पाक-साहित्य संपदा

उल्का's picture
उल्का in जनातलं, मनातलं
17 Mar 2016 - 1:33 pm

रविवारी आशुतोष जावडेकर यांचा लोकरंग पुरवणीतील 'वा! म्हणताना… 'हा लेख वाचला आणि माझ्या कडील पाक-साहित्य संग्रह खूप दिवसांनी हाताळला. तेव्हा लक्षात आले की हल्ली बाजारात पाककृतीच्या पुस्तकांचे पेव आले आहे. काय बरे घेऊ मी? ह्या विचाराने नवीन पीढी बावरून जात असेल. तर माझ्या कडील पाक-साहित्य संपदेतील काही आवर्जून उल्लेख कराव्या अशा पुस्तकांचा मागोवा घेणारा लेख मी लगेचच लिहिला. तो इथे देत आहे. कोणाला उपयोग झाला तर आनंदच वाटेल मला.

पाक-‘कला’आहे, पाक-‘शास्त्र’ आहे. अशा या कलेविषयी आणि शास्त्राविषयी मुबलक साहित्य मराठीत उपलब्ध आहे. पाक-‘साहित्य’!

मी वाचलेले पाककृतीचे सर्वात जुने पुस्तक म्हणजे ‘रसचंद्रिका’. सारस्वत महिला समाजाने ३० ऑक्टोबर,१९४३ रोजी प्रथम आवृत्ती प्रकाशित केली. माझ्या संग्रही १९८३ सालची नववी आवृत्ती आहे. हे पुस्तक म्हणजे दूरदेशी आपल्या सोबत वडिलधारे कोणीतरी असल्यासारखे आहे. कारण फक्त पाककृती न लिहिता यात महिलांनी घरगुती औषधे, सणवार यांचाही समावेश केला आहे.

पण माझ्या संग्रहातील पहिले पुस्तक म्हणजे शालिनी नाडकर्णी यांचे ‘सारस्वत स्वयंपाक’. खरे तर ते आईने घेतले नंतर मग वारसा हक्काने माझे झाले. त्याच प्रमाणे मंगला बर्वे यांचे ‘फ्रीज, ओवन, मिक्सर’. मग माझी आवड बघून माझ्या मैत्रिणीने ‘अन्नपूर्णा’ भेट दिले.

मला पुस्तक भेट द्यायला किंवा घ्यायला अगदी मनापासून आवडते. मी बरीच पुस्तके भेट द्यायला विकत घ्यायचे तर तो दुकानदार मला ओळखायलाच लागला होता. आणि मी ते सुंदर वेष्टनात बांधून घ्यायचे त्यामुळे त्याला माहित झाले होते की मी हे भेट द्यायला घेते आहे. एकदा तो मला म्हणालाही की तुम्ही नेहमी पुस्तके भेट देता. त्या लोकांना ही भेट आवडते का? मला त्याचा राग नाही आला कारण प्रश्न अगदी रास्तच होता. मी त्याला सांगितले की मी मला जे आवडते आणि अमुल्य वाटते ते इतरांना भेट देते. त्यांना इतर नक्की काय आवडते हे तरी मला कुठे माहित आहे? असो!

माझ्या जावेला मी जयश्री देशपांडे यांचे ‘हमखास पाकसिद्धी’ हे पुस्तक भेट दिले तेव्हा माझ्या सासूबाई भलत्याच खुश झाल्या. जाऊ झाली की नाही हे मात्र मला माहित नाही. ह्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पाककृतीनंतर सविस्तर टीप दिलेली आहे. माझ्या सासूबाई अतिशय सुगरण. त्या सतत प्रयोग करत नवनवीन पाककृती शिकत असतात. अगदी आत्ता वयाच्या ८०व्या वर्षी सुद्धा. त्यांना हे पुस्तक खूपच आवडले. परंतु त्यांचे अतिशय लाडके पुस्तक म्हणजे कमलाबाई ओगले यांचे ‘रुचिरा’. त्यांच्याकडील आवृत्ती अगदी जुनी आहे. पण त्या आपल्या सुगरणतेचे बरेचसे श्रेय रुचिराला देतात.

अशी अनेक पुस्तके मी घेत गेले. डॉ. मालती कारवारकर यांची ‘स्वयंपाक शोध आणि बोध’, ‘वंशवेल’ आणि‘अन्नपूर्णेशी हितगुज’ यांचा उल्लेख आवर्जून केलाच पाहिजे. आपण रोज इतके खातो पण विचारपूर्वक खातो का? तेव्हा रुचकर पण आरोग्यदायी काय आणि कसे खावे याचे मार्गदर्शन या पुस्तकातून होते. असेच एक सुंदर पुस्तक आहे डॉ. वर्षा जोशी यांचे ‘स्वयंपाकघरातील विज्ञान’. जर स्वयंपाकघर एक प्रयोगशाळा मानली तर तिथे केल्या जाणाऱ्या प्रयोगांचे शास्त्रीय विश्लेषण या पुस्तकातून केले आहे. हे काही पाककृतींचे पुस्तक नाही म्हणता येत पण प्रत्येक पाककृती परिपूर्ण बनवायला नक्कीच उपयोगी आहे.

मी १९९३ मध्ये एक पुस्तक विकत घेतले होते. दिसायला मासिकच जणू. नाव होते ‘द्रौपदीची थाळी’. यातील सर्व पाककृती ह्या पुरुष लेखकांनी लिहिल्या आहेत हे विशेष आहे. तसेच माधव कानिटकर संपादित ‘रसनारंजन’. हे पुस्तक म्हणजे पण एक छोटासा ग्रंथच वाटावा. पहिली साठ पाने ही आरोग्याविषयी माहिती, काही कानगोष्टी अशा प्रकारे रंजकतेने भरली आहेत. मराठी, गुजराती, कारवारी, गोमंतकीय पाककृती इथे देण्यात आल्या आहेत.

