इंद्रधनुष्याचा पाठलाग.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
25 Dec 2015 - 8:30 am

.

“माझा प्रयत्नावर विश्वास आहे.जरी पकडू शकले नाही तरी इंद्रधनुष्याचा पाठलाग करण्यावर माझा विश्वास आहे.”

वसुंधरा नाडकर्णी एक चांगली पत्रकार आहे हे मला माहित होतं.एका स्थानिक वर्तमानात ती रिपोर्टर म्हणून सुद्धा काम करायची.अलीकडे ती पर्यावरणावर अभ्यास करीत आहे.पर्यावरण हा सध्या बहूतचर्चीत विषय झाला आहे.काही श्रीमंत देश स्वतःच्या जरूरी साठी आणि उर्जा मिळवण्यासाठी पृथ्वीवर भरपूर प्रदुषण करून आपली उर्जीतावस्था करून घेऊन श्रीमंत झाले आहेत आणि यापुढे प्रदुषण कमी केलं नाही तरी पृथ्वीवर हाः हाः कार होईल म्हणून विकसित होऊ घातलेल्या देशांवर प्रदुषण न करण्याचा दबाब आणीत आहेत.
जगात ह्या विषयावर अनेक चर्चासत्रं चालू आहेत.माझा मित्र आणि मी अशाच एका चर्चासत्रात गेलो होतो.माझ्या मित्राने माझी वसुंधरेशी ओळख करून दिली होती.

त्यानंतर मी एकदा मुंबईहून दिल्लीला जात असताना माझी आणि तिची विमानात गाठ पडली.
“तू पर्यावरणाच्या विषयात का पडलीस?”
असा मी तिला प्रश्न केला.
माझा प्रश्न ऐकून ती थोडी हंसली. मला ही थोडं नवल वाटलं आणि ते तिच्या ध्यानात ही आलं. मला म्हणाली,
“मी का हंसले ते मी तुम्हाला नंतर सांगीन.पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर अगोदर देते”.
वसूंधरा म्हणाली,
“मला खूप लेखन करायचं आहे.एक दोन कादंबर्‍या लिहिण्याचे विषय मनात घोळत असतात.पण मुलतः मला पत्रकारीकता आवडते.म्हणून शास्त्रीय विषयावर लिहीते आणि त्यावर रिपोर्टींग पण करते.पर्यावरण आणि प्रदुषण हे विषय सध्या शिखरावर आहेत.त्याचाही अभ्यास करीत आहे.आणि जमेल तसं एका कादंबरीचं तात्पूरतं,कच्चं लेखन करून ठेवीत आहे.ह्या विमानाच्या प्रवासात मला असं कच्चं लेखन करायला खूप संधी मिळते.”
“म्हणजे मी आज तुझा वेळ खाणार आहे त्यामुळे तू मला शिव्या देत असणार ना?”
असा हंसत हंसत मी तिला प्रश्न केला.
“नाही,नाही तसं काही नाही.तुमच्याबरोबर चर्चा करून माझा फायदाच होणार आहे.”
“ते कसं?”
असा कुतूहलाने मी वसुंधरेला प्रश्न केला.
“त्याचं असं आहे तुम्ही “कां” प्रश्न करून मला माझ्या बालपणाची नव्हेतर माझा आता पर्यंतच्या जीवनाची झटक्यात आठवण करून दिलीत.आणि मघाशी मी त्याचाच विचार करून हंसले होते.”

असं तिने म्हटल्यावर मी मनात म्हणालो नाहीतरी ही़च्या बद्दल बरीच माहिती माझ्या मित्राने मला सांगीतली होती.आता काही गोष्टी प्रत्यक्ष तिच्याच तोंडून ऐकायला संधी मिळाली आहे.

“माझ्या मैत्रीणी मला म्हणत,तीन,चार वर्षाचं वय म्हणजे “कां” म्हणायचं वय.ह्याच वयात माझी मुलगी मला विचारायची,
“आकाश निळं कां आहे? पाण्याला रंग कां नाही?
आणि असेच काही शास्त्राला लागून असलेले प्रश्न मला विचारायची जे मला संभ्रमात टाकीत असत.तिने प्रश्न विचारल्याबरोबर मी ताबडतोब माझ्या लॅपटॉपकडे धांव घ्यायची आणि गुगलवर जाऊन माहिती काढायची.आणि तिला सांगायची.
निदान असे प्रयत्न तरी माझ्याकडून व्हायचे.एकदा तिने मला प्रश्न केला,
“आई,”
असं म्हणून ती वर आकाशाकडे आपले सुंदर गोल डोळे टवकारून पहात मला म्हणाली,
“हे इंद्रधनुष्य आपण कसं पकडू शकतो?”
मी वसुंधरेला मधेच अडवीत म्हणालो,
“तू तिला सांगीतलं असशील की सूर्य प्रकाश पावसाच्या थेंबातून कसा शिरकाव करून बाहेर पडतो,आणि तसं झाल्यावर त्या प्रकाशाचं सात रंगात कसं रुपांतर होतं वगैरे.”
मला ती म्हणाली,
“मुळीच नाही. खरं तर तिला इंद्रधनुष्य कसं तयार होतं हे विचारायचं नव्हतं.ते पकडायचं कसं? हे विचारायचं होतं. कारण ते तिला पकडता येत नव्हतं.
माझ्या मनात यायचं की तिला मी सांगावं का? की माझे बाबा, कुठचीही अशक्यप्राय असलेली गोष्ट साध्य करून दाखवायचे ते?
पण तेव्हड्यात माझ्या विचारात गुंगून गेलेल्या मतिला माझ्या नवर्‍याच्या घोघर्‍या आणि विश्वासपूर्वक आवाजाने खंड आणला.त्याने तिला सांगीतलं,
“तुला खरोखरच वेगाने धावावं लागणार.इतकं वेगाने की तू जणू त्या इंद्रधनुष्यावर आदळतेस की काय असं वाटलं पाहिजे मगच ते तुला पकडता येईल.”
“मी खूप जोरात धावते” माझी मुलगी त्याला म्हणाली.
“हो छकुले,तुझं खरं आहे.”
मी म्हणाले,
“पण तू धावण्यात थोडी मागे पडतेस.”

