न्यूरेंबर्गचा निकाल - द डेथ परेड

ऋत्विका's picture
ऋत्विका in जनातलं, मनातलं
15 Jan 2016 - 8:46 am

१६ ऑक्टोबर १९४६..

जर्मनीतल्या न्यूरेंबर्ग तुरुंगातल्या जिम्नॅशियममध्ये अमेरीकन सेनाधिकार्‍यांची आणि सैनिकांची एकच लगबग सुरू होती. जिम्नॅशियमची ती जागा सुमारे ८० फूट लांब आणि ३३ फूट रुंद होती. अवघ्या तीन दिवसांपूर्वीच इथे अमेरीकन सैन्यातील सिक्युरीटी गार्ड्सच्या दोन संघात इथे बास्केटबॉलचा सामना रंगला होता. परंतु आता या क्षणी मात्रं तिथे एका वेगळीच तयारी सुरु होती. ही तयारी होती ती जागतिक इतिहासातील एका अत्यंत ऐतिहासिक खटल्याच्या निकालाच्या अंमलबजावणीची! या खटल्यात एकूण १२ जणांना देहांत शासनाची शिक्षा फर्मावण्यात आली होती!

न्यूरेंबर्ग ट्रायल्स!

अटक केलेल्या नाझी नेत्यांवर युद्धगुन्हेगार म्हणून दोस्त राष्ट्रांनी जो खटला भरला होता, तोच हा न्यूरेंबर्गचा खटला! २० नोव्हेंबर १९४५ ला हा खटला सुरू झाला. अनेक साक्षीपुराव्यांच्या आधाराने चालवण्यात आलेल्या या खटल्याचा निकाल देण्यासाठी अमेरीका, ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया या चारही देशाच्या न्यायाधिशांची नेमणूक करण्यात आलेली होती. या खटल्यात मुख्यतः चार आरोप ठेवण्यात आले होते ते म्हणजे जागतिक शांतताभंग करण्यासाठी कट रचणे, जास्तीत जास्तं भूमीसाठी जगावर युद्धं लादणे, युद्धादरम्यान जाणिवपूर्वक केलेले अपराध (यात हत्या, बलात्कारापासून ते मारहाणीपर्यंत सगळ्याचा समावेश होता) आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 'क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी' अर्थात मानवतेविरुद्ध केलेले गुन्हे ज्यात छळछावण्यांतून गॅस चेंबर्समध्ये घडवून आणण्यात आलेला ज्यू आणि स्लाव्ह वंशियांचा संहार, युद्धकैद्यांवर तथाकथित संशोधनासाठी करण्यात आलेले अघोरी प्रयोग या सगळ्याचा समावेश होता. खुद्दं अ‍ॅडॉल्फ हिटलर, हेनरिख हिमलर आणि जोसेफ गोबेल्स यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांचा आरोपींमध्ये समावेश नव्हता! मार्टीन बोरमनला मात्रं फरारी घोषित करण्यात आल्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत त्याच्यावर आरोपपत्रं दाखल करण्यात आलं होतं!

दहा महिन्यांनी ३० सप्टेंबर - १ ऑक्टोबर १९४६ या दोन दिवसांत या खटल्याचा निकाल जाहीर करण्यात आला.

२४ प्रमुख आरोपींपैकी १२ जणांना देहांत शासनाची शिक्षा फर्मावण्यात आली. यांत फरारी मार्टीन बोरमन, हर्मान गोअरींग, जोआकिम वॉन रिबेन्ट्रॉप, आल्फ्रेड रोझेनबर्ग, हान्स फ्रँक, विल्हेम फ्रिक, आल्फ्रेड जोड्ल, विल्हेम कायटेल, अर्न्स्ट काल्टेनब्रुनर, फ्रिट्झ सॉकेल, आर्थर सेस-इन्क्वार्ट आणि ज्युलियस स्ट्रायखर यांचा समावेश होता! उरलेल्या १२ जणांपैकी वाल्थर फंक, रुडॉल्फ हेस आणि एरिक रेडर या तिघांना जन्मठेप तर कार्ल डॉनित्झ, कॉन्स्टँटीन न्यूराथ, बाल्डर वॉन शिआर्च आणि अल्बर्ट स्पीअर या चौघांना दहा ते वीस वर्ष मुदतीची कैद फर्मावण्यात आली. रॉबर्ट ले याने खटला सुरु होण्यापूर्वीच २४ ऑक्टोबर १९४५ च्या रात्री आत्महत्या केली तर गुस्ताव क्रपला पॅरॅलिसीसमुळे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथेच १९५० मध्ये त्याचा मृत्यू झाला. उरलेले तिघं - हान्स फ्रिट्झ, फ्रान्झ वॉन पापेन आणि डॉ. यालमार शाख्ट यांना निर्दोष सोडण्यात आलं! वास्तविक २० एप्रिल १९४४ मध्ये हिटलरच्या हत्येचा प्रयत्न फसल्यापासून शाख्टला नाझींनी छळछावणीत डांबलेलं होतं, मात्रं असं असतानाही आपल्यावर युद्धगुन्हेगार म्हणून खटला चालवल्याबद्दल तो नाराज होता!

१२ जणांना फाशीची शिक्षा फर्मावण्यात आली असली तरी बोरमन फरार असल्याने प्रत्यक्षात ११ जणांनाच फासावर लटकावण्यात येणार होतं. या सर्वांमध्ये सर्वात सिनियर नाझी अधिकारी होता तो म्हणजे राइशमार्शल हर्मान गोअरींग! गोअरींगचा देहांत शासनाला विरोध नव्हता, परंतु फाशी जाणं मात्रं त्याला मंजूर नव्हतं! आपल्या शिक्षेविरुद्ध केलेल्या अपिलात तो म्हणाला,

"मी जर्मन राइशचा एक सैनिक आहे. मरणाची मला भिती वाटत नाही. मला देहांत शासनाची सजा द्यायची असेल तर गोळी घालून मारा, परंतु कुत्र्यासारखं फासावर लटकावू नका!"

गोअरिंगचं हे अपिल फेटाळून लावण्यात आल्यावर १५ ऑक्टोबरच्या रात्री तुरुंगातल्या कोठडीत आपल्या बिछान्यावर झोपून त्याने सायनाईडची गोळी खाऊन आत्महत्या केली! फाशी जाण्यापूर्वी अवघे दोन तास!

नाझी युद्धगुन्हेगारांच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याची पूर्ण जबाबदारी अमेरीकन आर्मीवर सोपवण्यात आलेली होती. फाशी देणारा मुख्य अधिकारी (हँगमन किंवा जल्लाद) होता मास्टरसार्जंट जॉन क्लेरेन्स वूड आणि त्याचा सहकारी होता मिलीटरी पोलिस असलेला जोसेफ माल्टा! वूड आणि माल्टा यांनी ब्रिटनमध्ये प्रचलित असलेल्या लाँग ड्रॉप तंत्राचा वापर न करता अमेरीकेत वापरण्यात येणार्‍या स्टँडर्ड ड्रॉप तंत्राचा वापर करुन गुन्हेगारांना फाशी देण्याचं निश्चित केलं होतं!

