कुल्यार जांय...

माधुरी विनायक's picture
माधुरी विनायक in जनातलं, मनातलं
30 Sep 2015 - 4:18 pm

माझं गाव कोकणात. तसं गोव्यापासूनही जवळ. म्हणजे आमच्या घरापासून साधारण अर्धा तास चालत जायच्या अंतरावर तेरेखोलची खाडी आणि तिच्या पल्याड गोवा. सहज पोहत जाण्याजोगं अंतर. मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही गावी गेलो की बाबा पेडण्याच्या बाजाराला चालत जायचे. आमचे वाडीतले इतर कार्यक्रम ठरलेले असायचे, त्यामुळे त्यांच्यासोबत बाजारात जायचं फार अप्रुप नव्हतं. पण बाजारातून आणलेल्या कांदा भज्यांचं आकर्षण होतं. त्याचबरोबर मोठ्या बांगड्यांसारख्या गोल आकाराचे पाव मिळायचे. बांगड्या म्हणजे काकणं, म्हणून पावाच्या त्या प्रकाराचं नाव 'काकना'. तर, या दोन गोष्टींसाठी बाजारातून परतणाऱ्या बाबांच्या वाटेवर आम्ही चांगलेच नजर ठेवून असायचो.

बाबा पेडण्याला जायचे ते मुख्यत: मासे आणायला. शिंपले हा इतर माश्यांइतकाच आवडीचा प्रकार. पण ते विकत आणायचे नाहीत. तेरेखोलच्या खाडीत उतरायचे बाबा पोहायला. एका दिवशी दोन मोठ्या टोपल्या भरतील इतके शिंपले सहज मिळायचे. मग आमच्या बरोबर अवाटातल्या इतर घरांमध्ये सुद्धा हे शिंपले वाटले जायचे. मजा असायची.

प्रस्तावना लांबली का जरा... असो.
तर, सांगायचा मुद्दा असा की गाव गोव्याच्या जवळ, त्यामुळे मालवणी बरोबर कोकणी भाषाही सर्रास बोलली जायची. आमच्यासारख्या चाकरमान्यांच्या मुलांना मालवणी बऱ्यापैकी कळायचं. कोकणी भाषा ऐकायला गोड, पण काही शब्द डोक्यावरून जायचे...

असेच एकदा आम्ही गावी गेलो होतो. सकाळी भाकरीची न्याहारी झाली की साधारण अकरा वाजता पेज घ्यायची पद्धत. वाडीतले सगळेच एकमेकांचे सख्खे-चुलत नातेवाईक. ज्या घराच्या जवळ खेळ रंगला असेल, तिथून पेजेच्या वेळी हाक यायची आणि मग तिथेच पेज जेऊन आम्ही पुढे खेळायला मोकळे. त्या वर्षी आमचा एक भाऊ पहिल्यांदाच गावी आला होता. साधारण सात-आठ वर्षांचा. स्वभावाने गरीब आणि थोडासा भित्रा. पण मस्त रमला होता आमच्यासोबत. पेज हाताने जेवायचं तंत्र मात्र त्याला फारसं जमत नव्हतं. गावी चमच्याने खाण्याचं प्रथ तेव्हा नव्हतं फारसं. त्यातून लहान चमचे प्रत्येक घरात हाताशी असतीलच, असं नाही. मग त्याची तारांबळ व्हायची.

त्या दिवशी खेळता-खेळता पेजेची वेळ झाली आणि आम्ही जवळच्या घरात जेवायला बसलो. मजेत जेवणं चाललेली. याला मात्र चमच्याशिवाय भरभर जेवता येईना. त्याचं निवांत चाललं होतं. बाकीच्यांचं आटपत आलेलं. त्या घरातल्या काकी जरा उग्र रूपाच्या आणि गावच्या उन्हाने त्यांचा रंग तसा रापलेला. आवाजही दणकट. भाऊ जेवताना रेंगाळतोय हे पाहिलं त्यांनी आणि त्याला विचारलं, 'किते रे, तुका कुल्यार जांय...'

