परत स्मार्टफोन!

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
1 Jul 2016 - 3:31 pm

(अडीच वर्षांपूर्वी लिहिलेल्या 'माझा पहिला स्मार्टफोन' या लेखाचा दुसरा भाग)
आधीच्या लेखाचा दुवा खालीलप्रमाणे
http://www.misalpav.com/node/27462

कलीयुगातले हजार वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाच्या घड्याळातला एक सेकंद असतो असं म्हणतात. यासारखंच एक नवीन समीकरण आता रुजू झालंय. आपल्या आयुष्यातल्या एका वर्षात तंत्रज्ञान एका युगाने समोर जातंय. या अनुषंगाने मोबाईल क्रांती विषयी बोलायचे झाल्यास, फक्त सहा महिन्यापूर्वी घेतलेला लेटेस्ट स्मार्टफोन तुम्ही अश्मयुगात असल्याची ग्वाही देतो. सध्याच्या काळात आय फोन ६ एस वापरणारेसुद्धा आय फोन ६ वाल्यांकडे ,"सो मिडलक्लास!" अश्या नजरेने बघतात. आयफोन वन वगैरे तर हडप्पा संस्कृतीसोबतच नामशेष झालेत. अश्यावेळी तब्बल अडीच युगे जुना असलेला माझा स्मार्टफोन (आयफोन नाही !) जेंव्हा मी चारचौघात बाहेर काढतो तेंव्हा काय होत असेल विचार करा. क्रेडीट कार्डच्या जमान्यात एखाद्याने डी-मार्ट किंवा बिग-बझारमध्ये चुकून रेशन कार्ड दाखवले तर त्याचं जे आदरातिथ्य होईल तेच माझं होते. कितीतरी लोकांनी मला,"अरे फोन फार स्वस्त झालेत आजकाल, घेऊन टाक नवीन." वगैरे सल्ले दिलेत. 'फार स्वस्त' ह्या शब्दाची व्याप्ती हल्ली पन्नास हजारापर्यंत गेली आहे. यावर सुद्धा त्यांचे उत्तर तयार असते. ते म्हणतात,"तुरडाळ कशी खातोस २०० रुपयांची ! मग चांगला फोन घ्यायला काय होते?" बहुधा अच्छे दिन,अच्छे दिन म्हणतात ते हेच असावे. म्हणजे गरिबी ही एक मानसिक अवस्था असून काहीही झालं तरी आपण खानदानी श्रीमंत आहोत ही भावना सोडायची नाही!

