अॅगाथा क्रिस्ती (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

जुइ's picture
जुइ in लेखमाला
20 Apr 2016 - 7:16 am

Header

मर्डर इज अनाउन्सड!!

शsssssssss खून झाला आहे! "A Murder is announced" मर्डर मिस्टरीज वाचणार्‍यांसाठी परिचित असे हे वाक्य आणि कादंबरी देखील. या कादंबरीची लेखिका आहे Queen of crime म्हणून नावाजलेली अ‍ॅगाथा क्रिस्ती. १५ सप्टेंबर १८९० साली Agatha Mary Clarissa Miller चा जन्म अमेरिकन वडील आणि ब्रिटिश आईच्या पोटी Torquay इंग्लंड येथे झाला. वडील तिला घरीच शिकवायचे, तरी आईचे मत मात्र अ‍ॅगाथाने ८व्या वर्षापर्यंत काहीच शिकू नये असे होते. त्यामुळे कंटाळलेली अ‍ॅगाथा पाच वर्षांची होईपर्यंत स्वतःच्या प्रयत्नाने वाचायला शिकली. अ‍ॅगाथा लहान वयातच नृत्याबरोबर कविता लिहू लागली. अ‍ॅगाथा अकरा वर्षांची असतानाच तिच्या वडिलांचा अकाली मृत्यू झाला. या घटनेनंतर अ‍ॅगाथा आपल्या आईच्या अधिक जवळ आली. त्यानंतर ती पियानोवादन आणि गायनही शिकली. कालांतराने अठराव्या वर्षी ती छोट्या कथा लिहू लागली ज्या पुढे १९३० साली एकत्रितरीत्या प्रकाशित झाल्या. काही वर्षांनंतर अ‍ॅगाथा तिच्या आईबरोबर तीन महिन्यांसाठी कैरो येथे गेली. तिथे तिला उत्खनन स्थळांपेक्षा संध्याकाळच्या पार्ट्यांमध्ये मध्ये अधिक रुची वाटली!!

१९१४ साली आर्ची क्रिस्ती बरोबर तिने प्रेम विवाह केला. मात्र लग्नानंतर आर्ची महायुद्धात लढायला गेला. त्यानंतर काही वर्षांनंतर मात्र तो पुन्हा लंडन येथे परतला. याच दरम्यान आपल्या बहिणी बरोबर लावलेल्या पैजेखातर अ‍ॅगाथाने हेरकथा लेखन प्रारंभ केले.

आणि Hercule Poirot चा जन्म झाला...

१९१९ हे साल हे अ‍ॅगाथा आणि आर्चीसाठी संस्मरणीय ठरले. तिची पहिली कादंबरी 'The Mysterious Affair at Styles' ही प्रकाशित झाली तसेच त्यांच्या पहिल्या मुलीचा जन्म झाला. शिवाय प्रकाशक कंपनी कडून अजून पाच कादंबर्‍यासाठी प्रस्ताव आला. त्या काळी पहिल्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये सर्वत्र बेल्जियन शरणार्थी दिसत होते. अ‍ॅगाथाला वाटले की एक माजी बेल्जियन पोलिस अधिकारी चांगला डिटेक्टिव्ह होऊ शकतो. उंचीने कमी असलेला पण ऐटबाज मिशा ठेवलेला आणि कडक शिस्तीचा असा हाच तो Hercule Poirot जो अ‍ॅगाथाच्या पहिल्या कादंबरी मधून पहिल्यांदा वाचकांसमोर आला.

