संक्रांत

सुधीर वैद्य's picture
सुधीर वैद्य in जे न देखे रवी...
15 Jan 2016 - 9:27 am

संक्रांत

आणखीन एक वर्ष सरले.
थंडी घेऊनच नवीन वर्ष अवतरले.
गार हवेची शाल लपेटून माणसाचे मन सुखावले.

गार झुळकेने पतंग प्रेमी आनंदले.
तीळ - गुळाच्या गोड वासानी पोटच भरले.

संक्रांतीचे दागिने घडले.
नवीन नवरीला त्याचेच अप्रूप झाले.
जावईबुवा हलव्याचा हार आणि नारळ मिळणार म्हणून खुश झाले.
फोटो काढले , आधी हलव्याच्या दागिन्यांचे आणि मग मुलगी -जावयाचे.
आणखीन एक सण पार पडला म्हणून सासूबाईनी हुश्य म्हटले.

संक्रांतीचा सण आला आणि गेला.
दरवर्षीच येतो आणि जातो.

पतंग उडवले जातात आणि कापले पण जातात.
पतंग कधी कागदाचे असतात तर कधी स्वप्नांचे .
कधी तरी माणसावर संक्रांत कोसळते. तुमच्या स्वप्नांचा चक्काचूर करते.
माणूस परत उभा राहतो नाहीतर पतंगासारखा भरकटतो.

पतंग उडवताना पतंगा बरोबर चांगला मांजा, छान हवा - वारा हवा आणि पतंग उडविण्याचे कसब हवे.
तसेच स्वप्नांच्या पतंगासाठी चांगले ध्येय, परिश्रम आणि हवेसारखे थोडे नशीब हवे.
मग तुमचा पतंग आकाशात अशी भरारी घेईल कि सगळ्यांच्या माना वरच होतील.

संक्रांत संपत्तीवर येते , संक्रांत शिक्षणावर येते.
संक्रांत सत्तेला ग्रासते , संक्रांत नाव-लौकिकाला वेढते.

अशी संक्रांत येऊ नये व पतंग कापला जाऊ नये म्हणून मित्रा,
कर्मकांडात अडकू नकोस. उगाच वेळ फुकट घालवू नकोस.
स्वधर्म सोडू नकोस. ज्योतिषाच्या मागे लागू नकोस. अंध श्रध्येचा बळी होऊ नकोस.
विज्ञानाची कास धर. स्वत:चा उद्धार कर.

Sankrant

मार्गदर्शनकविता