वाडा चिरेबंदी- गॉन विथ द विंड ???
मध्यंतरी ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नव्या संचातील पुनरूज्जीवित 'वाडा चिरेबंदी' बघण्याचा योग आला. हे नाटक मी याआधी वाचलेले होते. परंतु नाटक वाचणे वेगळे आणि प्रत्यक्ष सादरीकरण वेगळे. मागच्या वेळेस चंद्रकांत कुलकर्णींच्यांच दिग्दर्शनात या नाटकाचे प्रयोग झाले तेव्हा मी प्राथमिक शाळेत होतो. त्यामुळे आज तिशीच्या उंबरठ्यावर असलेल्या आमच्या पिढीला भारतीय रंगभूमीच्या वाटचालीत मैलाचा दगड असलेले हे नाटक प्रत्यक्ष मंचावर पाहायला मिळेल अशी आशा नव्हती. टीव्ही-सिनेमातील 'स्टार' कलावंतांच्या नाममहिम्याचा फायदा घेणारी व्यावसायिक गणिते जुळवून का होईना पण निर्मात्यांनी पुन्हा एकदा हे धाडस केले याबद्द्ल त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे.
वरवर पाहता हे नाटक म्हणजे चार मध्यमवयीन बहीण-भाऊ, त्यांचे व त्यांच्या बायकामुलांचे आपसातले रागलोभ, इस्टेटीतून होणारे वाद, आधुनिक आयुष्याची ओढ बाळगतानाच परंपरा जपण्याची धडपड आदी 'कहाणी घर घर की' सांगणारे एक साधे कुटंबनाट्य आहे.त्यामुळे टीकाकारांच्या मते त्यात काय एवढे कौतुक करण्यासारखे? परंतु त्या काळात रंगभूमीवर प्रचलित असलेला कुठलाही 'नाटकी'पणा येऊ न देता साध्या, सोप्या रोजच्या बोलीभाषेत रंजक अशी गोष्ट सांगणे आणि ती तेवढ्याच प्रभावीपणे रंगमंचावर सादर करणे हे निश्चितच सोपे नाही.
साधारणत: नाटक-सिनेमा वा एरवीही कथात्म साहित्याचा विषय आला की त्यातील पात्रांना सरधोपटपणे काळा-पांढरा रंग देऊन कथाकार मोकळे होतात आणि वाचक-प्रेक्षकांनाही तशीच सवय लागते. परंतु वास्तव आयुष्य हे इतके एकरंगी, कृष्णधवल नसते तर ते एकाच वेळी रंगीबेरंगी, स्वच्छ, गढूळ व अत्यंत व्यामिश्र, गुंतागुंतीचे असते. म्हणून पात्रांना विशिष्ट रंगात रंगवण्याच्या पारंपरिक नाटकीय मागणीला दुर्लक्षून त्यांना वास्तवाच्या जवळपास नेऊन ठेऊन मग नाट्य उभे करणे हे या नाटकाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच मग प्रेक्षक नाटकातील पात्रांच्या सामाजिक पार्श्वभूमीवरचा नसला तरी नाटक पाहणार्याला आपले वाटते कारण थोड्याफार फरकाने ही प्रत्येकच घराची गोष्ट असते.
लेखकाने गोष्ट सांगण्यासाठी एखादी विशिष्ट पार्श्वभूमी निवडणे यामागे अनेक कारणे असतात. त्याच्या 'अप ब्रिंगिंग'च्या दृष्टीने असलेला एक 'कम्फर्ट झोन' हे एक कारण असतेच. हा काही कमीपणा नसून एक क्रिएटीव्ह आणि प्रॅक्टिकल सोय असते. नाहीतर लेखकाला सर्वस्वी अपरिचित पार्श्वभूमी उभी करताना प्रचंड 'रिसोर्सेस' ख्रर्ची पडतात आणि त्यामुळे वातावरणनिर्मिती करण्याच्या नादात कथेचा आत्माच हरवण्याची शक्यता राहते. त्यामुळे नाटककारावर होणार्या ब्राह्मणवादाच्या आरोपात फार काही तथ्य आहे, असे मला वाटत नाही.
महाभारताबद्दल तो ग्रंथ म्हणजे 'जय नावाचा इतिहास आहे' असे खुद्द त्याच्या रचनाकर्त्यानेच सांगून ठेवले आहे. त्याचप्रकारे 'वाडा चिरेबंदी' किंवा 'वाडा चिरेबंदी' हा ज्याचा पहिला भाग आहे अशी 'युगान्त' ही नाट्यत्रयी ही काही निव्वळ एकाच कुटुंबाच्या तीन-चार पिढ्यांची कहाणी नाही तर धरणगावकर देशपांड्यांच्या कथेतून उलगडत जाणारा, 'साडेतीन टक्क्यां'तील काहीच टक्क्यांचा का असेना पण एक कथात्म इतिहास आहे. महाराष्ट्राच्या लोकजीवनातील स्थित्यंतरांचे फारसे डॉक्युमेंटेशन कथात्म साहित्य/कलांत झालेले नाही हा तसा जुनाच आरोप. काही प्रयोग झाले तरी ते मुंबई, लालबाग, गिरणी कामगार संप वगैरे पुरते मर्यादित राहिले. याला कारण म्हणजे नाट्य-चित्रपटक्षेत्रावर असलेला मुंबई-पुण्याचा प्रभाव. त्यामुळे महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातील समाजजीवनाचा सतत बदलता असा विस्तीर्ण पट उलगडवून दाखवणार्या कलाकृती तशा कमीच. या पार्श्वभूमीवर 'वाडा चिरेबंदी' उठून दिसतो.