आत्मस्तुती करण्यात अगदी वाकबगार असा Poirot, The Mystery of the Blue Train कादंबरीत म्हणतो, "My name is Hercule Poirot, and I am probably the greatest detective in the world." Hercule Poirot इतका प्रसिद्ध झाला की अ‍ॅगाथाने त्याला केंद्रस्थानी ठेवून आणखी ३३ कादंबर्‍या आणि ५४ लहान गोष्टी लिहिल्या. त्यात Murder On The Orient Express आणि Death On Nile यांचा समावेश आहे. मात्र Hercule Poirot च्या स्वभावाचा स्वतः अ‍ॅगाथाला इतका कंटाळा आला की तिने Poirot केंद्रस्थानी असलेली शेवटची कादंबरी १९४०च्या दशकात लिहून तिजोरीत बंद करून ठेवली होती. अखेर १९७४ साली ती प्रकाशित झाली. ही कादंबरी प्रकाशित झाल्यावर Poirot या एकमेव काल्पनिक व्यक्तिरेखेवर न्यूयॉर्क टाइम्स मध्ये श्रद्धांजली छापली गेली ;-). Hercule Poirot ची व्यक्तिरेखा अनेक कलाकारांनी पडद्यावर साकार केली. सर्वात दीर्घकाळ David Suchet या कलाकाराने साकारली. त्याने ही व्यक्तिरेखा १९८९ ते २०१३ या काळात साकार केली. Hercule Poirot च्या जन्माला २०१६ साली १०० वर्ष पूर्ण झाली कारण The Mysterious Affair at Styles ही कादंबरी १९१६ सालीच लिहून पूर्णं झाली होती.

Book

Hercule Poirotच्या भुमिकेत अभिनेता David Suchet

David Suchet

पहिल्या कादंबरीच्या यशानंतर तिने आणखी काही कादंबर्‍या लिहिल्या. त्यात मिस मार्पलची यशस्वी निर्मिती देखील सामील आहे. Hercule Poirotच्या अगदी विरुद्ध अशी मिस मार्पलची शैली आणि व्यक्तिमत्व प्रथम १९२७ साली The Tuesday Night Club या छोट्या गोष्टीतून वाचकांसमोर आले. १९३० साली The Murder at the Vicarage ही मिस मार्पल असलेली कादंबरी वाचकांमध्ये लोकप्रिय झाली. मिस मार्पल ही एक छोट्या गावामध्ये राहिलेली सजग आणि उत्तम गुप्तहेर. अ‍ॅगाथा म्हणते की मिस मार्पलच्या व्यक्तिरेखेवर तीच्या आजीचा खूप प्रभाव होता. मिस मार्पलची व्यक्तिरेखा अनेक कलाकारांनी पडद्यावर साकार केली. त्यात Joan Hickson हिने ही व्यक्तिरेखा १९८४ ते १९९२ पर्यंत सादर केली.

मिस मार्पलच्या भूमिकेत Joan Hickson.

marple

अ‍ॅगाथाच्या आईच्या मृत्यूनंतर ती व आर्ची यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि एक अनाकलनीय घटना घडली. मुलीला दाई जवळ सोपवून अ‍ॅगाथा गाडी चालवत कुठेशी गेली. कुठे जात आहे हे काही कोणाला तिने सांगितले नव्हते. तिची गाडी दुसर्‍या दिवशी काही मैलांवर सोडून दिलेली आढळली. देशभर तिचा शोध सुरू झाला. काय झाले कसे झाले असेल या बाबत वृत्तपत्रांत आणि लोकांमध्ये वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात होते. झाले असे होते की ती निघून किंग्ज क्रॉस स्टेशनवर पोचली होती. तिथून पुढे ती ट्रेनने Harrogate येथे गेली. तिथल्या 'Harrogate हॉटेल आणि स्पा' मध्ये Theresa Neale या नावाने रूम बुक केली. हॉटेलच्या कर्मचार्‍यानी तिला ओळखले आणि पोलिसांना कळवले. आर्ची जेव्हा तिला ओळखायला आला तेव्हा तिने त्याला तर ओळखले नाहीच आणि तिला स्वतः बद्दलही काही आठवत नव्हते. अ‍ॅगाथाने या घटनेचा पुन्हा कधीच उल्लेख केला नाही. तीला अ‍ॅम्नेशिया झाला होता त्यावर तिने मानसोपचार घेतले व त्यातून बरी झाली व आपले लेखन पुढे चालू ठेवले.

Grand Hotel या स्पॅनिश मालिकेत तरुण अ‍ॅगाथाची पाहुणी व्यक्तिरेखा दाखवली होती. मालिकेतील इतर व्यक्तिरेखा पाहून तिला कादंबर्‍यांसाठी कल्पना सुचल्याचे दाखवले आहे. The Mousetrap हेही असेच एक रहस्यमय नाटक अ‍ॅगाथाने लिहिले. दीर्घकाळ चाललेले हे नाटक १९५२ साली प्रथम मंचावर आले. या नाटकाचा पंचवीस हजारावा प्रयोग १८ डिसेंबर २०१२ रोजी पार पडला. हे नाटक सुरुवातीला अ‍ॅगाथा लिखित 'Three Blind Mice' नावाने सुरुवातीला रेडिओवर प्रक्षेपित होत होते.

