चाय, चिलम, चपाटी : लाझ येई भारत भेटी (४)

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
4 Sep 2015 - 9:12 am

==================================================================
भारतभेटीला प्रथमच येणार्‍या एका परदेशस्थ व्यक्तीला आपला देश कसा वाटला हे आपण शक्य तितक्या अलिप्तपणे अनुभवावं, म्हणून त्याच्या पत्रांच्या मराठी रुपांतराचा हा प्रयत्न. माझा शेजारी असलेल्या मॅनीच्या लाझ नामक दूरच्या भाच्याची ही संक्षिप्त भारत भ्रमण-कथा.

===============================================================
भाग १ ------------ भाग २ ------------- भाग ३ ----------- भाग ४ ----------- भाग ५
================================================================

या भागात काही स्फोटक / जळजळीत / देश-विरोधी वगैरे वाटू शकतील अशी विधानं वा मतं आहेत, ती वस्तुस्थिती-दर्शक असतीलच असं नाही. पण ती मतं माझी नाहीत, पत्रलेखक परदेशी प्रवासी लाझ याची आहेत, याची जाणीव ठेवलेली बरी. त्या मूळ पत्रांशी प्रामाणिक राहून केलेलं हे भाषांतर आहे.
==================================================================

हा भाग सुरू करण्याआधी मी एक व्हिडिओ वाचकांनी पहावाच अशी आग्रहाची शिफारस करेन. लाझ नव्हे, पण दुसऱ्या एका परदेशी प्रवाश्याला लद्दाख आणि आसपासचा भूभाग कसा दिसला याचं हे चित्रीकरण आहे, इंग्लिश भाषेतील astounding, awesome, breathtaking ही सगळी विशेषणं ओवाळून टाकावीत इतकं अफाट निसर्ग-सौन्दर्य या हाय डेफिनिशन व्हिडिओत पकडलं आहे, आणि निवेदन संपतं तो अखेरचा भागही सुरेखच! नक्की पहा, म्हणजे लाझ सारखे लक्षावधी प्रवासी आपल्या देशातल्या या देखाव्यांसाठी का गर्दी करतात ते कळेल. तुमच्यापैकी अनेक जण या भागात प्रवास करून आलेले असतील, त्यांच्या भाग्याचा हेवा वाटतो. मी स्वत: अद्याप या भागात अजून गेलो नाही, पण या भाषांतरीत लेख-मालेच्या निमित्ताने ती इच्छा पुन्हा उफाळून आलीय, त्याबद्दल लाझचे मी आभारच मानायला हवेत!

==================================================================

Hello again, family!

२४ तासांपेक्षा पुढचं नियोजन करण्यात काही हशील नाही कारण अनपेक्षितपणे काहीही घडू शकतं, हे लक्षात घेऊन आम्ही लेह सोडून श्रीनगरच्या दिशेने रस्ता-मार्गे निघायचं ठरवलं. श्रीनगरला भेट देण्याची दोन कारणं होती; एकतर माझं मुंबईचं विमान तिकिट तिथून अर्ध्या किंमतीत पडलं असतं, आणि हिमालयीन उत्तर भारत पहायचा असेल तर श्रीनगर निसर्ग-सौन्दर्यासाठी पहावंच अशी भलामण बर्‍याच लोकांनी केली होती.

म्हणून मग आम्ही सहा जणांनी हे ४०० किलोमीटरचं अंतर ५ दिवसांत हिच - हायकिंग करत गाठायचं ठरवलं. वाटेत भारतातल्या निसर्गातली दिसेल ती जादू डोळ्यांत साठवून घ्यायचा विचार होता. माझ्या साथीला होते कोको (मला भेटलेला सर्वात वाह्यात फ्रेंच माणूस), माझी बुबा एला (हेब्रूमध्ये बुबा म्हणजे बाहुली), यार (इझ्रायली गिर्यारोहक), ओगी (दुसरा इझ्रायली भटक्या) आणि रोना (इझ्रायली चित्रपटातली कलाकार). सहा लोकांना एकाच वेळी फुकट वाहन मिळणं हे खरं तर दुरापास्तच, पण आमचं नशिब जोरावर असणार, कारण आम्हाला एक रिकामे प्लास्टिकचे डबे वाहून नेणारा ट्रक भेटला. त्या ट्रकमध्ये खोक्यांच्या वर बसून वळणावळणांवरून भेलकांडत, गाणी म्हणत, गप्पा मारत आम्ही प्रवास केला. मध्ये एकदा जेवणासाठी थांबलो, आणि अखेर सहा तास प्रवास करून लमायुरू या लद्दाख मधल्या सर्वात जुन्या बौद्ध धर्मस्थळाच्या गावात पोहोचलो. इथे आम्ही रात्री मुक्काम केला. प्रत्येकी १ डॉलर किंमतीत एक बेकार गेस्ट हाऊस मिळालं, पण आम्ही रात्री पैसे लावून सुरापानाचे खेळ खेळलो, झोप काढली आणि सकाळी उठून ध्यानासाठी लमायुरू गोंपाच्या (गुंफेच्या) ध्यानकक्षात गेलो.

