लिंडेन ची बरणी

निळकंठ दशरथ गोरे's picture
निळकंठ दशरथ गोरे in जनातलं, मनातलं
29 Feb 2016 - 12:30 am

लिंडेन व त्याची पत्नी वैज्ञानिक प्रयोग करण्यात पटाईत होते. त्यांना एकेदिवशी Faraday आणि osterd ह्यांच्या प्रयोगविषयी कळाले. ते तारेचे वेटोळे बनवून विद्युत उर्जेचे चुंबकीय उर्जेत आणि नंतर चुंबकीय उर्जेचे रुपांतर विद्युत उर्जेत करत होते. त्यांचे हे अनोखे प्रयोग पूर्ण युरोपात जोमाने पसरत होते. त्यांच्या प्रयोगाची सखोल माहिती वाचल्या नंतर लिंडेनच्या तुलनात्मक मनाने काम चालू केले. जर Inductor हा चुंबकीय उर्जा साठवत असेल तर ह्या जगी असे काहीतरी असेल ज्यात विद्युत उर्जा साठवली जात असावी. हाच प्रश्न त्याचे आयुष्य बनले. खूप प्रयोग करूनही हाती काहीच लागले नाही. खूप वाचन आणि विचार करूनही शून्याशिवाय काहीच मिळत नसे.आता करायचे तरी काय?
काही दिवस तसेच शून्यात जगायचे. पुन्हा पुस्तके चाळायाची.काही ओळींवर बारकाईने अध्ययन करायचे. कुठूनतरी धागेदोरे मिळतात का? ह्याचा सतत आढावा घेत राहायचे. हाच दृष्टीकोन आपली मदत करणार ह्याचा लिंडेनला विश्वास होता.
अखेर तो दिवस उजाडला. लिंडेनने एका काचेच्या बरणीला तांब्याचा पत्रा लावून त्यात विद्युत प्रवाह दिला. काही वेळानंतर विद्युत प्रवाह बंद झाला. आपला प्रयोग फसला असे समजून दोघांनी त्या बरणीला हात लावला. हात लावता क्षणी दोघांना विजेचा जोरदार झटका बसला व दोघे बेशुद्ध झाले. जेव्हा जाग आली तेव्हा हाताची हालचाल खूप कमी होत होती. हात थर थर कापत होते. पुन्हा ह्या बरणीच्या नादाला लागायचे नाही असे ठरवून त्या दिवसाचे काम बंद केले. पण लिंडेनच्या लक्षात आले की विद्युत प्रवाह बंद असतानाही आपल्याला झटका बसला म्हणजे बरणीमध्ये काही प्रमाणात विद्युत धारा होतीच.म्हणजेच आपला प्रयोग यशस्वी झाला. नंतर हीच बरणी capacitor म्हणून ओळखली जाऊ लागली.

बोध: विज्ञान दिन साजरा करताना आपण वैज्ञानिकांचा एक गुण अधोरेखित करायला हवा. तो म्हणजे, वैज्ञानिक नेहमी सत्याबद्दल किंव्हा सत्याविषयीच बोलतो. जर एखादी गोष्ट खात्रीपूर्वक किंव्हा पुरावा देऊ शकणारी नसेल तर खरा वैज्ञानिक अशा गोष्टी लोकांसमोर आणत नाही. तो सत्याची वाट पाहतो.धैर्याची कसोटी लागते. सत्याची वाट पाहणे म्हणजे वाळवंटात पाण्याची वाट पाहण्यासारखेच.पण वैज्ञानिक सत्याची आयुष्यभर देखील वाट पाहण्यास तयार असतो. असे म्हणतात की केप्लरला जेव्हा कळाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्यानंतर जवळपास मरणापर्यंत ह्या गोष्टींचे पुरावे आणि गणिती समीकरण मांडत होता. त्याने जाणलेले सत्यं मरणोत्तर जगाच्या समोर आले. खरच आयुष्य खर्चून जगाला दिशा दाखवणाऱ्या अशा वैज्ञानिकांना सलाम.

विज्ञानमाहिती

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

29 Feb 2016 - 2:44 am | गामा पैलवान

निळकंठ दशरथ गोरे,

लेख पटला. मात्र एक विधान पटलं नाही.

>> जर एखादी गोष्ट खात्रीपूर्वक किंव्हा पुरावा देऊ शकणारी नसेल तर खरा वैज्ञानिक अशा गोष्टी
>> लोकांसमोर आणत नाही.

