पुन्हा पाऊस

सटक's picture
सटक in जे न देखे रवी...
2 Jul 2015 - 7:27 pm

आला आला रे पाऊस, असे असे बरसले
अधीरल्या धरतीचे, लाजू लाजू पाणी झाले !

अंगप्रत्यंगी थरार, गात्रे ओथंबू वाहाती
एका रात्री असे झाले, काय सांगू तुल किती !

किलकिले डोळे होतं, वाटे थांबल्यासारखे...
आळसल्या त्या सकाळी, देता आळोखे पिळोखे !

हाय! परतुनी आला, पुन्हा रत अविरत..
सुखांताने अंधारून, देई आकाश संगत !

धुंद धरा धुंद पाऊ, माग कुणालाच नाही
उद्या सकाळी परंतु, वर येई नवलाई !

तरारून येता कोंब, पहा झुलतात झुले
मीलनाच्या एकांताला, येती हिरवाळी फुले !

हिरवाळीत नवोढ्या, मन भटक भटक
उगी रोखू पाहू नको, होई पाऊल "सटक" !

शृंगारकविता