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 'बेस्ट सेलिंग नॉव्हेलिस्ट ऑफ ऑल टाइम' म्हणून अ‍ॅगाथाचे नाव नोंदवले गेले आहे. अ‍ॅगाथा क्रिस्तीचे लेखन थोडेथोडके नव्हे तर सुमारे १०० भाषांमध्ये भाषांतरित केले गेले आहे. सर्वाधिक संख्येने अनुवाद झालेल्या पुस्तकांच्या लेखकांमध्ये तिचे नाव आघाडीवर आहे. And Then There Were None ही अ‍ॅगाथाची कादंबरी सर्वाधिक खप झालेली आहे. या कादंबरीच्या आजवर १० कोटीहून अधिक प्रती खपल्या आहेत, जो एक विक्रम समजला जातो. तिच्या साहित्यिक योगदाना बद्दल तिला १९७१ साली Dame Commander हा ब्रिटिश साम्राज्याचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला. विशेष असे की अ‍ॅगाथाचा दुसरा पती Max Mallowan याला पुरातत्त्व क्षेत्रातील कामगिरीसाठी १९६८ साली Sir किताबाने सन्मानित करण्यात आले होते Sir आणि Dame Commander हा सन्मान फार थोड्या दांपत्यांना मिळाला आहे.

अ‍ॅगाथाची शैलीही अशी की एकदा कादंबरी वाचायला सुरुवात केली की शेवटपर्यंत ठेववत नाही. तिने लिहिलेल्या कादंबर्‍यांमधे शेवटी गुन्हेगार म्हणून सिद्ध होणार्‍यांमध्ये कधी पोलिस, स्वतः निवेदक, कधी मृत व्यक्ती किंवा अगदी कुणीतरी अनोळखी व्यक्तिरेखा असे असू शकते. बर्‍याच कादंबर्‍यामध्ये शेवटी गुप्तहेर सर्व संशयितांना एकत्र करून आपले शोधकार्य कसे झाले याचे वर्णन करतो आणि गुन्हेगाराचे नाव जाहीर करतो. काही वेळा गुन्हेगाराचे नाव सांगून त्या व्यक्तीलाच गुन्हा कसा घडला याचे स्पष्टीकरण सांगायला लावतो. अ‍ॅगाथाच्या काही कादंबर्‍यांची नाव बालगीतांवर आधारीत आहेत जसे की 'And Then There Were None', 'One, Two, Buckle My Shoe', 'Five Little Pigs', 'Crooked House', 'A Pocket Full of Rye', 'Hickory Dickory Dock', 'Three Blind Mice' इत्यादी.

संपन्न आणि परिपूर्ण आयुष्य जगल्यावर अ‍ॅगाथा क्रिस्तीचा मृत्यू १२ जानेवारी १९७६ रोजी झाला. तिच्या मृत्यूच्या इतक्या वर्षांनंतरही अ‍ॅगाथा तिच्या साहित्यिक योगदानाबद्दल वाचकांच्या स्मरणात आहे आणि पुढेही राहिल.

माहितीचे स्रोत - अ‍ॅगाथा क्रिस्तीचे विकी पेज आणि संकेतस्थळ.

Footer

प्रतिक्रिया

अॅगाथा क्रिस्ती युगानुयुगे वाचकांना आपल्या गुप्तहेर कथांनी भुलवतच राहणार!
आवडत्या लेखिकेवरचा छान लेख.धन्यवाद जुइ!

