुसका" अस काहीतरी ती म्हातारी बोलली. एकटेच काय खाताय , त्या पोरांना द्या ना खायला असं काहीसं ती म्हणाली असावी. उत्तरादाखल त्या म्हाता-याने आणखी एक बिस्कीट काढले ; पण आमच्याएवजी ते बिस्कूट म्हातारीच्या हातावर टेकवले. त्या म्हातारीच्या वाक्याच्या अर्थ पोरांना बिस्किट द्या असा नसून मला स्वताःला बिस्कीट द्या असा होता याची अपमानजनक जाणिव झाली.
आता बदल्यासाठी गजाननने बॅगेतले किमचे बिस्कीट काढले. म्हाता-यापुढे दोन वेळा नाचवून तोंडात टाकले.म्हातारा ते बघून हसला. म्हातारी मात्र नाक मुरडून बाहेर बघू लागली.

तिकडे बाहेरच्या परिसराला निसर्ग म्हणणे आमच्या जिवावर आले होते. नुसतेच वाळेळेले पिवळं गवत
वा-यासोबत डुलत होते. हा बाहेरचा वारा तोच काय आमच्या उकाड्यावरचा उपाय होता. रेल्वेच्या पंख्याने अर्ध्या तासातच मान टाकली होती. बाहेरुन वा-याचा झोत आला की चक्कर आल्यासारखा दोन तीन चकरा मारायचा आणि पुन्हा त्याचे गतप्र्ाण स्थितीत आगमन व्हायचे.
समोरच्यांना मराठी कळत नाही एवढा अंदाज आम्हाला आला होता. त्यामुळे आम्ही 'पाहिजे त्या' विषयावर बोलू शकत होतो. अशा गप्पांमद्धये एक दिवस उलटला.
डोयपुर स्टेशनला अजुन एक दिवसाचा अवकाश होता. हेडफोन घालून सगळी गाणी एकून झाली होती. एकुणच प्रवास आता कंटाळवाणा झाला होता. एकदाचे ते डोयपुर स्टेशन आले आणि आपापल्या बॅगा खांद्यावर लटकवून आम्ही उतरलो.
उतरल्यावर आम्हाला त्या म्हाता-याने आम्हाला चक्क टाटा केला आणि 'जपुन जावा रे' असा शुद्ध मराठीत उपदेशही देऊन टाकला.
गजानन आणि मोहित रेल्वेतून सायकल काढून आणायला गेले. मी आपण त्या म्हाता-यासमोर काय काय बोलून बसलो हे आठवत राहिलो. का कोणास ठाऊक पण त्याचा जपुन जावा हा उपदेश मला पुढच्या अशुभाची जाणिव करुन देणारा वाटला.
" तेज्या .." मी एकदम भानावर आलो. "आपण आज इथल्या कुठल्यातरी लॉजमद्धये मुक्काम करूयात आणि सकाळी महोजकडे निघू " सायकलवर आपापली बॅग टाकून आम्ही निघालो. स्टेशनच्या जवळच आम्हाला एक
ब-यापैकी लॉज भेटले. आत रुममद्धे पोहचताच बेडवर आडव पडावसं वाटत होतं. एवढ्यात आईचा फोन वाजला. आम्ही सुखरुप पोहचलो की नाहि याची चिंता लागुल राहिली असणार तिला. आता ह्यात सांगण्यासारखे काही आहे का , पण एकतील ते घरचे कसले! "पोहचलात ना रे व्यवस्थित ?""हो आई , मघाशिच पोहचलो. इथं लॉजवरही उतरलो आम्ही."" ठिक आहे. का कुणास ठाऊक रे यावेळेस जरा जास्तच काळजी वाटते आहे. जरा जपुन जा" "हो आई! उद्या महोजला पोहचलो की करतो फोन" एवढच बोलुन मी बेडवर अंग टाकले.

दुस-यादिवशी सकाळीच आम्ही महोजकडे निघालो. दोन अडीच तासात आम्ही पोहचू असा आम्हाला अंदाज होता. इथून काहीसा जंगलाचा भाग चालू होत होता. नक्की कोणत्या मार्गाने जायचे हे आम्हाला ठाऊक नव्हते. कोणाला विचारावे , तर या भागात कोणालाही मराठीचा गंध नाही. अश्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणून मोहित कंपास घरी विसरुन आलेले. वर सुर्याकडे बघून आम्ही आमची दिशा ठरवली.
अर्ध्यातासानंतर आमच्या लक्ष्ात आले की वस्तीपासुन दुर चाललो आहोत. आजुबाजुला सगळीकडे जंगलच होते. कदाचित आम्ही रस्ता चुकलो होतो. आम्ही आमच्या सायकली रस्त्याच्या बाजुला घेतल्या. आम्ही थांबताच बाजुच्या झाडीतुन दहाबारा लोक बाहेर आले.
सगळ्यांचीच तोंडे झाकली गेली होती. आणि हातात बंदुके! मग आमच्या लक्ष्ात आले की आम्ही छत्तीसगडमधल्या नक्षलवाद्यांच्या हातात सापडलो आहोत.
आम्हाला ह्या गोष्टी लक्ष्ात येईपर्यंत त्यांनी आमचे सामान हिसकावुन तपासु लागले. आमच्या दुर्देवाने माझ्या बॅगेतला नकाशा सापडला. त्यावर
ब-याच खाणाखुणा केलेल्या होत्या. त्यांना आमच्यावर संशय येण्यास तेवढे कारण पुरेसे ठरले. वाचा जाणे म्हणजे काय याचा पुरेपुर अनुभव आला.
आमचे मोबाईल घेऊन बंद करण्यात आले आणि तिघांना हाताला धरुन आत जंगलाकडे नेण्यात आले. विरोध करण्याचा काही संबंधच नव्हता. जंगलामद्दये एक कच्च्या रस्त्यावर जिप उभी होती. आमच्या तोंडावर कापड बांधण्यात आले आणि आमचा एक नवीनच प्रवास चालू झाला.