असो. तर लोकलज्जेस्तव मी नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करू लागलो. आता एकवेळ प्रश्न फक्त आर्थिक असता तर गोष्ट वेगळी होती पण आमचं तसं नाही ना. स्मार्टफोन किंवा एकंदरीतच तंत्रज्ञानाच्या बाबतीत आमचं अज्ञान हे दिवसागणिक अपडेट होतं असतं. म्हणजे अडीच वर्षात तंत्रज्ञान जर अडीच युगे समोर गेलं असेल तर आम्ही अडीच हजार प्रकाशवर्षे मागे गेलेलो आहे. (इथं प्रकाशवर्ष म्हणजे 'आमच्या डोक्यात प्रकाश पडायला लागणारा वेळ' असं गृहीत धरलंय!) माझ्या सध्याच्या स्मार्ट्फोनमध्ये असलेल्या कितीतरी गोष्टी मला आत्ता कुठे उलगडायला लागल्या होत्या. ते पॅटर्न लॉक कसं करायचं हे मोबाईल घेतेवेळी दुकानदाराने मला सांगितलं होतं, त्यानंतर आजवर ते कुठून करायचं हे मला सापडलेलं नाहीये. मी काहीही न करता फोनमधले अँप्लिकेशन्स अपडेट का होतात हे आणखी एक न उलगडलेलं कोडं ! म्हणजे अँप्लिकेशन्स उगाचच अपडेट होणार...ते जास्त जागा घेणार..मग मला हवे असलेले अँप्लिकेशन्स घ्यायला जागा नाही उरणार..घेतलेच तर त्यामुळे फोन स्लो होणार...आणि चारचौघात ह्याविषयी तक्रार केली की," तुला कशाला हवे एवढे अँप्लिकेशन्स?" असं म्हणून आमच्याच अकलेचे धिंडवडे निघणार !! 32 जीबी मेमरी कार्ड असलेला माझा फोन स्लो झालाय म्हणून मी दुकानदाराला दाखवल्यावर तो म्हणाला," साहेब किती डाटा भरलाय तुम्ही? प्रोसेसरवर लोड येतं अशाने.होणारच ना फोन स्लो." अरे मग बत्तीस जीबी जागा काय म्हशी बांधायला वापरायची का? मला ह्यातलं जास्त कळत नाही पण एखाद्या प्रोसेसरला जर इतका डाटा झेपत नसेल तर त्या दोघांचं लग्न तरी का लावण्यात येतं ? कोअर टू डीओ अन् डीओ टू ऑक्ट्रा वगैरे जाहिराती हेच लोकं करतात ना? म्हणजे पंधरा-वीस हजार रुपये मोजून या स्पेसिफिकेशनचा फोन घ्यायचा आणि त्याला देवघरात ठेऊन रोज हळद कुंकू वाहायचं अशी अपेक्षा असते का ? स्मार्ट्फोनविषयी काही प्रश्न हे कधीच विचारायचे नसतात हे गेल्या अडीच वर्षात माझ्या लक्षात आलंय. उदाहरणार्थ १.स्मार्टफोनचं आयुष्य किती ? चुकून तुम्ही हा प्रश्न विचारलाच तर," वो आप यूज कैसे करते हैं उसपे डिपेंड है. पानी मे भिग गया तो खराब हो सकता हैं." असले उत्तरं येतात. आता स्मार्टफोन आपण बदाम भिजवल्यासारखा पाण्यात भिजवून ठेवतो का? शंभरातला एखादा फोन चुकून पाण्यात पडतो. त्याचा इथे काय संबंध? पण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर न देणं हा प्रगत तंत्रज्ञानाचा पाया आहे!

हे असं सगळं असताना नवीन फोन कसा निवडायचा या विचारात मी पडलो. मागच्या वेळी मदत केलेल्या दोन्ही भावांनी आता माझ्या अज्ञानासमोर सपशेल शरणागती पत्करली होती. "तेव्हढं सोडून काहीही बोल", या शब्दात माझा प्रस्ताव फेटाळला गेला. त्यांच्या मते अडीच हजार वर्षे उशिरा जन्मलेल्या माझ्यासाठी नोकिया 3310 हाच एकमेव पर्याय आहे. (तसं नोकिया आणि माझ्यात काहीतरी साम्य नक्कीच आहे. तंत्रज्ञान डोक्यावरून जायला लागल्यावर त्यांनाही कंपनी विकावीच लागली ना! त्यांना मायक्रोसॉफ्टने घेतलं म्हणून त्यांचं तेव्हढं कौतुक अन आमचे धिंडवडे! नोकियाची ही गाथा आज केस स्टडी म्हणून अभ्यासली जाते तशी माझी गाथा 'गेलेली केस' स्टडी म्हणून का अभ्यासली जाऊ नये असा एक विचार उगाचच माझ्या डोक्यात येऊन गेला.) शेवटी कुठूनही मदत मिळणारं नाही हे कळल्यावर मी स्वतः संशोधन सुरू केलं. संशोधनाचा आधीच अध्याहृत असलेला पहिला निष्कर्ष : आमचं बजेट आणि मोबाईलच्या किमती ह्यांचं प्रमाण व्यस्त आहे. (बेसिकली ही बाब आमच्या कोणत्याही खरेदीला लागू होते!) म्हणजे फोन न घेण्याचं सबळ कारण मिळणार. मग संशोधनाचा शेवटचा निष्कर्ष निघणार,

