20 लाख स्वाहाः, एक रुमाल अन मुर्तिमंत भीती.

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in जनातलं, मनातलं
10 Jan 2016 - 8:22 pm

मित्रहो, आजवर जगातली सगळ्यात यशस्वी गुन्हेगारी संघटना कुठली ? असे जर कोणी आपल्याला विचारले तर आपला साहजिक कल कुठे जाईल ? एकतर महाशक्तिशाली असा अन शेकडो खून पाडलेला असा एखादा रशियन माफ़िया? सिसिलियन अप्रवासी लोकांच्या बनलेल्या गँग्स ऑफ़ न्यूयॉर्क? वेस्टकोस्ट अमेरिका मधला हिस्पॅनिक माफिया ?, मॅक्सिकन कोलंबियन ड्रग कार्टेल्स?, निंजा परंपरांतुन आलेला जपानी गुन्हेगारी गट, का धर्म अन क्रिकेट बेटिंग अन अमली पदार्थांच्या अभद्र युती मधुन जन्माला आलेली भारतीय अंडरवर्ल्ड?? उत्तर??

ह्यापैकी एकही नाही, जगातला सगळ्यात भयानक गुन्हेगारी गट आजच्या जगातल्या सगळ्या खंडातल्या सगळ्या गटांच्या क्रौर्याला पुरुन उरेल अशी एक गँग, इथेच आपल्या भारतात होती. तिची दहशत इतकी भयानक होती की तीर्थयात्रेला निघलेला माणुस निघताना घरदारावर तुळशीपत्र ठेऊन बायकापोरांना कवेत घेऊन ओक्साबोक्शी रडत असे. भीती एकच! वाटेत जर "त्यांच्या" तावडीत सापडलो तर? अन परत आलाच, तर जिवंत परत आल्याच्या ख़ुशीत गावाला "मावंद" घालत असे जेवणाचे !. ४५० वर्षांच्या आपल्या अस्तित्वात ह्या भयंकर "गँग" ने विविध आकड्यांनुसार जवळपास १० ते २० लाख खून केलेत. होय! अक्षरी वीस लाख खून, म्हणजे रोज सरासरी ११ खून हे प्रमाण, गुप्ततेच्या अतिरेकी आवरणाखाली अघोरी शाक्त तत्वाची पूजा करत हा गट काम करत असे, हा गट म्हणजे "ठग" किंवा इंग्लिश मधे "The Thugs", कोण होते हे ठग? का करत असत ते हे सगळे? काय होती त्यांची कार्यशैली? कोणी केले त्यांना कंट्रोल?

ठग

तर मंडळी, काळ होता संक्रमणाचा, संक्रमण राज्यकर्त्यांचे सुद्धा अन काळाचे सुद्धा. अंदाजे तेराव्या शतकाच्या अंती अन चौदाव्या शतकाच्या पूर्वर्धात, उत्तर भारतावर तेव्हा ग़ुलामवंशाचे शासन होते, घोंगावत आलेले परचक्र स्थिरावत होते, त्याच काळात कधीतरी सततच्या युद्धांमुळे कोसळलेल्या सुलतानी मुळे देशोधड़ीला लागलेल्या कोण्या एका माणसाने सुरु केलेला हा उद्योग होता ज्याचे नाव काळाच्या उदरात गड़प झाले. इतिहासाला अतिशय गुप्ततेत असणाऱ्या ह्या गँग बद्दल फार कमी माहीती आहे, जी मिळाली ती ही ह्या गँग च्या उतरणीच्या काळात कागदी घोड्यांस महत्व देणार फिरंग्यांच्या कागदातून मिळाली. तसे पाहता ठगांचे "एक घट्ट विण असलेली गँग" ह्या स्वरूपाचे वर्णन पहिले मिळते ते १३५६ मधे लिखित "ज़ियाउद्दीन बर्नी" ह्याच्या "तारीख-ए-फ़ीरोज़शाही" मधे. इथे १२९० मधे त्याकाळच्या सुलतानाच्या दिल्लीत एक ठगांचा गट पकडल्याचे अन त्या सगळ्यांस सुलतानाने लखनौतीकड़े (आजचा पूर्व उत्तर प्रदेश) तड़ीपार केल्याचे उल्लेख सापड़तात. ह्या नंतरचे उल्लेख अक्षरशः नगण्य, पार ब्रिटिश लोकांनी एक विशेष खाते काढून ठगांचा बंदोबस्त करे पर्यंत म्हणजे जवळ जवळ ४५० वर्षे. तर, वरती सांगितल्याप्रमाणे सततची धुमश्चक्री पारतंत्र्य ह्यांनी गांजलेल्या अन भुकेकंगाल लोकांनी सुरु केलेली ही परंपरा, ह्यांचे प्रार्थमिक उद्देश्य म्हणजे धन मिळवणे, पण तसे पाहता हे तर डाकू सुद्धा करत असत! मग फरक काय होता? मुख्य फरक दोन. डाकू अघोषित राजांसारखे वागत एखाद्या गावात दहशत माजवणे, रयतेला अपल्यासमोर झुकवणे प्रसंगी विशिष्ट गावा/समूहा/व्यक्तिकडून वार्षिक/अर्धवार्षिक खंडणीची बंदी करून घेणे, फिक्स अड्डे असणे ही डाकुंची वैशिष्ट होती, पण ठग? त्यांच्यासाठी अवघे विश्वाची माझे घर प्रकार होता, कुठल्या ही एका गावाला टारगेट न करता प्रवाश्याना टारगेट करायची त्यांची ती पद्धत, असे म्हणू नये पण त्याकाळी विलक्षण इनोवेटिव होती. अड्डे सुद्धा असत ठगांचे, फ़क्त ते त्यांचे अड्डे म्हणजे रस्त्यावर प्रवासी कोंडीत धरुन ख़तम करायची जागा असे (शक्यतो तीनबाजू बंद असलेली जागा, नदी किनारा, कातळभिंतीच्या तळाला वगैरे). त्यांचे गाव पाडा वगैरे सगळे अज्ञात असे! बरेचवेळी रात्री ठगीचे काम केलेले लोकच दिवसा रस्त्याकडेला वेशांतर करून फ़कीर बैरागी बनून बसत किंवा गावात जे उपलब्ध ते काम करत असत. काहींच्या म्हणण्यानुसार ठग हे शाक्त परंपरेचे भोक्ते असत पण बरेच ठग हे मुस्लिम सुद्धा असल्याचे नंतर आढ़ळुन आले होते. ठगांचे उद्देश्य सुद्धा मुख्यत्वे पैसे सोने मिळवणे असेच होते, पण त्यांची कार्यशैली ही विलक्षण थंड डोक्याची असे, अन ह्या कार्यात त्यांना कामी येत असे त्यांची डाइवर्सिटी, ठग ही एक जात अशी नव्हती तर त्या गँग मधे अक्षरशः अठरापगड़ माणसे असत (जात म्हणुन फार नंतर म्हणजे १८७१ साली लॉर्ड मेयो गवर्नर जनरल असताना "क्रिमिनल ट्राइब्स एक्ट" मधे ह्यांना जात म्हणुन नोटिफाय केले गेले होते) . ही ती डाइवर्सिटी होती जी त्यांना आपल्या कवर आइडेंटिटी बळकट करून आपली सावजे म्हणजेच सहाप्रवाश्यांचा विश्वास जिंकण्यास मदतीची ठरत असे. प्रसंग काल स्थळा नुसार हे लोक कधी डोंबार्याचे सोंग आणत तर कधी "काशीयात्रेला निघालेल्या कथेकरी बुआचे" कधी जोग्याचे सोंग तर कधी बनिया कधी तेली कधी लोहार कधी कोण तर कधी कोण, अंडरकवर रहायची कला आधुनिक जगात आपण जशी पाहतो त्याच्या महत्वाच्या कंट्रीब्यूटर्स पैकी हे ठग एक म्हणल्यास हरकत नाही. ह्यांची मोडस ऑपरंडी म्हणजे पहिले लांबच्या प्रवासाला निघालेला एखादा गट हेरणे, लांबच्या प्रवासवाला इतक्यासाठी की लहान पल्ल्याचे प्रवासी शक्यतो लोकल्स असतात अन ते त्यांच्या गंतव्यास न पोचल्यास संशय बळावु शकण्याचे चांसेस जास्त असतात, उदा माझा एखादा पाहुणा अमुक गावाहुन माझ्याकडे येणार आहे तर कमी पल्ला असल्यामुळे एकतर घोड्यावर एका दिवसात पोचेल किंवा रात्र झाली तरी त्याला कुठे कसा मुक्काम करायचा हे पक्के माहीती असेलच, अश्या शक्यतांमुळे ठग कमी पल्ल्याचे प्रवासी कटाक्षाने टाळत असत अगदी सोन्याने मढलेले असले तरीही!. हा संयम अन गुप्तता ह्याच्यामुळे ते इतके वर्ष टिकले हे आवर्जून अधोरेखित करावे वाटते. प्रथम ठगांची एखादी गँग लांब पल्ल्याच्या प्रवासी गटाला हेरत असे, असे प्रवासी शक्यतो एकटेदुकटे नाही तर चांगले २५ च्या वगैरे गटात असत त्यामुळे लूटीची शक्यता वाढत असे. असा गट हेरल्यावर लगेच कुठलाच ठग काहीच करत नसे तर ते त्या गटांच्या निर्दिष्ट वाटांवर काही काही पडावांनंतर असे विखुरत, गट चालू लागयच्या वेळी एखादा गप्पीष्ट माणुस किंवा दोनचार हसमुख माणसे त्या गटात सामिल होत असे / असत, मजल दर मजल करत दोन चार मुक्काम गेले की सगळी गँग बेमालुमपणे त्या गटात मिसळून जाई त्यात कोणीही एकमेकांस ओळख दाखवत नसत, चौथ्या पाचव्या मुक्कामी सुरुवातीला गटात सामिल झालेले एक किंवा दोन ठग काहीही कारण काढून पुर्ण गटाला जेवण देतो म्हणत असत (आज एक व्रत पुर्ण झाले त्याचे पारणे आहे किंवा चाँद दिसला म्हणून काय वाटेल ते जे त्या खास प्रवासी गटाला कन्विनसिंग अन आनंद क्षण वाटावे असे) त्यावेळी जेवणात धतुरा/धोत्रा ह्या वनस्पती च्या विषारी बियांचा अर्क पाहुणे मंडळी उर्फ़ सावजांस दिला जात असे, कारण चार पाच ठगांना तसे पाहता 25 माणसे आवरणे कठीणच नाही का ? अशी ही प्रवासी मंडळी खाऊन अर्धवट बेशुद्ध झाली की ठगातला एखादा खड्या आवाजात गाणी म्हणी किंवा डफली चा ताल धरीत असे , जेणेकरून रुमालाने गळे आवळताना कोणी आरडले तर तो आवाज दबावा. स्वतःच्या गँगची गुप्तता अबाधित ठेवायची म्हणुन हे लोक कोणालाच जिवंत सोडत नसत. कार्यभाग आटोपल्यावर ते लोक आपल्या ठरलेल्या जागी प्रेते पुरुन टाकत असत अन त्या जागी मुद्दाम थोड़े विस्कटलेला पालापाचोळा वगैरे मुक्काम वाटावा अश्या खुणा सोडत जेणे करून त्या पाचोळया खाली गाडलेल्या प्रेतां मुळे वर खाली झालेली जमीन कोणाला दिसू नये. आता रुमालच का? तर परत कारण गुप्तता हेच समोर येते , रेशमी झुळझूळीत रुमाल प्रवासी म्हणून सोबत बाळगला तरी कोणाला शंका येणार नाही, concealmeant चे टेंशन नाही, मारताना कुठेही रक्तपात नाही, म्हणुन रेशमी रुमाल वापरला जात असे. बरेचवेळा रुमालाची पट्टी करून त्याच्या बरोबर मध्यात एक जड़ पितळी पदक ठेवले जात असे अन सावजाचा गळा घोटताना ते पदक बरोबर माणसाचे गळगुंड उर्फ़ एडम्स ऍपल वर येईल असे पाहिले जात असे जेणेकरुन श्वास नलिकेवर अतिरिक्त प्रेशर येऊन माणुस लवकर मरावा. नंतर तोच पदक असलेला रुमाल कंबरबंद म्हणून गुंडाळत असत.

