सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. असे आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

.बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही ..

Primary tabs

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
5 Sep 2015 - 9:27 pm

चहु दिशांत पसरे कीर्ती, जग तुझिया पायावरती
पण अवखळ गोकुळवासी, मज कृष्ण भेटला नाही
....... किती काळ उलटला राधे ,नित नवीन दिसशी तूही
....... जरी रूप बदलले त्याचे, तो कृष्ण वेगळा नाही
तो परतून आला तरीही, माझा ना उरला काही
दमले मी शोधून त्याला , मज कृष्ण भेटला नाही
....... उमगता मोल नात्याचे गेलेला परतून येई
....... समजून तयाला घे तू , तो कृष्ण वेगळा नाही
सर्वस्व वाहिले त्याला , काही ना बाकी उरले
मी स्वत:स हरवून बसले , मज कृष्ण भेटला नाही
.........इतुके न कुणाला द्यावे, की भार तयाचा व्हावा
........ बघ तुझ्यात लपला आहे , तो कृष्ण वेगळा नाही
या नात्यातील उपेक्षा मी मूक साहिली नाही
बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही
........ राधेची निर्मम प्रीती , गोपास बनविते कृष्ण
........ मिटल्या नयनांनी बघ तू , तो कृष्ण वेगळा नाही

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

अजया's picture

5 Sep 2015 - 9:28 pm | अजया

अप्रतिम!

तुषार काळभोर's picture

7 Sep 2015 - 6:41 am | तुषार काळभोर

.

सुंदर कविता आहे! शेवटचे कडवे फारच छान.

चौथा कोनाडा's picture

5 Sep 2015 - 9:40 pm | चौथा कोनाडा

अतिशय सुंदर !

दमले मी शोधून त्याला , मज कृष्ण भेटला नाही >>

क्या बात है |

बिन्नी's picture

5 Sep 2015 - 9:45 pm | बिन्नी

खूपच सुंदर कविता आहे ही

प्यारे१'s picture

5 Sep 2015 - 9:58 pm | प्यारे१

वाह!

मितान's picture

5 Sep 2015 - 10:01 pm | मितान

कित्ती सुंदर ! अप्रतिम !!!

मित्रहो's picture

5 Sep 2015 - 10:03 pm | मित्रहो

व्वा क्या बात है

मांत्रिक's picture

5 Sep 2015 - 10:27 pm | मांत्रिक

सुंदर आध्यात्मिक अनुभव! कृष्णाच्या मोरपिसासारखी सुरेख कविता! मानवाच्या मनातील गोपीने परमात्मरूप कृष्णाला दिलेली हाक! खूप क्षीण असते की काय कुणास ठाऊक ही हाक! त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही. आणि मग आत्म्याची परमात्म्यापर्यंत पोहोचण्यास झालेली ही तगमग! सुंदर!!!

काव्य रसग्रहण एका वेगंळ्या अंगाने म्हणून मूळ कविते प्रमाणेच आवडले. साध्या आणि आध्यात्मिक दोन्हीही दृष्टीने '.........इतुके न कुणाला द्यावे, की भार तयाचा व्हावा' हे कवियत्री नेमके कशा बद्दल म्हणते आहे ते अद्याप नीटसे उलगडले नाही.

मांत्रिक's picture

6 Sep 2015 - 7:45 pm | मांत्रिक

कवितेतील ज्या ओळी अक्षराने सुरु होतात, ते राधेचे मनोगत व ज्या ओळी टिंब टिंबने सुरु होतात ते कृष्णाचे मनोगत, असा माझा दृष्टिकोण. कदाचित कवयित्रीचा वेगळा असू शकतो. पण मी म्हणतो तसे वाचून पहा, उलगडा होईल.

मांत्रिक's picture

6 Sep 2015 - 7:54 pm | मांत्रिक

.........इतुके न कुणाला द्यावे, की भार तयाचा व्हावा
........ बघ तुझ्यात लपला आहे , तो कृष्ण वेगळा नाही
या ओळींचा माझ्या मते असा अर्थ आहे:
भक्ताचे आत्यंतिक द्वैती प्रेम भगवंतालाही असह्य होते. मग भगवंत भक्ताला अद्वैतवादाची जाणीव करुन देतो की अरे तू व मी एकच... उत्तिष्ठ जाग्रत प्राप्यवरान्निबोधत!!!
तुम्हाला अद्वैत मताची चांगलीच माहिती आहे, म्हणून थोडक्यात देतोय. नाहीतर यावर तासचे तास बोलावे लागेल.

माहितगार's picture

7 Sep 2015 - 9:35 am | माहितगार

ह्म्म.. 'तुझ्यात लपलेला कृष्ण कुणाला देऊ नकोस की त्याचाच(त्याला शोधत बसण्याचा) तुला भार तुला व्हावा' असे काहीसे ?

प्राची अश्विनी's picture

7 Sep 2015 - 3:04 pm | प्राची अश्विनी

एव्हढ्या रसपूर्वक कविता वाचलीत , खुप बरे वाट्ले.
मांत्रीक यांनी सांगितल्याप्रमाणे हा राधाकृष्ण संवाद आहे. राधेच्या तक्रारीला कृष्णाने दिलेली उत्तरे.
राधा म्हणते, " मी तुला माझे सर्वस्व दिले, इतके की आता माझ्याजवळ माझे असे काहीही उरले नाही ,मी देखिल माझी राहिले नाही. एवढे करूनसुद्धा तू मात्र काही माझा झाला नाहीस. "
त्यावर कृष्ण उत्तरतो, " अग दुसर्‍याला जे काही द्यायचे (अगदी सर्वस्व अर्पण करणे हे देखील )त्याचा बोझ ते घेणार्‍याला (किंवा दात्यालासुद्धा) वाटू नये इतपतच द्यावे. आणि तू एकीकडे म्हणतेस की,मी माझी उरले नाही आणि तक्रार करतेस की तो माझा झाला नाही.(हा विरोधाभास नाही का ?) जरा एकदा स्वतःमध्ये डोकावून पहा बरं, तुला ज्याचे दर्शन होइल तो कृष्णच आहे, कुणी वेगळा नाही ."

