नटसम्राट

श्रीरंग's picture
श्रीरंग in जनातलं, मनातलं
2 Jan 2016 - 2:29 am

मराठी रंभूमीवर अत्यंत गाजलेल्या "कट्यार काळजात घुसली" चं सुंदर चित्रपट रूपांतर पाहिल्यानंतर उत्सुकता होती ती अर्थातच नाना पाटेकर - महेश मांजरेकर द्वयीच्या येऊ घातलेल्या "नटसम्राट" ची. कुसुमाग्रजांच्या समर्थ लेखणीतून रंगभूमीवर येऊन अजरामर झालेलं ही नाटक म्हणजे नात्यसृष्टीतला एक महत्वपूर्ण मानबिंदू आहेच. अशातच, महेश मांजरेकर बर्याच काळानंतर मराठी चित्रपट बनवणार, त्यात नाना, विक्रम गोखलेंसारखे खरोखरचे नटसम्राट झोकून देऊन काम करणार.. प्रचंड ताणली गेलेली उत्सुकता, आणी उंचावलेल्या अपेक्षांनिशीच चित्रपटग्रुहात प्रवेश केला..
गणपत रामचंद्र बेलवलकर.. तब्बल ४ दशके रंगभूमीवर राज्य गाजवणार्या उत्तुंग कलाकाराची रंगभूमी सोडल्यावरची घुसमट, विक्षिप्त स्वभावामुळे ओढवून घेतलेला तणाव, त्यातच लयाला जाऊन झालेला अस्त, याची चटका लावून जाणारी कथा म्हणजे नटसम्राट. शिरवडकरांची कथा संपूर्णत: नायकाच्या मध्यवर्ती पात्राभोवतीच फिरणारी. त्यामुळेच, नटसम्राट साकारणं हा समर्थ अभिनयाचा मापदंडच मानला जातो.
आधीच दैदिप्यमान असलेल्या नानाच्या कारकिर्दितली आनखी एक मैलाचा दगड ठरावी अशी ही भूमिका नानाने ताकदीने पेलली देखील आहे. रोखठोक स्वभावाचा, रंगभूमीपासून दुरावल्यानंतर जरासा चिडचिडा झालेला, नंतर स्वतःच्याच मुलांच्या घरी आश्रितासारखं जगणं नशिबी आल्यानंतर विमनस्क झालेला नटसम्राट त्याने उत्तम उभा केलाय यात शंका नाही. विशेषतः विक्रम गोखलेंबरोबरचा हॉस्पिटलमधला प्रसंग, पत्नीच्या निधनाचा प्रसंग, "कोणी घर देता घर,घर?" म्हणून फोडलेला काळीज पोखरणारा टाहो, इत्यादि काही प्रसंग तर केवळ लाजवाब. पण तरीही, डॉ. लागूंनी अक्षरशः जिवंत केलेल्या बेलवलकरांची प्रतिमा मनात घट्ट रुजल्यामुळे असेल कदाचित, पाटेकरांनी साकारलेला नायक म्हणावा तसा मनाला भिडत नाही. खास करून पूर्वार्धात तर काही संवादांवर लागूंच्या शैलीचा इतका प्रभाव जाणवतो, की नाना चक्क लागूंची नक्कल करत आहेत की काय असा भास होतो. हे मात्र जरा खटकतंच.
नानांची मध्यवर्ती भूमिका असली तरी सर्वात प्रभाव पाडून जातात ते विक्रम गोखलेंनी साकारलेले रामभाऊ. कित्येक वर्षांनी गोखलेंना इतक्या सशक्त भूमिकेत बघून अतिशय बरं वाटलं. त्याबद्दल दिग्दर्शकाचे शतशः आभार मानायला हवेत. मूळ नाटकात नसलेलं हे पात्रच सर्वात जास्त प्रभाव टाकून जातं, यातच विक्रम गोखलेंच्या अभिनयसामर्थ्याचं पुनः एकदा प्रमाण मिळतं. मृण्मयी देशपांडेनेही गणपतरावांच्या मुलीच्या भूमिकेत अतिशय नैसर्गिक अभिनय केलाय. इतक्या हेवीवेट अभिनेत्यांच्या गर्दीतही तिने स्वतःचा खासंच ठसा उमटवला आहे. बाकी मंडळी ठीक्ठाक. नेहा पेंडसेचे सदोष उच्चार मात्र कानांवर आघात करतात.
चित्रपटात अनेक ठळक त्रुटी व anachronisms कडे आश्चर्यकारक दुर्लक्ष्य केलं गेल आहे. एकीकडे साधारण ७० च्या दशकातल्या गाड्या, व पेहेराव दाखवायचे, दुसरीकडे एकाला "अंदाज अपना अपना" मधील गाण्याची ओळ गुणगुणताना दाखवायचं. कित्येक पात्रांच्या डोळ्यांवर, शाळेच्या गॅदरिंगमध्ये, किंवा लो बजेट नातकांमधे वापरतात तसले बिन काचांचे चष्मे आहेत हे स्पष्ट दिसतं. एकिकडे पोरं विटिदांडू खेळत असलेला काळ दाखवायचा, दुसरिकडे शाळेतील मुलं एकमेकांना चिडवताना “chicken-shit pie" वगैरे बोलताना दाखवायचं.. असल्या चुका सहज टाळता येऊ शकल्या असत्या. याव्यतिरिक्त चित्रपटाची गतीही (विशेषतः पूर्वार्धात) थोडी संथ झाली आहे.
किरण यज्ञोपवीत या गुणी लेखकानेही संवादलेखनात निराशाजनक कामगिरी केली आहे. "मे घर चकाचक करते" असं त्याकाळच्या पात्राच्या तोंडी विसंगत वाटणारं वाक्य, किंवा "बाबा, आपण असं करुयाच नको" असलं धेडगुजरी मराठी एखाद दोन ठिकाणी ऐकून धक्का बसतो.
फ्लॅशबॅकच्या माध्यमातून उलगडत जाणारी कथा, आणी नाटकाचं माध्यमांतर करताना केलेले बदल मात्र चपखल बसलेत.
एकूणच, घेऊन गेलेल्या उत्तुंग अपेक्षा हा नटसम्राट जरी पूर्ण करू शकत नसला, तरी आवर्जून पाहण्याजोगा मात्र निश्चितच आहे.