हत्या करते ठग

(रुमालाने गळा आवळणारे ठग)

अड्ड्यावर प्रेते पुरायला नेताना

"अड्ड्यावर प्रेते पुरायला नेताना ठग"

ठगांच्या टोळीत सामिल व्हायला विशेष काही प्रशिक्षण नसे फ़क्त कॉन्टेक्ट हवा अशी अट असे, एक असा कॉन्टेक्ट जो तुम्हाला गँग मधे इंट्रोड्यूस करेल, एकदा गँग मधे आले की एक वरिष्ठ ठग तुम्हाला चालण्याबोलण्या पासुन ते गळा आवळण्यापर्यन्त सारी ट्रेनिंग देत असे. गँगच्या राजाला "जमेदार" असे म्हणत, असाच एक प्रसिद्ध जमेदार म्हणजे "बेहराम जमेदार" किंवा "ठग बेहरा" हा होता, १७६५ मधे जन्माला आलेला बेहराम हा कदाचित आजही जगातला सर्वात जास्त बळी घेणारा सीरियल किलर ठरावा, ह्याने १७९० मधे पहिल्या खूनापासून ते १८४० मधे पकडला जाईपर्यंत ९३१ लोक खलास केले होते, १८४० मधे त्याला फासावर लटकवले गेले. ह्याचा एरिया म्हणजे अवध विभाग होता. वेषांतर म्हणून हा बेहराम जमेदार अतिशय धनी व्यापार्याचे सोंग वठवत असे.

व्यापार्याच्या वेशात बेहराम जमेदार

"व्यापारी वेषात बेहराम जमेदार"

कथेकरी/ब्राह्मणवेशात बेहराम जमेदार

"पंडित झालेला बेहराम जमेदार"

ठगांच्या गँगचा राजा मात्र वंशपरंपरागत ठगीचे काम करणाऱ्या फॅमिली मधला असे किंवा सहसा जुन्या जमेदाराचा मुलगा असे, बरेचवेळी ठग आपल्या सावजांसोबत असलेली मुलेबाळे ठार न करता जिवंत ठेऊन दत्तक घेत असत व त्यांना पुढे ठग बनायचे प्रशिक्षण देऊन टोळीत सामिल करून घेत असत, लूटीच्या मालाचे वाटप जमेदाराच्या मार्गदर्शनात होत असे. अगदी सुरुवातीला भुकेकंगाल अवस्थेला तोड़ म्हणून सुरु झालेली ही भयंकर गँग नंतर नंतर खुप जास्त फोफावली कारण "इजी मनी"चं खुळ त्याकाळी सुद्धा होतेच की!. सुरुवातीला साधन म्हणजे खून करणे जरी शुचिर्भूत नसले तरी साध्य निरलस होते ते म्हणजे "पोटची भुक मिटवणे" नंतर नंतर विकृती इतकी वाढली ठगांमधे की भुक मिटवणे किंवा धन प्राप्त करणे ही "साध्यं" सुद्धा दुय्यम झाली अन लोकांना "साधनाची" सवय किंबहुना व्यसन लागले, बेहराम जमेदार ह्याच विकृत काळाचा प्रतिनिधी होय.

