आठवणी दाटतातः आठवणीतली गाणी

अफगाण जलेबी's picture
अफगाण जलेबी in जनातलं, मनातलं
26 Dec 2016 - 11:31 am

.inwrap
{
background: url(https://lh3.googleusercontent.com/Lp_d4i7_2MsOm0urqKpCOtvWkKCpcWUtKx9R26...);
background-size: 100%;
background-repeat: repeat;
}

माझ्या घरी गाण्याचे शौकीन जरी कोणी नसले तरी रेडिओच्या कृपेने दिवसाची सुरुवात आणि शेवट संगीतमय व्हायचा. आमच्या चाळीत तेव्हा जेमतेम एका बि-हाडात टीव्ही असेल. तोही आजच्यासारखा २४ तास नव्हता. शिवाय तो बघायचा म्हणजे त्याच्यासमोर बसावं लागे. त्यापेक्षा रेडिओ छान वाटायचा. समोर नसला तरी ऐकू येणाऱ्या गाण्यांमुळे त्याचं अस्तित्व जाणवायचं. मला ७वीत येईपर्यंत गाणी ऐकण्यात फारसा रस नव्हता. पण एके रात्री विविधभारतीवरचा ' बेला के फूल ' कार्यक्रम ऐकत असताना एक गाणं लागलं. मी ते बहुतेक पहिल्यांदाच ऐकलं असेल. दिल ढूंढता है फिर वोही फुरसत के रात दिन। बैठे रहे तसव्वुरे जाना किये हुवे!

मी हे गाणं ऐकलं आणि काहीतरी झालं. मला ते एवढं आवडलं - लताचा अप्रतिम मधाळ आवाज आणि भूपेंद्र सिंगचा किंचित घोगरा पण तरीही ऐकत राहावं असं वाटणारा आवाज.

गाणं कोणी लिहिलंय, कोणत्या चित्रपटातलं आहे, पडद्यावर कोण आहे - मला काहीही माहित नव्हतं. पण जेव्हा कधी हे गाणं रेडिओवर लागायचं, मी हातात असेल ते सगळं काम सोडून गाणं ऐकायचे. एकदा ते संध्याकाळी ७ वाजता लागणाऱ्या ' जयमाला ' नावाच्या कार्यक्रमात लागलं होतं. मी हातात धरलेल्या चहाच्या कपातला चहा थंड होऊन गेला पण मी कशाकडेही लक्ष न देता गाणं ऐकल्याचं आठवतंय.

या गाण्याबद्दलची सर्वात प्रिय आठवण म्हणजे - मी ११वी मध्ये असताना माझ्या हट्टापायी बाबांनी एकदाचा घरी टीव्ही आणला. तेव्हा रविवारी संध्याकाळी टीव्हीवर चित्रपट लागायचे. आम्ही सगळे स्वतःच्या घरी आरामात बसून चित्रपट बघता येईल म्हणून भलतेच खुशीत होतो. जेव्हा चित्रपटाचं नाव कळलं - मौसम - तेव्हा बाबा हसायला लागले. ते का हसताहेत ते मला चित्रपट चालू होऊन थोडा वेळ झाल्यावर कळलं - जेव्हा माझं आवडतं गाणं सुरु झालं तेव्हा.
पडद्यावर ते पाहताना काय वाटलं ते शब्दांत सांगणं कठीण आहे. संजीवकुमारने साकारलेला डाॅ.अमरनाथ. शर्मिला टागोरने साकारलेली, गावातला वैद्य हरिहरची मुलगी चंदा. तिला परत येण्याचं वचन देऊन अमरनाथ निघून जातो आणि तब्बल २५ वर्षांनी परत त्याच गावी येतो. तेव्हा त्याला आपल्या डोळ्यांसमोर हे गाणं दिसतं. स्वतःचं तरुण रुप आपल्या दिवंगत प्रेयसीबरोबर हे गाणं गाताना पाहून तो भावुक होतो.