कलासमीक्षा

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

2 Jan 2016 - 5:05 am | श्रीरंग_जोशी

दोन आठवड्यांपूर्वी आमच्या शहरात कट्यार काळजात घुसली या चित्रपटाचा खेळ आयोजित करण्यात आला होता. चित्रपट सुरु होण्यापूर्वी एकाच चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला होता. तो ट्रेलर नटसम्राटचा होता.

मोठ्या पडद्यावर तो ट्रेलर पाहून अन तुम्ही लिहिलेलं परीक्षण वाचून नटसम्राट चित्रपट पाहण्याची खूप इच्छा होत आहे. गेल्या दीड महिन्यात इथे दोन (बायोस्कोप व कट्यार) मराठी चित्रपटांचे विशेष खेळ झाले असल्याने लगेच तिसरा चित्रपट येणार नाही त्यामुळे मोठ्या पडद्यावर नटसम्राट पाहायला मिळणे शक्य वाटत नाही :-( .

श्रीरंग's picture

2 Jan 2016 - 12:18 pm | श्रीरंग

ट्रेलर पाहून मी पण भारावून गेलो होतो. काहितरी भव्य, अभिजात पहायला मिळेल या अपेक्षेने गेलात तर थोडी निराशा पदरी पडू शकते.

श्रीरंग_जोशी's picture

8 Jan 2016 - 10:29 am | श्रीरंग_जोशी

आजच कळले आहे की आमच्या शहरात नटसम्राट चित्रपटाचा खेळ होणार आहे :-).

चित्रपट परिक्षण, निरिक्षण आवडले. कट्यार ....सुरु होण्याआधी थेट्रात नटसम्राटचा ट्रेलर पाहिला होता. पंत म्हणतात तसे झाल्यास आमच्यायेथेही सिनेमा येईल याबद्दल शंका आहे. आला तरी आम्हालाच बाहेर जाऊन सिनेमा पहायची सवय न राहिल्याने जाऊ असे नाही.

प्रचेतस's picture

2 Jan 2016 - 6:55 am | प्रचेतस

परिचय आवडला रे श्रीरंग.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jan 2016 - 1:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

आँ ? एकदम माईंचं भूत कसं काय अंगात आलं ?) ;) :)

प्रचेतस's picture

2 Jan 2016 - 3:31 pm | प्रचेतस

हाहा. :)

मी-सौरभ's picture

5 Jan 2016 - 6:53 pm | मी-सौरभ

माईंचे हे म्हन्जे वल्ली दा तर नव्हेत ;)

पण त्याच्या व्यक्तिमत्वाला असा अगतिक झालेला आणि एकटा पडलेला नटसम्राट विसंगत वाटतो. कदाचित नानाच्या आतापर्यंतच्या भूमिका या परिस्थितीला शरण न जाणाऱ्या माणसांच्या असल्यामुळे ही व्यक्तिरेखा पटली नाही. बाकी सहकलाकारांबद्दल सहमत. परीक्षणही छान.

मुक्त विहारि's picture

2 Jan 2016 - 9:59 am | मुक्त विहारि

.....मला तरी हे समीकरण पचवणे जरा अवघड असल्याने, सिनेमा फुकट बघायला मिळाला तर नक्की बघीन.

मुळात नाना पाटेकरांच्या आवाजाची पट्टी आणि देहबोली, ह्या भुमिकेला न्याय देईल असे वाटत नाही.

सिंहाला गवत खातांना बघणे आणि नाना पाटेकर, स्व.विनय आपटे आणि स्व.निळू फुले इ. आवाजावर हुकुमत असलेले अभिनेते, बेलवकरांच्या भुमिकेत बघायला, माझे मन धजावत नाही.

सध्या तरी "बेलवरकरांच्या" भुमिकेला योग्य असा अभिनेता, मराठी नाट्य-सिनेमा जगतात नाही, असे माझे मत.

विश्वव्यापी's picture

4 Jan 2016 - 10:53 am | विश्वव्यापी

सध्या तरी "बेलवरकरांच्या" भुमिकेला योग्य असा अभिनेता, मराठी नाट्य-सिनेमा जगतात नाही, असे माझे मत.

मी आपल्या मताशी सहमत आहे.
चित्रपट पहाताना नाना बेलवलकरांच्या भूमिकेत नसुन बेलवलकरच नावांची भुमिका करत आहेत असा सारखा भास हाेत रहातो.

विश्वव्यापी's picture

4 Jan 2016 - 10:53 am | विश्वव्यापी

सध्या तरी "बेलवरकरांच्या" भुमिकेला योग्य असा अभिनेता, मराठी नाट्य-सिनेमा जगतात नाही, असे माझे मत.

मी आपल्या मताशी सहमत आहे.
चित्रपट पहाताना नाना बेलवलकरांच्या भूमिकेत नसुन बेलवलकरच नावांची भुमिका करत आहेत असा सारखा भास हाेत रहातो.

तिमा's picture

2 Jan 2016 - 12:55 pm | तिमा

बेलवरकरांच्या

बेलवलकरांच्या, असे वाचावे, हो नाहीतर भलताच अर्थ व्हायचा.