मला अतिशय प्रिय असलेले पुस्तक म्हणजे दुर्गा भागवत यांचे ‘खमंग’. हे पुस्तक म्हणजे आजीचे प्रेम आहे. तिचा बटवा आहे. आजी कसे आपल्याला समजावून सांगेल न तीच ओघवती शैली या पुस्तकात आहे. हे पुस्तक त्यांच्या वयाच्या ८५ व्या वर्षी छापले गेले. त्यांनी सांगितले आणि मृण्मयी रानडे यांनी लिहून घेतले. त्यामुळे तर ह्या पुस्तकाला गप्पांच स्वरूप आलंय. पारंपारिक पाककृतीच्या पुस्तकाला छेद देणारे हे पुस्तक आहे यात शंकाच नाही.

हल्ली विष्णू मनोहर यांचे ‘खवय्यांचे अड्डे…प्रांतोप्रांतीचे’ पुस्तक घेतले. ठीक आहे. पण आता मात्र मी सहसा पाककृतींची पुस्तके विकत घेणे टाळते. कारण सर्व पुस्तकांमध्ये तोच तोचपणा जाणवतो आहे. वैविध्य जाणवत नाही. एकसुरीपणा जाणवतो. आपल्या देशात पावलागणिक आणि माणसागणिक खाण्याची आणि शिजवण्याची पद्धत बदलत असते.

उदाहरणच देते. आमच्या कोकणामध्ये माशाची रसगोळीची आमटी बनवतात. त्यात धणे अजिबात वापरत नाहीत. थोडे पुढे गोवा, कारवार इथे मात्र बाकी पद्धत तीच असते पण धणे हा एक घटक पदार्थ वाढतो. तसेच आम्ही लसूण माशाच्या आमटीत नाही वापरत पण इतर जातीत मात्र ती हवीच हवी. तर अशा ह्या विविध पद्धती.

खरे तर असे एखादे पुस्तक यावे ज्यात प्रत्येक धर्म, जात, पोटजात यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पाककृतींचा संग्रह असेल. काही विस्मृतीत गेलेल्या पाककृती असतील तर त्यांचाही उल्लेख असावा. अगदी छोट्या छोट्या क्लृप्त्या असाव्यात ज्या पणजीने, आजीने किंवा आईने शिकवलेल्या असतील. अगदी ग्रंथाच जणू! छपाई सामान्य असावी जेणेकरून किंमत कमी असेल व सर्व सामान्यांच्या खिशाला भुर्दंड पडणार नाही. सहज आवाक्यात असेल तर जास्तीत जास्त लोक खरेदी करून वाचू शकतात. कारण जेव्हा छपाईचा दर्जा चांगला असतो तेव्हा त्याप्रमाणे किंमतही अवाजवी वाटू लागते. मी अशा ग्रंथाच्या प्रतीक्षेत आहे ज्याचा लेखक वर्ग तुम्ही, आम्ही म्हणजे मी पण असेन. (स्माईल)

- उल्का कडले

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

सुनील's picture

17 Mar 2016 - 2:05 pm | सुनील

अच्छा, पाककृतींवर धागा आहे होय!

मला वाटले, पाकिस्तानी साहित्यविश्वातील सध्याच्या घडामोडींवर भाष्य वैग्रे असेल!

चांदणे संदीप's picture

17 Mar 2016 - 3:26 pm | चांदणे संदीप

सेम पिंच! ;)

आता वाचतो!

Sandy

एकनाथ जाधव's picture

17 Mar 2016 - 4:06 pm | एकनाथ जाधव

मला पण आधी तसच वाटल!

अत्रन्गि पाउस's picture

17 Mar 2016 - 4:58 pm | अत्रन्गि पाउस

हेच वाटले

कालचा विषय भारत माता आणि आजचा पाक साहित्य !!!

अजया's picture

17 Mar 2016 - 2:09 pm | अजया

पाकृ पुस्तकांचे एक संकलन लवकरच मिपावर वाचण्यात येईल तुमच्या!त्यात अनेक पुस्तकांचा उल्लेख असेल.

सतिश पाटील's picture

17 Mar 2016 - 5:15 pm | सतिश पाटील

धाग्याचा विषय वाचून मला वाटले कि धाग्यात पाकिस्तानातील साहित्य संपदेवर काही लिहिले असेल.....

प्रचेतस's picture

17 Mar 2016 - 5:19 pm | प्रचेतस

नलपाकदर्पण आणि मानसोल्लास आठवला.

पाकृ लिहायला हवे होते. आता जाणवतय तुमचा सर्वांचा प्रतिसाद वाचून. :D

प्राची अश्विनी's picture

18 Mar 2016 - 8:26 am | प्राची अश्विनी

छान माहिती! आता यातील काही पुस्तके घेणे आले.
स्वयंपाकघरातील विज्ञान हे डॉ वर्षा जोशींचे पुस्तक देखील संग्रही ठेवण्यासारखे आहे. त्यात प्रत्येक गोष्टी मागील विज्ञान/ कारण सांगितले आहे.

नाखु's picture

18 Mar 2016 - 12:05 pm | नाखु

नावामुळे धाग उघडला नव्हता

आणि अत्ता उलगडा झाला.

शिकाऊ नाखु

पैसा's picture

18 Mar 2016 - 12:30 pm | पैसा

छान लिहिलंय.