तोवर चारशे सवाचारशे वर्षे उलटून गेली होती अन अजुन एक नवसंक्रमण होऊ घातले होते, ह्या नव्या संक्रांतीचं नाव होतं "यूरोपियन्स" मसाल्यांच्या शोधात आलेले हे लोक पुढे औद्योगिक क्रांतिनंतर कच्च्या मालाला हपापलेले होते, त्यानंतर ब्रिटिश साम्राज्य ईस्ट इंडिया कंपनी वगैरे सगळ्या घडामोडी झाल्या होत्या, रेनेसांसचं वारं प्यायलेल्या ह्या लोकांनी सगळ्या आधुनिक कल्पना ह्या आपल्या वसाहतीचं शोषण करण्यासाठी मॉडिफाई करून घेतल्या होत्या, ह्यातलीच एक म्हणजे मुख्यभूमीवर तयार होणार कच्चा माल उदा नीळ, अफु, ताग, कापुस बंदरापर्यंत पोचवणे अन त्याच्यासाठी तेव्हा प्रवासी अन व्यापारी राज्यमार्ग सुलभ सुकर अन सुरक्षित करणे क्रमप्राप्त होते, १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यसमराच्या अगोदर तर कंपनी ची माणसे अगदी धार्मिक बाबी जसे सती वगैरे च्या विरोधात सुद्धा लुड़बुड करू लागले होते. १८१२ मधे पेशवाई गार केल्यावर इंग्रज यूनियन जॅक भारतात घट्ट रोवला गेला अन ते संक्रमणचक्र हळू होऊ लागले काळाचे, नव्या गड्याच्या नव्या राज्यात हे संक्रमण ठगांचे कर्दनकाळ ठरले, ह्याला कारण होता तो एक इंग्रज गवर्नर जनरल, लॉर्ड विलियम बेंटिक. बेंटिक भारतात आला तो बंगाल सुभ्याचा गवर्नर जनरल म्हणुन, ब्रिटिश पार्लियामेंट ने त्याला एकच काम सोपवले होते, फ़क्त अन फ़क्त कंपनीचा नफ़ा वाढवणे, १८२८ मधे भारताचा गवर्नर जनरल व्हायच्या आधी बंगालचा गवर्नर असताना ह्याने राजा राम मोहन राय ह्यांच्या समवेत सतीबंदी वर भरपुर कार्य केले होते अर्थात हे कार्य त्याने रेनेसांस ने शिकवलेल्या मुल्यांमुळे केले की इंग्रजी शिक्षण देऊन देशी कारकुन तयार करुन कंपनीचा नफ़ा वाढवणे ह्या हेतु ने केले हा इतिहासप्रेमी लोकांत वादाचा विषय असू शकतो. १८२८ मधे भारताचा गवर्नर जनरल झाल्यावर बेंटिक समोर प्रश्न फ़क्त बंगाल प्रेसीडेंसी पुरते उरले नव्हते तर बंगाल खुद्द अन सोबत मुंबई अन मद्रास प्रेसीडेंसी अश्या उर्वरीत दोन्ही प्रेसीडेंसी चा कारभार सुद्धा तो पाही, तंत्रिकदृष्टया तो मद्रास अन मुंबई प्रेसीडेंसीच्या गवर्नर्सचा मुकादम झाला होता. ही जबाबदारी त्याने संधीयुक्त आवाहनासारखी वापरली अन कंपनीला भारतभरातुन वांछित कच्चामाल निर्धोक मिळावा म्हणुन देशाच्या कायदासुव्यवस्थेत सूक्ष्म लक्ष घालायला सुरुवात केली, जिच्यावर तसेही इंग्रज नेहमी लक्ष ठेवत खुप आधीपासुन. ह्याचवेळी त्याची दृष्टी ठगांच्या गँग वर पडली, ही नजर पडायला कारण म्हणजे इंग्रज लोकांची गुन्हेअन्वेषण करायची काटेकोर पद्धत, ह्यात गुन्हा तर समोर येतच असे शिवाय इंग्रज लोकांच्या कागदाला अतिमहत्व दिल्यामुळे त्या गुन्ह्याचे स्वरुप अन इतर माहीती भविष्यासाठी उपलब्ध होऊ लागली होती. हा तो काळ होता जेव्हा ४००+ वर्षांची गुप्ततेची चादर ठग लोकांवरून हळूहळू उचलली जाऊ लागली अन त्यांची कुंडली आकार घेऊ लागली. अर्थात, ह्या कामाचा अवाका ठगांचे पूर्वकर्तृत्व पाहता प्रचंड असणे साहजिक होते, तेव्हा बेंटिकला एक हुशार माणुस हे प्रकरण हाताळायला गरजेचा वाटू लागला. नाट्याच्या ह्या अंकात प्रवेश होतो तो ठगांचा कर्दनकाळ ठरलेल्या अश्या मेजर जनरल विलियम हेनरी स्लीमनचा जो त्याकाळी कर्नल होता.

लॉर्ड विलियम बेंटिक

"लॉर्ड विलियम बेंटिक"

विलियम हेनरी स्लीमन, किंवा मेजर जनरल विलियम हेनरी स्लीमन हे एक अफ़लातून प्रकरण होते, १७८८ साली इंग्लॅण्ड मधे एका सरकारी बाबुच्या पोटी आलेले हे पुत्ररत्न हरहुन्नरी अन डेरिंगबाज होते. १८०९ साली २१ वर्षांचा तरुण विलियम लेफ्टनंट म्हणून बंगाल आर्मी मधे रुजू झाला अन नंतर पूर्णपणे भारतात विरघळुन गेला. १८२० साली त्यांची नेमणूक मुलकी अधिकारी म्हणून झाली अन ते Assiatant to the Agent of Governer General, जिल्हा सागर, मध्यप्रांत म्हणून रुजू झाले, नंतर १८२२ अन १८२८ मधे त्यांना अनुक्रमे नरसिंहपुर, मध्यप्रांतचा जिल्हाधिकारी अन जबलपुर, मध्यप्रांतचा जिल्हाधिकारी म्हणून बढ़ती मिळाली. १८३५ मधे ते मजिस्ट्रेट जिल्हा सागर म्हणून परत सागरला पोस्टेड झाले. नर्मदा नदीच्या खोऱ्यात डायनासोर जीवाश्म शोधून त्यांनी एशिया खंडात डायनासोर जीवाश्म शोधणार पहिला माणुस अशी ख्याती सुद्धा कमवली होती. बंगाल आर्मी अन मध्यप्रांत म्हणजे ठगीच्या बालेकिल्ल्यात उमेदीची वर्षं घालवलेला हा इसम साहजिकच बेंटिकच्या नजरेत भरला अन त्यांचा मुलकी अन लष्करी अनुभव जमेला धरता बेंटिकने त्यांची आपल्या ठगी निर्मूलन कार्यक्रमाचे अधीक्षक म्हणून नेमणूक केली. General Supritendent, Thuggee and Dcoity Supression Department असे ते पद होते. जवळपास 2 वर्षे घालवुन आपली पूर्वपुण्याई , लोकांत मिसळण्याचे कसब अन सागरचे मजिस्ट्रेट असतानाचा अनुभव पणाला लावुन, स्लीमन ह्यांनी १८३५ मधे कुविख्यात ठग राजा सईद आमीर अली उर्फ़ "फिरंगिया"ला जेरबंद केले. पोलिसी चौकशीअंती फिरंगिया ने माफीचा साक्षीदार व्हायची तयारी दर्शवली. त्याने स्लीमन ह्यांना ठगांचे अड्डे दाखवले, एक अशी जागा दाखवली जिथे १०० च्या वर माणसांची प्रेतं ठगांनी गाडली होती. ते खून करणाऱ्या ठगांची नावे सांगितली. ह्या नंतर स्लीमन ह्यांनी आपला झपाटा सुरु केला. पुर्ण राज्यात जिथे कुठे ठगीच्या घटना झाल्या तिथे भेटी देणे, कितीही अतिरंजित वाटले तरी ग्रामीण लोकांनी दिलेली वर्णने सूचीबद्ध पद्धतीने लिहून काढणे, ठग लोकांस भौगोलिक फायदा देतील अशी ठिकाणे, त्यांचे प्रोबेबल अड्डे ह्यांना नकाश्यावर नोंदवणे, जास्तीत जास्त प्रवासी कुठल्यामार्गाने प्रवास करतात हे निरिक्षण करणे, साध्यावेषातली माणसे खबरी सगळीकडे पसरवणे अन माफीचे साक्षीदार झालेले ठग ह्यांना ठगांच्या टोळी मधे मोल म्हणुन घुसवणे हे सगळे प्रकार ह्या आधुनिक इंटेलिजेंसच्या पितामह ठरणाऱ्या माणसाने केले, अन १८३६ ते १८५२ ह्याकाळात एकतर हजारो हजार ठग ठार केले किंवा पार अफगानिस्तान खुरासान कड़े तड़ीपार केले. त्यांची ही प्रोएक्टिव लॉ एनफोर्समेंटची पद्धत इतकी नवीन होती की पुढे चालून त्याच Thuggee and Dacoity supression department चे रूपांतर अतिशय कार्यक्षम अन गुप्त अश्या ब्रिटिश CID मधे झाले जे स्वातंत्र्यप्राप्ती नंतर इंटीलिजेंस ब्यूरो उर्फ़ IB मधे रूपांतरित झाले, ह्यप्रकारे आयबी ही आधुनिक जगातली सर्वात जुनी गुप्तहेर संघटना झाली. त्यांनी प्रथम पकडलेल्या फिरंगियाची केस इतकी प्रसिद्ध झाली होती की १८३९ मधे फिलिप मेडो टेलर नामक इंग्लिश लेखकाने सईद आमीर अली उर्फ़ फिरंगियाला केंद्रस्थानी ठेऊन "कंफेशंस ऑफ़ अ ठग" ही कादंबरी लिहिली होती जी त्याकाळी लंडन मधे बेस्टसेलर झाली होती.