माहितगार's picture

7 Sep 2015 - 3:09 pm | माहितगार

त्यावर कृष्ण उत्तरतो, " अग दुसर्‍याला जे काही द्यायचे (अगदी सर्वस्व अर्पण करणे हे देखील )त्याचा बोझ ते घेणार्‍याला (किंवा दात्यालासुद्धा) वाटू नये इतपतच द्यावे. आणि तू एकीकडे म्हणतेस की,मी माझी उरले नाही आणि तक्रार करतेस की तो माझा झाला नाही.(हा विरोधाभास नाही का ?) जरा एकदा स्वतःमध्ये डोकावून पहा बरं, तुला ज्याचे दर्शन होइल तो कृष्णच आहे, कुणी वेगळा नाही ."

सिंप्ली ग्रेट ! आवडले

माहितगार's picture

7 Sep 2015 - 3:11 pm | माहितगार

कविता यासाठीही आवडली की पत्नीला आणि मुलीला हि कविता एकाचवेळी आणि तेही घरातील वडीलधार्‍यांसमोर सहजपणे वाचून दाखवू शकलो. धन्यवाद

प्राची अश्विनी's picture

7 Sep 2015 - 3:26 pm | प्राची अश्विनी

__/\__

विशाल कुलकर्णी's picture

8 Sep 2015 - 11:29 am | विशाल कुलकर्णी

मला वाटते विद्या सप्रेंच्या 'कृष्णमयि' मध्ये एक वाक्य आहे.
"प्रेम करण्यात जे ऐश्वर्य आहे ते प्रिय होवून बसण्यात मुळीच नाही. म्हणून फक्त प्रेम करावं निष्पाप, निष्पक्ष, निरागस. राधेसारखं, मीरेसारखं."

सुंदर झालीय कविता !

प्राची अश्विनी's picture

8 Sep 2015 - 4:31 pm | प्राची अश्विनी

सुंदर! नक्की वाचेन हे पुस्तक. अरुणा ढेरेंची कृष्णकिनाऱ्यातील राधा पण छान आहे.

प्राची अश्विनी's picture

6 Sep 2015 - 11:14 am | प्राची अश्विनी

धन्यवाद सर्वांनाच!

नूतन सावंत's picture

6 Sep 2015 - 12:01 pm | नूतन सावंत

सुरेख

स्वाती राजेश's picture

6 Sep 2015 - 12:25 pm | स्वाती राजेश

छान लिहिली आहे. .मस्त..

पैसा's picture

6 Sep 2015 - 12:29 pm | पैसा

सुंदर कविता!

मनिमौ's picture

6 Sep 2015 - 12:31 pm | मनिमौ

यथार्थ वर्णन केले आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Sep 2015 - 1:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता.

-दिलीप बिरुटे

अंतरा आनंद's picture

6 Sep 2015 - 4:32 pm | अंतरा आनंद

सुंदर.

पद्मावति's picture

6 Sep 2015 - 6:17 pm | पद्मावति

सुरेख कवीता. आवडली.

एक एकटा एकटाच's picture

6 Sep 2015 - 6:22 pm | एक एकटा एकटाच

अप्रतिम

शब्दांची रचना म्हणून सुरेख.
पण बर्‍याच उपमा कळल्या नाहीत. मूळ म्हणजे कोण कुणाला कधी काय म्हणतय तेच कळले नाही. बिटविन द लाईन्स काही असेल तर पास.
माझा कवितेतला अडाणीपणा असेल बहुतेक. :(

मांत्रिक's picture

6 Sep 2015 - 7:46 pm | मांत्रिक

कवितेतील ज्या ओळी अक्षराने सुरु होतात, ते राधेचे मनोगत व ज्या ओळी टिंब टिंबने सुरु होतात ते कृष्णाचे मनोगत, असा माझा दृष्टिकोण. कदाचित कवयित्रीचा वेगळा असू शकतो. पण मी म्हणतो तसे वाचून पहा, उलगडा होईल.

प्राची अश्विनी's picture

7 Sep 2015 - 3:06 pm | प्राची अश्विनी

फार सुंदर रितीने समजून घेतलीत, धन्यवाद !

बोका-ए-आझम's picture

6 Sep 2015 - 8:00 pm | बोका-ए-आझम

फारच सुंदर. राधेची निर्मम प्रीती , गोपास बनविते कृष्ण हा एकदम वेगळा दृष्टीकोन वाटला. नेहमी आपण प्रत्येक गोपी राधा झाल्याचं वाचलंय किंवा ऐकलंय पण प्रत्येक गोप कृष्ण झाला हे पहिल्यांदाच!

अभ्या..'s picture

6 Sep 2015 - 8:11 pm | अभ्या..

Krisna

'राधेची निर्मम प्रीती, गोपास बनविते कृष्ण' यास एकापेक्षा अधीक अर्थछटा आहेत असे वाटते का ?

कवितारुपी संवाद राधाकृष्णाच्या काळात सुरू होतो, आणि आजच्या काळात येउन थांबतो.
आजची प्रेयसी म्हणते , मला राधेसारखं अशारिरीक, अविचल आणि अखंड प्रेम करणं (राधा बनणं) जमणार नाही कारण त्यासाठी कॄष्ण मिळावा/ जीवनात यावा लागतो.
त्यावर कॄष्ण उत्तर देतो, राधेचं अस्तित्व कॄष्णामूळे नसून, कॄष्णाचं कॄष्णपण हे राधेमुळं आहे. म्हणून जेव्हा तू राधेसारखी निर्मम प्रीती करशील, तेव्हा तो तुझा प्रियकर कॄष्णच असेल.

माहितगार's picture

7 Sep 2015 - 3:50 pm | माहितगार

"बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही" या ओळीचं सरल वाचन मी "या नात्यातील उपेक्षा मी मूक साहिली नाही" या ओळी सोबत कृष्णा, तू उपेक्षा केलीस म्हणून मी तुझी राधा राहु शकले नाही हे जरा लटक्या रागाने असावे किंवा कृष्णाने राधेत राधा पाहील्याशिवाय राधा राधा कशी असेल ? या अर्थ छटा विचारात घेऊन केले. काळाचा फरक तुम्ही सांगीतलात म्हटल्यावर आणखी वेगळी आणि कवियत्रीची स्वतःची अर्थछटा कळाली.

