बँकॉक: धावती भेट: २ पारंपरिक थाई घर

आतिवास's picture
आतिवास in भटकंती
17 Jun 2016 - 11:52 pm

भाग १

आता मी चालले होते ती एक 'पारंपरिक थाई घर' पाहायला. एखादी पारंपरिक गोष्ट मुद्दाम जतन करून ठेवावी लागते म्हणजे तिचं अस्तित्व त्या विशिष्ट समाजातून नाहीसं झालं आहे असा एक सरळ निष्कर्ष निघतो – जो नेहमीच खरा असतो असं नाही. ही पारंपारिक गोष्ट (मूल्य असेल, कर्मकांड असेल, उत्सव असेल...) तिची उपयुक्तता नाहीशी झाल्याने नष्ट झाली? की आर्थिक-सामाजिक-राजकीय रेट्यामुळे नष्ट झाली याचा अंदाज घेण्यातही एक वेगळी मजा असते हे मात्र खरं.

कोणत्याही ठिकाणच्या पारंपरिक ठिकाणांना भेट देताना माझ्या मनात अनेकदा एक द्वन्द्व असतं. परंपरा चांगल्या आणि वाईट दोन्ही असतात हे मान्य केलं तरी त्या परंपरा न पाळणा-या माणसांना त्यांचं चांगलं-वाइटपण ठरवता येतं का हा एक प्रश्न उरतो. माणसाचं शोषण करणा-या परंपरा, रूढी, कर्मकांड वाईट असतात याविषयी सर्वसाधारणपणे दुमत नसावं. दुस-या समाजाच्या – देशाच्या परंपरा कौतुकाने पाहायला जाताना त्या आपल्याला नेमक्या समजतील का याचा विचार करावा लागतो. ही परंपरा स्थानिक माणसानं जतन करण्याऐवजी त्या देशात आलेल्या विदेशी व्यक्तीने जतन केली असेल तर गोंधळ आणखीच वाढतो.
असो. तर मी येऊन पोचले Jim Thompson House Museum ला.

जिम

इथं १५० Baht (थाई चलन) प्रवेशशुल्क होतं. (शंभर भारतीय रूपये म्हणजे ५२ किंवा ५३ Baht ). प्रवेशद्वारात एक छोटं मंदिर दिसलं.

स्पिरिट हाऊस

बहुसंख्या थाई घरांमध्ये आणि व्यावसायिक इमारतींमध्ये पुढच्या अंगणात असं मंदिर असतं. मी सवयीने मंदिर असा शब्द वापरला असला तरी प्रत्यक्षात हे Spirit House आहे. नऊ प्रकारचे Guardian spirit असतात आणि ते घराचं रक्षण करतात अशी लोकांची श्रद्धा आहे.

इथल्या बहुसंख्य कर्मचारी स्त्रिया होत्या आणि त्या उत्तम इंग्रजी बोलत होत्या. प्रवेश घेताना मार्गदर्शक (टूर गाईड) भाषा निवडायला स्थानिक भाषा, आंग्ल, फ्रेंच, जर्मन असे बरेच पर्याय उपलब्ध होते. प्रवेश घेणा-या प्रत्येक व्यक्तीला निवडलेल्या भाषेनुसार गटवार वेळ दिला जात होता. एका गटात साधारण आठ-दहा लोक होते. घरात काहीही नेण्याची अगदी कॅमेरा आणि मोबाईलही नेण्याची परवानगी नव्हती. सामान ठेवण्यासाठी कुलुपबंद कप्प्यांची (लॉकर्स) उत्तम व्यवस्था होती. अर्धा तास घराच्या अंतर्भागात फिरून आल्यावर परिसराचे फोटो काढायला परवानगी होती. एकंदर अनुभव व्यावसायिक कार्यक्षमतेचा होता.

Jim Thompson हे अमेरिकन वास्तुरचनाकार (architect). दुस-या महायुद्धात त्यांचा सहभाग होता. महायुद्ध संपल्यावर ते बँकॉकला आले आणि थाईलँडच्या प्रेमात पडले. पुढं २५ वर्ष ते बँकॉकमध्येच राहिले. त्यांचा सिल्कचा मोठा व्यवसाय होता. थाईलँडमधल्या सिल्क व्यवसायाला आणि एकंदरच उद्योगजगताला उर्जितावस्था आणण्यात जिम यांचे योगदान मोलाचे होते. १९६७ मध्ये ते मलेशियातून गूढ रीत्या नाहीसे झाले, त्यांचा मृतदेहदेखील सापडला नाही.

