मुलांचे वकील आणि मार्गदर्शक (Child Advocates)

रुपी's picture
रुपी in जनातलं, मनातलं
30 Nov 2016 - 6:59 am

.inwrap
{
background-color: #DFEDF8
}

1
शाळेतून घरी आल्यावर तुम्हांला लेकाने सांगितलं, "माझा चष्मा तुटला!" तर तुम्ही काय कराल? कदाचित थोडं रागवाल; "असा कसा तुटला?", "लक्ष द्यायला काय झालं?" विचाराल. पण लवकरात लवकर नवीन चष्मा कराल की नाही? कुणाला आर्थिक परिस्थितीमुळे कदाचित नवीन चष्मा बनवणे लगेच जमणार नाही, पण पैशांची व्यवस्था झाली की सर्वांत आधी नवीन चष्माच येणार.

एखाद्या दिवशी तुमची मुलगी धावत-पळत घरात येते. "आई, वक्तृत्व स्पर्धेत माझा दुसरा नंबर आला" म्हणून बागडत सांगते. तुमची छातीही अभिमानाने भरून येते. तिला तुम्ही जवळ घेता, पाठीवरून हात फिरवता, घरातल्या इतरांना, असतील तर शेजार्‍यांना सांगता. सगळेजण तिच्यावर कौतुकाची फुले बरसवतात!

चष्मा तुटणं असो, की स्पर्धेत बक्षीस मिळणं असो... तुमच्या मुलाच्या बाबतीत यातलं काही घडत असेल तर ते खूप नशीबवान आहे! कारण, त्याचं ऐकून घेऊन त्यावर प्रतिक्रिया द्यायला कुणीतरी आहे...

पण कितीतरी मुलं अशी आहेत ज्यांना आपल्या व्यथा, अडचणी, आयुष्यात घडलेलं चांगलं काही सांगता येईल असं कुणीच नाही. असले तरी त्यांना त्यांच्याशी सोयरसुतक नाही. हो, कितीतरी मुलांना आई-वडील असूनही "पालक" असे नसतात. त्यातल्या त्यात भारतात अजूनही नातेवाईकांचा आधार बर्‍यापैकी असल्याने ही वेळ फार येत नाही. पण अमेरिकेत आणि इतर काही देशांमध्ये यांबाबतीत जरा गुंतागुंत वाढलेली आहे. इथे जन्मदाते आई-वडील हे मुलांचे "कायद्याने"ही पालक असतात. हा शब्दप्रयोग काहींना हास्यास्पद तर कुणाला आश्चर्यजनक वाटेल, पण हे खरे आहे. याचा अर्थ काय, तर आई-वडिलांचे काही बरे-वाईट झाले तर ही मुले सरकारच्या ताब्यात जातात. मला वाटते कायद्याने हे भारतातही आहे, पण भारतात लगेच कुणी मुलांना घरातून उचलून नेणार नाहीत, आणि दुसरे कुणी नातेवाईक मुलांचा सांभाळ करतीलही. अमेरिकेत मात्र मुलांना कुणा नातेवाईंकांच्या ताब्यात सहजासहजी दिले जात नाही. काही वेळा तर आई-वडील धडधाकट असूनही मुलांचा सांभाळ करू इच्छित नाहीत, किंवा कधी आई-वडील मुलांचा सांभाळ करायला समर्थ नाहीत असेही आढळून येते. अशी बरीच मुले मग फॉस्टर-केअरमध्ये जातात.

मूल फॉस्टर केअरमध्ये आल्यावर त्याचे प्रश्न सुटत नाहीत. "पुढे या मुलांचे भवितव्य काय?" हा एक मोठा प्रश्न अजून अनुत्तरित असतो. कदाचित कुणी नातेवाईक त्यांचा सांभाळ करण्याची इच्छा दर्शवण्यास पुढे येतात, कधी आई-वडिलांमध्येच त्यांचा ताबा मिळवण्यासाठी चढाओढ असते. कधी आई-वडील पुन्हा मुलांचा ताबा घ्यायला समर्थ होऊ शकतातही, परंतु, फॉस्टर केअर किंवा चाइल्ड प्रोटेक्शन एजंन्सीज इतक्या सहज मुलांना त्यांच्या हवाली करत नाहीत. कधी ही मुले छोट्या छोट्या गुन्ह्यांमध्ये अडकू शकतात. फॉस्टर-केअरमधून बाहेर पडलेली मुले पुन्हा काही कारणाने फॉस्टर केअरमध्ये येतील याचीही शक्यता बरीच असते. अश्या प्रसंगी या मुलांना स्वतः काय वाटते, त्यांचे मत काय, त्यांच्या अडचणी काय याला आवाज कोण देणार? महिनोंमहिने कोर्टात यांवर सुनावणी होते. त्या वेळी या मुलांची 'वकिली' कोण करणार?

