चित्रपट पटकन समजण्यात मी थोडी मंदच आहे. पिक्चर बघितल्या बघितल्या सिनेमेटोग्राफी, बॅकग्राऊंड म्यूझिक इत्यादी गोष्टींबद्दल चर्चा करणार्यांबद्दल भयंकर आदर आहे मला. मला तर चित्रपटभर फक्त आणि फक्त कथा दिसत राहते. अतिशय चांगला चित्रपट असेल, तर एकसंध अशा कथेतून बाहेरच्या जगात आलं की एकदम हरवायला, बिचकायला होतं. काही दिवस ती कथा मनाच्या मागे रेंगाळत राहते, आणि मग एकदम कधीतरी अनपेक्षितपणे ती पूर्णपणे जाणवते.
स्पॉटलाईटबद्दल झालं असं, की ती खरीखुरी घडलेली गोष्ट आहे हे माहित होतं. इतकंच काय, त्या बॉस्टन ग्लोबच्या बातमीबद्दल पेपरात वाचलेलंही आठवत होतं. त्यामुळे त्या भरकटून टाकणाऱ्या बाहेरच्या जगातून त्याच जगाबद्दल बोलणाऱ्या कथेत शिरायचीच इच्छा नव्हती. पण ऑस्कर मिळालेले चित्रपट बघून पश्चात्ताप नक्कीच होत नाही असा विचार करून बघितला. स्पॉईलर देण्यासारखं काहीही फारसं नसणारी, पण तरी खिळवून ठेवणारी ती अनपेक्षितरित्या सादर केली गेलेली अपेक्षित कथा खूप खूप विचारात पाडून गेली. एकसंध कसली, एका ओळीत संपणारी कथा आहे ती. ‘चर्चमधील धर्मगुरूंनी केलेल्या मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल एका वृत्तपत्रातील विभागाने केलेली संशोधनपर वृत्तमाला’ या एवढ्या कथावस्तूवर हा चित्रपट उभा आहे. धर्माशी निगडित संवेदनशील घटना, आणि पत्रकारितेसारखा आक्रस्ताळेपणास पूर्ण वाव देणारा विषय. किती प्रकारे हा चित्रपट चुकू शकला असता, त्याची गणतीच नाही. पण उथळपणाला अगदी एकूणच फाटा देऊन, संथ, एका लयीत चालत हा चित्रपट पुढे जातो. अस्वस्थ करतो, पण डोळे डबडबवत नाही, विचार करण्यास भाग पाडतो.
बॉस्टन ग्लोब या वृत्तपत्रात बॉस्टनबाहेरून आलेला मार्टी बॅरन हा नवीन संपादक. तो नवीन बदल काय करणार याच्या चर्चा रंगलेल्या असतानाच तो ‘स्पॉटलाईट’ टीमच्या लीडरला बोलावून घेतो. एखादी बातमी घेऊन तिच्यावर महिनोनमहिने मेहनत घेऊन, तिच्या मुळाशी जाऊन मग बातमी छापणारी स्पॉटलाईटची टीम. तशा आर्थिक अडचणीतून जाणाऱ्या वृत्तपत्राला हे असलं काहीतरी म्हणजे खायला काळच. पण बॅरन या टीमची पद्धत समजावून घेतो, त्यांना एका बातमीवर खोलात जाऊन काम करायला सुचवतो. मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या धर्मगुरूंना शिक्षा होत नाही, त्यांची फक्त इकडून तिकडे बदली केली जाते, आणि याबद्दल चर्चच्या वरच्या सूत्रांना पूर्णपणे माहिती आहे, अशी कुणकुण घेऊन हा त्या बातमीच्या फॉलो अपचा प्रवास सुरू होतो.
यापुढे हा चित्रपट म्हणजे पत्रकारितेच्या विश्वाचं उत्कृष्ट दर्शन आहे. त्यांच्या फाईलिंग सिस्टम सारख्या छोट्या छोट्या, पण महत्वाच्या गोष्टी पण आपल्याला पहायला मिळतात. या टीमची या गोष्टीच्या मुळाशी जाण्याची धडपड, ती चिकाटी, धार्मिक संस्थेबद्दल विषय असल्याने सर्व काही नाजुकपणे हाताळण्याची संवेदनशीलता, बळी आणि आरोपी या दोन्ही घटकांच्या मानसिकतेचा उहापोह, या सगळ्याचं इतकं समर्थ चित्रण आहे, की आपल्याला बोट धरून त्या प्रक्रियेतून फिरवल्यासारखं वाटतं. धर्माच्या विरोधात लढायचा वगैरे अजेंडा घेऊन मैदानात उतरलेले नसल्याने एक एक गोष्ट उलगडत गेल्यावर पारंपारिक वातावरणात वाढलेल्या टीममेंबर्सना येणारी अस्वस्थता, हताशा छोट्या छोट्या प्रसंगांमधून अप्रतिम टिपलेली आहे. पण त्याचसोबत त्यांच्या अंगी बाणलेला आवश्यक तो पत्रकारी अलिप्तपणा तितकाच जाणवत राहतो. धर्मसंस्थेकडे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असणारी ताकद अशीच निरनिराळ्या प्रसंगांमधून दिसत राहते. याच्या परिणामांची कल्पना असूनही या टीमच्या मनात बातमी छापण्याबद्दल किंतु नाही, किंवा ‘आम्हीच ते जगाचे क्रांतिकारी तारणहार’ असा आवही नाही. आक्रस्ताळेपणा, भडकाऊपणाचा तर इतका अभाव आहे, की चित्रपट बघत नसून एखादं पुस्तक वाचत असल्यासारखं वाटतं.