कानडाऊ योगेशु's picture

5 Feb 2016 - 3:02 pm | कानडाऊ योगेशु

काय बाई ते निरिक्षण! ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jan 2016 - 1:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर परिक्षण. आज हा चित्रपट बघायचा बेत आहे.

जगप्रवासी's picture

2 Jan 2016 - 1:37 pm | जगप्रवासी

कालच वडिलांसोबत चित्रपट बघितला, खूप छान जमला आहे. महत्वाच म्हणजे मांजरेकर बुवांनी त्यांच्या सवयीप्रमाणे या चित्रपटात उगाच "मेलोड्रामा घुसडवलेला" नाहीये. माझ्या वडिलांनी ना नटसम्राट नाटक बघितलय ना नाना पाटेकरचा वेलकम पाहिलाय पण त्यांना हा चित्रपट खूप आवडला.विशेष म्हणजे नानाचं काम आवडलं, आपल्याच मुलीने आपल्यावर चोरीचा आळ घेतल्यावर क्षणात बदलणारे भाव अप्रतिमरीत्या साकारलेत.

विशेषतः विक्रम गोखलेंबरोबरचा हॉस्पिटलमधला प्रसंग.>>>>> या प्रसंगात विक्रम गोखले पूर्ण पडदा आणि मनावर व्यापून राहतात. अप्रतिम काम, खूप आवडलं.

शेवटच थेटर मधल स्वगत तर लाजवाब. शेवटी नावं येताना परत स्वगत चालू झाल्यावर उठलेले सर्व प्रेक्षक ते ऐकण्यासाठी जागेवर बसले.

कालच पाहिला ...अप्रतीम अनुभव मिळाला. .खरोखरच नानांनी ही भुमिका छान वठवली आहे. श्रीराम लागू यांच्या अभिनयाला तोड नाहीच पण नानांनी देखील आपल्या अभिनयाची खरी ओळख करून दिली. विक्रम गोखले यांच्या भूमिकेबाबत मी काही बोलणे चुकीचे ठरेल.
काही चित्रपटांना टाळ्यांनी नाही तर डोळ्यांनी दाद द्यावी असा अप्रतिम चित्रपट. .

मी हा चित्रपट गेल्या आठवद्यातच पाहिला, आणी एक अप्रतिम कलाक्रुति पाहिल्याचा आनंद मिळाला. नानाच्या अभिनयाला खरच तोड नाहि. मि तर म्हणेन कि हा चित्रपट प्रत्येकाने आवर्जुन पहावा.

उत्तम परीक्षण. बारीक तपशीलवार निरीक्षण.

चित्रपटात अनेक ठळक त्रुटी व anachronisms कडे आश्चर्यकारक दुर्लक्ष्य केलं गेल आहे.

हे मात्र खरंच खेदकारक आहेत. त्याने रसभंग होतच असणार.
आमच्या इथे पुढच्या वीकेंडला कट्यार काळजात..आणि पुढच्या महिन्यात नटसम्राट येणार आहे. दोन्हीही नक्की पाहणार.

जेपी's picture

2 Jan 2016 - 6:00 pm | जेपी

चित्रपट आज पाहिला.
मांजेरकरांनी त्यांचा चित्रपट बटबटीत करण्याचा USP जपला आहे..
सौ.मांजेकरांचा अभिनय अतिशोक्ती आहे..नेहा पेंडसेला का घेतल??
विक्रम गोखलेंचा अभिनय सोडला तर काय नाय चित्रपटात.
**

जेपी's picture

2 Jan 2016 - 6:03 pm | जेपी

नाना वयानुसार शांत आणी प्रगल्भ होत आहे..पण अति गोड पणा खटकला..

--
नाना मोड ऑन-छान..छान..सगळच एकदम छान आहे..-मोड ऑफ

यशोधरा's picture

2 Jan 2016 - 6:06 pm | यशोधरा

बघणार नाही बहुतेक..

एस's picture

2 Jan 2016 - 7:32 pm | एस

हेच म्हणतो.

श्रीरंग's picture

3 Jan 2016 - 5:39 pm | श्रीरंग

माझ्या मते, चित्रपट आवर्जून पहावा असा नक्कीच आहे. फक्त प्रकर्षाने जाणवणार्या काही त्रुटी मी इथे मांडल्या, इतकंच.
अर्थात, कोणता चित्रपट पहावा, व कोणता पाहू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण तो टाळण्याएवढा वाईट असल्याचे माझ्या लेखनात ध्वनित होत असल्यास, ती माझी सुस्पष्ट लिखाणाची कमतरता समजावी.

यशोधरा's picture

4 Jan 2016 - 10:42 am | यशोधरा

नाही, आपल्या लिखाणाबद्दल काहीच म्ह्णायचे नाही, ते उत्तमच आहे. मला शंका आहे ते नानाला ह्या भूमिकेत मी पाहू शकेन की नाही ह्याची आणि संवाद ऐकताना नानाचे "नानापण" जाणवत राहील का ह्याची.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jan 2016 - 5:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कुसुमाग्रज आपल्या मुळ नाटकाच्या संहितेच्या सुरुवातीच्या आभार मानताना म्हणतात ''आपल्या मनातील चित्र रंगमंचावर यथार्थ रुपात पाहण्याचे समाधान लेखकाला क्वचितच मिळते. डॉ.श्रीराम लागू या प्रतिभाशाली कलावंताने हे दुर्मिळ समाधान मला दिले'' एका लेखकाच्या मनातील अभिनय डॉ. लागूंनी साकार केला. दोघंही ग्रेटच यात काही वाद नाही. मलाही डॉ. लागूंचा अभिनय केवळ क्लास वाटतो. (प्रशस्तीपत्राची त्यांना गरज नाही)