'Child advocates' किंवा 'Court Appointed Special Advocate (for children) - CASA (कॅसा) हे अश्या मुलांच्या आयुष्यातला अंधार निदान काही प्रमाणात तरी दूर व्हावा या आशेने प्रकाशाचे किरण घेऊन येतात! 'वकिली करणे' हा शब्दप्रयोग आपण किती वेळा चेष्टेने वापरतो. पण मुलांची वकिली करणे हे काम मुळीच सोपे नाही. कॅसाच्या अधिकृत संस्थळानुसार एकट्या अमेरिकेत दर वर्षी किमान ६ लाख मुले फॉस्टर केअर आणि फॅमिली कोर्ट सिस्टिममधून जातात. यातले मूल सरासरी २० महिने (आयुष्यातली २ वर्षे!) फॉस्टर केअरमध्ये घालवते आणि सरासरी तीन वेगवेगळ्या घरांमध्ये त्याची रवानगी होते. मातीच्या गोळ्याला आकार देण्याच्या या वयात कितीतरी गोष्टी कळत-नकळत दूरगामी परिणाम करतात. आपले आयुष्य अगदी "डेड-एंड"ला येऊन पोहचले आहे असे त्यांना वाटू लागलेले असताना आशेचा, मार्गदर्शनाचा, मदतीचा हात देण्याचे काम कॅसा करतात.

कॅसाच्याच अहवालाप्रमाणे दर दिवशी अमेरिकेत १९०० मुले कुठल्या न कुठल्या त्रासाचे किंवा दुर्लक्षाचे बळी ठरतात आणि त्यातले ४ प्राणांस मुकतात. बर्‍याचदा आपण असे आकडे वाचतो, हळहळतो, यंत्रणेला नावे ठेवतो, स्वतःला नशीबवान समजतो, फार तर थोडीफार चर्चा करतो आणि आपापल्या कामाला लागतो. कॅसा मात्र खरोखर याही पुढे जाऊन या मुलांचे आयुष्य सुधारतात. कॅसा हा शब्द तसा थोड्या मोठ्या व्याप्तीने वापरला जातो. या संस्थेलाही कॅसा म्हणतात, आणि याच्या एका सदस्याला किंवा अनेक सदस्यांना मिळून एकत्रितपणेही कॅसा असे संबोधले जाते. इच्छुक स्वयंसेवकांना मार्गदर्शन करून संस्थेत सामील करून घेणे हे कामही प्रस्थापित सदस्य करतात. या मुलांचा आवाज कोर्टात आणि समाजात पोहचवणे हे समान ध्येय आणि त्यामागची कळकळ हाच यांना जोडणारा समान धागा!

