गुड्बाय मिस्टर डॅनियल !!

Sanjay Uwach's picture
Sanjay Uwach in जनातलं, मनातलं
14 Sep 2015 - 3:51 pm

गुड्बाय मिस्टर डॅनियल !!
युरोपातील वंसत ऋतूच्या आगमनाची ती नुकतीच सुरवात होती. बर्फ़ाच्छादित पर्वत रांगामधून वेडीवाकडी वळणे घेत, एक टॅक्सी त्या भव्य प्रासादाच्या दरवाज्या समोर येउन थांबली.त्यातून काळसूट घातलेला एक उंचापूरा तरुण खाली उतरला.त्यांने टॅक्सीवाल्याचे पैसे दिले व तो त्या प्रासादाच्या दारासमोर जाउन थबकला.त्याला पाहून बाजूच्या छोट्या गेट मधून एक सुरक्षारक्षक बाहेर आला व त्यांने त्या तरुणाची विचारपूस केली, तसे तो तरुण बोलू लागला " मी डॅनियल ,मला ह्या पत्त्यावर मि. ब्रॅडन यांनी भेटायला बोलवले आहे.त्यांच्या मुलीला शिकवण्यासाठी एक शिक्षक हवा होता ,त्या साठी त्यांनी माझी निवड केली आहे व आत्ता मला त्यांनी भेटण्यास बोलवले आहे. "
"ठीक आहे मी त्यांना फोन करून विचारतो व तुम्हाला सांगतो ,दोन मिनिटे कृपया इथेच थांबा !" त्या सुरक्षारक्षकांने आत फोन लावला व खात्री केल्यावर तो भव्य दरवाजा उघडून डॅनियला आत जाण्यास सांगितले . मिस्टर. ब्रॅडन आपल्याला भेटू शकतील असेही त्याने सांगितले .

त्या प्रासादाच्या भव्य दालनातून डॅनियल आत शिरला. मुख्य इमारत ही दरवाज्या पासून कांही अंतरावरच होती . इमारती कडे जाणाऱ्या रस्त्यावर लाल रंगाच्या फारश्या घालण्यात आल्या होत्या.रस्त्याच्या बाजूनी असणारी ती उंच उंच हिरवीगार झाडे आगदी गगनाला जाऊन भिडली होती .त्या झाडांच्या खाली खास तयार केलेली ती हिरवळ ,वेग वेगळी रंगबिरंगी फुलांची झाडे व त्यातूनच उगवल्या सारखे वाटणारे ते दिव्याचे खांब. इमारतीच्या समोर बांधलेला तो संगमरवरी मोठा कारंजा व त्यातून सू सू करीत उडणारे ते फेसाळलेले पाणी हे सर्व वैभव पाहून डॅनियल हरकूनच गेला. हा ब्रॅडन जो कोणी असेल ,तो खूप श्रीमंत सरंजामी माणूस असणार ,यात कांही शंका नाही असे त्याला वाटले .डॅनियल मुख्य इमारतीत शिरला व त्याने दरवाज्याची बेल वाजवली तसे एका वृध्द गृहस्थाने दार उघडले. मोठ्या विनयाने त्याने डॅनियला कोचवर बसण्यास सांगितले ."मि.डॅनियल सर ब्रॅडन आपणाला लवकरच भेटतील ,तो पर्यंत मी आपल्या चहापानाची व्यवस्था करतो " असे म्हणत तो वृध्द गृहस्थ आत निघून गेला .

डॅनियल कोच वर बसून त्या महालातील प्रत्येंक गोष्ट न्याहाळीत होता . अतिशय सुंदर नक्षीदार कोरीव लाकडा पासून तिथले उंची फर्निचर बनविले होते व त्याला केलेले ते शिसवी रंगाचे चमकदार पॉलीश, त्याची आणखीनच लज्जत वाढवीत होते. भले मोठे दोन जिने ,त्यावर अंथरलेले गालीचे ,मोठे मोठे पडदे हे पाहिल्यावर डॅनियल चांगलाच अचंबित झाला .त्याला इथे येण्या पूर्वी असे कधीच वाटले नाही कि आपण एक फार मोठ्या श्रीमंत माणसाला भेटायला जात आहोत .