हे गृह संग्रहालय म्हणजे खरं तर सहा वेगवेगळी घरं आहेत. देशातल्या सहा वेगवेगळ्या ठिकाणची घरं जिम यांनी विकत घेतली. ही घरं सागवानी लाकडाची आहेत. ती त्या त्या जागेवर सुटी केली आणि बँकॉकमध्ये आणून पुन्हा उभी केली. त्यामुळे एकाच जागी सहा स्थापत्य परंपरांचा संगम इथं पाहायला मिळतो.

बँकॉकमध्ये पावसाळ्यात हमखास पूर येतो. त्यामुळे घरं थेट जमिनीवर न बांधता लाकडी खांबांच्या आधारावर बांधायची पद्धत होती. छपरं लाल कौलाची होती. घराच्या भिंतींना बाहेरून लाल (की गेरू) रंग द्यायची पद्धत होती. घरांची पुनर्बांधणी करताना पारंपरिक पूजा वगैरे केल्या गेल्या होत्या.

घरात प्रवेश करताना चपला बाहेर काढून ठेवायला सांगितलं गेलं. आणि घरात देशोदेशीच्या मूल्यवान वस्तू आहेत. स्वयंपाकगृह, झोपण्याची खोली अशा वेगवेगळ्या खोल्या आहेत. घरात भरपूर दारं आणि खिडक्या आहेत. समोरच्या खिडकीला काच आहे असं वाटत असताना आमची मार्गदर्शिका ते ओलांडून गेली आणि मी चकित झाले. मग आम्ही सगळेच त्या खिडकीतून गेलो. पण तो दृष्टिभ्रम कसा काय निर्माण केला गेला हे मात्र समजलं नाही.

या घराच्या परिसरातली ही काही प्रकाशचित्रं.
जोडलेली घरं
घरं

सजावट

सजावट

घराचे रक्षक - हे अनेक प्रकारचे दिसले.
रक्षक

दारावरंचं कोरीवकाम

कोरीवकाम

अशा अनेक मूर्ती आहेत
मूर्ती

आणखी एका प्रवेशद्वाराकडं जाताना
प्रवेशद्वार

घराची शैली - बाहेरून दिसणारी

स्टाईल

मार्गदर्शिका माहिती सांगते आहे
गाईड

हे झाड मला फार आवडलं...
झाड

एक गोष्ट मात्र मजेदार आहे. या देशात ‘बुद्ध’ या शब्दाचा उच्चार ‘बूढा’ असा करतात – म्हणजे निदान मला तरी तो तसाच ऐकू आला. आणि प्रत्येक वेळी तो शब्द ऐकताना विचित्र वाटायचं. तसंच ‘खाखूनखाSS’ असं बोलण्यात दर दोन-चार मिनिटांनी येतंच. विचारल्यावर कळलं की ‘खाखूनखाSS’ म्हणजे ‘आभारी आहे, धन्यवाद’.

बँकॉकच्या गगनचुंबी इमारती पाहताना हे 'पारंपरिक घर संग्रहालय' म्हणजे लयाला गेलेल्या इतिहासाची एक खूण आहे हे मात्र जाणवत राहिलं.

येताना वाटेत आणखी काही मॉल्स दिसले. एका मॉलच्या बाहेर असे अनेकजण उभे होते

पुतळे
बरेच लोक त्यांच्यासोबत हौसेने फोटो काढत होते.
रस्त्याने येताजाता जाणवलेली एक गोष्ट म्हणजे बँकॉक शहरात अगदी पावलोपावली 'मनी एक्स्चेंज ' आहेत. जगभरातून सतत लोक (टूरिस्ट) इथं येत असताता म्हणून जागोजागी चलन बदलण्याची अशी सोय असावी.
दिवसभरात सुमारे सात किलोमीटर चालले होते मी. उद्या कुठं जावं याचा विचार करत हॉटेलमध्ये परतले.
क्रमश:

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

18 Jun 2016 - 12:00 am | यशोधरा

ते झाड एकदम देखणं आहे :)

कवितानागेश's picture

18 Jun 2016 - 12:30 am | कवितानागेश

आवडला हा भाग.

पद्मावति's picture

18 Jun 2016 - 1:32 am | पद्मावति

मस्तं!

रुपी's picture

18 Jun 2016 - 2:19 am | रुपी

छान

प्रचेतस's picture

18 Jun 2016 - 6:32 am | प्रचेतस

टुमदार घर आहे अगदी.