ही कळकळ तुम्हाला कॅसाच्या एखाद्या कार्यालयापर्यंत पोहचवते, तेव्हा तुम्ही पहिल्या पायरीशी पोहचलेले असता. कॅसा होण्यासाठी तुम्हाला कायद्याचे खास असे ज्ञान असणे आवश्यक नाही आणि अपेक्षितही नाही. मुलांबाबत सहानुभूती आणि बर्‍यावाईटाची जाण हे मात्र आवश्यक! अगदी सुरुवातीला त्यांच्या ठराविक कालावधीने (शक्यतो दर महिन्यातून एकदा) होणार्‍या अभिमुखता कार्यक्रमाला हजेरी लावून कॅसा नेमकं काय आहे, त्याच्या काही सभासदांची ओळख, काही मुलांचे व्हिडिओ हे सर्व पाहायला मिळतात. तुम्ही इच्छुक असाल तर तुमचे नाव आणि संपर्क माहिती नोंदवायची. मग पहिल्या मुलाखतीसाठी वेळ ठरवून तुम्हाला त्यांच्या कार्यालयात बोलावले जाते. ही मुलाखत तशी सोपी असते. त्यात साधारणतः तुमची प्राथमिक माहिती, तुमचे मुलांविषयीचे विचार, स्वतःचे बालपण कसे गेले, तुमच्यावर कुणाचा प्रभाव आहे आणि का, एखाद्या प्रसंगी तुम्ही कसे वागाल अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. तुम्हालाही प्रश्न विचारायची संधी दिली जाते. ही मुलाखत म्हणजे पहिली पायरी. साधारणपणे ६० पैकी ५८-५९ जण ती पार करू शकतात. ही पार केली याचा अर्थ आत्ता कुठे तुम्ही ते देत असलेल्या ३० तासांच्या ट्रेनिंगसाठी पात्र ठरलात! पुढचे साधारण तीन महिने आठवड्यातून २-३ तास असे हे ट्रेनिंग होते. 'बॅकग्राउंड चेक' तर असाही बर्‍याच क्षेत्रात होतोच, इथे तर अपवाद होणं शक्यच नाही. यानंतर तुमची पुन्हा एक मुलाखत होते. पण याहून महत्त्वाचे आहे, ते तुम्ही तुम्हाला सोपवलेली "केस" मिटेपर्यंत त्याबरोबर राहणं. एका केसचा सरासरी कालावधी असतो साधारण १० महिने ते दीड वर्ष. तुम्ही निदान तुमची पहिली केस संपेपर्यंत तरी कॅसामध्ये राहणं अपेक्षित आहे. ते मान्य केलंत तर तुम्ही 'कॅसा' होणार.

आता कामाची खरी सुरुवात! खरं तर तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे यावरून तुम्हांला कुणाची केस सोपवावी हा निर्णय तुमच्याशी बोलून जुणे-जाणते कॅसा घेतात. त्यामुळे केस निवडणंही फार अवघड नाही. पण एकदा तुम्ही याला बांधील झालात तर एका अजाण मुलाची जबाबदारी तुमच्यावर येते. सर्वात सोपे म्हणजे आठवड्यात सुमारे १० तास देऊ शकणे. तुम्हाला सोपवलेल्या मुलाला तर तुम्हाला वेळ द्यावाच लागतो; शिवाय, कधी त्या मुलाशी, कधी नातेवाईक, संस्था, वकील, शाळेतले शिक्षक यांच्याशी संवाद साधावा लागतो. केस असेल तेव्हा कोर्टात उपस्थित राहावे लागते. तुमच्या घर/ कार्यालयापासून जाण्या-येण्याचा आणखी वेळ गृहीत धरावा लागतो. एक वेळ व्यापातून इतका वेळ काढता येईलही; पण भेटीची वेळ सुरू होईल तेव्हा मनाचा एक कोपरा उघडणं आणि वेळ संपली की बंद करणं इतकं सोपं आहे का?

आपण कल्पनाही करू शकत नाही इतक्या वाईट प्रसंगांतून काही मुले गेलेली असतात. त्यांची मने स्वतःच्या जन्मदात्यांबद्दल, जवळच्यांबद्दलही कलुषित झालेली असतात. मुळात ती मुले पहिल्याच भेटीत घडाघडा बोलायला लागतील ही अपेक्षाच स्वप्नरंजित असते. त्यांचा विश्वास संपादन करणं हा मोठा टप्पा असतो. किशोरवयीन मुले असतील तर हा टप्पा आणखी अवघड! कुणी परकी व्यक्ती आपलं भलं करण्यासाठी नि:स्वार्थी होऊन तिचा वेळ देईल हे त्यांचं मन मान्य करत नसतं. बर्‍याचदा ज्या कुटुंबात किंवा फॉस्टर केअरमध्ये ती राहतात तिथेच काही अडचण आली, तर आपल्याला कुणीच वाली नाही असंच त्यांना वाटू लागतं. गरज लागेल तेव्हा हाक मारल्यावर कुणी "ओ" देणारं मिळालं तरी त्यांच्यासाठी किती आनंदाची गोष्ट! हळूहळू आपल्या अंतरंगात दुसर्‍यांना डोकावू द्यायला तयार झाल्यावर त्याचा विश्वास मोडू न देणं हीदेखिल कॅसाची मोठीच जबाबदारी असते. हे भावबंध जुळले तर एखाद्याच्या आयुष्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसवली जाऊ शकते, आणि बिघडले तर आधीच कोमेजलेली मने आणखीच दुखवू शकतात. थोडक्यात, मानसिकदृष्ट्या त्या मुलाच्या कॅसावर मोठी जबाबदारी असते. मुलांना बोलते करून, त्यांच्या अडचणी समजून घेऊन कोर्टात त्यांची बाजू मांडणं हेही महत्त्वाचं काम. शिवाय पहिल्या उदाहरणात सांगितलं तसं कुणाला चष्म्याची गरज असते, कुणाला पुस्तकांची, कुणाला आणखी कशाची. ती गरज संस्थेपर्यंत पोहचवणंही एक काम. मग संस्था त्यांच्या देणगीतून हे साध्य करते.