इतक्यात समोरच्या जिन्या वरून एक सत्तरीतील वृध्द व्यक्ती व त्याच्या बरोबर एक तरुण मुलगी त्या ठिकाणी आली . ती व्यक्ती जरी वृध्द असली तरी त्याच्या पेहराव्यावरून हा ह्या घराचा मालक सरं.ब्रॅडन व ही तरुणी त्याची मुलगी असणार, हे कोणीही ओळखू शकले असते . गोरापान ,लाल चेहऱ्याचा,त्यावर लांब नाक , वयोमानाने डोक्याला पडलेले टक्कल ,अनुभवाने पांढऱ्या झालेल्या मिशा व जाडजूड भुवया खाली संथ पणे रोखून पाहणारे त्याचे निळेभोर डोळे फारच धूर्त व निष्ठूर वाटत होते. त्याने आपल्या हातात सोनेरी मुठिची नकक्षिदार काठी पकडली होती तर तोंडात भला मोठा चिरु्ट धरला होता. त्या वृद्धा बरोबर आलेली ती तरुणी, ती पण आपल्या बापा प्रमाणे खूपच सुंदर दिसत होती .तिने आपले सोनेरी केस मागे बांधले होते.अंगात घातलेला मोठया गुलाबी फुलांचा बिन बाह्यांच्या फ़्रॉक मुळे,तिचा कमनीय बांधा आणखीनच तिच्या सौंदर्यात भर टाकीत होता . हा सर्व प्रकार पाहून डॅनियल चांगलाच भारावून गेला .तो कोच वरुन बसलेला उठुन उभा राहीला, त्याला काय बोलावे व कुणाशी बोलावे हेच त्याला कळेना .

डॅनियल कडे नजर रोखूनतोंडातील चिरूट बाजुला करुन तो वृध्द बोलू लागला " हॅलो मिस्टर डॅनियल !,मी ब्रॅडन व हि माझी मुलगी रोझी. ब्रॅडन हिलाच शिकविण्या साठी ,मी आपणास बोलविले आहे . माझ्या कडे आलेल्या सर्व बायोडेटा मध्ये ,मला आपलाच बायोडेटा योग्य वाटला ,म्हणूनच मी आपणाला इथे बोलवून घेतले आहे .सुरक्षेच्या कारणामुळे माझी मुलगी घराबाहेर जाऊ शकत नाही .तिच्या शिक्षणाची सोय मी आत्ता पर्यंत ह्या घराच्या महालातच केली होती व इथून पुढेहि, तेच धोरण मी निश्र्चित केले आहे.आपणास हा जॉब योग्य वाटत असेल तर,या साठी माझ्या कांही आटी आहेत.पैशाची काळजी आपण करू नका , माझ्या कडे तो भरपूर आहे.आपणाला या महालात कायम स्वरूपी राहावे लागेल.आपल्या राहण्याची,जेवणाची सर्व सोय आम्ही करू.माझी हि मुलगी शहाणी व्हावी व माझ्या ह्या मोठ्या व्यवसायाचा सर्व डोलारा तिने सांभाळावा हीच ह्या वृध्द थकलेल्या पित्याची इच्छा आहे . माझे मॅनेजर तुम्हाला आपल्यातील करारनाम्याच्या सर्व अटी वाचून दाखवतील.पण एक गोष्ट लक्षात ठेवा,इथे चांगल्या कामाचे जसे कौतुक केले जाते तसे चुकीच्या गोष्टींना शिक्षाही कठोर केली जाते,हे मात्र आपण विसरू नका.मी आपला जास्त वेळ घेत नाही. आपणास हा करारनामा मान्य असेल तर त्या वर तुम्ही स्वाक्षरी करू शकता अन्यथा आपला मार्ग आपल्याला मोकळा आहे . मी तुम्हाला विचार करण्या साठी एक दिवस देतो. तो पर्यंत आपण आमचा पाहुणचार स्वीकारावा .तुम्हाला रोझीशी बोलण्यास माझी कोणतीही हरकत नाही,ग़ुड नाईट म्हणत हातातील सोनेरी मुठीची काठी फिरवीत व तोंडातील चिरूट शिलगावीत तो वृध्द निघून गेला . त्याच्या बोलण्या मध्ये एक प्रकारचा करारीपणा व व्यवहार जाणवत होता . तो वृध्द जसा निघून गेला तसे रोझीच्या चेहऱ्यां वरील दबाव कमी झाल्या सारखे वाटू लागले .तिने डॅनियल कडे पाहून स्मित हास्य केले व ती डॅनियलच्या जवळ आली. एखादी स्वर्गातील अप्सराच आपल्या शेजारी उभी आहे असे त्याला वाटू लागले. डॅनियलने देखील तिच्या कडे पाहून स्मित हस्य केले.
तो रोझीचे सौंदर्य पाहून इतका भारावून गेला कि त्याच्या तोंडातून शब्दच फुटेना.त्याला बोलण्याची सुरवात कशी करावी हेच सुचेना.शेवटी रोझीच त्याला म्हणाली ,"मिस्टर डॅनियल, मी तुमचा बायोडेटा पहिला आहे, जसा तुम्हचा बायोडेटा चांगला आहे,तसेच तुम्ही दिसायला देखील खूप सुंदर आहात. पाहु ! काय होते ते ?,आपण नंतर लवकरच भेटू ,थॅंकं यू ! म्हणत ती हळुवार पावले टाकीत निघून गेली .तिच्या प्रत्येक पावलावर डॅनियलच्या हृद्याची स्पंदने वाढत होती .