स्टँडर्ड ड्रॉप पद्धतीत फाशी जाणार्‍या कैद्याला ४ ते ६ फूट दोराचा वापर करुन लटकावलं जातं. या पद्धतीत मान मोडली जाऊन कैद्याचा वेदनारहीत मृत्यू व्हावा अशी अपेक्षा असते. लाँग ड्रॉप पद्धतीत प्रत्येक कैद्यासाठी समान लांबीचा दोर न वापरता कैद्याची उंची, वजन या सर्व बाबी विचारात घेऊन मान मोडण्यासाठी आवश्यक तितक्या लांबीचा दोर वापरुन फाशी दिली जाते. विल्यम मरवूड याने लाँग ड्रॉपच्या तंत्राचा शोध लावला. फाशीची शिक्षा प्रचलित असलेल्या देशांत याच पद्धतीने फाशी दिली जाते. (अपवाद - इराण!)

न्यूरेंबर्गच्या तुरुंगाच्या जिम्नॅशियममध्ये एकाशेजारी एक अशी एकूण तीन फाशीगेट उभारण्यात आली होती. प्रत्येक फाशीगेट हे आठ फूट लांब-रुंद होतं. फाशीच्या फळीवर उभं राहण्यासाठी १३ पायर्‍या चढून जाव्या लागणार होत्या! प्रत्येक फाशीगेटचा फाशीच्या फळीखालचा भाग तीन बाजूंनी लाकडी फळ्यांनी बंदीस्त करण्यात आलेला होता. मोकळ्या चौथ्या भागावर जाड काळ्या कापडाचा पडदा लावलेला होता. फाशीची अंमलबजावणी झालेली पाहण्यास हजर असलेल्या साक्षीदारांना खटला ओढल्यावर फाशी गेलेल्या कैद्याचे हाल पाहण्यास लागू नयेत यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती. एकावेळी एकाच कैद्याला फाशी देण्याची योजना असली तरी वेळ वाचवण्याच्या दृष्टीने तो फासावर लटकलेला असतानाच दुसर्‍या कैद्याच्या फाशीची तयारी सुरू करण्यासाठी एकावेळेस दोन फाशीगेट वापरण्याचा वूड्सचा इरादा होता. गरज पडलीच तर तिसरं फाशीगेट मुद्दाम उपलब्धं ठेवण्यात आलं होतं! फाशी देण्यासाठी एकूण ११ आणि जास्तीचे ४ असे पंधरा दोर वूडने तयार ठेवले होते, परंतु गोअरिंगने आत्महत्या केल्यामुळे एकूण दहा जणांनाच फासावर लटकवण्यात येणार होतं!

फाशीची शिक्षा फर्मावण्यात आलेल्यांपैकी सर्वात सिनीयर नाझी असल्यामुळे फाशी जाण्याचा पहिला मानकरी होता तो म्हणजे हर्मान गोअरिंग! परंतु गोअरिंगने आत्महत्या करुन अमेरीकन अधिकार्‍यांना चकवलं होतं. मूळ योजनेप्रमाणे फाशी जाणार्‍या प्रत्येकाला मोकळेपणे मृत्यूला सामोरं जाण्यासाठी फाशीच्या तख्तावर नेण्याची अमेरीकनांची इच्छा होती, परंतु गोअरिंगच्या आत्महत्येमुळे खबरदारी म्हणून प्रत्येकाच्या हातात बेडी अडकवण्यात आली!

फाशीची अंमलबजावणी करणारे अमेरीकन अधिकरी, देखरेख करणारे रशियन अधिकारी, डॉक्टर्स, सार्जंट वूड, माल्टा, कैद्यांना फाशीच्या तख्तावर घेऊन जाणारे सैनिक आणि हजर असलेले सर्व पत्रकार असे एकूण तीसेक जण तिथे हजर होते! सर्वजण तयारीत होते!

पहाटे १ वाजून ११ मिनीटांनी न्यूरेंबर्गच्या तुरुंगात डेथ परेडला सुरवात झाली!
पहिला नाझी फाशी जाण्यासाठी जिम्नॅशियममध्ये प्रवेशला!

परराष्ट्रमंत्री आणि रशियाशी अनाक्रमणाचा करार करण्यात महत्वाची भूमिका बजावणारा जोआकिम वॉन रिबेन्ट्रॉप!

रिबेन्ट्रॉप आता येताच दोन सार्जंटनी त्याचे हात धरले. त्याला आत आणणार्‍या तिसर्‍या सार्जंटने त्याच्या हातातल्या बेड्या काढून घेतल्या आणि चामड्याच्या पट्ट्याने त्याचे हात घट्टं बांधले. रिबेन्ट्रॉपच्या चेहर्‍यावर तणाव स्पष्टपणे दिसून येत होता. मात्रं त्याने आपलं भवितव्यं स्वीकारलेलं होतं. शांतपणे पावलं टाकत तो फाशीच्या तख्ताखाली असलेल्या पहिल्या पायरीजवळ उभ्या असलेल्या अमेरीकन अधिकार्‍यापाशी आला. त्या अधिकार्‍याने रिवाजाप्रमाणे त्याला नाव विचारल्यावर रिबेन्ट्रॉपने प्रथम काहीच उत्तर दिलं नाही. पुन्हा प्रश्न आल्यावर तो जवळपास किंचाळलाच,

"जोआकिम वॉन रिबेन्ट्रॉप!"

त्या अधिकार्‍याकडे वळूनही न पाहता रिबेन्ट्रॉप पायर्‍या चढून वर गेला! त्याच्या दोन बाजूला असलेल्या सार्जंट्सनी त्याला समोर हजर असलेल्या साक्षीदारांकडे तोंड करुन उभं केलं. रिबेन्ट्रॉपच्या चेहर्‍यावर पूर्वीचा थंड आणि उद्दामपणाने ओतप्रोत भरलेला भाव झळकत होता! वूड्सने त्याला शेवटचं काही बोलायचं आहे का असं विचारल्यावर जर्मन भाषेत तो उद्गारला,

"God protect Germany!" क्षणभर थांबून त्याने विचारलं, "May I say something else?"

भाषांतर करणार्‍या अमेरीकन अधिकार्‍याने परवानगी दिल्यावर रिबेन्ट्रॉप म्हणाला,
"My last wish is that Germany realize its entity and that an understanding be reached between the East and the West. I wish peace to the world!"