गीतकार आणि दिग्दर्शक गुलजार, संगीतकार मदनमोहन, गायक लता-भूपेंद्र आणि पडद्यावर संजीवकुमार आणि शर्मिला यांनी हे गाणं कुठल्यातरी वेगळ्याच उंचीला नेऊन ठेवलेलं आहे. तरूण संजीवकुमार (तो एवढाही तरुण वाटत नाही पण असो) आणि शर्मिलाला पाहून वृद्ध संजीवकुमारच्या चेहऱ्यावर येणारे व्याकुळता, वैफल्य आणि खंत दाखवणारे भाव निव्वळ लाजवाब! नंतर फक्त भूपेंद्रच्या आवाजात हेच गाणं संथ लयीत, दु:खी स्वरात ऐकलं, तेव्हा सगळे संदर्भ समजून गेले.

मी आधी जेव्हा गाणं नुसतंच ऐकलं होतं, पाहिलं नव्हतं तेव्हा पडद्यावर वेगवेगळे ऋतू दाखवले असतील असं मला उगाचच वाटायचं. गाणं पाहिल्यावर त्याची काही गरज नाही हे जाणवलं. नंतर या गाण्याबद्दल अनेक गोष्टी समजत गेल्या. मूळ रचना उर्दू भाषेचा महाकवी मिर्झा गालिबची आहे.

जी ढूंढता है फिर वोही फुर्सत के रात दिन।
बैठे रहे तसव्वुर - ए - जाना किये हुवे॥

जगण्यासाठी धडपड प्रत्येकालाच करावी लागते. आता थोडी आयुष्याला स्थिरता येईल असा विचार जेव्हा कुणी करतो तेव्हा दैव त्याच्यापाठी कुठला न कुठला ससेमिरा लावतं. त्यातून निवांत आयुष्य जगता येईल ही फक्त एक कल्पना, एक मृगजळ बनून राहते. हा सगळा विषाद गुलजारजींनी या मूळ काव्याच्या विस्तारात समर्थपणे मांडलेला आहे. तो पडद्यावर साकार करण्यासाठी संजीवकुमारसारखा अभिजात अभिनेता असणं हे या गाण्याचं भाग्य.

या गाण्याच्या या ओळी तर जवळपास प्रत्येकाचं स्वप्न असतं -
या गर्मीयों की रात को
पुरवाईयां चले!
ठंडी सफेद चादरों मे
जागें देरतक!
तारों को देखते रहे
छतपर पडे हुवे

या गाण्याने मला लता मंगेशकर नामक अलौकिक आवाजाचं फॅन बनवलं. त्यांची गाणी ऐकायचा, कॅसेटस् (हो, तेव्हा सीडीज एवढ्या प्रचलित झाल्या नव्हत्या आणि MP3 वगैरे प्रकार तर कुणी ऐकले पण नसतील) विकत घ्यायचा आणि गाण्यांचे शब्द लक्षात ठेवायचा आणि गुणगुणायचा सिलसिला सुरु झाला. इंजिनियरिंग करत असताना हाॅस्टेलवर ज्या बाकीच्या मैत्रिणी होत्या त्यांनाही सुदैवाने गाण्यांची आवड होती. त्यांच्यामुळे मी इतर गायिकांची आणि लताजींची इतर गैरफिल्मी गाणी आणि भावगीतंही भरपूर ऐकली.

भावगीतांमध्ये माझ्या मते ' श्रावणात घन निळा ' ला तोड नाही. प्रत्येक कडवं हेच एक वेगळं भावगीेत असल्यासारखं आहे. विशेषतः ह्या ओळी -

रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी
निळ्यारेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी
आणि
पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले
माझ्या भाळावर थेंबांचे फुलपाखरू झाले

आणि माझं सर्वात आवडतं -

पानोपानी शुभशकुनांच्या कोमल ओल्या रेषा।
अशा प्रीतीचा नाद अनाहत शब्दांवाचून भाषा।
अंतर्यामी सूर गवसला नाही आज किनारा॥