ती रात्र मात्र डॅनियला फारच बेचैन करून गेली.एकतर आशा श्रीमंती थाटात झोपण्याची त्याला कधी सवय नव्हती ,त्यात रोझीचा तो सुंदर चेहरा त्याच्या डोळ्या समोरून जात नव्हता. त्याच्या डोक्यात वेगवेगळे विचार येऊ लागले.समजा ही रोझी आपल्या प्रेमात पडली व ती आपल्याशी लग्न करण्यास तयार झाली तर एका दगडात दोन पक्षी.सुन्दर स्त्री व तिच्या सोबत श्रीमंतीही.ही गोष्ट इतकी सोपी असेल ,तिचा बाप हे असे कांहीतरी होऊन देईल,कुणास ठाऊक हे लोक कसे आहेत ? करारनामा कांही जरी असला,तरी आपण त्याला होकारच देणार आहोत व हे त्या रोझी साठीच.

सकाळ झाली ,सर्व मंडळी डायनिंग रूम मधील टेबलावर हजर होती ऱोझी,ब्रॅडन,त्यांचे मॅनेजर हे सर्व न्याहारी साठी उपस्थित होते . मॅनेजरने आपला करारनामा डॅनियला दाखविला.ब्रॅडन यांनी सांगितल्या पेक्षा विशेष असे कांहीच त्या मध्ये नव्हते .डॅनियलने ह्या सर्व अटी विनाशर्त मान्य केल्या व आज पासून रोझीला शिकविण्याची जबाबदारी त्याने स्वीकारली .अशा प्रकारे रोझीची शिकवणी आज पासून सुरु झाली. एका स्वतंत्र खोली मध्ये या शिकवणीची व्यवस्था करण्यात आली होती.त्यांच्या तैनातीला एक दोन नोकरही देण्यात आले होते.सुरवातीला डॅनियल रोझीशी फारच संकोचाने बोलत होता त्या मानाने रोझी दिलखुलास व मोकळ्या मनाने बोलत आसे. तिला कुठल्या गोष्टी शिकविण्यास आवश्यक आहेत ,याची माहिती घेण्यास त्यांने सुरवात केली.अधून मधून तो तिला खाजगी ,वैयक्तिक प्रश्र्न देखील विचारीत असे .उदा: रोझी तुझ्या शिवाय ह्या घरात दुसरी कोणी स्त्री आहे का ? म्हणजे तुझी आई किंव्हा इतर कोणी," माझी आई माझ्या लहानपणीच वारली.मला दुसरी कोणीही बहिण अथवा भाऊ नाही " मात्र ह्या वैयक्तिक गोष्टी रोझी थोडक्यात सांगून मूळ विषयाला बगल देत असल्याचे डॅनियलच्या लक्षात येऊ लागले.