सुधीर कांदळकर's picture

18 Jun 2016 - 7:31 am | सुधीर कांदळकर

मस्त लेख आणि छायाचित्रांबद्दल खाखूनखा.

जाताजाता
एखादी पारंपरिक गोष्ट मुद्दाम जतन करून ठेवावी लागते म्हणजे तिचं आस्तित्व

मी पण हा शब्द अनेक वर्षे असाच म्ह्णजे आ ने सुरू होणारा लिहीत होतो. एका सिनीअर ग्रंथपालबाईंनी दोनचार वर्षांपूर्वी माझा कान पिळला आणि हा शब्द अस्तित्त्व असा म्हणजे अ ने सुरू होणारा आहे म्हणून सांगितले. माझ्याकडच्या शब्दकोषातही अस्तित्त्व असेच आढळले. माझ्यासारखीच गफलत करणारी निदान एक व्यक्ती आहे हे पाहून बरे वाटले.

आतिवास's picture

18 Jun 2016 - 8:28 am | आतिवास

चूक लक्षात आणून दिल्याबद्दल.

जगप्रवासी's picture

18 Jun 2016 - 1:54 pm | जगप्रवासी

हाही भाग आवडला

आतिवास's picture

18 Jun 2016 - 5:05 pm | आतिवास

'आस्तित्व' हा चुकीचा शब्द बदलून 'अस्तित्व' असा योग्य शब्द टाकला आहे.
अधिक माहितीसाठी 'स्पिरिट हाऊस'चा दुवा दिला आहे.

आतिवास's picture

20 Jun 2016 - 9:28 am | आतिवास

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.

मुक्त विहारि's picture

20 Jun 2016 - 1:28 pm | मुक्त विहारि

पुभाप्र.

चांदणे संदीप's picture

20 Jun 2016 - 4:45 pm | चांदणे संदीप

या लेखावरून सर्फ करीत जॉनभाऊला सगळ्या इंटरनेटवर धुंडाळला पण माणूस सापडेल तर शप्पथ!!

असो, पुभाप्र!

Sandy

कसा सापडेल? ;) तो जिमभाऊ आहे!

आतिवास's picture

21 Jun 2016 - 8:29 am | आतिवास

जालावर भरपूर माहिती आहे. लेखातला पहिला दुवा पाहावा.

समीरसूर's picture

21 Jun 2016 - 10:16 am | समीरसूर

सुरेख लेख!

एप्रिल २०१५ मध्ये आम्ही थायलंडच्या छोट्या सहलीवर (पाच दिवस) गेलो होतो त्याची आठवण झाली. आमची अर्थात बुफे सहल होती. सगळं तयार! कुठेच काही प्रयत्न करण्याची गरज नाही. सहल कंपनी आम्हाला सगळीकडे नेत होती, मस्त भारतीय जेवण, नाष्ता देत होती, शिवाय कुठे कुठे आईस क्रीम, शहाळे वगैरे देत होती. अशा सहली बहुधा अळणी वाटतात. फक्त सहल कंपनीचे वेळापत्रक सांभाळायचे; बाकी सगळं त्यांच्यावर सोडून निवांत व्हायचं. पण अशा सहलीत स्थानिक जनजीवन जवळून अनुभवायला मिळत नाही. लहान मुलांच्या सहलीसारखं वाटतं. पण मला अशा सहली सोयीस्कर वाटतात. अशा सहलीचे फायदे आहेत तसे तोटे ही आहेतच. वरील लेखात वर्णन केलेलं संग्रहालय आम्ही पाहिलं नाही. ते आमच्या मेनूमध्ये नव्हतं. पण जे जे पाहिलं ते सगळं छान होतं. कोरल आयलंडचे वाटर स्पोर्ट्स, तिथले सुंदर बीच, तो अथांग साऊथ चायना सी, अंडरसी वॉक वगैरे मस्त होतं. पटायाच्या पटाया टोवरच्या पन्नासाव्या मजल्यावरून दोरीला लटकून खाली येणे हा तर थरारक अनुभव होता. पेरासेलिंग मस्त होते. पटायाचा समुद्रालगतचा रस्ता खूप देखणा होता. अगदी मायामीच्या ओशन ड्राईव्हची आठवण यावी असा. तिथले ते निवांत बार्स, तंगड्या पसरून आरामात पहुडलेले गोरे पाहुणे, वगैरे मस्तच होतं. आम्ही रात्री त्या रस्त्यावर पायी फिरलो बराच वेळ. अल्काझार शो देखणा होता.