तो भाऊ दचकलाच. 'नको नको, जेवतो मी पटपट', म्हणत त्याने पेजेचा वाडगा तोंडालाच लावला. ठसका लागला त्याला, पण पेज चटकन संपवून उठला तो आणि हात धुवायला पळाला सुद्धा. आम्ही अजून जेवतोय...
तेव्हा त्याची गडबड कळली नाही. मग पेज संपवून हात धुवून बाहेर गेलो आम्ही. त्याला विचारलं की भरकन का जेवलास तर तो रडवेल्या आवाजात म्हणाला, त्या काकींनी मारलं असतं ना मला. कुल्यावर.... त्या बोलल्या ना...
बिचारा...
आम्ही हसत सुटलो आणि आम्ही त्यालाच हसतोय हे लक्षात येऊन तो आणखीच कावरा-बावरा...
मग ताईने त्याला जवळ घेऊन सांगितलं, 'अरे त्या कुल्यावर मारू का, असं विचारत नव्हत्या. तुला कुल्यार देऊ का, असं विचारत होत्या. कुल्यार म्हणजे चमचा (कोकणी भाषेत)...'
ही गंमत कळल्यावर तो सुद्धा हसू लागला.

अगदी आजही आम्ही भावंडं एकत्र आलो की हटकून त्याला विचारतो, किते रे, तुका कुल्यार जांय....
----------------------------------------------------------------------------------------

हा दुसरा किस्सा गावात नव्याने लग्न होऊन आलेल्या काकीचा. माझ्या आई कडून ऐकलेला...

मुंबईत राहणाऱ्या या काकाने तेव्हा म्हणजे सत्तरच्या दशकात प्रेम विवाह केला होता. ती काकी मूळात कारवारची. त्यामुळे आजी काहीशी नाराज. नाराजी काय, प्रेम काय, व्यक्त करून मोकळं व्हायचं, असा आज्जीचा खाक्या. त्यामुळे आपण इथे फारसे आवडत नाही, हे काकीला जाणवलं होतं. भाषाही तशी अनोळखी, त्यामुळे ती फारशी बोलायचीही नाही. जेमतेम पंधरा दिवसासाठी गावी आली होती. काका आणि माझी आई, या दोघांशी बोलणं व्हायचं तिचं..

शेजार-पाजारच्या घरात ओळख झाली आणि ही काकी पाणी भरायला विहिरीवर गेली. तिला आवडायचं विहिरीवरून पाणी भरायला. त्या दिवशी मात्र विहिरीवरून आली ती रडवेली होऊनच.
भांडी घरात ठेवली आणि आतल्या खोलीत जाऊन मुसमुसू लागली. काका घरात नव्हते, आज्जीही नव्हती. आईला काळजी वाटली. तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत करत आईने विचारलं, काय झालं तुझं... का रडतेस... कोणी काही म्हणालं का तुला...

त्यावर ती रडवेल्या आवाजात आईला म्हणाली, मी आवडत नाही ना कोणाला... मग लोकं असंच बोलणार मला... मला नाही राहायचं इथे आता. हे आले की मी जाते निघून...

आईने पुन्हा तिची समजूत घालायचा प्रयत्न करत विचारलं, काय झालं, ते सांगतेस का... कोण काय बोललं तुला.. कोणी काही विचारलं का...
त्यावर डोळे पुसत काकी उत्तरली.. विहिरीवर वनिताताई भेटल्या. छान बोलल्या माझ्याशी. मग मला विचारलं, तुला किती भंगार देऊन घेतलं भाईने... मी इतकी वाईट आहे का की मला माझ्या नवऱ्याने भंगार देऊन घेतलं....

काकी आता नीटच रडू लागलेली. आईला ऐकून धक्का बसला. वनिता आत्ते असं बोलणं शक्यच नाही, याची तिला खात्री. मग आई काही सुचून चटकन बाहेर गेली, तो तिला लांबून वनिता आत्ते येताना दिसली. ती पाण्याचे हंडे घेऊन घरी निघाली होती. आईने तिला हाक मारून जवळ बोलावलं. 'गो वनग्या, हंय ये. काय इचारलंस तू भाभीक... रडता बघ ती...'

