दीपा

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जनातलं, मनातलं
4 Feb 2016 - 10:55 pm

२६ जानेवारीची परेड पाहिली की दीपाची हमखास आठवण येते. सैन्यात जाऊन परेडमध्ये भाग घेणारी गावातील एकमेव मुलगी, दीपा गुरखा. गावच्या गुरख्याची मुलगी. गावाला खरंतर गुरख्याची गरज कधी नव्हतीच. कुणी चोरून असं मोठ्ठसं काय चोरणार? पण एक दिवस अचानक गावात गुरखा हजर झाला, बाजारेपेठेत दोन तीन सोनार होते. त्यांच्या पाया बिया पडून गस्त घालायला सुरवात केली. रोज रात्री बाजारपेठेत शिट्टी फुंकत, काठी आपटत गुरखा फिरत असे. नाक्या नाक्यावर "होशियाsssssर" अशी लांबलचक हाळी देत असे. पहिले काही दिवस सगळ्यांना याचं अप्रूप वाटलं. गावातील इतर दुकानदार देखील गुरख्याला महिना अखेर काही बाही पैसे देऊ लागले. पण नव्याची नवलाई लवकरच संपली.

नाना पारकरच्या म्हातारीला आधीच झोप कमी होती. त्यात तिचा डोळा लागायला आणि फुर्रर करून गुरख्याची शिट्टी वाजायला एकच मुहूर्त सापडायचा. म्हातारी मग रात्र रात्र झोपत नसे. नानाच्या गृहस्थीवर परिणाम व्हायला लागला. त्यानं गुरख्याला सांगून शिट्टी बंद केली. नाक्यावरची कुत्री "होशियाsssssर" ऐकून जोरजोरात भुंकायला लागत. गुरखा पुढं निघून गेला तरी त्यांचं भुंकणं चालूच राही. आणि अख्ख्या सुतार आळीची झोप उडत असे. त्यामुळं नाक्यावरच्या लोकांनी त्याची होशियारची हाळी बंद केली. आता गुरखा नुसता काठी आपटत फिरू लागला.

एव्हाना गुरख्यानं एक झोपडी बांधली होती. आमच्या घरासमोर म्युन्सिपाल्टीच्या चाळी होत्या. त्यांच्या एका भिंतीला लागून ही झापाची खोली किंवा पडवी होती. अगदी रस्त्याला लागून. मध्ये अचानक काही दिवस गुरखा गायब झाला आणि शादीशुदा होऊन परतला. गुरख्याची बायको सावळी होती पण होती मात्र देखणी. गावातल्या सगळ्या शेटलोकांकडं गुरखा बायकोला घेऊन पाया पडायला गेला आणि भरगच्च मुहदिखाई घेऊन आला. वर्षभरातच दीपाचा जन्म झाला. दीपाच्या जन्मानंतर गुरख्यानं गावभर पेढे वाटले. मुलगी झाल्याचा त्याला मनापासून आनंद झाला. "इसे पढा लिखाकर बडा करुंगा" असं तो सगळ्यांना अभिमानानं सांगत फिरे.

ही सगळी ऐकीव माहिती. कारण दीपा माझ्याहून दोन वर्ष मोठी. मला दीपा आठवते ती तिसरी चौथीतली. आमच्या बरोबर खेळणारी. संध्याकाळी जवळच्या मैदानात आम्हा मुलांची भली मोठी ग्यांग जमायची आणि मग पकडापकडी, डोंगर का पाणी, लपाछपी, डब्बाइसपैस हे सगळे खेळ चालायचे. या सगळ्या खेळात दीपाचा आवडता खेळ म्हणजे आबाधुबी. दीपा दात ओठ खाऊन बॉल मारायची. असला लागायचा! एकाही मुलाला तिच्या एवढ्या ताकदीनं बॉल मारता येत नसे. त्यामुळे दीपा असली की कुणीही आबाधुबी खेळायला तयार नसे. मग दीपा चिडायची. दीपाला तसंही चिडायला कारण लागत नसे. कुणी जरा काही चिटींग वगैरे केलं की दीपा त्याला धरून बदडायची. तिच्यापुढे कुणाचंही काही चालत नसे. एवढा कुठला संताप तिच्यामध्ये खदखदत होता हे आम्हाला तेव्हा कळत नसे.

