तमसो मा ज्योतिर्गमय - भाग २

भानिम's picture
भानिम in जनातलं, मनातलं
11 Dec 2015 - 11:54 am

तमसो मा ज्योतिर्गमय - भाग १ - http://www.misalpav.com/node/34053

तमसो मा ज्योतिर्गमय - भाग २

कळत नकळत भटांनाही बाळाचा लळा लागू लागला. जरी ते लेकीच्या आणि बाळाच्या खेळाकडे दुर्लक्ष केल्यासारखे दाखवित असत; तरी बाळाच्या बोबड्या बोलांमुळे त्यांचेही मनोरंजन होऊ लागले. रुक्मिणी वहिनी तर बाळाचे सर्व काही करण्यामध्ये अगदी गुंगुनच गेल्या, आणि बघता बघता चारेक वर्षे कशी निघून गेली ते कळले सुद्धा नाही.

भट घरी येताच लहानगा कार्तिकेय त्यांच्या मागे मागे करून आणि "बाबा, असे का? बाबा, तसे का?" असे प्रश्न विचारून भंडावून सोडत असे! पहाटे लवकर उठून पूजेच्या वेळी त्यांच्या बाजूला बसून काळजीपूर्वक तो पूजाविधीचे निरीक्षण करीत असे.

घरच्या देवांची पूजाअर्चा आटोपून कृष्णंभट बाहेरची कार्ये करण्यासाठी बाहेर पडण्याची तयारी करत असताना रुक्मिणी वहिनींनी "कार्तिकेय आता चार वर्षांचा झाला……. दत्तक विधानाचे बघायला हवे काहीतरी…… " अशी काही अस्पष्ट पुटपुट चालविली होती, पण भटांच्या त्रासिक मुद्रेकडे बघून त्या गप्प झाल्या. भटांनाही हे पटत होते, नाही असे नाही, पण या बाबतीत त्यांचा निश्चित निर्णय होत नव्हता. ब्रम्हवृन्दातील काही वयोवृद्ध ब्राह्मणांशी या विषयी चर्चा करावी, असा विचार करत ते घराबाहेर पडले.

बाहेरची कार्ये करून, घरी येऊन माध्यान्ह संध्या आणि भोजन आटपून ते सोप्यावर विश्रांतीसाठी काही वेळ कलंडले असतील नसतील; तोच दिन्डीबाहेरच्या गलबल्याने त्यांना जाग आली. कानोसा घ्यायला ते पडवी ओलांडून अंगणात आले, तोच त्यांना दिंडीतून आत शिरणारे दोन पोलिस शिपाई, दोन मुस्लिम महिला आणि त्यांच्या मागून दिसेल न दिसेल असे चालणारे विष्णूभट असे दृश्य दिसले. अंगणात ही सर्व मंडळी पावले दोन पावले शिरली नसतील तोच कृष्णंभटांनी त्यांना 'तिथेच थांबा' अशी खूण हाताने केली आणि स्वत: त्यांच्यापर्यंत पोहोचले.

मागून आलेले विष्णू भट स्वत:च्या चेहऱ्यावर शक्य तितके साळसूदपणाचे भाव आणून; त्यापैकी एका पोलिस शिपायाला हाताने स्पर्श करून बोलण्यासाठी खुणावत होते. परंतु त्यातील थोडी वयस्क दिसणारी मुस्लिम महिला आपणहून पुढे झाली आणि म्हणाली, "तकलीफ के लिये मुआफ़ि चाहती हूँ पंडितजी। मैं मेहरुन्निसा, हमीद चौकमें यतीम मुस्लिम औरतोंके लिए पनाहगाह चलती हूँ। ही माझ्याबरोबर आलेली झुबेदा…… आपके घरमें जो बच्चा पल रहा है, यह उसकी माँ है ऐसा उसका कहना है।"

मघा जेंव्हा ते सोप्यावर कलंडले होते, तेंव्हा गार्गी त्यांच्या पायाशी बसून अभ्यास करीत होती. हा सर्व गलबला ऐकून तीही कृष्णंभटांच्या मागोमाग अंगणात आली होती.

झुबेदाकडे पाहून गार्गीच्या चेहऱ्यावर जे काही स्तंभित भाव उमटले ते भटांच्या नजरेने क्षणात टिपले. काय बोलावे ते कृष्णंभटांना कळेना. आपल्या सर्वांगातून आगीच्या ज्वाळा निघत आहेत असे त्यांना वाटू लागले, आणि त्यांनी हाक दिली…. "अहो …."