आईनस्टाईनने गुरुत्वलहरींचा अदमास अगोदर बांधला होता. प्रत्यक्ष पुरावा नुकताच मिळाला आहे. मध्ये सुमारे १०० वर्षे गेली.

आ.न.,
-गा.पै.

राजेश घासकडवी's picture

29 Feb 2016 - 7:41 am | राजेश घासकडवी

जर एखादी गोष्ट खात्रीपूर्वक किंव्हा पुरावा देऊ शकणारी नसेल तर खरा वैज्ञानिक अशा गोष्टी लोकांसमोर आणत नाही.

आईनस्टाईनने गुरुत्वलहरींचा अदमास अगोदर बांधला होता. प्रत्यक्ष पुरावा नुकताच मिळाला आहे. मध्ये सुमारे १०० वर्षे गेली.

या दोन्ही विधानांबद्दल थोडं स्पष्टीकरण आवश्यक आहे. मला वाटतं की गामा पैलवान म्हणत आहेत की अनेक सिद्धांत असे असतात जे आधी मांडले जातात आणि नंतर सिद्ध होतात. आणि नीळकंठ गोरे म्हणत आहेत की वैज्ञानिक विधानांना पुरावा असल्याशिवाय ती टिकत नाहीत. दोघेही आपापल्या परीने बरोबर आहेत, पण मग ती विधानं परस्परविरोधी आहेत का?

आपण न्यूटनच्या थियरीचं उदाहरण घेऊ - कारण सापेक्षतावाद हा फारच क्लिष्ट विषय आहे. त्याने फळ पडताना पाहिलं आणि त्यावरून अंदाज बांधला पृथ्वी गोल आहे, तेव्हा हा मोठा पृथ्वीचा गोल या फळाला केंद्राकडे आकर्षित करत असावा. यात खरं तर काही विशेष नाही. गोल पृथ्वीवर सर्व बाजूंना बसलेल्या अनेक लोकांचा विचार केला तर ही कल्पना करायला काही कठीण नाही. त्यात मुख्य गोष्ट अशी होती की सफरचंद आणि पृथ्वी या दोन्ही वस्तुमान असलेल्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्या दोन्ही एकमेकींना समान बलाने आकर्षित करतात ही मांडणी त्याने केली. त्यापुढे विचार करून त्याने म्हटलं की आपण सफरचंद जर जमिनीला समांतर जोरात फेकलं तर लांब पडेल, अजून जोरात फेकलं तर अजून लांब पडेल, आणि पुरेशा जोरात फेकलं तर ते पडण्याऐवजी पृथ्वीभोवती फिरत राहील. सूर्यमालेतले सूर्याभोवती फिरणारे ग्रह, पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र हे असेच गुरुत्वाकर्षणामुळे फिरत असले पाहिजेत.

न्यूटनच्या आधी केप्लरने 'सर्व ग्रह सूर्याभोवती अंडगोलाकार कक्षेत भ्रमण करतात' हे सांगून त्यांच्या वेगांबद्दल नियम केले होते. मात्र या भ्रमणप्रक्रियेचं कारण त्याला नीटसं देता आलं नव्हतं. न्यूटनच्या मांडणीमुळे हे कारण मिळालं. तसंच केप्लरने मांडलेली सर्व वेगांची प्रमाणं ही दोन वस्तुमानांमध्ये आकर्षणाचं बल असतं आणि ते त्यांच्या वस्तुमानाच्या गुणोत्तराच्या प्रमाणात व अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं असं धरलं तर सगळे नियम पाळले जातात हे लक्षात आलं.

अर्थात न्यूटनने जे मांडलेलं होतं ते संपूर्णपणे सिद्ध झालेलं नव्हतं. उदाहरणार्थ, अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणातच का? कदाचित तो घातांक २ नसून १.९२ असूही शकेल. न्यूटननंतर अनेक शतकांनी हा घातांक मोजला गेला आणि तो मोजमापीच्या त्रुटीत २ असल्याचं दिसून आलं. म्हणजे तसं म्हटलं तर न्यूटनचा सिद्धांतही नंतरच सिद्ध झाला. मग गोरे यांच्या मताप्रमाणे न्यूटन खरा वैज्ञानिक नव्हता का?