मेजर जनरल विलियम स्लीमन

"मेजर जनरल विलियम स्लीमन"

बरीच वर्ष नंतर गेली, १८७१ मधे ठग ही जात म्हणून गणली गेली अन क्रिमिनल ट्राइब्स एक्ट मधे अंतर्भूत झाली खरी, पण तोवर प्रवासाला रेलवे झाली होती, ठग ही एक दंतकथा झाली होती, काळ आपल्या गतीने पुढे सरकत राहिला प्रत्येक क्षणाला जगातल्या ह्या सर्वाधिक भयानक गँगची स्मृती पुसट करत, तरीही एक वाक्य इतिहासाच्या प्रत्येक पुस्तकाच्या कोपर्यात कायम आहे, अन राहील.....

"एक काळ होता जेव्हा भारतात एक अतिशय भयानक गुन्हेगारी गँग होती, जिचे नाव होते............

.....ठग"

(लेखनसीमा) बाप्या

सर्व चित्रे इंटरनेट वरुन साभार

इतिहासलेख

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

10 Jan 2016 - 8:40 pm | यशोधरा

जबरी.

श्रीगुरुजी's picture

10 Jan 2016 - 8:46 pm | श्रीगुरुजी

माहितीपूर्ण लेख!

२१ व्या शतकात देखील मोठ्या संख्येने ठग आहेत. परंतु हे ठग खून न करता कायदेशीर मार्गाने नागरिकांना लुबाडून देशोधडीला लावतात.

संदीप डांगे's picture

10 Jan 2016 - 9:30 pm | संदीप डांगे

अगदी अगदी, मूळ ठगांची मोडस् ऑपरेंडी वाचता वाचता नवठगांची तशीच असल्याचे लक्षात येत होते...

नाखु's picture

11 Jan 2016 - 8:42 am | नाखु

बिना रुमाली ठग फार बेक्कार आणि वर वेळप्रसंगी रुमालही तुमचा आमचाच वापरतील.

प्रतीसाद मात्र नाखु

जव्हेरगंज's picture

10 Jan 2016 - 8:48 pm | जव्हेरगंज

अत्यंत रोचक माहितीपुर्ण लेख!

एकदम रोचक विषय.नवीच माहिती.

राजेश घासकडवी's picture

10 Jan 2016 - 8:53 pm | राजेश घासकडवी

लेख आवडला. दोन वर्षांपूर्वी कन्फेशन्स ऑफ अ ठग वाचलं होतं. ते वाचून त्यातल्या वर्णनांनी अंगावर काटा आला होता. ब्रिटिशपूर्व काळात संस्थानिक, गावचे पाटील, नवाब, छोटेमोठे राजे हे सर्व ठगांना संरक्षण देत असत.

हे पुस्तक आंतरजालावर उपलब्ध आहे.

मन१'s picture

11 Jan 2016 - 12:51 pm | मन१

पिंडारी / पेंढारी ह्या लुटालूट करणार्‍यांना संसरक्षण होतं ते ठौके.
ठगांना असल्याचं प्रथमच नव्या माहितीबद्दल आभार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jan 2016 - 8:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला. केवळ जबरा.

-दिलीप बिरुटे

उगा काहितरीच's picture

10 Jan 2016 - 8:58 pm | उगा काहितरीच

एका वेगळ्याच जगाची ओळख करून देणारा लेख.

बापरे! अविश्वसनीय प्रकार आहे. लेखनशैली आवडली.

एस's picture

10 Jan 2016 - 9:19 pm | एस

जियो!

अत्रन्गि पाउस's picture

10 Jan 2016 - 9:44 pm | अत्रन्गि पाउस

वा ...अत्यंत रोचक आणि माहितीपूर्ण लेख ...मन:पूर्वक दाद

संदीप डांगे's picture

10 Jan 2016 - 9:54 pm | संदीप डांगे

+१०००

भंकस बाबा's picture

10 Jan 2016 - 9:45 pm | भंकस बाबा

लेख आवडला.

योगी९००'s picture

10 Jan 2016 - 9:47 pm | योगी९००

लिखाणशैली छान..! पण वाचून अंगावर काटा आला..!!

छान अभ्यासपूर्ण लेख

राही's picture

10 Jan 2016 - 9:58 pm | राही

ठगांविषयी अनेक उल्लेख एकोणिसाव्या शतकातल्या साहित्यात येतात. ठगांच्या बंदोबस्तामुळे इंग्रजांना अनेक 'ब्राउनी पॉइंट्स' मिळाले. रयतेमध्ये इंग्रजांबद्दल अचानक सद्भाव निर्माण झाला. गोर्‍यांच्या राज्यात काठीला सोने बांधून काशीयात्रेला जाता येते असा सामान्य जनतेचा विश्वास इंग्रजांवर बसला. पुढे संस्थाने खालसा करण्याच्या प्रकरणांमुळे राजेरजवाडे जरी ब्रिटिशांच्या विरोधात गेले तरी सामान्य जनतेपर्यंत ही विरोधाची धग पोचली नाही. इंग्रजांची सत्ता दृढमूल होण्याचे हे एक मोठे कारण होते. पुढे दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे यांनी हिंदुस्तानच्या होत असलेल्या आर्थिक लुटीविरोधात आवाज उठवेपर्यंत ब्रिटिशांच्या कल्याणकारी राज्याचीच प्रतिमा जनतेत रुजून राहिली होती.
लेख आवडला हे वेगळे सांगायला नकोच.

मन१'s picture

11 Jan 2016 - 2:13 pm | मन१

+१
ठगाच्मा बंदोबस्त, इतर कायदा - सुव्यवस्थेची कामे ह्यांमुळे ब्रिटिशांबद्दल नागरिकांना फारच बह्रवसा वआतू लागला ह्तोआ. शिवायप्रसशासकीय वय्वस्थेत त्यांनी मिडलमननीकमी केले; आख्ख्या व्यवस्थेचं प्रमाणीकरण/ स्टँडार्डाअय्झेशन केलं ; ( म्हणजे पंजाबात असेल , तशीच थोडीबहुत व्यवस्था कर्नाटकतही असेल; अशी परिस्थिती ) ह्यामुळे काही नागरिकांना जगणं सोपं वाटू लागलं ; निदान सरकारशी संबंध येणार्‍या घटकांना. ( व्यापारी वगैरे. )
सगळ्याच पब्लिकची काही सुरुवातीला तक्रार वगैरे नव्हती ब्रिटिशांबद्दल.
.
.
दादाभाई नवरोजी वगैरेंनी उगीचच ब्रिटिश आणि जनता ह्यांच्यात भांडणे लावायला सुरुवात केली ;)

अनुप ढेरे's picture

10 Jan 2016 - 10:00 pm | अनुप ढेरे

जबरी!

विशाल कुलकर्णी's picture

10 Jan 2016 - 10:36 pm | विशाल कुलकर्णी

जबरा लेख रे बापु. भरपूर अभ्यास केलाहेस, आवडला लेख!

सुहास झेले's picture

10 Jan 2016 - 10:57 pm | सुहास झेले

आयला... लेका ऐकावे ते नवलच. मस्त अभ्यासपूर्ण लेख.

स्रुजा's picture

10 Jan 2016 - 10:58 pm | स्रुजा

बाप रे ! थरारक लेख !

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jan 2016 - 11:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर अभ्यासपूर्ण लेख !

लॉरी टांगटूंगकर's picture

11 Jan 2016 - 12:16 am | लॉरी टांगटूंगकर

लेख आवडला बापू, !!! लिखते रहो.

चतुरंग's picture

11 Jan 2016 - 2:12 am | चतुरंग

वाचून काटा आला! हे ठग म्हणजे सध्याच्या गुन्हेगारी वर्तुळांचे खापरपणजोबाच म्हणायला हवेत.