विचार करा, स्वतःची मुलेही वयात येत असताना, त्यांना मोठी करताना किती वेळा आपली चिडचिड होते. दुसर्‍याची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेऊन ती पार पाडणं, त्यांना उभारी देणं हे किती अवघड. काही महिने, किंवा एक-दीड वर्ष एका मुलाला द्यायचे, त्याची केस संपली की दुसर्‍याला आपल्या पंखांखाली घ्यायचे हे किती भावनिक गुंत्याचे! यांमुळे कॅसांना समाजात खूप मानाचं स्थान असतं. एखादी व्यक्ती कॅसा आहे हे कळल्यावर समोरच्या व्यक्तीच्या नजरेत त्याबद्दल आलेला आदर, कुणी कॅसा कशी २४ तास केव्हाही फोन केला तरी मदतीसाठी तत्परता दाखवते हे जाणून घेणं, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुलांचे त्यांच्या कॅसाबद्दलचे अनुभव त्यांच्याच शब्दांत ऐकणं हा एक विलक्षण अनुभव!

एका कॅसानेच सांगितलेला एक अनुभव... एका मुलाची केस त्यांच्याकडे होती. मुलगा अठरा वर्षांचा होईपर्यंत त्यांच्या संपर्कात होता. पुढे अचानक त्याचा संपर्क तुटला. मध्ये काही वर्षे गेली. एका रात्री त्या कॅसाचा फोन वाजला. अनोळखी नंबरवरून आलेला फोन. पलीकडच्या व्यक्तीने बोलायला सुरुवात केल्यावर ओळख पटायला १-२ मिनिटे लागली, पण तो तोच मुलगा होता. त्यांच्याशी संपर्क तुटल्यानंतर पुढे काय काय केले हे सर्व त्याने सांगितले. लग्न झाले, एक गोड मुलगी आहे सांगितले, आणि मग म्हणाला, "..because of you, I am a CASA today!" एखाद्या कॅसासाठी याहून जास्त आनंदाची गोष्ट काय असणार?

(बालदिनाच्या निमित्ताने अनाहितामध्ये पूर्वप्रकाशित)
1

समाजअनुभव

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

30 Nov 2016 - 7:45 am | अर्धवटराव

या कार्याबद्दल काहि कल्पना नव्हती. अत्यंत मोलाचं कार्य.

कॅसांना सलाम! पण मला व्यक्तिशः फॉस्टर केअर ही संकल्पना पटत नाही. असो.

सुबोध खरे's picture

30 Nov 2016 - 11:55 am | सुबोध खरे

सुंदर लेख
असे कार्य किंवा फॉस्टर केअर आहे हे माहित होतं पण त्याची प्रक्रिया माहित नव्हती.
असे काही करावे असे आतून नेहमी वाटते. आळस आणि जडत्व (INERTIA) या दोन्ही मुळे असं काही हातून होत नाही हि वस्तुस्थिती.

रुपी's picture

2 Dec 2016 - 5:44 am | रुपी

धन्यवाद.
आळस हे कारणही आहे. शिवाय, थोडासा भावनिक गुंताही आहे. एखाद्याच्या अडचणी समजणे, सोडवणे यासाठी भावुकताही हवी, पण त्याचबरोबर फार भावुक न होता वागणं, निर्णय घेता येणंही महत्त्वाचं असं व्यक्तिशः मला अवघड वाटतं.

