"लका तुला सांगती, हीतं झिट यीती काम करायला. आन ही म्हातारं कदी शेतावर सोड घरीबी येत न्हाई. आता ह्या येवढ्या उनात येकल्या बायनं किती करायचं?"
सुमात्त्यानं चिरकुटात भाकऱ्या बांधल्या. कांद्याची हिरवीगार पात पिशवीत टाकत म्हणाली. "आन ही आवदसा बघावं तवा उंबऱ्यात बसल्याली आसती."
हरीभाऊनं जरा घाबऱ्यानं भाईर बघितलं. राधाक्काला काही ऐकू गेलं तर उगाच पराचा कावळा नको.
"मी काय भीती काय तिला. वाटुळं केलंय भवानीनं माझं"
"आसं, आसं म्हणू नगा सुमात्त्या. संसार मनलं की चालायचंच. हितं कुणाला सुख म्हनून लागून राहिलंय सांगा बरं?"
"तिला लागलंय बग. दारात बसून नुसती नटती आयघाली. आता ही काय वय हाय कारं नटायचं?"
सुमात्त्या एकदा सुरु झाली की थांबायचं नाव घेत नाही. बाई वंगाळ बोलती. विंचू डसावा तसं तिचं बोलणं डसतं. पण कधीतरीचं. ऐन दुपारी टकुरं दुखाय लागल्यावरंच तिला तिच्यातली सोशिक बाई आठवते. आंब्याची मोहरलेली सावलीसुद्धा तिला नकोशी वाटते.
दोन घरं. एक बंगलाच म्हणायला पाहिजे असं. पण ते तिचं नाही. तिचं घर साधं. ऐपत बघून बांधलंय असं वाटण्याजोगं. बंगल्याला अगदी चिटकूनंच. गाईम्हशींचा मोठ्ठा गोठा सुमात्त्याच्या वाटणीचा. प्रशस्त बंगला आख्खा राधाक्काच्या मालकीचा. तो तिचा हक्क होता. त्यातच ती लहानाची मोठी झालीय.
जांभळाच्या झाडाखालून जाताना हरीभाऊ जरा अडखळला. बऱ्याच दिवसांनी त्याला बंगल्याच्या पाठीमागच्या पायऱ्यांवर बसलेली राधाक्का दिसली. सुरकुतलेल्या चेहऱ्यावरच्या जाळ्यात बाई अडकलेली दिसत होती.
"कसं चाललंय राधाक्का?"
"बरं चाललंय की. गावात चाल्ला काय?" पान खाऊन बोलावं तसं राधाक्का बोलत होती. बहुतेक तिनं ओठांना लाली लावली असावी.
"व्हय. भानुदासच्या भाकऱ्या दिल्यात वैनीनं. घीऊन चाल्लुय."
"बरं" राधाक्कानं सुपारीचं खोंड तोंडात टाकत म्हटलं. "यी कधी च्या प्यायला"
सायकलचं स्टँड काढून हरीभाऊनं शिटावर उडी घेतली. लोकांच्या घरचा तमाशा बघनं त्याला काही नवीन नव्हतं. सटरफटर कामं करुन दिवस ढकलायचा हे त्याचं नेहमीचं आयुष्य. या रस्त्यावर त्याचं येणंजाणंही नेहमीचंच. तळपत्या उन्हात डांबरीवरुन त्याची सायकल पळत सुटली.
"भानुदास, भाकऱ्या दिल्यात वैनीनं" चिरकुट अडगळीतल्या पेटीवर ठेवत हरीभाऊ म्हणाला.
डोळे चोळत उठून बसलेल्या भानुदासनं हात वर करुन जांभई देत आळस झटकला.
'लक्ष्मण सायकल मार्ट' हे त्याच्या दुकानाचं नाव. फारफार तर चारदोन सायकल्यांची पंम्चर तो दिवसाकाठी काढायचा.
"हरीभाऊ, तू आला काय आज, चल दोन घास खा" बाटली घीऊन भानुदासनं चूळ भरली. खसाखसा तोंड धुतलं.
"आरं मी जीऊन आलूय. तू घी जीऊन"
"आरं बस म्हणतूय ना" भानुदास मांडी घालत गुरकावलाच.
तेवढ्यात वडराचा झिंगऱ्या दारात येऊन वाकत म्हणाला
"आज ओपनला सत्ती लागली बर का"
"ह्या तेच्यायला.." चिरकुट सोडताना भानुदासनं हताश सूर काढला.
घर एखाद्या बंगल्यासारखं. चांगली बागायती जमीन. पण हा माणूस सायकलीच्या पंम्चरी काढत बसतो याचं गणित काय हरीभाऊला कळत नव्हतं. हरीभाऊनं अशी अनेक कोडी बघितली आहेत जी त्याला सुटली नाहीत.
सायकलवर टांग टाकून हरीभाऊ पुन्हा निघाला. मारुतीच्या देवळापाशी एक वड आहे. त्याच्या बुंध्याला दाट सावलीत चार धोतरंवाली माणसं पत्ते कुटत बसलेली असतात. हरीभाऊनं एका गार फरशीवर अंग टाकून दिलं.
तो जागा झाला तेव्हा चौकात कसलासा गोंधळ चालू होता.
"अरे बाप हाय तुजा. बापाला आसं बोलतो का?. दे सोडून" कोणीतरी समजावत होतं.
"आसला कसला बाप. ह्यो बुळाय बुळा. मी काय ह्येला बाप मानत नाय" आडदांड अंगकाठीचा सुऱ्या दमात बोलत होता.