सार्जंट वूड्सने त्याच्या चेहर्‍यावर काळा बुरखा चढवला तेव्हा रिबेन्ट्रॉप एकटक नजरेने समोर हजर असलेल्या साक्षीदारांकडे पाहत होता! बुरख्याखाली चेहरा झाकल्यावर वूड्सने दोराचा फास रिबेन्ट्रॉपच्या गळ्यात घातला आणि दोर नीट अ‍ॅडजेस्ट केला आहे याची खात्री केल्यावर मागे सरकून त्याने माल्टाला खूण केली...

दुसर्‍याच क्षणी रिबेन्ट्रॉप फळीखालच्या पोकळीत दिसेनासा झाला!
साक्षीदारांच्या समोर उरला तो केवळ एक दोर आणि काळ्या कापडाचा पडदा!
नाझी परराष्ट्रमंत्र्याचा अध्याय संपला!

रिबेन्ट्रॉपला फाशी जाऊन जेमतेम दोन मिनीटं होतात तोच डेथ परेडचा पुढचा मानकरी जिम्नॅशियममध्ये आणण्यात आला! फील्डमार्शल जनरल विल्हेम कायटेल!

न्यूरेंबर्गच्या खटल्यात कायटेलने आपल्यावरील सर्व आरोप नाकारलेले होते. मी केवळ राइशचा सैनिक असून माझ्या वरिष्ठांनी आणि हिटलरने दिलेले आदेश अंमलात आणले होते असा त्याने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. अर्थातच हा बचाव धुडकावून लावण्यात आला!

कायटेलच्या चेहर्‍यावर तणावाचं कोणतंही चिन्हं दिसून येत नव्हतं! त्याचे हात चामडी पट्ट्याने बांधले जात असतानाही त्याच्या चेहर्‍यावर मिलीटरी अधिकार्‍याचा दृढनिश्चयी भाव कायम होता. हात बांधल्यावर अधिकार्‍याला साजेशा रुबाबात पावलं टाकत तो तख्तापाशी आला. तिथे हजर असलेल्या अमेरीकन अधिकार्‍याने त्याचं नाव विचारल्यावर खणखणीत आवाजात त्याने स्वत:चं नाव सांगितलं आणि जणूकाही एखाद्या सैन्याच्या परेडची पाहणी करण्यासाठी मंचावर जात असल्याच्या रुबाबात तो एकेक पायरी चढून फाशीच्या तख्तावर गेला! समोर हजर असलेल्या साक्षीदारांवरुन प्रशियन अधिकार्‍याला साजेशी करारी नजर फिरली. त्याने आपला फील्डमार्शलचा युनिफॉर्म घातला होता!

वूडने त्याला शेवटचं बोलायचं असल्यास बोलण्याची सूचना दिली. कायटेल जर्मनमध्ये उद्गारला,
"I call on God Almighty to have mercy on the German people. More than 2 million German soldiers went to their death for the fatherland before me. I follow now my sons – all for Germany."

वूडने कायटेलच्या चेहर्‍यावर काळा बुरखा चढवला आणि तो मागे सरकला.
अवघ्या काही क्षणात नाझी जर्मनीचा हा फिल्डमार्शल जनरल इतिहासजमा झाला!

रिबेन्ट्रॉप आणि कायटेल फाशीच्या दोन तख्तांवर लटकलेले होते. फाशी दिल्यावर किमान पंधरा मिनीटांनी डॉक्टर्स तपासणी करणार होते. जिम्नॅशियममधलं वातावरण कमालीचं तणावपूर्ण होतं. हजर असलेले पत्रकार आपल्या कामात गर्क होते. सर्वांवर असलेला तणाव कमी करण्याच्या दृष्टीने वूड्सने सर्वांसाठी सिगारेट्स मागवण्यासाठी परवानगी विचारली. अमेरीकन आणि रशियन जनरल्सनी परवानगी देताच जवळपास सर्वजण धूम्रपानात बुडून गेले!

१.२५ च्या सुमाराला एक अमेरीकन आणि एक रशियन डॉक्टर रिबेनट्रॉपला फाशी दिलेल्या तख्ताखालच्या काळ्या पडद्याआड दिसेनासे झाले. अवघ्या पाच मिनीटांत ते पडद्याआडून बाहेर आले आणि रिबेन्ट्रॉपचा मृत्यू झाल्याचं त्यांनी घोषित केलं. लगेच दोन सैनिक एका स्ट्रेचरसह पडद्याआड गेले. वूड्सने स्वतःजवळ असलेल्या कमांडो सुर्‍याचा वापर करुन दोर कापला. रिबेन्ट्रॉपचा मृतदेह स्ट्रेचरवरुन जिम्नॅशियमच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या कॅनव्हासच्या कापडाआड नेण्यात आला. त्याच्या चेहर्‍यावरचा काळा बुरखा मात्रं अद्यापही तसाच होता. अवघ्या दहा मिनीटांच्या आत हे सर्व उरकण्यात आलं!

अमेरीकन अधिकार्‍याने धूम्रपान करणार्‍या लोकांना सिगारेट्स विझवण्याची सूचना दिली. वूड्सने पुढचा दोर फाशीच्या तख्ताला बांधला होता.

१.३६ ला तिसरा नाझी मृत्यूला सामोरा जाण्यास आणण्यात आला!
अर्न्स्ट काल्टेनब्रुनर!

काल्टेनब्रुनर न्यूरेंबर्ग खटल्यात आरोपी असलेला सर्वोच्च एसएस अधिकारी होता. रेनहार्ड हायड्रीखच्या खुनानंतर जवळपास सग़ळ्या छळछावण्या त्याच्या अखत्यारीत येत होत्या. न्यूरेंबर्गच्या खटल्यात रुडॉल्फ हॉसने ज्या ऑशवित्झमध्ये सुमारे ३० लाख लोकांना गॅस चेंबर्समध्ये मारल्याची अंगावर शहारे आणणारी साक्ष दिली होती, तो ऑशवित्झचा कँपही काल्टेनब्रूनरच्याच अखत्यारीत येत होता!

स्वत:चा मृत्यू समोर दिसू लागल्यावर मात्रं काल्टेनब्रूनरची अवस्था केविलवाणी झालेली होती. तो कमालीचा भेदरुन आळीपाळीने फाशीच्या तख्ताकडे आणि हजर असलेल्या साक्षीदारांकडे पाहत होता. भयाने विदीर्ण झालेला त्याचा चेहरा पाहून हा माणूस कमालीचा उलट्या काळजाचा असेल हे कोणाला सांगूनही खरं वाटलं नसतं! एकही पाऊल न अडखळता तो फाशीच्या तख्तापाशी गेला आणि आपलं नाव सांगून त्याने पायरीवर पाऊल ठेवलं!