मंजूताई's picture

30 Nov 2016 - 1:06 pm | मंजूताई

या कार्याबद्दल काहि कल्पना नव्हती. अत्यंत मोलाचं कार्य..>>> +१

पद्मावति's picture

30 Nov 2016 - 2:29 pm | पद्मावति

या कार्याबद्दल काहि कल्पना नव्हती. अत्यंत मोलाचं कार्य

हेच म्हणायचे आहे.
उत्तम लेख.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Nov 2016 - 2:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

फॉस्टर केअरबद्दल सोप्या शब्दांत खूप सुंदर माहिती !

नाखु's picture

30 Nov 2016 - 3:04 pm | नाखु

भारतात असेल काय हे माहीत नाही.

खारघरच्या पाळणाघरबातमीबाबत मिपावर आले नाही,बातमी दखल घेण्यालायक नाही का,मिपा जागतीक्/देशापुढील समस्यांचाच विचार करते असा प्रश्न पडला आहे.

प्रश्नात आडलेला नाखु

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Nov 2016 - 9:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

बहुतेक, फोस्टर केअर अशी काही व्यवस्था भारतात नाही.

भारतातला पाळणाघर हा व्यस्त पालकांच्या मुलांची दिवसाचे काही तास (काहीशी एकत्र बेबी सिटींग सारखी) काळजी घेणारा, अनियमित (अनरेग्युलेटेड) आणि खाजगी व्यवसाय आहे.

अमेरिकेतली चाईल्ड अ‍ॅड्व्होकेट्स ही पालकविरहित मुले; किंवा ज्या मुलांचे पालक आपल्या मुलांची योग्य काळजी घेऊ शकत नाहीत अथवा घेऊ इच्छीत नाहीत, अश्या मुलांना सुरक्षित नवीन घर (फोस्टर होम) मिळावे यासाठी प्रयत्न करणारी व त्यांना नवीन घरी मिसळून जाण्यास मदत करणारी; पब्लिक चॅरिटी व स्वयंसेवी (व्हालंटियर) प्रणाली/संस्था आहे. यातील स्वयंसेवक, कोर्टाच्या प्रक्रियेने, मुलांच्या हक्क व जरूरींची काळजी घेण्यासाठी नेमलेल्या, व्यक्ती असतात. (Child Advocates, Inc. mobilizes court appointed volunteers to break the vicious cycle of child abuse. We speak up for abused children who are lost in the system and guide them into safe environments where they can thrive.)

अश्या मुलांची काळजी घेणार्‍या भारतातल्या "चाईल्ड केअर होम्स"ची (फोस्टर होम नव्हे) अनावस्था सर्वशृतच आहे.

फोस्टर होम किंवा चाईल्ड अ‍ॅड्व्होकेट्स भारतात असल्याचे माझ्या माहितीत नाही. इतकेच काय बहुदा या संकल्पनाही आपल्याकडे नाहीत असा माझा समज आहे.

आपल्याकडे उपयोगी पडू शकणार्‍या कोणत्याही चांगल्या संकल्पना, प्रणाली किंवा तंत्रे जगात इतर कोठे आस्तित्वात असली तर, त्यांचा विचार करून त्यांच्यात आपल्या वस्तूस्थितीसाठी सोईस्कर फरक करून (इंडिजिनायझेशन), त्यांचा स्वीकार करण्याने (रि-इनव्हेंटिंग ऑफ व्हील टाळल्यामुळे) खूप वेळ, श्रम, वित्त व मनुष्यबळाची बचत होईल. शिवाय, या प्रत्यक्ष व्यवहारात आलेल्या गोष्टी असल्याने त्यांच्या यशाची शक्यता खूप मोठी असेल.

असे मला वाटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Nov 2016 - 9:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

Foster care is a system in which a minor has been placed into a ward, group home, or private home of a state-certified caregiver, referred to as a "foster parent". The placement of the child is normally arranged through the government or a social service agency.

अप्रतिम लेख आहे हा रुपी.

प्रीत-मोहर's picture

30 Nov 2016 - 3:18 pm | प्रीत-मोहर

अप्रतिम लिखण रुपी. ह्याबद्दल अजिबात माहिती नव्हती. धन्स

पाटीलभाऊ's picture

30 Nov 2016 - 3:19 pm | पाटीलभाऊ

सुंदर लेख आणि चांगली माहिती.

