अखेर चुलत बहीण सापडली.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
28 Jul 2015 - 8:48 am

NASA’s Kepler Mission Discovers Bigger, Older Cousin to Earth. एक बातमी.

“मला एकच प्रश्न पडला आहे की,मुलांचा आणि बाबांचा शोध लागत आहे पण ह्यांना जन्म देणारी ती महान आई कोण बरं असावी.कुणी सांगेल का?”

अखेर नासाच्या पोलिसानी(शास्त्रज्ञानी) चांदण्याचं जंगल पिंजून पृथ्वीच्या चुलत बहीणीला हुडकून काढली.तशी ही पृथ्वीची केपलरताई फार दूर (?) राहत नाही.
“प्रकाश सेकंदाला तीन लाख किलोमिटर वेगाने गेल्यास एक वर्षात तो जेव्हडे किलोमिटर प्रवास करील त्या अंतराला एक लाईट वर्ष म्हणतात.”
असं प्रो.देसाई मला म्हणाले.
300,000*24*60*60*365 किलोमिटर, म्हणजे 9,4,6,0800,000,000 किलोमिटर म्हणजे एक लाईट वर्ष.
(9निखर्व,4खर्व 6दशअब्ज 8दशकोटी किलो मिटर किंवा 6 निखर्व मैल)
अशी 1400 लाईट वर्ष दूर, म्हणजेच 13245 निखर्व 1खर्व 20अब्ज किलोमिटरावर केपलरताई आहे.(चूक भूल द्यावी घ्यावी)
म्हणजेच केपलरताईकडे पोहोचायला 300,000 किलोमिटर एका सेकंदाला ह्या वेगाने जायचं झाल्यास <del>अब्जानी</del> 1400 वर्ष लागतील.
केपलरताई पृथ्वीपेक्षा अडीच पट लठ्ठ आहे.(डायबिटीस नसावा.कारण ती तिच्या बाबांच्या भोवती वर्षानुवर्ष प्रदक्षिणा घालून व्यायाम घेत असते.) त्यामुळेच की काय केपलरताई आपल्या सूर्याबाबांच्या भोवती एक प्रदक्षिणा घालायला 380 दिवस घेते(उघडच आहे.) पृथ्वी एका प्रदक्षिणेला 365 दिवस घेते.
पृथ्वीने जर तिला,
“ताई”
म्हणून साद दिली तर ती साद ताईकडे पोहोचायला अब्जानी वर्ष लागतील.
केपलरताईचे बाबा(सूर्य) पृथ्वीच्या बाबापेक्षा करोडो वर्षानी मोठे आहेत.आणि जास्त तेजस्वी आहेत.हे दोन्ही भाऊ करोडो वर्षं असेच तळपत आहेत.

पृथ्वीला जर का तिच्या केपलरताईला आपल्या इकडच्या परिस्थितीचा संदेश द्यायचा झाल्यास ती म्हणेल,
“अगं ताई,इथे मानवाने माझ्यावर अत्याचार करायला सुरवात केली आहे.हा मानवप्राणीच असं करतोय.कारण निसर्गाने त्यालाच अचाट बुद्धी दिली आहे.इतर प्राणी निसर्ग नियमाने रहातात.
एके काळी मी सौन्दर्यवती होते.
माझे लांब केस,सतेज डोळे,निथळ कांती आणि आजुबाजूचं स्वच्छ वातावरण.अशी स्थिती होती.अगदी डोळ्याला द्द्ष्ट लागेल अशी मी होते.
पण आता केस गळलेल्या,काळपटलेल्या, दरिद्री भिकारणी सारखी माझी अवस्था हा मानव करीत सुटला आहे. जंगल तोड,प्रदुषण,पाण्याचं दुर्भिक्ष ही त्याची कारणं आहेत.ह्या मानवाचा स्वतःच्या उत्पतिवर कसलाच संयम नाही.ह्याची नातवंडं, पतवंडं,खापरपतवंडं भूक भूक करून नामशेष होणार आहेत, ह्याची त्याला खंत दिसत नाही. अब्जानी वर्षाचा माझा इतिहास असा आहे की असे हे उन्मत्त प्राणी आपल्याच कर्माने नामशेष होतात.”