आत बाळाला भरवत बसलेल्या रुक्मिणी वहिनींना ती हाक ऐकताच विजेचा लोळ कोसळल्यासारखेच झाले; आणि हातातला घास टाकूनच त्या बाहेर आल्या. बाहेरचे दृश्य बघून काहीतरी भयंकर घडले आहे असे त्यांना जाणवले; तोच भटांचा करारी आवाज त्यांच्या कानात तापल्या सळईसारखा शिरला…. "कार्तिकेयला तयार करून बाहेर आणा!"

झाला प्रकार लक्षात यायला रुक्मिणी वहिनींना वेळ लागला नाही. आपल्या पायाखालची धरणी सरकते आहे असे त्यांना वाटू लागले, आणि लटलटत्या पायांनी त्या तशाच खिळून उभ्या राहिल्या. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. गार्गीनेही आता त्यांचे बघून रडायला सुरुवात केली होती.

"मी काय म्हणतो आहे…. लक्षात आले नाही का?"

हे ऐकताच त्या आतमध्ये गेल्या आणि गार्गीसुद्धा त्यांच्या मागे मागे "आई……. नाही….. नाही….. नको…. नको…. !!" असे रडत रडत घरात गेली.

आतमध्ये जाऊन त्यांनी कार्तिकेयला सदरा आणि विजार घातली. त्याला काहीच समजेना, आई आणि ताई का रडत आहेत ते! वहिनींनी एका पिशवीत त्याचे काही कपडे भरले, एका डब्यात त्याचा आवडता खाऊ भरला; आणि त्याला घेऊन त्या बाहेर जाऊ लागल्या. डोळ्यांना संततधार लागली होती. गार्गी त्यांच्या पायाशी लागून "आई…… नको….. नको ना…..!!!" असे म्हणून आकांड करू लागली. हे सर्व बघून आता कार्तिकेयही हमसाहमशी रडू लागला होता.

बाहेर अंगणात भट एखाद्या वठलेल्या झाडाप्रमाणे उभे होते….. निश्चल!!

वहिनी बाहेर आल्या, पण त्यांचे पाऊल पडवीच्या पायऱ्या उतरून खाली यायला धजेना, तेंव्हा भटच फिरून परत आले, आणि त्यांनी कार्तिकेयला वहिनींच्या हातातून सोडवून घेतले आणि ते मुस्लिम महिलांच्या दिशेने जाऊ लागले. गार्गीने धावत येऊन त्यांच्या पायाला घट्ट मिठी घातली, आणि ती मोठ्यामोठ्याने रडू लागली, "बाबा, नको…… नको…… नको…… बाबा!!" भटांनी तिला हाताने दूर सरले आणि कार्तिकेयला त्या महिलांच्या हाती सोपवू लागले.

ते कार्तिकेयला सांगू लागले, "तुला यांच्याबरोबर जायचे आहे….. बाळ…..!!" कार्तिकेयाने त्यांना घट्ट मिठी मारली आणि तो आणखीच रडू लागला!! आणि बोबड्या बोलात "मला नाही जायचं…… बाबा….. मला नाही जायचं!!" आई….. ताई…… सांग ना…… !!!" असा आक्रोश करू लागला!!

मोठ्या कष्टाने भटांनी त्याची मिठी सोडवून त्याला झुबेदाच्या सुपूर्द केले. ती पटापट त्याचे पापे घेऊ पाहत होती; पण तो आपल्या छोट्या हातांनी तिला मारू लागला, आणि पुन्हा पुन्हा भटांकडे झेपावू लागला. तिला अगदीच आवरेनासा झाला, तेंव्हा मेहरुन्निसाने त्याला घेतले आणि ती परतीच्या दिशेने वळली.

वहिनी आता पडवीच्या खांबाला धरून कोसळल्या होत्या आणि त्यांच्या रडण्याला खंड नव्हता. गार्गी त्यांच्या कुशीत शिरून ओक्साबोक्शी रडत होती!

आणि भट दिंडीच्या चौकटीला धरून कार्तिकेयाला घेऊन जाणाऱ्या महिलांच्या पाठमोऱ्या आकृत्यांकडे पाहत उभे होते…… एखाद्या पाषाणमूर्तीप्रमाणे!!

थोड्या वेळाने ते परत वळले, आणि सोप्यावरचे आपले उपरणे खांद्यावर घेऊन त्यांनी खाली उतरून पायात खडावा घातल्या. ते बघून रुक्मिणी वहिनींनी त्यांना रडतच विचारले; "अहो, कुठं निघालात?" पण त्यांना काही उत्तर न देताच भट तरातरा चालत बाहेर पडले सुद्धा!