'वाडा'सारखे नाटक जेवढे मंचावर घडत असते त्यापेक्षा ते सेटमागच्या काळ्या अवकाशात मोठ्या प्रमाणात घडत असते. अशा नाटकांच्या बाबतीत पात्रांच्या संवादांतून, मौनातून, हालचालीतून सेटमागच्या अवकाशात होणारे इतिहासाचे आणि वर्तमानाचे प्रोजेक्शन नटांना व प्रेक्षकाला नीट समजून घ्यावे लागते. त्यासाठी दोघानांही एक वेगळ्या प्रकारची रूची, अभ्यास व सराव लागतो तरच दोघांनाही अशा नाटकांचा खरा 'बौद्धिक' आनंद घेता येतो. ही अशा प्रकारच्या नाटकांची व एरवीही नाट्यमाध्यमाचीच अंगभूत मर्यादा आहे व बलस्थानही. त्यामुळेच हे नाटक, करणारा आणि पाहणारा, दोघांनांही आव्हान देणारे आहे. परंतु याच कारणामुळे सध्या या नाटकाला होणार्या गर्दीचे कारण समजून घेताना थोडा गोंधळ होतो.
माझ्या आकलनाप्रमाणे विदर्भात या नाटकाला मिळालेला प्रतिसाद हा प्रामुख्याने स्मरणरंजनातून आलेला आहे तर मुंबई-पुणे पट्ट्यात मिळणारा प्रतिसाद हा नावीन्य व काही प्रमाणात स्मरणरंजन यामुळे मिळालेला आहे. भारत गणेशपुरे, मकरंद अनासपुरे व टीव्हीवरील इतर स्टॅण्डअप कॉमेडीअन्सनी लोकप्रिय केलेल्या वर्हाडी-मराठवाडी बोलीभाषांमुळे आणि गेल्या काही वर्षात या दोन्ही भागातून रोजगारासाठी होत असलेल्या प्रचंड स्थलांतरामुळेही पश्चिम महाराष्ट्रात मराठीच्या प्रादेशिक बोलींबाबत असलेली अढी व तिथल्या स्थानिक बोलीभाषेबद्दल असणारा श्रेष्ठत्वगंड थोडा निवळला आहे. पण वरील कारणांसोबतच टीव्ही-सिनेमातील कलाकारांना प्रत्यक्ष 'परफॉर्म' करताना बघायला मिळणे याचे आकर्षण हेसुद्धा नाटकाच्या यशस्वीतेमागचे मुख्य कारण आहे असे वाटते.
'वाडा चिरेबंदी' च्या लिखाणाबद्दल अभिप्राय मांडण्याइतका माझा अभ्यासही नाही की अधिकारही नाही परंतु एक सर्वसामान्य रसिक म्हणून काही गोष्टी जाणवतात. हे सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले नाटक. या पस्तीस वर्षात पूर्णेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे हे नाटक त्याकाळात प्रासंगिक असेलही पण आजही ते एक कथा म्हणून प्रासंगिक आहे की 'शोले'मधील ठाकूरला वाटते तशी 'वक्त की दीमक'ने या वाड्याचे बुरुज 'खोखले' करून टाकले आहेत का अशी मला शंका येते.