बाकी मांत्रिक यांच्या प्रमाणे मीपण या ओळींचे अध्यात्मिक अर्थासहीत वाचन केले ते परमेश्वराने केलेली उपेक्षा मी मुकपणे सहन केली नाही परमेश्वरा तू मला भेटला नाहीस किंवा भक्तातला भक्त पाहू शकला नाहीस म्हणून मी तुझ्या भक्तांच्या यादीत नाही जा! हा भक्ताचा लटका राग झाला. :)

धन्यवाद.

पु.ले.शु.

स्वाती दिनेश's picture

6 Sep 2015 - 8:33 pm | स्वाती दिनेश

कविता आवडली.
स्वाती

सुंदर थरांची !

अर्थवाही.

पगला गजोधर's picture

7 Sep 2015 - 8:39 am | पगला गजोधर

10 out of 10

माहितगार's picture

7 Sep 2015 - 9:44 am | माहितगार

शालेय आणि महावैद्यालयीन अभ्यासक्रमास लावावयास हवी असे वाटले !

अमृत's picture

7 Sep 2015 - 9:51 am | अमृत

खूप आवडली

माहितगार's picture

7 Sep 2015 - 9:55 am | माहितगार

या कवितेतून राधा-कृष्ण संवादातून भारतीय संकल्पनेतील प्रणयाची जाणीव होते. भारतीय संकल्पनेतील प्रणयाची दखल घेण्याच्या मराठी विकिपीडियातील प्रणय या लेखातून केलेला आहे.

प्रीत-मोहर's picture

7 Sep 2015 - 10:12 am | प्रीत-मोहर

क्या बात है!!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

7 Sep 2015 - 3:08 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सुंदर रचना...

प्राची अश्विनी's picture

7 Sep 2015 - 3:23 pm | प्राची अश्विनी

सर्वांनाच धन्यवाद!

शिव कन्या's picture

7 Sep 2015 - 8:31 pm | शिव कन्या

मनभावन कविता.
अशाच लिहित्या रहा. आम्ही वाचत्या राहू.
हि कविता वाचून कधीकाळी ऐकलेली कथा 'दूध पोळलं' च्या निमित्ताने वर आली.
दुसऱ्याला लिहीतं करणारी तुमची कविता ग्रेट!
शुभेच्छा.

कपिलमुनी's picture

7 Sep 2015 - 9:57 pm | कपिलमुनी

सहसा या भागात येत नाही पण ही कविता खूप सुंदर

अदि's picture

8 Sep 2015 - 10:48 am | अदि

रचना!!

मीता's picture

8 Sep 2015 - 3:06 pm | मीता

कविता खूप सुंदर

संवादाच्या लयीत लिहिण्याची शैली आवडली. बाकी मीरा पुर्णपणे कृष्णमय झाल्यामुळे तिच्याकडुन अश्या तक्रारी कधी आल्याच नसतील ना?

तिमा's picture

8 Sep 2015 - 4:38 pm | तिमा

मीरेची केस वेगळी आहे. तिला सिझोफ्रेनिया झाल्यामुळे कृष्ण आपला नवराच आहे असे वाटत होते. आयुष्यभर ती त्याच धुंदीत वावरत होती.

प्राची अश्विनी's picture

8 Sep 2015 - 4:46 pm | प्राची अश्विनी

सिझोफ्रेनिया....
हहपुवा.:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Sep 2015 - 7:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ही गोष्ट खरीच आहे. मीरा एकतर्फी प्रेमात वेडीच झाली.
एक उत्तरप्रदेशमधील आयजी डी.के. पांडा असेच म्हणावे लागतील.
स्वतःला कृष्णाची दुसरी राधा समजत होते.

-दिलीप बिरुटे

मांत्रिक's picture

10 Sep 2015 - 10:14 pm | मांत्रिक

मिरेला स्किझोफ्रेनिया? धन्य आहात! तुम्हाला मीरा कधी कळूच शकत नाही मग! आपापली कुवत समजण्याची!
उगाच नाही सहस्रकात एकच अशी मीरा निर्माण होत!
असो, तुमच्या मानसिकतेला शुभेच्छा!!! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Sep 2015 - 11:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मीरा समजली नसेल हे मत मला मान्य आहे. सर्वच सर्वांना कळलं पाहिजे असं काही नाही. माझं काही वाचन नाही, मिरेला समजुन घेता आलं नाही. मिरा जेवढी कळली ती अशी....

मीरेला नेमका स्किझोफ्रेनिया होता का याचं मला निदान करता येणार नाही, तिचं वेड कोणतं होतं तेही मला सांगता येणार नाही, वाचनातही नाही. पण कोणत्या तरी एक वेडाचा प्रकार असावा असे नक्की वाटते. बालपणी आईला विचारलं की माझं लग्न कोणाशी होणार आहे, आई म्हणाली कृष्णाशी. झालं ! कृष्ण वेडाला इथूनच सुरुवात झाली. अध्यात्मिक वेड अंगात भिनलं ते भिनलंच. पुढे राजपुत्राशी लग्न झाल्यानंतर आणि त्याचं निधन झाल्यानंतर लोकांनी तिला सतीजावं यासाठी प्रयत्नही केले पण ती सती गेली नाही, ती म्हणाली माझा नवरा कृष्ण आहे. पुढे संसारात आलेल्या या विरक्तीने कृष्ण भक्तीत तन्मयतेने नाचत राहणे, गीत गात राहणे हे तिनं स्वीकारलं. मिरा एक राजघराण्यातली वधु असल्या कारणाने विवाहानंतर तिच्यावर विष प्रयोग केले गेले. कृष्ण भक्ती आणि प्रेमामुळे त्या विषाचा कोणताच परिणाम झाला नाही.(क्या बात है ) तिला गुरु म्हणुन संत रोहिदास हे लाभले. पुढे ती वृंदावन आणि द्वारकेत गेली. आणि एक दिवस द्वारकेच्या कृष्ण मंदिरात ती अंतर्धान पावली. इतकीच वेडी मिरा मला कळली. .