इंग्रजांचे एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा छडा लावण्याचे कसब आणि नोंदी ठेवण्यातली मेहनत ही अजोड होती यात शंका नाही. त्यामुळे निदान काही प्रमाणात तरी हा इतिहास माहीत झाला.

(किंचित अवांतर - मी मागे वाचलेल्या ठगांच्या काही उल्लेखात ठग-पेंढारी असे जोड उल्लेख वाचलेले आठवताहेत, त्यातले पेंढारी म्हणजे नेमके कोण? तेहि बहुधा गुन्हेगारच असावेत परंतु नेमका फरक काय?)

-रंगा

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Jan 2016 - 8:14 am | कैलासवासी सोन्याबापु

पेंढारी,

हे भाड़े तत्वावर मिळणारे योद्धे असत, जे कुठल्याही एका सरदार दरकदाराच्या बाजुने लढत अन सालाना तनखा किंवा वतन मोबादला म्हणुन घ्यायला नकार देत , त्याच्या जागी ते त्यांच्या आवडीचे एक गाव लुटायची परवानगी मागत. अन अक्षरशः ते गाव बेचिराख करून टाकत असत. म्हणुन बरेचवेळी पेंढारी यायच्या अगोदर गावकरी स्वतःची चीज़वस्तु दडवुन ठेवत अन स्वतःच स्वतःचे गाव पेटवून देत असत. एकार्थाने जो जास्त गावे लुटायला परवानगी देईल त्याची चाकरी करायची असा खाक्या असे थोडाबहुत आधुनिक सोमलियन वॉरलॉर्ड्स सारखा किंवा नाइजीरियन कांगो मधल्या वॉरलॉर्ड्स सारखा. The allegiances purely reserved for the highest bidder

मन१'s picture

11 Jan 2016 - 2:11 pm | मन१

इंग्रजांचे एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा छडा लावण्याचे कसब

ह्याबद्दल बॅट्या नेमकं सांगतो. standardisation आणि organization ह्यामुळं ब्रिटिशांना जबरदस्त फायदा झाला सत्ता मिळवण्यात आणि टिकवण्यात.
सुरुवातीस भारतीय राजांविरुद्ध काही लढाया हरले असतीलही, पण त्यांचा प्रभाव सतत वाडह्त राहिला. आणि मग ते सगळच घशात घालून बसले. लढाई हरले तरी ते त्यामागचं विश्लेषण, आणि प्रापत परिस्थितीत काय काय करता येइल, ह्याचा सखोल अभ्यास, दस्ता ऐवजीकरण ( डॉक्युमेन्टेशन ) करत; त्यामुळे सतत सुधारणा होत राहून ते अंतिमत: मालक झाले.
.
.
पेंढारी म्हणजे वरती कुनीतरी म्हटलय तसे थेट येउन हल्ले करत गावात. लुटत. ( हे मला ऑल्मोस्ट दरोडेखोरीसारखच वाटाअतं.) हे मुळात मुघल - मराठा वगैरे फौजांत सुरुवातीस पगारी योद्धे म्सर्सिनरीज् का काय म्हणतात तसे होते. जोअवर लडहया वगैरे होत मोठ्या प्रमाणावर; तोवर ह्यांचे बरे चालू असे.
मुळात केंद्रिय सत्ता प्रबळ असताना त्यांची चाकरी ह्यांना शक्य होती.
.
.
नंतर नंतर दिल्ली काय नि पुणे काय, एक नेमकी अशी प्रबळ केंद्रिय सत्ता राहिली नाही. एकत्रित दीड दोन लाखाचं खडं लष्कर कुणी मेन्टेन करेनासं झालं. लढाईच्या वेळीच काय ते ह्यांना पाचारण करण्यात येइ. पण तोवर खायचं काय ? दोन लढायांच्या दरम्यानचं काम काय ?

ह्याला संस्थानिकांनी दिलेलं उत्तर होतं "तुम्चं तुम्ही पाहून घ्या".
मग चरितार्थासाठी ही पेंढारी/पिंडारी टोळकी निशस्त्र गावकर्‍यांना लुटत फिरु लागली.

.
.सनंतर ब्रिटिशांशी ह्यांचा सामना झाल्यावर ब्रिटिशांना विजय मिळण्याचं एक कारण हेही होतं की ही मंडळी प्रत्यक्ष शिस्तबद्ध सैन्यासोबत लढण्याचा अनुभव गमावून बसली होती; व निव्वळ लुटीत वेळ घालवत होती.

.
.
अजून एक बाब म्हणजे लढाई नंतर मागाहून (मुख्य सैन्यानंतरही काही पेंढारी तुकड्या असत.) त्यांचे मुख्य काम गावातला माल लुटाणे, "खणती" लावणे, श्रीमंत घरे हेउन त्याच्या आसपास खोद्दून लपवलेला माल मिळवणे हे होते. मग ह्यातला एक हिस्सा वरते पातह्वला जाइ, उरलेला हे लोक स्वतःकडे ठेवून घेत.
.
.
मराठा सत्तेच्या शेवटच्या कालात ह्यांना एकत्र करुन एक लढाउ सैन्य बनवण्याचा यशवंतराव होळकरांचा प्रयत्न त्यांच्या अज्काली निधनाने पूर्णत्वास जाउ शकला नाही.

राजानेच परवानगी दिली गावे लुटायला मग प्रजेने काय करायचे.
हिंदुस्तानचा इतिहास नावाचे १८९४ की ९५ साली लिहीलेले एक पुस्तक वाचले आहे. त्यात या पेंढा-यांबद्द्ल माहीती दिली आहे.
ज्या गावात हे लुटीला जात त्या गावाची भरलीच असे समजले जायचे. अनन्वीत अत्याचार करत. धन कुठे ठेवले आहे वगैरे माहीती काढण्यासाठी गावक-यांच्या तोंडात गरम राख आणि विस्तव कोंबत, लहान मुलाला भाल्याच्या टोकावर ठेवत आणि उंच उडवत वगैरे.
शिंदे आणि होळकर यांच्याकडे अशा पेंढा-यांच्या टोळ्या होत्या. त्यांना शिंदेशाही पेंढारी आणि होळकरशाही पेंढारी म्हणत. लुटीचा काही भाग शिंदे आणि होळकरांना द्यावा लागत असे.
हे म्हणजे आपल्याच प्रजेला लुटा आणि तुमची आणि आमची पण पोटे भरा.
खरेच त्यावेळचा इतिहास वाचला तर असे दिसते की शिवाजी महाराज आणि काही थोडके अपवाद सोडले तर प्रजेशी कोणत्याही राज्यकर्त्याला काही घेणे दिसले नाही.

पगला गजोधर's picture

13 Jan 2016 - 9:25 am | पगला गजोधर

हे म्हणजे आपल्याच प्रजेला लुटा आणि तुमची आणि आमची पण पोटे भरा.
खरेच त्यावेळचा इतिहास वाचला तर असे दिसते की शिवाजी महाराज आणि काही थोडके अपवाद सोडले तर प्रजेशी कोणत्याही राज्यकर्त्याला काही घेणे दिसले नाही.

काहीतरीच काय हे बबनराव !!!!
इथल्या सुसंस्कृत्,सभ्य्,विद्वत्ताप्रचूर्, महान आणि उच्च अश्या परंपरावादी असलेल्या लोकांना विचारले का तुम्ही,

''प्रजेच्या जगण्याशी कोणतेही देणेघेणे न ठेवणाऱ्या" राज्यकर्त्यानां बोल लावण्यापूर्वी …. उदा. दुसरा बाजीराव व लक्ष्मीबाई … ''???
भारताला, भाटगिरीपूर्ण बखरीपेक्षा, अभ्यसनिशि इतिहासाचे पुराव्यानिशी डॉक्यूमेंटेशन करायला शिकवणाऱ्या ब्रिटीश अभ्यासकांचा थेट चाहता पगु…।

" माझा प्रवास " या गोडसे भटजींच्या पुस्तकात १८५७ च्या उठावात झाशी पडल्यानंतरचे झाशी शहराचे भेसूर वर्णन केले आहे.
झाशी पडल्यानंतर शहरातील प्रजेला कुणीच वाली नव्ह्ता. जेत्यांनी (इंग्रज सैनिक - अर्थात बहुतांशी काळेच आणि इंग्रजांना साथ देणारे ग्व्हालेरचे शिंदे यांचे सैनिक) झाशीच्या नागरीकांची लूट करून दैना करून टाकली. भांडीकुंडी सुद्धा शिल्ल्क ठेवली नाहीत.