गुरख्याला आपणहून कुणीच नोकरीला ठेवलं नव्हतं. तशी त्याची गरज कुणालाच नव्हती. त्यामुळं गुरख्याला कुणी खुशीनं पगार देत नसे. एकटा होता तेव्हा त्याचं भागून जाई. पण मुलीच्या जन्मानंतर घर चालवणं कठीण होऊ लागलं. बिचाऱ्याला पगारासाठी फार लाचारी करावी लागे. तीन चार फेऱ्या मारल्या, हाता पाया पडलं की लोक कुठं मुश्किलीनं पन्नास शंभर रुपये काढून देत. दीपा नेहमी त्याच्याबरोबर असे. गुरख्याच्या बायकोचं घरात मुळीच लक्ष नसायचं. नटून थटून ती सदानकदा बाहेर भटकत असे. तिच्याबद्दल गावात बरीच कुजबुज चाले. एक दिवस रात्रीच्या शांततेत मोठमोठ्यानं भांडणाचा आवाज येऊ लागला. गुरखा बायकोला गुरासारखा बडवत होता, शिव्या देत होता. बायको आणि लहानगी दीपा रडत होत्या. नंतर कळलं की लोकांची कुजबुज ऐकून एकदा गुरखा अचानक रात्री घरी आला. बायकोला कुणाबरोबर तरी रंगेहाथ पकडलं आणि भांडण सुरू झालं. त्या दिवशी लोक मध्ये पडले म्हणून, नाहीतर कुकरीनं त्यानं बायकोचा जीवच घेतला असता. पण मग हे रोजचंच झालं. त्यातच त्याला दारूचं व्यसन लागलं. मग तर बायको त्याला बिलकुल भाव देईना. जेव्हा केव्हा तो शुद्धीवर असे तेव्हा दीपाला घेऊन फिरत असे. मुलीला शिकवून मोठं करायचं त्याच स्वप्न अजूनही होतं. पण परिस्थितीनं दीपाला केव्हाच मोठं केलं होतं.

दीपा कन्याशाळेत जाई. शाळा सुटल्यावर घरी न जाता थेट बाजूच्या मैदानात चिंचेपाशी थांबे. इतर मुलं खेळायला यायची वाट पाहत राही. सगळे जमले की आमचे खेळ चालू होत. दीपाचा नेम अचूक होता. झाडावरून पाडलेले अंजीर, चिंचा, जांभ हाच तिचा संध्याकाळचा खाऊ. एकदा संध्याकाळी खेळून परत येताना आम्हाला वाटेत एक पेन पडलेलं दिसलं. हातावर लिहून बघितलं तर चांगलं चालत होतं. आम्हाला जणू खजिना सापडल्याचा आनंद झाला. दीपानं ते माझ्याकडं मागितलं पण "मला सापडलंय, मी घेणार " म्हणून मी मोठ्या तोऱ्यात ते घरी घेऊन आलो. आईला दाखवल्यावर आई म्हणाली, "अरे द्यायचं ना तिला. आपण नवीन पेन आणू शकतो, तिला ते शक्य नाही. उद्या देऊन ये तिला." जरी पटलं नाही तरी आईने सांगितलेलं न ऐकण्याची हिम्मत नव्हती. दुसऱ्या दिवशी मी दीपाच्या घरी गेलो. घर म्हणजे काय झोपडीच ती! गुरखा स्टोव्ह दुरुस्त करत होता. मला बघताच "आओ आओ बाबाशाब" म्हणत त्यानं खाटेवर बसायला सांगितलं. मी अवघडून बसलो. गुरख्याची बायको अर्थातच घरी नव्हती. दीपा बाजूलाच जेवण बनवत होती. "इस्कुल जाते हो न? बहोत अछ्छा बहोत अछ्छा " म्हणत त्यानं खिशातून लिमलेटची गोळी काढून माझ्या हातावर ठेवली. दीपा मान वर करून बघायलाही तयार नव्हती. थोडा वेळ शांततेत गेला. मी काही न बोलता पेन ठेवून निघालो. घराजवळ आल्यावर कोणी बघत नाहीसं पाहून हातातली चिकट गोळी लांब फेकून दिली. दीपाकडे जायची ती माझी पहिली आणि शेवटची वेळ.

एक दिवस मैदानात व्हॉलीबॉल खेळणाऱ्या कुणीतरी दीपाला चिडवलं. बहुतेक बापावरून असावं. दीपा वाघासारखी चवताळून त्याच्या अंगावर गेली. तेव्हा ती सहावीत होती. तो मुलगा मोठा, कॉलेजमधला! पण काही कळायच्या आत दीपानं त्या मुलाला लोळवलं. चार लाथा लगावून वर शेलक्या शिव्या घालून ती रागारागानं तिथून निघून गेली. सगळे अवाक होऊन बघत राहिले. त्यानंतर तिला चिडवायची पुन्हा कुणाचीही हिम्मत झाली नाही. त्या प्रसंगानंतर दीपाचं खेळायला येणंही कमी होत गेलं.