टॉम मकार्थीच्या ‘स्पॉटलाईट’बद्दल असं याहून जास्त काही मला लिहिता येणारं नाही. तो चित्रपट ही अनुभवण्याची गोष्ट आहे. फक्त केवळ एक ‘कथा’ यापलीकडे जाऊन चित्रपट या माध्यमात काय काय मांडलं जाऊ शकतं आणि या मांडणीत अतिशय प्रगल्भपणे संयतपणा कसा जपला जाऊ शकतो याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून हा चित्रपट माझ्या कायम स्मरणात राहील.
प्रतिक्रिया
10 Jun 2016 - 4:53 pm | एस
सुंदर लिहिलेय.
10 Jun 2016 - 4:57 pm | प्रीत-मोहर
अतिशय सुरेख पिशे :)
14 Jun 2016 - 9:52 pm | Maharani
Khupach chan olakh karun dilis....nakki baghin
14 Jun 2016 - 10:02 pm | मिहिर
एका अतिशय सुंदर चित्रपटाची छान ओळख. आक्रस्ताळेपणा, भडकाऊपणा ह्यांचा अभाव आणि टीममेंबर्सना येणारी अस्वस्थता ह्याच्याशी तर अगदी सहमत. चित्रपट पाहिल्यावर अनेक दिवस युट्युबवर मूळ पत्रकार आणि काम करणारे अभिनेते ह्यांच्या जितक्या मिळतील तितक्या मुलाखती बघत होतो.
सुंदर लेखाबद्दल आभार.
14 Jun 2016 - 10:11 pm | कैलासवासी सोन्याबापु
सुंदर परिचय! वॉचलिस्ट मध्ये स्पॉटलाईट जोडला गेला आहे.
14 Jun 2016 - 10:12 pm | स्रुजा
वाह ! तू अगदी पेशा म्हणुन स्विकारलंस चित्रपट परिक्षण तरी चालेल. पाहिन आता हा सिनेमा. माझ्या खात्यातल्या व्हिपलॅश च्या दणदणीत अॅडिशनचं श्रेय ही तुझंच.
14 Jun 2016 - 10:30 pm | योगेश कोकरे
खुप छान आहे चित्रपट. इतक्या मनापासुन काम करणारे लोक खुप कमी आहेत. बाकि ह्या चित्रपतमुळे हि पोप लोक पण किती खालच्या पातळीवर गेलेली अहेत हे समजले. "रुम" नावाचा एक चित्रपट बघन्यासारखा आहे.
14 Jun 2016 - 11:49 pm | रेवती
चित्रपटाची ओळख आवडली. पाहण्यात येईल. यूट्यूबवर आत्ता ट्रेलर पाहिल्यावर जरा कसंतरी झालं.
14 Jun 2016 - 11:49 pm | रेवती
चित्रपटाची ओळख आवडली. पाहण्यात येईल. यूट्यूबवर आत्ता ट्रेलर पाहिल्यावर जरा कसंतरी झालं.
15 Jun 2016 - 1:28 am | पद्मावति
सुंदर ओळख.
15 Jun 2016 - 9:28 am | असंका
सुरेख!!
धन्यवाद!
15 Jun 2016 - 11:22 am | अजया
अप्रतिम ओळख.चित्रपट नक्कीच बघावासा वाटतोय तू लिहिलेलं वाचून.
15 Jun 2016 - 11:37 am | सुबक ठेंगणी
Don't judge the book by the movie असं म्हणतात. पण इथे सिनेमा बघताना (प्रत्यक्षात नसलेलं) पुस्तक वाचल्याचा भास होतोय म्हणजे क्या बात है!
बघितलाच जाईल.
15 Jun 2016 - 2:39 pm | पिशी अबोली
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद!
सर्वांनी हा चित्रपट नक्की पहावा. खूप वेगळा आहे. :)
15 Jun 2016 - 2:52 pm | आतिवास
चित्रपट पाहिला असल्याने ती पटलीही.
15 Jun 2016 - 2:59 pm | वेल्लाभट
खूप आवडलं हे परीक्षण. बघायचा आहेच तो... आता उत्कंठा वाढली मात्र.
15 Jun 2016 - 3:59 pm | प्रचेतस
स्पॉटलाईट पाहिलाय.
मार्क रफेलो नेहमीप्रमाणेच इथेही प्रभावित करतो. मायकेल कीटनचा रॉबीही उल्लेखनीय.
15 Jun 2016 - 9:47 pm | पिशी अबोली
अभिनय तर उत्कृष्ट आहेच.रफेलो आवडलाच अतिशय..
15 Jun 2016 - 4:21 pm | अनिरुद्ध प्रभू
छान लिहिलय.....पुलेशु
15 Jun 2016 - 4:46 pm | अभ्या..
कथा जबरी आहे म्हणातेस, मग पाहायलाच हवा.
15 Jun 2016 - 7:13 pm | सखी
ओळख आवडली - पहायला पाहीजे आता.
15 Jun 2016 - 9:47 pm | पिशी अबोली
धन्यवाद!