त्या शोमधल्या सगळ्या सुंदर ललना या ललना नव्हत्याच हे कळल्यावर आम्ही स्तंभित झालो होतो. पटायाची जेम्स गेलरी पण छान होती. नोंगनूच व्हिलेजमध्ये वाघ जबरदस्त होते. पण त्यांची दयनीय अवस्था बघून वाईट वाटले. बाकी नोंगनूच फार भारी नाही वाटले. सफारीमध्ये बरेच प्राणी पहायला मिळाले. बेंकोकमध्ये गोल्डन बुद्ध बघून मी हरखून गेलो होतो. सुंदर मूर्ती. स्वच्छ मंदिर. रिक्लायनिंग बुद्ध पण सुरेख होता. रिव्हर चाओ फ्राया स्वच्छ वाटली.

थायलंड हा छोटा देश आहे पण शिस्तीच्या आणि कल्पकतेच्या बळावर त्यांनी पर्यटनाला मुख्य आधार मानून खूप प्रगती केली आहे. पर्यटनाच्या बाबतीत त्यांनी अमेरिकेचा कित्ता गिरवल्यासारखे वाटले. प्रत्येक छोट्या छोट्या आकर्षणाचे व्यावसायिक नियोजन अफलातून वाटले. शिवाय सगळीकडे स्वच्छता, ठिकठिकाणी स्वच्छतागृहे (स्वच्छ असलेली), वाय-फायची मुबलक उपलब्धता, उत्तम सेवा या प्राथमिक बाबींवर नेमका भर दिल्याने पर्यटकांचे वास्तव्य आरामदायक होते. पर्यटकांची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर काळजी काळजी घेतली तर पर्यटन व्यवसाय बहरतो हे थायलंडमध्ये सिद्ध होते.

थायलंडमध्ये खूप भव्य-दिव्य किंवा नेत्रदीपक असे पाहण्यासारखे खरे तर काहीही नाही पण योग्य नियोजन आणि पर्यटकांची सोय यावर भर दिल्याने थायलंड हा जगातला पहिल्या दहामधला सर्वाधिक पर्यटकांनी भेट दिलेला देश आहे. भारतीय लोकांविषयी मात्र त्यांच्या मनात आकस दिसला. अर्थात भारतीय पर्यटक त्याला जबाबदार आहेत यात शंकाच नाही. कुठेही कसेही बेशिस्त आणि आक्रस्ताळेपणाने वागणे आणि तिथल्या स्थानिक संस्कृतीचा, लोकांचा, त्यांच्या कष्टाळूपणाचा आदर न ठेवणे हे भारतीय पर्यटकांचे स्वभाव वैशिष्ट्य आहे. हुल्लडबाजी, अरेरावी हे अजून दोन संतापजनक दुर्गुण!

मला थायलंड आवडले. शांत, सुंदर आणि आतिथ्यशील!

नुकताच मी पुण्यातल्या पर्वतीवर जाऊन आलो. १०-१२ परदेशी पाहुणे पर्वती पहायला आले होते. शांतपणे पेशवाईबद्दलची माहिती त्यांच्या गाईडकडून ऐकून घेत होते. खरं तर पर्वती टूमदार आहे. तिथून पुण्याचा नजारा सुरेख दिसतो. तिथली मंदिरेदेखील देखणी आहेत. पण पायथ्याशीच झोपडपट्टी, तिथल्या स्वच्छतागृहाचा येणारा भयंकर वास, पायर्यांवर घाण, द्वाराच्या बाहेर छोट्या टपर्या, वरचे घाणेरडे स्वच्छतागृह, कळकट हॉटेल, जवळच वाहणारा नाला...पर्यटन कसे सुखावह होईल? वरच्या सुंदर अशा पेशवा संग्रहालयातली धूळ कित्येक महिने स्वच्छ केलेली नव्हती. कुणी नीट माहिती देणारे नव्हते. खाली परदेशी पाहुण्यांना आराम वाटेल असे रेस्टोरंट्स नाहीत. आहेत त्या गलिच्छ टपर्या. शेजारी पर्वती औद्योगिक वसाहत आणि बकाल झोपडपट्टी. पर्यटनासाठी अनुकूल स्थळे असूनदेखील पर्यटन वाढणार कसे? भारतीय लोक कधी शहाणे होणार माहित नाही.