'' हरी मेरे जीवन प्रान अधार।
और आसरो नाहीं तुम बिन तीनूं लोक मंझार।।
आप बिना मोहि कछु न सुहावै निरख्यौ सब संसार।
मीरा कहै मैं दासि रावरी दीज्यो मती बिसार ''
(पदं जालावरुन साभार)

कृष्णप्रेमाच्या नादात मिरा वेडी झाली तिची सर्व पदं कृष्ण.. कृष्ण... कृष्ण.....प्रभु गिरधर... अशीच दिसतात. आता एक सुंदर मिरेचं आयुष्य अध्यात्मिकतेच्या वेडात बुडुन गेलं की तीचं आयुष्य तरुन गेलं हा ज्याच्या त्याच्या बघण्याचा प्रश्न आहे.

मिरा काय आहे, ते जरुर लिहा एका नव्या धाग्यात. आम्ही येऊच तिथेही. ’बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही’ या अतिशय सुंदर कवितेत कवयत्रिची क्षमा मागुन माझं अवांतर थांबवतो.

जाता जाता : आकाशवाणीचं हे औरंगाबाद केंद्र आता ऐका ''साधी भोळी मिरा तुला कळली नाही, तुझी माझी प्रित कधी जुळली नाही”

-दिलीप बिरुटे
(वेडा गिरधर)

अभ्या..'s picture

13 Sep 2015 - 11:18 am | अभ्या..

सर नमस्कार करतो हो.
आता बघतो एकेकाला.
.
अभ्या
(येडा आर्जुन्या)

मांत्रिक's picture

13 Sep 2015 - 11:24 am | मांत्रिक

माफ करा डाॅ. साहेब! माझा प्रतिसाद तुम्हाला उद्देशून नव्हता. अपुर्या माहितीवर स्फोटक विधाने करणे हा नक्कीच तुमचा स्वभाव नव्हे. बरं, आत्तासुद्धा जो प्रतिसाद दिलात त्यातून तुमची अभ्यासू वृत्ती, सामंजस्य व परमत सहिष्णुता दिसून येते. हां, माझा प्रतिसाद नक्की कुणाला उद्देशून होता हे न लिहिल्याने निष्कारण गैरसमज झाले. त्यासाठी पुन्हा एकदा क्षमस्व!

माहितगार's picture

13 Sep 2015 - 12:04 pm | माहितगार

बिरुटेसर मी आक्षेप अध्यात्मिक अथवा हिंदूत्ववादी श्रद्धेतून घेत नाहीए. इंग्रजी विकिपीडियावर संत मिराबाईंच्या बद्दल जी अभ्यासकांची मते नोंदवली आहेत त्यानुसार सदर आख्यायिकांना सुस्पष्ट ऐतिहासिक आधार दिसत नाही. तसा आधार आपल्याकडे असल्यास संदर्भ नमुद करणे श्रेयस्कर ठरते किंवा कसे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Sep 2015 - 4:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझ्याकडे कोणताही संदर्भ नाही. (उगाच तुम्हाला कामाला लावायची सवय आहे. ह. घ्या). :)
आता संत मिरेबद्दल काही माहितीपूर्ण दस्तऐवजे सापडला तर इथे हजर होईन नै तर हा विषय संपला.

-दिलीप बिरुटे

तिमा's picture

11 Sep 2015 - 4:54 pm | तिमा

वाचताय ना बिरुटेसाहेब,
स्किझोफ्रेनिया मीरेला नव्हे, आपल्यासारख्या विज्ञानवाल्यांनाच झालाय!

मूरखको तुम राज दियत हो
पंडित फिरत भिकारी
करमकी गति न्यारी |

मांत्रिक's picture

11 Sep 2015 - 5:09 pm | मांत्रिक

तुम्ही विज्ञानवाले म्हणजे तुम्हीच बरोब्बर! बाकी मीरा, ज्ञानेश्वर, तुकाराम, कबीर, रामकृष्ण परमहंस, नामदेव सर्व वेडे? आणि तुम्ही पंडित?
ठीक आहे. घ्या तुम्हाला पदवी लावून!
माझ्या दृष्टीने विषय बास! इतक्या चांगल्या धाग्याचा कात्रज नको.
करमकी गति न्यारी विज्ञानवादी असून यातली कर्माची गती बरी चालली तुम्हाला!

माहितगार's picture

11 Sep 2015 - 11:07 pm | माहितगार

मीरेची केस वेगळी आहे. तिला सिझोफ्रेनिया झाल्यामुळे कृष्ण आपला नवराच आहे असे वाटत होते. आयुष्यभर ती त्याच धुंदीत वावरत होती.

संत मीराबाई या माझ्या अभ्यासाच्या विषय नाहीत, जिथपर्यंत इंग्रजी विकिपीडियावरील संत मीराबाईंवरील लेख वाचला. संत मीराबाईंच्या आयुष्याबद्दलच्या बहुतांश दंतकथांना विशीष्ट ऐतिहासीक आधारांची जोड दिसत नाही. असंख्य शक्यतांपैकी एकच शक्यता घेऊन त्याला एकमेव सत्य म्हणून प्रदर्शीत करणे विज्ञानाच्या कोणत्या तत्वात बसते ?