मुंबई-पुण्याइतकं तीव्र आणि अ-मानवीय नसले तरी विदर्भातसुद्धा शहरीकरणामुळे होणारे कुटंबव्यवस्थेचे आणि समूहजीवनशैलीचे (कम्युनिटी लाईफ) विखंडन ही एकदिश आणि अपरिवर्तनीय प्रक्रिया आहे, हे वास्तव आहे. विदर्भातील किंवा महाराष्ट्रातील इतर भागांचाही विचार केला तर वाडा संस्कृती, एकत्र कुटुंबपद्धती शेवटची आचके देत असताना पाहिलेली आमची बहुधा शेवटची पिढी. 'वाडा चिरेबंदी'त दाखवल्याप्रमाणे साधारणत: ऐंशीच्या दशकात सुरू झालेल्या कुटुंबविभाजनाच्या प्रक्रियेने नव्वदच्या 'अस्वस्थ' दशकात वेग घेतला आणि नंतर आता चालू दशकात ती पूर्ण होत आली आहे. वानगीदाखल, आमच्या आई-वडीलांच्या पिढीतले जवळचे नातलगही आता फक्त कार्यप्रसंगापुरतेच एकत्र येताना दिसतात, आमच्या पिढीची तर गोष्टच सोडा. आमच्या आधीची पिढी एकदा संपली की त्यांच्या 'कुटुंबा'त आज एक-दोन भाऊ-बहिणींच्या रूपात उरलेले आम्ही एकांडे शिलेदार ही व्यवस्था चालवू शकू की नाही याची खात्री नाही. परंपरेशी असलेली नाळ जोडून ठेवण्याचा आमच्या पिढीने कितीही प्रयत्न केला तरी त्याचा प्रभाव मर्यादित आहे. म्हणूनच अशा परिस्थितीत 'वाडा' सारखी नाटके कितपत प्रासंगिक राहिली आहेत, असा विचार मनात येतो. की त्यांना आता फक्त एक नॉस्टाल्जिक वा व्हिंटेज मूल्य राहिले आहे ? तसेच केवळ असे व्यावसायिक मूल्य आहे म्हणून आपण जुन्या सिनेमांचे रिमेक, जुन्या नाटकांचं पुनरूज्जीवन , जुन्या गाण्यांचं रिमिक्स, जुन्या कथा-कादंबरी पात्रांचे पुन्हा-पुन्हा सिनेमाकरण-नाटकीकरण कुठवर करणार आहोत,हा सुद्धा एक वेगळा विषय या निमित्ताने चर्चिला जाणे आवश्यक आहे. पण या पुनरूज्जीवनाच्या अनुषंगाने काही नवीन मुद्द्यांचा ऊहापोह करणेही गरजेचे वाटते.
'वाडा चिरेबंदी' ही एक अभिजात कलाकृती आहे असे ज्येष्ठ मंडळी म्हणतात. परंतु अभिजात म्हणजे काय? अक्षर वाड्मय म्हणजे काय ? आजपासून पन्नास वर्षांनी आपण हेच नाटक पुन्हा उभे करून यशस्वी करू शकू का? उदा. आजच्या नाटकाच्या नेपथ्याचे डिझाईन आपल्याकडे जतन केलेले नसेल तर आपण ते नेपथ्य नेमके पुन्हा उभे करू शकू का ? आजच या नाटकाचे प्रयोग बघताना त्यातील कलावंत नाटकातील प्रादेशिक संस्कृतीशी फारसे परिचित नसल्यामुळे (केवळ 'करून राहलो, जाऊन राहलो' म्हटल्याने वर्हाडी होता येत नाही) जरा अवघडल्यासारखे वाटतात. तरीही सादरीकरण, अभिनय, लकबी, लहेजा यासारख्या गोष्टी या एकवेळ प्रयत्नाने, अभ्यासाने जमण्यासारख्या आहेत. परंतु हे नाटक करत असलेले कुटुंबांच्या अवस्थेबद्दलचे जे एक अनेकपदरी व्यापक स्टेटमेंट आहे तिचे आकलन आणि अपील भविष्यातही तसेच असेल का ? नाटकातील पात्रे जे जगले तसे आयुष्य न पाहिलेले भविष्यकाळातील कलावंत, दिग्दर्शक आणि प्रेक्षक यांचा नाटकाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा असेल ?
'गॉन विथ द विंड' या जगप्रसिद्ध कादंबरीवरील त्याच नावाच्या चित्रपटाच्या उपसंहारात सांगितल्याप्रमाणे ती, वार्यासोबत वाहून गेलेल्या एका संस्कृतीची कहाणी आहे. त्याचप्रमाणे वार्यावर वाहत नाहीशी होत चाललेली, नाटकात दाखवलेली ,जिला वर्हाडात खोचकपणे 'देशपांडेशाही' म्हणतात ती संस्कृती आपल्या प्रेक्षकांपुरती तरी नाट्यगृहाच्या अवकाशात बंदिस्त करण्यात तेव्हाचे समकालीन पण आता ऐतिहासिक झालेले 'वाडा चिरेबंदी' नाटक व नाटककार आज तरी यशस्वी झाले आहेत. ते येणार्या काळातही असेच यशस्वी होईल का, हे मात्र काळच सांगू शकेल.
-अ.अ.वा.
http://aawaghmare.blogspot.in/
प्रतिक्रिया
7 Dec 2015 - 6:42 pm | रेवती
नाटकाची ओळख व आपलं मत दोन्ही आवडलं.
7 Dec 2015 - 7:10 pm | मराठी_माणूस
नाटकाची छान ओळख
7 Dec 2015 - 7:54 pm | उगा काहितरीच
नाटकाचा काही भाग टिव्हीवर पाहिला होता. आवडलं होत नाटक.लेख पण छान जमलाय.
7 Dec 2015 - 8:27 pm | संदीप डांगे
वाघमारे साहेब, छान लिहिता तुम्ही. आवडला लेख. गोळीबंद.
7 Dec 2015 - 10:21 pm | बोका-ए-आझम
लिहिलेला लेख आवडला. शीर्षकावरुन थोडा गोंधळ झाला होता पण एकंदरीत लेख छानच आहे.
7 Dec 2015 - 10:43 pm | पद्मावति
नेमकं लिहिलंय.
लेख आवडला आणि पटला.