भूनंदनवन काश्मीर – भाग २ (दूधपथरी)

के.के.'s picture
के.के. in भटकंती
5 Dec 2016 - 1:14 pm

====================================================
भूनंदनवन काश्मीर - भाग-१ भाग-२ भाग-३ भाग-४
====================================================

भूनंदनवन काश्मीर – भाग २ (दूधपथरी)

काश्मीरमधे आम्ही सर्वप्रथम भेट दिली ती ‘दूधपथरी’ला. खरेतर दूधपथरीबद्दल आम्हाला काहीच माहीत नव्हते. Tripadvisor Forumsवर वाचता वाचता ह्या ठिकाणाबद्दल कळाले होते. एकुण माहिती चांगली वाटल्यामुळे इकडे जायचे ठरवले. दूधपथरी श्रीनगरच्या साधारण दक्षिणेला ४२किमीवर बडगाम जिल्ह्यात असलेले एक थंड हवेचे (!) ठिकाण आहे. पर्यटकांमध्ये फारसे परिचित नसल्यामुळे इथे फारशी गर्दी नसते. जे लोक येतात ते एक तर स्थानिक असतात किंवा ज्यांना माहिती आहे असेच. त्यामुळे इथे गर्दीचा त्रास नाही. सोहैल तर स्वत: आजपर्यंत कधी दूधपथरीला गेलेलाच नव्हता. त्याला रस्तादेखिल माहिती नव्हता. दोन-तीन ठिकाणी विचारत विचारत आम्ही दूधपथरीला पोहोचलो.

1

दूधपथरीचा भाग हा वनखात्याच्या संरक्षित क्षेत्रात येतो. बराचसा भाग हा घाटरस्ता, जंगलातून जाणारा रस्ता असा आहे. वळणावळणाचे रस्ते आजुबाजूला चिनार, पाईन, देवदारच्या झाडांची दाटी, दूरवर दिसणारे बर्फाच्छादित डोंगर असा एकदम छान रस्ता आहे. अधुनमधुन मेंढपाळ त्यांच्या मोठ्या कळपाला घेऊन जाताना दिसत होते.

2

3

4

दूधपथरीचा शब्दश: अर्थ “दूधाची दरी” (“Valley of Milk”) असा आहे. इथे जी एक नदी वाहते तिचे दगडगोट्यांवरुन खळाळणारे पाणी अगदी दूधासारखे दिसते. त्यावरुन हे नाव पडले असावे.

5

6

दूधपथरी ही पीरपांजाळ पर्वतरांगांमधे असलेली एक बाऊलच्या आकाराची दरी आहे. इथले वैशिष्ट्य म्हणजे दूरवर पसरलेली गवताळ कुरणे, दरीतुन खळाळत वाहणारी व दूधासारखे भासेल असे पाणी असणारी नदी, त्याच्यामागे असलेले बर्फाच्छादित डोंगर आणि डोंगरउतारावर पसरलेली पाईन, देवदार, फ्रिस आदी झाडांची दाटी. निसर्गाचे अत्यंत विलोभनीय व नेत्रसु्खद दर्शन इथुन घडते. दूरवर पसरलेले कुरण पाहुन निसर्गाने जणु काही हिरवागार गालिचाच अंथरला आहे की काय असे तुम्हाला नक्कीच वाटेल. कुरणावर बसण्यासाठी ठिकठिकाणी बाकडी ठेवलेली आहेत. तुम्ही इथे कितीही वेळ बसला तरी तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही. इथे मेंढपाळ त्यांच्या कळपाला चरायला घेउन येतात. वेळ एकदम निवांत जातो.

7

8

अर्थात हे फक्‍त उन्हाळ्यातच पहायला मिळेल कारण हिवाळ्यात हा सर्व भाग बर्फाने व्यापून जातो. इथे घोडेवाल्यांचा थोडा त्रास आहे पण तो तुम्ही काश्मीरमधे कुठेही गेला तरी असतोच. कुरणांवरुन तुम्ही थोडे पुढे दरीत उतरला की तिथे नदी आहे. पात्रात भरपुर दगडगोटे आहेत. नदीचे पाणी पाय गारठून जातील एवढे गार आहे. नदीचे पात्र ओलांडून पलिकडे तुम्ही डोंगरावर छोटेखानी ट्रेकला जाऊ शकता. फक्‍त घोडेवाल्यांच्या वर्णनाला भुलू नका कारण तिकडे पहायला फार काही नाही. घोडेवाले काहीच्या काही वर्णन करुन घोड्यावरुन फेरी मारायला लावतात, तुमचा पिच्छा सोडत नाहीत.

8

9

10

11

12

13

14

20

बाकी, दूधपथरी अजुन पर्यटनस्थळ म्हणुन पूर्णपणे विकसित झाले नसल्याने इथे फार काही सोयी नाहीत. इथे काश्मीरी ग्रामीण पद्धतीची थोडी घरे पहायला मिळतात. कमी ऊंचीची, पूर्णपणे मातीचे छप्पर असलेली ही घरे नक्कीच वेगळी जाणवतात. थंडीच्या दिवसात मातीचे घर असल्याने उबदार राहते. वनखात्याने सशुल्क स्वच्छताग्रुहाची व्यवस्था केलेली आहे पण रेस्तरों वगैरे मात्र वनखात्याच्या हद्दीबाहेर आहे.