हे हृदयाला चटका लावणारे आपल्या बहीणीचे उद्नार ऐकून केपलरताई पृथ्वीला म्हणाली,
” माझा इकडचा मानव त्या मानाने फारच वेगळा आहे.इथे कुणी जात,धर्म पाळत नाहीत.त्यामुळे धर्मवाद, जातीवाद,प्रांतवाद असले प्रकारच नाहीत. इथे असलाच तर एकच धर्म आणि तो म्हणजे शेजारधर्म.इकडे युद्ध, लढाया होत नाहीत.प्रश्न निर्माण झाला तर एकमेकासमोर बसून चर्चा करून मार्ग काढतात.इथे पर्यावरणावर फार विचार करतात.म्हणून मी इतकी वर्षं जगले आहे.तुझ्या पेक्षा आम्ही करोडो वर्षांनी मोठे आहोत आणि टिकून राहिलो आहोत.त्याचं हेच कारण आहे.इकडे संयमाने प्रजोत्पत्ती होत असते.
संयम हा इकडच्या मानवात नव्हे तर इकडच्या इतर प्राण्यामधेही आहे.म्हणून निसर्गाच्या इकडच्या संपत्तीचा व्यय होत नाही.इकडचा मानव तुझ्या मानावापेक्षा बुद्धीमत्तेने जास्त प्रगतिशील आहे.एव्हडंच नव्हे तर तो इतर ग्रहावर गुप्तपणे जाऊन माहिती काढून आपल्यात सुधारणा करीत आहे.ह्या बुद्धीवान मानवाने तुझ्या मानवासारखं कसं वागू नये हे पण तो शिकला आहे.
वाईट वाटून घेऊ नकोस.मी तुझी ताई आहे ना? तेव्हा मी तुला प्रेमाने सांगत आहे.तू निसर्गाला सांग की,एखादं असं संकट आण की त्यातून तुझा मानव स्वतःला सुधारेल तरी.
बुध, शुक्र, मंगळ, गुरू, शनी, युरेनस व नेपच्यून.हे तुझे भाऊ आहेत.म्हणजे माझे चुलत भाऊ आहेत.तसे माझेही भाऊ आहेत.आता नासाचे पोलीस असंच चांदणं पिंजून जसं मला हुडकून काढलं तसं माझे भाऊपण शोधून काढतील.निदान अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. नासाच्या शास्त्रज्ञासारखे बुद्धीवान मानवसुद्धा तुझ्याजवळ आहेतच ना?

चुलत बहीणीतला हा संवाद नासाच्या शास्त्रज्ञानी ऐकला असावा.कारण तिथे जीवन असेल का ह्या शोधात ते रहाणार आहेत.हा संवाद ऐकून त्यांची खात्री होईल असं आपण तुर्तास समजूत करून घेऊ या.

मला एकच प्रश्न पडला आहे की,मुलांचा आणि बाबांचा शोध लागत आहे पण ह्यांना जन्म देणारी ती महान आई कोण बरं असावी.कुणी सांगेल का?

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

कथालेख

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

28 Jul 2015 - 9:22 am | श्रीरंग_जोशी

अवकाश संशोधनातील नव्या घडामोडींच्या आधारे लिहिलेला काल्पनिक संवाद आवडला.

जडभरत's picture

28 Jul 2015 - 9:45 am | जडभरत

सहमत!!! छानंय!!!

नेत्रेश's picture

28 Jul 2015 - 12:01 pm | नेत्रेश

> 300,000*60*60*365 किलोमिटर, म्हणजे 9,4,6,0800,000,000 किलोमिटर म्हणजे एक लाईट वर्ष.

याच्यात दीवसाचे २४ तास टाईपलेले दीसत नाहीत. पण उत्तर मात्र २४ तास घरुन काधलेले आहे.