भानुदास इवलंसं तोंड करुन गल्ल्यावर बसला होता. हरीभाऊला त्या बिचाऱ्याची दया आली. पोटचं पोरगं आसं बापावर धाऊन आलं तर कुणाला वाईट नाही वाटणार. भानुदासची अंगकाठी बारीकच. सुऱ्यानं नाही म्हनलं तरी उचलून त्याची हाडं मोकळी करायला कमी केलं नसतं. पण भांडण कशाचं होतं हे एक कोडं तसंच राहिलं.
गर्दी पांगली तसं भानूदास दुकान बंद करून तडक घरी निघून गेला. अंधार गडद झाला तसा हरीभाऊही सुटला.
किर्रर अंधारात त्याच्या सायकलचे पांयडेल चरकत होते. बंगला जवळ आल्यावर हरीभाऊ थांबला.
"भानूदास" त्यानं लांबूनंच हाक मारली. काही प्रतिसाद आला नाही. मग तो उतरुन आत आवारात गेला. तिथं बरीच धुसमूस झाली असणार. सुमात्त्या भिताडाला डोकं टेकून बसली होती. भानूदास विचारात हरवल्यासारखा ओट्यावर बसला होता. जोरदार भांडण घडून गेल्याची बहुतेक ती निशाणी होती.
हरीभाऊ काहीच न बोलता केवळ उभा राहीला. सुऱ्या कुठं दिसतोय का त्यानं बघितलं. पण तो तिथं नव्हता.
एकाएकी भानूदास उठला आणि हातात टिकुरणं घेऊन "बघतूच हिच्याकड..." म्हणत बंगल्याकडं धावला.
भांबावून गेलेला हरीभाऊ काहीच करु शकला नाही. राधाक्काच्या किंकाळ्या त्या बंगल्यात बराच वेळ घुमत राहिल्या.
नक्की त्या दिवशी झालतं काय याचं कोडं हरीभाऊला अजून सुटलेलं नाही.
प्रतिक्रिया
27 Jan 2017 - 11:09 am | संजय पाटिल
काही समजले नाहि..
27 Jan 2017 - 1:06 pm | हतोळकरांचा प्रसाद
अत्यंत जबरदस्त पकडलेलं बेअरिंग असं शेवटी एकदम का अर्धवट सोडलं असेल याचं कोडं मलाही सुटलं नाही. शेवटी क्रमश: असतं तर अजून खूप जास्त आवडलं असतं!
27 Jan 2017 - 2:04 pm | प्रचेतस
जव्हेरगंज हा एक भारी लेखक आहे.
27 Jan 2017 - 2:13 pm | गणामास्तर
मला वाटतंय कि सुमात्त्या भानुदासची बायको आणि राधाक्का हि भानुदासने ठेवलेली बाई असावी, बरोबर का?
27 Jan 2017 - 2:36 pm | किसन शिंदे
माझाही तोच अंदाज आहे. आणि त्याचा मुलगा सुर्या बापावर भ्डकण्यामागे राधाक्का कारणीभूत असावी.
28 Jan 2017 - 8:07 pm | पराग देशमुख
जबराट... पूर्ण पंन्याच्या कॅनव्हास वर मध्यभागी सुंदर, गूढ डोळे काढलेले मिळावे तशी कथा...
३ प्रसंग, पात्र आपलीशी झाली कि विचारांचे घोडे चौखूर उधळायला लागतात आणि त्याच वेळी कोणी लगाम खेचावी तशी कथा थांबते घोडा थबकला तरी आवेग मागे उरतोच त्याची नशा काही औरच ज्याला जसा हवा तसा अर्थ काढावा...वाचताना वाचकाची होणारी कलाकृती हि पुर्नाकृतीच ...
28 Jan 2017 - 10:44 pm | ज्योति अळवणी
नाही कळली कथा
29 Jan 2017 - 2:49 pm | इरसाल कार्टं
दुसर्यांदा वाचल्यावर कळलं. मस्त!
29 Jan 2017 - 7:51 pm | संदीप डांगे
वाटुळं केलंय भवानीनं माझं, आडदांड सुर्या, भानुदासची अंगकाठी बारिकच, बघतूच हिच्याकडं...
( कथा संकल्पना: सुमात्त्याने राधाक्कापासून झालेल्या सुर्याच्या डोक्यात भानुदास त्याचा बाप नाही हे भरवलंय...)
जव्हेरगंज, बरोबरे का?
बाकी, आम्ही तुमचे फ्यान आहोत ते का ह्याचं उत्तर सामावलंय खालच्या लाइनीत...
आंब्याची मोहरलेली सावलीसुद्धा तिला नकोशी वाटते.
30 Jan 2017 - 6:45 pm | Ranapratap
दोन दिस झालं पण हे कोडं काय सुटलं नाय बाबा. बाकी जव्हेर भाऊ लिखाण बाकी मस्त.
8 Feb 2017 - 8:26 am | एमी
प्रतिसाद वाचल्यावर थोडं कळल्यासारखं वाटतंय.
राधाक्का एक्सवेश्या असावी. नंतर भानुदासची रखेल बनली. पण मग 'तर प्रशस्त बंगला आख्खा राधाक्काच्या मालकीचा. तो तिचा हक्क होता. त्यातच ती लहानाची मोठी झालीय.' हे काय आहे? या वाक्यांतली 'ती', 'तिचा' म्हणजे सुमात्त्या का? भानु घरजावई?
मला वाटतं सुर्या राधा-हरीचा मुलगा आहे. राधाने तो भानुचा आहे सांगून सुमा-भानुला सांभाळायला दिला. पण त्याबदल्यात बंगला बळकावला.
20 Mar 2017 - 11:09 am | प्रियाभि..
20 Mar 2017 - 11:09 am | प्रियाभि..
20 Mar 2017 - 11:09 am | प्रियाभि..