प्राचीन इतिहासातील भास होऊन स्वतःला अमूक तमूक समजणार्‍या अनेक केसेस आहेत त्या पैकी कुणालाही सिझोफ्रेनिया असूही शकतो आणि निव्वळ तत्कालीन अंधश्रद्ध समाजाचा विश्वास मिळवण्याकरता आखलेली डेलीबरेट स्ट्रॅटेजी असू शकते किंवा इतरही काही शक्यता असू शकतील. जिथ पर्यंत भारतीय भक्ती परंपरेचा संबंध आहे भक्त त्याच्या इश्वराशी कोणतेही नाते कल्पित करू शकतो. भारतीय अद्वैत सिद्धांत व्यक्ती आणि परमेश्वर यातील कोणत्याही नात्यातून व्यक्त होणार अद्वैत स्विकारतो. त्या शिवाय जगातील असंख्य कवि आणि लेखक असंख्य कल्पना करून लिहित असतात उपरोक्त कवियत्रीच नशीब की तिने मज कृष्ण भेटला नाही .. असे लिहिले नाही तर या कवियत्रीलाही आणि जमले तर जगातील सर्व कलावंतांना आपण कदाचीत सिझोफ्रेनिया रोग्यांच्या पंगतीला बसवण्यास कमी करणार नाही.

बिरुटेसर कोणत्या अर्थाने लिहितात आपण कोणत्या अर्थाने लिहितो. हा.का.ना.का.
sandarbha hava

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Sep 2015 - 11:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झाड्लोट करी जनी । केर भरी चक्रपाणी
पाटी घेऊनिया शिरी । नेऊनिया टाकी दुरी
ऐसा भक्तासि भुलला । नीच कामे करु लागला
जनी म्हणे विठोबाला । काय उतराई होऊ तुला.

किंवा

जनी डोईने गांजली । विठोबा धावली
देव हाते बुचडा सोडी । उवा मारतसे तांतडी
केश विंचरुनी मोकळे केले । जनी म्हणे निर्मळ झाले.

भक्त भक्तीच्या पाय-या चढत आध्यात्मिक अशा उंचीला गेला की भक्त आणि परमेश्वर एक होतात आणि मग लौकिक पातळीवरचं जगणं अध्यात्मिक झालं की कृष्ण जात्यावर धान्य दळायला मदत करतो, केसातील उवा काढतो. भक्त आणि भगवंत एकरुप होतात, लौकिक जीवनाचा त्यांचा संबंध संपतो का ? असं म्हणायचं होतं.

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

13 Sep 2015 - 1:09 pm | माहितगार

प्रत्येक चांगल्या गोष्टीत, कृत्यात आणि व्यक्तीत इश्वर बघणे भारतीय संस्कृतीचा भाग आहे, एवढेच नव्हे असे करणार्‍याला भारतीय संस्कृती आणि भारतीय कथासुत्रे आदर्श मानतात. संतकाव्यातील सुवचनांना अभंगांचा अध्यात्मिक दर्शनांमधला अर्थ लावणे एक झाले. एखाद्या कविला अध्यात्मिक अर्थ अपेक्षीत असेल की नाही हेही निश्चित सांगता येत नाही.

"बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही .." याचा अध्यात्मिक अर्थ काढला जावा किंवा त्यांच्या अपेक्षेपलिकडे जाऊन काही अध्यात्मिक अर्थ निघू शकतो हे, प्राची अश्विनींना अपेक्षीतही नसेल. (आता मी पुढे जे लिहिणार आहे ते केवळ उदाहरण म्हणून प्राची अश्विनींनी माफ करावे) प्राची अश्विनी त्यांच्या जिवनात भावलेल्या एखाद्या खर्‍या खुर्‍या व्यक्ती बद्दलही कृष्ण म्हणून लिहीत असू शकतील, भारतीय काव्यालंकरांचे उपमा ते व्याजोक्ती काय काय अलंकार प्रकार आहेत तो आपल्या अभ्यासाचा विषय आहे. एकुण माझे म्हणणे की कल्पना करणे अलंकारीक रचना करणे व्यक्तीचा अधिकार आहे. लोकांनी वेडं म्हणाव एवढी पॅशन असणे हा सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे.

एखाद्या व्यक्तीने लिहिलेल्या काल्पनिक अलंकारांना श्रद्धावंतांनी शब्दप्रमाण म्हणून स्विकारल्यास ती काही वेळा अंधश्रद्धा होऊ शकते. त्याच व्यक्तीने लिहिलेल्या रचना काल्पनिकही असू शकतात हे लक्षात न घेता शब्दप्रमाण मानून त्यावरुन स्किझोफ्रेनियाची एकच शक्यता वर्तवणे विज्ञानास अनुसरून नाहीच त्या शिवाय अंधश्रद्धेच्याच नाण्याची दुसरी बाजू ठरते. माझा आक्षेप स्किझोफ्रेनीया ही अनेक शक्यतापैकी एक शक्यता असू शकते हे म्हणण्यास नाही माझा आक्षेप स्कीझोफ्रेनीया किंवा मानसिक रोगाचीच शक्यता आहे या पुरेसे आधार नसतानाच्या ठामपणाला आहे.

सामाजिक सुधारणा होत असलेल्या १९३०च्या काळात माधव ज्युलीयनांना केवळ विद्यार्थीनीशी संभाषण केले या कारणावरून जाचास सामोरे जावे लागले. आपण आतापेक्षा बरीच शतके आधीच्या समाजातील स्त्रीयांच्या काव्य रचनेचा विचार करत आहोत. मला 'प्राची अश्विनीं'च नाव पुन्हा नमुद करून त्यांच्या उल्लेखातला खरा कृष्ण कोण हे सांगण्यास त्यांना भरीस पाडायच नाहीए (प्राची अश्विनीं ह. घ्या.) पण आजच्या काळातही काही शहरी सुधारणा झालेला सुशिक्षीत झालेला भाग सोडला तर खर्‍या नवर्‍या शिवाय इतरही कृष्ण कुणी असू शकतो हे मोकळ्या मनाने स्विकारण्यास आजही भारतीय समाज कितपत सक्षम आहे ? संत मीराबाईंना तर साक्षात सती प्रथेचा सामना करावयाचा होता. त्यांचा बालविवाह त्यांच्या मनाप्रमाने नसेल तर कृष्णाचे नाव घेऊन त्यांनी त्या विवाहाचे अस्तीत्व नाकारण्याचे धाडसही दाखवले असेल. आणि त्यांचे धाडस नाकारणार्‍या समाजाने त्यांना वेडेपणाचा शिक्का मारला असेल असे काही झाले असल्यास सामाजिक सुधारणा न झालेल्या समाजाने मारलेले शिक्के व्यक्तीरेखांवर जबरदस्तीने सुधारणा झालेल्या समाजानेही वागवत ठेवण्या बद्दल मला जराशी साशंकता आहे एवढेच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Sep 2015 - 4:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'प्रतिभा ही वेडाची बहीण असते' असं एका इटालियन मानसशास्त्रज्ञ लोंब्रोसोने म्हटलं आहे. (आता संदर्भ विचारु नका. थोडा फार तर विश्वास ठेवा) वेडाच्या झटक्यात किंवा अचानक स्फुर्ती होते म्हणजे एकाकी स्फुरण येतं आणि पुढे लिहिणं, बडबडणं सुरु होतं. हं आता तुलसीदासांनी आपल्या खांद्याचं दुखणं दुर व्हावं म्हणुन काही रचना केलेली आहे, हा अपवाद सोडा. (संदर्भ विचारु नका विश्वास ठेवा) काही तरी क्षणात वीज चमकुन जाते आणि लिहायला सुरुवात होते.