--
--

त्यानंतर पुन्हा एकदा भाग्यदेवता आमच्यावर खूष झाली, आणि डग नावाच्या एका दयाळू ऑस्ट्रेलियन माणसाने आम्हाला त्याच्या कँपर वाहनात बसवून पुढे नेलं. त्याने १०० किलोमीटरवर एका मधल्या कुठल्या तरी अडनीड्या गावात सोडलं, आणि तो दुसऱ्या दिशेने पुढे गेले. आम्हाला जायचं होतं कारगिलला. पण नशिबाने तिकडे जायला तयार असलेल्या एका cab ड्रायव्हरने आम्हाला पुढे नेलं. कारगिल हे काश्मीरमधलं प्रामुख्याने मुस्लीम-बहुल शहर आहे. इथे एक गोष्ट नमूद केलीच पाहिजे: इथले सर्वच काश्मिरी लोक अतिरेकी वाटले, ते स्वत:ला भारतीय समजतच नाहीत, ते अत्यंत हावरट आहेत, अस्थिर मनोवृत्तीचे आहेत आणि बहुसंख्येने मुस्लीम असूनही बरेचदा मद्यधुंद किंवा अगदी नशेत चूर असतात.

आम्ही पोहोचलो तेंव्हा एकतर अंधार होत आलेला होता, आणि थोड्याच वेळात एकंदरीत अनुभव घेऊन आम्ही भूक-चिडे [Hangry (hungry and angry) ] झालेलो होतो, त्यामुळे कारगिलला आणखी थांबण्याची आमची इच्छा नव्हती. आम्ही उर्वरित २०० किलोमीटरसाठी प्रत्येकी ८०० रुपये (जवळजवळ १५ डॉलर्स!) इतकी अवास्तव रक्कम मान्य करून एक खाजगी गाडी ठरवली. पुढचा तो सात तासांचा खडतर प्रवास मी एला आणि बदली ड्रायव्हर यांच्या मधल्या खड्ड्यातील अडचणीच्या सीटवर बसून केला. गाडी उडाली की टाळकं टपाला आदळायचं, आणि डावी-उजवीकडे वळली की गाढ झोपलेले एला किंवा तो बदली ड्रायव्हर आळीपाळीने माझ्या खांद्यावर पडायचे! एकदाचा तो प्रवास पहाटे ३ वाजता संपला, आणि आम्ही श्रीनगरला पोहोचलो.

अशा अवेळी तिथे रहायला जागा मिळणं म्हणजे दुरापास्तच, पण सुदैवाने आम्हाला एक टुक-टुक चालक भेटला, आणि त्याच्या शिकाऱ्याकडे घेऊन गेला. (हे एक बरं आहे तिथे, प्रत्येकाला कुणी-ना-कुणीतरी शिकारावाला माहीत असतो!) आम्ही सूर्योदय होईपर्यंत गप्पा मारत बसलो आणि हसत-खेळत गेल्या तीन दिवसांतील साहसांचं पुनरावलोकन केलं.

श्रीनगरही काश्मीरचा भाग आहे, आणि तिथेही मुस्लिमच बहुसंख्य आहेत. पण रस्तोरस्ती जाणवण्याइतका लष्कर आणि पोलिसांचा वावर आहे. काही आठवड्यांपूर्वीच इथे अतिरेक्यांचे हल्ले झालेले होते, आणि परिस्थिती अजूनही तणावाचीच होती. त्यात भारतीय स्वातंत्र्यदिन ५ दिवसांवर आलेला. मी म्हणेन की मला इथे निम्मे लोक चांगले काश्मिरी भेटले तर उरलेले निम्मे अतिरेकी मनस्थितीतले होते.