सचिन खेडकरांच्या नटसम्राटाचे संवाद बघा. कोणा प्रेक्षकांना हा अभिनयही आवडेल. सचिन खेडेकरचा अभिनय पाहतांना मला त्याच्या इतर चित्रपटातील अभिनय डोकावणार नाही. कारण मी तिथे तादात्म पावलेलो असतो. डॉ.लागूंच्या अभिनयाच्या बाबतीतही तसंच आहे इतर डॉ.लागू माझ्या मनात डोकावत नाही. नाना पाटेकरचा अप्पा मला असाच भिडतो. आणि अनेक प्रेक्षकांना अनेकांनी साकारलेल्या गणपतराव बेलवलकर असेच आवडतील आणि अनेकांना आवडणारही नाही, म्हणुन कोणी अन्य पात्रांनी साकारलेला अभिनयात उन्नीस बीस असेलच यात काही वाद नाही पण म्हणुन त्याने केलेला अभिनय कमी ठरत नाही. कलाकृतीला न्याय किती दिला फार तर अशी चर्चा व्हावी असे वाटते. डॉ.श्रीराम लागूंनी कदाचित चित्रपटात भूमिका केली असती तर लोक म्हणाले असते की, नाटकात केलेला अभिनय उत्तम होता चित्रपटात तो मात्र जमला नाही.

सारांश, एखादा कलावंत एखादा कलाप्रकार सादर करतांना त्या कलाकृतीला किती न्याय देतो ती मापं फार फार तर तराजूत
टाकावीत असे वाटते.

'' ........ पण, तुला एक सांगून ठेवतो नंद्या, आम्ही आज आहोत. उद्या नाही. पण कोणाला तरी नमस्कार करायची ही सवय मात्र कायम ठेव, बेटा. ज्यांना नमस्कार करायला जागा नाहीत ती माणसं अभागी. आणि जागा असून ज्यांना नमस्कार करायचा धीर होत नाही ती निव्वळ कपाळकरंटी. अमृताशी पैजा जिंकेल अशी ही चीज आहे नंदा'' - नटसम्राट.

-दिलीप बिरुटे

तुम्ही माझा प्रतिसाद वाचलात का? मी नानाच्या अभिनयाला काहीच म्हणत नाहीये, माझ्या स्वतःच्या कमतरतेबद्दल, perceiving abilities बद्दल बोलत होते.

असो. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jan 2016 - 7:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला शंका आहे ते नानाला ह्या भूमिकेत मी पाहू शकेन की नाही ह्याची आणि
संवाद ऐकताना नानाचे "नानापण" जाणवत राहील.

असं बोलल्या न तुम्ही. नानाचं नानापण येणं म्हणजे नाटकातील संवाद विसरुन नानामय होणं आहे, असे मी समजतो.

>>> माझ्या स्वतःच्या कमतरतेबद्दल, perceiving abilities बद्दल बोलत होते. असो.
असं कसं असो, उगं रक्त आटवलं का आम्ही ? प्लीज वाद घाला. :)

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

4 Jan 2016 - 7:22 pm | यशोधरा

पुढच्या वर्षी बघू!

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jan 2016 - 8:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

आत्ताच चित्रपट पाहून परतलोय. उत्तम चित्रपट. मागच्या कोणत्याच आठवणींचे (कथावस्तू ताकदीची आहे, इतके सोडून) गाठोडे न घेता जावून चित्रपट पाहिला. खूप आवडला. सगळ्यांचीच कामे छान झाली आहेत. नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांच्याबद्दल काय सांगावे ? नसता बघितला तर नक्कीच काहीतरी राहून गेले असते !

नाखु's picture

4 Jan 2016 - 10:26 am | नाखु

आणि आपला प्रतिसाद

नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांच्याबद्दल काय सांगावे ? नसता बघितला तर नक्कीच काहीतरी राहून गेले असते !

सुसाट...

सुज्ञास सांगणे ळले.

प्रतीसाद मात्र नाखु.

अवांतर: हा सिनेमा बघणार, पण फुरसतीत.

मित्रहो's picture

2 Jan 2016 - 9:23 pm | मित्रहो

ते त्यातल्या स्वगतांमुळे. वि. वा. शिरवाडकरांनी लिहीलेले स्वगत म्हणजे मराठी कसे लिहावे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. स्वगत वगळता मूळ कथानकात नावीन्य नाही. मुळात कुसुमाग्रजांची नाटके ही कथानकाएवजी पात्रांभोवती गुंफलेली असतात. हे नाटक सुद्धा अपवाद नाही. सिनेमात अशी स्वगत ठेवता येनार नाही मग काय राहत. फक्त आणि फक्त नाना.
त्यामुळे बघितला नाही.

अवतार's picture

2 Jan 2016 - 9:52 pm | अवतार

मुळात कुसुमाग्रजांची नाटके ही कथानकाएवजी पात्रांभोवती गुंफलेली असतात.

सहमत. चित्रपट अजून पहिला नाही. पण शिरवाडकरांच्या काही नाटकांचे वाचन केले होते. तेव्हा हे प्रकर्षाने जाणवले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jan 2016 - 10:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रपट आजच पाहिला. नटसम्राट नाना पाटेकरांनी गणपतराव बेलवलकर (अप्पा) जबरा उतरवला आहे. अभिनय सुरेख झाला आहे. चित्रपट पूर्वार्धात थोडा संथ वाटला. विक्रम गोखले मात्र चित्रपटात भाव खावून जातात. अतिशय कसदार अभिनय त्यांनी केला आहे. दवाखान्यातली जुगलबंदी खास जमली आहे. चोरीचा आळ, पावसात निघणे, तसेच, गणपतराव आणि सरकार यांचा 'तुम्ही आम्हाला आवडता आमचं तुमच्यावर प्रेम आहे' हा संवाद भावभावनांचा गुंता मस्तच. मला तर मी नाटकच पाहात आहे, असंच वाट्त होतं. काही संवादाला टाळ्या वाजवाव्यात असंही वाटून जातं.

