साहित्यः
१. मेथी जुड्या - ३ ते ४
२. मसूर डाळ - पाव वाटी
३. कांदा - १ मध्यम
४. टोमॅटो - १ मध्यम
५. लसूण पाकळ्या - २ (ठेचून किंवा बारीक चीरुन)
६. जिरं / मोहरी - १/२ चमचा प्रत्येकी
७. तेल - ३ ते ४ पळ्या
८. गरम मसाला - १/२ चमचा
९. लाल तिखट किंवा मसाला - चवीनुसार
१०. हळद - पाव चमचा
११. अर्ध्या लिंबाचा रस
१२. चवीनुसार मीठ / साखर
कृती:
१. मसूर डाळ स्वच्छ धुवून भिजत घाला
२. कांदा/टोमॅटो बारीक चिरुन घ्या
३. मेथी स्वच्छ धुवुन बारीक चिरुन घ्या
४. नॉनस्टिक कढई किंवा पॅन मधे तेल तापलं कि जिरं / मोहरी घालून तडतडू द्या
५. चिरलेला कांदा / लसूण घालून परता. कांदा जरा मऊ झाला की भिजवलेली डाळ घाला. डाळ खाली लागू नये म्हणून डाळ भिजेल इतपतच पाणी घालून डाळ कोरडी होईस्तोवर शिजवा
६. डाळ शिजली की अनुक्रमे हळद, तिखट किंवा मसाला, गरम मसाला, मीठ आणि साखर घालून एक २-३ मि. परता. नंतर टोमॅटो घालून कडेने तेल सुटेस्तोवर परता
७. बारीक चिरलेली मेथी घाला. मेथी शिजली आणि कडेने परत तेल सुटायला लागलं की गॅस बंद करा. लिंबाचा रस घालून भाजी सारखी करा
८. गरमागरम आणि चविष्ट मसूर-मेथी पोळी, फुलका किंवा भाकरी बरोबर सर्व करा. स्पेशली भाकरी सोबत सायीचं दही आणि मिरच्यांचा ठेचा असेल तर अहाहा....
टीपा:
१. मेथी एवजी कांद्याची पात किंवा पालक घेऊ शकता कींवा मेथी-पालक, मेथी-कांद्याची पात काँम्बो पण छान लागतं. कांद्याची पात असेल तर मग वेगळा कांदा घालायची गरज नाही
२. मसूर-मूग डाळही एकत्र घेउ शकता
३. काही भाज्यांत तेल अंमळ जरा जास्त असलं तरचं मजा येते नाहीतर भाजी कोरडी लागते (असं माझं मत)
प्रतिक्रिया
3 Dec 2015 - 2:03 pm | जातवेद
एकदम वाटलं माईसाहेबांनी लिहीले आहे कि काय, परत वर जाऊन बघितले आणि हुश्श केले!
3 Dec 2015 - 5:58 pm | दिपक.कुवेत
कारण माईसाहेब नेहमी त्यांच्या "ह्यांच्या (च)" म्हणण्याला दूजोरा देतात!! आमचे हे असं म्हणत होते, आमचे हे तसं म्हणतात वगैरे...
4 Dec 2015 - 9:51 am | जातवेद
मग तर तुम्ही माईसाहेबांचे 'हे' आहात अशी शंका घ्यायला वाव आहे!
4 Dec 2015 - 1:24 pm | दिपक.कुवेत
"असं सीनीयर सीटीझन्स ना छळु नये रे बाळा. थांब आमच्या ह्यानांच सांगते तुझं नाव. चांगली खबर घेतील ते तुझी. मग माई माई मला वाचव करत येउ नकोस"
माई मोड ऑफ
4 Dec 2015 - 10:26 pm | जातवेद
हे शिनिअर लोक्स काय काय पदव्या देतील सांगता येत नाही.
- आजोबा (पदवीधारक) जातवेद
3 Dec 2015 - 2:04 pm | अजया
मेथी पाकृ हव्याच आहेत नव्या नव्या.
5 Dec 2015 - 9:20 am | नेहरिन
हि घ्या अजुन एक वेगळी पाक्रु
5 Dec 2015 - 1:14 pm | दिपक.कुवेत
हे सांडगे रेडिमेड मिळतात का? म्हणजे येताना एक पाकीट आणीन कारण आमच्या घरी काय करत नाहीत.
5 Dec 2015 - 11:10 pm | चिंतामणी
सांडगे रेडिमेड मिळतात.
5 Dec 2015 - 2:00 pm | अजया
छान आहे ही पाकृ पण.धन्यवाद.
3 Dec 2015 - 2:18 pm | अत्रुप्त आत्मा
दीपकबाबा पनिरवाले इन तरकारी!