इथले लोक सोडले तर दुसरं प्रमुख आकर्षण म्हणजे दाल-सरोवर. आम्ही आमची रहाण्याची जागा बदलली आणि सरोवराच्या जवळच असलेल्या महाल-सदृश शिकाऱ्यात गेलो. इथून साववर आणि पर्वत दोहोंचा सुरेख नजारा होता. मद्य मिळणं अवघड आहे पण अशक्य नाही. आम्ही आधी आमचं फ्रिज बीअरच्या बाटल्यांनी भरून घेतलं, मोहीम फत्ते! मग आम्ही शिकाऱ्या च्या बाहेरच्या भागातल्या पोर्चवर आरामात बसलो, आणि मग सुरू झाला आमचा पुढच्या काही दिवसांचा दिनक्रम, बीअर पिणं, गिटार वाजवत गाणी म्हणणं, एकमेकांच्या देशातल्या चालीरीती, एकमेकांची स्वप्नं, आकांक्षा यांची देवाणघेवाण वगैरे. आश्चर्य वाटलं की आंतर्जाल नसतांनाही माणसं एकमेकांच्या किती जवळ येश शकतात ते, एकमेकांशी असा खराखुरा संवाद साधणं हे खूप आनंददायक होतं! एकंदरीतच, १४ दिवसांच्या अविरत, कष्टप्रद धकाधकीनंतर हे श्रीनगरमधले तरंगत राहणाऱ्या हाऊसबोटीमध्ये बसून, फिरत राहणारे शिकारे आणि प्रवासी पहात घालवलेले दिवस म्हणजे सुखद अनुभव होता.

--

--
--

आता ते मित्र मागे सोडून मी मुंबईकडे एकटा निघेन, या सगळ्या सवंगड्यांचा निरोप घेणं अवघड असेल, पण आम्ही एकमेकांना पुन्हा-पुन्हा सांगतोय की हा निरोप नाहीये, आपण परत भेटणार आहोत. एकमेकांच्या देशांनाभेटी देऊन. खरोखर, माझ्यापुरतं सांगायचं तर मी माझा प्रवासाचा बेत बदलला आहे, आणि मी लवकरच इझ्रायलला जाईन , आणि या प्रवासात शिकलेलं दिव्य हेब्रू तिथे वापरात आणून बघेन (मातोडा तीट पाश ती, म्हणजे Thank You काय? कपडे काढ! - कुणी Thank You म्हंटल्यावर वेलकम म्हणायच्या ऐवजी चिडवण्यासाठी हे उत्तर द्यायचं!)

मुंबईत आठवडा घालवून मग मी श्रीलंकेला जाईन, मला बिन-गर्दीच्या समुद्र-किनाऱ्या वरच्या आयुष्याची आत्यंतिक गरज भासायला लागली आहे. आता मला हवेत दोन आठवडे किनाऱ्यावर, तंगड्या पसरून आंबे, नारळ,अननस, बीअर या सर्वांचा उपभोग घेत घालवायला. मी खरंतर या वेळेपर्यंत आफ्रिकेत परतणार होतो, भारतात इतका वेळ घालवायचा माझा plan नव्हता, पण हेच करणं योग्य होतं हे आता जाणवतं आहे.

Namaste! Until next time.

Thanks,

- लाझ

================================================================

नक्की कल्पना नाही, पण लाझ आणि त्याचे सहप्रवासी बहुधा झोजी ला पास मधून गेले असावेत. त्या खिंडीतून जाणं कधी कधी किती कठीण असतं त्याविषयीचा एक व्हिडिओ:

================================================================

देशांतरभाषांतर

प्रतिक्रिया

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Sep 2015 - 9:42 am | कैलासवासी सोन्याबापु

पुर्ण वाचले आज एकत्र , अप्रतिम आहे इतका indifferent perspective विरळा पहायला मिळतो खरा! बाकी मला तुमच्या लेखनात किंवा लाझ च्या अभिव्यक्ति मधे काहीही देशविरोधी वगैरे सापडले नाही बहुगुणी सर,

लाझ एक अवलिया व्यक्तिमत्व वाटले.