प्रवासामधल्या अशुभ शकांचे रुपांतर आता अतिशय थरारक वास्तवात झाले होते.तोंडावर बांधलेल्या काळ्या कापडाप्रमाणेच मनही काळोखात बुडाले होते. भितीचे सर्वोच्य शिखर आम्ही अनुभवत होतो.
दिड एक तासानंतर आमची गाडी थांबली. तिघांनाही एका झोपडी वजा घरात नेण्यात आले आणि चेह-यावरचं कापड हटवण्यात आले.

"सुकटु के गजमा . नाकी तु गसदे" अस काहितरी कानावर पडले. एक थोराड चेह-याचा माणुस दटावून आम्हाला काहीतरी विचारत होता. " हमने कुछ नही किया छोडो ना हमे. आम इन्सान ही हे तो. " आमच्यातला गजानन त्यातल्या त्यात धीट निघाला.
"आम आदमी ? आम आदमी क्या मॅप लेके घुमता है क्या ? पुलिस का आदमी हो तुम. हमारी जानकारी के लिए इस इलाके मे घुसा. "
"नही. हम तो खालि ..खालि घुमने आया था. स्डुडंट है हम. रास्ता खो गये थे " आता मोहितलाही जरा जोर आला.
" वो हम देख लेगा. याद रखो जंगल के काफी अंदर हो तुम. अगर भागनेई कोशिश की तो जान से हात धो बैठोगे."
अस बोलुन धाडकन दरावाजा लावुन गेला.
इकडे मला एकदमच गरगरल्याप्रमाणे होऊ लागल. पुढच्याचक्षणी मी धाडकन जमिनीवर बेशुद्ध पडलो.
.
.
"काय झाल बाळ तुला ? बर आहे ना आता " तोंडावर मारलेले पाणी पुसत मी समोर बघितल. पाणीदार डोळ्याचा एक माणूस माझ्यासमोर बसला होता.
मी आजुबाजुला पाहिल तर मी त्याच खोलित होतो. गजानन आणि मोहित टक लावून माझ्याकडे पहात होते.

कोण असेल हा माणूस ? आणि ह्या भागात एवढ चांगल मराठी बोलणारा माणूस आला कुठुन ? मी बुचकळ्यात पडलो.
क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

ट्रेड मार्क's picture

7 Feb 2017 - 12:42 am | ट्रेड मार्क

क्रमशः वाचल्यावर बरे वाटले.

एस's picture

7 Feb 2017 - 9:17 am | एस

वाचतोय. मध्यंतरी महाराष्ट्रातली काही पोरे सायकलभ्रमंती करताना नक्षलवाद्यांच्या तावडीत सापडली होती. बऱ्याच दिवसांनी त्यांची सुटका करण्यात यश आले होते. त्यावर आधारित असावी ही कथा. पुभाप्र.

स्पॉयलर अॅलर्ट तरी टाकायचात.

आता त्या घटनेविषयी वाचतो.
:-(

गवि's picture

7 Feb 2017 - 9:44 am | गवि

थरारक कथानक आणि रंजक शैली.

पुढचा भाग लवकर येऊद्या.

पैसा's picture

7 Feb 2017 - 11:32 am | पैसा

वाचताना जीव घाबरला होता. शेवट 'कथा' वाचून हुश्श झाले!

सस्नेह's picture

7 Feb 2017 - 12:49 pm | सस्नेह

भारी सुरुवात !
पुभाप्र.

फेदरवेट साहेब's picture

7 Feb 2017 - 1:06 pm | फेदरवेट साहेब

बाबाऊ काय ते मिपा अन काय संस्थळाचा लोकसंग्रह. आमच्यासारखी चाकरमानी आयुष्यात अगदी इमॅजीन सुद्धा करणार नाहीत असला अनुभव आहे हा. पुढील भाग लवकर येउद्या

(थरार अनुभवणारा ऑफिस बॉय) फेदूदा

जव्हेरगंज's picture

7 Feb 2017 - 10:53 pm | जव्हेरगंज

रोचक!

Snow White's picture

7 Feb 2017 - 11:35 pm | Snow White

छान सुरुवात...

आदूबाळ's picture

8 Feb 2017 - 2:16 am | आदूबाळ

लय भारी. पुभाप्र!

रेल्वेतल्या म्हाताऱ्याचं पुनरागमन होणार काय?

यशोधरा's picture

8 Feb 2017 - 7:48 am | यशोधरा

तेच वाटतंय!

आदूबाळ's picture

8 Feb 2017 - 2:37 pm | आदूबाळ

:) चेखॉवची बंदूक!

संजय पाटिल's picture

8 Feb 2017 - 1:18 pm | संजय पाटिल

चांगली सुरवात..
पु.भा.प्र....