फाशी जाण्यापूर्वी काल्टेनब्रूनर जर्मन भाषेत म्हणाला,
"I have loved my German people and my fatherland with a warm heart. I have done my duty by the laws of my people and I am sorry my people were led this time by men who were not soldiers and that crimes were committed of which I had no knowledge!"

सार्जंट वूड काळा बुरखा त्याच्या तोंडावर चढवत असतानाच जर्मन भाषेत तो उद्गारला,
"Germany, good luck!"

बरोबर १.४० ला काल्टेनब्रूनरचा अवतार संपला!

दरम्यान अमेरीकन आणि रशियन डॉक्टर्सनी कायटेलला १.४४ का मृत म्हणून घोषित केलं होतं. रिबेन्ट्रॉपप्रमाणेच त्याचा मृतदेह स्ट्रेचरवरुन हलवण्यात आला. अवघ्या ३ मिनीटांत!

मृत्यूच्या परेडमध्ये पुढचा नाझी होता तो म्हणजे नाझी तत्वज्ञानाचा पुरस्कार करणारा आल्फ्रेड रोझेनबर्ग!
वंशभेदाच्या सिद्धांताचा पुरस्कर्ता असलेल्या रोझेनबर्गने हिटलर तुरुंगात असताना १९२३ मध्ये नाझी पार्टीची धुरा यशस्वीपणे सांभा़ळली होती. ज्यूविरोधी तत्वज्ञानाचा आणि आर्यवंशीयांच्या वर्णवर्चस्वाचा तो प्रणेता होता!

रोझेनबर्गने आपलं नाव सांगितलं आणि एक शब्दंही न उचारता तो फाशीच्या तख्तावर गेला. तो स्वतः नास्तिक असूनही एक प्रॉटेस्टंट धर्मगुरु त्याच्याबाजूला हजर होता. वूड्सने त्याच्या चेहर्‍यावर बुरखा घालण्यापूर्वी त्याला शेवटचा संदेश देण्याची विचारणा केल्यावर रोझेनबर्गने नकार दिला.

"No!"

जिम्नॅशियममध्ये प्रवेश केल्यावर मोजून तिसर्‍या मिनीटाला रोझेनबर्ग फासावर लटकला होता!

१.५२ ला काल्टेनब्रूनर मरण पावल्याचं डॉक्टरांनी जाहीर केल्यावर आणि त्याचा मृतदेह हलवण्यात आल्यावर दोन मिनीटांतच पाचवा कैदी आत आणण्यात आला. हान्स फ्रँक!

न्यूरेंबर्ग खटल्याच्या दरम्यान अल्बर्ट स्पीअर आणि फ्रँक या दोघांनीच आपल्या नाझी कारकिर्दीत घडलेल्या गुन्ह्यांबद्दल खेद व्यक्तं केला होता. आपल्याला देण्यात आलेली फाशीची शिक्षा म्हणजे या पापांचं प्रायश्चित्त असल्याची त्याची भावना होती. तो कमालीचा नर्व्हस दिसत होता. तो सतत आवंढा गिळत असल्याचंही वूड्सच्या निदर्शनाला आलं होतं. परंतु त्याच्या चेहर्‍यावर तरीही स्मितं विलसत होतं! अखेर एकदाची सगळ्यातून कायमची सुटका होणार ही भावना त्याच्या चेहर्‍यावर दिसून येत होती!

अमेरीकन अधिकार्‍याने नाव विचारल्यावर हळू आवाजात त्याने आपलं नाव सांगितलं आणि तो पायर्‍या चढून फाशीच्या तख्तावर गेला. वूड्सने काळा बुरखा चढवण्यापूर्वी त्याला काही बोलायचं आहे का असं विचारलं. फ्रँक अत्यंत हळू आवाजात उत्तरला,

"I am thankful for the kind of treatment during my captivity and I ask God to accept me with mercy!"

कैदेत असताना रोमन कॅथलिक धर्म स्वीकारलेल्या फ्रँकची परमेश्वराने सर्व पापांतून आपली मुक्ती करावी अशी अपेक्षा असावी! २.०० च्या ठोक्याला तो आपल्या पापाचा पाढा वाचण्यासाठी परमेश्वराकडे गेला!

फ्रँक फाशी जाण्यापूर्वी अवघे काही सेकंदच रोझेनबर्गचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरनी घोषित केलं होतं. त्याचा मृतदेह हलवण्यात आल्यावर २.०५ ला या डेथ परेडमधला सहावा मानकरी हजर करण्यात आला. विल्हेम फ्रिक!

विल्हेम फ्रिक हा नाझी जर्मनीचा अंतर्गत सुरक्षा मंत्री होता. महायुद्ध सुरू असताना हिटलरच्या विरोधात जर्मनीत एकही आवाज उमटणार नाही याची जबाबदारी फ्रिकवर होती. म्युनिक विद्यापिठात हिटलरविरोधात हान्स आणि सोफी स्कोल यांनी सुरू केलेली व्हाईट रोझ ही संघटना त्याने अत्यंत निर्दयपणे चिरडली होती. २० जुलै १९४४ मध्ये हिटलरच्या खुनाचा प्रयत्न फसल्यावर त्यात दूरान्वयानेही सामील असणार्‍यांची जी निर्घृण कत्तल करण्यात आली आणि पियानोच्या तारांचे फास लावून देहांत शासनाच्या शिक्षा देण्यात आल्या त्याचा कर्ताकरविताही फ्रिकच होता. इतकंच नव्हे तर याच कटात सामिल असल्याच्या आरोपावरुन 'डेझर्ट फॉक्स' अर्विन रोमेलला आत्महत्या करायला लावण्याच्या कारवाईतही फ्रिकचा महत्वाचा सहभाग होता!

६९ वर्षांचा फ्रिक कमालीचा अस्वस्थं दिसत होता. अमेरीकन अधिकार्‍याने नाव विचारल्यावर आधी तो गोंधळूनच गेला! नाव सांगून फाशीच्या तख्ताच्या पायर्‍या चढताना त्याचे पाय कमालीचे थरथरत होते. शेवटच्या तेराव्या पायरीवर तो अड्खळून जवळजवळ पडलाच होता! वूडने बुरखा घालण्यापूर्वी तो म्हणाला,

"Long live eternal Germany!"

२.१० ला फ्रिकचा अध्याय संपला!

दरम्यान हान्स फ्रँकचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरनी जाहीर केल्यावर आणि त्याचा मृतदेह हलवण्यात आल्यावर वूडने आपला सातवा दोर फाशीच्या तख्ताला बांधला! डेथ परेडमधला सातवा मानकरी होता ज्युलियस स्ट्रायखर!