संतांनी जे काव्यलेखन केलं ते ईश्वराची कृपेमुळे झालं अशी अनेक उदाहरणे आहेत. 'हा ग्रंथ नोहे, हे वैभव तिये कृपेचे' 'मज विश्वंभर बोलवितो. (संत ज्ञानेश्वर), आम्ही कोण म्हणुन काय पुसता आम्ही असू लाडके देवाचे' शारदेने कानमंत्र दिला म्हणुन केशवसुतांनी लिहिणे आणि परमेश्वराचा अनुग्रह झाला म्हणुन तुकारामांनी लिहिणे. माझी माय सरसोती हे सर्व माझ्याकडुन वदवून घेते असं बहिणाबाई चौधरी म्हणतात.(हा जो देवाचा झटका आहे, ते वेड आहे). ही जी संतमंडळी आणि लेखकाची भारावलेली अवस्था आहे ही प्रतिभा आहे. उत्कट भावनेचा अविष्कार आहे. आता या भावनिक अविष्करणाचा फ्लो जेव्हा अधिकच अधिक होतो तेव्हा त्याला शास्त्रीय काय नाव असेल मला माहिती नाही, पण ते वेड असतं आजाराची सुरुवात असावी असं वाटतं. काही लौकिक पातळीवर वावरत असतात तर काहींना आवरणे कठीण जातं. मला काही प्रतिभावंतांना वेडं ठरवायचं नाही. वर्डस्वर्थच्या भाषेत The spontaneous overflow of powerful feeling ही जी उत्कट अवस्था असते लिहिण्याची बडबडण्याची इच्छा जी स्फुर्ती असते. असं, अधिकच्या अवस्थेतील लेखन मला वाटतं मिरेचं असावं.

संत मिराबाई या पंडित होत्या की नव्हत्या मला माहिती नाही. धार्मिक ग्रंथांचं त्यांनी पठण केलं असं वाचुन आहे. म्हणजे शास्त्र पारंगत छंद व्याकरण, इ.इ. चौसष्ट कला, पुरुषार्थावरील वाचन, धर्मग्रंथ असे जर त्यांचे वाचन असते तर त्यांची प्रतिभा केवळ 'गिरीधर'साठी राहीली नसती. लौकिक आणि अलौकिक अशा पातळीवरचं त्यांचं जगणं एक सामान्य माणसाप्रमाणे आणि सामान्य माणसाच्या कल्याणासाठी झालं असतं. मुळात मिरेचा गुंता असा वाढला की ती एक तर सुंदर होती. अध्यात्मिकतेची आवड म्हणुन राजपुत्राला ती आवडली असावी पण हिचं वेड कदाचित राजपुत्र जीवंत राहीला असता तर कसं राहीलं असतं ती राजवाड्यातच भ्रमिष्टासारखी 'गिरीधर गिरीधर' करत राहीली असती अशी एक शक्यता वाटते. कदाचित एक आदर्श संतही तेव्हा बनुन राहीली असती.

कवीचा अनुभव व्यक्तिगत न राहता तो वैश्विक असला पाहिजे. केवळ स्वतःचे सुखदु:ख तो लेखनातून मांडत असेल तर त्याला एक संकुचितता येते, मिरा केवळ कृष्णमय झाली अर्थात ती प्रेमाचं प्रतिक म्हणायचं तर मला तसं काही म्हणायला अडचण नाही.

गोराकुंभार चिखल तुडवता तुडवता इतका तल्लीन झाला की मुल पायाखाली आला तरी तुडवत राहीला, ही अशी वैराग्याची अवस्था, जनीला विठ्ठल दळण कांडन करतांना तो विठ्ठल सोबतच काम करत असल्याचा भास व्हावा, ही अवस्था, आणि मीरेला आपला नवरा कृष्ण वाटावा ही अवस्था मला एकसारख्याच वाटतात. अर्थात या सर्व आख्यायिकांना माझ्याकडे काही आधार नाही. आणि अशा मनोवस्थेला शास्त्रीय दृष्ट्या काय म्हणतात तेही मला माहिती नाही.

चला आता प्राची अश्विनीकडे. (हलकेच घ्या हो) प्राची अश्विनी यांच्या जीवनात एक उणीव दिसत आहे. प्रेम करुनही काय रे हे, तु मला समजुन घेतलं नाही. इतक्या दिवसांनी आलास पण तो तु नाहीस. आणि तो म्हणतो काय हे, प्रेम तितकेच आहे तुला ते ओळखता येत नाही. मला राधा बनायचं होतं रे पण तुला कृष्ण होता आलं नाही. :)

गोविंदाग्रज म्हणतात-

प्रेम बोले, प्रेम डोले, प्रेमे जग हाले
प्रेमाखातर जगी आजवर काय नाही झाले.

