!!!...अर्थ-हीन चरित्र…!!!
बक्कळ कोरड्या नदीतला,
आयुष्याचा हा शेवटचा थेंब… बाष्पी-भवनाने वाफ होण्याआधी…
दहा मिनटात… एक अर्थहीन आत्म-चरित्र
खरडावं म्हणतोय…
खरंतर, जन्मलो त्या दिवशीच भयानक रडलो होतो.
आई बाप हसत होते, मी जन्मलो म्हणून
अन मी रडत होतो,
या जन्मात जन्मायच्या ‘फक्त एक-क्षण-आधी’,
गेल्या जन्मात मेलो म्हणून …
एक आई, एक बाप, एक भाऊ, एक बहिण… --ती तेवढी नाही… (ते दुख आलंच…)
काही मित्र, काही शिक्षक, काही पाहुणे, काही वेपराईज्ड नाती………… (तेही दुख आलंच…)
अन काही माझीच अनेक मलाच रोज भेटणारी विखुरलेली रूपे…!
असे सगळेच आवडायचे मला तेव्हा…
(सुरुवातीला लहानपणी हे होतंच...)
(नाईलाजाने) मग मोठा झालो…
शाळेत कि चार भिंतीत, (घरचे पाठवतात म्हणून)
पाटी-दप्तर घेऊन बसू लागलो…
(आता ज्याचा काहीच उपयोग नसतो… )
लक्ष देऊन असे विषय शिकू लागलो!
लाल खडक, जांभळा खडक, काळी मृदा,
खडकाळ जमीन, सुपीक माती,
(आता थेंबही नसलेल्या) तेव्हाच्या बारमाही नद्या… अन त्यांची लक्षात न राहणारी असंख्य नावे…!
१८५७ च्या उठावाची.
प्लाशीच्या लढाईची कारणे, कलमे, परिणाम आणि वैशिष्ठ्ये...
पंतप्रधानाच वय, राष्ट्रपतीची (फालतू) कार्ये!
धोतरातला गांधी, खून मागणारा बोस,
टरफाले-वाला टिळक… गुलाब आवडणारा नेहरू
अन…
फासावर (जाऊ दिलेला) भगतसिंग..
समपृष्ठरज्जू प्राण्याची वैशिष्ठ्ये..
प्रकाश-संश्लेषण प्रक्रिया…!
पायथागोरसचा प्रमेय, लसावी, मसावी,
सहसा मलातरी न पडलेले गणितातले 'भाग'…
अन शेवटी… भूमितीचा समभूज ‘त्रिकोण’…
याच अर्थहीन ‘चौकटीच्या’ प्रत्येक बाजूवर…
आख्खं बालपण आपटत-ठेचाळत राहिलं…
दुसरीत शिकलो तेच-तेच पुनपुन्हा दहावी पर्यंत पाठांतर करत राहिलो…
गोल-घुमटात १० वेळा Echo यावा तसा… 10 वर्ष बेचैन आतल्या आत घुमत, घुसमटत राहिलो..”
मग अजून निरर्थक मोठा झालो,
मग अजून निरर्थक गोष्टी (अजून जास्त लक्ष देऊन) शिकत राहिलो,
तो हाडाचा सापळा… त्यातली २०६ हाडे अन त्यांचे उपयोग...
बिचाऱ्या बेडकाचा प्रयोगाच्या नावाखाली Lab मधे (सगळ्यांनी मिळून केलेला) निर्घृण खून…
त्यामुळे कुपोषित झालेले बाहेरचे साप...
शिकलो तर काहीच नाही त्यात्न…
पण आमच्यामुळे असंख्य बेडकांचे आणि सापांचे
बलिदान मात्र व्यर्थ…
मग सुरु… पाणी म्हणजे H2O,
हवा म्हणजे Oxygen…
Derivatives म्हणजे …
म्हणजे Opposite To Integration…
दगड म्हणजे माती, माती म्हणजे…
Opposite To दगड,
कसल्यातरी Reactions, त्यांचे ते आगलावे Catalayst,
मग अनु, मग रेणू,
मग इलेक्ट्रोन, मग प्रोटोन…. Charge नसलेला फडतूस न्यूट्रोन,……………………….
त्या कसल्यातरी आवर्तसारणीत… 18 वर्षाच माझ अस्तित्व शोधत राहिलो…
दहावी नंतरची 2 वर्ष या असल्या Infinite कक्षेतेच फिरत राहिलो…
(2 वर्षे फिरून झाल्यावर कळलं… सुरु झालो
तिथच तर पोचलो)
मग परत Engg ..
एक 8 ओळींचं Degree Certificate… म्हणजे..
“काहीच न शिकवणाऱ्या… अर्थ-हीन शिक्षण-व्यवस्थेचा… कळस…”
म्हणजे फक्त फुकणे, पिणे, अन पोरी….