" मला हव्या असलेल्या स्पेसिफिकेशनचा फोन मार्केटमध्ये योग्य किमतीत उपलध नसल्यामुळे, नवीन फोन घेणे तूर्तास स्थगित करण्यात येत आहे"

रीड बिटवीन दि लाईन्सच्या सिद्धांतानुसार वरील निष्कर्षांचा खरा अर्थ खालीलप्रमाणे,

"मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या फोनचे स्पेसिफिकेशन माझ्या गरज आणि आकलनक्षमतेपेक्षा कितीतरी प्रकाशवर्षे दूर असल्यामुळे, नवीन फोन घेणे किमतीचे कारण देऊन तूर्तास स्थगित करण्यात येत आहे!”
--चिनार
http://chinarsjoshi.blogspot.in/

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

ब़जरबट्टू's picture

1 Jul 2016 - 3:43 pm | ब़जरबट्टू

मस्त.. आवडले.
मोबाईल म्हणजे ती गाढव आणि मालक याची कथा आहे.. घेतला तरी लोक म्हणतात, नाही घेतला तरी ,...
शेवटी ऐकावे जणांचे, करावे मनाचे, हेच ...

राजाभाउ's picture

1 Jul 2016 - 5:02 pm | राजाभाउ

:) १०० % पटल्ं

टवाळ कार्टा's picture

1 Jul 2016 - 3:55 pm | टवाळ कार्टा

खि खि खि....मस्तय

मराठी कथालेखक's picture

1 Jul 2016 - 3:59 pm | मराठी कथालेखक

हा हा... मस्त !! नकाच घेवू स्मार्टफोन.. तसंही माणूस स्मार्ट असला म्हणजे झालं ..त्याचं कौतूक करण्याऐवजी त्या फोनचं कशाला उगाच कौतूक :)

कंजूस's picture

1 Jul 2016 - 4:33 pm | कंजूस

ख्याक्

पैसा's picture

1 Jul 2016 - 4:50 pm | पैसा

=))

राजाभाउ's picture

1 Jul 2016 - 5:02 pm | राजाभाउ

हा हा पु वा. मस्तय !!!

नाखु's picture

1 Jul 2016 - 5:15 pm | नाखु


"चिनार्या तू मुळ्चाच स्मार्ट आहेस्,हे स्मार्ट फोनचं खूळ डोक्यातून काढून टाक, आणि एखादी स्मार्ट..... थांब होल्ड कर जरा यांनी हाक मारली कशाला तरी........."

मि सा मा

बरं झालं माई योग्य ठिकाणी थांबलीस ते...तुझ्या नातसुनेने थयथयाट केला असता नाहीतर...
बाकी मी स्मार्ट आहे हे तुझ्या नातसुनेला पण समजावून सांग की...तिच्या मते मी म्हणजे मुलखाचा वेंधळा ...!!

अजया's picture

1 Jul 2016 - 6:08 pm | अजया

माझीच कथा आणि व्यथा लिहिली आहेस रे चिना-या ;)

मुक्त विहारि's picture

1 Jul 2016 - 6:21 pm | मुक्त विहारि

येड्याचा बाजार.

ज्यांच्याकडे वेळ आणि पैसा भरपूर आहे, त्यांच्यासाठी योग्य.

जव्हेरगंज's picture

1 Jul 2016 - 6:38 pm | जव्हेरगंज

मस्त!!

उल्का's picture

1 Jul 2016 - 7:12 pm | उल्का

मस्त!

