डोम्या म्हणे...

कौतुक शिरोडकर's picture
कौतुक शिरोडकर in जनातलं, मनातलं
24 Nov 2015 - 12:25 pm

माननीय लीलासूत श्री. भंसाली यांच्या ऐतिहासिक असहिष्णूतेचा वाढता गदारोळ पहाता, सिनेसृष्टीतील काही नामवंत कलाकार, त्यांनी महत्प्रयासाने कमवलेले पुरस्कार परत करण्याच्या तयारीत आहेत याची उडती बातमी कळताच डोम्याने चोच टवकारली. येणार्‍या जाणार्‍या कोळीणीच्या पाट्या न्याहाळत बसलेल्या कावळ्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकून त्याने ताबडतोब उडत उडत अभिनयाचे बादशाहा श्री. शाहरुख खान यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळेस किंगखान जवळ-जवळ शेजारी बसलेल्या त्यांच्या फार जवळच्या मित्राशी चर्चा करत होते. डोम्याला ते दर्शनी भांडणं वाटलं. पण ती चर्चाच होती असं दोघांनी छातीठोकपणे (एकमेकांची छाती ठोकून) सांगितलं. विषय काजोल आणि दिलवालेचा होता बहुधा. 'ते टायटल आणि ती जोडी' आपला कॉपीराईट आहे असे जवळ-जवळ शेजारी बसलेल्या मित्राचे म्हणणे होते. कारण गेली कित्येक वर्षे मराठामंदिरच्या रिकाम्या हॉलचे भाडे ते भरत आहेत. रोहित शेट्टी जवळ-जवळ जवळचा मित्र नसल्याने तो सिनेमा किंगखानने करायला नको होता असा युक्तिवाद होता. यावर बादशहाचे म्हणणे होते कि काही सिनेमे जवळ-जवळ हिट असलेल्या दिग्दर्शकांबरोबर सुद्धा करावे लागतात. त्यामुळे जवळकीचा एका नवीन फ्लेवर मिळतक, शिवाय 'कार'किर्दीत फरक पडतो. असो. मुद्धा तो नव्हता. मुद्दा लीलासुतांचा होता. ‘पुपदे’ बद्दल (पुरस्कार परत देणे) किंगखान यांचे मत विचारले असता ते म्हणाले कि असहिष्णुता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो सर्वप्रथम त्यांनीच मांडलेला असल्याने त्यावर बोलण्याचा आणि ‘पुपदे’चा पहिला अधिकार त्यांचाच आहे. देवदासमधील ‘डोला’ या गाण्यात ‘डोले’ दाखवण्याची संधी लीलासूताने दिली नाही. शिवाय दोन दोन हिरोइन्स असून एकही पदरात (ते ‘धोतराच्या पदरात’ म्हणाले होते. पण सेंसरशीपमुळे धोतर काढण्यात आलं आहे हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलं असेलंच.) पडली नाही. लीलासूताच्या त्या असहिष्णूतेमुळे ते पुरस्कार परत करणार आहेत. किंगखानच्या या भुमिकेवर जवळच्या मित्राने त्यांना जवळजवळ मिठीच मारली. त्यात ते दोघेही खाली कोसळले. पुढचं पहायला डोम्या थांबला नाही.

