रामपुरी ते रायफल

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
20 Sep 2015 - 8:01 am

"लुटूपुटूची फयटींग खेळताना,पोलीसाने ”हेंज-जॉफ" असं म्हटलं की गुंड दोन्ही हात वर करून उभा रहायचा.”

मुंबईत असताना आमच्या लहानपणी घरात चाकू असलाच तर पेन्सिलीला टोकं काढण्यासाठीच असायचा.मोठं धारदार हत्यार बाळगायला त्या काळात बंदी होती.जातीवादावरून किंवा अन्य कारणावरून दंगे किंवा भांडणं झालीच तर चाकूचे वार व्हायचे. किंवा लाठ्या काठ्याने डोकी फोडली जायची.हे चाकू मुंबईत तरी चोरबाजारात मिळायचे.हा चोरबाजार भेंडी बाजाराच्या आसपास भरायचा.ह्या चाकवाना रामपुरी म्हणायचे.रामपुरी चाकू म्हणजे मोठा चाकू समजायचा.आणि हे चाकूने भोसकाभोसकीचे प्रकार हाताच्या बोटावर मोजण्या इतके व्ह्यायचे आणि त्यातून एक दोन मरायचे.

त्यानंतर जमावाकडे दुसरं अस्त्र म्हणजे दगड किंवा सोडावॉटरच्या बाटल्या असायच्या.त्या एकमेकावर फेकून मारायचे. त्याने पाच दहा डोकी फुटायची. त्यावेळच्या पोलीसाकडेपण दंडुके-बॅटन- असायचे. त्यावेळच्या पोलीसांचा ड्रेस गमतीदार असायचा. शिवाजीचे मावळे वापरायचे तसे डोक्यावर पगड्या असायच्या आणि त्याचा रंग पिवळा जर्द असायचा आणि पेहराव असायचा जांभळ्या रंगाचा बुशकोट आणि खाली शॉर्ट-हाफ प्यॅन्ट पोटरीपर्यंत असायची आणि ती प्यॅन्ट पोटरीवर गच्च असायची.पायात पठाणी चप्प्ल असायचं.पोलीस गमतीदार जोकर दिसायचा. आम्ही पोलीसाला लहानपणी "जांभळी बाटली पिवळा बूच" असं गमतीने ओरडून म्हणायचो आणि पळून जायचो.पोलीसाच्या कमरेला हे पिवळ्या रंगाचे दंडुके-बॅटन लटकत असायचे.त्याचा वापर त्याला क्वचितच करावा लागायचा.आणि मोठ्या दंग्यात गाड्या भरून पोलीस आले की त्यांच्याकडे लांब काठ्या असायच्या.लाठीमार करून जमावाला पांगवायचे.त्याहून गंभीर जमाव झाल्यास रायफली घेऊन पोलीस यायचे. ही स्पेशल रायफलची तुकडी असायची.पोलीसांची रायफल तुकडी आली की समजावं प्रकरण खूपच गंभीर आहे. ह्या रायफलीतून एका वेळी एक गोळी झाडली जायची.बरेच वेळा गोळीबार पोलीस हवेतच करायचे.दंगे काबूत यायचे. त्यामुळे मनुष्य हानी कमीच व्ह्यायची. पोलीसांच्या साहेबाकडे मात्र पिस्तूल असायचं आणि कमरेला एका चामड्याच्या पिस्तुलाच्या आकाराच्या पाऊचमधे ठेवलेलं असायचं.