बोका-ए-आझम's picture

28 Apr 2016 - 7:27 am | बोका-ए-आझम

आगाथा ख्रिस्तीचा मी अगदी प्रचंड जोरात फिरणारा पंखा आहे. त्यामुळे कितीही लिहिलंत तरी मला तो लेख छोटाच वाटणार! बायबल आणि शेक्सपिअर यांच्यानंतर खप असलेली पुस्तकं आगाथाचीच. लेख छानच! मला स्वतःला Hercule Poirot च्या कादंबऱ्यांमध्ये Murder on the Links, Peril at End House, Death on the Nile, Sad Cypress, One Two Buckle My Shoe आणि तिचा मास्टरपीस The Murder of Roger Ackroyd हे प्रचंड आवडतात. मार्पल कथांमध्ये Murder at the vicarage, A murder is announced, The moving finger आणि A pocketful of rye या अत्यंत आवडत्या कादंबऱ्या.

पिलीयन रायडर's picture

28 Apr 2016 - 11:24 am | पिलीयन रायडर

लेख खुप आवडला. मी अजुन अ‍ॅगाथाबाईंचे एकही पुस्तक वाचलेले नसल्याने मला सगळीच माहिती नवीन आहे!

बोकाभाऊ,

सुरवात करायची असेल तर अ‍ॅगाथाबाईंच्या कोणत्या पुस्तका पासुन करु?

त्यातल्या कुठल्याही पुस्तकापासून सुरूवात करा-
१. Murder on the Links
२. The Murder of Roger Ackroyd (मस्त)
३. Peril at End House
४. Death on the Nile (अफाट)
५. Murder on the Orient Express (अफाट)
६. Appointment with Death
७. Cards on the Table.(अप्रतिम)
८. ABC Murders (जबरदस्त)
९. Sad Cypress
१०. One, Two, Buckle My Shoe (अफाट)
११. Clocks
१२. Hercule Poirot's Christmas
१३. Curtain (सर्वात शेवटची कादंबरी, जी प्रसिद्ध झाल्यावर पाॅयरा‌ॅटची obituary छापून आली होती.

Miss Marple

१. Murder at the Vicarage.
२. Body in the library
३. A Pocketful of Rye
४. Nemesis
५. A murder is announced
६. Mirror Cracked
७. The moving finger

Tommy and Tuppence

१. N or M?
२. The secret adversary

यातलं कुठलंही उचला आणि सुरुवात करा आणि जगाला विसरून जा!!!

राघवेंद्र's picture

28 Apr 2016 - 7:11 pm | राघवेंद्र

यादी बद्दल धन्यवाद

राजाभाउ's picture

29 Apr 2016 - 11:14 am | राजाभाउ

+१

हकु's picture

5 May 2016 - 3:01 pm | हकु

माझ्यासाठीही खूप नवीन माहिती आहे ही. बोकाभाऊ आणि जुइताई दोघांनाही खूप खूप धन्यवाद.

कविता१९७८'s picture

28 Apr 2016 - 7:42 am | कविता१९७८

छान लेख

DEADPOOL's picture

28 Apr 2016 - 8:45 am | DEADPOOL

भारी लेख!
पण न जाणे आमच्या शेर्लोक पुढे हर्क्युल जरा डावाच वाटतो!

होम्स हा तर्काधारित गुन्हा अन्वेषण पद्धत वापरतो आणि त्यामुळे त्याच्या कथांमध्ये धागेदोरे किंवा cluesना महत्त्व आहे. हर्क्युल पाॅयराॅट मानसशास्त्राला आणि order and method या गोष्टींना जास्त महत्व देतो. मजा म्हणजे आगाथाबैंची पहिली पाॅयराॅट कादंबरी - A mysterious affair at Styles ज्या वर्षी प्रकाशित झाली त्याच वर्षी किंवा त्याच्या आदल्या वर्षी होम्सचं शेवटचं पुस्तक His Last Bow प्रकाशित झालं. पण लोकांना रहस्यकथा वाचायची सवय किंवा चटक ही होम्सकथांमुळे लागली हे खरं आहे. होम्सचं लंडन हे १९ व्या शतकातलं व्हिक्टोरियन लंडन आहे तर पाॅयराॅटचं लंडन हे पहिल्या महायुद्धानंतरचं अस्वस्थ लंडन आहे. शिवाय पाॅयराॅट हा बेल्जियन आणि कॅथाॅलिक असल्यामुळे त्याचा सामाजिक आणि धार्मिक दृष्टिकोन (उदाहरणार्थ त्याचं ठाम मत - I don't approve of murder) हा येतोच. शिवाय त्याच्या कथा लंडनशिवाय फ्रान्स, मेसोपोटेमिया, जाॅर्डन, इजिप्त अशा अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत. काही तर ट्रेनमध्ये आणि बोटीवर घडलेल्या आहेत.
दोघांचाही आनंद वेगळा आहे. त्यामुळे तुलना थोडी अस्थायी वाटली.