जस जसे दिवस जाऊ लागले तस तसे दोघांच्यातील मोकळे पणा,हास्य विनोद ,एक मेकावर केलेल्या टिपण्या वाढू लागल्या .ते नक्कीच एक मेकाच्या जवळ येऊ लागले.डॅनियला देखील हेच अपेक्षित होते.आगदी प्रत्येंक गोष्ट त्याच्या मनासारखी होत होती .थोड्क्यात तो रोझीच्या प्रेमाने खुळा झाला होता व रोझीला देखील आपल्या सारखे वाटत असावे,अशी त्याची खात्री होऊ लागली .

एक दिवस आपण आपल्या मनातील गोष्ट रोझीला सांगावी, असे त्याने मोठ्या धाडसाने ठरवले व तसे त्यांने रोझीला सांगून टाकले देखील . "हे बघ रोझी ! मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. ह्या खोलीत सर्व नोकरदारांच्या समोर आपण बोलणे योग्य नाही .तुझ्या पित्याला हे कळले तर तो मला ह्या घरातून हाकलून देईल.तुला माझ्या बद्दल खरोखरच काय वाटते ते तू मला सांग.? रोझीला देखील हे ऐकल्यावर धक्काच बसला.ती पण थोडी भांबावून गेली.तिने स्वत:ला सावरले व ती म्हणाली " डॅनियल मलाही तुझ्याशी खूप बोलायचे आहे ,मात्र ह्या महालात हे शक्य नाही,य़ावर एकच उपाय, मध्यरात्र झाली, कि तू हळूच माझ्या खोलीत ये.मी माझ्या खोलीचा दरवाजा आतून बंद करणार नाही,मात्र माझ्या खोलीत मी कुठलाही दिवा लावू शकणार नाही कि तुझ्याशी मोठ्याने बोलू शकणार नाही.य़ात तुला खूप सावधगिरी बाळगावी लागेल अन्यथा पकडला गेलास, तर माझे वडील तुझे काय हाल करतील कुणास ठाऊक? मग ठरले तर, रात्री भेटू !" असे म्हणून ती निघून गेली . हे ऐकल्यावर डॅनियल आतून आंनदाच्या उखळ्या फुटू लागल्या. तसेच त्याला भीतीही पण वाटू लागली.आपण ठरवलेल्या गोष्टीना यश येऊ लागले आहे ,असे त्याला जाणवू लागले .

आता मात्र डॅनियल रोझीला भेटायला फारच उत्सुक झाला होता. क़धी एकदा मध्य रात्र होते असे त्याला वाटू लागले.प्रत्येक क्षणाचा ठोका विलंबाने पडू लागला आहे कि काय!,असे त्याला वाटू लागले. शेवटी रात्रीचा एक वाजला,तसा तो हळूच दबक्या पावलाने आपल्या खोलीच्या बाहेर पडला.बाहेर आल्यावर त्याला खूप थंडी जाणवू लागली.भितीने त्याच्या कानाच्या पाळ्या उगीचच गरम झाल्या सारख्या जाणवू लागल्या.त्याच्या हृदयाची स्पंदने फारच वाढत होती .दबक्या पावलाने तो रोझीच्या खोली जवळ पोहचला.त्यांने तिच्या खोलीचा दरवाजा हळुवार पणे उघडला व तो आत शिरला.आत शिरताच त्याला सुंदर अत्तराचे वास येत होते .सुरवातीला त्या अंधाऱ्या खोलीत त्याला कांहीच दिसेनासे झाले.अंधुक चंद्र प्रकाशात तो कसाबसा रोझीच्या बिछान्या जवळ पोहचला.तिथेच त्याला आंधारात रोझीचा पुसट चेहरा दिसला व तिच्या बाहुपाशात तो विसावला.खऱ्या अर्थाने त्याला आज रोझी भेटली होती ,मात्र हि भेट निशब्दच,आंधाराच्या साक्षीने होती.