''अगणित माणसाच्या दुनियेत मला एकच माणुस ठाऊक आहे जो स्वतःच्या जागेवर ठामपणे उभा असतो तो म्हणजे मी आहे. मी आहे, ज्युलीयस सिझर, मी आहे ऑथेल्लो, मी आहे प्रतापराव, हेम्लेट, सुधाकर, आणि मी आहे गणपतराव बेलवलकर नटसम्राट. हे सारे महापुरुष माझ्या देहाच्या शामियान्यात राह्यला आले आहेत''

बाकी, चित्रपट संपल्यानंतरही नावं चालली असतांना चाललेलं स्वगत ऐकायला मजा आली. सुरेख चित्रपट, एकदा नक्की पाहावा असा.

-दिलीप बिरुटे

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jan 2016 - 10:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

काही संवादाला टाळ्या वाजवाव्यात असंही वाटून जातं.
+१

मी चित्रपट पाहिला तेव्हा लोकांनी पाचसहा वेळा नाटक चालू असल्याप्रमाणे उत्फुर्तपणे टाळ्या वाजवल्या. चित्रपट संपला तेव्हा तर सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला, मीही अभावितपणे त्यात सामील झालो !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jan 2016 - 10:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>>चित्रपट संपला तेव्हा तर सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला, मीही अभावितपणे त्यात सामील झालो !

क्या बात है जियो. जिंदादिली आवडली.

-दिलीप बिरुटे

तुषार काळभोर's picture

4 Jan 2016 - 1:03 pm | तुषार काळभोर

मी शनिवारी अमनोरात पाहिला. तिथेही चित्रपट संपल्यावर लोकांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या. आणि नंतर लगेच श्रेयनामावली+स्वगत सुरू झाले. तेव्हा लोक तसेच खिळून उभे राहिले होते.

नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांनी वर्णनापलिकडे अभिनय केलाय.
मृण्मयी देशपांडे हे सरप्राईज पॅकेज आहे.
आई-वडीलांची काळजी, ममत्व आणि चोरीचा आळ घेणे, हे सर्व तिला व्यवस्थित जमलंय.
मेधा मांजरेकरांनी चांगली साथ दिली असली, तरी त्यांचं वृद्धत्व नैसर्गिक वाटत नाही.
सुनील बर्वेसुद्धा चांगला. (खरंतर मला ते पात्र आवडलं)
नेहा पेंडसेच्या उच्चारां कडे फार लक्ष नाही दिलं, पण ती सून अशीच असणे अपेक्षित होते.

(मी नाटक पाहिलं नव्हतं, त्यामुळे कोणताही पूर्वग्रह/पूर्वप्रभावाशिवाय चित्रपट पाहिला.)

अवांतरः निवृत्तीमहाराज इंदूरीकर शेतकर्‍यांना सांगतात, मरेपर्यंत एक गूंठा जमीनदेखील पोर्‍याच्या नावे करू नका.

सत्याचे प्रयोग's picture

2 Jan 2016 - 10:26 pm | सत्याचे प्रयोग

मला तर आवडला, नाना पाटेकरांचा सर्वोत्तम अभिनय, काही प्रसंगात नकळत डोळ्यांच्या पापण्या ओलावतात. दुर्दैवाने नटसम्राट नाटक न पाहिल्याने तुलना नाही. फक्त एकच बाब खटकली ती म्हणजे पोलिसांची प्रतिमा, किरकोळ कारणावरून दे दणादण मारताना दाखवलेय.

फक्त एकच बाब खटकली ती म्हणजे पोलिसांची प्रतिमा, किरकोळ कारणावरून दे दणादण मारताना दाखवलेय.

एकदम बरोबर. उगा वेगळ्या टोन मध्ये घेऊन जातात चित्रपटाला.

सिरुसेरि's picture

4 Jan 2016 - 1:33 pm | सिरुसेरि

"वास्तव"चा फील येतो .

कलंत्री's picture

3 Jan 2016 - 12:22 pm | कलंत्री

चित्रपटगृहात जावुन चित्रपट बघणारच. मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस यायलाच हवे.

चौकटराजा's picture

3 Jan 2016 - 1:20 pm | चौकटराजा

दोन डॉ नी नावाजलेला आहे त्यामुळे पाहिलाच पाहिजे .त्यातून इंग्रजी माध्यमात शिकलेल्या मुलीवर विवाशि यांच्या भाषेचे गारुड झाल्याने तिचा लकडा आहेच !

अन्नू's picture

3 Jan 2016 - 9:28 pm | अन्नू

पिक्चर बघितला नाही, पण ट्रेलरनेच नटसम्राटची पुर्ण कल्पना येऊन गेली. नानांच्या अभिनयाला खरंच सलाम!

नाना व गोखलेंच्या अभिनयाबद्दल वादच नाही. त्याच्या जोडीला उत्तम लिखाण व संवाद (शिरवाडकरांनी लिहिलेले) यामुळे चित्रपट नक्कीच "आवर्जून बघा" या गटात जातो.
परंतु लक्षात ठेवण्याजोगे चित्रपटात जवळपास काही सापडले नाही. लागुंचे नाटक पाहून १० वर्षापेक्षा जास्त काळ झाला. पण अजूनही त्यांचा आवाज, अभिनय व त्याला असलेली विविध पात्रांची जोड यामुळे अजूनही नाटकातच हरवलो आहे.
ज्योती सुभाष व सौ. मांजरेकर यांची तुलना "कुठे इंद्राचा ऐरावत…" अशी होईल.
नानांच्या निवडीबद्दल खटकलेली एक गोष्ट म्हणजे त्यांच्या शरीरयष्टी मुळे कुठूनही बेलवलकर "थकलेले" वाटत नाहीत. त्यामुळे "स्वगत" हा भाग बरळणे वाटू लागते.
लागू च्या बाबतीत बेलवलकर प्रत्यक्ष जगात थकलेले व नटसम्राट स्वगत बोलताना अतिशय ताकदवान हा फरक त्या भूमिकेला वेगळ्या उंचीवर नेतो. नाटक लक्षात ठेवायला भाग पाडतो.