> अशी 1400 लाईट वर्ष दूर, ... म्हणजेच केपलरताईकडे पोहोचायला 300,000 किलोमिटर एका सेकंदाला ह्या वेगाने जायचं झाल्यास अब्जानी वर्ष लागतील.

हे काही समजले नाही. १४०० लाईट वर्षे दुर असलेल्या ठीकाणी प्रकाशाच्या वेगाने जायला १४०० वर्षेच लागणार, अब्जावधी वर्षे कशाला लागतील?

काळा पहाड's picture

28 Jul 2015 - 1:34 pm | काळा पहाड

कारण प्रकाशाच्या वेगाने जाता येत नसल्यामुळे तिथे प्रकाशाच्या वेगाने कसं जायचं याचं संशोधन करण्यातच ती वर्षं जाणार. ज्यावेळी तो उपाय सापडेल, उदाहरणार्थ, अल्कुबिअर वार्प ड्राईव्ह प्रत्यक्षात कसा तयार करावा (जास्तीची माहिती इथे किंवा इथे पहा) त्यावेळी प्रकाशापेक्षा जास्त वेगाने (उदाहरणार्थ १४ वार्प वेगाने) कदाचित १०० वर्षंच लागतील. है कै नै कै.

संजय पाटिल's picture

28 Jul 2015 - 5:27 pm | संजय पाटिल

१ प्रकाश वर्ष प्रती सेकंद या वेगाने गेल्यास १४०० सेकंदात पोहोचु. है कै नै कै !!!

काळा पहाड's picture

28 Jul 2015 - 6:15 pm | काळा पहाड

अं? १५७६८००००००० वार्प स्पीड? कै च्या कै काय! १० वार्प स्पीड चं बंधन आहे आहे ना? पुनर्मापांकनापूर्वीची एकके वापरली तरी १४.१ वार्प स्पीड च्या पुढे जायला नको. एवढं ऋण वस्तुमान असणारं कोणतं द्रव्य वापरणार आहे हे यान?

श्रीकृष्ण सामंत's picture

29 Jul 2015 - 12:30 am | श्रीकृष्ण सामंत

नेत्रेशजी,

"याच्यात दीवसाचे २४ तास टाईपलेले दीसत नाहीत. पण उत्तर मात्र २४ तास घरुन काधलेले आहे."

आपलं बरोबर आहे दिवसासाठी २४ आंकडा टाकायला त्या गुणाकारात मी घाईत विसरलो.परत चेक केलं नाही. पण गुणाकार २४ धरूनच केला आहे.

"हे काही समजले नाही. १४०० लाईट वर्षे दुर असलेल्या ठीकाणी प्रकाशाच्या वेगाने जायला १४०० वर्षेच लागणार, अब्जावधी वर्षे कशाला लागतील?"

"अब्जानी वर्ष लागतील."
हे माझं म्हणणं चुकीचं आहे.

पद्मावति's picture

28 Jul 2015 - 12:54 pm | पद्मावति

अखेर नासाच्या पोलिसानी(शास्त्रज्ञानी) चांदण्याचं जंगल पिंजून पृथ्वीच्या चुलत बहीणीला हुडकून काढली.....हे आवडले.

उगा काहितरीच's picture

28 Jul 2015 - 6:23 pm | उगा काहितरीच

क्या बात है ! आवडला काल्पनिक संवाद .

शेखरमोघे's picture

28 Jul 2015 - 6:48 pm | शेखरमोघे

लिखाण आवडले. असे अजस्र आकडे कल्पनेपलिकडले असल्याने आपली ग्रहमालिका "प्रचन्ड" आहे यापलिकडे आम्हा पामरान्चे ज्ञान जावे या साठी श्री सामन्त अथवा इतर जाणकार एखादी मालिका लिहितील का?

विवेकपटाईत's picture

28 Jul 2015 - 8:22 pm | विवेकपटाईत

लेख आवडला.

आईचा शोध बॉलीवूड वालेच लाऊ शकतील. सध्या नाशिकात कुंभ मेळा भरलेला आहे, बहुतेक तिथे सापडण्याची शक्यता.