(एकेकाळी बिनबंधनाचा अवलिया होऊ पाहणारा) बाप्या

राही's picture

4 Sep 2015 - 11:03 am | राही

लेखामध्ये देशविरोधी असे काहीही नाहीय.
सर्वच लेख सुंदर आहेत.
कश्मीर, सिक्कीम, भु टान, सगळेच सुंदर आहे. फक्त सिक्कीम आताशी फार अस्वच्छ होत चालले आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Sep 2015 - 11:10 am | कैलासवासी सोन्याबापु

सिक्किम मधे मी गंगटोक मधे घाण पाहिली खुप पण पुढे मंगन किंवा युमथांग वैली वगैरे नॉर्थ सिक्किम मधला भाग मात्र स्वच्छ सापडला मला

हेच म्हणतो, त्याला जसे वाटले तसे त्याने लीहीले. तो म्हणाला तशी असेलही तीथली परीस्थीती.

मीता's picture

4 Sep 2015 - 11:37 am | मीता

अप्रतिम फोटो आणि लेख .

यमन's picture

4 Sep 2015 - 3:13 pm | यमन

लाझ मिपा गाजवणार काही काळ ,असं वाटतंय .
सुरेख अनुवाद .
अभिनंदन .
चलते रहो . मुंबई बघायला उत्सुक

पद्मावति's picture

4 Sep 2015 - 5:37 pm | पद्मावति

मजा येतेय वाचायला.

आजचा भाग जास्तच आवडला.फोटो तर अप्रतिम.मस्त फकिर आहे हा लाझ. क्षणभर हेवा वाटून गेला त्याच्या जीवनशैलीचा!

सुन्दर अनुभवमाला. बहुगुणीन्चं मस्त अनुवादन. अप्रतिम छायाचित्रण.
मस्तमौला लाझ भाई को सलामालेकुम.

पिलीयन रायडर's picture

4 Sep 2015 - 11:53 pm | पिलीयन रायडर

मला अशा लोकांचा नेहमीच फेवा वाटतो.. असं फिरत रहायला वेळ, पैसा आणि स्टॅमिना कसा काय असतो लोकांकडे..

चारही भाग सुंदर झाले आहेत. फोटो तर निव्वळ अप्रतिम!!!

पिलीयन रायडर's picture

4 Sep 2015 - 11:54 pm | पिलीयन रायडर

हेवा*

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Sep 2015 - 12:42 am | डॉ सुहास म्हात्रे

परदेशी डोळ्यातून केलेले निरिक्षण आणि त्याचे सुंदर भाषांतर, दोन्हीही आवडले ! पुभाप्र.

उगा काहितरीच's picture

5 Sep 2015 - 12:58 am | उगा काहितरीच

पहिले तो व्हिडीओ पाहीला, नंतर लेख वाचला. अप्रतिम व्हिडीओ जवळजवळ सगळ्या फ्रेम वॉलपेपर ठेवाव्यात इतक्या सुंदर ! लेख आवडला हेवेसांनलगे . रच्याकने लाझने लिहीलेली लिंक मिळेल का ?

बहुगुणी's picture

5 Sep 2015 - 1:09 am | बहुगुणी

@"उगा काहितरीच": लाझने हे कुठे लिहिलेलं नाही, त्याने त्याच्या कुटुंबियांना (आणि मॅनीने मला कॉपी करायला सांगितलं म्हणून मला) इ-मेल्स द्वारे हे प्रवासवर्णन पाठवलेलं आहे. मी केवळ त्या पत्रांचे मराठी रुपांतर करून इथे देतो आहे.

उगा काहितरीच's picture

5 Sep 2015 - 10:57 am | उगा काहितरीच

ओक्के , पण जमल्यास , परवानगी असेल तर मूळ लेखन पेस्ट करा इकडेच. भाषांतर सुंदर होत आहे यात शंका नाही पण मूळ इंग्रजी लेखन वाचायची इच्छा होतं आहे .

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

5 Sep 2015 - 1:46 am | निनाद मुक्काम प...

फारच सेक्लुअर आहात बुआ
ह्यात लेखात वाईट व वावगे देश विरोधी असे काहीच नव्हते
उगाच आगाऊ माफी मागण्याची गांधीगिरी केली राव

बहुगुणी's picture

5 Sep 2015 - 3:23 am | बहुगुणी

निनाद मुक्काम: मी सहसा माझ्या लेखावर आलेल्या प्रतिक्रियांचा प्रतिवाद करत बसत नाही, एकतर माझ्या स्वतःकडेही लिमिटेड वेळ आहे, आणि इतरांचाही वेळ घालवणं मला पटत नाही. पण थोडा खुलासा द्यावासा वाटला म्हणून इथे (एकदाच) देतो आहे:

पहिली गोष्ट - मी कुठेही माफी मागितली नाही, कारण मी काही चूक केलेली आहे असं मला वाटलं नाही आणि वाटत नाही.

