वारसा महाराष्ट्राचा

सोहम कामत's picture
सोहम कामत in जे न देखे रवी...
21 Oct 2016 - 3:06 pm

महाराष्ट्र.. आपली माय मराठी धर्ती.. आणि या धर्तीवर शिवकाळापासून अस्खलित बोल्ली जाणारी आपली मराठी मायबोली.. याच बोलीने वर्षानुवर्षे जतन केलेला महाराष्ट्राचा ऐतिहासिक आणि आधुनिक वारसा मी या कवितेतून सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.

कवितेच नाव आहे वारसा महाराष्ट्राचा...

वारसा महाराष्ट्राचा

हिंदोस्ताँ वंदितो तयाला अशी ही अपुली किर्ती..
निसर्गाचे ऐक्य सांगते माय मराठी धर्ती.. या महाराष्ट्राची धर्ती..

पराक्रमींची शूरवीरता संतांचे ते विचार..
महाराष्ट्राचे किल्ले करिती शिवरायांचा प्रचार..
क्रांतीकारी अन् पेशवाईचा लढा इथे कोरला..
प्रेम शांती समृद्धी सोबत संस्कारी ते आचार..
शूरवीरांचे शौर्य सांगते मर्द मराठी माती..
निसर्गाचे ऐक्य सांगते माय मराठी धर्ती.. या महाराष्ट्राची धर्ती..

तेहत्तीस कोटी दैवतांचा येथे असतो वास..
मल्हारी अन् विठ्ठल असती या भुमीचा श्वास..
समर्थ आणिक साईनाथ ते येथेचि जन्मले..
भाविक सेवा करी लेवूनि गजाननाचा ध्यास..
धर्माचे ते प्रेम सांगते मंत्र मराठी भक्ती..
निसर्गाचे ऐक्य सांगते माय मराठी धर्ती.. या महाराष्ट्राची धर्ती..

डहाणू ते वेंगुर्ला अखंड कोकण हा झुंजार..
बुलढाणा ते नागपूर तो विदर्भ अटकेपार..
सात समुद्रापार गरजते कोल्हापूरची किर्ती..
पुणे मुंबई शहरे असती पर्यटनाचे द्वार..
जिल्ह्यांचा भूगोल सांगते राज्य मराठी नीती..
निसर्गाचे ऐक्य सांगते माय मराठी धर्ती.. या महाराष्ट्राची धर्ती..

ख्रिश्चन मुस्लिम सिख हिंदू ते येथेचि वसतात..
नेकी आणिक एकीचा ते धडा नवा ध्यासतात..
मंदिर मश्जिद चर्च ती असती यांची श्रद्धास्थाने..
एकात्मिक त्या परंपरेचा वारसा ते जपतात..
माणुसकीचा अर्थ सांगते मित्र मराठी प्रिती..
निसर्गाचे ऐक्य सांगते माय मराठी धर्ती.. या महाराष्ट्राची धर्ती..

मुंबईत ते तंत्रज्ञान झाले अतिव प्रगत..
कोकणची ती माती करते पर्जन्याचे स्वागत..
मराठवाडा विदर्भ असती शेतीमध्ये अव्वल..
अन्नातून त्या प्रेम वाटते सातार्याची पंगत..
प्रगतीची ती दिशा सांगते तंत्र मराठी शक्ती..
निसर्गाचे ऐक्य सांगते माय मराठी धर्ती.. या महाराष्ट्राची धर्ती..

दुनियेच्या या प्रेमापोटी शेतकरी तो कसतो..
गणेशोत्सवी गल्लीत त्या टिळकांचा बाप्पा बसतो..
मन हे अपुले रंजित करते दशावतारी नाटक..
रायगडाचा इतिहास तो हृदयी अपुल्या वसतो..
परंपरेचे जतन सांगते सौख्य मराठी ज्ञाती..
निसर्गाचे ऐक्य सांगते माय मराठी धर्ती.. या महाराष्ट्राची धर्ती..

मर्द मराठी माती आणिक मंत्र मराठी भक्ती..
राज्य मराठी नीती आणिक मित्र मराठी प्रिती..
सार्या जगाची माऊली ही स्वराज्याची साऊली..
तंत्र मराठी शक्ती आणिक सौख्य मराठी ज्ञाती..
महाराष्ट्राचे गूज सांगते राष्ट्र मराठी जाती..
निसर्गाचे ऐक्य सांगते माय मराठी धर्ती.. या महाराष्ट्राची धर्ती..

हिंदोस्ताँ वंदितो तयाला अशी ही अपुली किर्ती..
निसर्गाचे ऐक्य सांगते माय मराठी धर्ती.. या महाराष्ट्राची धर्ती....

जय शिवाजी महाराज.. जय महाराष्ट्र..

संस्कृती