नाझी प्रपोगंडा मंत्री म्हणून जोसेफ गोबेल्स कुख्यात असला तरी स्ट्रायखर त्याच्या तोडीसतोड ज्यूद्वेष्टा होता! डेर स्टमर या ज्यूविरोधी साप्ताहीकाचा तो संपादक होता! इतकंच नव्हे तर लहान मुलांसाठीही त्याने ज्यूंचा द्वेष करणारी अनेक पुस्तकं लिहीली होती! त्याचबरोबर १९३५ मध्ये तयार करण्यात आलेल्या न्यूरेंबर्गच्या ज्यूविरोधी कायद्यांमध्येही त्याचा सहभाग होता! मात्रं पुढे त्याने तो सोईस्करपणे नाकारला!

२.१२ ला स्ट्रायखरला जिम्नॅशियममध्ये आणण्यात आलं. आत येताच त्याने फाशीच्या तिन्ही तख्तांकडे क्षणभर पाहिलं. त्याच्या हातात असलेल्या बेड्या काढून चामड्याचा पट्टा बांधला जात असतानाच तो तुच्छपणे हजर असलेल्या अमेरीकन आणि रशियन अधिकारी आणि साक्षीदारांकडे पाहत होता. हात बांधून झाल्यावर दोन सार्जंट्सनी दोन बाजूंनी धरुन फाशीच्या तख्ताकडे चालवलं. रिवाजाप्रमाणे पहिल्या पायरीच्याखाली नाव विचारण्यासाठी त्याला थांबवण्यात आलं. परंतु अमेरीकन अधिकार्‍याने नाव विचारण्यापूर्वीच तीक्ष्ण सुरात स्ट्रायखरने आरोळी ठोकली,

"Heil Hitler!"

तिथे हजर असलेल्या अनेकांच्या पाठीच्या कण्यातून एक थंड शिरशिरी निघून गेली!

फाशीच्या तख्तावर उभ्या असलेल्या अमेरीकन अधिकार्‍याने खाली असलेल्या सार्जंटला सूचना दिली.
"Ask the man his name."

"You know my name well." स्ट्रायखर बेदरकारपणे उत्तरला!

भाषांतर करणार्‍या अधिकार्‍याने पुन्हा नाव सांगण्याची सूचना केल्यावर स्ट्रायखर ओरडला,
"ज्युलियस स्ट्रायखर!"

तेरापैकी अकरा पायर्‍या चढून गेल्यावर जर्मनमध्ये स्ट्रायखर ओरडला,
"Now it goes to God!"

अमेरीकन सार्जंट्सनी धक्के मारून शेवटच्या दोन पाय चढवल्या आणि त्याला फाशीच्या तख्तावर उभं केलं. साक्षीदारांकडे तोंड करुन त्याला उभं करण्यात आल्यावर स्ट्रायखर ओरडला,

"Purim Fest 1946!"

पुरातन काळात ज्यूंची हत्या करण्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या हमान याला फाशी देण्याचा आणि ज्यूंचा जीव वाचण्याचा दिवस म्हणून प्युरीम हा दिवस साजरा केला जातो! ज्यूंना टोमणा मारण्याच्याच उद्देशाने स्वतःची तुलना हमानशी करत स्ट्रायखरने हे उद्गार काढले होते!

वूडने त्याला शेवटचं काही बोलायचं आहे का असा प्रश्नं केल्यावर स्ट्रायखर किंचाळला,
"The Bolsheviks will hang you one day!"

स्ट्रायखरच्या चेहर्‍यावर बुरखा चढवला जात असतानाच त्याने आपल्या पत्नीची आठवण काढली.
"Adele, my dear wife!"

माल्टाने फाशीचा खटका ओढल्यावर स्ट्रायखरचा देह धाडकन खालच्या पोकळीत नाहीसा झाला! परंतु त्यानंतरही काही मिनीटं त्याच्या कण्हण्याचा आणि तडफडण्याचा आवाज येत होता! अखेर फाशीच्या तख्तावरुन खाली उतरून वूड त्या काळ्या पडद्याआड दिसेनासा झाला आणि अवघ्या मिनीटभराच्या आत स्ट्रायखरचा आवाज बंद झाला! वूडने त्याचे पाय खाली ओढत त्याचा लवकर मृत्यू घडवून आणला असं मानण्यास वाव आहे! स्ट्रायखर मान मोडल्यामुळे न मरता ती आवळली गेल्यामुळे मरण पावला अशी जवळपास सर्व साक्षीदारांची खात्री पटली होती!

स्ट्रायखर लटकल्यावर फ्रिकचा मृतदेह खाली उतरवून इतरांप्रमाणेच स्ट्रेचरवरुन हलवण्यात आला. मृत्यूच्या या परेडमधला आठवा मानकरी होता फ्रिट्झ सॉकेल!

२.२० ला सॉकेलला जिम्नॅशियममध्ये आणण्यात आलं. त्याच्या नावाची खात्री करुन झाल्यावर फाशीच्या तख्तावरुन साक्षीदारांकडे पाहत सॉकेल जर्मनमध्ये ओरडला,

"I am dying innocent. The sentence is wrong. God protect Germany and make Germany great again. Long live Germany! God protect my family!"

जिनेव्हा कराराला वाटाण्याच्या अक्षता लावत युद्धकैद्यांना गुलामगिरी करण्यास भाग पाडणार्‍या सॉकेलने स्वतःला निर्दोष म्हणवणं म्हणजे विनोदच होता!

२.२६ ला सॉकेल फासावर लटकला. स्ट्रायखरप्रमाणेच सॉकेलच्या तख्ताखालूनही काही वेळ कण्हण्याचे आवाज आले परंतु पुन्हा एकदा वूडने काळा पडद्याआड धाव घेत सॉकेलचा मृत्यू घडवून आणला!

दरम्यान स्ट्रायखरला मृत घोषित करुन त्याचा मृतदेह हलवण्यात आल्यावर त्याच्या तख्तावर नवव्या माणसाची वर्णी लागली! जनरल आल्फ्रेड जोड्ल!

जोडलने ब्रिटीश-अमेरीकन फौजांपुढे रिन्ह इथे शरणागती पत्करली होती. त्याच्यावर करण्यात आलेल्या काही आरोपांमधला फोलपणा त्याने न्यूरेंबर्गच्या खटल्यात सिद्धं केला होता. परंतु हिटलरच्या उच्च वर्तुळात असल्याने त्याची वाचण्याची शक्यता जवळपास नव्हतीच! गोअरिंगप्रमाणेच त्यानेही आपल्याला गोळी घालून मारण्याचं अपिल केलं होतं, परंतु ते फेटाळण्यात आलं!