तर त्याचं थोडक्यात उत्तर असं आहे की 'संपूर्णपणे सिद्ध झालेला सिद्धांत' असं काही नसतं. उपयुक्त सिद्धांत असतात. आत्तापर्यंत जे दिसलेलं आहे त्याचं पुरेसं व्यवस्थित उत्तर देणारा सिद्धांत मान्य होतो. तो सिद्धांत इतर ठिकाणी वापरला जातो, आणि त्यातून येणारे निष्कर्ष निरीक्षणांना लागू पडले की तो अधिक सबळ होतो. काही विशिष्ट ठिकाणी तो लागू पडला नाही, तर एकतर तो टाकून द्यायचा किंवा त्यात किंचित बदलून तो सुधारायचा असे पर्याय असतात. अशी सुधारणेची प्रक्रिया चालू राहात, सुधारित सिद्धांत तयार होतात आणि ते आत्तापर्यंतच्या सर्वच निरीक्षणांना लागू पडतील असे सक्षम बनतात.

तेव्हा सिद्धांत मांडले जातात तेव्हा 'सर्व काही' ऐवजी 'आत्तापर्यंतच्या निरीक्षणांपैकी बहुतांश' गोष्टींचं समाधानकारक उत्तर देणारे सिद्धांत असतात. त्यांच्या गृहितकांमधून 'नीट तपासून पाहिलं तर हेही निरीक्षण सापडेल' अशा काही गोष्टी दडलेल्या असतात. त्या नंतर कधीतरी सापडतात. त्या सापडल्या तर सिद्धांत बळकट होतो. पण त्या सापडेपर्यंत तो सिद्धांत सिद्धच झाला नाही असं म्हणता येत नाही.

आइन्स्टाइनच्या सिद्धांताचंही तसंच आहे. वस्तुमानामुळे अवकाश वक्र होतं - ही त्याची मुख्य मांडणी केव्हाच सिद्ध झालेली होती. त्याचा पुढचा टप्पा म्हणजे 'हलणाऱ्या वस्तुमानांमुळे या अवकाश वक्रतेच्या लहरी तयार होतात' हे आता सिद्ध झालेलं आहे, याचा अर्थ सिद्धतेच्या आधी मांडणी केल्यामुळे आइन्स्टाइन खरा वैज्ञानिक नव्हता असं नाही. निरीक्षणं - सिद्धांत - अजून निरीक्षणं - बळकटी/सुधारणेची गरज - सिद्धांतात सुधारणा - निरीक्षणं अशी सतत चालू राहाणारी साखळी असते. तिला 'सर्व सिद्ध झाल्याशिवाय मांडणी नाही' किंवा 'आधी मांडणी झाली तरी सर्व पैलू सिद्ध झाल्याशिवाय थियरी सिद्ध नाही' अशा जोखडांखाली बांधता येत नाही.

विधान बरोबर आहे.अगोदरचे शोध म्हणजे प्रथम पाहिले नंतर कारण शोधले असे झाले.आताच्या वैश्विक संशोधनात अगोदर गणिताने भाकीत केले पण त्याच बरोबर त्याची प्रचिती घेण्यातल्या अडचणीही मांडतात.त्याचाच परिपाक लायब दुर्बिणीचे यश,CERN project आहे.

निळकंठ दशरथ गोरे's picture

29 Feb 2016 - 10:40 am | निळकंठ दशरथ गोरे

जर पुरावा म्हणून एखादी नैसर्गिक घटनाच हवी असेल तर माझे विधान चुकीचे ठरू शकते.पण गणिती समीकरण पुरावा ठरू शकत नाहीत का?
जसे प्रकाशकिरण गुरुत्वाकर्षणमुळे वक्र होतात. हे Einstein ने गणितातून सिद्ध करून दाखवले होते.त्याचा प्रत्यक्ष पुरावादेखील गुरुत्वलहरी प्रमाणे खूप उशिरा मिळाले. Einstein ने तर गुरुत्वलहरी बद्दल प्रत्यक्ष पुरावे मिळतील ह्या बद्दल शंका व्यक्त केली होती.आणखीन सागायचे झाले तर classical भौतिकशास्त्राचे नियम हे जवळपास दोन शतके जसेच्या तसे राहिले. हे नियम लहानातील लहान आणि मोठ्या वस्तूंवर सारखेच लागू पडतात. असा समज quantum भौतिकशास्त्राने मोडून काडला. सूक्ष्म कणासाठी हे नियम एकसारखे लागू पडत नाहीत.

वस्तुतः वैज्ञानिक त्यांचे शोध पहिले कल्पनाशक्तीने त्यानंतर गणिती समीकरणाने आणि सर्वात शेवटी प्रत्यक्ष पुराव्याने सिद्ध करत असावे.ह्या क्रमातील दुसरा किंव्हा तिसरा विचार आपली जागा बदलू शकतो. पण पुरावा म्हणून गणिती समीकरण असेल तरी शोध सिद्ध होतो. असे मला वाटते.

