दिवस तिसरा आणि चौथा-अमृतसर, मनाली, लेह,कारगिल,श्रीनगर, जम्मू.

सतिश पाटील's picture
सतिश पाटील in भटकंती
7 Oct 2015 - 8:51 pm

पूर्वतयारी आणि दिवस पहिला - अमृतसर, मनाली, लेह,कारगिल,श्रीनगर, जम्मू.

दिवस दुसरा -अमृतसर, मनाली, लेह,कारगिल,श्रीनगर, जम्मू.

दिवस तिसरा
पहाटे पहाटेच जुलीने मला उठवले, मी ही कोणतेही आढेवेढे न घेता उठून बसलो, बाहेर तसा अजून अंधारच होता, आम्ही आमचे सामान गोळा करायला घेतले, हळू हळू झुंजू मुंजू व्हायला लागले तसे खिडकीतून पंजाबची हिरवीगार शेती दिसायला लागली,
७ वाजता गाडी अमृतसर स्टेशन ला लागली आणि आम्ही आमचे सामान खाली उतरवून आधी माल डब्ब्यापाशी गाड्या घेण्यासाठी गेलो तर रेल्वे च्या एका माणसाने सांगितले कि अजून २ तासाने गाड्या मिळतील, तो पर्यंत बाबाला आम्ही रिक्षात बसवून सामानासकट हॉटेल ला पाठवून दिले.
..

स्टेशन वर रिक्षावाल्याशी घासाघीस करताना

मालडब्बा प्ल्याटफॉर्म च्या बाहेर होता. म्हणून जुली आणि मी तिथेच उभ राहून कुतूहलाने पाहत होतो कि आता हे गाड्या खाली कशा उतरवणार, तेवढ्यात २ हमाल ते गाड्या काढण्यासाठी आले, जमिनीपासून डब्याच्या दरवाज्याची ती उंची साधारण ४ फुट असेल, एक हमाल डब्यात आणि एक खाली उभा होता, त्याने माझी आर्धी गाडी डब्याच्या बाहेर काढली आणि दुसरा हमाल जणू काही खाली क्याच पकडायलाच उभा होता, आम्ही तडक त्याच्या मदतीला गेलो आणि दोन्ही गाड्या खाली उतरवल्या, आम्ही नसतो तर त्याने गाड्या खाली टाकल्याच होत्या, ट्रेन मध्ये गाड्यांचे नुकसान का होते याचे एक कारण आम्हाला कळाले होते. ९.३० वाजता गाड्या घ्यायला या असे त्या रेल्वे च्या कर्मचार्याने सांगितल्यामुळे आम्ही देखील मग हॉटेल कडे रवाना झालो.

आज १५ ऑगस्ट त्यात हे अमृतसर म्हणजे देशप्रेमाला उफाळे आले असतील, जिकडे तिकडे देशावरची गाणी वगैरे लावून झेडावंदन वेगैरे करत असतील असा आमचा एक सहज आणि माफक अपेक्षित समज होता.

परंतु रिक्षात बसून हॉटेलकडे जाताना असे काहीच दिसले नाही, " अरे अजून ८ पण वाजले नाहीत थोड्या वेळाने दिसेल आपल्याला" असे जुली मला आणि पर्यायाने स्वतःला समजावत होता.