या 'पुपदे' मुळे एक नवा 'पिन्गा' सिनेक्षेत्रात सुरु व्हायलाच हवा हे डोम्याला एक पत्रकार म्हणून जाणवलं. ‘पुपदे’ (पुरस्कार परत देणे) चा पहिला मानकरी सापडल्यानंतर डोम्या उडत उडत अभिनयाचे शहेनशहा श्री. अमिताभ बच्चन यांच्याकडे गेला. ते त्यावेळेस स्टार च्या मालकाशी चर्चा करत होते. “आज कि रात है जिंदगी’ हे शोचं नाव बदलावे असा त्यांचा आग्रह होता, अन्यथा शो सोडून देईन अशी नम्र धमकी त्यांनी दिली. या नावामुळे “उद्या ते गचकणार आहेत का ?” अशा आशयाचे (खवचट) ट्वीट त्यांचे अनुयायी (फोलोव्हर्स) करत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. यावर “करत नाही जॉ” असं काहीतरी स्टारकर वदले. त्यावर त्यांनी ‘प्लीज करा ना.. ” असा प्रेमळ आग्रह सुरु केला.
“नकारात्मक शीर्षकामुळे शो डब्यात जाऊ शकतो. शिवाय मला बरीच वर्षे जगायचं आहे. घर माझ्या एकट्याच्याच कमाईवर चालते. मुलगा सून काहीच कमावत नाही. नात लहान आहे. बायको तर घरीच बसून आहे. इतक्या जबाबदा-या आहेत. प्लीज काहीतरी करा.” अशी खाजगी स्पष्टीकरणे द्यायला त्यांनी सुरुवात केली. तेव्हा डोम्याने मधेच चोच खुपसून त्यांना सांगितले कि भन्सालीच्या असहिष्णुतेमुळे किंगखान पद्मश्री परत करत आहेत. यावर “ त्यांच मत काय आहे ?” असं विचारातच शहेनशहा संतापले.
‘मी सिनियर आहे. पहिला हक्क माझाच आहे. मी ‘पुपदे’णार. प्रत्येक ठिकाणी नंबर वन होण्याचा हव्यास वाईट.” यावर डोम्याने “का ?” असं नम्रपणे (साळसूदपणे नव्हे !) विचारलं.
"‘ब्ल्याक’ सिनेमात लीलासूताने एकदाही “हांय” करण्याची संधी मला दिली गेली नाही. एखाद्या कलाकाराला त्याची ‘सिग्नेचर मूव्ह’ वा ‘तकिया कलाम” वापरू न देणे हा त्या कलाकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मुलभूत अधिकारावरील हल्ला आहे. ह्या असहीष्णूतेविरुद्ध आवाज उठवायलाच हवा.” असं ते मळमळीने (‘तळमळीने’ किंवा ‘कळकळीने’ असे वाचावयासही हरकत नाही.) म्हणाले.
“मग तुम्ही कोणता पुरस्कार परत करताय ?” डोम्याने त्याना हे विचारताच ते विचारात पडले.
“इतके पुरस्कार आहेत कि नेमका कोणता देऊ तेच कळत नाही.” त्यांच्या या अडचणीवर डोम्याने त्यांना एका सल्ला दिला. त्यावर ते चटकन “हांय” म्हणत खुर्चीत उसळले. डोम्या उडाला तोवर त्यांनी सगळे पुरस्कार दिवाणखान्यात मांडले आणि सध्या ते किचनमधून रिंग फेकत आहेत. ज्या पुरस्कारावर रिंग पडेल तो पुरस्कार ते परत करणार आहेत. अजून रिंगेत एकही पुरस्कार अडकलेला नाही अशी ऐकीव माहिती आहे.

डोम्याने मोर्चा दंगल ग्रस्त आमिरखान कडे वळवला. शुटींगमध्ये जखमी झाल्याने त्यांचे काही अवयव ब्यांडेजमध्ये बांधण्यात आले होते. डोम्याने कावळकीच्या (माणुसकीसारखं) नात्याने त्यांची चौकशी केली आणि येण्याचे प्रयोजन सांगितले. त्यांनी एक पॉज घेतला. विचार केला.
“श्या ! “ प्रतिक्रिया देऊन तो गप्प झाला. विचाराल्याशिवाय तो बोलणार नाही हे माहित असल्याने डोम्याने या प्रतिक्रियेच कारण विचारलं.
“मी एवार्ड फंक्शनला जात नाही याचा मला आज पश्चाताप होतोय.”
“पण सरकारी एवार्ड आहेत तुमच्याकडे.” डोम्याने आठवण करून दिली.
“पण हा म्याटर फिल्मी आहे ना ? तिथे सरकारी एवार्ड देऊन कसं चालेल ? नॉट लॉजिकल.” कुणीतरी लॉजिकल विचार करतोय याचा डोम्याला आनंद झाला.
“सर, फ़िल्मफ़ेअर आहेत ना ? “ डोम्याने पुन्हा चोच खुपसली.
“ते देऊ शकतो ? लेट मी आस्क किरण.” किरण म्हणताना ते अडखळले नाही. ‘हिला विचारून सांगतो” किंवा "आमची ही म्हणते तेच खरं" या सर्वमान्य जमातीत त्यांचा समावेश झालेला पाहून डोम्याचे डोळे पाणावले आणि तसाच तो सलमानकडे उडाला.