सकाळी न्याहरी साठी सर्व जण एकत्र जमले होते.डॅनियलने हळूच रोझी कडे पहिले, तसे तिने त्याच्या कडे पाहून छान स्मित हस्य केले. क़ाल रात्री जणू कांही घडलेच नाही ह्या आवीर्भावात रोझी दिसत होती .

आता मात्र रोझीला रात्री भेटण्याच्या घटना,डॅनियल कडून वारंवार होऊ लागल्या .त्या नंतर ज्या ज्या वेळी सकाळी तो रोझीला भेटत आसे तेंव्हा तिचा आविर्भाव जणू कांही घडलेच नाही असा होता.तो ज्या वेळी ह्या गोष्टीची आठवण रोझीला करून देत असे त्या वेळी मात्र रोझी त्याचे बोलणे कटाक्षाने टाळू लागली.डॅनियला मात्र सारखे असे वाटू लागले कि हि प्रेमाची गोष्ट आपण दोघांनी तिच्या पित्याला सांगावी व त्यांची लग्नास समंती मिळवावी मात्र एकट्या डॅनियलाचे असे कांही धाडस होईना.आता रोझी त्याल दुर्लक्षित करु लागली. हा विषय सोडून ती डॅनियलाशी बोलत असे. सकाळी ती त्याचाशी परक्या सारखी वागत आसे मात्र रात्र होताच ज्या ज्या वेळी डॅनियल तिला भेटत असे त्या वेळी मात्र तिला कुठल्याही गोष्टीचा संकोच वाटत नसे. डॅनियल देखील तिच्या ह्या विचीत्र वागण्याने चक्रावून गेला.आता मात्र त्याचा संयम सुटला होता.एक दिवस त्याने रागाने रोझीचा हात हातात धरला व तिला त्यांने खडसावून विचारले " रोझी हे असे किती दिवस चालणार? आपल्याला हि गोष्ट तुझ्या पित्याला एक ना एक दिवस सांगावीच लागणार.हे ऐकल्या वर रोझीने क्रोधाने आपले डोळे विस्फारले तिने आजू बाजूला कोणी नाही याचा कानोसा घेतला व ती डॅनियलाशी रागाने बोलू लागली "माझीही सहनशक्ती आता संपली आहे ऱोज रोज खोटे बोलणे ,खोटे पणाने वावरणे हे मलाही आता शक्य नाही .डॅनियल मी एक विवाहीत स्त्री आहे.मला एक लहान मुलगा देखील आहे.माझा नवरा व माझा मुलगा हेच माझे विश्व आहे व त्यांच्यावर माझे जीवापाड प्रेम आहे ."

मग तू जे रात्री मला भेटत होतीस, ते काय होते ? "- डॅनिअयल ,

तू रात्री जिला भेटतोस ती माझी जुळी बहिण नॅसी आहे.आम्ही दोघीही बऱ्यापैकी एक सारख्या दिसतो. नॅसी हि कांही दुर्घर आजाराने ग्रासली आहे.माझ्या वडिलांचे तिच्यावर जिवापाड प्रेम आहे.ती बरी व्हावी म्हणून माझ्या वडिलांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला.जगातील सर्व तज्ञ डॉक्टरना तिला दाखवले मात्र कुणालाही यश मिळाले नाही.शरीरावरील बऱ्या न होणाऱ्या जखमा मुळे ती बहुतेक काळ बिछान्यावर पडूनच असते.तिची मानसिक अवस्था ठीक नाही.जगातील सर्व सुख हे आपल्या बहिणीलाच मिळाले आहे या कल्पनेतून ती माझा व्देष करते . या वरुन ती माझ्या वडिलांशी सातत्याने वाद घालत असते व सारखी भांड्ण करीत असते. या कारणावरून तिने माझ्या पतीला व मुलाला देखील या घरातून बाहेर हाकलून दिले आहे. कदाचित ती आता कांही दिवसाचीच आमची सोबती असेल. मला मिळालेले सर्व सुख नॅसीला देखील मिळावे ह्या कल्पनेतून माझ्या वडिलांनी खेळलेला हा एक धूर्त डाव होता. नाईलाजाने मलाही त्यांनी ह्या कटात सामील करून घेतले आहे. य़ा पूर्वी देखील त्यांनी असे अनेक तरुणांना फसवले आहे.डॅनियल तुम्ही हुषार आहात ,या दृष्ट्चक्रातुन तुम्हाला बाहेर पडायचे असेल तर तुम्ही लवकरात लवकर इथून निघून जा,नाहीतर हि गोष्ट कदाचित तुमच्या जिवावरही बेतू शकेल. गुड बाय मिस्टर डॅनियल !!! " . आपल्या डोळ्यातील आश्रू पुसत ती वेगाने तिथून निघून गेली.हे ऐकल्या वर डॅनियल मात्र गर्भगळीत झाला. त्याल काय करावे तेच सुचेना. ज़गामध्ये स्वत:च्या स्वार्था साठी लोक कोणत्या थराला जातील कुणास ठाऊक ! डॅनियल आपल्या खोलीत आला ,त्याने आपली बॅग भरली व तो घरा बाहेर पावले टाकीत चालू लागला .