हॉटेल बर्यापैकी होते, एसी आणि वायफाय असल्याने मज्जाच होती. अंघोळ वगैरे करून झाल्यावर आम्ही नाश्ता करण्यासाठी बाजूलाच असलेल्या st डेपोजवळ निघालो, तर तेवढ्यात बाबा फेस्वाश लावायला बाथरूम मध्ये गेला. अंघोळ करून १० मिनिट झाले नाहीत तर तुला लगेच फेस्वाश का लागतो रे म्हणून मी त्याला १-२ डझन शिव्या घातल्या. एखादी हेरोइन सुद्धा स्वतःच्या चेहर्याची काळजी घेत नसेल तेवढी हा बाबा घ्यायचा. त्याला तशी सवयच होती. ( एकदा महाबळेश्वर वरून रायगड किल्ल्याकडे गेलो होतो, तेव्हा त्या उन्हाळ्यात पाणी पाणी करून आमचे फार हाल झाले होते, एके ठिकाणी थांबलो असता, तहान लागली म्हणून आम्ही दोघे तिघे गाडी मध्ये पाण्याची बाटली शोधत होतो तर आम्हाला ती मिळेना, अर्धी बाटलीच पाणी उरले होते ते आम्ही शोधत असताना थोडे दूर एका झाडाखाली बाबा बाकीच्या मित्रांच्या शिव्या खाताना दिसला, जाऊन पाहोत तर हा बाबा त्या पिण्याच्या पाण्याने फेस्वाश लावून तोंड धुवत होता. त्याला विचारले तर हा म्हणतो अरे तोंडावर फारच धूळ बसली होती, चेहरा फारच चिकट झाला होता आणि मला फार अन कम्फर्टेबल वाटत होते अस तो सांगायला लागला, हे उत्तर ऐकून तो बाबा विरुद्ध आम्ही असा हाणामारीचा प्रसंगच आला होता.) असो... किंवा नसो....

हॉटेलात जावून मस्तपैकी मक्खन लावलेले पराठे आणि झकासपैकी लस्सी प्यायलो. अशी लस्सी मी आयुष्यात पहिल्यांदाच पिलो होतो, आपल्या शहरात मिळणारी ती घट्ट लस्सी हीच खरी लस्सी असते अस माझा समज होता. लस्सी घट्ट करण्यासाठी त्यात आपल्याकडे टिशू पेपर टाकत असे ऐकले होते.
परंतु लस्सी म्हणजे काय हे त्यादिवशी मला कळाले.

त्यानंतर आम्ही कूच केले ते रेल्वे स्टेशन कडे, आमच्या गाड्या आमची वाटच पाहत उभ्या होत्या,
एक रुपायचीही लाच न देता आम्ही गाड्या सोडवल्या. स्टेशन पासून ९०० मीटर अंतरापर्यंत आम्ही गाड्या ढकलत पेट्रोल पम्पापार्यंत घेऊन गेलो. घामाने अक्षरशः न्हाऊन निघालो होतो, एवढी गर्मी इथे असेल याची आम्ही कल्पनाच केली न्हवती. पेट्रोल पंपावर गेल्यावर आमची अवस्था पाहून तिथल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला त्यांच्या एसी ऑफिस मध्ये नेवून बसवले, थंडगार पाणी प्यायला दिले, त्यांचे आदरातिथ्य अगदीच वाखाणण्याजोगे होते. त्यांना धन्यवाद वेगैरे करून आम्ही पुढे निघालो.

पुढचा प्लान होता तो आधी जालियानवाला बाग, नंतर वाघा बोर्डर आणि संध्याकाळी सुवर्ण मंदिर.
सुवर्णमंदिर ते जालियानवाला बाघ हे अंतर तसे अगदी जवळच होते. मंदिराच्या पार्किंग मध्ये गाड्या पार्क करून आम्ही बाहेर येतो तेच, आजूबाजूला शास्त्रांची दुकाने दिसू लागली, सहज फेरफटका मारुया म्हणून पटकन एक दुकानात शिरलो, प्रशस्त असे दुकान आणि त्यात नाना तर्हेचे तलवारींचे प्रकार पाहून हरखूनच गेलो. एक काळ्या रंगाची ४ किलो वजनाची गन मेटलची तलवार पसंत केली, कुरिअर ने घरी मागवली.

..

..

..

जालियानवाला बागेत शिरलो तेव्हा त्यावेळी घडलेला प्रसंग डोळ्यापुढे उभा राहिला, एक एक गोष्ट पाहताना अंगावर रोमांच उभे राहत होते, तिथे धारातीर्थी पडलेल्या शहिदांना वंदन करून आम्ही वाघा बोर्डरकडे कूच केले.

शहराच्या बाहेर पडताच पुन्हा हिरवी गार शेते दिसू लागली, सोबतीला आर्मीचे क्यांप जागोगाजी होते. रस्ता तसा चांगला होता आणि त्या रस्त्यावरचे पुढचे मुख्य शहर होते लाहोर. पाकिस्तानात.
बाजूने आपल्या गावाकडे जसे वडाप असतात तसे गाड्या भरून लोक जाताना दिसत होते. हे नक्कीच वाघा बोर्डर ला निघाले असतील हे आम्ही हेरले. आणि गाड्या दामटल्या.