एस's picture

4 Jan 2016 - 7:08 pm | एस

नानांच्या निवडीबद्दल खटकलेली एक गोष्ट म्हणजे त्यांच्या शरीरयष्टी मुळे कुठूनही बेलवलकर "थकलेले" वाटत नाहीत. त्यामुळे "स्वगत" हा भाग बरळणे वाटू लागते.
लागू च्या बाबतीत बेलवलकर प्रत्यक्ष जगात थकलेले व नटसम्राट स्वगत बोलताना अतिशय ताकदवान हा फरक त्या भूमिकेला वेगळ्या उंचीवर नेतो. नाटक लक्षात ठेवायला भाग पाडतो.

अगदी हेच म्हणायचेय.

श्रीरंग's picture

4 Jan 2016 - 7:53 pm | श्रीरंग

अगदी नेमके लिहिलेत.

ज्योती सुभाष व सौ. मांजरेकर यांची तुलना "कुठे इंद्राचा ऐरावत…" अशी होईल.

शांता जोगांच्या सरकार अजूनही लक्षात आहेत. टीव्हीवर पाहिल्या होत्या.

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Jan 2016 - 3:20 pm | ज्ञानोबाचे पैजार

वरती बर्‍याच जणांनी नानाची तुलना डॉ लागूंशी केली आहे. त्या वरुन एक जूनी आठवण जागी झाली.

पहिला नटसम्राट म्हणजे "दत्ता भट" मी माझ्या लहानपणी दुरदर्शन वर दत्ता भटांचे नटसम्राट पाहिले होते.

नंतर डॉ लागूंचे नटसम्राट आले. मी आणि माझे बाबा जेव्हा डॉक्टरांचे नाटक बघुन बाहेर पडत होतो तेव्हा माझ्या बाबांनी डॉ लागूंची तुलना दत्ता भटांशी केली आणि भटांचा अभिनय कसा अस्सल होता व डॉक्टर भटांची कशी नक्कल करत आहेत ते सप्रामण ऐकवले होते.

मी ही दोघांचा अभिनय पाहिला असल्या मुळे हिरहिरीने वाद घालुन बाबांची मते खोडुन काढत होतो. त्या वेळी मी डॉ लागुंच्या बाजूने मत मांडत होतो. नंतर कोणत्या तरी वर्तमान पत्रात पण माझ्या बाबांच्या मता सारखेच मत मांडणारा लेख आला होता. बाबांनी तो लेख वाचल्यावर परत एकदा माझ्याशी वाद घातला होता.

मी त्यावेळी जरी डॉक्टरांच्या बाजूने भांडलो असलो तरी पण आता लक्षात येत्या की मी दुरदर्शन वर पाहिलेले नाटक हे एक तर ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट् होते आणि चित्रिकरणाचे तंत्रज्ञान हे आजच्या इतके प्रगत नव्हते. पण माझ्या बाबांनी त्यांच्या उमेदीच्या काळात भटांचे नाटक थेटरमध्ये जाउन पाहिले होते. त्यामुळे त्यांना भटांबद्दल जिव्हाळा वाटणे स्वाभाविक होते.

पण तरी सुध्दा एक मान्य करावेच लागेल की त्या वेळी दत्ता भटांचा अभिनय पाहून मी देखिल काही काळ भलताच प्रभावित झालो होतो. बरेच दिवस नटसम्राट मधले उतारे मिळवुन लिहुन काढत होते व पाठ देखिल करत होते.

आता नानाने नटसम्राट कसा साकार केला आहे ते पहाण्यासाठी बाबां बरोबर पुन्हा एकदा थेटरात जावेच लागेल.

पैजारबुवा,

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Jan 2016 - 9:52 am | ज्ञानोबाचे पैजार

घाई घाईत प्रतिसाद लिहिताना फारच मोठी अक्ष्यम्य चूक करुन बसलो.

पहिला नटसम्राट डॉ लागू आणि त्या नंतर दत्ता भटांनी नटसम्राट केला. मी आणि माझ्या बाबांनी जे नाटक पाहिले होते त्यात राजा गोसावी होते आणि त्यांची तुलना बाबांनी डॉक्टरांशी केली होती.

मी दुरदर्शन वर जे नटसम्राट पाहिले होते त्यात दत्ता भट होते. बाबांनी डॉक्टरांचा आणि भटांचा नटसम्राट थेटर मध्ये पाहिला होता.

पैजारबुवा,

वरचा मूळ प्रतिसादच परत एकदा लिहून काढा की योग्य नावं घालून. संपादकांना विनंती करून बदलून घ्या. (कारण खुलाशावरून नक्की काय गोंधळ झालाय ते कळत नैये ...)

दिपक.कुवेत's picture

5 Jan 2016 - 7:15 pm | दिपक.कुवेत

पाहीन मी सुद्धा...

जव्हेरगंज's picture

5 Jan 2016 - 7:21 pm | जव्हेरगंज

बघणार!!