बोका-ए-आझम's picture

11 Jan 2016 - 8:23 am | बोका-ए-आझम

ब्रिटिशांच्या एका नवीन पैलूचं आकलन करुन देणारा लेख लिहिलाय बापू. मुळातच इतर युरोपियन लोकांपेक्षा ब्रिटिश वेगळे ठरतात ते त्यामुळे. त्यांनी उपखंडातल्या लोकांच्या धार्मिक बाबतीत पोर्तुगीजांएवढी ढवळाढवळ केली नाही आणि शिवाय कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित केली. जगाच्या इतर भागांतही असंच घडलेलं असण्याची शक्यता आहे, कारण एकेकाळी सूर्य पण न मावळणारं साम्राज्य ब्रिटिश उभं करु शकले नसते.

प्रचेतस's picture

11 Jan 2016 - 9:08 am | प्रचेतस

अप्रतिम लेख.

पगला गजोधर's picture

11 Jan 2016 - 9:22 am | पगला गजोधर

सेम अश्याच आशयाचा प्रोग्राम एपीक EPIC चँनेलवर पाहिला होता, तेव्हा
तत्कालीन ब्रिटीश अधिकार्याच्या खबर्यांचे जाळे व त्यावर अँनालीसीस करून
उपाययोजना करण्याच्या त्यांच्या गुणांचे कौतुक वाटलेले.
भारतीय पोलीसदल सैन्य अश्या सर्व मुलभूत संस्थांची बीजे ब्रिटीश इंडियात आहे हे प्रकर्षाने जाणवते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Jan 2016 - 9:35 am | कैलासवासी सोन्याबापु

एपिक एकंदरित लैच जबरा चॅनल आहे फ़क्त थोड़े कंटेंट अजुन डेवेलोप व्हायला हवे त्यांचे एकीकडे राजा रसोई और अन्य कहानियां अन दरीबा डायरीज सारखे कार्यक्रम तर एकीकडे टाइम स्लॉट भरायला म्हणुन फ़क्त बीआर चोपड़ाच्या महाभारत अन श्रीगणेश टाइप कार्यक्रमांचे पुनःप्रक्षेपण, त्यांचे दोन कार्यक्रमांच्या मधले फिलर्स सुद्धा भारी असतात.

मन१'s picture

11 Jan 2016 - 2:09 pm | मन१

फिलर्सच खरोखर जास्त माहितीपूर्ण वाटले त्यांचे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

12 Jan 2016 - 11:44 am | अनिरुद्ध.वैद्य

हेच लिहायला आलो होतो!

पैसा's picture

11 Jan 2016 - 9:23 am | पैसा

अप्रतिम लेख!

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Jan 2016 - 9:35 am | कैलासवासी सोन्याबापु

सगळ्यांचे आभार मंडळी! ____/\____

मुक्त विहारि's picture

11 Jan 2016 - 10:01 am | मुक्त विहारि

आवडला....

श्रीरंग_जोशी's picture

11 Jan 2016 - 10:43 am | श्रीरंग_जोशी

सोन्याबापू - अत्यंत माहितीपूर्ण लेख. ठग या शब्दाचा अर्थ एकेकाळी केवळ फसवणारा बहुरुपी म्हणून मी घेत असे. परंतु हे ठग अत्यंत क्रुर असत हे मला बरेच अलिकडे कळले.

ठगांना आवर घालण्यासाठी ब्रिटिशांच्या यशस्वी प्रयत्नांबद्दल प्रथमच सविस्तर वाचले.

हा लेख वाचताना मिपाकर जयंत कुलकर्णी यांच्या या दोन लघुकथा सतत आठवत होत्या.

पिलीयन रायडर's picture

11 Jan 2016 - 2:40 pm | पिलीयन रायडर

जयंत काकांच्या लेखांची आठवण आलीच.. आनी मग लिंकसाठी तुमचीही आली!!

उत्तम लेख!!

अमित खोजे's picture

13 Jan 2016 - 2:18 am | अमित खोजे

विचारच करत होतो की अश्याच आशयाची गोष्ट अगोदर कुठेतरी वाचली आहे म्हणून पण नावच आठवत नव्ह्ते.
धन्यवाद. लेख जबरदस्तच!!!

मृत्युन्जय's picture

11 Jan 2016 - 11:13 am | मृत्युन्जय

आइच्यान. वेगळीच माहिती कळाली. हे नव्हते माहित.

मी-सौरभ's picture

11 Jan 2016 - 6:07 pm | मी-सौरभ

सहमत आहे

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jan 2016 - 11:29 am | बिपिन कार्यकर्ते

उत्तम लेख. लिही राहा बाप्पू.

ठग हे एक प्रचंड रोचक प्रकरण आहे. त्यात परत त्यांच्याबद्दल माहिती फारशी उपलब्ध नसल्यामुळे ते प्रकरण गूढ होत गेलं आणि रोचकता वाढत गेली. माझ्या माहितीप्रमाणे ठग हे कालीचे उपासक असत. हिंदू मुस्लिम असे दोन्ही ठग असले तरी ते सर्वच कालीभक्त असत आणि तिला बळी देणे वगैरे प्रकारही करत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Jan 2016 - 11:43 am | कैलासवासी सोन्याबापु

होय कालीमातेचे भक्त असत ठग लोकं बिका दादा, त्याचे एक्सप्लेनेशन असे त्यांच्याकडे, "धनासाठी आम्ही जी माणसे मारतो त्यात आम्ही फ़क्त साधन असतो, मुळ जीव हरण करते ती कालीमाताच" असे ते सांगत असत.

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jan 2016 - 1:16 pm | बिपिन कार्यकर्ते

अजून एक असे ... रक्तभक्षण करणे हे भवानीचे (कालीमातेचे) स्वाभाविक काम आहे. ती रक्तावर गुजराण करते. तिला असे बळी देऊन आम्ही बाकीच्या लोकांचे रक्षणच करत आहोत.

मन१'s picture

11 Jan 2016 - 2:12 pm | मन१

+१
शिवाय ते अत्यंत श्रद्धाळू, निष्ठावंत असत. आपण लोकंणा मारुन काहीतरी कालीमातेची खरोखरच सेवा करत आहोत; असे ह्यांना वाटे. ( अगदि मुस्लिमांनाही ) स्लीमननं ह्याच श्रद्धेचा वापर करुन ह्यांच्या कारवाया आटोक्यात आणल्या.
त्यातल्या त्यात वाईट इतकच की खूपशा खबर्‍यांनी केवळ पर्सन्ल स्कोर सेटिंग सआथी कैक निरपराधांचेही नावं दिली.
आणि कित्येक निरपराधही ह्या लफड्यात नाहक फासावर गेले ठग असलयच्या संशयावरुन .

अद्द्या's picture

11 Jan 2016 - 12:09 pm | अद्द्या

बापू साहेब

मस्तच लेख .

टुकुल's picture

11 Jan 2016 - 12:39 pm | टुकुल

सुंदर लेख.

तपशील्वार, आणि रोचक !
--- इपिक वरील "लुटेरे" मालिकेची आथवण झाली.
चलाख, कर्तबगार स्लीमनला भारतीय भाषा बर्‍यापैकी येत होत्या, त्यामुळे त्याला हे प्रकरण हाताळायला मदत झाली म्हणतात.

अभिरुप's picture

11 Jan 2016 - 1:35 pm | अभिरुप

अगदी अभ्यासपूर्ण लेखन अन रोचक माहिती.
अशीच माहिती अजुन येउद्यात बापूराव......

पद्मावति's picture

11 Jan 2016 - 2:09 pm | पद्मावति

फारच इण्टरेस्टिंग. अप्रतिम लेख.
मलाही खरंतर ठग म्हणजे बनवाबनवी करणारा, बाकी गुन्हेगारांच्या तुलनेने बर्यापैकी निरुपद्रवी गुन्हेगार असेच वाटत होतं. या शब्दमागे इतका भयंकर प्रकार आहे हे हा लेख वाचून कळतंय. अतिशय आभ्यासपूर्ण लेखन. डाकु आणि ठग यामधला फरक पण छान दाखवून दिलात.

वेल्हाळ's picture

11 Jan 2016 - 2:10 pm | वेल्हाळ

बापुसाहेब,
मुजरा...!