..

जसजसे वाघा जवळ येऊ लागले तसे गर्दी वाढू लागली, गर्दीतून वाट काढता काढता, कानावर आवाज पडला " भाऊ जय महाराष्ट्र " वळून पहिले तर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका जवानाने हात उंचावले, मराठी नंबर प्लेटचा परिणाम, "जय हिंद भाऊ जय महाराष्ट्र " असे म्हणून मीही त्याला प्रतिसाद दिला.
वाघा बोर्डर च्या २ किमी आधी आमच्या गाड्यांना पार्किंग मिळाली आणि आसपास पाहू लागलो तर बोर्डर च्या दिशेने २ किमी लांबीच्या कमीतकमी ६ रांगा लोकांनी लावल्या होत्या.
सगळीकडे अक्षरशः जत्राच लागली होती. कमीतकमी २० -२५ हजार लोक तरी असतीलच.
आपल्या नशिबात काही वाघा बोर्डर नाही असे वाटू लागले. एवढ्या लोकांची व्यवस्था तिथे होईल हे शक्यच न्हव्ते, तरी सुद्धा आम्ही गर्दी मध्ये शिरून त्या गर्दीचा एक भाग झालो,

..

..
एका पोलिसाला लिफ्ट देताना मी

प्रचंड उष्णता, अंगावरून घामाच्या धारा, नुसती गर्दी आणि धक्काबुक्की, यातच आमचा एक तास गेला, रांग पुढे पुढे सरकली तसे फलकावर वाचले, वाघा बोर्डर १ किमी. आर्मिवाल्यांनी मग लहान मुले , आणि महिलांना पुढे यायला सांगत होते, म्हणजे नक्कीच त्या मैदानाची क्षमता संपत आली होती आणि आम्हाला तिथून हुसकावून लावले जाणार हे समजले. अचानक धक्का बुक्की वाढली, प्रचंड रेटारेटी सुरु झाली, सहज मागे वळून पाहिले तर माझ्या मागचा एक भैय्या, बंद पडलेली गाडी जशी दोन हाताने जोर लावून ढकलतात, त्या प्रमाणे मला ढकलत होता, मग तसाच पूर्ण मागे वळलो, एका हाताने त्या भैयाचे ते कळकट, चिकट झालेले केस पकडले आणि दुसर्या हाताने कानामागे खणखणीत आवाज काढला, तसा तो भैया गयावया करायला लागला, " अरे हम कुछ नाही किये, पिचे से धक्का दे राहे है."

त्याला शिव्या शाप दिल्या तसे अजून एक भैय्या त्याच्या जोडीला येउन त्याची बाजू घ्यायला लागला, मग दोघांचा आवाज वाढला, मग परत एका हाताने या वेळी त्याच्या केसाऐवजी क्वालर धरली आणि दुसरा आवाज काढला, मग तिसरा काढला, मग ते दोघे भैय्ये माफी मागू लागले, " यु पी बिहार से इधर मुंबई मी आके आवाज नाही करनेका, नाही तो ऐसेच कान के नीचे आवाज निकलेगा" आपला नेहमीचे तोंडात बसलेले वाक्य फेकले तसे एक पंजाबी पोराने आठवण करून दिली, "ओय पाजी, अमृतसर है जी ये," . मी म्हटले "हा वहीच ".

तिथे गेल्यावर आजिबात भांडण मारामारी करायची नाही अश्या घेतलेल्या शपथेला मी पहिल्याच दिवशी तिलांजली दिली होती.

शेवटी जे नको होते तेच झाले, आम्हा सगळ्यांना त्या सेनापोलीसांनी घरी जाण्यास सांगितले, पार हताश झालो, आम्ही आधीची चंडीगड ची तिकिटे क्यान्सल करून तारखांची जुळवाजुळव करून , प्लान चेंज करून ज्यासाठी अमृतसरला आलो, तेच आज नशिबात न्हवते,
पुन्हा त्या भैयाला शोधू लागलो.