वनिता आत्तेने लगबगीने घराबाहेर हंडा उतरवला आणि गडबडून म्हणाली, काय नाय गे... आम्ही बोला होतो.. आणि भाभी आपली बोलता बोलता रागान थंयसून चालू पडली. मी काय इचारतंय ता ऐकूक सुद्धा रवाक नाय ती... मी इचारतंय काय झाला, तर तशीच जात ऱ्हवली... काय झाला तरी काय...,'

आता आईही चक्रावली. तिने काकीला जबरदस्तीने बाहेर बोलावलं. दोघींना समोर उभं केलं आणि विचारलं काकीला, काय विचारलं हिने तुला म्हणून रडतेस तू...'

वनिता आत्ते बिचारी चेहरा पाडून उभी. तिच्याकडे बघत काकी थोडी रागात, थोडी रडत म्हणाली, हिने मला विचारलं वहिनी, तुला किती भंगार देऊन घेतलं भाईने.... आता विचारा ना मला वहिनीसमोर... आता गप्प कशाला....

बिचारी वनिता आत्ते... तिला आधी काही कळलंच नाही. मग काहीसं आठवत ती आईला म्हणाली, गे वयनी, मिया हिका इचारलंय, भाईन कितले भांगार घातले तुका...' मगे... काय चुकला माजा... आमका तुमचे गजालीच नको बाये... जातंय मी...

ती काहीशी वैतागत हंडा उचलायला वळली, तशी सगळ्याचा उलगडा होऊन शांत झालेल्या आईने तिला हसत म्हटलं, 'गो वनग्या, भंगार म्हणजे काय तां सांगून जा तुझे भाभीक...'

हंडा उचलायला वळलेली आत्तेही काहीशी हसत काकीकडे वळली. 'गे भाभी, भांगार म्हणजे सोना गे... आमच्या भाईची प्रेमाची बायल तू... म्हणान तुका इचारला , भाईन काय दागीने घातले तुका, काय सोना घातला तुका, तां....

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

30 Sep 2015 - 4:31 pm | कविता१९७८

हा हाहा , मस्त

बाबा योगिराज's picture

30 Sep 2015 - 4:32 pm | बाबा योगिराज

ख्या ख्या ख्या.

सौंदाळा's picture

30 Sep 2015 - 4:39 pm | सौंदाळा

मस्त किस्से.
कुल्यारचा असाच किस्सा माझ्या मित्राच्या बाबतीत पण झाला होता. (बांद्याला)
गोव्यात पणजी स्टँडला पाहिलेली पाटी 'हागा थुकु नाका' वाचुन असेच हसलो होतो. (हांगा होते आणि अनुस्वार पुसला गेला होता)
अर्थ : येथे थुंकु नये.

पुण्यात बसमधे एकदा पाटी वाचली होती प्रत्येकाने आपले सामान आपल्या मांडीवर घेउन बसावे. आणी कोणा वात्रटाने मा मधी बारीक डॅश खरडून मा चा गा अतिशय नैसर्गीक भासेल असा बनवला होता...

मांत्रिक's picture

30 Sep 2015 - 4:40 pm | मांत्रिक

मस्तच!!!
अगदी गमतीशीर!!!

सूड's picture

30 Sep 2015 - 4:40 pm | सूड

हा हा! मस्तच!!

सिरुसेरि's picture

30 Sep 2015 - 4:53 pm | सिरुसेरि

+१ . छान कथा .

मागल्या आठवड्यात खफवर जेप्याने कोकणीत लिहायच्या नादात 'जोतिबा पावला' लिहीलं होतं ते आठवलं. =))

एस's picture

30 Sep 2015 - 4:47 pm | एस

खी: खी: खी:!

शलभ's picture

30 Sep 2015 - 4:54 pm | शलभ

छान किस्से..:)

हलका फुलका छान विनोदी लेख. कुल्यार जांय , भंगार या शब्दाचा अर्थ सांगितला ते बरे झाले. शेजारी अहात , शब्द लक्षात ठेवायला हवे . लेख आवडला.

सस्नेह's picture

30 Sep 2015 - 5:14 pm | सस्नेह

भारी किस्से !

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

30 Sep 2015 - 5:26 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

भारी किस्से.आवडले

बॅटमॅन's picture

30 Sep 2015 - 5:56 pm | बॅटमॅन

हा हा हा, सहीच!!!! त्यावरून कन्नड नातलगांसोबत हमखास होणारे इणोद आठवले.