स्पीलबर्गने इंडियाना जोन्स अँड टेम्पल आॅफ डूममध्ये हा ठग संप्रदाय दाखवला आहे.
यात अमरीश पुरीने रंगवलेला "मोलाराम" अस्सल जमलाय.

होबासराव's picture

11 Jan 2016 - 2:21 pm | होबासराव

गाववाले छान माहिति. ह्यावर फार पुर्वि एक पुस्तक वाचले होते पेशवेकालीन कथा होति. बहुधा गो.नि.दा. च पुस्तक होत घाशिराम कोतवाल छान रंगवल होता गो.नि.दा. नि.

सिरुसेरि's picture

11 Jan 2016 - 3:43 pm | सिरुसेरि

रुमाली रहस्य

नितीनचंद्र's picture

11 Jan 2016 - 3:56 pm | नितीनचंद्र

आमच्या पिंपरी चिंचवड शहराची म्हणे लोकसंख्या २० लाख आहे. इतकी माणसे भले ४००- ५०० वर्षांत संपवणे काही सोप्पे नाही. काशीला जाऊन आल्यावर मावदे करायची परंपरा का होती ते आत्ता समजले.

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Jan 2016 - 6:27 pm | कैलासवासी सोन्याबापु

नितीनचंद्र साहेब,

मावंदं ह्या शब्दाची उत्पत्ती संस्कृत "मा वदं" मधली आहे (बहुतेक) ज्याचा अर्थ "मीच बोलतोय" अर्थात "बाबांनो मी यात्रा करून सुखरूप परतलोय मीच बोलतोय" म्हणुन तुम्ही जेवायला या, ह्या अर्थी मावंदं

पिलीयन रायडर's picture

11 Jan 2016 - 6:34 pm | पिलीयन रायडर

पण मी बोलतोय = अहम् वदामि ना?
आणि "मा" म्हणजे नको ह्या अर्थानी असतं ना? (अरसिकेषु कवित्वं मा लिख..)

मला जरा डाऊट आहे ह्या व्युत्पत्ती वर...

(इथे मावंदं मध्ये द वरचा अनुस्वार हा अहम् = अहं असा नसुन तो ... असं = असे ह्यातला आहे असं माझं मत..)

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Jan 2016 - 6:48 pm | कैलासवासी सोन्याबापु

पिरा तै, मी काही संस्कृत तज्ञ नाही हे त्या कॉमेंट मधे लिहायचे राहिले खरे!, मी जे बोललो ते ऐकिव आहे , परफेक्ट नाही :)

पिलीयन रायडर's picture

12 Jan 2016 - 11:24 am | पिलीयन रायडर

:) असु देत..

पण त्या निमीत्ताने चर्चा होऊ शकते व्युत्पत्तीवर!

होबासराव's picture

11 Jan 2016 - 6:36 pm | होबासराव

___/\____ बॅट्या लय मिस करतोय राव तुला...

नाखु's picture

12 Jan 2016 - 8:41 am | नाखु

काहीतरीच काय हे होबासराव !!!! इथल्या सुसंस्कृत्,सभ्य्,विद्वत्ताप्रचूर्,न्याय्यवादी आणि उच्च विचारधारा असलेल्या लोकांना विचारले का तुम्ही, त्याची आठवण काढण्यापुर्वी ????

बॅट्टमण्णचा थेट चाहता नाखु

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jan 2016 - 9:52 am | अत्रुप्त आत्मा

येस येस! आय एम् ऑल सो द बिग चाहता ऑफ़ ब्याट्टमण्ण .

पैसा's picture

13 Jan 2016 - 8:38 am | पैसा

http://www.misalpav.com/comment/788552#comment-788552 इथे नीलकांतने त्याचे म्हणणे पुरेसे स्पष्ट लिहिले आहे ना नाखु?

जे लोक काही चुकीचे वागले असतील त्यानी "पुन्हा चूक होणार नाही" अशी खात्री दिली पाहिजे इतकं हे सोपं आहे. ती खात्री चूक करणार्‍याने द्यायला पाहिजे ना? आणि आपला मित्र जर काही चुकीचे वागला असेल तर तुझ्याकडून अशी चूक झाली आहे असे मित्रांनी सांगितले पाहिजे. नाहीतर ते खरे मित्र ठरत नाहीत.

आपला मित्र जर काही चुकीचे वागला असेल तर तुझ्याकडून अशी चूक झाली आहे

कसंय ना चूक कधीकधी सापेक्ष असू शकते. सोपं उदाहरण, जे मी आधीही कुठेतरी दिलेलं आठवतंय. कोकणातून लग्न होऊन देशावर आलेली सून उठसूठ सगळ्या स्वयंपाकात नारळ वापरत असते. देशावरच्या सासवेला सवय असते दाण्याच्या कूटाची!! दोघींनीही केलेला स्वयंपाक चवीला चांगला असतो. पण सासूला सूनेची पद्धत चूक वाटते आणि सूनेला सासूची. सो, आपल्याला चूक वाटत असलेली गोष्ट समोरच्याला चूक वाटायलाच हवी आणि तशी वाटत नसेल तर ती व्यक्ती आणि तत्सम विचार असलेले आणखी लोक चूक ठरवणं मला तरी योग्य वाटत नाही. अर्थात ज्याचा त्याचा दृष्टिकोन !! :)

प्रचेतस's picture

15 Jan 2016 - 3:44 pm | प्रचेतस

चपखल.

पैसा's picture

15 Jan 2016 - 5:09 pm | पैसा

येता जाता वैयक्तिक शिव्या देणे ही चूक नाही का? तुम्ही ओपन फोरमवर लिहिता तेव्हा तिथे काही मिनिमम सभ्यता पाळणे आवश्यक असते. शिव्यांमधे सापेक्ष काही नसते. दुसरी मोठी चूक म्हणजे कोणाचेही व्यनि/खरडी धाग्यावर पेस्ट करणे. त्यासाठी आतापर्यंत कित्येक मोठमोठे लोक बॅन झाले आहेत. ते माहीत असताना जर अति आत्मविश्वासाने तेच करत असाल तर तुम्ही अ‍ॅडमिनलाही मोजत नाही असा त्याचा अर्थ होतो. त्यातही सापेक्ष काही नसते.

(हे सगळे मी इतकी वर्षे मिपावर जे पहात आले त्यावरून लिहीत आहे. नीलकांतच्या वर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर खरे तर यात आपण काही बोलण्यासारखे आहे असे मला वाटत नाही.)

पगला गजोधर's picture

15 Jan 2016 - 5:12 pm | पगला गजोधर

आपल्याला चूक वाटत असलेली गोष्ट समोरच्याला चूक वाटायलाच हवी आणि तशी वाटत नसेल तर ती व्यक्ती आणि तत्सम विचार असलेले आणखी लोक चूक ठरवणं मला तरी योग्य वाटत नाही. अर्थात ज्याचा त्याचा दृष्टिकोन !! :)

सुड्भाऊ, अपना कौंट डौन शुरू करो अब्बी,

जान्व्ही की डिलिवरी और तुम्हारे अच्चे दिन जल्दी शुरू होना रे बाबा अबी तुमरी ये प्रतिक्रिया के बाद !

;)

बापुजी
फार सुंदर माहीतीपुर्ण लेख फार आवडला.
ब्रिटीशांनी इतका विशाल देश इतकी वर्ष कसा कह्यात ठेवला
याच उत्तर अशा लेखांनी आपसुकच मिळ्त जात.

गामा पैलवान's picture

11 Jan 2016 - 9:02 pm | गामा पैलवान

बापूसाहेब,

तुमचा लेख मस्त माहिती देतोय. त्यावरून लोकप्रभेत ठगांवरचा लेख आल्याचं आठवलं. आता सापडत नाहीये. त्यानुसार प्रत्यक्ष ठार मारणारे ठग वेगळे असंत आणि प्रेताची विल्हेवाट लावणारी यंत्रणा वेगळी असे. त्या लोकांना भटोटे म्हणंत. भटोटे प्रेतं जिथे पुरायचे त्या जागेला मिरी म्हणायचे. प्रेतं पुरून झाल्यावर त्यावर काटेरी फांद्या वा दगडधोंडे इत्यादी टाकायचे. बरीच प्रेते असतील तर चक्क मुंग्यांची वारुळेही टाकायचे!