प्रचेतस's picture

28 Apr 2016 - 10:05 am | प्रचेतस

अगदी अगदी.

गणामास्तर's picture

28 Apr 2016 - 12:00 pm | गणामास्तर

शेरलॉक आणि पॉयरॉ ची तुलना जरी अस्थायी वाटतं असली तरी तो करण्याचा मोह टाळणे अगाथा ख्रिस्ती ला सुद्धा जमले नाही. काही कथांमध्ये उगाचचं शेरलॉक ला मारलेले टोमणे अस्थानी वाटतांत, तसेचं वॉटसन ला शेरलॉक चा निर्बुद्ध साथीदार असे संबोधल्यावर अगाथा ख्रिस्तीला पॉयरॉ चा साथीदार म्हणून हेस्टिंग सारखे निरर्थक पात्र निर्माण करायची अशी काय गरज वाटली असावी.

पॉयरॉ ची गुन्हा उकलण्याची पद्धत मला तरी बर्‍याचदा नीरस वा कंटाळवाणी वाटते. बहुतेक कथांमध्ये असणाऱ्या भरमसाठ पात्रांमुळे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या प्रत्येकाच्या निवेदनामुळे सुद्धा कथा लांबलचक वाटू शकतात.

बोका-ए-आझम's picture

28 Apr 2016 - 12:28 pm | बोका-ए-आझम

क्लाॅक्स नावाची कादंबरी आहे. त्यात पाॅयराॅट उतारवयाचा दाखवलाय. तो जगातल्या सगळ्या नामवंत रहस्यकथालेखकांचा अभ्यास करत असतो असा उल्लेख आहे. त्यात त्याने काॅनन डाॅीलने डाॅ. वाॅटसन ही अप्रतिम व्यक्तिरेखा निर्माण केली असा स्पष्ट उल्लेख आहे.
हेस्टिंग्जही पाॅयराॅटच्या सगळ्या कादंबऱ्या आणि कथांमध्ये नाहीये. बहुसंख्य कथा आणि कादंबऱ्यांमध्ये पाॅयराॅट आणि तृतीयपुरुषी निवेदन आहे.
पाॅयराॅटची गुन्हा उकलण्याची पद्धत कधीकधी अाणि काहीजणांना कंटाळवाणी वाटू शकते कारण बहुतेक वेळा तो एक लांबलचक भाषण देऊन गुन्हेगार कोण ते सांगतो. पण त्याबद्दल स्वतः आगाथा ख्रिस्तीने इतर व्यक्तिरेखांच्या तोंडून त्याची खिल्ली उडवलेली आहे.

अगाथा ख्रिस्ती ची मी देखील फॅन नाही. आणि तुमच्याशी सहमत. दोघांच्या पद्धती वेगळ्या तरी शेरलॉक ची जास्त ग्रिपिंग वाटते. अगाथा ख्रिस्ती ची रहस्य गुंफणी नंतरच्या निवेदनामुळे थोडे फिके होऊन जाते. शिवाय मानसशास्त्रावरचा ठेहराव पण तुम्ही म्हणता तसा आहेच, ते कधी पटतं कधी नाही. पण, जुइ चा लेख आवडला. निदान या लेखासाठी तरी एखाद दुसर्‍या न वाचलेल्या अगाथा कथा वाचेन म्हणते.

प्रीत-मोहर's picture

28 Apr 2016 - 9:04 am | प्रीत-मोहर

__/\__
सुंदर लेख

मी अगाथा ची पंखी नाही पण हा लेख आवडला. भारतात वाचल्या जाणाऱ्या इंग्रजी साहित्यावर खूप मोठा ठसा आहे अगाठाबाईंचा

मार्मिक गोडसे's picture

28 Apr 2016 - 10:15 am | मार्मिक गोडसे

जागतिक पुस्तक दिन लेखमालेच्या निमित्ताने धमाल वाचायला मिळत आहे.