चौकटराजा's picture

5 Jan 2016 - 7:43 pm | चौकटराजा

लग्न झाल्यापासून हा पहिलाच सिनेमा जो सगळ्या कुटुम्बाने पाहिला. सर्वच लोकाना थेटरी अभिनय व सिनेमाचा अभिनय यातील तुलना करण्याचा मोह होणे साहजिकच आहे. मूळ कथानकात फारसे सांगण्यासारखे काही नाही. कोणीतरी इथेच म्हटले आहे की हे पात्रांभोवती शिरवाडकर फिरत असतात व पात्र आले की जरा अंगावर येणारे संवाद आवश्यकच. ते तसे सिनेमातही आहेत. एक दोन ठिकाणी नानाच्या आवाजात लागू डोकावतात हे खरे आहे पण एरवी नानाच डोकावत असतो कधीतरी बेलवलकरही. मी कथानकाचा शौकिन असल्याने जरा कमी अपेक्षेने सिनेमा पाहिला आहे. (सी फी सिनेमे मला यासाठी आवडत नाहीत कारण कम्जोर कथानक )एकदा पाहावा असा मात्र आहे. बेलवलकर व रामभाउ यांचे मैत्रामधील सम्वादाचे पंचेस हशा पसरवितात. विक्रम गोख्ले लाज्वाब नाही पण मस्त. तेच नानांचे. बाकी संगीत हा चित्राचा महत्वाचा भाग नाहीच आहे. त्या बद्द्ल काय लिहायचे ?

अभिजीत अवलिया's picture

11 Jan 2016 - 4:22 pm | अभिजीत अवलिया

कालच चित्रपट पाहिला. आवडला. नानाची भूमिका आवडली. पण त्याहीपेक्षा आवडले विक्रम गोखले ह्यांचे काम. विशेषत: तो हॉस्पिटल मधला नाना व विक्रम गोखले ह्यांचा संवाद.त्यांच्यासाठी पुन्हा एकदा बघायची इच्छा आहे.
बाकी पोलिसांचे जे काही प्रसंग ठेवले होते ते कशाला ठेवले होते ते कळले नाही. फक्त बेलवल्कराना शोधण्याच्या कामापुरते दाखवले असते तरी चालले असते. पोलिसांचा छापा वगैरे हास्यास्पद वाटला.

तिमा's picture

22 Jan 2016 - 5:16 pm | तिमा

मूळ मेलोड्रामाचा मेलो मेलोड्रामा केला आहे. नाना, कुठल्याच प्रसंगात थकलेला वाटत नाही. अभिनयांत देहबोलीही महत्वाची आहे.

आवडला चित्रपट . विक्रम गोखले आणि नाना पाटेकर यांनी जबरी काम केलंय .

पैसा's picture

23 Jan 2016 - 6:32 pm | पैसा

सिनेमा बघावा की न बघावा हा प्रश्न आहे. कुसुमाग्रजांची स्वगते नानाच्या आवाजात ऐकणे हा एक वेगळाच अनुभव असेल. त्याचवेळी आता अशा शोकांतिका बघायची मानसिक ताकद राहिली नाहीये.

जगाबद्दल फारसे न कळण्याच्या वयात सतिश दुभाषीचा नटसम्राट बघितला होता. मात्र तेव्हाही त्या स्वगतानी जबरदस्त मोहिनी घातली होती. छोट्या नातीच्या भूमिकेत अलका कुबल होती का काय असं वाटतंय.

हेमंत लाटकर's picture

24 Jan 2016 - 5:44 pm | हेमंत लाटकर

छान पिक्चर आहे. मन भरून डाेळ्यातून पाणी येते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jan 2016 - 7:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नवा शीन कसं काय आहे ? त्याच्यासाठी पुन्हा पिच्चर बघावा लागेल असं वाटतं !

-दिलीप बिरुटे

अगदी हेच ईचाराय आलो होतो. नक्की काय बदल केलाय?

हेमंत लाटकर's picture

25 Jan 2016 - 10:13 am | हेमंत लाटकर

माय-बापाने सर्व मुलांना देऊन टाकू नये द्यायचे असल्यास मृत्यूपत्रात द्यावे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jan 2016 - 10:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डन.....!

--दिलीप बिरुटे

अर्धवटराव's picture

29 Jan 2016 - 12:24 am | अर्धवटराव

आणि बहुतेक आजवर बघितलेल्या सर्वोत्तम (मनावर आघात करणार्‍या अभिनयाच्या बाबतीत) चित्रपटांपैकी एक. सबकुछ नाना.. पण इतरही तेव्हढेच ताकतीने उतरले आहेत आखाड्यात.

जव्हेरगंज's picture

4 Feb 2016 - 11:33 pm | जव्हेरगंज

" दुनिया बेईमान झाली तरी चालेल, पण तुम्हाला ती मुभा नाही"

ज्याप्रकारे हा संवाद येतो त्याला तोड नाही!

लाजवाब!!!!!

अर्धवटराव's picture

5 Feb 2016 - 12:56 pm | अर्धवटराव

आजवर अनेक सिनेमे बघितले कि ज्यात कमि जास्त पोर्शन जबरदस्त अ‍ॅक्टींग केली स्टारकास्टनी. हा असा एक चित्रपट आहे कि ज्यात अगदी १००% म्हणावं अशी भन्नाट अ‍ॅक्टींग झाली आहे. नानाच्या पाया पडावसं वाटतय.

अवांतरः
'कट्यार काळजात घुसली' पण बघितला होता. सहज तुलना केली कट्यार आणि नटसम्राटची. तर कट्यार म्हणजे जीतेंद्र आणि नटसम्राट म्हणजे दिलीपकुमार वाटला.

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Feb 2016 - 2:35 pm | ज्ञानोबाचे पैजार

दिलीप कुमार? अर्धवट राव आवडला नाही तर सरळ सांगायच की नाही आवडला. पण डायरेक्ट दिलीपाकुमाराशी तुलना? इतकाही काही वाईट नाहीये सिनेमा. जगदीप किंवा जॉनी लिव्हर म्हणाला असतात तर एकवेळ समजुन घेतले असते. पण दिलीप कुमार? छे.... कल्पना देखिल सहन होत नाही.