त्या लेखात वाचलेलं आठवतं की ठग लोकं बायकांना हातही लावंत नसंत. तसेच त्यांचं लक्ष्य केवळ श्रीमंत लोकंच असंत. साधारणत: जथ्याचा पुढारी त्यांचा बळी ठरे. प्रवासातील इतर सहायकांना (= सपोर्ट स्टाफ) हात लावंत नसंत. कारण बऱ्याचदा सहायक हे स्थानिक वाटाडे असंत. ठगांनी सहसा गावे लुटली नाहीत. ते काम डाकू लोकांचं असे.

असो. जनी माहिती ताजी झाली. त्याबद्दल धन्यवाद. :-)

आ.न.,
-गा.पै.

हुप्प्या's picture

11 Jan 2016 - 9:38 pm | हुप्प्या

गुन्हेगारी जमाती ह्या नावाचे एक लहानसे पुस्तक वाचले आहे. इंग्रजांनी अनेक वर्षे अभ्यास करून विविध गुन्हेगारी जातींबद्दल माहिती गोळा केली आहे. त्यात त्यांची वेषभूषा, संस्कृती, गुन्हेगारीचे प्रदेश, कार्यपद्धती आणि मुख्य भाषा आणि गुन्हेगारीतली परिभाषा ह्या गोष्टी आहेत.
ह्या बाबतीत ब्रिटिश लोकांचे कौतुक वाटते. एखादी समस्या असली की तिचा मुळापासून सखोल अभ्यास करायचा आणि तो लिहून ठेवायचा जेणेकरून पुढच्याला तो उपलब्ध असेल आणि तो कदाचित एक पायरी पुढची चढू शकेल. ह्या अभ्यासू वृत्तीनेच ते लोक इतके प्रगत होत गेले ह्यात शंका नाही.
भारतातील कुठल्या राजाने, बादशहाने, नवाबाने वा संस्थानिकाने असा अभ्यास केल्याचे ऐकिवात नाही. निदान त्याची नोंद तरी आढळली नाही. हे एक मोठेच वैगुण्य म्हटले पाहिजे.

गामा पैलवान's picture

11 Jan 2016 - 11:22 pm | गामा पैलवान

हुप्प्या,

>> भारतातील कुठल्या राजाने, बादशहाने, नवाबाने वा संस्थानिकाने असा अभ्यास केल्याचे ऐकिवात नाही.
>> निदान त्याची नोंद तरी आढळली नाही. हे एक मोठेच वैगुण्य म्हटले पाहिजे.

पेशव्यांच्या दप्तरात आज लक्षावधी कागदपत्रे विनावाचन तशीच पडून आहेत. पण लक्षात कोण घेतो अशी परिस्थिती आहे. पेशवे हे सत्ताकेंद्र असल्याने त्यांच्याकडे या विषयाची माहिती असेलसे वाटते. आजून एक गोष्ट म्हणजे पुस्तकछपाई इंग्रज आल्यावर सुरू झाली. जनतेला वाचायला पुस्तके मिळू लागली. त्यातून जे ज्ञान पूर्वी फक्त विद्वानांना वापरण्यास मिले ते आता आम जनतेसाठी खुले झाले. जर पेशवाई चालू राहिली असती तर जनता याच प्रकारे बहुश्रुत निश्चितच झाली असती.

आ.न.,
-गा.पै.

मोगा's picture

12 Jan 2016 - 12:44 am | मोगा

तुमच्यासारखे बुद्धिमान लोक लंडनात बसलेत. मग ती कागदं वाचणार कोण ?

माई मोड आण ..

अरे गामा , त्या ठगांचं काय घेऊन बसलास ? इंग्रजांबरोबरचे युद्ध हरुनही पुढे परत न लढण्यासाठी आठ लाख पेन्शनीचा मलिदा खाणारा दुसरा बाजीराव हा भयानक मोठा ठगच होता ना रे ? असं आमचे हे विचारत होते.

होबासराव's picture

12 Jan 2016 - 12:58 pm | होबासराव

मोगा मौसि आता कशा ला मोड आणतेस ?

होबासराव's picture

12 Jan 2016 - 7:30 pm | होबासराव

मोगा मौसि हे नाव लक्षात ठेव्...तुझा करंट आय डि ब्लॉक झाल्यनंतर ह्या नावाने तु आणखी एक आयडी घेउ शकतेस.
कॉलेज के दिन याद आ गये यार्...तिथे हा कोडवर्ड होता बघा एका कॅटॅगीरी च्या पप्पुं करता :))

गामा पैलवान's picture

12 Jan 2016 - 7:24 pm | गामा पैलवान

मोगा,

दादाभाई नवरोजींनी लिहिलेल्या poverty and un-british rule या पुस्तकाचं नाव ऐकलंय का हो तुम्ही? पेशवाईत किती दुष्काळ पडले आणि इंग्रजी आमदानीत किती पडले? पेशवाईत किती लोकांची अन्नान्नदशा झाली आणि इंग्रजी आमदानीत किती जणांची झाली? पेशवाईत किती भूकबळी पडले आणि इंग्रजी आमदानीत किती पडले?

आ.न.,
-गा.पै.

मोगा's picture

13 Jan 2016 - 8:13 pm | मोगा

पेशव्याला आठ लाख गुणिले ३२ वर्षे पेन्शन दिली. त्यात इंग्रजांचा दुष्काळनिधी संपून गेला.

बोका-ए-आझम's picture

17 Jan 2016 - 6:58 am | बोका-ए-आझम

यांचं प्रेरणास्थान ब्रिटिश होते हे कळलं तर तुम्हाला!

मोगा's picture

12 Jan 2016 - 12:46 am | मोगा

छापलं इंग्रजानी आणि तुम्ही क्रेडिट देताय पेशव्याला ! डोळे पाणावले !

फेरफटका's picture

12 Jan 2016 - 1:52 am | फेरफटका

गा.पै., पेशव्यांच्या दप्तरात किंवा अजुनही कित्येक ठिकाणी असे दस्तावेज आहेत असं वाचलय / ऐकलय. पण ते न वाचण्यामागे फक्त आळस / कर्मदरीद्रीपणा नसून बाकी काही अडचणी असाव्यात असा माझा कयास आहे (मोडी लिपी न वाचता येणं वगैरे). ब्रिटीशांची अभ्यासू वृत्ती वादातीत आहे.

गामा पैलवान's picture

12 Jan 2016 - 7:22 pm | गामा पैलवान

फेरफटका,

ब्रिटीश अभ्यासू होते याबद्दल वादच नाही. तशी अभ्यासू वृत्ती आपल्या अंगी बाणायला हवी. नव्या पिढीचे तसे प्रयत्नही चाललेत हे कौतुकास्पद आहे. ही कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापूर्वी इतरत्र कॉपी व्हावीत.

आ.न.,
-गा.पै.

नगरीनिरंजन's picture

11 Jan 2016 - 9:44 pm | नगरीनिरंजन

माहितीपूर्ण लेख आवडला!

नूतन सावंत's picture

11 Jan 2016 - 10:05 pm | नूतन सावंत

माहितीपूर्ण लेख आवडला.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jan 2016 - 8:18 am | अत्रुप्त आत्मा

खतरनाक!

नांदेडीअन's picture

12 Jan 2016 - 11:24 am | नांदेडीअन

माहितीबद्दल धन्यवाद.
चांगला चित्रपट होऊ शकतो यावर.
नवाजुद्दीन आणि इरफानची 'बायपास' शॉर्टफिल्म आठवली.

अनिरुद्ध.वैद्य's picture

12 Jan 2016 - 11:48 am | अनिरुद्ध.वैद्य

मस्त लिहिलेत :)

सिरुसेरि's picture

12 Jan 2016 - 1:09 pm | सिरुसेरि

ठगांबद्दल काही प्रश्न . हेच प्रश्न मी ठगांबद्दलच्या एका दुसरया धाग्यावरही पेस्ट करत आहे .
ठग हे पुर्वी सर्व भारतामध्ये होते . मग "दिल्ली का ठग" असे ठराविकच नाव का पडले ?
"दिल्ली का ठग" आणी "पुणेरी भामटा" असे का म्हणले जाते ?
ठगांबद्दल "ऐसा कोई सगा नही , जिसको हमने ठगा नही " असे का म्हणले जाते ? म्हणजे हे ठग एकमेकांनाही लुटायचे / रुमाल टाकायचे का ?