उत्सर्जन

पालीचा खंडोबा १'s picture
पालीचा खंडोबा १ in जे न देखे रवी...
28 Nov 2015 - 2:02 pm

अंधारलाटा शरीरास
धडका देत असताना
गलितगात्र शरीर
वासनेचे किनारे
शोधायला लागते
वादळात भरकटल्या
नौकेसारखे.

वाळू चिकटलेले सारे
पाउलठसे मग
सारा किनारा रिता
करून
रस्ते वालुकामय करतात
अन्
गर्भगळीत समुद्र
बेवारशी खडकांना
धडका द्यायला लागतो.

जमीनीचा स्पर्श होताच
मस्यपुरुषाला पाय
फुटतात
अन्
काचवाटा तुडवत
काळे रस्ते लाल करत
तो
प्राक्तनाच्या ढगाआड लपल्या
वासनाचंद्राचे
माग काढायला लागतो.

उफाळलेल्या समुद्राची
गाज
रस्त्यारस्त्यावर आक्रोश
मांडून
काळोखथिजल्या हृदयाचा
थरकाप उडवत
विसर्जनाची तयारी सुरु करते.

काळनिद्रेत झोपल्या
काळाजांचे थरकाप उडवत
विजा कडाडू लागतात
सीमा सोडून समुद्र
जमिनीकडे धाव घेतो
निलाजरा.

अंधार दाटला रस्ता
खारट होवून
तहानेची हाव
उत्सर्जित करत असताना,
मावळत्या चंद साक्षीने
समुद्र माघार घेतो
अन्
फेस फेस होवून शरीर
विरघळते,
खवले खवले होवून चंद्र
धरणीवर कोसळतात.

विजयकुमार.........
१४.११.२००९, मुंबई

कविता

प्रतिक्रिया

दमामि's picture

28 Nov 2015 - 2:09 pm | दमामि

भन्नाट!

तुमच्या कवितांचा पंखा झालो आहे.:)

पालीचा खंडोबा १'s picture

28 Nov 2015 - 2:38 pm | पालीचा खंडोबा १

आपण सगळेच एकमेकांचे पंखे आहोत तरीही मनापासून आभार

शिव कन्या's picture

3 Dec 2015 - 7:25 pm | शिव कन्या

shhh !!!!! खंडोबा झाले म्हणून काय, एवढे खरे बोलायचे? :) :) :)

बाकी कविता उत्तम.

मांत्रिक's picture

28 Nov 2015 - 6:27 pm | मांत्रिक

भन्नाट!!!

पालीचा खंडोबा १'s picture

4 Dec 2015 - 11:16 am | पालीचा खंडोबा १

खरे बोलते म्हणून ती कविता. स्वप्नरंजन केले असते तर त्याचे फिल्मी गीत नाही का होणार