या निमीत्ताने एक विनंती करु इच्छितो
मिपावरील विशाल जनसमुदाय असलेल्या पुरुष वर्गाला त्यांचे जीवन उन्नत होण्यास मदत करील असे
अजुन काही लेख "अनाहिता" च्या पोतडीत असतील तर ते जनहितार्थ उघड करावेत अशी विनम्र विनंती.
ज्ञान वाटल्याने वाढते.
पुरुषांना असे जाणीवपुर्वक वंचित ठेवणे ( तुमचे हक्काचे विषय वगळुन ) हे अन्यायकारकच नाही का वाटत ?
किमान पैसा मितान इ. वरीष्ठ प्रगल्भ सभासदांनी एकत्र येऊन ( तुमचे हक्काचे विषय वगळुन ) एक निवडक अनाहिता असा प्रकल्प करावा त्यात मिपापुरुषांना प्रगल्भ होण्यास मदत होइल असे लेख जमा करुन.
पुरुष बांधवांना एक नववर्ष भेट द्यावी असे
विनम्रपणे सुचवतो
निवडक अनाहिता - २०१५ असेही देता येइल
याने दोन्ही पार्टींमधले सामंजस्य ही वाढेल उत्सुकतेचा क्षोभ ही मंदावेल
बघावे.

नीलकांत यांच्या सुचवणीवरून अनाहितातील निवडक लेखांचे संकलन करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामागील हेतू व त्याची उदत्ताता वगैरे ची काही कल्पना नाही बुवा ;)

सस्नेह's picture

2 Dec 2016 - 3:47 pm | सस्नेह

=))

रुपी's picture

2 Dec 2016 - 6:03 am | रुपी

सर्वांना धन्यवाद.

खरंच आपल्या आजूबाजूला घडणार्‍या कितीतरी गोष्टी/ चाललेले कार्यक्रम आपल्याला माहीत नसतात. काही वर्षांपूर्वी एका ढकलपत्रातून कॅसाबद्दल समजले, लेखात लिहिलेल्या एक-दोन पायर्‍या चढले, तेव्हा याबद्दल आणखी माहिती मिळाली. फॉस्टर केअर चांगले/ वाईट म्हणण्याइतका अजून माझा अभ्यास नाही आणि तेवढा विचारही केला नाही. एखाद्या सुखी कुटुंबातल्या मुलांना अचानक फॉस्टर केअरमध्ये जावं लागलं तर मनाला नाही पटणार; पण चाइल्ड अ‍ॅब्युज आणि तत्सम प्रश्न सोडवण्यासाठी बहुतेक पाश्चात्य देशांत त्याची गरज जास्त असावी.

कॅसांचे कार्य खरंच बहुमूल्य आहे, आणि अजूनही बर्‍याच मुलांना कॅसांची गरजही आहे. म्हणून या लेखातून ते पोहचवण्याचा प्रयत्न!

अतिषय माहितीपूर्ण व महत्वाचा लेख आहे. हे असं वाचायचं म्हणजे अवघड वाटतं म्हणून अनाहितामध्ये लेख वाचायचा टाळत होते पण वाचल्यामुळे कॅसा व त्यांचे काम याबद्दल माहिती समजली.

वेगळ्या विषयावरील सुंदर लेख. भारतात अशी सिस्टीम नाही. होणे गरजेचे आहे.
तथापि मुलांच्या भावविश्वाशी बाहेरच्या व्यक्तीचे नाते जुळणे फार फार अवघड आहे. नातेवाईक, परिचयातील व्यक्ती यांनी असे काम केले तर ते सोपे होईल असे वाटते.

पैसा's picture

3 Dec 2016 - 3:46 pm | पैसा

आपल्याकडे स्वतःची मुले भरपूर आणि पैसे तुटपुंजे असे असल्याने हा फॉस्टर प्रकार रुजणे शक्य नाही. थोड्या फार प्रमाणात मदत पूर्वी माधुकरी, वार लावून जेवणे वगैरे प्रकारात होत असे. पण आता अनाथाश्रमांव्यतिरिक्त कुठे काही ऐकले नाही.

वाचून खरे तर वाईट वाटले. कुणाही मुलावर अनाथ शिक्का घेऊन जगायची वेळ येऊ नये.

अनिंद्य's picture

14 Nov 2018 - 9:14 am | अनिंद्य

योगायोगाने आज बालदिनाच्या दिवशी हा लेख वाचला. CASA (कॅसा) विषयी माहित नव्हते.

असे काही करता आल्यास स्वतःला भाग्यवान समजीन.