उदास होऊन पुन्हा हॉटेलला आलो, चहा वेगैरे पिउन जर फ्रेश झालो आणि ठरल्याप्रमाणे सुवर्णमंदिर कडे निघालो. मंदिरात शिरताच, सगळा शीण नाहीसा झाला, पायाखाली थंडगार संगमरवरी लादी, डोळ्यासमोर शांतपणे दिव्यांच्या रंगांशी खेळणारा तो सरोवर, प्रसन्न दिव्यांची रोषणाई, शिस्तीत जाणारे येणारे भक्त, कानावर ऐकू येणारे पंजाबी भाषेतले भजन, मन अगदी तल्लीन झाले.

..

..

..

..
फोटो काढताना हा रक्षक अचानक फ्रेम मध्ये आला

..

मंदिरातून बाहेर येउन मग जेवणाची सोय पाहायला निघालो तर रात्री १०.३० वाजता ९०% अमृतसर बंद झाले होते, नशिबाने एका ठिकाणी खाण्याची व्यवस्था झाली, जेवण मात्र अगदीच टुकार होते. कसे बसे पोटात ढकलले, आणि हॉटेलकडे निघालो. सामानाची बांधाबांध करून झोपायलाच १ वाजलं.

वेळेचे गणित पाहून अमृतसर ते मनाली या ४०० किमी साठी किमान १५ तास लागतील असा हिशोब धरला होता आणि त्यासाठी सकाळी ४.३० वाजता हॉटेल सोडायचे ठरले होते. मी आणि जुलीने सकाळी ३.५० चा गजर लावून झोपी गेलो.

दिवस चौथा
सकाळी जुली मला उठवत होता अरे उठ अरे उठ, उठून पाहतो तर घड्याळात ७.३० वाजले होते. बोंबला.
का कुणास ठावूक पण त्या दिवशी माझा आणि जुलीच्या दोघांच्या मोबाईलच्या गजराने दगा दिला होता. वाजलाच नाही.
आवरावर करून निघायला ९.१५ झाले. त्या ब्यागा बंजी कॉर्ड ने गाडीला बांधायलाच १ तास गेला. सगळे अलंकार नेसून झाल्यावर आम्ही जर विचित्रच दिसायला लागलो, येणारे जाणारे लोक आमच्याकडे वळून वळून पाहायला लागले. एक गल्लीच्या कोपर्यात २-४ लहान कार्टी आमच्याकडे पाहून हसत टाळ्या वाजवत होती.

..

..

पहिल्याच दिवशी आम्हाला तब्बल ५ तास उशीर झाला. सगळ्या ब्यागा गाडीला बांधून निघणारच तेवढ्यात बाबा गायब.

१० मिनिटांनी फेस्वाश ने तोंड धुवूनच आला . कुठे गेलेलास विचारले तर त्याने उत्तर दिलेच नाही.
गाडीवर टांग मारून शहराच्या बाहेर निघालो, सुरुवातीलाच रस्ता थोडासा चुकलो आणि ५० किमी चा वळसा पडला, नकाश्यात पाहिल्याप्रमाणे सुरुवातीचे फक्त १०० किमी रस्ता हा सपाट मैदानी भागावर होता, आणि नंतर ३०० किमी हा पूर्ण घाटच. म्हणजे पटापट अंतर कापण्यासाठी आम्हला फक्त सुरुवातीचे १०० किमी रस्ता होता, गाड्या पळवल्या, वाटेत होशियारपुर मध्ये धाब्यावर जेवण केले. फारच अप्रतिम जेवण.
..

हिमाचल चा घाट सुरु झाला आणि गाड्यांचा स्पीड कमी झाला. वळणावर माझी गाडी झुलायला लागली.मग वाटेत गाड्या थांबवून माझ्यागाडीवर एकावर एक चुकीच्या पद्धतीने रचलेले ओझे जुलीच्या गाडीवर टाकले आणि जुलीच्या गाडीवरच्या बाबाला माझ्या गाडीवर बसवले.

..

..

..
जसजशी वळणे वाढू लागली तशी सुरु, पाईन आणि देवदार ची ती ओळखीची झाडे दिसू लागली. थंडगार वाऱ्याने उन्हाच्या झळा कमी केल्या, मजल दरमजल करीत आम्ही लवकरात लवकर जास्तीत जास्त अंतर कापायचा प्रयत्न करीत होतो,

..