बिचार्‍या मिरेच्या प्रेमावर अजून आता काथ्याकुट नको.....आपल्याला काही जमलं नाही, किमान थोरामोठ्यांच्या प्रेमाच्या गोष्टी देहभान हरपुन वाचत राहु. :)

-दिलीप बिरुटे

प्राची अश्विनी's picture

14 Sep 2015 - 4:33 pm | प्राची अश्विनी

बिरुटे सर तुम्ही एका ठिकाणी म्हणताय ,"कवीचा अनुभव व्यक्तिगत न राहता तो वैश्विक असला पाहिजे. "
आणि नंतर म्हणता,
"प्राची अश्विनी यांच्या जीवनात एक उणीव दिसत आहे. "
या दोन विधानात तुम्हारा विरोधाभास नाही वाटत?
पुढे
"प्रेम करुनही काय रे हे, तु मला समजुन घेतलं नाही. इतक्या दिवसांनी आलास पण तो तु नाहीस. आणि तो म्हणतो काय हे, प्रेम तितकेच आहे तुला ते ओळखता येत नाही. मला राधा बनायचं होतं रे पण तुला कृष्ण होता आलं नाही. "
हे मी म्हटलेले तुमच्या लक्षात आले तर या सर्व प्रश्नांना/ तक्रारींना दिलेली उत्तरे पण मी च लिहिली आहेत ना?
असो. उद्या "कळीदार कपुरी पान" वाचताना कवी राजा बढे कलावंतिणीच्या समवेत बसले होते.... असं तुम्ही म्हणाल. :)( हलकेच घ्या हो.:))

मला काही, प्रतिभावंतांना वेडं ठरवायचं नाही.

बिरुटेसर काही आपणास काही या शब्दानंतर कॉमा अभिप्रेत असावा. उपरोक्त वाक्य आणि खालील वाक्याचा तुमचा क्रम बदलला की अंशतः विसंगतीतर नाहीना अशी शंका येते आहे.

ही जी संतमंडळी आणि लेखकाची भारावलेली अवस्था आहे ही प्रतिभा आहे. उत्कट भावनेचा अविष्कार आहे. आता या भावनिक अविष्करणाचा फ्लो जेव्हा अधिकच अधिक होतो तेव्हा त्याला शास्त्रीय काय नाव असेल मला माहिती नाही, पण ते वेड असतं आजाराची सुरुवात असावी असं वाटतं. काही लौकिक पातळीवर वावरत असतात तर काहींना आवरणे कठीण जातं.

कलावंताच्या प्रेरणेचे अभिव्यक्ती एकतर देव-दत्त असावी --(कारण प्रतिभावंत आपल्या प्रतिभेच क्रेडीट त्याच्या परमेश्वरास देतो - या विषयावर मला अजून एक वाद वेगळ्या धाग्यावर करावयाचा आहे.) -- किंवा प्रतिभावंतास वेडाच्या आजाराची सुरवात झाली असावी. बिरुटेसर मानवी अभिव्यक्तीच्या प्रेरणेचे इतर कोणतेही स्रोत आपण शिल्लक ठेवलेले दिसत नाहीत ! :) बिरुटेसर या व्यक्त होणार्‍या कवि अथवा संतांच कवि अथवा लेखक असणे हा निव्वळ योगा योग नाही का ? अभिव्यक्ती हि केवळ लेखन आणि काव्य याच्यातूनच प्रकट होते असे आपणास म्हणावयाचे नसावे. गायक, चित्रकार, नृत्य अशा अनंत गोष्टीतून मानव अभिव्यक्त होत असतो. आपण मांडलेल्या तर्कास जरासे ताणले की हातात कुंचला घेतलेल्या प्रत्येक चित्रकारास अथवा गायनाचा सूर धरणार्‍या प्रत्येक गायकास, नृत्य करण्यास सुरवात करणार्‍या प्रत्येक नर्तकास वेडाच्या आजाराची सुरवात झाली आहे असे म्हणावे लागेल :) या अर्थाने कोणतेही काम आवडीने / मन लावून/ (भान हरपून)/ झोकून देऊन अथवा प्रामाणिकतेने करणार्‍या प्रत्येक व्यक्तीस वेडाच्या आजाराची सुरवात झाली असे म्हणावे लागेल ? आपल्या दृष्टीकोणात वेडाच्या आजाराची जी काही व्याख्या आहे त्याचे कौतुकच करावे लागेल, आपल्या दृष्टीकोणात वेडाच्या आजाराची व्याख्या काय आहे तरी काय आणि आपण ती कोठून मिळवलीत ? (आता संदर्भ विचारु नका. थोडा फार तर विश्वास ठेवा असे उत्तर देणार ?:) )

passionate या शब्दाची इंग्रजीतील गूगल बाबाने दिलेली व्याख्या 'having, showing, or caused by strong feelings or beliefs.' अशी येते आहे आपण मराठीत एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीच वेड आहे म्हणतो याचा अर्थ त्याला वेडाच्या आजाराची सुरवात आहे का ? अबकड व्यक्तीला हळक्षज्ञ गोष्टीच वेड आहे = अबकड व्यक्ती वेडा आहे अथवा अबकडला वेडाची सुरवात झाली आहे ? हा कोणता तर्क आहे ?

अबकड व्यक्तीला हळक्षज्ञ गोष्टीच वेड आहे या मराठी वाक्याचा आत्ता पर्यंत मी स्वतः जो अर्थ घेतला तो हाच की, किमान पातळी वर अबकड व्यक्तीला हळक्षज्ञ गोष्ट आवडणारी आहे, विशेष प्रीय आहे , हळक्षज्ञ गोष्ट आवडण्याच्या बर्‍याच पायर्‍या त्याने पार केल्या आहेत आणि अपवादात्मक स्थितीत त्याला खरोखर वेड आहे. एखाद्या अपवादात्मक शक्यतेवरून सरसकट शिक्का मारणे यालाच तर आपवादावरून नियम सिद्ध करणे म्हणत नसावेत ?

"....किमान थोरामोठ्यांच्या प्रेमाच्या गोष्टी देहभान हरपुन वाचत राहु. :) "

देहभान हरपून वाचणे ही सुद्धा एक अभिव्यक्ती आहे का ?