दुसरी गोष्ट - 'गांधीगिरी' हे विशेषण तुम्ही उपहासाने वापरलं नसावं अशी आशा आहे, पण मी गांधीजींसारखा कधी काळी वागू शकलो तर त्याचा मला अभिमान वाटेल, लाज नाही.

आणि महत्वाची तिसरी गोष्टः मिपा हे समुदाय-संस्थळ आहे, इथे सर्व धर्मांचे वाचक येऊ शकतात. असं असतांना एखाद्या लेखात एका गावातले "सर्वच काश्मिरी लोक अतिरेकी वाटले, ते स्वत:ला भारतीय समजतच नाहीत, ते अत्यंत हावरट आहेत, अस्थिर मनोवृत्तीचे आहेत" असं विधान काही वाचकांना स्फोटक / जळजळीत वाटू शकतं, किंवा इतर काही वाचकांना हे वाचून काश्मीर हातातून चाललंय, तिथे देश-विरोधी प्रवृत्ती बळावते आहे, असंही वाटणं शक्य आहे.

हे रुपांतर लिहितांना मी केवळ निरोप्या म्हणून काम करत असलो तरीही अनाहूतपणे कुणाचं मन दुखावलं जाऊ नये (याला पापड मोडणं म्हणतात ;-) ), आणि धाग्याचं काश्मीर होऊ नये, इतकी खबरदारी घ्यावी एवढाच उद्देश माझ्या सुरूवातीच्या डिस्क्लेमर मागे होता.

आतापर्यंत कुणालाच त्या लिखाणात काही गैर/ अवास्तव वाटलं नाही हे इथल्या वाचकांच्या प्रगल्भतेचं लक्षण आहे. आणि त्यात मला आनंदच आहे.

बऱ्याच काश्मीरी लोकांबद्दल हे मत मान्य करावं लागतं. त्यांना भारताबद्दल प्रेम नाही, पाकिस्तान सुद्धा नकोय त्यांना स्वतन्त्र काश्मीर ची ओढ़ आणि आस आहे. यात चुकीचं काही नाही. (जम्मू आणि काश्मीरचा इतिहास भूगोल सगळंच वेगवेगळं आहे. इथे फ़क्त कश्मीर बद्दल बोलत आहे, जम्मू बद्दल नाही.) उच्चशिक्षित काश्मीरी तरुणांमध्येही भारत विरोधी भावना तीव्र आहेत.

स्पष्टीकरण: यात चुकीचं काही नाही.
यात म्हणजे लाझ च्या मतामध्ये काश्मीरी जनतेच्या भावनांचा विचार करता चुकीचं काही नाही. राजा हरिसिंग पासून च लोक भावना आणि राज्यकर्त्यांचे निर्णय यात प्रचंड तफावत आहे. शेख अब्दुल्ला पासून अनेकांनी आपापल्या पोळ्या यावर शेकलेल्या आहेत.

अनिरुद्ध.वैद्य's picture

6 Sep 2015 - 10:46 am | अनिरुद्ध.वैद्य

अस भटकायला कधी जमेल? परदेशात त्यातही लेह हुन कारगिलपर्यंत हिचहायकिंग करत जाणं ... केवढे गट्स!!
अप्रतिम भटकंती!

एकंदरीत अस जाणवत की लाझनी भरपूर भेटी घेतल्यात लोकांच्यासुद्धा. त्यावरून त्याने निष्कर्ष काढले असावेत.
आपण आपल ७ दिवसात लेह लदाख काश्मीर आटोपून परत :P

विलासराव's picture

19 Sep 2015 - 1:09 am | विलासराव

मी स्वतः १ ऑगस्टला श्रीनगरमार्गे कारगील लेह केलांग मनाली दिल्ली असा प्रवास केलाय. लेखकाच्या लोकल लोकांविषयीच्या मताशी बराचसा सहमत.
आवर्जून पहावा असा हा प्रदेश आहे.
आम्ही लेहला ५ दिवस होतो. अव्हेंजेर गाडीने फिरलो.
मी पुन्हा ख़ास विपश्यनेसाठी लेहला किमान २ महीने तरी परत जाईल.