..

..

..

..

.

.
हळहळू अंधार पडायला लागला आणि गाड्यांचा वेग कमी झाला. आजूबाजूला केवळ जंगल आणि अंधार, क्वचित एखादी समोरून येणारी गाडी,अंधार पडल्यावर समोरून येणाया ४ चाकी गाड्या आणि मुख्यत्वे ट्रकचा फार त्रास व्हायला लागला. एकेरी वाहतूक आणि आणि त्यांच्या प्रखर दिव्यांमुळे डोळे दिपायला लागले, अप्पर दिप्पर चा इशारा देऊनसुद्धा त्यांना काही फरक पडत न्हवता, ते आम्हाला दाबत होते.आम्ही आमच्या गाड्यांचे दिव्यांचे बल्ब आणि जुलीने तर एक्स्ट्रा फोकस लावून घेतले होते, त्यांचा प्रकाश एकदम ट्यूबलायीट सारखा लक्ख आणि दूरवर पडत होता, तरी सुद्धा त्या ट्रक वाल्यांच्या दृष्टीने आम्ही टिनपाट दुचाकीवालेच.
मग आम्ही एक आयडिया केली.
दोन्ही बायीक आम्ही रस्त्यावर समांतर चालवल्या लागलो. तेव्हा समोरून येणाऱ्या त्या ट्रक ला आम्ही देखील ४ चाकीच वाटू लागलो. हा उपाय कामी आला.

.
एका अरुंद वळणावर मला एक कुत्र्याचे पिल्लू मरून पडलेले दिसले, त्याचा गळा कापला होता, आणि त्यातून रक्त येत होते, अगदी ताजे रक्त दिसत होते, कुत्र्याचा गळा कोण कापेल असा विचार करत होतो तेच पुढच्याच वळणावर मला भर रस्त्यात ७-८ लांडग्यांची टोळी दिसली. एक बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूला खडा पहाड आणि समोर हे लांडगे. अगदी बायीक च्या पुढच्याच चाकासमोर २ फुटांवर ती ग्यांग उभी. अचानक झालेल्या या वन्य प्राण्यांच्या दर्शनाने मी तर हबकूनच गेलो, आणि दुसर्याच क्षणी भानावर आलो, दोन्ही बाजूने आम्ही त्या लांडग्यान पासून घेरलो गेलो होतो,
( एका बाजूला पहाड आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी, जिथून पळून जाणे केवळ अशक्य होते,त्यामुळे २ बाजू या प्रसंगातून वजा केल्या आहेत )

हळूच मग त्या ७-८ लांडग्यांच्या मधून रस्ता काढला, एका हाताने सहज त्यांचा कान खेचू शकत होतो इतक्या जवळ, खाली पाय ठेवला तर त्यांच्या पायावर पडेल का इतकी काळजी घ्यावी लागत होती इतका जवळ ते लांडगे होते आणि आम्ही त्यांच्या मधून वाट काढत निघून गेलो.
वरील संपूर्ण घटना घडण्यास १ मिनितापेक्षाही कमी वेळ लागला होता ,त्यामुळे हृदयाला धडधडायला सुद्धा पुरेसा वेळ मिळाला न्हवता,

थोडेसे पुढे गेल्यावर गाड्या थांबवल्या, मला तर घडल्या प्रकाराने खूपच हसू येत होते, जुली भीतीने थरथरत होता, "इथे नको थांबायला इथे अंधार आहे, आपण पुढे कुठे तरी गावात उजेड आहे तिथे थांबूया," हे ऐकून मला अजून हसायला आले, जुली मात्र मला शिव्या घालायला लागला "तुला असेल असल्या जंगली प्राण्यांची सवय, मला भीती वाटतेय." बाबा चमत्कार मात्र मोबाईलला नेटवर्क कसे मिळेल याची खटपट करत होता.