3 Dec 2015 - 2:29 pm | पद्मावति
खूपच मस्तं पाककृती. आवडली.
मेथी आणि मसूर हे कॉंबिनेशन छानच वाटतंय.
3 Dec 2015 - 5:20 pm | अक्षया
मसुर आणि मेथी दोन्ही आवडते. नक्की करुन बघेन.
3 Dec 2015 - 6:13 pm | मितान
व्वा !
मी सेम प्रकार कांदापात वापरून करते. मेथी मिळाली की लगेच करणार ही भाजी !!
3 Dec 2015 - 6:21 pm | स न वि वि
मसुर्र्र्र्र … माझा वीक पोइण्ट ;-)
3 Dec 2015 - 6:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त ! तोंपासू !
आदल्या दिवशी भिजत टाकलेली अख्खी मसूर वापरूनही ही भाजी फक्कड लागेल असे वाटते.
3 Dec 2015 - 6:31 pm | स्रुजा
अरे वा ! मेथी काल च संपवली पण कांद्याची पात आहे घरात. करुन बघण्यात येईल. नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट !
3 Dec 2015 - 7:16 pm | कंजूस
चविष्ट लागणार यात शंकाच नाही.परंतू मार्केट यार्डातून मेथीच्या जुड्या आणल्या तर "तीन चार जुड्या"म्हणजे मसूर-मेथी-कहर होईल इतक्या मोठ्या असतात.अर्धीच पुरेल.ओंजळभर मेथी पाने एक वाटी मसुरासाठी हे प्रमाण ठीक वाटतंय दिपक.
4 Dec 2015 - 1:25 pm | दिपक.कुवेत
मेथी जुड्यांच प्रमाण हे आमच्या ईथे ज्या आकारमानात मीळतात त्यानुसार दिले आहे. तुम्ही ते तुमच्या अंदाजानुसार घ्या.
3 Dec 2015 - 7:17 pm | खटपट्या
करून बघीतल्या जाइल
3 Dec 2015 - 7:20 pm | पियुशा
+१ टू कंजूस काका ,३ चार जुड्या म्हणजे खुप वाटताहेत ,बाकी रेसेपी मस्त क्रुण पहानेत येईल :)
3 Dec 2015 - 8:02 pm | स्वाती दिनेश
छान दिसते आहे. मेथी मिळाली की करण्यात येईल,
स्वाती
3 Dec 2015 - 9:48 pm | पिशी अबोली
मेथीजुडी अर्धी वापरून आत्ताच केली. मेथी आवडते, मसूर फार खाल्ली जात नाही म्हणून लगेच करून टाकली. फक्त आळस नावाच्या जिवलग सख्याच्या आग्रहामुळे डाळ भिजवलेलं पाणी त्यात टाकून तीच भातासोबत ओरपण्याजोगी केलेली आहे.
तुमच्या सूचनांचे पालन शक्य तसे केल्याने चव माझ्या पाककौशल्याच्या ष्टयांडर्डपेक्षा काहीच्याकाही चांगली लागत आहे.
3 Dec 2015 - 9:54 pm | पैसा
खूप छान पाकृ!
3 Dec 2015 - 11:10 pm | इशा१२३
मस्त दिसतेय भाजि.करुन पाहिन.
4 Dec 2015 - 12:57 am | उगा काहितरीच
मेथीचा कुठलाही प्रकार आवडतो. पण आमच्या घरी मसुर दाळ आणत वा खात नाहीत. रच्याकने नैवेद्याला मसुर दाळ का चालत नाही ? याचे कारण माहीत आहे का कुणाला ?
-मेसमधे अख्खा मसुर आवडीने खाणारा !
4 Dec 2015 - 1:20 am | मीअपर्णा
मला कांद्याच्या पातीचं काय करायचं हा एक नेहमीचा प्रश्न असतो अदर दॅन फ्राईड राइस किंवा दलिया उपमाच्या फोडणीत खपवणे आणि पीपे भाज्या माझ्याच्याने होत नाहीत. आता एकदा मसूर-डाळ घालून पाहीन.
अॅज इज कृतीपण छान आहे.नेहमी मेथी मिळत नाही.
माझी आई मसूर डाळ घालून कारलं करते फक्त त्यात मला वाटतं टॉमेटो नसतो. मला ती यासाठी आवडते की मग प्रोटीनचा वेगळा विचार करावा लागत नाही. अतिशय मंद आच करून झाकणावर पाणी घालून शिजवणे ही तिची टीप आहे आणि बंद करायच्या आधी घरगुती गरम मसाला घालून ढवळून ठेऊन द्यायचं.