२.२८ ला जोडलला आत आणण्यात आलं. त्याचा वेरमाख्टचा युनिफॉर्म त्याच्या अंगावर होता. तो कमालीचा नर्व्हस दिसत असला तरीही त्याच्या मिलीटरी रुबाबात मात्रं कसलीही उणीव दिसत नव्हती. आपलं नाव सांगून फाशीच्या तख्ताच्या पायर्‍या चढताना तो किंचीतसा अडखळला, मात्रं एकदा वर पोहोचल्यावर कायटेलप्रमाणेच करारी मुद्रेने मृत्यूला सामोरं जाणं त्याने पसंत केलं. वूडने त्याला शेवटचा संदेश विचारल्यावर जोड्ल जर्मनमध्ये उत्तरला,

"My greetings to you, my Germany!"

२.३४ ला जनरल जोडलचा अवतार संपला!

जोडल फासावर लटकल्यावर चार मिनीटांनी २.३८ ला सॉकेलचा मृतदेह खाली उतरवण्यात आला. त्याचा देह इतर नाझींच्या मृतदेहांमध्ये ठेवला जात असतानाच मृत्यूच्या या परेडमधला शेवटचा दहावा भिडू आत आला. आर्थर सेस-इन्क्वार्ट!

सेस-इन्क्वार्टला पुढे करुनच हिटलरने ऑस्ट्रीयावर कब्जा केला होता. पुढे जर्मनीने हॉलंडवर आक्रमण केल्यावर हिटलरने हॉलंडचा कमिशनर म्हणून त्याची नेमणूक केली होती. न्यूरेंबर्ग खटल्याच्या निकालात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आल्यावर तो म्हणाला,

"Death by hanging... well, in view of the whole situation, I never expected anything different. It's all right."

सेस-इन्क्वार्टचा चेहरा शांत भासत असला तरी तो कमालीचा अस्वस्थं होता. त्याचा डावा पाय किंचीत वाकडा असल्याने तो अडखळतच फाशीच्या तख्ताच्या दिशेने गेला. आपलं नाव सांगितल्यावर वर चढताना त्याला दोन्ही सार्जंट्सची मदत घ्यावी लागत होती. फाशीच्या तख्तावरुन जर्मन भाषेत तो उद्गारला,

"I hope that this execution is the last act of the tragedy of the Second World War and that the lesson taken from this world war will be that peace and understanding should exist between peoples. I believe in Germany!"

२.४५ ला सेस-इन्क्वार्टचा अध्याय संपला!

जोडल आणि सेस-इन्क्वार्ट फासावर लटकलेले असतानाच जिम्नॅशियमच्या दारातून दोन सैनिक एक स्ट्रेचर घेऊन आत आले. त्या स्ट्रेचरवर एक मृतदेह होता. राइशमार्शल हर्मान गोअरिंग!

वास्तविक गोअरिंगला सर्वप्रथम फाशी देण्याची योजना होती. परंतु त्याने आत्महत्या केल्यावर किमान त्याचा मृतदेहतरी फाशी गेलेल्या त्याच्या सहकार्‍यांप्रमाणे साक्षीदारांना दाखवण्याचा अमेरीकन अधिकार्‍यांनी निर्णय घेतला होता! जोडल आणि सेस-इन्क्वार्ट यांच्या फाशीच्या तख्तांच्या मधोमध गोअरिंगचा मृतदेह असलेलं स्ट्रेचर खाली ठेवण्यात आलं आणि त्याचा चेहरा सर्व साक्षिदारांना दाखवण्यात आला! गोअरिंगचा खरोखरच मृत्यू झालेला आहे याची खात्री पटवण्यासाठी अमेरीकन अधिकार्‍यांनी ही खबरदारी घेतलेली होती!

गोअरिंग आणि त्याच्यापाठोपाठ जोड्ल आणि सेस-इन्क्वार्ट यांना मृत घोषित केल्यावर त्यांचे मृतदेह इतर नाझींबरोबर ठेवण्यात आले. त्यानंतर सर्व अकरा मृतदेह म्युनिक इथल्या एका दहनगृहात जाळण्यात आले आणि त्यांची राख सार नदीत विखरुन टाकण्यात आली!

अनेक पत्रकार आणि साक्षीदारांच्या मते सार्जंट जॉन वूड्सने स्टँडर्ड ड्रॉप पद्धत वापरताना केलेल्या चुकांमुळे काही कैद्यांना गळा आवळला जाऊन यातनामय मृत्यू आला होता. विशेषत: स्ट्रायखर, सॉकेल आणि रिबेन्ट्रॉप यांना! वूड्सचं दोराच्या लांबीचं गणित चुकल्यामुळेच हा परिणाम झाला होता. तसंच फाशीच्या फळीची लांबी-रुंदी तुलनेने बरीच कमी असल्याने फाशी दिली जाताना अनेकांचे देह फळीचा कडांना घासले गेल्यामुळे रक्तबंबाळ झाले होते! अर्थात अमेरीकन आर्मीने हे सर्व आरोप फेटाळले हे वेगळं सांगायला नकोच!

खुद्दं सार्जंट वूड्सची प्रतिक्रीया फारच बोलकी होती. तो म्हणाला,

"I hanged those ten Nazis... and I am proud of it... I wasn't nervous.... A fellow can't afford to have nerves in this business.... I want to put in a good word for those G.I.s who helped me... they all did swell.... I am trying to get them a promotion.... The way I look at this hanging job, somebody has to do it. I got into it kind of by accident, years ago in the States!"

अवघ्या पावणेदोन तासात दहा जणांना फाशी देण्याच्या आपल्या कामगिरीचा वूड्सला फार अभिमान होता.

"Ten men in 103 minutes! Thats fast work!"

-----------------------------------------------------------------------------------------------------------

संदर्भ-

By The Neck Until Dead: The Gallows of Nuremberg - Stanley Tilles,Jeffrey Denhart
From Nuremberg to Nineveh - Mark Turley
The Execution of Nazi War Criminals - Joseph Kingsbury-Smith
Interrogations: The Nazi Elite in Allied Hands - Richard Overy

इतिहासलेख

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

15 Jan 2016 - 9:52 am | तुषार काळभोर

.

हिट्लर व त्याच्या भक्तगणाची....

एकापेक्षा जास्त जण स्वत:च्या पायांनी चालत फाशीच्या तख्तापर्यंत गेल्याचे उल्लेख आहेत.

प्रत्येकजण स्वतःच्या पायांनीच चालत फाशीच्या तख्तापर्यंत गेला. केवळ खबरदारी म्हणून अमेरीकन सार्जंट्सनी प्रत्येकाचे हात धरले होते. पायर्‍या चढतानाही स्ट्रायखरचा अपवाद वगळता कोणावरही जबरद्स्ती करावी लागली नाही. कायटेल आणि जोड्ल हे मिलीटरी परेडमध्ये ज्या रुबाबात चालत असत, त्याच रुबाबात आणि शिस्तबद्धपणे चालत गेले.