मार्मिक गोडसे's picture

28 Apr 2016 - 10:20 am | मार्मिक गोडसे

आणि हो, अ‍ॅगाथाचा बालपणीचा कृष्णधवल फोटो फारच सुंदर.

सुंदर लेख. मिस मार्पल आणि हर्क्यूल प्वॉरे या दोन्ही व्यक्तिरेखा आवडत्या आहेत.

पद्मावति's picture

28 Apr 2016 - 1:55 pm | पद्मावति

सुंदर लेख.

सस्नेह's picture

28 Apr 2016 - 3:05 pm | सस्नेह

उत्तम माहितीपूर्ण लेख. अ‍ॅगाथा ख्रिस्ती हे नाव सुप्रसिद्ध आहेच. अजूनही त्यांच्या कादंबऱ्या वाचनविश्व व्यापत आहेत.

उल्का's picture

28 Apr 2016 - 6:48 pm | उल्का

मी पण पंखा. :)
वजनावर पुस्तके मिळतात त्या प्रदर्शनात कधीही अगाथा आणि वुडहाउस यांची पुस्तके वजनावर नसतात. इतकी ती अजुनही (कायमच) लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत.

मस्त. माझं इंग्रजी वाचन नाही अजिबात पण अगाथा ख्रिस्तीचे हर्क्युल पायरो मराठीत मिळाले तर वाचीन अवश्य.

जुइ's picture

28 Apr 2016 - 7:08 pm | जुइ

मधुकर तोरडमल अनुवादीत अगाथा क्रिस्तीची(हर्क्युल पायरोची) मराठी पुस्तके उपल्बध आहेत.

ते इंग्लिश वाङ्मयाचे प्राध्यापक असल्यामुळे तो प्रश्नच नाही. पण अभ्याभौ, जमलं तर मूळ इंग्लिश वाचा. भाषेला खेळवणं म्हणजे काय ते समजून जाईल एकदम. विशेषतः Five Little Pigs सारख्या कादंबऱ्यांमध्ये.

थ्यांक्स जुइताई आणि बोकेशा. वाचेन अवश्य.

राघवेंद्र's picture

28 Apr 2016 - 7:14 pm | राघवेंद्र

लेख आवडला!!!

किलमाऊस्की's picture

28 Apr 2016 - 7:44 pm | किलमाऊस्की

अ‍ॅगाथा ख्रिस्तीची फॅन नाही पण लेख खूप छान झालय जुइ. अ‍ॅगाथाबद्दल काही गोष्टी नव्याने समजल्या.

तर्राट जोकर's picture

29 Apr 2016 - 1:08 am | तर्राट जोकर

लेख खरंच छान लिहिलाय. बाईंचे माझ्यासारखेच काही लोक फ्यान नाहीत हे वाचून धीर आला. असो. ज्याची त्याची आवड. प्रत्येकाच्या आवडीचा आदर आहे.

यशोधरा's picture

29 Apr 2016 - 1:18 am | यशोधरा

लेख आवडला.

मधुरा देशपांडे's picture

29 Apr 2016 - 4:39 pm | मधुरा देशपांडे

छान लिहिलं आहेस जुई.

नीलमोहर's picture

29 Apr 2016 - 5:47 pm | नीलमोहर

अ‍ॅगाथा ख्रिस्तींचे लेखन जास्त वाचलेले नाही, काही कथा आधी वाचल्या होत्या पण ते लिखाण बरेच लांबलेले, पकड न घेणारे असे वाटले. आता पुन्हा प्रयत्न करून बघावा.

मुक्त विहारि's picture

29 Apr 2016 - 7:52 pm | मुक्त विहारि

धन्यवाद.

भारतातील (आणि भारतीय उपखण्डातील) लोक ह्या लेखिकेच्या नावाचा अगाथा, आगाथा असा उच्चार करतात हे रहस्य उलगडायला कुणी पॉयरो किंवा मार्पल आली तर बरे होईल!
ह्या नावाचा उच्चार असा आहे
https://www.youtube.com/watch?v=g7EV9GoBgEI

ह्या रहस्यकथांमधली एक खटकणारी गोष्ट म्हणजे गुन्ह्याची उकल करणारे प्रमुख पात्र सोडल्यास बाकी पोलिस वगैरे लोक बिनडोक दाखवलेले असतात. त्यांना गुन्ह्याचा तपास करण्याचा अनुभव असूनही तपासात कुठलेही चातुर्य दाखवता येत नाही हे खरे वाटत नाही.