संदीप डांगे's picture

1 Jul 2016 - 7:22 pm | संदीप डांगे

एक से एक पंचेस राजेहो!.... कल्ला नुस्ता :)

आमच्या स्मार्टफोनने 'राम म्हणून' आज सहा महिने झाले, तेवापासून साधा फिचरफोन वापरत आहे. कॉल करणे-घेणे, व एसएमएस वाचणे (फिचरफोनवर एसएमएस टाईप करणे अगदी बालवाडीत घेऊन जाते). क्काहीसुद्धा बिघडले नाही!!! आता तर बजेटमधे असेल तरी स्मार्टफोन घ्यावाच वाटत नाही. पुढचे पुढे बघू....

अंतु बर्वा's picture

1 Jul 2016 - 8:19 pm | अंतु बर्वा

राजेहो! ची एक गंमत सांगतो. लहानपणी आमच्या शेजारी एक विदर्भातील कुटंब राहत होतं. कुटुंबात कोण तर दोघे बॅचलर भाउ. आम्हा बच्चे कंपनीचं त्यांच्याशी चांगल जुळायच म्हणुन आम्ही बर्याच वेळा तिकडे पडीक असायचो. तर तिथुन मला इथुन तिथुन सर्व वाक्यांत 'राजा' म्हणायची सवय लागली. त्या वयात नवीन गोष्टी बघुन बघुन इमिटेशन करायची खुप सवय होती मला. मित्रा मित्रांमधे ठिक होतं, पण एकदा वडीलांना चुकुन राजा म्हणता म्हणता आपली चुक होतीये हे समजल्याबरोबर इंप्रोवायजेशन करुन रा...जे..हो असं काहीतरी बोललो. त्यानंतर वडीलांनी असं काही रागाने माझ्याकडे पाहिलं की आजतागायत परत कुणाला राजेहो म्हणायच धाडस झालं नाही :-)

अवांतरः त्यानंतर काही वर्षांनी त्याच कुटुंबातील एकाच्या लग्नासाठी नागपुर आणि यवतमाळला जाण्याचा योग आला.. आणि तिकडची गरमी, खास वैदर्भी पद्धतीचं जेवण आणि माणसं पहायला मिळाली. मजा आली होती, संधी मिळाल्यास परत नक्की जायला आवडेल मला :-)

बाकी स्मार्ट्फोन वरचे पंचेस सहीच आहेत. मलाही ३-४ महीन्यांपुर्वी नवीन फोन घेताना असच कन्फुजायला झालं होतं :-)

संदीप डांगे's picture

1 Jul 2016 - 8:58 pm | संदीप डांगे

मजा आली होती, संधी मिळाल्यास परत नक्की जायला आवडेल मला :-)
कदीबी या, व्होल वावर इज अवर... :)

सुबोध खरे's picture

1 Jul 2016 - 7:44 pm | सुबोध खरे

गेली सहा वर्षे स्मार्ट फोन वापरत आहे.अगोदर ३G होते. दीड वर्षांपासून ४ G तंत्रज्ञान वापरत आहे. ५. ५ इंचाचा स्मार्टफोन वर. बिल १.२ GB डेटा आणि फोन कॉल मिळून रुपये ५००/- च्या आसपास येते.
एक अतिशय उत्तम सुविधा आहे. कुठेही रिकामे बसलेले असताना किंवा गाडीतून प्रवास करताना एखादा वैद्यकशास्त्रातील नवीन लेख किंवा वर्तमानपत्र किंवा तत्सम वाचन करता येते. बऱ्याच नवीन गोष्टी समजू शकतात. नकाशे, माहिती, शेअर बाजाराशी संपर्क सर्व गोष्टी सहज करता येतात. एखादी सुविधा/ नवीन तंत्रज्ञान कसे वापरायचे याचे तारतम्य असेल तर त्याचा अमाप उपयोग करता येतो. व्हॉटस ऍप/ चेपू वर किती वेळ घालवायचा हे ज्याचे त्याला कळले पाहिजे. व्यसन आपणच लावून घेतो आणि तंत्रज्ञानाला शिव्या देतो.
धारदार सुरीने स्वयंपाकही करता येतो किंवा खून/ आत्महत्याही करता येते.
मॉर्फीनने प्राणही वाचवता येतात किंवा व्यसनाधीन होऊन आयुष्य बरबादी करता येते.
काय करायचे आहे ते तुम्ही ठरवा.