(पोरी… नकोच तो विषय…)
मग, “गुरुसमान” सर-ला उगीचच शिव्या -
पण रात्री Gate उघडणारा शिपाई म्हणजे देव…
मित्रांचे Copy केलेले Programme-
परीक्षेत Pen Drive मधन Run,
Dot Net म्हणजे ढेकळ, Java म्हणजे मोठी ढेकळ,
C म्हणजे शिव्या, C++ म्हणजे घाणेरड्या शिव्या…
Civil म्हणजे मित्राच शीटवरचं Copy केलेलं… स्वतःच पहिलं घर…
Truss म्हणजे फास… … ग्राफिक्स मधे तेवढा रस…
मनात बांधून ठेवाव्या अशा खूप गोष्टी होत्या इथ…
नाही अस नाही…
पण त्यातली एकही शिकण्याच्या Related नाही…
ना Gathering , ना ट्रीप, ना गाण्याच्या मैफिली, ना संदीप-सलिल च्या कविता,
ना कॅन्टीन, ना स्पोर्ट्स, ना नाटक, ना वासना, ना Heartbreak (प्रेम टाळतो. तसलं काही नसतं...)
लक्षात राहिल्या त्या… या असल्याच…
शिक्षणाशी घंटा संबंध नसलेल्या गोष्टी…
असलच काहीतरी Engg… मग चिडत-चिडत ते संपण्याआधीच तिसऱ्या वर्षीच सुरु झालेली ती Body-Shopping… अस्सल Placements!
म्हणजे
“तुटपुंज्या बुद्धीची… सपशेल.. खुली.. आणि बाजारभावाने..
College वाईज आणि कंपनी वाईज.. केलेली विक्री…”
अन 'Successfully विकलो गेलो' म्हणून रात्रभर हॉटेलात पिउन केलेलं “Celebration”...
Infy म्हणजे तेव्हाचा स्वर्ग…
काम सुरु होऊन दोन वर्ष उलटले की नर्क…
Cogni म्हणजे नुसता गोंधळ,
TCS म्हणजे प्रचंड संथपणा…
IBM म्हणजे फुकटचा मोठेपणा…
अर्थ कशालाच नाही…
“कपड्याच्या आतून सगळेच नागडे…”
सगळे जॉब म्हणजे… वरच्या म्हणीचे भक्कम पुरावे…
मग अजून मोठा… मग अजून राग, मग अजून चिड-चिड,
“थुंकू नका” वर थुंकत…
समाजाने सुधरावं म्हणून समाजाला शिव्या,
Triple Seat साठी, पोलिसात पैशे कोंबून, भ्रष्टाचारी राजकारण्यांना मात्र आई-बहिणीवर शिव्या…
मतदाना दिवशी घरीच उताणा,
पण “Right To Recall” यावा म्हणून देठापासून चर्चा…
“12 दिवस तग धरला अण्णा हाजाऱ्याने, अजून आठ-दहा दिवस लय होते का उपोषण धरायला??? म्हणत…
घरात बातम्या ऐकत ‘मटनावर’ ताव…
ह्या असल्याच संस्कृतीचे मग आमीपण एक “पिलर”…
यातनं बाहेर पडण्याआधीच…
मग लग्न…
ते नकोच…
पोराला जन्म देण्याच्या नावाख़ाली अन
'आपलं मानवीय अस्तित्व -आपल्या नंतरही टिकून रहावं' या माणसाच्या जागतिक कलेक्टिव स्वार्थी इच्छेपायी ,,
गेल्या जन्मातल्या कुणाचा तरी निरागस खून नको…
दिलाच जन्म -तरी आयुष्यभर त्याची ही वर-झालेली फरफट नको…
आता शेवटी असल्या "बाकी शुन्य” आयुष्याची बेरीज-वजाबाकी,
तिही नकोच….
शुन्य लांबच… उणे यायची व्याकूळ भीती…
असंच करत… का जगतोय ते कळायच्या आत,
बालपण अन तरुणपण निघून गेल, (म्हतार पण स्व-इच्छेने नकोच होत…)
आता त्यात आलंच परत…
अस्तित्वहीन प्रश्नांची उत्तरं शोधन…
नेमक कशासाठी जन्मलो? म्हणून.. मरताना पडायचे यक्ष् प्रश्न…
“समाधान एवढंच कि बरं झालं,
कमीत कमी जन्मल्या-क्षणी तरी “खरा” वागलो…
डोळे उघडायच्या आधी हवं तेवढं रडून घेतलं…”
या सगळ्याचा अंतीम-सार म्हणजे….....
शेवटी…
.
.
“हल्ली मी सगळीकडे…
जिवंत असल्यासारखा वावरतो…..”
---अर्थ-हीन...
प्रतिक्रिया
26 Oct 2016 - 5:00 pm | राजेंद्र देवी
जिवनाचा खरा अर्थ सांगानारी अर्थ-हीन आय टी चरित्र
खुप छान..