साधारण रात्री १० वाजण्याच्या सुमारास आम्ही मंडीजवळ पोहोचलो, आताच जेवून घेऊया नाहीतर नंतर पुढे उपाशी राहावे लागेल म्हणून मग एका हॉटेलात शिरलो, ११.३० च्या सुमारास पुन्हा गाडीला किक मारुन पुढे निघालो,मनाली अजून ११० किमी होते, " पप्या तुझ्या गावाला पोहचायला अजून किती वेळ लागेल, ?" मी म्हटले अजून ३.३० तास तरी लागतील.
थोड्या थोड्या वेळाने बाबाचे मागे बसलेल्या बाबाचे डोके हेल्मेट सकट माझ्या हेल्मेटवर आदळत होते,
बाबा मागे बसून पेंगत होता, " बाबा झोपू नकोस टाकून देईन खाली," चल रे तू नीट गाडी चालवत नाहीस म्हणून डोके आदळतय" अस तो फेकायला लागला, मी दणादण गाडी चालवायला लागलो मुद्दाम गाडी खड्ड्यात घालून चालवायला लागलो जेणेकरून हा झोपणार नाही. स्वतःच्या चुका हा कधीच कबूल करणार नाही म्हणून हा जालीम उपाय.

पंडोह धरणाच्या पुढे पोहोचल्यावर गार वारा अजून थंडगार झाला, धुके दाटून आले, कसे बसे एकदाचे मनालीच्या जवळ पोहोचलो तर आता अंगावर पाऊस बरसायला लागला, गाड्या बाजूला घेऊन मग, रेनकोट वगैरे घालू लागलो, त्या छोट्याश्या जास्त रुंद नसलेल्या रस्त्यावरून मनालीपासून एक ट्रक खाली खूप जोरात गेला, नक्कीच १०० च्या आसपास त्याचा स्पीड असावा, विचित्र वाटले,
रेनकोट वेगैरे घालून जेमतेम १-२ किमी गेलो असेन तर त्या रस्त्यात एक पूर्ण वाढ झालेला अंगाने दणकट असलेल्या चोकलेटी कुत्र्याचे २ तुकडे दिसले, बरसणाऱ्या पावसाने त्याचे ते रक्त रस्ताभर पसरले होते, नक्कीच तो ट्रकवाला याला जबाबदार होता. दुचाकी असो व छोटी कारवाला, हे रणगाडे चालवणारे नेहमीच यांना दुय्यम समजतात, मग तिथे या मुक्या प्राण्यांना कोण विचारतो, ?
जंगली प्राण्यांचे जे नैसर्गिक मार्ग असतात ते बर्याच वेळा छेदून आपण तिथे आपले डांबरी मार्ग तयार केलेले आहेत, तिथे कुठे तरी एखादा सरकारी फलक असतो, कि इथून जंगली प्राणी रस्ता पार करतात तेव्हा आपली वाहने सावकाश हाका, आपल्यापैकी किती लोक तिथे या प्राण्यांचे विचार करतात, ( मुंबईत पकडून जुन्नर ला नेउन सोडलेल्या "आजोबा" या बिबट्याची आठवण झाली,)
असो, विषयांतर होतंय....

ग्रीन गेटवर पावती फाडून मनालीमध्ये प्रवेश केला, हॉटेलजवळ पोहोचलो, पाऊस अजूनही पडतच होता,बंजी कॉर्ड च्या तावडीतून कश्याबश्या आमच्या ब्यागांची सुटका केली,१८ तास गाडी चालवून , पावसात भिजून आता अंगातले त्राण संपले होते, रूमवर पोहोचताच, समान फेकून दिले, अंगातले रेनकोट, एल्बो गार्ड, नि गार्ड,बूट, आणि तत्सम अलंकार काढायलाही जीवावर आले होते,
अंग पलंगावर टाकले आणि निद्रेधीन होतानाच पुसटशे आवाज कानावर येत होते, पलंगावर कोण आणि खाली टाकलेल्या गादीवर कोण झोपणार यासाठी दोघे भांडत होते.....

प्रतिक्रिया

जगप्रवासी's picture

8 Oct 2015 - 4:54 pm | जगप्रवासी

मालक फोटो दिसत नाहीयेत

लॉरी टांगटूंगकर's picture

8 Oct 2015 - 11:56 pm | लॉरी टांगटूंगकर

मस्त लिहिताय.
ओ संपादक्स, फटूचं बघा की जरा.