त्यांच्या पाठीपाठी वहिनी दिन्डीपर्यंत गेल्या आणि थबकल्या. त्यांनी खुणेनेच गार्गीला जवळ बोलावले आणि हातानेच तिला वडिलांच्या पाठीवर जाऊन ते कुठे जात आहेत ते बघण्यास आणि परत येण्यास सांगितले. कृष्णंभट कुठलेही अतार्किक कृत्य करणार नाहीत याचा त्यांना पूर्ण विश्वास होता, पण पत्नीधर्माला अनुसरून त्यांना काळजी वाटत होती.
काही अंतर गार्गी आपल्या पित्याच्या पाठी गेली, आणि ते कुशावर्ताकडे जात आहेत असे पाहून ते सांगायला परत आली.

भटांनी कुंडावर पोहोचताच आपले उपरणे काठावर ठेवले, आणि ते हळूहळू कुंडाच्या पाण्यात कंबरभर जाऊन उभे रहिले. तोंडाने काहीसे पुटपुटत त्यांनी अर्घ्य द्यायला सुरवात केली. किती तास ते असे उभे होते कुणास ठाऊक? दिवेलागणीच्या काही वेळ आधी त्यांनी तीन डुबक्या पाण्यामध्ये घेतल्या आणि ते परत फिरले.

येताना ते गुरुकुलात शिरले, आणि त्यांच्या एका आवडत्या शिष्याला त्यांनी सूचना केल्या. पुढच्या एक मासात ज्यांच्या घरी कार्ये होती, त्या घरांची यादी देऊन त्याला त्या त्या घरी जाऊन गुरुजींना हि कार्ये करण्यास जमणार नसल्याचे सांगावे, आणि पर्यायी व्यवस्था म्हणून गुरुकुलातील योग्य ते शिष्य ही कार्ये करण्यासाठी येऊ शकतील असा निरोप देण्यास सांगितले. त्याचप्रमाणे गुरुजी पुढचा एक मास व्रतस्थ असल्यामुळे येऊ शकणार नाहीत असाही निरोप त्यांनी दुसऱ्या एका शिष्याकरवी जहागिरदारांच्या वाड्यावर धाडला.

घरी आल्यावर काहीही न बोलता त्यांनी स्वत:च पायावर पाणी घेतले, आणि ते तडक देवघरात गेले. देवांसमोरच्या समईमध्ये त्यांनी तेलवाती लावल्या, तेल घातले, त्या पेटविल्या आणि देवांसमोर बसून राहिले. वहिनींना त्यांची चाहूल लागलीच होती, परंतु काही विचारायचे धैर्य त्यांना होत नव्हते.

आज माघ पौर्णिमा होती. भटांनी देवघरातल्या ग्रंथांच्या बासनातील एक पोथी काढली आणि ते वाचन करू लागले. थोड्या वेळाने उठून त्यांनी अंगणामध्ये तीन दगडांची चूल बनवली. स्वयंपाकघरातील एक पातेले आणि दोन मुठी तांदूळ आणले आणि त्यांनी त्या चुलीवर ते शिजत ठेवले. पुन्हा जाऊन ते देवघरात पोथी वाचन करू लागले.

('धर्म' या हिंदी कलात्मक चित्रपटावर आधारित. मूळ चित्रपटातील कथा वाराणसी मध्ये घडलेली दाखवली असली तरी प्रस्तुत कथापट नाशिकमध्ये घडल्याचे कल्पिले आहे. नाशिकच्या वर्णनात आणि प्रत्यक्ष भौगोलिक तपशिलात; त्याचप्रमाणे धार्मिक विधींच्या तपशिलात काही तफावत आढळल्यास ते लेखकाचे कलात्मक स्वातंत्र्य समजावे)

कथा

प्रतिक्रिया

दुसरा भागही छान आहे. पुढे काय होणार याची उत्सुकता आहे.

मितान's picture

11 Dec 2015 - 12:19 pm | मितान

हा भागही आवडला.

पैसा's picture

11 Dec 2015 - 12:33 pm | पैसा

या ओघात पुढचा भाग लिहा.

पद्मावति's picture

11 Dec 2015 - 3:09 pm | पद्मावति

दोन्हीही भाग सुंदर. पुढील भागाची वाट पाहतेय.

सस्नेह's picture

11 Dec 2015 - 3:43 pm | सस्नेह

पुभाप्र.

अप्रतिम.
खूपच सुरेख लेखनशैली.

भानिम's picture

12 Dec 2015 - 2:49 pm | भानिम

सर्वांच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!