4 Dec 2015 - 1:26 pm | दिपक.कुवेत
मग मसूर-कारलं डिट्टेल पाकृ द्या की.....करुन बघीन एकदा.
6 Dec 2015 - 6:25 am | मीअपर्णा
आईची कृती हा अटकपूर्व जामिन होता भाऊ...आईच्या पाकृ कधी कुणी डिट्ट्लेवार लिहितं का? म्हंजे आईला तरी ते शक्य आहे का? असो. मला वाटत तुमचीच ओरिजिनल कृती लेस टोमॅटो आणि कारलं शिजायला वेळ लागतो म्हणून चकत्या कापून मिठातून पिळल्या की डाळ कारलं एकत्र शिजवावं. आणि त्या टिप्स आहेतच वरती.
4 Dec 2015 - 2:58 am | रेवती
आता मसूर डाळ आणली की करून पाहीन. तुमच्या पाकृचा फोटू छान आलाय.
4 Dec 2015 - 3:25 am | स्वाती२
छान पाकृ!
4 Dec 2015 - 10:40 am | सस्नेह
जरा जरा डाळ-मेथी सारखी वाटली. पण ही भाजी हिरवी नाही दिसत ?
4 Dec 2015 - 1:28 pm | दिपक.कुवेत
ओह लब्बाड बरोब्बर ओळखलसं..... मग आता सांग पाहू भाजीचा कलर. रच्याकने मला पण समजेल.
4 Dec 2015 - 11:09 am | अनंत छंदी
कालच केली होती.
4 Dec 2015 - 1:29 pm | दिपक.कुवेत
जरुर करा, खा आणि खिलवा....
4 Dec 2015 - 6:13 pm | अनिता ठाकूर
मसूर वेगळे, मसूर डाळ वेगळी. मसूर काळे असतात, मसूर डाळ केशरी असते. ही 'मसूर डाळ मेथी' अशी पा.कृ. दिसते आहे.
5 Dec 2015 - 1:17 pm | दिपक.कुवेत
तुम्ही खुलासा केला तेव्हा मला कळलं मसूर डाळ आणि आख्खा मसूर मधला फरक. खूप खूप धन्यवाद. अशीच मौलीक (?) माहिती देत जा (अधून मधून).
5 Dec 2015 - 1:46 am | कुंदन
तिक्डे तेलाची विहिर आहे का हो तुमची? किती ते तेल....
5 Dec 2015 - 1:20 pm | दिपक.कुवेत
एक दोन पाठवू का तूझ्याकडे?? (उंटावरुन)
5 Dec 2015 - 5:41 pm | कुंदन
कुवेतला आलो की तुमच्या कडे मेस लावणारे मी.
5 Dec 2015 - 9:13 am | कंजूस
मेथीच्या पानापानावर "भरपूर तेल ओतावं" असा वैधानिक इशारा लिहिलेला वाचला नाहीत का?पाण्यातल्या भाज्या पित्तकर असतात आणि कडूझारही होतात.
यात दोन प्रकार आहेत १) मेथा - पाने जाड आणि काळसर हिरवी ,फार कडू, २ ) कसुरी मेथी :- पाने कोमल फिकट हिरवी कमी कडू .दांडे फिकट पोपटी.हीच मेथी पराठा करण्यासाठी उत्तम. वाळवून अॅल्युमिनिअम फॅाइलच्या पिशवीत ( बिस्किटांना,चहापाउडरला येते तसली) ठेवल्यास स्वाद उत्तम राहतो.थोडे अवांतर झाले.
5 Dec 2015 - 1:23 pm | दिपक.कुवेत
आमच्याकडे पहिल्या प्रकारातीलच मेथी मीळते. पण मला स्वःताला आपल्याकडे ती अगदी बारीक मेथी मीळते ना ती खूप आवडते. बोंडं प्रकार छान होतो त्याचा. शीवाय वरच्या प्रकारानेही छान लागते.
5 Dec 2015 - 1:59 pm | कंजूस
तुझ्याकडच्या मेथीचा फोटो टाक.बहुतेक "सागर मेथी असावी" त्याच्या तीन चार जुड्या चालतील.मेथी दाणे वाळूत पेरतात.उगवून तीन चार ईंच उंच आणि दोनच पाने ,खाली लांब दांडी आणि पांढरी शुभ्र मुळे असतात.ही उपटून ( वाळूमुळे सहज निघते) पाण्यात हलवली की मुळांची वाळू लगेच सुटते.याच्या जुड्या विकायला येतात.जुडीची फक्त मुळांकडचा भाग कापून वापरतात.हीच वापरली आहे का?यालाही तेल फार लागते.
29 Dec 2015 - 3:44 pm | गोंडस बाळ
मला मेथीची भाजी खूप आवडते ..