आणि रहाता राहिला तो कट्यार आणि नटसम्राटच्या तुलनेचा. ही तुलना मला रत्नागिरी हापुस आंब्याची लोणकढ्य़ा रवाळ साजुक तुपा बरोबर केल्यासारखी वाटली. दोन्ही चित्रपट आणि नाटके आपापल्या जागी श्रेष्ठच आहेत.

पैजारबुवा,

अर्धवटराव's picture

6 Feb 2016 - 12:04 am | अर्धवटराव

दिलीप कुमार? अर्धवट राव आवडला नाही तर सरळ सांगायच की नाही आवडला. पण डायरेक्ट दिलीपाकुमाराशी तुलना? इतकाही काही वाईट नाहीये सिनेमा. जगदीप किंवा जॉनी लिव्हर म्हणाला असतात तर एकवेळ समजुन घेतले असते. पण दिलीप कुमार? छे.... कल्पना देखिल सहन होत नाही.

काहिच नाहि कळलं. कोणाला, काय नाहि आवडलं म्हणताय पैजार बुवा?

आणि रहाता राहिला तो कट्यार आणि नटसम्राटच्या तुलनेचा. ही तुलना मला रत्नागिरी हापुस आंब्याची लोणकढ्य़ा रवाळ साजुक तुपा बरोबर केल्यासारखी वाटली. दोन्ही चित्रपट आणि नाटके आपापल्या जागी श्रेष्ठच आहेत.

नाटके आपापल्या जागी हुच्च आहेतच. चित्रपटाच्या बाबतीत नटसम्राटपुढे कट्यार अगदीच केवीलवाणा वाटला. ते ही नाना आणि सचिन हि तुलना मनात आल्यानंतर...

नगरीनिरंजन's picture

5 Feb 2016 - 1:12 pm | नगरीनिरंजन

टू सी ऑर नॉट टू सी? दॅट इज द क्वश्चन.
बघावं की न बघावं? हा एकच सवाल आहे.
अखंड मनोरंजनाच्या लखलखाटात पल्लेदार भाषेची झालर लावलेलं आप्पा बेलवलकरांचं आत्मकेंद्री जुनाट दु:ख जाऊन बघावं निर्बुद्ध नॉस्टॅल्जिक आनंदानं...
की रोखून धरावं स्वत:ला नाविन्याच्या कंटाळवाण्या प्रतीक्षेत मनाच्या मनोरंजनाच्या व्यसनासह आणि करावा अस्वीकार एकाच क्षणी जुनाटपणाचा, नॉस्टॅल्जियाचा, पाट्या टाकण्याचा आणि कल्पनाशून्यतेचाही?
नाविन्याच्या नवलाईने जुनेराला असा रंग मारावा की नंतर येणाऱ्या नवलाईला स्मरणरंजनाचा वासही नसावा!
पण..पण अशी नवलाई आलीच नाही तर?
तीच तर खरी मेख आहे. नव्या नवलाईच्या नागड्या अनुभवांना फकीर होऊन भिडण्याची हिंमत होत नाही म्हणूनच आम्ही सहन करतो हे जुन्याचेच नवथरलेपण. सहन करतो विचारशक्तीवर माहितीच्याच गोष्टीसाठी टाळ्या पिटण्याचा बलात्कार. कवटीच्या गाभाऱ्यात असलेल्या मेंदूची विटंबना आणि अखेर?
पॉपकॉर्न घेऊन उभे राहतो दाखवतील ते बघण्यासाठी.
मराठी माणसा, तू इतका विचारहीन का झालास?
एका बाजूला ज्यांनी आमच्या पैशाचा पुरेपूर दाम द्यायला पाहिजे ते आम्हाला गृहीत धरतात आणि दुसरीकडे नवनवीन प्रयोग करणाऱ्यांकडे मात्र तू पाठ फिरवतोस.
मग जुन्याच तोंडाला नवा रंग फासून फडावर उभ्या राहिलेल्या या नाट्य-चित्रसृष्टीकडे पाहून कौटुंबिक विषय, पुणेरी भाषा आणि गोरे(च) नायक-नायिका स्विकारणाऱ्या तुझ्या बेगडी चित्र-नाट्य प्रेमाचं कौतुक आम्ही कुठवर करायचं?

तुषार काळभोर's picture

5 Feb 2016 - 2:00 pm | तुषार काळभोर

त्यातल्या मतांशी किंचीत असहमत, तरी अ‍ॅज ए प्रतिसाद म्हणून आवडला.
नाविन्य हवेच. (ते नव्हते तेव्हा नव्वदीच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीची काय अवस्था होती, ते पाहिलंय आपण).
पण म्हणून अशा (उदा नटसम्राट/कट्यार.. अशी नाटके पडद्यावर आणणे) गोष्टी करूच नयेत का?
चित्रपटामुळे नटसम्राट उभ्या महाराष्ट्रात पोहचला. (आणि नानामुळे तो जास्त लोकांनी पाहिला (असावा). सामान्य प्रेक्षक, जो सामान्यपणे नाटकांपासून लांब आहे-सांस्कृतिक व भौगोलिक दृष्ट्या)- त्यांना चित्रपटामुळे 'नटसम्राट' पाहता आला.)
मराठीतील आणखीही उत्तमोत्तम नाटके योग्य माध्यमांतराद्वारे मोठ्या पडद्यावर यावीत अन् जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचावीत.

संदीप डांगे's picture

5 Feb 2016 - 2:21 pm | संदीप डांगे

__/\__ अभिप्रायाचा प्रतिसाद जबरस्त! लाखात एक!

मधुरा ashay's picture

5 Feb 2016 - 2:22 pm | मधुरा ashay

आप आपल्या ठिकाणी बरोबर..तुलना कशाला करायची..जे समोर आहे त्याचा आनंद घ्यावा..