(श्री जयंत कुलकर्णी यांनी लिहीलेली "नकतोड्या " हि सुंदर कथा वाचल्या नंतर ,मला एक जुना रिजनल चित्रपट पाहिल्याची आठवण झाली .तो कोणत्या भाषेत होता ,त्याचे नाव मला आठवत नाही.मात्र त्याच्या सबटायटल्स मात्र इंग्रजी मधून होते.बहुतेक तो फ़्रेंच चित्रपट आसावा. य़ातील जुळ्या बहिणीची कल्पना डोळ्या समोर ठेऊन मी हि कथा लिहीली आहे .तसेच यातील कांही गोष्टी आपल्या संस्कृतीशी निगडीत नसल्या मुळे, मी या कथेचा पाया पाश्र्चिमात्या शिष्टाचारा प्रामाणेच लिहीला आहे )

कथालेख

प्रतिक्रिया

एस's picture

14 Sep 2015 - 4:20 pm | एस

कथा आवडली!

मुक्त विहारि's picture

14 Sep 2015 - 4:32 pm | मुक्त विहारि

आणि, तशीच तुमची कथा शैली देखील.

सस्नेह's picture

14 Sep 2015 - 4:52 pm | सस्नेह

छान आहे कथा.

द-बाहुबली's picture

14 Sep 2015 - 4:57 pm | द-बाहुबली

मी एक अरेबीक कथा (मराठीत) समग्रपणे याच आशयाची वाचल्याचे आठवत आहे. डिट्टो.

पद्मावति's picture

14 Sep 2015 - 9:22 pm | पद्मावति

मस्तं आहे कथा. खूप छान. आवडली.

मांत्रिक's picture

14 Sep 2015 - 9:34 pm | मांत्रिक

सुंदर कथा! आवडली! थोडंसं शुद्धलेखनाकडे लक्ष द्या भौ!

बोका-ए-आझम's picture

14 Sep 2015 - 11:47 pm | बोका-ए-आझम

बाबा कदमांची एक कथा - अशीच पण भारतीय पार्श्वभूमीवर वाचलेली आठवतेय. पण तिचा शेवट वेगळा होता. यात वडिलांची व्यक्तिरेखा नकारात्मक आहे, त्यात ती सकारात्मक होती. बाकी कथा उत्तम रंगवली आहे.

ब़जरबट्टू's picture

15 Sep 2015 - 9:28 am | ब़जरबट्टू

मस्त...

प्रचेतस's picture

15 Sep 2015 - 9:59 am | प्रचेतस

छान लिहिलंय. कथा आवडली.

आपण दिलेल्या प्रतिक्रीये बद्द्ल मि तुमचा मनापासुन आभारी आहे

gogglya's picture

23 Sep 2015 - 4:50 pm | gogglya

शेवटची कलाटणी आवडली. अजून थोडा धक्का वाढवता आला असता तर खुमारी वाढली असती.