सलमान सुलतानच्या सेटवर सुटलेल्या पोटाचे फोटोशॉप करण्यात बिजी होते. त्यांना ‘पुपदे’ अभियानात सहभागी होण्याबद्दल विचारलं तर त्याने हाताच्या मुठी वळल्या.
"ये क्या होता है ?"
"किंगखान अपना पद्मश्री पुरस्कार सरकार को वापस दे रहे है | आपके पास पद्मश्री है सर ? "
" मेरे पास राजश्री है |" सलमान दिवारमधल्या शशीस्टाईलमधे बोलला.
"भन्सालीजीकी असहिष्णूता पर आप कुछ कहना चाहेंगे ?"
“उस भन्साली की तो मै.... उसीने पनवती लगाई थी | ऐश मेरे बदले अजय को दी थी | बाजीराव का साईनिंग मुझे दिया और लिया रणबीर को | उसको तो मै छोडूंगा नही | बिग बॉस चाहते है कि उसे डबल नही चौबल ट्रबल हो........” त्याने रागाने दोन्ही हात पुढे करताच, डोम्याने मान मागे घेतली आणि तिथून उडण्याचा शहाणपणा दाखवला. मध्ये सैफच घर होतं, पण तो खिजगणतीत नसल्याने डोम्या पुढे सरकला.

एखाद्या मराठी कलाकारानेही पद्मश्री परत करून या अभियानात सहभागी व्हावे असा एका क्रांतिकारी विचार तेवढ्यात डोम्याच्या डोक्यात येताच त्याने कावळ्याकडे मोर्चा वळवला. कावळा नेहमीप्रमाणे कोळणीच्या पाटीतून वरचेवर उचलून आणलेल्या बोंबलात बिजी होता.
“ काय रे, कुठल्या मराठी कलाकाराकडे पद्मश्री आहे ?”
“विजय कदम” त्याने क्षणाचा विचार न करता उत्तर दिलं. कावळ्याचं जनरल क्नोलेज पाहून डोम्याच मन भरून आलं. त्याला ‘धन्यवाद’ न बोलताच डोम्याने मोर्चा विजय कदम यांच्याकडे वळवला. ते “ विच्छा माझी पुरी करा “ चा कोणता नवा रेकॉर्ड करता येईल या विचारात दंग होते.
“सर, पुपदे अभियान जोरात सुरु आहे. तुम्ही तुमची पद्मश्री कधी परत करताय ?” गेल्या गेल्या डोम्याने मुद्द्याला हात घातला आणि त्यांनी चपलेला. त्यांनी फेकलेली चप्पल चुकवून डोम्या उडाला ते थेट तारेवर. कावळा अजून बोंबील ओढत होता.
“भेटले कदम ?”
“भेटले आणि पेटले पण. पत्रकारांचा सन्मान करायचं सौजन्य नाही या कलाकारांकडे. मी इतकंच म्हटलं कि पद्मश्री कधी परत करताय तर चप्पल मारली फेकून.” डोम्याने आंखोदेखा आणि खुदपे बिता हाल सांगितला.
“पद्मश्री त्यांच्या बायकोचं नाव आहे.” कावळ्याने डोम्याकडे न पहाता बोम्बिलाचा आणखी एक तुकडा ओढला आणि डोम्या चोच चावून कावळ्यावर राग काढावा कि आपल्या अज्ञानावर रडावं या विचारात पडला.

डोम्या म्हणे...

विनोद

प्रतिक्रिया

पैसा's picture

24 Nov 2015 - 7:06 pm | पैसा

धमाल आहे!!

आतिवास's picture

24 Nov 2015 - 7:11 pm | आतिवास

चांगलं आहे.
चुकून कविता विभागात प्रकाशित झालेलं दिसतं आहे.

दमामि's picture

24 Nov 2015 - 8:04 pm | दमामि

:):):)

दमामि's picture

24 Nov 2015 - 8:06 pm | दमामि

तंबी दुराईची आठवण आली.

खेडूत's picture

24 Nov 2015 - 8:34 pm | खेडूत

हे हे हे...
भारीय! :)

सस्नेह's picture

24 Nov 2015 - 8:49 pm | सस्नेह

धमाल लेख !

मी-सौरभ's picture

24 Nov 2015 - 9:20 pm | मी-सौरभ

मस्त जमवलय :)

अत्रुप्त आत्मा's picture

24 Nov 2015 - 9:26 pm | अत्रुप्त आत्मा

ह्या ह्या ह्या!!! जब्री हाय. वस्तप शेअर दिऊ का?