पिस्तुल प्रत्यक्षात कसं दिसतं ते आम्हाला कधीच पाहायला मिळालं नाही.पण नाही म्हटलं तरी वांद्र्याच्या वांद्राटॉकीझमधे चार आण्याचं तिकिट काढून आम्ही इंग्लिश फिल्म बघायला जायचो. "झोरो इन टाऊन" किंवा "डेथ ऑफ गॅन्गस्टर" ह्या नावाचे ऍनथनी क्विन किंवा ग्रेगरी पेक ह्यांचे फायटींगचे सिनेमा आवडायचे.असले फायटिंगचे चित्रपट बघायला मजा यायची.त्यात पिस्तुलं म्हणजे काय ते पहायला मिळायचं.तेव्हड्या लहान वयात मोठ्या भावाबरोबर चित्रपट बघायला गेल्यावर इंग्रजी काही कळत नसायचं.एखादा सिन पाहून मोठा भाऊ हंसायचा त्यावेळी आम्ही हंसायचं.एक मात्र खरं धावत्या घोड्यावर बसून बंदूकीच्या गोळ्या एकमेकावर झाडण्याच्या दृश्याने त्यांची मर्दूमकी बघायला मजा यायची.एक मात्र इंग्रजी शब्द अजून आठवतो" हेंज-जॉफ" म्हणजेच हॅन्डस अप". मित्रांच्या ग्रुपमधे लुटूपुटूची फयटींग खेळताना,पोलीसाने ”हेंज-जॉफ" असं म्हटलं की गुंड दोन्ही हात वर करून उभा रहायचा.

जशी मुंबईची वस्ती वाढू लागली तसे गुन्हेगारी वाढायला लागले.जरा आधुनिक हत्यारं गुंडाना मिळायला लागली. अलिगढवरून गांवठी पिस्तुलं मिळायला लागली.उत्तरप्रदेशच्या अलिगढमधे गावठी पिस्तुलं बनावायचे बेकायदा कारखाने बरेच होते. ही पिस्तुलं मुंबईत स्मगल व्हायची.कधी कधी मुंबईचे पोलीस अलिगढमधे जाऊन बेकायदा कारखान्यावर छापे टाकायचे.
मुंबईत त्यावेळी नावाजलेली मराठी वर्तमानपत्रं म्हणजे लोकमान्य,नवशक्ती आणि केसरी.लोकसत्ता आणि सकाळ ही वर्तमानपत्रं आत्ता आत्ताची.परदेशातल्या बातम्या सोडाच एखाद दुसरा भोसकून मेल्याची मात्र एखादी बातमी दिसायची. अमेरिकन कॉटनबाजाराचे नंबर मात्र एका ठराविक जागेत दिसायचे.त्या नंबरावर काही लोक सट्टाबेटिंग खेळायचे.

मुंबईची वस्ती आणखी वाढायला लागल्यावर,चोर्‍यामार्‍या दंगेधोपे जातीय दंगल वाढायला लागली.आता नवीन अस्त्र म्हणजे गांवठी बॉम्ब फुटायला लागले.नाहीतर बॉम्ब हा प्रकार फक्त लष्कराकडेच असायचा. ह्या गांवठी बॉम्बच्या वापराने एक्का दुक्का मेल्याची बातमी यायची.गांवठी बॉम्ब बनवायचे मुंबईतपण कारखाने निर्माण व्हायचे.धारावीत त्यांचं जास्त प्रमाण असायचं. हे बॉम्ब विझवण्यासाठी मुंबईपोलीसांच स्पेशल खातं असायचं.हळू हळू सर्रास पिस्तुलं मिळायला लागली.अर्थात बेकायदा वापर व्हायचा.आता पेपरात एकदोन ऐवजी चारपाच दुर्घटनाच्या बातम्या यायच्या.हवालदारपण आता थोडे स्मार्ट व्हायला लागले. पुर्वीचा गचाळ पेहराव जाऊन पोलीस आता जांभळी टोपी आणि जांभळे कपडे वापरायला लागले.

एके४७,बिके५७,सिके६७ ही पोलीसांच्या कमरेवरच्या बिल्ल्यावरची नंबरांची नांव असायची."अरे त्या एके४७ला बोलाव. किंवा बिके५७ला हांक मार" अशी भाषा बोलली जात होती.
एके४७ ही मशीनगन असते हे त्यावेळी पोलीसानासुद्धा माहिती नसावी.मशिनगन्स फक्त लष्करात असतात हे ऐकलं होतं.
पण आता गुंड जाऊन अतीरेकी आले.गावठी बॉम्ब जाऊन आरडीएक्सचे बॉम्ब आले.हात ग्रेनेड सर्रास वापरायला लागले. सुईसाईड बॉम्बचं नवीन टेकनीक आलं.आता पुढे रेडिओऍकटीव्ह बॉम्ब येतील.पुढे सेटलाईटवरून लेझर बिम वापरून संहार करण्यात येतील. कदाचीत पोरटेबल न्युकलीयर बॉम्ब येतील.डर्टीबॉम्ब येतील.काय कुणाष्टाऊक,
"कुठे चालला आहे हा जगंनाथाचा रथ?