असंका's picture

30 Apr 2016 - 7:11 am | असंका

अवांतराबद्दल क्षमस्वः

असा उच्चार (का) करतात हे रहस्य उलगडायला कुणी पॉयरो किंवा मार्पल आली तर बरे होईल!

आपल्या भाषेचे संस्कार. अ‍ॅ चा अ किंवा आ करणं खूपच सामान्य गोष्ट झाली हो. इंग्रज लोक तर शब्दच बदलतात. टँडूल्कर किंवा गवासकर कसं वाटतं? तो एक अतुल वासन आहे, त्याला तर अ‍ॅटल/अटल म्हणतात. अतुल आणि अ‍टल मध्ये काही फरक आहे की नाही?

हुप्प्या's picture

30 Apr 2016 - 10:51 am | हुप्प्या

इंग्रज माणूस भारतीय उच्चार वेडेवाकडे करतो हे खरे आहे. पण आपल्या चुकीचे समर्थन करण्याकरता इतरांच्या चुकांकडे बोट दाखवणे कितपत सयुक्तिक आहे? अ‍ॅगथा हा ब्रिटिश वा अमेरिकन उच्चार आपल्याला (म्हणजे भारतीय जिभेला) इतका अवघड आहे का? उलट इंग्रजांच्या जिभेला तेंडूलकर, गावस्कर वगैरे म्हणणे नक्कीच अवघड आहे. भारतीय लोकांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्त्व आणि इंग्रजांचे मराठी वा हिंदीवरील प्रभुत्त्व ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे त्यामुळे इंग्रज भारतीय भाषेतले शब्द बोलताना जितक्या चुका करतील तितक्या चुका आम्हाला माफ असाव्यात हा युक्तिवाद (असला तर तो) हास्यास्पद आहे.

प्रत्येकाची शब्दोच्चाराची आणि अक्षरांवर आघात करण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्यालाच accent म्हणतात. आपण जसा शब्दोच्चार करतो, तसं लिहितो. इंग्लिश भाषेत शब्दाचं spelling आणि त्याचा उच्चार यांच्यात तफावत असू शकते. शिवाय Agatha हे विशेषनाम किंवा Proper noun असल्यामुळे त्याला phonetics चे नियम लागू पडत नाहीत. उदाहरणार्थ भारतीय नावांचं spelling हे English मध्ये कसं करावं याचे काहीही नियम नाहीत. त्याचप्रमाणे इंग्लिश नावांचा उच्चार मराठीत कसा करावा याचेही काही नियम नाहीत. त्यामुळे आगाथा, अगाथा, अॅगथा हे तिन्ही उच्चार बरोबरच आहेत.

हुप्प्या's picture

4 May 2016 - 3:04 am | हुप्प्या

विशेष नावे कुठे वापरली जातात ती संस्कृती त्या नावाचे उच्चार ठरवते. अ‍ॅगथा हे नाव कुठले आहे? मुख्यतः इंग्रजी भाषा जिथे रुळली आहे तिथले. त्यामुळे ते तसेच उच्चारले पाहिजे. तुम्ही म्हणता तसे उच्चारातले वैविध्य सर्वमान्य असेल तर कुठल्या शब्दकोषाचा वा अन्य संदर्भ द्या. बाकी जवळपास सर्व इंग्रजी नावे व्यवस्थित उच्चारायचा मराठी माणूस प्रयत्न करताना दिसतो. पण ह्या नावाबाबतची विसंगती जास्त ठळकपणे जाणवते.

मी यूट्युबवरील लिंक दिली आहे. हेही पहा https://en.wikipedia.org/wiki/Agatha_(given_name)
अमेरिकेत वा इंग्लंडमधे नावाकरताही तेच उच्चाराचे (फोनेटिक) नियम लावले जातात (अपवाद वगळता) म्हणूनच ते भारतीय उच्चार विचित्र करतात. दीपकचे डिपाक, संजयचे सॅन्जे, कामिनीचे कमिनी हे अपभ्रंश हे इंग्रजी उच्चाराचे नियम भारतीय नावाला लावल्यामुळे होतात त्यामुळे विशेष नावाकरता फोनेटिक नियम लागू नाहीत हा दावा साफ चुकीचा आहे.

