अगदी खर्री लोकशाही

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
5 Aug 2015 - 12:26 am

“लोकशाही म्हणजे रे काय, भाऊ?”

“अरे, लोकशाहीवर अनेक ग्रंथ लिहिले गेलेले आहेत, अनेक छोटी मोठी पुस्तकं लिहिली गेली आहेत, अनेक चर्चा-वाद झाले आहेत. त्यातून काही माहिती मिळेल ती मिळेल. पण तुला थोडक्यात सांगतो. लोकांनी केलेलं, लोकांसाठी केलेलं, लोकांचं राज्य ती लोकशाही. ती आपल्या भारत देशात आहे, ती अमेरिकेत आहे, ती युरोपात आहे, ती अनेक पश्चिमी देशात आहे. तिलाच लोकशाही म्हणतात!”

“मग ही लोकशाही निरनिराळ्या प्रकारची असते का रे भाऊ?”

“हो, अगदी बरोबर. ही लोकशाही निरनिराळ्या प्रकारची असतेच, शिवाय तिच्यात निरनिराळ्या प्रक्रियासुद्धा असतात.”

“काय प्रकार असतात ते सांगशील का रे, भाऊ?”

“बरं, प्रयत्न करतो.
ठोकशाही, दंडुकशाही, घोटाळेशाही, आंदोलनशाही, आचरट, खुळचट, पोरकटशाही, घराणेशाही आणि हुकूमशाही असे मला आत्ता आठवतात ते प्रकार तुला मी सांगितले. लोकशाहीच्या नावाखाली वरचे प्रकार प्रकर्षाने होत असतात.”

“हेच सर्व विस्ताराने सांगशील का रे, भाऊ?”

“बरं, सांगतो. जे सांगतो ते प्रकार खर्‍या लोकशाहीचे प्रकार नव्हेत.
ठोकशाही म्हणजे, उदा. गोर्‍या चामडीचा पोलीस, दुसर्‍या कसल्याही रंगाच्या चामडीच्या माणसाला - मग त्याच्याजवळ कसलंही शस्त्र नसलं, किंवा तो घाबरून पळून जात असला आणि पाठमोरा असला, तरी त्याला गोळी घालून जीवे मारतो ती ठोकशाही. ही खरी लोकशाही नव्हे.

दंडुकशाही म्हणजे अपराधाच्या किंवा गुन्ह्याच्या मानाने शिक्षा जब्बर असते आणि दंड फारच जास्त असतो आणि काही बारीक बारीक कारणाने झालेल्या गुन्ह्यांच्या आधारावर शिक्षा होऊन ज्यामुळे तुरुंग भरले जातात, ती दंडुकशाही.

घोटाळेशाही म्हणजे करदात्याच्या पैशातून, विकासाचं कारण दाखवून घोटाळे करून स्वतःची तुंबडी भरून दोन-चार पिढ्यांना पुरतील एवढे पैसे जमवले जातात आणि बेशरमासारखे लोकशाहीच्या नावाखाली त्या पैशाचा वापर करून परत परत निवडून येतात, तो प्रकार घोटाळेशाही्चा.

आंदोलनशाही म्हणजे रोज सकाळी उठल्यावर काही ना काही आंदलोनं करून रस्ते बंद, व्यवहार ठप्प, अडचणी खूप, असं करून एका अर्थी लोकांनाच नामोहरम केलं जातं ती आंदोलनशाही. खरं तर सशक्त लोकशाहीत लोकहितासाठी आंदोलनाची गरज असते. पण कुठच्याही गोष्टीचा अतिरेक झाला की ते नकोसं होतं.

आचरट, खुळचट, पोरकटशाही म्हणजे आपल्या वयाचा विचार न करता पोरकट होऊन दोन-दोन चार-चार दिवस लोकशाहीच्या मंदिरासमोर अडथळा करून, लोकांच्या समस्यांबद्दल चर्चा न करता संसदेचा वेळ वाया घालवण्यात ज्या निवडून आलेल्या लोकांकडून राजकारण केलं जातं, ती ही पोरकटशाही.

घराणेशाही तुला माहीतच असणार, घराणेशाही म्हणजे बापजाद्यांपासून ते आजोबा, पणजोबा, खापरपणजोबा ते मुलगा, नातू पणतू ते खापरपणतूपर्यंत आपणच राज्य करण्यास लायक आहोत असं गृहीत धरून लोकशाहीच्या नावाखाली राज्य करण्यात येतं ती घराणेशाही.

शेवटी हुकूमशाही - हिचे खूप प्रकार आहेत, पण एक उदाहरण म्हणून सांगतो. लोकांवर एकट्याने अधिकार गाजवून खोट्या निवडणूका घेऊन 'हम करेसो कायदा' अशा तर्‍हेने राज्य केलं जातं ती हुकूमशाही.

हे सर्व प्रकार किंवा ह्याच्यातले काही प्रकार लोकशाहीचाच आधार घेऊन वापरात असतात.”

“मग खर्री लोकशाही कशाला म्हणावं रे, भाऊ?

“ज्या लोकशाहीत निवडून आलेले ९९, आपल्या बहुमताचं किंवा आपल्या संख्याबळाचं राजकारण न करता, निवडून आलेल्या एकट्या शंभराव्या विरोधकाने लोकहितासाठी दिलेल्या मताशी किंवा त्याने केलेल्या सूचनेशी सहमत होऊन हे शंभर लोक मिळून, लोकहितासाठी राज्य करतात, ती खर्री लोकशाही” असं प्रो. देसाई म्हणतात.

“अशी लोकशाही कधी अस्तित्वात होती का रे, भाऊ?”

“रामराज्य आणि शिवाजी महाराजांचं राज्य हे लोकांचं राज्य होतं असं भारतात समजलं जातं.”

“लोकशाहीच्या विषयावर एवढी चर्चा आज पुरे, असं तुला वाटत नाही का रे भाऊ?”

“मर्जी तुझी!”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे, कॅलिफोर्निया)

राजकारणलेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

5 Aug 2015 - 8:34 am | मुक्त विहारि

...आवडला...

टवाळ कार्टा's picture

5 Aug 2015 - 9:17 am | टवाळ कार्टा

व्वा :)