मी विचार केला तिची निराशा का करावी? कधी ना कधी ती मोठी झाल्यावर देवाच्या पर्‍या असतात त्या हट्ट न करणार्‍या लहान मुलांच्या स्वप्नात येतात आणि तू देवाला आवडतेस म्हणून निरोप देऊन जातात. हे आम्ही तिला सांगीतलेलं किती खरं होतं ते कळणारच आहे मग त्यावेळीच इंद्र्धनुष्य पकडण्याबद्दल खरं सांगायचं का?

परंतु, माझ्या हे ही लक्षात आलं की, ती काय,मी काय आणि माझा नवरा काय जीवनात इंद्रधनुष्याचा पाठलाग करीत असतो.माझ्या पाचवीच्या वर्गातली माझी शिक्षीका जेव्हा मला म्हणाली होती की मी चांगलं अक्षर काढून लिहू शकत नाही तेव्हा मी तिला खोटं ठरवायचं ठरवलं होतं.आणि शेवटी मी त्यात यशस्वी झाले.त्यानंतर मी पत्रकारितेत डीग्री घेतली.काही वर्ष पत्रकार म्हणून काम केलं.एक दोन पुस्तकं लिहीली.संपादक झाले.एका मासिकाचं संपादन केलं.आणि आता स्वतंत्र सायन्स रायटर पण आहे.”
“तुझा नवरा काय करतो?”
असा मी तिला प्रश्न केला.
वसुंधरा म्हणाली,
“माझ्या नवर्‍याला कुठेही नोकरी करायला आवडत नाही.
जेव्हा माझ्या नवर्‍याला रेडीमेड कपड्याचं नवीन दुकान घालून धंदा करायचा होता तेव्हा मी सातव्या महिन्यावर गरोदर होते.त्यावेळी आम्ही दोन इंद्रधनुष्यांचा पाठलाग केला होता.अगोदरच आम्ही रहात्या अपार्टमेंटचा हाप्ता भरत होतो आणि आता धंद्याच्या लोन वर दुसरा हाप्ता भरायला लागलो.माझ्या नवर्‍याला दोन वर्ष मिळकत नव्हती.अशा परिस्थितीत मी माझ्या नवजात मुलीला वाढवत होते.तिचे कपडे बदलायचं,पाळणा ओढून तिला झोपवायचं,आणि तिला पाजायचं.ही कामं करण्यात माझा वेळ खर्ची जायचा.आणि हे करीत असताना रकानेच्या रकाने लेखन करायचं,आणि संसाराला मदत करायची.हे करीत असताना माझ्या पाचव्या वर्गातल्या शिक्षीकेने मी जे करू शकणार नाही म्हणून मला सांगीतलं होतं तेच मी करीत होते.”

“मग आता तू काय करतेस?”
असं मी विचारल्यावर ती म्हणाली,
“अजून सुद्धा मला सृजनात्मक लेखन कसं करायचं त्यावर क्लासीस घ्यायचे आहेत.माझा इंद्रधनुष्य पकडण्यासाठी पाठलाग चालूच आहे. पंधरा वर्षापूर्वी मी कॉलेज सोडलं.ऑलजीब्रा,जॉमेट्री आणि इतर विषय विसरून गेले आहे.तरीपण मी त्या इंद्रधनुष्याचा पाठलाग करीत आहे. कारण मला कादंबर्‍या लिहायच्या आहेत.मी पाठलाग करीत आहे कारण माझा प्रयत्नावर विश्वास आहे.जरी पकडू शकले नाही तरी इंद्रधनुष्याचा पाठलाग करण्यावर माझा विश्वास आहे.”

वसुंधरा आणि मी आणखी अनेक विषयावर बोलत होतो ते प्रवास संपेपर्यंत.शेवटी दिल्लीला उतरल्यावर,
“पुन्हा असेच कधी तरी भेटूं”
असं म्हणत आम्ही आमच्या मार्गाला लागलो.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

कथालेख

प्रतिक्रिया

माझा प्रयत्नावर विश्वास आहे.जरी पकडू शकले नाही तरी इंद्रधनुष्याचा पाठलाग करण्यावर माझा विश्वास आहे.

पर्फेक्ट!

DEADPOOL's picture

25 Dec 2015 - 11:02 am | DEADPOOL

नंतर जरा विस्कळीत वाटली.
भन्सालीच्या फिल्मप्रमाणे!!!

विश्वव्यापी's picture

25 Dec 2015 - 11:53 am | विश्वव्यापी

नमस्ते सामंत साहेब,
लेख फार छान वाटला.
सुरेखच.
विश्वव्यापी

चांदणे संदीप's picture

25 Dec 2015 - 1:31 pm | चांदणे संदीप

प्रयत्नांवर विश्वास ठेवायला शिकवणारा लेख! आवडला!

Sandy

एक एकटा एकटाच's picture

25 Dec 2015 - 1:43 pm | एक एकटा एकटाच

चांगला लेख आहे