हेल = 'शी' (कन्नडमध्ये). त्यामुळे अमकातमका 'हेल काढून बोलला' म्हटले की खी खी खी =))

झालंच तर कुंडी या शब्दाचा कन्नड अर्थही मजेशीर. त्यामुळे 'झाडाची कुंडी', 'कुंडीतील लागवड' वगैरे शब्द ऐकले की काही भाऊबहीण लोक्स लै हसायचे.

झालंच तर अरिबी = कपडे हा शब्द वापरून मातु:श्री जोक करीत असत. वाळलेले कपडे एकत्र करून ढीग केला की त्यांचे मते 'अरबी समुद्र' होत असे.

जगप्रवासी's picture

30 Sep 2015 - 5:57 pm | जगप्रवासी

आपली कोकणी भाषा मजेशीरच आहे. माझ्या मोठ्या भावाच लग्न झाल तेव्हाचा किस्सा

माझी वहिनी संगमेश्वरची पण कधीच गावाला गेली नसल्यामुळे तिला गावची भाषा कळत नसे, माझ्या गावच्या काकाच्या मुलीला संध्याकाळी परसाकडे जायचं होत तर आईने सहज वहिनीला सांगितल की " गो हिच्या वांगडान जरा जाऊन ये" यावर वहिनी म्हणाली होती की "आई मी आता काळोखातून दुसर्या गावात जाणार नाही". आईला आधी काहीच समजल नाही नंतर अर्थ लागल्यावर आईच हसू थांबेना मग तिने वहिनीला समजावलं की "अग वांगड म्हणजे सोबत" ते ऐकून वहिनी पण हसायला लागली.

रेवती's picture

30 Sep 2015 - 6:11 pm | रेवती

हीहीही. मजेदार किस्से.

नाव आडनाव's picture

30 Sep 2015 - 6:39 pm | नाव आडनाव

माझ्या टीम मधल्या एकाने सांगितलेला किस्सा -
मामाचं लग्न झालं. मामी हैद्राबादची. पुण्यात नवीन असतांना तिला जास्त मराठी कळत नव्हतं. पब्लिक त्याचा फायदा घायचं. तिला विचारायचे - तू वेडी की खुळी. की म्हणजे ऑप्शन आणि वेडी या शब्दाचा अर्थ माहित असल्यामुळे ती सांगायची "मी खुळी" :) आणि पब्लिक हसायचं. तिला बरेच दिवस अर्थ मुद्दाम सांगितला नव्हता :)

पद्मावति's picture

30 Sep 2015 - 6:48 pm | पद्मावति

ही ही ही...मस्तं लेख.
प्रतिसादही मस्तं.

चाणक्य's picture

30 Sep 2015 - 8:33 pm | चाणक्य

मस्तच

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Sep 2015 - 8:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =))

सानिकास्वप्निल's picture

30 Sep 2015 - 9:58 pm | सानिकास्वप्निल

हाहाहा छानच आहेत किस्से.

नाखु's picture

1 Oct 2015 - 5:44 pm | नाखु

किस्से.

भांगार्=सोने फेम कानडीने केला मराठी भ्रतार .

जावई बुवा नाखुस

इशा१२३'s picture

1 Oct 2015 - 11:02 pm | इशा१२३

मस्त किस्से!

बोका-ए-आझम's picture

2 Oct 2015 - 2:21 pm | बोका-ए-आझम

पोर्तुगीज भाषेत चमच्याला colher (उच्चार कोयेर) असा शब्द आहे. बहुधा त्याच्यावरून कुल्यार हा शब्द आला असावा.

यशोधरा's picture

2 Oct 2015 - 3:11 pm | यशोधरा

भांगर असा शब्द आहे तो.
मजेशीर किस्से.

प्रभाकर पेठकर's picture

2 Oct 2015 - 10:21 pm | प्रभाकर पेठकर

एकेक किस्से मजेदार. मजा आली वाचताना.

रातराणी's picture

2 Oct 2015 - 11:45 pm | रातराणी

:)

श्रीकृष्ण सामंत's picture

3 Oct 2015 - 7:22 am | श्रीकृष्ण सामंत

माकां किस्से आवडले

मुक्त विहारि's picture

3 Oct 2015 - 9:02 am | मुक्त विहारि

आवडले.