मदनबाण's picture

9 Oct 2015 - 4:21 am | मदनबाण

फोटो दिसत नाहीत...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अधीर मन झाले,मधुर घन आले... :- निळकंठ मास्तर

असंका's picture

9 Oct 2015 - 4:55 am | असंका

मस्तच!!!

(रच्याकने, ते एक किमी. गाडी ढकलावी लागल्याचे वाचून दु:ख झाले. मराठी माणूस कायदा किती इमाने इतबारे पाळतो ते दिसतं अशा प्रसंगातून. काय? )

सतिश पाटील's picture

9 Oct 2015 - 10:39 am | सतिश पाटील

एक किमी गाडी ढकलण्याचा आन मऱ्हाटी माणसाने इमाने इतबारे कायदा पाळण्याचा तुम्ही जुळव्लेला मेळ काही कळला न्हाई, जरा इस्कटून सांगा ...

इमानदारीत गाडीतलं पेट्रोल काढून गाडी लोड केलीत ना रेल्वेत?

सतिश पाटील's picture

9 Oct 2015 - 7:20 pm | सतिश पाटील

अस होय.. सगळेच मराठी माणसे नियम पाळतात असे काही नाही,
आणि मराठी माणसे सगळेच नियम पाळतात असेही काही नाही..

बाबा योगिराज's picture

9 Oct 2015 - 7:33 pm | बाबा योगिराज

४ चौघात अस खर बोलू नै

आपण ते आईस्क्रीम , इंग्रजी नंबरप्लेट बरोबर घेणे, भैयांशी झालेला सुखसंवाद याबद्दल बोलत आहात का? सोरी हां.. मी ते वाचलेलंच नाही.
;-)

(लेखक दादा: हलकेच घ्या हो... आपलं लेखन वाचून मजा येतीये, म्हणून परतफेड करतोय.)

वेल्लाभट's picture

9 Oct 2015 - 8:44 am | वेल्लाभट

फेसबुकाचे दुवे दिलेत असं दिसतंय... बरोबर का पाटील साहेब

सतिश पाटील's picture

9 Oct 2015 - 10:34 am | सतिश पाटील

व्है, फेस्बुकाचे दुवे दिलेत, जास्त यम बी चे फोटो हायेत म्हणून असा प्रोब्लेम आला आसल का?
जरा मार्गदर्शन करा कि...

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Oct 2015 - 12:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही फेसबुकवरून फोटो टाकले आहेत व त्यांना पब्लिक अ‍ॅक्सेस दिलेला नाही. पब्लिक अ‍ॅक्सेस दिल्यास फोटो दिसतील असे वाटते.

बाबा योगिराज's picture

9 Oct 2015 - 11:20 am | बाबा योगिराज

फोटो च बघ भौ काहीतरी. नाय तर संपादक मंडळा पैकी कुणाची मदत घे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Oct 2015 - 12:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेखकाने फेसबुकवरून फोटो टाकले आहेत व त्यांना पब्लिक अ‍ॅक्सेस दिलेला नाही. पब्लिक अ‍ॅक्सेस दिल्यास फोटो दिसतील असे वाटते.

खटपट्या's picture

9 Oct 2015 - 1:03 pm | खटपट्या

फेसबूक आणि जीमेलला लॉगीन असूनही फोटो दीसत नाहीत. कायतरी करा

सतिश पाटील's picture

9 Oct 2015 - 7:18 pm | सतिश पाटील

जम्ल हो जरा जरा...

सतिश पाटील's picture

9 Oct 2015 - 7:22 pm | सतिश पाटील

पिकासा ची मदत घेतलि

पुढचं कधी? आठवडा होत आला....

मस्त लिहिलंयत! पण फोटोचे दुवे गंडलेत! दुरुस्त करा की राजे!!!

सतिश पाटील's picture

15 Oct 2015 - 4:44 pm | सतिश पाटील

हापीसात बसून लपून छापून असले लिखाण करणे म्हणजे लई अवघड काम आहे राव...
उद्यापात्तोर फूडला भाग हुईल लिहून अस वाटतंय