पैसा's picture

29 Feb 2016 - 11:16 am | पैसा

मनोरंजक शोधकथा आवडली.

Logic मध्ये दोन संकल्पना आहेत - Inference आणि Conclusion. जेव्हा माहितीमध्ये किंवा Premises मध्ये काही बदल होतो आणि त्याप्रमाणे निष्कर्षांमध्येही होतो, तेव्हा त्याला Inference म्हणतात आणि जर निष्कर्षांमध्ये बदल होणार नसेल तर त्याला Conclusion म्हणतात. शास्त्रज्ञ आपले निष्कर्ष चुकीचे असल्याची शक्यता कधीच नाकारत नाहीत. त्यामुळे सर्व शास्त्रीय सिद्धांत हे Inference म्हणूनच मांडले जातात. उदाहरणार्थ सूर्यमालेत ८ किंवा ९ ग्रह आहेत हा inference आहे आणि हे सर्व ग्रह सूर्याभोवती गुरूत्वाकर्षणामुळे परिभ्रमण करतात हे Conclusion आहे.

अत्रन्गि पाउस's picture

29 Feb 2016 - 11:28 am | अत्रन्गि पाउस

आपण सफरचंद जर जमिनीला समांतर जोरात फेकलं तर लांब पडेल, अजून जोरात फेकलं तर अजून लांब पडेल, आणि पुरेशा जोरात फेकलं तर ते पडण्याऐवजी पृथ्वीभोवती फिरत राहील ??

पुरेशा जोरात समांतर फेकले तर ते क्षितिजावरून पृथ्वीच्या कक्षे बाहेर जाईल हे पटू शकते तथापि नुसतेच समांतर राखले तर तसे जाईल का हि शंका आहे ...

किंबहुना पृथ्वीच्या त्या बिंदूच्या काटकोनात फेकले तर पृथ्वीभोवती फिरत राहील हे जास्त खरे ...

काय वाटते ?

रच्याकने : हे खुसपट नाही ...नेमके पणाचा वेध आहे ...

लिंडेन आणि त्याची पत्नी? कोण हा लिंडेन? त्याचं पूर्ण नाव देता येईल काय?

मी शास्त्रशाखेचा विद्यार्थी नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे वरील कपॅसिटरचं वर्णन "लायडेन जार"चं आहे.
https://en.m.wikipedia.org/wiki/Leyden_jar

लायडेन हे हॉलंडमधल्या गावाचं नाव आहे.

विकीपानावरून:

A Leyden jar typically consists of a glass jar with metal foil cemented to the inside and the outside surfaces, and a metal terminal projecting vertically through the jar lid to make contact with the inner foil. It was the original form of a capacitor (originally known as a "condenser").

It was invented independently by German cleric Ewald Georg von Kleist on 11 October 1745 and by Dutch scientist Pieter van Musschenbroek of Leiden (Leyden) in 1745–1746. The invention was named for the city.

हा लिंडेन कोण याचा खुलासा नक्की करावा.

रोचक माहिती.वाचते आहे.सविस्तर वाचायला आवडेल.

तुषार काळभोर's picture

29 Feb 2016 - 12:39 pm | तुषार काळभोर

विकी:
Capacitorचा इतिहास : इथे सांगितलंय की कॅपॅसिटरचा शोध लेइडेन जारच्या ( Leyden jar) स्वरुपात Pieter van Musschenbroek याने लावला.विकीपिडियावरच्या या लेखात लिंडेन दांपत्याचा उल्लेख बहुतेक राहून गेला असावा. (माहितगारांनी कृपया नोट करावे)

दुसरे. लिंडेन दांपत्याने फरडेच्या प्रयोगातून प्रेरणा घेतल्याचा उल्लेख आहे. पण लेइडेन जारचा शोध १७४५ च्या सुमारास लागला तर मायकेल फॅरडेचा जन्म १७९१ मध्ये झाला. मग जन्माआधी ४५ वर्षे प्रेरित करणारा फॅरडे खरोखर खूप मोठा शास्त्रज्ञ असला पाहिजे.

जर एखादी गोष्ट खात्रीपूर्वक किंव्हा पुरावा देऊ शकणारी नसेल तर खरा वैज्ञानिक अशा गोष्टी लोकांसमोर आणत नाही

हा आणखी एक विनोद!