मित्रहो's picture

24 Nov 2015 - 9:49 pm | मित्रहो

भारी लेख

स्वाती दिनेश's picture

24 Nov 2015 - 9:58 pm | स्वाती दिनेश

मस्त!
स्वाती

विशाल कुलकर्णी's picture

24 Nov 2015 - 10:46 pm | विशाल कुलकर्णी

जियो दोस्त..., मझा आला !
साल्या किती दिवसांनी लिहितोयस लेका..

एस's picture

24 Nov 2015 - 10:57 pm | एस

भारीये! :-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Nov 2015 - 10:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =))

शब्दबम्बाळ's picture

24 Nov 2015 - 11:48 pm | शब्दबम्बाळ

झक्कास! बर्याच दिवसांनी मस्त मजेशीर वाचायला मिळाल! :))

मुक्त विहारि's picture

25 Nov 2015 - 9:16 am | मुक्त विहारि

एकदम खूसखूशीत लेख...

नाखु's picture

25 Nov 2015 - 9:26 am | नाखु

"शिरोडकरा कौतुक रे तुझे, चांगले लिहितोस रे बाळा जरा डोम्याला म्हणाव मिपाकडेही बघत जा असे आम्चे हे म्हणत होते"

मामो ऑफ..

स्वगतः चटपटीत गजाल

अरे व्वा ! खूप दिवसांनी आलात ! छान वाटलं.

लेख भन्नाटच !

प्रीत-मोहर's picture

25 Nov 2015 - 9:45 am | प्रीत-मोहर

सुप्पर!!!!!

बोका-ए-आझम's picture

25 Nov 2015 - 11:33 am | बोका-ए-आझम

.

रातराणी's picture

25 Nov 2015 - 11:43 am | रातराणी

ही ही ही!

जातवेद's picture

25 Nov 2015 - 12:47 pm | जातवेद

मजा आली!
तुम्ही नाथमाधव वाचता का?

जेपी's picture

25 Nov 2015 - 1:14 pm | जेपी

आवडल..

अजया's picture

25 Nov 2015 - 2:00 pm | अजया

धमाल लिहिलंय.आवडलं.

असंका's picture

25 Nov 2015 - 2:32 pm | असंका

एकदमच भारी!!

धन्यवाद!!

बबन ताम्बे's picture

25 Nov 2015 - 2:36 pm | बबन ताम्बे

खूप छान !! मजा आली वाचताना.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Nov 2015 - 2:59 pm | कैलासवासी सोन्याबापु

शिरोड़करांचे कौतुक बऱ्याच जुन्याजाणत्या मित्रांकडून ऐकले होते आज प्रचिती आली! :D

विशाल कुलकर्णी's picture

25 Nov 2015 - 4:30 pm | विशाल कुलकर्णी

बापू, ते गुरुजी आहेत आमचे !
एक हां नमूना आणि दुसरं ते निंबाळकराचं ध्यान... :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Nov 2015 - 11:47 am | कैलासवासी सोन्याबापु

____/\____

ते चाफ्या एक कुठं उलथलय देव जाणे!

- (गुर्जींचा ईद्यार्थी) सोकाजी

रेवती's picture

25 Nov 2015 - 9:22 pm | रेवती

मनोरंजक लेख. आवडला.

अंतु बर्वा's picture

25 Nov 2015 - 10:03 pm | अंतु बर्वा

सुपरलाईक!!

राही's picture

26 Nov 2015 - 10:22 am | राही

इतके निर्विष विनोदी लेखन आजकाल दुर्मीळ झाले आहे. जयवंत दळवींचा भास झाला काही ठिकाणी.
एक सुंदर लेख वाचायला मिळाला. धन्यवाद.

vishal jawale's picture

26 Nov 2015 - 4:51 pm | vishal jawale

खुप दिवसांनी मस्त विनोदी लेख वाचायला मिळाला. :) :) :D

नाव आडनाव's picture

26 Nov 2015 - 5:58 pm | नाव आडनाव

जोरदार लिवलंय :)

नया है वह's picture

26 Nov 2015 - 6:29 pm | नया है वह

लेख आवडला!

सुज्ञ's picture

27 Nov 2015 - 3:55 am | सुज्ञ

कौतुकाने लिहिलंय सगळं