मंदार कात्रे's picture

1 Jul 2016 - 7:50 pm | मंदार कात्रे

माझा झियोमी एम आय फोर आय पावसात भिजल्याने बन्द पड्ला आहे ४/५ दिवस . म्हणून सिमकार्ड नोकिया १११० मध्ये टाकून वापरतोय. तेव्हा समजले आपण व्हाट्सॅप चे अ‍ॅडिक्ट झालो आहोत . पेटीएम , रेल्वे बुकिंग अ‍ॅप आणि मोबल्यावरून फेबु वापरायची एवढी सवय झालीये की कसेतरीच वाटतेय फोन शिवाय ... नाइलाज म्हणून लॅपटॉप वर तीन वर्षापूर्वी टाकलेल्या ब्ल्यूस्टॅक्स प्लॅटफॉर्म वरुन व्हॉट्सॅप वापरतोय .....

रच्याकने फोन पावसात भिजल्याने बूटलूप होत आहे .... उपाय माहित आहे का कोणाला? अजिबात चालू होत नसल्याने फ्लॅशिन्ग साठी रिकव्हरी फाइल टाकता येत नाही . मेमरी इन्बिल्ट असल्याने लोच्या झालाय

सुबोध खरे's picture

1 Jul 2016 - 8:05 pm | सुबोध खरे

एक महत्त्वाची सूचना. घरात एक स्मार्टफोन अतिरिक्त (SPARE) असावा म्हणजे घरातील कोणाचाही फोन बिघडला किंवा दुरुस्तीसाठी गेला तर अडत नाही. कोणत्याही गोष्टी वाचून आपले "अडू नये" ही आदर्श परिस्थिती आहे. वॊशिंग मशीन टी व्ही, मिक्सर किंवा फ्रिज बिघडला तरीही फार त्रास होतो( बायकांना विचारुन पहा)
फार काय एखादा दिवस घरात बायको नसेल तरी भरपूर अडचण होते.
तेंव्हा स्मार्ट फोननेच काय घोडं मारलंय?

भराल? जरा दुसर्या प्रतिसादासाठी ठेवा ना ! (कृ ह घ्या)

एक महत्त्वाची सूचना. घरात एक स्मार्टफोन अतिरिक्त (SPARE) असावा म्हणजे घरातील कोणाचाही फोन बिघडला किंवा दुरुस्तीसाठी गेला तर अडत नाही. कोणत्याही गोष्टी वाचून आपले "अडू नये" ही आदर्श परिस्थिती आहे. वॊशिंग मशीन टी व्ही, मिक्सर किंवा फ्रिज बिघडला तरीही फार त्रास होतो( बायकांना विचारुन पहा)
फार काय एखादा दिवस घरात बायको नसेल तरी भरपूर अडचण होते.
तेंव्हा स्मार्ट फोननेच काय घोडं मारलंय?

ठळक शब्दांचे आसपास आपल्या मगदुरावर आणि जबाबदारीवर शब्द भरावेत.
पुढील माहीतीसाठी मंडळातच भेटणे (हा चिमण्या कुठे गेलाय कुणास ठाऊक)

खुलासेदार नाखु

भंकस बाबा's picture

1 Jul 2016 - 9:59 pm | भंकस बाबा

लेख मस्तच जमवलाय, मी सध्या मोटो इ 3rd जेनरेशन वापरतो , च्यामारि आमच्या हपिसात शिपायाकडे यापेक्षा महागातला फोन आहे. माझे काम होते पण हे कुचाळके मलबारहिलवाल्यानी धाराविवाल्याकड़े बघावे असे बघतात, च्यामारि माझ्याकडे चहा देखिल मागत नाही