असंका's picture

18 Jan 2016 - 7:14 pm | असंका

होय. धन्यवाद....

जरा वेगळं वाटलं. फाशीच्या शिक्षेला गुन्हेगारांना ढकलत न्यावं लागतं या पद्धतीची वर्णनंच आजपर्यंत जास्ती करून वाचली होती..

प्रमोद देर्देकर's picture

15 Jan 2016 - 10:32 am | प्रमोद देर्देकर

भयानक नव्हे हो , उलट त्यांना सोप्या पध्दतीने मारले गेले. त्यांनी जो छळ केला होता त्यापुढे फाशी म्हणजे काहीच नाही. उलट मला वाटतं की या दहा जणांनाही हाल हाल करुन मारायला हवे होते.

मृत्युन्जय's picture

15 Jan 2016 - 11:30 am | मृत्युन्जय

कायटेल आणि जोडल यांना फाशी दिली गेली ते पसंत पडले नाही. त्याचप्रमाणे रुडॉल्फ हेस आणी स्पीअर सुद्धा नाहक बकरे बनवले गेले असे वाटते (अर्थात ते कमी शिक्षेवर सुटले)

बोका-ए-आझम's picture

15 Jan 2016 - 12:52 pm | बोका-ए-आझम

कायटेलवर ठेवण्यात आलेल्या आरोपांमध्ये शत्रुसैनिकांना देण्यात आलेल्या वागणुकीचाही मुद्दा होता. पूर्व आघाडीवर पकडण्यात आलेल्या युद्धकैद्यांना वेहरमाख्ट किंवा जर्मन सैन्याने एस.एस. च्या हातात सोपवावं हा आदेश कायटेलने दिला होता, त्यांची काय गत होणार आहे याची पूर्ण कल्पना असूनसुद्धा.
जोडल हिटलरचा सल्लागार होता आणि जरी रशियावर आक्रमण करण्याला त्याने विरोध दर्शवला असला तरी हाॅलंड आणि बेल्जियम या तटस्थ राष्ट्रांवरच्या आक्रमणाची आणि परिणामी सर्व संहाराची जबाबदारी त्याच्यावर होती.
हेस १९४१ मध्ये शांतता प्रस्थापित करण्याची स्वयंघोषित जबाबदारी घेऊन ब्रिटनमध्ये उतरला होता आणि तेव्हापासून ब्रिटिश तुरूंगात होता त्यामुळे रशियावरचा हल्ला आणि तिथल्या संहाराची जबाबदारी त्याच्यावर येत नव्हती पण पश्चिम युरोपातील युद्धात जर्मनीतील चौथ्या क्रमांकाचा नेता - हिटलर, गोअरिंग, हिमलर यांच्यानंतर - त्याचा सहभाग सिद्ध झाला.
१९४३ पासून स्पीअर जर्मनीचा युद्धसाहित्य मंत्री होता. त्याच्याआधी तो वास्तुविशारद होता. युद्धकैद्यांना गुलाम म्हणून वापरणे यासाठी तो जबाबदार होता. मजा म्हणजे ज्या साॅकेलला स्पीअर आपली मागणी कळवायचा, त्या साॅकेलला फाशी झाली पण स्पीअर २० वर्षांच्या शिक्षेवर सुटला. कदाचित त्यांचा सामाजिक दर्जा हे एक कारण असावं.

मृत्युन्जय's picture

15 Jan 2016 - 1:06 pm | मृत्युन्जय

कायटेलने फक्त शत्रुसैनिकांना एस एस च्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. त्यांच्याबरोबर एस एस ने काही केले त्याचे उत्तरदायित्व कायटेलवर येत नाही. तत्कालीन परिस्थितीत तो युद्धकैद्यांना स्वतःबरोबर ठेउ शकत नव्हता आणि सोडुनही देउ शकत नव्हता. त्याची जागी असलेल्या कुठल्याही अधिकार्‍याने हेच केले असते.

जोडलचे ही तेच. त्याने त्याच्या देशासाठी युद्ध लढले. त्यात जे काही नुकसान झाले त्याची संपुर्ण जबाबदारी हिटलर आणि गोअरिंग वर जाते.

रुडॉल्फ हेसने हिटलरची साथ सोडली होती यातच खरे म्हणजे त्याचे निर्दोषत्व सिद्ध होते. अर्थात तो सुटला असता तर लवकर मेला असता. उरलेल्या नाझींनी त्याला नक्कीच जिवंत सोडला नसता.

स्पीअरने युद्धकैद्यांना गुलाम म्हणुन वागवले की कामावर जुंपले? इतर अनेको केसेस मध्ये हेच झाले आहे की. किमान स्पीअर ने त्यांना कामाला जुंपले म्हणुन ते जिवंत तरी राहिले.

बोका-ए-आझम's picture

15 Jan 2016 - 3:22 pm | बोका-ए-आझम

वानसी येथील परिषदेत - जिथे राइनहार्ड हायड्रिचने Final Solution हा शब्द पहिल्यांदा वापरला - कायटेल आणि जोडल हे दोघेही हजर होते आणि दोस्तांनी Following the orders हा बचाव कोणाच्याही बाबतीत स्वीकारला नाही. अगदी नंतर आइकमनच्या किंवा क्लाऊस बार्बीच्या बाबतीतही नाही. मजा म्हणजे हिटलरला चॅन्सेलरपदाचं निमंत्रण द्यायला अध्यक्ष हिंडेनबर्गला भरीस पाडणा-या आणि त्यामुळे पुढच्या सगळ्या संहाराला जबाबदार असणाऱ्या फाॅन पापेनला निर्दोष सोडण्यात आलं. त्याला Denazification Court ने शिक्षा दिली. जर्मनीची अर्थव्यवस्था सुधारून तिला युद्धसज्ज बनवणा-या शाख्तलाही निर्दोष सोडण्यात आलं पण Denazification Court ने शिक्षा दिली. पण १९५५ पर्यंत दोघेही बाहेर आले आणि पश्चिम जर्मनीत सुखवस्तू आयुष्य जगले.
हेस जेव्हा ब्रिटनमध्ये उतरला तेव्हा त्याने आपण नाझी जर्मनीचे नेते आहोत हे उघडपणे सांगितलं होतं. त्याने हिटलरच्या तत्वांचा त्याग वगैरे अजिबात केला नव्हता. त्यामुळे महायुद्धापूर्वी आणि १९४१ पर्यंत घडलेल्या अत्याचारांची जबाबदारी त्याच्यावर येतच होती. पूर्व आघाडीवरच्या नृशंस अत्याचारांमध्ये तो सहभागी नव्हता कारण तो त्याआधीच ब्रिटनमध्ये उतरला होता.
स्पीअर नाझी पक्षाचा सभासद नव्हता. त्याला हिटलरने सभासद करुन घेतला होता. शिवाय नाझींमध्ये तोच एक sensible माणूस होता आणि १९४४ मध्ये हिटलरला उलथवण्याच्या कटाला त्याची सहानुभूती होती हे न्यूरेंबर्ग खटल्यात उघड झालं होतं. शिवाय, त्याने आपला गुन्हा मान्य केला. त्यामुळे त्याला २० वर्षांची शिक्षा झाली.
विजेत्यांचा न्याय हा आरोप रशियाच्या बाबतीत खरा आहे कारण रशियनांनी जर्मनांसारखेच अत्याचार करूनही विजेते म्हणून त्यांच्या अधिका-यांना कोणीही हात लावला नाही.