प्रत्येक शब्दाचा उच्चार इतका हळुवार आणि नेमका केलेला आहे की आपल्या डोळ्यांसमोर चित्र उभं राहतं. न्याय देणं हा शब्दप्रयोग आपण बरेच वेळा ऐकतो आणि वापरतोही. पण त्याचं इतकं सुंदर उदाहरण सापडणं कठीण आहे.

http://www.aathavanitli-gani.com/song/shravanat_ghan_nila

लताजींचं असंच एक मनात घर करुन राहणारं गाणं म्हणजे ' अनुपमा ' मधलं ' कुछ दिल ने कहा '. मी जेव्हा ते पहिल्यांदा ऐकलं तेव्हा ते मला या जगातलं वाटलंच नाही. त्याची सुरुवातही थोडी गूढ आहे. पण ते अशी काही तुमच्या मनाची पकड घेतं की ज्याचं नाव ते. कैफी आझमींचे शब्दही मनाचा ठाव घेतात.

लेता है दिल अंगडाईयां
इस दिल को समझाये कोई।
अरमां न आंखे खोल दे
रुसवा न हो जाए कोई।
पलकों की ठंडी सेज पर सपनों की परीयां सोती है
ऐसे भी बातें होती है, ऐसेभी बातें होती है!

आपल्या जन्माच्या दिवशीच आईला गमावणारी अनुपमा. पत्नीवियोगामुळे कडवट झालेला आणि मुलीचा राग करणारा बाप आणि तिच्या भावनांना समजून घेणारा कवी हा त्रिकोण दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जींनी फार संयत पद्धतीने पडद्यावर साकार केला आहे. या गाण्यातली अनुपमाच्या मनाची व्यथा शर्मिला टागोरच्या चेहऱ्यावर दिसते पण त्याहीपेक्षा जास्त ती लताजींच्या आवाजातून व्यक्त होते. पु.लं.च्या शब्दांत म्हणायचं तर या गाण्यासाठी लता पार्श्वगायिका नाहीये, तर शर्मिला पार्श्वनायिका आहे.

अशी अनेक गाणी आहेत. सर्वांविषयी लिहायचं म्हटलं तर एक पुस्तक नक्कीच होईल. डोळ्यांचं पारणं फेडणारी दृश्यं असतात. या गाण्यांनी कानांचं पारणं फेडलेलं आहे.

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

प्रदीप's picture

26 Dec 2016 - 12:49 pm | प्रदीप

आवडला.

'श्रावणात' मलाही अतिशय आवडते, गीताचे शब्द, त्यांतील प्रतिमा मुळातच अप्रतिम आहेत. त्यातून खळ्यांची सुंदर चाल, अनिल मोहिलेंची अ‍ॅरेंजमेंट, व ते गाण्यार्‍या लताबाई-- ह्या सर्वांनी ह्या गीताचे सोने केले आहे. माझ्या दृष्टिने त्यात अजून एक अतिशय आनंद देणारी बाब म्हणजे त्यात वाजवलेला तबला. ही एक अतिशय संयत तरीही वजनदार, तयार, हळुवार आणि मॅच्युअर साथ आहे. अंतर्‍याच्या दोन दोन ओळींतील गॅप किती नाजूक तुकड्यांनी भरलीय! त्यातच त्याला जोडून वाजणारे गीटारचे स्ट्रोक्स! 'चार चॉद लागणे' म्हणजे काय ह्याचा हा तबला व गीटार उत्कृष्ट उदाहरण आहे.

'कुछ दिल ने कहा' हे लताबाईंचे एक खास व्हिस्परींग गाणे. तशीच त्यांची दुसरी दोन गाणी पटकन आठवतात-- 'मेरे मन के दिये' (परख) आणिव 'दिल का दिया' (आकाशदीप). ह्या खास लताबाईंनीच कराव्यात अशा करामती!

लेख आवडलाच.प्रदीपदादांचा प्रतिसाददेखील आवडला.

सुबोध खरे's picture

26 Dec 2016 - 6:58 pm | सुबोध खरे

अप्रतिम

मराठी_माणूस's picture

27 Dec 2016 - 12:04 pm | मराठी_माणूस

....त्यात वाजवलेला तबला

आणि फ्लुट