सुबोध खरे's picture

2 Jul 2016 - 10:02 am | सुबोध खरे

चांगलं आहे की तुम्हीच त्याच्या कडे चहा मागा.
बाकी तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची अंगापेक्षा बॉंगा मोठा अशी स्थिती असते. "जमाने को दिखाना है" ही वृत्ती असते कारण त्यांची प्रतिष्ठा त्यावर अवलंबून असते.
हिरानंदानी रुग्णालयात असताना माझ्या एक्स रे तंत्रज्ञाकडे त्याच्या एक महिन्याच्या पगाराच्या किमतीचा मोबाईल होता आणि माझ्याकडे त्याच्या १/३ किमतीचा. एक दिवस त्याचा मोबाईल हरवला आणि तो अक्षरशः रडत होता.
तुमची प्रतिष्ठा ही तुमच्या वैयक्तिक कौशल्यावर अवलंबून असावी. ती तुमच्या मोबाईल मोटार सायकल किंवा मोटार वर नसावी.

रातराणी's picture

1 Jul 2016 - 11:35 pm | रातराणी

ही ही भारीये!

अनिरुद्ध प्रभू's picture

2 Jul 2016 - 9:33 am | अनिरुद्ध प्रभू

फक्कड जमलाय हो लेख!!!

बाकी मोबाईल तंत्रज्ञान हा आमचा फ्री हिट चा विषय आहे......

बरं मग मी कुठला स्मार्टफोन घेऊ याचा सल्ला द्या. ;-)

सुबोध खरे's picture

2 Jul 2016 - 10:41 am | सुबोध खरे

आपले बजेट काय आणि आपली गरज काय? यांवरून ४-५ फोन सुचवता येतील यानंतर निर्णय आपण घ्यायचा असतो.

ब्लॅकबेरी ( महाग असला तरी ) ,मायक्रोसॅाफ्ट चे फोन्स हे 'क्रिएशन'साठी चांगले असतात,भक्कम आणि ओएस सिक्युअर आहे .स्लो होत नाहीत,मेमरी कमी पडत नाही.यांची रॅम वापरण्याची आणि आवरून स्वच्छ ठेवण्याचा कोड भयानक अचूक काम करतो.क्लिनर अॅप,अँटिवायरस अॅपची अजिबात जरूर नसते.

इतर ब्रांडचे फोन्स 'अॅक्सेससाठी' उत्तम.त्यातून इंटरनेट ब्यान्किंगवगैरे धोकादायक ठरू शकते.

बाकी घरातले वाइफाइ वापरून मोबाइल वापरणाय्रांनी 4G फोन्स घेण्याचे काहीच कारण नाही.स्वतंत्रपणे मोबाइल सिमवरचे नेट अति जलद असायला आपण काय इतक्या महत्त्वाच्या खरडी पाठवत असतो?ट्विटर वापरावे.अतिवेगाने जगात संदेश जातो 2Gवरही.