दीपा आता वयात येऊ लागली होती. तिनं आईचं रूप आणि बापाचा रंग घेतला होता. गावातले टगे मुद्दाम थांबून तिच्याशी काहीबाही बोलत बसत. खरं तर त्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत ती चुकीच्या मार्गी लागण्याचेच चान्स जास्त होते. पण तिच्या सुदैवाने बापट बाईंचं लक्ष तिच्याकडं गेलं. बापट कुटुंब संघाचं. त्यांच्या घरी समितीची शाखा भरत असे. बापट बाई दीपाच्या घरी गेल्या. गुरख्याशी बोलून, त्याला पटवून देऊन तिला रोज संध्याकाळी शाखेत नेऊ लागल्या. शाखेत जात असल्याने गावातल्या काही चांगल्या घरांचा दीपाला आधार मिळाला. दीपा दहावीत असताना तिच्या आईनं आपल्या दूरच्या कुणा चुलतभावाला घरी आणून ठेवलं. त्याच्याबरोबर दीपाचं लग्न लावायचा तिचा प्लान होता. पण दीपा त्यांना कसली जुमानते? आई आणि मामानं जबरदस्ती करताच त्या मुलाला बांधून घालून दीपा, बापट बाईंच्या घरी निघून आली. बाई पोलिस गेऊन तिच्या घरी गेल्या. लहान वयात मुलीला लग्न करायला लावते म्हणून केस करू असे बापट बाईनी ठणकावून सांगताच दीपाची आई आणि तिचा तो भाऊ पळून गेले. ते पुन्हा कधी कुणाला दिसले नाहीत. दीपा आणि गुरखा अशी दोघंच राहू लागली. गुरख्याची सोबत असून नसल्यासारखी. तो कुठतरी गावात पिउन पडलेला असे. दीपा रोज त्याला शोधून घरी घेऊन येत असे. गाव झपाट्यानं वाढत होतं. दीपाची झोपडी तितकीशी सुरक्षित राहिली नव्हती.

दहावीनंतर बापट बाईंनी तिला शाखेच्याच कुठल्यातरी वसतीगृहात ठेवलं. बारावीनंतर ती सैन्यात भरती झाली. बापट बाईंना तिची नियमित पत्रं येत असत. २६ जानेवारीच्या परेडमध्ये ती असल्याचं तिचं पत्र आल्यावर बापट बाईंना कोण आनंद झाला! त्यांनी लगेच जाऊन गुरख्याला सांगितलं. गुरख्याच्या डोळ्यातलं पाणी काही थांबेना. जो भेटेल त्याला अभिमानानं तो दीपाचं यश सांगत होता. त्या २६ जानेवारीला गावातल्या अनेकांनी, टीव्हीवरची परेड, मोठ्या कौतुकाने बघितली. एवढ्या लोकांत दीपा दिसणार नाही हे माहित असून सुद्धा!

वर्षाकाठी एकदा दीपा घरी गुरख्याला भेटून जात अस. गुरखा आता खंगला होता. त्यात पिणंही चालूच होतं. गुरख्याला मृत्यू फार वाईट प्रकारे आला. गावातल्या प्रथितयश डॉक्टरच्या दवाखान्याबाहेर गुरखा पडलेला सापडला. सगळ्यांना वाटलं नेहमीप्रमाणं पिऊन पडलाय. कुणीच त्याला उचलायला गेलं नाही. दुसऱ्या दिवशी तोंडावर माशा बसू लागल्या तेव्हा तो गेल्याचं लक्षात आलं. दीपाला कळवलं. ती काश्मीर मध्ये पोस्टेड होती. ती येईपर्यंत बॉडी ठेवणं शक्य नव्हत. बापट काकांनी गुरख्याचे सर्व विधी जबाबदारीनं केले. दीपा आली. दोन दिवस वडील बेवारशासारखे पडून होते, तेही एका दवाखान्याबाहेर हे कळल्यावर ती कळवळली. संतापली. "डॉक्टर आहात की राक्षस" म्हणत ती त्या डॉक्टरांवर धावून गेली. चार पाच जणांनी मिळून मोठ्या मुश्किलीनं तिला आवरलं , नाहीतर डॉक्टरांची खैर नव्हती. पूर्वीची दीपा अजूनही कुठेतरी शिल्लक होती … अतीव उद्वेगानं तिनं गाव सोडलं.