16
काश्मीरी ग्रामीण पद्धतीचे मातीचे घर

आम्ही काश्मीरमधे भेट दिलेले हे पहिले ठिकाण नक्कीच अतिव सुंदर होते. सोहैलला देखिल हे ठिकाण भलतेच आवडले. त्याने पुढच्या वेळेस तंबू घेउन येउन रात्र त्या कुरणावर घालवायचा प्लॅनसु्द्धा बनवला! सोहैलने त्याच्या खास शैलीत आम्हाला सांगुन टाकले की “मान लिजीये की, अगर आपको ये जगह पसंद आई है तो इसके आगे आपको युसमर्ग और गुलमर्ग कुछ भी नही लगेगा.” तिथुन निघेपर्यंत २ वाजले होते. सोहैलला एखाद्या veg restaurantपाशी थांबायला सांगीतले. सोहैल म्हणाला अशा ठिकाणी veg restaurant मिळणे अवघड आहे कारण काश्मीरमधे खूप कमी लोक veg खातात. सुदैवाने आम्हाला लगेचच एक veg restaurant सापडले. सोहैलला आमच्याबरोबर जेवायला बोलावले तर त्याने अदबीने नकार दिला. तो म्हणाला “मान लिजीये की, कश्मीरी लोग बाहर खाना पसंद नही करते| अगर वो कहीं बाहर घुमने जायेंगे तो भी वो घरसे खाना बनाके लेके जायेंगे| मै भी मेरा टिफीन लेके आया हूं|” खरेतर, आमच्या नजरेतुन हे सुटलेले नव्हते. दूधपथरीमधे अशी बरीच कुटुंबे दिसली होती की जी आपल्याबरोबर खाण्याचे सगळे घेउन आलेले होते आणि त्या कुरणांवर मस्त चादर अंथरून एकत्र खात बसले होते. सोहैलच्या ह्या माहितीमुळे त्यामागचे कारण देखिल कळाले.
तुम्ही जर कधी काश्मीरला भेट दिली तर दूधपथरीला आवर्जून जा!

17

संध्याकाळी श्रीनगरला हॉटेलला पोहोचल्यावर काय करायचे हा प्रश्न होता. कारण अंधार पडायला बराच वेळ होता. मग आम्ही जवळच असलेल्या ‘जेहलम व्ह्यू पार्क'मधे चालत गेलो. ही बाग जेहलम नदीच्या काठावर आहे. बाग छोटीशीच आहे पण जेहलम नदी इथुन खूप छान दिसते.

18
जेहलम व्ह्यू पार्क
====================================================
भूनंदनवन काश्मीर - भाग-१ भाग-२ भाग-३ भाग-४
====================================================

प्रतिक्रिया

वरुण मोहिते's picture

5 Dec 2016 - 1:30 pm | वरुण मोहिते

बऱ्याचदा काश्मीर ला जाऊन महिने महिने राहून हे ठिकाण नाही पाहिलंय . असाच एक ठिकाण म्हणजे युसमर्ग जरूर पहा घोड्यांची राईड असते ४-५ तासांची . सोनमर्ग गुलमर्ग च्या पलीकडे असलेलं ठिकाण आहे अनुभवांसाठी. पेहेलगाम पासून काही अंतरावर एक ठिकाण आहे आरु म्हणून असच छान ठिकाण आणि तिथे काही रिसॉर्ट्स मध्ये फिशिंग ची सोय करून देतात . जबरदस्त अनुभव असतो . काही काश्मीर ची वेगळी ठिकाण कोणाला माहित असतील तर जरूर लिहा

पाटीलभाऊ's picture

5 Dec 2016 - 2:51 pm | पाटीलभाऊ

सुंदर फोटो आणि वर्णन...!
खरंच मनमोहक असं ठिकाण आहे हे.

पद्मावति's picture

5 Dec 2016 - 2:56 pm | पद्मावति

वाह, सुरेख फोटो आणि वर्णन.

एस's picture

5 Dec 2016 - 3:03 pm | एस

नेत्रसुखद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Dec 2016 - 3:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

जबरदस्त आहे हा प्रदेश ! सुंदर फोटो व वर्णन !

बबन ताम्बे's picture

5 Dec 2016 - 3:59 pm | बबन ताम्बे

.

मृत्युन्जय's picture

5 Dec 2016 - 4:52 pm | मृत्युन्जय

फटु दिसत नाहित हो. जरा परत अपलोडवा की. बाकी वर्णन मस्तच

बरखा's picture

5 Dec 2016 - 4:57 pm | बरखा

फोटो दिसत नाहीत :(

फोटो तर खूप छान आलेत. गुगल क्रोम वापरा मग दिसतील फोटो.

फारच सुंदर.. शब्द नाहीत वर्णन करायला. ही जागा फोटो मधेच इतकी सुंदर दिसते तर प्रत्यक्षात किती छान असेल याची कल्पनाच करावी.
आता पुढील भागाची जास्त उत्सुकता लागून राहिली आहे.

संजय पाटिल's picture

6 Dec 2016 - 4:08 pm | संजय पाटिल

फोटो आणि वर्णन..

तीन तीन वेळा काश्मीर बघूनही हे नावही कधी ऐकले नव्हते :(
तुमच्या लेखामुळे परत काश्मीर होणार बहुतेक!

पैसा's picture

6 Dec 2016 - 6:24 pm | पैसा

अप्रतिम आहे हे!