(मी कठोर टिकेचा समर्थक असल्यामुळे अत्याधिक खिस पाडणे वगैरे होते. माहितगार म्हणजे वेड्यासारखा खीस पाडतो :) तरीपण आपला लोभ कायम ठेवावा ही नम्र विनंती )

बाकी खाली नमूद केलेल्या ओळी आवडल्या
गोविंदाग्रज म्हणतात-

प्रेम बोले, प्रेम डोले, प्रेमे जग हाले
प्रेमाखातर जगी आजवर काय नाही झाले.

प्राची तैंना 'जो जे वांछील तो ते लाहो, कृष्ण प्राचीतैंच्या भेटीस येत राहो' हि शुभेच्छा !

सस्नेह's picture

8 Sep 2015 - 9:23 pm | सस्नेह

फारच सुंदर !

अनन्त अवधुत's picture

9 Sep 2015 - 4:49 am | अनन्त अवधुत

फार छान कविता आहे. कविता पहिल्या वाचनात आवडली. सुंदर शब्दरचना.
स्वत: कवी, मांत्रिक , माहितगार यांच्या प्रतिसादातून कविता अधिक कळली.

........ राधेची निर्मम प्रीती , गोपास बनविते कृष्ण

१) श्रद्धेच महात्म्य अचूक आले आहे, ज्या कुणात/कशात तुम्ही परमेशवर (कृष्ण) पहाल त्यात तुम्हाला परमेश्वर दिसेल.

२) भक्ताच्या प्रितीमूळे/भक्तीमूळेच परमेश्वराच (कृष्णाच) अस्तीत्व आहे. (राधेची प्रिती नसती तर गोपाचा गोपच राहीला असता कृष्ण झाला नसता)

चाणक्य's picture

9 Sep 2015 - 1:22 pm | चाणक्य

ही वाचायची राहिली होती. फारच अप्रतिम झालीये. पुन्हा पुन्हा वाचावी अशी.

नया है वह's picture

9 Sep 2015 - 6:55 pm | नया है वह

सुंदर

मांत्रिक's picture

10 Sep 2015 - 10:03 pm | मांत्रिक

तुमची कविता दखल सदरात गेली! याबद्दल खूप खूप अभिनंदन!!! जे अगदी अंतःकरणापासून आहे त्याची निश्चित दखल घेतली जाणारच!!!
तो हातात बासरी घेतलेला कृष्णकन्हैया वाचकांच्या मनात जागवला तुमच्या कवितेने! म्हणून हे यश! असो! पुनश्च अभिनंदन!!!

जे अगदी अंतःकरणापासून आहे त्याची निश्चित दखल घेतली जाणारच!!!

धन्यवाद माहितीबद्दल. माहीत नव्हते.

अजया's picture

11 Sep 2015 - 10:15 pm | अजया

:)

प्यारे१'s picture

11 Sep 2015 - 10:23 pm | प्यारे१

गप की बे भाऱ्या.
णवीण हाय ना मांत्रिक? मग्ग्ग?

मांत्रिक's picture

11 Sep 2015 - 10:47 pm | मांत्रिक

यात चेष्टा करण्यासारखे काय आहे?

नया है वह's picture

11 Sep 2015 - 5:54 pm | नया है वह

.

मृत्युन्जय's picture

11 Sep 2015 - 6:06 pm | मृत्युन्जय

दोन तीन दा वाचली. शब्दांची गुंफण सुरेखच वाटली होती आधीही आणि आत्ताही. पण परत परत वाचल्यावर कवितेतला सुंदर अर्थही साधला. सुंदर जमली आहे कविता

शुचि's picture

11 Sep 2015 - 8:16 pm | शुचि

फार आवडली.

रातराणी's picture

11 Sep 2015 - 11:54 pm | रातराणी

अप्रतिम! अर्थ खुलवून सांगितल्यामुळे तर अजूनच भावली!

तिमा's picture

12 Sep 2015 - 9:57 am | तिमा

@प्राची अश्विनी,

माझ्या इतर प्रतिसादात, तुमची कविता मला खूपच आवडली हे लिहायचे राहून गेले. तसेच मांत्रिक यांनी त्याबाबत केलेला अर्थाचा उलगडा तेवढाच आवडला. एक फारच चांगला घागा वाचायला मिळाला असे वाटते.

प्राची अश्विनी's picture

12 Sep 2015 - 10:29 am | प्राची अश्विनी

धन्यवाद!

पद्मश्री चित्रे's picture

12 Sep 2015 - 8:29 pm | पद्मश्री चित्रे

जितक्या वेळा वाचली तितकी जास्त आवडली.

मदनबाण's picture

13 Sep 2015 - 10:04 am | मदनबाण

सुंदर...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Manali Trance... ;) :- The Shaukeens

सतिश गावडे's picture

14 Sep 2015 - 9:03 am | सतिश गावडे

राधेचा सर्वप्रथम उल्लेख बाराव्या शतकातील कवी जयदेव याने आपल्या "गीतगोविंद" या काव्यात केला होता असे वाचले होते.
त्याआधी लिहिलेल्या आणि कृष्णाचे अधिकृत चरित्र म्हणता येतील अशा श्रीमद भागवत, महाभारत आणि हरिवंश पुराण यात राधेचा उल्लेख नाही.

किंबहूना श्रीकृष्ण भक्तीचा पुरस्कार करणारा "पुष्टीमार्ग" संप्रदायही याला दुजोरा देतो. या दुव्यावरील माहिती वाचनीय आहे.

प्राची अश्विनी's picture

14 Sep 2015 - 4:37 pm | प्राची अश्विनी

भागवतात राधा वाचललेली आठवते,कुणीतरी केलेले भागवताचे भाषांतर होते, पुन्हा बघून संदर्भ देईन.

शब्दवेडी's picture

15 Sep 2015 - 11:40 am | शब्दवेडी

कविता खूप सुन्दर आहे.आणि त्यानन्तर झालेली चर्चा पण खूप अर्थपूर्ण आहे.मला छान माहिती मिळाली.

प्राची अश्विनी's picture

22 Sep 2015 - 12:00 pm | प्राची अश्विनी

धन्यवाद !