नंतर दीपा परत कधीच गावात आली नाही. पण बापट बाईंना ती खुशालीचं पत्र लिही. दीपाचं लग्नाच वय झालंच होतं. तिच्यासाठी कोण मुलगा बघणार? यावेळी देखील बापट बाई पुढे आल्या. वरसंशोधन सुरु झालं. पण काही नक्की ठरत नव्हतं. दीपाची एक शाळेपासूनची मैत्रीण होती. ती दुसऱ्या गावी शाळेत नोकरीला लागली होती. दीपा कधीतरी तिच्याकडे जात असे. एक दिवस अचानक तिचा बापट बाईंना फोन आला की दीपानं पंख्याला लटकून आत्महत्या केली. बाई आणि गावातली इतर लोकं पोचेपर्यंत सगळं संपलं होतं. दीपाची मैत्रीण आत्महत्येचं कारण सांगू शकली नाही. पोलिस केस वगैरे झाल्यामुळे ती बिचारी आधीच घाबरली होती. कळलं ते एवढंच की आदल्या रात्री दीपा सुट्टीवर म्हणून तिच्याकडं आली, खूप डिस्टर्ब होती. मैत्रीण सकाळी शाळेत गेली. संध्याकाळी घरी येईतोवर हे घडलेले. चिठ्ठी वगैरे काहीही लिहिलं नव्हतं. एवढ्या लढाऊ स्वभावाची ही मुलगी! आत्तापर्यंतची लढाई हिमतीनं जिंकलेली! मग तिनं हे का केलं? जगण्यावर एवढी संतापली? सारे प्रश्न अनुत्तरीत राहिले. ऑन ड्युटी नसल्याने असेल कदाचित , आर्मीकडून फारशी चौकशी झाली नसावी. बापट बाईना मात्र तिचं जाणं फार लागलं. त्या सोडून तिचं असं या जगात होतं कोण?

२६ जानेवारीची परेड बघितली की दीपा आठवते. यावेळी पण तिची आठवण आली. खरं तर व्यक्तिचित्र लिहिताना खरं नाव लिहू नये हा संकेत आहे. पण आज दीपाच्या बाबतीत मात्र मी तो जाणीवपूर्वक मोडलाय.

कथालेख

प्रतिक्रिया

चटका लावणारी कथा आहे दीपाची!

उगा काहितरीच's picture

4 Feb 2016 - 11:32 pm | उगा काहितरीच

असेच म्हणतो :'( :-(

पैसा's picture

4 Feb 2016 - 11:13 pm | पैसा

चटका लावणारी दीपा!

एक एकटा एकटाच's picture

4 Feb 2016 - 11:38 pm | एक एकटा एकटाच

प्रभावी लिहिलय

निओ's picture

5 Feb 2016 - 12:29 am | निओ

:(

नाखु's picture

5 Feb 2016 - 9:14 am | नाखु

सारेच अचाट आणि कल्पनातीत. एका जिद्दी जीवाचा असा अंत चटका लावणारा.

अजया's picture

5 Feb 2016 - 9:19 am | अजया

:'(
अतिशय प्रभावी व्यक्तिचित्रं लिहिलंय.जीयो चुकलामाकला.

लढवय्ये लोक आत्महत्या करतात...
दुर्दैव.

सुरेख लिहिलंयत!
धन्यवाद.

विजय पुरोहित's picture

5 Feb 2016 - 11:19 am | विजय पुरोहित

काही बोलूच शकत नाही....

केवळ शांततेतच त्या निष्पाप लढवय्या मुलीला श्रद्धांजली वाहतो...

रातराणी's picture

5 Feb 2016 - 11:42 am | रातराणी

:(

मराठी कथालेखक's picture

5 Feb 2016 - 12:58 pm | मराठी कथालेखक

कथ छान आहे.

मोहनराव's picture

5 Feb 2016 - 1:58 pm | मोहनराव

:(

प्राची अश्विनी's picture

5 Feb 2016 - 6:09 pm | प्राची अश्विनी

जीव लावावा असे कोणीच नाही
प्राण गुंतावा असे कोणीच नाही....
संगीता जोशी.

शैलेश भोसले's picture

6 Feb 2016 - 4:06 pm | शैलेश भोसले

खरचं या जगात कुणी आपल असत का ...
एका लढवय्या सैनिकाचा असा अंत...
मन सुन्न करुन गेला ....

फार प्रभावी लिहिलंय.. चटका लावणारं व्यक्तिचित्र.

सौन्दर्य's picture

1 Dec 2017 - 4:23 am | सौन्दर्य

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झगडून मोठ्या झालेल्या व्यक्ती सहसा असे पाउल उचलत नाहीत. दीपाने तसे का केले असावे हा एक मोठा गहन प्रश्न असू शकतो. अठराविश्वे दारिद्र्य, डोक्यावर सुरक्षित छप्पर नाही, कुणाचाही भक्कम आधार नाही अश्या स्थितीत तिने जीवनाशी दोन हात केले मात्र परिस्थिती बऱ्यापैकी सुधारल्यावर तिने आत्महत्या करावी असं काय घडलं असेल तिच्या जीवनात हाच प्रश्न डोक्यात रुंजी घालतो आहे.

व्यक्तिचित्र मात्र अप्रतिम आणि छान लेखन.