स्पीअर २० वर्षांनीच असला तरी हेस कधीच सुटला नाही. हेसला देण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेतून त्याची लवकर मुक्तता व्हावी म्हणून बरेच प्रयत्न करण्यात आले, पण दरवेळी रशियाने व्हेटो वापरुन त्याल नकार दिला. हेसचा ब्रिटनमध्ये जाण्याचा हेतू हा ब्रिटनशी तह करुन रशियावर आक्रमण करणं सोपं जावं हा असल्याने रशियाने त्याला कधीच माफ केलं नाही. १७ ऑगस्ट ८७ या दिवशी स्पांडाऊ तुरुंगात वयाच्या ९३ व्या वर्षी हेसने आत्महत्या केली.

एस's picture

15 Jan 2016 - 11:54 am | एस

लेख छान लिहिलाय.

अत्रन्गि पाउस's picture

15 Jan 2016 - 11:54 am | अत्रन्गि पाउस

चुकीच्या कृत्यांचे समर्थन नाहीच ...पण यदाकदाचित जर्मनी जिंकता आणि दोस्तांच्या लोकांना फाशी देता ...तर ह्याच सगळ्यांचा प्रचंड उदो उदो झाला असता ...

जिंकलेला प्रत्येक देश जवळपास तितक्याच घृणास्पद हिंसाचाराचे धनी आहे ....

फटू's picture

15 Jan 2016 - 2:49 pm | फटू

नशा केवळ दारुची किंवा अंमली पदार्थाची असते असे नव्हे. नशा एखादया विचाराचीही असू शकते. हे या नाझी क्रुरकर्म्यांच्या फासावर जाण्यापूर्वीच्या शेवटच्या वक्तव्यावरुन प्रकर्षाने जाणवते.

मानसशास्त्राच्या क्षेत्रातील काही तज्ञांच्या मते व्यसनाचे दोन प्रकार पडतात.

१. पदार्थाचे व्यसन (substance addiction)
२. विचारांचे/कृतीचे व्यसन (process addiction)

देश, देव, धर्म किंवा एखादी विचारधारा यांच्या बाबतीतला अतिरेक दुसर्‍या प्रकारात येतो जो इथे नाझी क्रुरकर्म्यांच्या "शुद्ध जर्मन वंशाच्या" विचारधारेत दिसून येतो.

बोका-ए-आझम's picture

15 Jan 2016 - 4:29 pm | बोका-ए-आझम

या मुख्य खटल्यानंतर प्रत्येक विजेत्या राष्ट्राने आपापल्या क्षेत्रात नाझी युद्धगुन्हेगारांवर खटले भरले. त्यांच्यावरही लिहा.

जव्हेरगंज's picture

15 Jan 2016 - 8:26 pm | जव्हेरगंज

वाचतोय!
लिहा अजून!!!

मुक्त विहारि's picture

15 Jan 2016 - 8:35 pm | मुक्त विहारि

लेख आवडला....

ऋत्विका's picture

15 Jan 2016 - 8:38 pm | ऋत्विका

सर्वांचे मनापासून आभार!

बोकोबा,
न्यूरेंबर्गच्या खटल्याप्रमाणेच ऑशवित्झ, डाखाव, बार्जेन-बेल्सेन, सॅबिबॉर, ट्रेबलिंका अशा अनेक छ़ळछावण्यांमधील गुन्ह्यांबद्दल आणि इतर अनेक राष्ट्रांमधून नाझी आणि त्यांच्याशी हातमिळवणी करणार्‍यांवर खटले झाले आणि अनेकांना फासावर लटकवण्यात आलं असलं, तरी या प्रत्येक खटल्यांवर स्वतंत्र प्रकरण म्हणजे एकसुरीपणा येण्याची शक्यता वाटते, त्यामु़ळे तूर्तासतरी तसा विचार केलेला नाही. परंतु जगभरातील विविध देशांतील देहांतशासनाच्या पद्धतींवर लिहीण्याचा विचार आहे. पाहू कसं जमतंय ते!

नया है वह's picture

15 Jan 2016 - 8:46 pm | नया है वह

+१

अजया's picture

15 Jan 2016 - 9:27 pm | अजया

लेख आवडला.पुलेशु

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Jan 2016 - 10:47 pm | निनाद मुक्काम प...

आमचे न्युन्बेर्ग जगात दोन गोष्टीच्या साठी प्रसिद्ध आहे
न्युन्बेर्ग सोसेज आणि न्युन्बेर्ग चा खटला
तेथे न्युन्बेर्ग ची सिटी टूर आहे ज्यात ह्या सर्व ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन घडवून आणतात.

कायदेशीर कारवाई वाचताना अंगावर शहारा आला. लेखनशैली आवडली.

DEADPOOL's picture

17 Jan 2016 - 9:26 am | DEADPOOL

रोमांचक लेख! आवडला!
मार्टीन बोरमनच पुढे काय झालं?

पैसा's picture

17 Jan 2016 - 10:34 am | पैसा

लिखाण आवडले. वाचताना शहारा आला.

अभिजीत अवलिया's picture

17 Jan 2016 - 8:56 pm | अभिजीत अवलिया

लिखाण वाचताना प्रत्यक्ष डोळ्यासमोर चित्र उभे राहत होते.

अत्रन्गि पाउस's picture

7 Apr 2016 - 11:05 am | अत्रन्गि पाउस

ह्याचे उद्गार मात्र अत्यंत उर्मट आणि उद्दाम वाटतात....
वयाच्या ३९ व्या वर्षीच तो गेला ..

सुधीर कांदळकर's picture

8 Apr 2016 - 5:07 pm | सुधीर कांदळकर

लेखन आवडले. रिबेन्ट्रॉपला का फासावर लटकावले कळत नाही. रशियाच्या हट्टामुळे असणार. रशियाबरोबरचा मोलोटॉव्ह रिबेन्ट्रॉप करार यानेच केला होता ज्यावर हरताळ फासून नंतर रशियावर हल्ला चढवला.

असो. चांगल्यालेखाबद्दल धन्यवाद.