बोका-ए-आझम's picture

5 May 2016 - 11:48 am | बोका-ए-आझम

किंवा व्यनि करतो. इथे धाग्यावर अवांतर नको.

चुकीचं समर्थन? कसली चुक ? कसलं समर्थन?
तुम्ही म्हणत होता की असं असं होतं याचं कारण काय...? ते सांगितलं.

(रच्याकने, तुमचा तो सयुक्तिक शब्द आवडला. अनेक लोक हा शब्द संयुक्तिक असा लिहितात. मला वाटायला लागलेलं की माझंच चुकतंय की काय!)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Apr 2016 - 8:57 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

सगळीचं माहिती नवी आहे. अ‍ॅगाथा ख्रिस्तीचं एकही पुस्तक वाचायचा योग आलेला नाही आजवर. :(
चांगला लेख.

आनंदयात्री's picture

30 Apr 2016 - 9:40 am | आनंदयात्री

लेख अतिशय उत्तम झाला आहे. दोनदा वाचला. द मर्डर ऑफ एक्रोय्ड अशातच वाचले आहे, त्यामुळे त्यांच्या लिखाणाची जादू अनुभवली आहे. वर बोका ए आझम म्हन्तायेत तसे पुस्तक घ्या जगाला विसरून जा.

जुइ's picture

3 May 2016 - 8:30 am | जुइ

सर्वप्रथम या लेखमालेत लेख लिहिण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकांना धन्यवाद.
सर्व वाचकांचे व प्रतिसादकांचे मनपूर्वक आभार मानते.

वोका-ए-आझम यांच्या माहितीपूर्ण प्रतिसादांसाठी त्यांचे विशेष आभार मानते.

तसेच या लेखमालेमुळे एकाहून एक माहितीपूर्ण लेखांची मेजवानी मिळत आहे त्याबद्दल सर्व लेखकांना व संयोजकांना धन्यवाद.

जुइ's picture

3 May 2016 - 8:33 am | जुइ

अनावधानाने श्री बोका-ए-आझम यांचे नाव टंकताना चुक झाली आहे. याबद्दल दिलगीर आहे.

नूतन सावंत's picture

3 May 2016 - 10:57 am | नूतन सावंत

जुई ,सुरेख लेख.
सस्पेन थ्रिलर आवडीमुळे,अॅगाथा जितकी मिळाली तेवढी वाचून काढलेली आहे.त्यामुळे लेखाच्शी आपोआपचजवळीक साधली गेली.लेआहेवेसांन.

नूतन सावंत's picture

3 May 2016 - 10:58 am | नूतन सावंत

सस्पेन्स असे वाचा.

नाखु's picture

3 May 2016 - 12:21 pm | नाखु

छान झाला आहे.
मराठीत उत्तम अनुवादीत अॅगाथा संपदा असल्यास सांगणे.

तूर्तास सम्ग्र शे हो संग्रही आहे.

पैसा's picture

3 May 2016 - 9:18 pm | पैसा

जबरदस्त सुंदर लिहिलंय!

सुधीर कांदळकर's picture

4 May 2016 - 6:39 am | सुधीर कांदळकर

आवडला. मेरे हमदम मेरे दोस्त नावाचा धर्मेन्द्रचा सिनेमा मर्डर इन ओरिएन्टल एक्सप्रेसमधील कल्पनेवर आधारित असावा. त्यात महंमद रफीची एक सुरेख गझल आहे. आपके हसीन रुख का आज नया नूर है, मेरा दिल मचल गया .... मेरा क्या कुसूर है! (शब्द इकडेतिकडे झाले असतील) या सुरेख गझलेवर धर्मेन्द्र पियानोवर पोळ्या लाटतांना पाहून फारच मजा येते.

एका प्रतिसादात तिच्या लेखनाची कॉनन डायलच्या लेखनाशी केलेली तुलना रोचक आहे.
सुरेख लेखाबद्दल धन्यवाद.