कुणाचा आहे हा इशारा ( अनुवादीत)

जात आहे पुढे पुढे ही धरती
जात आहे पुढे पुढे हे गगन
होत आहे काय ह्या जगताला
कुणाचा आहे हा इशारा

जात आहे पुढे पुढे ही जीवन नय्या
कोण आहे हिचा नावाडी
न कळे जात आहे कुठे हे जीवनचक्र
कुणाचा आहे हा इशारा

हे हंसणे हे रडणे ही आशा निराशा
न कळे आम्हां काय हा तमाशा
रात्रंदिनी जात आहे कुठे हा मेळावा
कुणाचा आहे हा इशारा

अजब आहे हा सोहळा
अजब आहे ही कहाणी
नाही कसले ठिकाण
नाही कसले निशाण
न कळे कुणासाठी जात आहे
हा जगन्नाथाचा रथ
कुणाचा आहे हा इशारा

हे शहाणे हजारो झाले भटके
गुपित त्याचे कुणी न समजे
ही साखळी जीवनाची करीते भ्रमंती
कुणाचा आहे हा इशारा

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

इतिहासलेख

प्रतिक्रिया

सामंत जी वेगळ्या विषयावरचा लेख आवडला
कवितेचा रेलेव्हन्स नाही कळला पण स्वतंत्र म्हणुन आवडली
हि मुळ कविता दिली तर आनंद होइल
मारवा (मु.पो. गोलापांगरी बुद्रुक ता. हौश्यावाडी महाराशटर )

श्रीकृष्ण सामंत's picture

20 Sep 2015 - 9:54 am | श्रीकृष्ण सामंत

पण आता गुंड जाऊन अतीरेकी आले.गावठी बॉम्ब जाऊन आरडीएक्सचे बॉम्ब आले.हात ग्रेनेड सर्रास वापरायला लागले. सुईसाईड बॉम्बचं नवीन टेकनीक आलं.आता पुढे रेडिओऍकटीव्ह बॉम्ब येतील.पुढे सेटलाईटवरून लेझर बिम वापरून संहार करण्यात येतील. कदाचीत पोरटेबल न्युकलीयर बॉम्ब येतील.डर्टीबॉम्ब येतील.काय कुणाष्टाऊक,

ह्या शेवट्च्या मजकूराने माझ्या मनात प्रश्न आला की हा जीवनाचा गाडा कुठे चालला आहे. तो माझ्या मनातला रिलेव्हन्स होता.म्हणून ती कविता सुचली.
सध्या आठवत नाही,पण कोणत्या गाण्याचा अनुवाद आहे ते आठवल्यावर जरूर कळवीन.प्रतिसादाबद्दल आभार.

एक एकटा एकटाच's picture

20 Sep 2015 - 9:06 am | एक एकटा एकटाच

मस्त लिहिलय

आवडला लेख

कविता ही परिणामकारक आहे.

बहुगुणी's picture

20 Sep 2015 - 10:05 am | बहुगुणी

लेख आणि कविता दोन्ही विचार करायला लावणारे आहेत.

जव्हेरगंज's picture

20 Sep 2015 - 4:11 pm | जव्हेरगंज

लेख आवडला. साधारण कधीचा काळ होता हा?
ई.स. वगैरे दिले असतेत तर अजुन रोचक झाला असता.

श्रीकृष्ण सामंत's picture

21 Sep 2015 - 6:04 am | श्रीकृष्ण सामंत

साधारण १९४५ ते ५५ चा काळ होता.

छान आहे. आर्थिक प्रगतीबरोबरच विध्वंसाची साधनेही जास्त विनाशकारी होत चालली आहेत.

द-बाहुबली's picture

21 Sep 2015 - 7:30 pm | द-बाहुबली

विषय छान होता पण आवाका नक्किच झेपला नाही. असो छान प्रयत्न आहे.

विवेकपटाईत's picture

21 Sep 2015 - 8:11 pm | विवेकपटाईत

लेख आवडला आणि कविताहि. बाकी नजरेचा वार कुठल्याहि एकेपेक्षा जास्त घातक असतो.