इंग्लंड भटकंती - भाग ३ - गर्नसे आयलंड

अभिजीत अवलिया's picture
अभिजीत अवलिया in भटकंती
12 Jul 2016 - 8:50 am

गेल्या भागाची लिंक
इंग्लंड भटकंती - भाग 2 - स्टोनहेंज, ओल्ड सेरम आणि सॅलिसबरी

खरे तर ह्या जागेबद्दल सर्वात शेवटी लिहिणार होतो. पण मिपावरच्या ताज्या खबरी नुसार आपले टवाळ कार्टा साहेब लंडनला निघाले आहेत आणि त्यांनी 'UK व्हिसावर कुठे कुठे भटकू शकतो?' असे विचारले आहे. तेव्हा लगेच हा भाग अगोदर लिहायला घेतला.

तर आम्ही पूल बंदराजवळच राहत होतो. त्यामुळे बंदरावर रोज एक तरी फेरी व्हायची. तेव्हा एकदा सहज पत्नी बंदरावर गेली असता तिथे पूल ते गर्नसे आयलंड जहाज फेरी असल्याचे कळले (Condor Ferries नाव होते फेरी चालवणार्या कंपनीचे). जहाज शनिवारी सकाळी 9 ला निघणार, 12 वाजता गर्नसे आयलंडला पोचणार आणि दुपारी 3 ला परत निघून 6 ला पूलला पोचणार असे वेळापत्रक होते.

फ्रान्सच्या अगदी जवळ असलेले गर्नसे आयलंड ही यु.के.ची 'Crown Dependency' आहे. म्हणजे जरी ते स्वतंत्र राष्ट असले तरी त्यांचे परकीय व्यवहार आणि सुरक्षा ह्याची जबाबदारी यु.के.ची आहे. गर्नसे आयलंडला जायला व्हिसा लागतो पण मी ICT (इंट्रा कंपनी ट्रान्स्फर) व्हिसा वर आलो असल्याने आम्हाला तिथे जायला वेगळ्या व्हिसाची गरज देखील न्हवती. आम्ही कधीही जहाजातून प्रवास केला नसल्याने त्याचा अनुभव घेण्यासाठी आम्ही जायचे ठरवले.

ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी पूलच्या हॅमवर्दी बंदरावर पोचलो. लगेच चेक इन करून जहाजावर गेलो.
जहाजावरुन दिसणारे पूल शहराचे आणी हॅमवर्दी बंदराचे दृश्य.

जी लोक गर्नसेला राहण्यासाठी जात होती ती कार वगैरे घेऊन आली होती आणी त्या गाड्या जहाजात लोड केल्या होत्या. थोड्याच वेळात जहाज समुद्रात दूरवर गेले आणि आम्ही वरती डेक वर येऊन बसलो. दूर दूर फक्त समुद्र आणि जहाजाच्या स्पीड मुळे लागणारा वारा.

जवळपास 3 तासाने जहाज गर्नसे आयलंडची राजधानी 'Saint Peter Port' ला पोचले . जहाजातून बाहेर आलो आणी समोर हे दिसले. बहुतेक लाईट हाऊस (?)

बंदावरून दिसणारे Saint Peter Port शहर.

2 मिनिटात शहरात प्रवेश केला.
सुरवातीलाच एक सुंदर क्लॉक टॉवर होता.

तो पाहून आम्ही पुढे गेलो आणी फक्त आश्चर्यचकित होऊन प्रत्येक रस्त्याने फिरत राहिलो.
संपूर्ण शहराला, शहरातील एकूण एक दुकानाला सुंदर फुलांनी सजवलेले होते. खरे सांगतो इतके सुंदर शहर आम्ही आयुष्यात दुसरे बघितले न्हवते. हा एक अतिसुखद धक्का होता. मग आम्ही तिथल्या शक्य होईल तितक्या रस्त्यांवरून फुलांची सजावट बघत वेळ घालवला. खाली काही फोटो.

फुलांनी सजवलेली दुकाने

चर्च

तिथे एक छोटी बाग देखील आहे. (कॅन्डी गार्डन). तिथे देखील थोडा वेळ गेलो.
बागेतून दिसणारे दृश्य

परत येताना दिसलेला एक सुंदर चौक

अवघे 3 तास मिळाल्याने आम्ही जास्त काही बघू शकलो नाही. आमचा मूळ उद्देश फक्त जहाजाचा प्रवास करण्याचा अनुभव घेणे हा होता. पण ह्या ठिकाणी किमान दोन दिवस राहण्यासाठी यायला हवे होते असे वाटायला लागले. ती हुरहूर आजही आमच्या मनात आहे. तरी यु.के. ला जाणाऱ्यांनी ह्या ठिकाणाला नक्की भेट द्यावी. आणि किमान एक दिवस तरी मुक्काम करावा असे सुचवेन. गर्नसे वरून पुढे जर्सी आयलंडला जायला देखील बोट मिळते. ते देखील असेच सुंदर असावे असा माझा कयास.

अजून एक
ह्या बेटाचे स्वतःचे चलन आहे. त्याची किंमत ब्रिटीश पौंड एवढी गणली जाते. इथल्या दुकानात ब्रिटीश पौंड स्वीकारला जातो पण यु.के. मध्ये गर्नसे पौंड स्वीकारला जात नाही.

गर्नसे पौंडची नोट

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

12 Jul 2016 - 9:09 am | प्रमोद देर्देकर

तीनही भाग वाचले , खुप छान चालली आहे सफर.

टवाळ कार्टा's picture

12 Jul 2016 - 10:36 am | टवाळ कार्टा

आयाया...लैच आवडली ही जागा पण मला अर्ध्यातासाचा बोटीचा प्रवास पण झेपत नाही...लगेच माझा वकार युनुस होउन जातो :(

सुहास बांदल's picture

19 Aug 2016 - 1:35 pm | सुहास बांदल

अतिशय सुंदर जागा आहे. इतकी वर्षे आम्ही इंग्लंड ला आहोत पण अजून तिकडे जायचा योग नाही आला पण लवकर च येईल असे वाटत आहे.

अमितदादा's picture

19 Aug 2016 - 1:58 pm | अमितदादा

छान सफर..पहिला भाग जास्त आवडला..

पद्मावति's picture

19 Aug 2016 - 2:23 pm | पद्मावति

वाह, काय सुंदर ठिकाण आहे. मस्तं सुरू आहे तुमची भटकंती.

इकडे कायला युके चा विसा चालतो का? की वेगळा शेंजेन विसा लागतो

अभिजीत अवलिया's picture

19 Aug 2016 - 10:43 pm | अभिजीत अवलिया

@विजूभाऊ
- यू.के.चा व्हिसा चालतो. पण त्यातला कुठला कुठला असेल तर इथे प्रवेश मिळेल हे मला माहीत नाही. माझ्याकडे इंट्रा कंपनी ट्रान्स्फरी व्हिसा होता.