सुबोध खरे's picture

2 Jul 2016 - 11:28 am | सुबोध खरे

बाकी घरातले वाइफाइ वापरून मोबाइल वापरणाय्रांनी 4G फोन्स घेण्याचे काहीच कारण नाही
याच्याशी असहमत.
पंख्याने काम चालते मग एसी ची गरज काय? असे म्हणण्यासारखे आहे.
४ G फोन घेणे ही भविष्यातील तरतूद आहे. आज २G फोन घेतला तर सहा महिन्यातच आपला फोन कालबाह्य होईल आणि आपल्याला उपयुक्त गोष्टी उपलब्ध नाहीत याची जाणीव होईल.
विंडो XP चा संगणक आज घेण्यात काय हशील आहे?(जरी ती प्रणाली भक्कम होती.)
४G चे बिल २ किंवा ३G इतकेच येते. पण एखाद्या वेळेस आपले महत्त्वाचे कागदपत्र पाठवायचे असतील तर ४G ची सुविधा फार उपयुक्त ठरते. माझ्या बदलापूर येथील घरासाठी महानगर गॅसची जोडणी घ्यायची होती. माझ्या मित्राने त्याचा फॉर्म व्हॉटस आप वर पाठवला तो मी ४G वर काही क्षणात उतरवून घेतला त्याचा प्रिंट आउट घेतला आणि पाच मिनिटात धनादेशाबरोबर पाठवलाही. दुसऱ्या मित्राच्या २G तंत्रज्ञानाच्या फोन वर तो दोन वेळेस अडकला. ( मी त्याला माझ्या फॉर्मची कॉपि दिली).
ही सर्व सुविधा आहे. वापराल तर फायदा होईल. नसेल तर आपल्याला काय सुविधा उपलब्ध होऊ शकतात याची कल्पनाच येणार नाही.( you wont know what you are missing)

२जी नाही हो ते फारच जुने आहे.३जी वर काम होते की एक मिनिटात.

अनिरुद्ध प्रभू's picture

4 Jul 2016 - 3:41 pm | अनिरुद्ध प्रभू

मोबाइल घेताना तीन गोष्टी महत्वाच्या,
१) नक्कि काय आणि कसा वापर करणार आहोत?
२) किंमतीची मर्यादा (कमाल आणि किमान सुद्धा)
३) किती वेळ वापरणार आहोत?

या तीन गोष्टीचीं उत्तर स्वतःला अगदी व्यवस्थीत ठाउक असतील तर कोणताच प्रश्न उद्भवत नाही.

बाकी ब्रॅण्ड, फिचर्स वैगरे फिचर्स्वरच्या तीन उत्तरांमुळे सोप होतं....

अनिरुद्ध....

सर्वांना धन्यवाद. पण हा विनोदनिर्मितीचा एक क्षीण प्रयत्न होता. प्रतिसादातली स्मायली त्यासाठीच होती. म्हणजे मला असे म्हणायचे होते की, 'चिनारभाऊ, तुम्ही स्मार्टफोनच्या बाबतीत डम्ब असाल; पण तुमच्यापेक्षा मी जास्त डम्ब आहे. तेव्हा तुम्ही मला सल्ला द्या, मी कोणता मोबाईल घेऊ! ;-) ;-) ;-) '.

*आता तीन-तीन स्मायल्या टाकल्या आहेत.

सुबोध खरे's picture

6 Jul 2016 - 8:01 pm | सुबोध खरे

प्रभू साहेब
आधुनिक तंत्रज्ञान हे असे आहे की ते वापरल्याशिवाय त्याची आपल्याला गरज आहे का हे समजत नाही. आणि एकदा ते वापरायला लागलात तर त्याच्या वाचून पान हलत नाही अशी स्थिती येऊ शकते.
उदा. सोनी कंपनीने वॉकमन हा छोटा टेप प्लेयर बाजारात आणला तेंव्हा इतर कंपन्यांनी, अनेक ध्वनी तंत्रज्ञांनी आणि लोकांनी त्यांना वेड्यात काढले. याची गरजच काय आणि हे कोण विकत घेणार? पैशाचा अपव्यय इ इ. परंतु अल्पावधीत तो इतका लोकप्रिय झाला की या सर्व कंपन्यांना आपला स्वतःचा टेप प्लेयर बाजारात उतरवावा लागला.
त्यामुळे आपण म्हणता तशा तीन गोष्टी सकृतदर्शनी महत्त्वाच्या वाटल्या तरी एकदा चांगला मोबाईल वापरू लागत की त्याची उपयुक्तता आपल्याला जाणवू लागते. फ्रिज येईपर्यंत माठातले पाणी चालू असते तसेच.

बोलबोलेरो's picture

2 Jul 2016 - 10:07 am | बोलबोलेरो

पण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर न देणं हा प्रगत तंत्रज्ञानाचा पाया आहे!
हे वाक्य त्याच्या शब्दशः भयानक अर्थासह सरसकट सर्व मोबाईल कंपन्या, विक्रेते आणि सर्विस सेन्टर्सना लागू पडते. सॅमसुंग, सोनी, मायक्रोमॅक्स, नोकिया इ चे स्मार्टफोन वापरूनही अबसेन्ट माईंडेड राहिलेला
बोलबोलेरो

एकवेळ बायको नसली तर चालते पण पंखा लागतोच.

चिनार's picture

2 Jul 2016 - 5:11 pm | चिनार

धन्यवाद !!!!

किसन शिंदे's picture

2 Jul 2016 - 5:16 pm | किसन शिंदे

जबरी लेख आणि डाॅकच्या सगळ्या प्रतिसादांशी सहमत. तंत्रज्ञानाचा चांगल्या रितीने फायदा करून घेता आला पाहीजे.

चिनार's picture

4 Jul 2016 - 11:17 am | चिनार

धन्यवाद !!!!

मित्रहो's picture

4 Jul 2016 - 1:18 pm | मित्रहो

मस्त
सहमत की तंत्रज्ञानाचा चांगल्या रितीने फायदा करून घेता आला पाहीजे

सस्नेह's picture

4 Jul 2016 - 1:28 pm | सस्नेह

माझीच व्यथा ही.
मेमरी कार्डाच्या रिकाम्या जागेत अगदी म्हशी नाही, तरी सैपाकघराच्या फळीवरचे चार डबे तरी मावावेत म्हणते मी.
रच्याकने , अखेर कोणता फोन ठरवला ते सांगणे.

अकिलिज's picture

6 Jul 2016 - 7:48 pm | अकिलिज

जशी गोठ्यातली घाण काढायला लागते तशी ईथलीही. अधून मधून हवे असलेले फोटो पीसी वरती उतरवून घेऊन बाकीचे काढून टाकले, उगाच न लागणारी अ‍ॅप्स उडवून लावली तर कोठलाही स्मार्टफोन चांगला चालतो.

असा अंदाजे चार वर्षे वापरुन मग फोनला राम राम म्हटला. १५ ते २० हजार फोनवारी दर चार वर्षाला हे मनाला एकदा पटवल्यावर मग फार दुःख होत नाही.

फोन चांगला राहाण्यासाठी काही पथ्ये पाळावी लागतात
१) फोन कम्प्युटरला जोडू नये,
२) दुसय्रांच्या फोनातून ब्लुटुथने गाणी घेऊ नये,
३) थर्ड पार्टी अॅपस वापरू नये
४) नवीन फोन हातात आल्यावर त्यातले सर्व सेटिंगज पाहून ठेवावेत/लिहून ठेवावेत आणि नंतरच चेंज करावेत.नंतर पुर्ण रिसेट मारण्याऐवजी गरजेच्या संशयास्पद सेटिंग्ज बदलून सुधारणे सोपे जाते.
५) नवीन फोनासाठी जुन्या फोनातले कॅान्टॅक्ट्स कुठल्या अॅपने अथवा व्हाया कम्प्युटरने भरू नये.हळूहळू एकेक सेव करावेत.
६) फोन अचानक स्लो वाटू लागल्यास अगोदरच्या दोन दिवसात केलेल्या कामगिरीतच दोष सापडतो.नवीन अॅप अथवा सेटिंग्जमधला बदल हे कारण असते.अॅप उडवावे.ब्लुटुथने घेललेल्या फाईल्स काढाव्यात.

टवाळ कार्टा's picture

6 Jul 2016 - 10:27 pm | टवाळ कार्टा

१) फोन कम्प्युटरला जोडू नये,

असे का?